Wednesday 15 March 2023

हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू

"फिके फिके रंग व्हावे गर्द गर्द निळे डोळे डोळ्यांत तसेच झाकून राहिले तुझ्या माझ्या अस्तित्वाची स्तब्ध रानजाळी एकदाच उजळेल मरणाच्या वेळीं रंग रंगांत तोंवरी गर्दसे वाहूं दे प्राण होऊन पावरी वाजत राहूं दे" आरतीप्रभूंच्या एका अप्रतिम कवितेच्या ओळी, आपल्या मनाच्या नेहमीच ठाव घेतात आणि आपण एकदम अंतर्मुख होतो. शब्दांचा असा अनिर्वचनीय अनुभव आपल्याला हलवून जातो. सुंदर कवितेंबाबत असा अनुभव येणे ही आनंदपूर्ती असते आणि अशी पूर्तता आपल्याला वारंवार मिळायला हवी, असे वाटायला लागते. चित्रपट संगीतात किंवा एकूणच संगीतात, रसिकांच्या दृष्टीने या सांगीतिक आविष्कारात सुरांचे महत्व अनन्यसाधारण असते आणि ते साहजिकच आहे. सुरांचा अमूर्त भाव नेहमीच मनावर गाढा परिणाम करीत असतो आणि त्यामानाने शब्द/भाषा माध्यम अपुरेच असते. याचा परिणाम असा झाला, आस्वादाच्या दृष्टीने सुरांचे महत्व अपरिमित वाढले आणि शब्दांना बरेचवेळा दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली, हा अर्थातच चुकीचा पायंडा पडला. जर का गाण्यात शब्द नसतील तर होणारा आविष्कार, धून या सदरेत मोडतो, म्हणजे गाण्यात शब्द तर हवेतच पण त्याचे स्थान तसे खालच्या पायरीवर ठेवायचे, असाच विचार बळावला गेला. त्यातून(च) असे घडले असावे, सुगम संगीतासाठी शब्दकळा "चटपटीत" असणे जरुरीचे आहे, हा विचार पुढे आला आणि जवळपास निकष, या स्वरूपात मान्यता पावला. याचा मुख्य परिणाम असा झाला, सुगम संगीतासाठी शब्दकळा लिहिणारे हे "गीतकार" आणि स्वतंत्र लिहिणारे हे "कवी" असला पंक्तिप्रपंच निर्माण झाला. तसे जरा खोलात जाउन बघितले तर सहज समजून घेता येईल, जे कवी म्हणवतात, त्यांच्या देखील कित्येक रचना केवळ "टुकार" म्हणता येतील अशा आहेत, या वाक्याचा उत्तरार्ध असा मांडता येईल, जी गीतकार म्हणून गणले जातात, त्यांनी देखील काहीवेळा, अत्यंत सकस, अर्थपूर्ण आणि घाटदार रचना लिहिली आहे. मग प्रश्न असा उरतो,असा पंक्तिप्रपंच निर्माण करून नेमके काय साधतो? या मताला पुष्ठ्यर्थ म्हणून हे गाणे दाखवता येईल. गुलजार हे मुळातले भावगर्भ कविता लिहिणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बहुतेक रचना वाचल्यास,एक बाब लगेच ध्यानात येते. कवितेतील शब्द तसे साधे असतात, प्रतिमा तशा परिचयातील असतात पण त्याची "जोडणी" फार विलक्षण असते आणि साध्य शब्दातून, ते अतिशय तरल,भावपूर्ण आशय आपल्यापुढे सादर करतात, ज्याला आपण सहजपणे "भावकविता" म्हणू शकतो. आपल्या सर्व प्रेरणा व कृती यांच्यामध्ये एक अविभाज्य नाते असते. विचाराच्या पातळीवर हे नाते स्पष्टपणे कार्यकारणभावाचे असते. परंतु भावना, इच्छा, संवेदना, कल्पना व विचार या सर्वांनी सिद्ध होणाऱ्या प्रेरणाक्षेत्रामुळे घडलेल्या आपल्या सखोल अशा भावानुभवात कार्यकारणभाव