Wednesday, 9 November 2022

रणजी करंडक - हरपलेले श्रेय

१९७१ साली अजित वाडेकरच्या संघाने निव्वळ अभूतपूर्व यश मिळवून, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघांना, त्यांच्या भूमीत धूळ चारून, भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. त्यावेळी, इंग्लंडवरून मुंबईला परतल्यावर, मुंबईच्या पोलीस कमिशनर ऑफिसने, सगळ्या संघाचा सत्कार कार्यक्रम योजला होता. माझी आई त्यावेळी त्याच ऑफिसमध्ये - क्रॉफर्ड मार्केट हेड ऑफिसमध्ये नोकरीला होती. त्यावेळी आई त्या ऑफिसच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सातत्याने भाग घ्यायची. परिणामी तिच्या बऱ्याच ओळखी असायच्या. त्या ओळखीच्या संदर्भातून, मी आणि माझे नाना, त्या सत्कार समारंभा गेलो होतो. एका आलिशान बस मधून सगळा संघ आला होता. बसपासून २,३ फुटावर मी, माझ्या नानांचे बोट धरून (१९७१ साली माझे वय वर्षे १२!!) उभा असताना, एकदम नाना बोलले, "अनिल, तो बघ सोलकर!!" एखादे अद्भुत प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवावे, तसे मी डोळे विस्फारून सोलकरला बघितले. सोलकरने घेतलेल्या असामान्य झेलांची छायाचित्रे जमवण्याच्या आटापिटा सार्थकी लागला होता. नंतर मग वाडेकर, सरदेसाई, विश्वनाथ,गावस्कर आणि स्पिनर्स असे बाहेर पडले. कार्यक्रम बहुदा छानच झाला असणार कारण आता त्या स्मृती बऱ्याच अंधुक झाल्या पण सोलकरला प्रत्यक्ष बघितल्याचे चित्र मात्र आजही मनावर कोरलेले आहे. त्यावेळी आपल्या भारतीय संघातील हे सगळे खेळाडू म्हणजे भूलोकीवरील गंधर्व वाटायचे. याच पार्श्वभूमीवर पुढे रणजी सामने सुरु झाले. त्यावेळी ब्रेबर्न स्टेडियम म्हणजे क्रिकेट सामन्यांचे अद्वितीय श्रद्धाळू मंदिर!! अर्थात त्यावेळचा मुंबई संघ म्हणजे रत्नांची खाण होती. खेळाडू कितीही आंतर राष्ट्रीय ख्यातीचा झाला तरी, रणजी सामने, पावसाळ्यातील कांगा लीग सामने, कुणीही चुकवत नसे. मला आजही स्पष्ट आठवत आहे, याच काळात, मी नानांच्या बरोबरीने पहाटे उठून ब्रेबर्न स्टेडियमच्या तिकिटांच्या रांगेत उभे राहून, सामन्याच्या पहिल्या दिवसाचे तिकीट मिळवीत असे. गिरगावात रहात असल्याचा फायदा असा, मुंबईतील इतर प्रेक्षक ब्रेबर्न स्टेडियमपर्यंत येईपर्यंत, आम्हा दोघांकडे तिकीट मिळालेले असायचे. सगळ्यांच्या आता जाऊन, आपली जागा पकडण्याचे अपूर्व समाधान मिळवणे, हा आनंदाचा पुढील भाग. त्यावेळी बहुतांश जागी लाकडी फळ्या असायच्या पण त्याचे काहीही वाटत नसे. लवकर आत गेल्यामुळे या खेळाडूंची चाललेली "नेट प्रॅक्टिस" फार जवळून बघायला मिळायची. बहुतेक खेळाडू साध्या कपड्यात, हसत खेळत प्रॅक्टिस करत असताना बघणे, फार अपूर्वाईचे वाटत असे. त्यावेळी आमचे आनंद देखील साधेसुधे होते. सुनील अर्ध्या चड्डीत फलंदाजी करत आहे आणि हाच सुनील आंतरराष्ट्रीय सामन्यात आपली द्वाही फिरवून ख्यातकीर्त झालेला आहे आणि आज मी त्यालाच १५,२० फुटांवर फलंदाजी करताना बघत आहे - असे साधे आनंद होते. असेच समाधान, वाडेकर,सरदेसाई, सोलकर इत्यादी खेळाडूंना बघण्यात मिळत असे. जरा वेळानी सगळे आत पॅव्हेलियन मध्ये जात आणि मग अंपायर बाहेर पडत. अंपायर बाहेर येत आहेत, हे प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजराच्या आवाजाने समजून येत असे. एव्हाना, ब्रेबर्न स्टेडियम संपूर्णपणे भरलेले असायचे. पुढे मग वाडेकर आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार "टॉस" करायला यायचे आणि पुन्हा टाळ्यांचा प्रचंड गजर व्हायचा. सारा