Friday 24 February 2023

मेरी याद में तुम ना आंसू बहाना

हिंदी चित्रपट सृष्टीत एक काळ असा होता, जेंव्हा गाण्यातील कवितेला आणि त्या काव्याला समजून, स्वररचना करताना त्याला भारतीय संगीताचे लेणे बहाल करण्याचा. हा काळ अगदी विस्मृतीत गेला असे म्हणता येणार नाही परंतु आता अभावानेच अशा प्रकारची गाणी तयार होताना दिसतात. अर्थात काळ बदलतो, काळानुरूप अभिरुची बदलते आणि त्या अभिरुचीला धरून आवड निर्माण होत असते. तरीही काही मूलभूत गाष्टी तितक्याच महत्वाच्या असतात आणि त्या कायम चिरंतन राहणारच, त्यातील एक बाब म्हणजे गाण्यातील मेलडी. मेलडी हा भारतीय संगीताचा प्राण! अर्थात निखळ मेलडी ही रागदारी संगीतात प्रकर्षाने ऐकायला मिळते परंतु आपले भारतीय संगीतकार इतके प्रज्ञावान की त्यांनी ललित संगीतात त्याचा सढळ वापर केला आणि तो तसे करताना, मेलडीला अनेक अंगाने सजवले, प्रसंगी मगदुराप्रमाणे वळवून देखिल घेतले. इथे बरेच वेळा एकमुद्दा उपस्थित केला जातो. मेलडी म्हणजे काय? भारतीय संगीत सुरप्रधान आहे, हे निश्चित आणि या सुरांना धरूनच मेलडी अवतरते. परंतु नुसता एक सूर गायला म्हणजे मेलडी तयार होत नसते. अर्थात बहुदा २,३ सूर एकत्रित गायला घेतले म्हणजे मेलडी तयार होते, हे म्हणणे देखील धार्ष्ट्याचे ठरेल. तेंव्हा काही ठराविक सुरांचा समुच्चय गाताना, त्यात संगती निर्माण करून एकामागोमाग एक, अशी स्वरसंहती तयार करणे म्हणजे मेलडी होय, असे सर्वसाधारणपणे मांडता येईल. अर्थात हे फार ढोबळ आणि प्राथमिक वर्णन झाले परंतु एका गाण्याच्या संदर्भात आणखी विस्ताराने किती लिहिणार? तेंव्हा हा विषय इथे मांडण्यात, एक औचित्य साधायचे होते आणि ते म्हणजे आजचे आपले गाणे *मेरी याद में तुम ना आंसू बहाना*, मेलडीच्या अंगाने कसे सौंदर्याधिष्ठित झालेले आहे, याचा अदमास घेता येतो. राजा मेहदी अली खान यांनी शब्दबद्ध केलेले गीत आहे. मुळातला कवी परंतु बऱ्याच चित्रपटांसाठी गीतरचना केलेला कवी. उर्दू भाषेतील प्रतिष्ठित शायरांमध्ये याचे नाव फारसे प्रचलित नाही परंतु चित्रपटासाठी सक्षम गाणी लिहिणारा, असा ख्यातकीर्त आहे. विशेषतः संगीतकार मदन मोहन सोबत त्यांनी बऱ्याच असामान्य गीतासाठी हात मिळवलेला आहे. उर्दू आणि हिंदी शब्दांचा यथोचित वापर करण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. चित्रपटगीत लिहिताना बरेचवेळा अनावश्यक अक्षरांची जोडणी करावी लागते कारण तिथे स्वरिक लयीला प्राधान्यक्रम असतो. तरीही *प्रचलित* मधून *अप्रचलित* निर्मिती करण्याचे कौशल्य अप्रतिम आहे. सर्जनशीलता मर्यादित अर्थाने का होईना, तिथे दिसते. मुखड्यातील ओळींमध्ये *समझना के एक था सपना सुहाना* या ओळीत वास्तविक *के* अक्षराला स्वतंत्र अर्थ नाही परंतु त्या अक्षरानेच एक लय पूर्ण होते, हे महत्वाचे. *निगाहें* किंवा *मोहब्बत के काबिल* सारख्या शब्दांच्या पखरणीने कवितेला एकप्रकारचे वजन प्राप्त होते आणि हे नाकारता येणार नाही. बाकीची कविता, तशी सरळ,साधी आहे पण गेयता अचूकपणे मांडलेली आहे. त्यामुळे संगीतकाराला एक सक्षम शायरी संगीतबद्ध करायला मिळाली, हे महत्वाचे. संगीतकार मदन मोहन याची *तर्ज* आहे. राग *जौनपूरी* रागाशी संबंधित प्रस्तुत स्वररचना आहे. आता आपल्याला माहीत आहे, असे व्यासंगी संगीतकार शक्यतो रागाच्या चलनाच्या आधाराने स्वररचना न करता, त्यातील *वेचक* भागावर आधारित चालीची निर्मिती करतात. इथे असेच झाले आहे. कसे ते बघूया. *गंधार* स्वर *आरोही* सप्तकात वर्ज्य आहे परंतु *अवरोही* सप्तकात *गंधार*,*धैवत* आणि *निषाद* स्वर *कोमल* लागतात आणि बाकीचे स्वर *शुद्ध* स्वरूपात योजले जातात. मुखड्याची पहिलीच ओळ घेतल्यास, *मेरी याद में तुम ना* ही ओळ *सा सा रे रे म म म प प प* अशा सुरांत येते. लक्षात घेण्यासारखे म्हणजे इथे *गंधार* घेतला नाही. पुढील *आँसू बहाना* मुद्दामून वेगळे घेतले कारण इथे *मींड* आहे. आता *आँसू बहाना* घेताना, संगीतकाराने *प सा(किंचित लांबवलेला) नि/सा रे नि ध प* अशा प्रकाराने स्वर घेतले आहेत. अर्थात हा एक तांत्रिक भाग झाला परंतु एक गाणे म्हणून विचारात घेतल्यास, काही मुद्दे मांडावेसे वाटतात. संगीतकाराने चाल बांधताना, निश्चितपणे तलत मेहमूद आणि त्यांच्या गायकीचा विचार केला असणार. आपण ज्या गायकाला आपली स्वररचना देत आहोत, त्याचा गळा आणि गळ्याच्या मर्यादा, दोन्ही गोष्टीचा अचूक अंदाज बांधलेला दिसतो. सुरवातीपासून *मध्य लयीत* गाणे सुरु होते. इथे जरी *जौनपुरी* रागाची सावली असली तरी गायकाच्या गळ्याला कुठल्या प्रकारच्या हरकती शोभणाऱ्या आहेत, हा विचार दिसून येतो. मुखडा आणि अंतरे जवळपास सारखे आहेत. पहिला अंतरा किंचित वरच्या सुरांत सुरु होतो पण अगदी तार सप्तक गाठत नाही. संगीतकार मदन मोहन यांची गाणी बांधायची एक शैली होती. लखनवी ढंगाने चाली बांधण्यात हा संगीतकार माहीर होता. बहुदा *बेगम अख्तर* यांच्या गायकीचा असर असणार. अर्थात संगीतकाराने, या गायिकेचा प्रभाव अनेकवेळा मान्य केला आहे. एकामागून एक शब्द घेताना, कुठेही शब्दांचे औचित्य भंग होत नाही तर कवितेतील आशय सुरांद्वारे अधिक अधिक खोल होतो. गायक म्हणून तलत मेहमूद यांच्या गळ्याला निश्चित मर्यादा होत्या परंतु आपले *परिप्रेक्ष्य* काय आहे,याची वाजवी जण ठेवली आणि त्यानुरुपच गाणी गायला घेतली. त्यांना माहित होते, आपण इतरांसारखे गाऊ शकत नाही पण आपली ओळखआणि आवड नक्क्की केली तर आपल्याला आपल्या अभिरुचीची गाणी मिळू शकतात आणि तसे त्यांनी सिद्ध केले. अर्थात हा गायक देखील लखनवी संस्कृतीत मुरलेला असल्याने, गाणे गायच्या आधी, काव्याचा ठराविक दर्जा, चालीचे मूल्य आणि आपण गाऊ शकू की नाही, याची अचूक धारणा,आपल्याला नेहमी बघायला मिळाली. यासाठी आपली आपल्यालाच ओळख असावी लागते. गाणी गाताना, गाण्यात किती हरकती घ्यायच्या, शब्द किती ताणायचा वगैरे बाबतीत या गायकाचे गायन आदर्श मानावे, इतपत योग्यतेचे निश्चित होते. तलत मेहमूद यांच्या आवाजातील *आर्जव* हा गुण विशेष आहे. कुठलेही गाणे ऐकायला घ्या, धीम्या गतीने, शांतपणे शब्दांचा आस्वाद घेत गायन करायचे,ही त्यांची गायन प्रकृती. आपल्या मराठीतील अरुण दात्यांवर तलत मेहमूद यांच्या गायकीचा सुरवातीच्या काळात प्रभाव होता. गायला घेतलेले गीत एका विशीष्ट दर्जाचे आहे, हे ध्यानात ठेऊन, ते नेहमी गायन करीत असत. *ये रो रो के कहता है टुटा हुआ दिल* हे मुद्दामून ऐकावी. ओळीत दु:खाचा कडेलोट आहे पण म्हणून गाताना अभिव्यक्ती संयमित आहे, कुठेही आकांत नाही. आता आयुष्य मुकेपणाने, झुरत काढायचे आहे, ही विषण्ण करणारी जाणीव ऐकायला मिळते आणि हे जाणीव अतिशय सुरेलपणे ऐकायला मिळते. *जुदा मेरी मंज़िल, जुदा तेरी राहें,मिलेगी न अब, तेरी मेरी निगाहें* ही ओळ देखील वरील विवेचनाचा पुरावा म्हणून दाखवता येईल. *निगाहें* गाताना, एका दुखऱ्या भावनेची अतृप्त अशी जाणीव दिसते. आपले गायन हे नेहमीच संयत तरीही प्रभावी कसे करावे, यासाठी तलत मेहमूद यांची गायकी अभ्यासण्यायोग्य आहे. मेरी याद में तुम ना आँसू बहाना न जी को जलाना,मुझे भूल जाना, समझना के एक था सपना सुहाना वो गुज़रा जमाना, मुझे भूल जाना जुदा मेरी मंज़िल, जुदा तेरी राहें मिलेगी न अब, तेरी मेरी निगाहें मुझे तेरी दुनिया से है दूर जाना न जी को जलाना,मुझे भूल जाना ये रो रो के कहता है टुटा हुआ दिल नहीं हूँ मैं तेरे मोहब्बत के काबिल मेरा नाम तक अपने लबों पे ना लाना न जी को जलाना,मुझे भूल जाना (2) meri yaad me na tum aansu bahana, mujhe bhool_Madhosh_Manhar &MeenaKumari_Talat_R M A Khan_ MM_a tri - YouTube

No comments:

Post a Comment