स्पष्टपणे दाखवणे अशक्य असते. प्रेरणाक्षेत्राची संमिश्रता, तसेच प्रेरणा व कृती यांच्यासंबंधातील संमिश्रता आणि या सहस्थिती इथे पोहोचू शकत नाही. तर्कात्म सूत्रावर बांधलेली अनुभवाची बंदिश ही नेहमीच निश्चिततेकडे जाते, कार्य आणि कारण यातील संबंध स्पष्ट करीत असते. तो अनुभव अशा विचाराशिवाय वेगळा होतो आणि म्हणून अधिक बुद्धिगम्य होतो. भावकवितेचे अंग काही प्रमाणात स्पष्ट होऊ शकेल. खरतर इथे बौध्दिक प्रवासाची चर्चा येऊ शकते पण हा भाग रसिकतेच्या पलीकडे जाणारा असल्यामुळे, त्याची चर्चा इथे नको. कवितेत ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. मुळात भावकवितेचे कार्य हे भाववृत्तीने भारलेल्या क्षणांचे स्पंदन जाणवून देणे, त्या क्षणांमधील सारे ताण शब्दांकित करणे, हे असते आणि हे सगळे गुलजार यांच्या कवितेत आढळतात. अशी सक्षम शब्दकळा हाती आल्यावर संगीतकाराला सांगीतिक रचना करायला निश्चित हुरूप येतो. संगीतकार हेमंतकुमार (जरी मूळचे गायक असले तरी !!) यांचा संगीताचा पाया व्यापकप्रमाणावर बंगाली संगीत आणि रवींद्र संगीतावर आधारलेला जरी असला तरी, त्यांची कवितेबद्दलची जाण, त्यांनी आपल्या यापूर्वीच्या गाण्यांतून नेमकेपणे दाखवलेली आहे. पारंपारिक संगीत आणि आधुनिक संगीत याचा मेळ, त्यांच्या रचनेत नेहमी आढळतो. आपल्याला संगीत रचना निर्माण करायची आहे आणि त्यासाठी आपण, हाती असलेल्या शब्दांच्या सहाय्याने बनवायची आहे, याचे नेमके भान त्यांच्या रचनेतून सारखे दृग्गोचर होत असते. शब्दांना सुरांचे आवरण चढवायचे परंतु ते करताना, शब्दात जो "आशय" दडलेला असतो, तिथून आपले लक्ष जरादेखील विचलित नाही!! प्रसंगी सांगीतिक रचनेला थोडी मुरड देखील, त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. या गाण्यात, या विचाराचे तंतोतंत प्रत्यंतर येते. गाण्याचा पहिल्या २ ओळी बघूया. "हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू, हाथ से छुके इसे रिश्तो का इल्जाम ना दो; सिर्फ एहसास है ये रुह से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो." मी वरती म्हटले तसे, दोन्ही ओळीत एकच कल्पना मांडली आहे. शब्द सगळे परिचित आहेत " आंखो की महकती खुशबू" आहे पण त्याला स्पर्शाने डागाळू नये, अशी इच्छा आहे आणि त्याच जोडीला, प्रत्येक संबंधाची इतिश्री नात्यातच हाण्याची अजिबात गरज नसते, असला इशारा देखील आहे आणि हे सगळे फक्त "महसूस करो" याच पातळीवरील भावनेत आहे, इथे "तर्कात्म बंदिश" पूर्ण होते. सांगीतिक दृष्टीने बघायला गेले तर, साधारणपणे,बहुतेक गाण्यात, गाण्याच्या आधी थोडासा वाद्यमेळ असतो, ज्यायोगे चालीचे सूचन होईल पण इथे सुरवातीला काही क्षणांपुरते व्हायोलीनचे सूर वाजतात आणि कानावर लताबाईंचा सूर येतो, अगदी स्पष्ट तरी व्याकूळ करणारा!! पुढील रचना कशी विस्तारित होणार आहे, याची कल्पना देणारा!! लताबाईंच्या