आसमंत नुसता गर्जून जायचा आणि वातावरण क्रिकेटमय व्हायचे. समाज मुंबईने टॉस जिंकला की लोकांनाच दिवस सार्थकी लागल्या सारखे वाटायचे कारण आता, सुनील आणि रामनाथ पारकर यांची फलंदाजी बघायला मिळणार!! हे दोघे बुटुकले फलंदाज म्हणजे मुबई संघाची शान होती. पारकर तर विजेच्या गतीने धावायचा. त्याचे क्षेत्ररक्षण बघणे, हा अवर्णनीय सोहळा असायचा. संपूर्ण "कव्हर्स" क्षेत्र एकटा सांभाळायचा. त्याच्या आसपास जरी चेंडू गेला असला तरी धाव घ्यायची एकही फलंदाजांची टाप नसायची, इतकी त्याची दहशत होती. मुंबईचा संघ त्यावेळी संपूर्ण भारतभर आपली दहशत राखून असायचा आणि त्या संघातील बरेचसे खेळाडू कसोटी सामने खेळणारे असले तरी शक्यतो रणजी सामने खेळायचे आणि आपली कौशल्ये पुन्हा पारखून घ्यायचे. रणजी सामन्यांना त्यावेळी तितकी मान्यता होती. रणजी करंडकाचे उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने म्हणजे उत्सव असायचा. मला आठवत आहे, १९९० पर्यंत तरी रणजी करंडकाचे सामने म्हणजे ऑफिसमधून सुटी घ्यायची आणि वानखेडेवर ५ दिवस हजर राहायचे. हा माझा कित्येक वर्षे परिपाठ असायचा. अशोक मंकड म्हणजे आमचा रणजी सामन्यांचा "दादा" फलंदाज. तो "काका" म्हणूनच प्रसिद्ध असायचा आणि जोपर्यंत काका आहे, तोपर्यंत मुंबई संघ सुरक्षित!! ही भावना आम्हा सगळ्या प्रेक्षकांची असायची आणि त्याला या काकाने फारसा तडा जाऊ दिला नव्हता. पद्माकर शिवलकर, राकेश टंडन हे मुंबईचे अद्वितीय स्पिनर्स. शिवलकर तर निव्वळ दुर्दैवी. बेदी आणि राजिंदर गोयल, यांच्या काळात जन्माला आला. आपल्याला कसोटी सामने खेळायला मिळण्याची शक्यता शून्य तरीही शिवलकरने वर्षानुवर्षे मुंबईला सामने जिंकवून दिले होते, अगदी एकहाती सामने जिंकवून दिले होते. खरंतर मी, माझ्या तरुणपणात रणजी करंडकाचे वैभवाचे दिवस बघितले. कॉलेज बुडवून रणजी सामने बघितले आणि त्याची धुंदी बाळगत, पुढील कित्येक दिवस धमाल केली होती. पुढे "टाइम्स करंडक" आणि पावसाळी दिवसातील "कांगा लीग" मधील सामने बघणे, हे माझ्या पिढीचे आद्यकर्तव्य होते. गंमत म्हणजे, पुढे दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अगदी संजय मांजरेकर पर्यंत सगळे खेळाडू आपले कर्तव्य मानून, या सगळ्या करंडकाच्या सामन्यातून भान हरपून खेळायचे. असे असंख्य सामने मला आठवत आहेत, जिथे मुंबई हरणार असे जवळपास नक्की व्हायचे पण मुंबईचा "काका" (कितीतरी वर्षे अशोक मंकड मुंबईचा कर्णधार होता आणि त्याच्या हाताखाली सुनील,एकनाथ, सरदेसाई, जीवाची बाजी लावून खेळायचे) कुठलीतरी क्लुप्ती लढवायचा आणि हरत असलेला सामना, मुंबईच्या खिशात जायचा. मला तर आजही असेच वाटते, अशोक मंकड सारखा कर्णधार झाला नाही. सचिनचा उदय झाला आणि हळूहळू रणजी सामन्यांचे आकर्षण कमी व्हायला लागले. वास्तविक खुद्द सचिन देखील वेळ मिळेल तसा रणजी सामने खेळतच होता. एकेवर्षी तर सचिनने द्विशतक करून, मुंबईला रणजी करंडक मिळवून दिला होता पण आता मुंबई बाहेरचे अनेक संघ तितकेच बलशाली व्हायला लागले. माझ्या तरुणपणी, मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली आणि कधीकधी हैदराबाद किंवा तामिळनाडू संघ, यांच्यात जीवघेणी चुरस असायची. पुढे, या खेळात प्रचंड पैसा आला तसेच मुख्य म्हणजे मुंबई संघाची रया गेली आणि एकूणच मुंबईपुरते आकर्षण कमी होत गेले. आता तर रणजी सामने कधी होतात, कोण जिंकते, असते प्रश्नच पडत नाहीत आणि रणजी करंडकाचे "ग्लॅमर" कधी संपले, हेच ध्यानात आले नाही.

No comments:

Post a Comment