Tuesday 7 March 2023

मैं पागल मेरा मनवा पागल

आपल्याकडे काय किंवा एकूणच जगात, लोकांची आवड, हा विषय अती दुर्घट मानला जातो. त्याला महत्त्वाचे कारण, व्यक्ती तितक्या प्रकृती, हेच लागू होते. एकाची आवड दुसऱ्याशी जुळणे अवघड असते. अर्थात याचा दुसरा परिणाम असा दिसतो, त्यामुळे आवडीची वैविध्ये बघायला मिळतात. संस्कृती संपन्न होते. हाच प्रकार ललित संगीतात वारंवार अनुभवायला मिळतो. अगदी हमरीतुमरीवर वाद झडतात. खरंतर ३ मिनीटांच्या गाणे पण तरीही त्यात प्रचंड वैविध्य आढळते आणि रसिकांत मतभैदांना वाव मिळतो. एक मुद्दा तर विशेष करून ध्यानात घ्यावा लागेल. एखादे गाणे केवळ प्रचंड जाहिरात करून, लोकांच्या मनावर बिंबवणे! पूर्वी रेडिओ होता, आता इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी उपलब्ध आहेत, जेणेकरून गाणे लोकांना सतत ऐकायला मिळावे आणि त्यातून गाण्याची लोकप्रियता वाढत जावी. त्यामुळे, मुळात गाणे किती कसदार आहे? हा प्रश्नच उद्भवत नाही. निर्मात्याचा बक्कळ फायदा होतो. बरेचवेळा अशा प्रकारे उबवलेली गाणी अल्पजीवी ठरतात. गाण्यात, प्रत्येक घटकाचा कस लागलेला असावा म्हणजे दर्जा आपसुकच वाढतो. अर्थात रसिकाश्रय, हा मुद्दा विवादास्पद राहतो. आजचे आपले गाणे - "मैं पागल, मेरा मनवा पागल", हे गाणे, गाणे म्हणून सर्वार्थाने अप्रतिम असून, दुर्दैवाने विस्मरणात गेले. का गेले? या प्रश्नाचा कारणमिमांसा करता येत नाही. गाण्याची शब्दरचना प्रसिद्ध कवी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिली आहे.राजेंद्र कृष्ण, अगदी चित्रपटसृष्टीत नावाजलेले कवी आहेत. विशेषतः त्यांच्या शब्दरचना गीताला अनुकूल अशाच असतात. गीतासाठी शब्दरचना फारशी क्लिष्ट असू नये तसेच गेयताप्रधान असावी, अशी काही ठळक वैशिष्ट्ये वाचताना जाणवतात. प्रसंगी उर्दू शब्दांचा सढळ हाताने उपयोग केलेला आढळतो. या त्यांच्या शैलीमुळे, त्यांचे अनेक प्रतिभावान संगीतकारांशी जमले आणि हिंदी चित्रपटसंगीतात फार मोलाची भर पडली. कविता वाचताना,काही प्रतिमा असंख्य वेळा त्यांनीच कुठेना कुठेतरी वापरल्याचे समजून घेता येते. अर्थात सातत्याने शब्दरचना करायचे म्हटल्यावर अटळपणे तोचतोचपणा कवितेत येणे क्रमप्राप्त ठरते. शब्दरचना वाचताना, आपल्याला देखील त्यातील शाब्दिक लय सापडते आणि पुढे गीताची चाल ऐकताना, गाण्यातील खटके अचूकपणे शब्दांमधून मांडल्याचे दिसून येते. ही या कवीची खास हातोटी होती, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. मर्यादित प्रतिभा पण एकूणच चित्रपट गीताचे नेमके तंत्र जाणून घेऊन, गीते लिहिणारा कवी, असे सार्थ वर्णन करता येईल. संगीतकार मदन मोहन यांची स्वररचना आहे. मदन मोहन यांची स्वररचना म्हटल्यावर, त्यांची विशिष्ट शैली उभी राहते. वाद्यमेळाची खास रचना ब-याच गाण्यांमधून बघायला मिळते. अर्थात, थोडा विचार केल्यास प्रत्येक संगीतकाराची ठराविक शैली असते आणि ती, त्यांच्या रचनांमधून ऐकायला मिळते, मग गाण्याच्या चालीत कितीही वैविध्य असू दे. आजचे गाणे जरी संगीतकाराची शैली दाखवत असले तरी थोडेफार फारकत घेणारे आहे. अगदी सुरवातीचा वाद्यमेळ ऐकायला घेतल्यावर या विधानाची चुणूक मिळते. स्वरमंडळाच्या सुरात व्हायोलिनचे सूर मिसळतात आणि गाण्याचा गाढा परिणाम मनावर व्हायला लागतो. अर्थात जिथे व्हायोलिन संपते, तिथे सतार झमझमायला लागते आणि सतारीचे सूर या संगीतकाराची शैली स्पष्ट करतात. सतार वाद्य, संगीतकार मदन मोहन यांच्या स्वररचनेत नेहमीच प्राधान्यपुर्वक आपले अस्तित्व दर्शवत असते. या वाड्याचा "टणत्कार" कानाला सुखवून