गायनाचे हे एक प्रमुख लक्षण म्हणता येईल. ओळीच्या पहिल्या काही शब्दातच त्या, संगीतकाराच्या रचनेची ओळख करून देतात आणि हे फार कठीण आहे. गाताना, इथे "छुके" या शब्दावर किंचित थरथर आहे पण, हा स्वरिक आविष्कार, पुढील शब्दांतील आशय अधिक खोलवर जाणवून देणारा!! संगीतकार आणि गायक, हे रचनेतील छुपे सौंदर्य अशा प्रकारे आपल्यापुढे सादर करतात पण आपणच बरेचवेळा दुर्लक्ष करतो!! लगेच पुढे येणारा "एहसास" शब्द आवर्जून ऐकावा. भावनेत आर्जव जरूर आहे पण, तरीही भावविवशता नाही आणि हेच या उच्चारातून दाखवून दिले आहे. इथे गाण्याचा विचार करताना, मी प्रामुख्याने "गाणे" हेच ध्यानात घेतले आहे आणि चित्रपट आणि त्यातील प्रसंग बाजूला ठेवले आहेत कारण, तो विचार, संपूर्ण चित्रपटाच्या संदर्भात घेणे, मला योग्य वाटते. या चार ओळी, दोन वेळा गायल्यामुळे, कवितेतील आशय आणि त्याची व्याप्ती, नेमकेपणी आपल्याला जाणवते आणि संगीतकार म्हणून हेमंतकुमार यांचे महत्व अधोरेखित होते. एकदा की गाण्याचा "मुखडा" झाला की मग पुढील बांधणी तशी तर्कात्म पद्धतीने विस्तारित करता येते अर्थात, काही संगीतकारांचे प्रयोग, पुढील रचनेत देखील दिसून येतात, पण तो भाग वेगळा!! "मुखडा" देखणा झाला म्हणजे गाण्याचा परिणाम साधण्याच्या दृष्टीने, संगीतकाराचे अर्धे अधिक काम पूर्ण होते, हे मात्र मान्यच करावे लागेल.मुखड्याचे स्वरलेखन बघितल्यास, अधिक स्पष्ट यावी. *हम ने दे खीsहै उन आँखों की म ह क ती खु श बू* *ग गरे रेसा सा.... सा.... रेसा.... सानि नि नि सासा सारेरे.....* गाण्याची स्वररचना *पिलू* रागावर आधारित आहे. *रिषभ,धैवत* वर्ज्य असलेला राग(आरोही सप्तकांत) असून रागात दोन्ही *गंधार,धैवत आणि निषाद* स्वर लागतात(अवरोही सप्तकांत). त्यामुळे रागाची ठेवणं "औडव/संपूर्ण* अशा धर्तीची आहे. गाण्यात सर्वत्र दरवळणारा *दादरा* ताल आहे. पहिला अंतरा येताना, अचानक व्हायोलीनचे स्वर वरच्या सप्तकात जातात आणि तिथेच काही क्षण तरळत राहतात. वास्तविक, गाण्याची सुरवात मंद्र स्वरांत झालेली आहे तरीही अंतरा बांधताना, वाद्यमेळ तीव्र स्वरांत वाजतो वाद्यमेळ म्हणजे इथे प्रामुख्याने व्हायलीन हेच वाद्य आहे पण, जरा बारकाईने ऐकले तर समजेल, इथे अनेक व्हायोलिन्स वेगवेगळ्या स्तरावर वाजत आहेत आणि तरीही अंतरा संपताना, एकाच स्वरावर विलीन होत आहेत. "प्यार कोई बोल नही प्यार आवाज नही, एक खामोशी है सुनती है कहा करती है; न ये बुझती है न रुकती है न ठहरी है कहीं. नूर की बुंद है सदियो से बहा करती है. सिर्फ अहसास है ………" किती तरल कल्पना आहे आणि ती देखील अत्यंत साध्या शब्दातून व्यक्त झाली आहे. कविता समजून घेण्यासाठी फारसे कष्ट पडत नाहीत पण वाचताना, वाचनानंद म्हणून जो काही असतो,त्याचे पुरते माप आपल्या पदरी पडते!! वास्तविक प्रेमाची भावना आणि अभिव्यक्ती ही मानवाच्या आयुष्यात अनंत काळापासून चालत आलेली