जातो. केदार रागावर आधारित स्वररचना आहे पण रागाची प्रकृती बघता, रागातील एखादी फ्रेज ऐकून गाण्याची तर्ज बनवली आहे, असे समजून घेता येते आणि हे या संगीतकाराचे वैशिष्ट्य. गाण्यातील ताल - केरवा असून त्याचे प्रचलित स्वरूप ऐकायला मिळत नसून, "मटका" धर्तीवर तालाच्या मात्रा घेतल्या आहेत. असे करताना, गाण्याचा भावार्थ मात्र गहिरा ठेवण्यात यश मिळवले आहे. करुण भावना आहे त्यामुळे गाण्याची लय अतिशय संथ आहे. रागाशी संबंध ठेवायचा परंतु त्यातील आवाहक सुरावटींकडे लक्ष देऊन, गाण्याची उभारणी करायची. असे संगीतकार नेहमीच गाण्यातील काव्याला नेहमीच प्राधान्य देतात. आणखी वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, गाण्यातील लय तर सांभाळतात परंतु त्यापेक्षा सुरावट आणि त्याचे चलन, या घटकांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याचे आढळते. याचाच परिणाम, गझल वृत्ताकडे या संगीतकाराची आवड का झुकली? या प्रश्नाचे उत्तर सापडते. त्यातून या संगीतकाराला एकूणच "वेदना" या भावनेचे पराकोटीचे आकर्षण असल्याचे, समजून घेता येते. आजचे गाणे, या भावनेचा "अर्क" आहे, असे मानता येईल. आपल्या स्वररचनेने रसिकांना दिपवून टाकावे, मग त्यात अवघड हरकती किंवा दीर्घ ताना, इत्यादी सांगीतिक अलंकारांचा उपयोग करावा, असे फारसे ऐकायला मिळत नाही. एखादी जखम हळूहळू चिघळत जावी आणि त्या वेदना सहन करणे, इतकेच प्राक्तन असावे, असा भाव गाण्यात दिसतो. गायक तलत मेहमूद, यांच्या गायकीला सुयोग्य अशीच स्वररचना आहे. मुळात संगीतकार मदन मोहन आणि गायक तलत मेहमूद, हे दोघेही लखनौ संगीत वारशाचे प्रतिनिधी म्हणावेत, इतका जवळचा संबंध राखून आहेत. गाण्याच्या मुखड्यापासून जी सुरवात होते, तिथून "हताशता" किंवा "विखार" अशा भावना ऐकायला मिळतात आणि गायनावर काळी छाया पडलेली आहे. "कहे ये दुनिया मैं दीवाना, दिन में देखूं सपने" या ओळी माझ्यावरील विधानाला पूरक म्हणून सांगता येतील. तसेच शेवटचा अंतरा ऐकायला घेतल्यास, "छुपी हुई मेरी काया में,राख किसी परवाने की" हीच भावना प्रकर्षाने ऐकायला मिळते. याची दुसरी बाजू अशी, आपली गायनाची शैली ओळखूं, त्यावरच ठाम राहिल्याने, या गायकाला वारंवार संधी मिळणे अशक्य होते. विशेषतः १९६० नंतर हिंदी चित्रपट संगीताचा ढाचा बदलला आणि त्या बदललेल्या संगीताला प्रतिसाद देणे, या गायकाच्या कुवतीबाहेर होते. अर्थात ही या गायकाची मर्यादा होती. असे असून देखील त्यांच्या गायकीचा प्रभाव पुढे मराठीतील अरुण दाते तसेच सुरवातीच्या काळातील जगजीत सिंग, यांच्यावर पडलेला होता,असे त्यांच्या काही रचना ऐकताना, समजून घेता येते. अर्थात पुढे या दोघांनी आपली शैली बदलली. एकूणच गायन हे कोमलमधुर, अंत:स्पर्शी, अंतर्मुख, काहीसे उदास आणि अनाक्रमक गायन हीच एक मान्यवर शैली ठरली. वास्तविक उदास, दु'खी प्रकृतीच्या गाण्यांना रसिकांचा प्रतिसाद नेहमीच मिळत आलेला आहे परंतु या आणि अशा काही गाण्यांचा अपवाद म्हणायला लागले. अन्यथा इतके नितांत रमणीय गाणे विस्मृतीत जाण्याचे काही कारण संभवत नाही. मैं पागल मेरा मनवा पागल पागल मेरी प्रीत रे पगले - पन की पीड़ वो जाने बिछड़े जिसका मीत रे कहे ये दुनिया मैं दीवाना दिन में देखूं सपने दीवानी दुनिया क्या जाने ये सपने हैं अपने घायल मन की हंसी उड़ाये छुपी हुई मेरी काया में राख किसी परवाने की ये मेरा दुखिया जीवन है रूह किसी दीवाने की मन के टुटे तार बजाकर  गाऊं अपने गीत रे (2) Main Pagal Mera Manva Pagal | Shaam-E-Ghazal | Ashiana | Talat Mahmood - YouTube

No comments:

Post a Comment