आहे आणि यापुढे अशीच चालत राहणार आहे, हेच वैश्विक सत्य, कवीने किती अप्रतिम शब्दात मांडले आहे, "खामोशी". "सदियो" सारख्या प्रतिमा चपखलपणे वापरल्या आहेत. हेमंतकुमार यांनी हा अंतरा संपवताना, पारंपारिक पद्धतीने पहिल्या ओळी न वापरता, तिसरी आणि चौथी, अशा ओळी वापरल्या आहेत आणि यामागचे कारण एकच संभवते - शब्दातील दडलेला आशय अधिक गडद करणे. किंचित वरचा स्वर लावून, कडव्याला सुरवात होते आणि ती सलगपणे " नूर की बुंद है सदियो से बहा करती है"या शब्दापर्यंत सुरावट चालू आहे. जिथे वाद्यसंगीत संपले तिथला "वरचा" स्वर उचलून, रचना त्याचा स्वरात पुढे सरकते आणि सगळे कडवे काहीशा वरच्या सुरात गायले जाते. पण तीही परत " सिर्फ अहसास है …." इथे येताना स्वर पहिल्या ओळीच्या सुरांशी जवळीक साधतो. हे जे सुरांचे "जोडकाम" आहे, इथे कलाकाराची व्यामिश्रता दिसून येते. हे काम सोपे नाही. काव्याची नेमकी जाण असेल तरच असले जमू शकते. दुसरा अंतरा देखील पाहिल्याप्रमाणे(च) वरच्या सुरांत सुरु आहे पण, काही क्षणात, वाद्यमेळातील काही व्हायोलिन्स एकदम "खर्जाच्या" सुरांत येतात!! म्हणजे बघा, एका पातळीवर काही व्हायोलिन्स टिपेचा सूर लावतात, तिथे तेच वाद्य त्याचवेळेस, खर्जाचा सूर लावून, शब्दातील भावना अधिक अंतर्मुख करतात!! प्रत्येक वाद्याचा स्वत:चा असा एक गुणधर्म असतो आणि त्यानुरूप त्यावर सूर वाजण्याची क्षमता असते. त्या वाद्याची जातकुळी, क्षमता याचा पुरेपूर उपयोग करवून घेण्यातच संगीतकाराची कुशलता दडलेली असते आणि त्यायोगे गाण्याचे सौंदर्य अधिक खुलवण्याची ताकद अजमावता येते. वाद्यांचा खर्जातील सूर जिथे सुरु होतो, तिथे खरतर गाणे सिद्ध होते, असे मला वाटते. यातही एक गंमत आहे, गाण्यात व्हायोलिन्स भरपूर आहेत पण त्याच सुरांना पियानोचे सूर देखील साथ कशी देतात, हे ऐकण्यासारखे आहे. "मुस्कुराहट सी खिली रहती है आंखो मे कहीं, और पलको पे उजाले से झुके रहते है; होंठ कुछ कहते नही कांपते होठो पे मगर, कितने खामोश से अफसाने रुके रहते है. हमने देखी है ……." "मुस्कुराहट सी खिली रहती है" हे शब्द ऐकताना जरा विचार केला तर असे दिसेल, गाण्याच्या चालीच्या "मीटर" मध्ये "मुस्कुराहट" हा तसा मोठा शब्द सहज खपून जाण्यातला नाही पण, संगीतकाराने, चालीत बसवताना, हा शब्द कसा घेतला आहे, हे आवर्जून ऐकण्यासारखे आहे. मघाशी मी जे म्हटले होते, प्रसंगी हा संगीतकार, शब्दांसाठी चालीला किंचित "वळण" किंवा "मुरड" घालतो, ते इथे दिसून येते. अर्थात, इथे एकाच लेखात या गाण्याचे सगळे सौंदर्य विशद करणे, तसे फार अवघड आहे. वास्तविक गाण्यात एकच भावना मांडलेली आहे परंतु ती भावना, ज्या वेगवेगळ्या प्रतिमांच्या सहाय्याने मांडली आहे आणि त्या भावनेचे स्फटीकीकरण सुरांच्या सहाय्याने कशी अधोरेखित केली आहे, हेच लिहिण्याचा हा सगळा प्रपंच!! @अनिल गोविलकर

No comments:

Post a Comment