Wednesday, 16 November 2022

कारागिरी आणि कला

शिर्षकावरून विषयाबद्दल कल्पना यावी. आपल्याकडे आजही या दोन्ही शब्दांबद्दल घोळ घातला जातो आणि याचे कारण या दोहोंतील सर्जनशीलतेबद्दल असलेली संदिग्धता. मुळात दोन्ही कृतीत "निर्मिती" हा घटक प्रामुख्याने अस्तित्वात असतो, हे मान्य व्हावे. काहीतरी तयार होणे आणि त्याला कलात्मक रूप मिळणे, या प्रक्रियेत कुठेतरी निर्मितीची बीजे अंकुरलेली असतात. अर्थात या प्रक्रियेची प्रक्रिया कशी तयार होते, याचा शोध हा जवळपास अशक्य असतो कारण अबोध मनाच्या तळाशी कुठेतरी याची प्रक्रिया चाललेली असते. त्यामुळेच बहुदा आपण मनाशी काय ठरवत असतो आणि प्रत्यक्षात काय बघायला मिळते, यात नेहमीच तफावत निर्माण होते. जरी आपणच निर्मिती करत असलो तरी हाती येणारे फळ हे नेहमीच अतर्क्य जरी नसले तरी पूर्णतः समाधान देणारे नसते आणि ही वस्तुस्थिती आहे. या हताशतेचा शोध नेहमीच अपूर्ण असतो. यामुळेच निर्मितीचे गणित मांडता येत नाही. वास्तविक पहाता प्लेटोने Maths आणि Music, यांना फार वरचे स्थान दिले आहे परंतु एका विविक्षित मर्यादेपुढे यातील साम्यस्थळं शोधण्याची प्रक्रिया अत्यंत धूसर होत जाते. मुळात निर्मिती म्हटली की त्यात कुठेतरी बरा,वाईट प्रतिभेचा अंश सापडतो. त्याशिवाय निर्मिती अशक्य. इथेच खरा गोंधळ होऊ शकतो कारण प्रतिभा म्हणजे नक्की काय? गणिताप्रमाणे त्याचे ठराविक उत्तर मिळत नाही. जिथे प्रमेय निर्माण करता येत नाही तिथे उत्तर कुठून शोधणार!! त्यामुळे प्रतिभावंत या शब्दाला खूप मर्यादा पडतात. याचाच दूरगामी परिणाम निर्मिती आणि त्या निर्मितीचा दर्जा ठरवण्यावर होतो. निर्मिती अवतरली की लगेच तिथे आपण सगळेच तिचा मूलभूत शोध आणि त्याची प्रतवारी शोधण्याच्या मागे लागतो. यात बरेचवेळा एक गोंधळ होतो, निर्मितीचा आस्वाद मागे पडतो. हाताशी आलेली निर्मिती काय दर्जाची आहे, हे ठरवण्याआधी त्या निर्मितीचा आनंद घ्यावा, ही प्रक्रिया बरेचवेळा मागे पडते आणि निर्मितीचा खल करण्याची प्रवृत्ती पुढे येते. काहीवेळा, निर्मितीच्या आनंदावर विरजण पडते!! परंतु जरा विचार केल्यास, निर्मितीचा आनंद घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचे? एकतर जो निर्मिक असतो, त्याला बाजूला सारायचे आणि एक रसिक म्हणून आपणच ती निर्मिती अंतर्बाह्य न्याहाळायची. हे न्याहाळणे म्हणजे एक प्रकारे प्रतवारी लावण्याची प्रक्रिया करणे होय. आपण जेंव्हा निर्मितीकडे सजग दृष्टीने बघायला लागतो तेंव्हा आपल्याच नकळत आपण ती निर्मिती तपासत असतो. अशा वेळी आपण रसिक कधीही "प्रतिभा" वगैरे विचार करत नसतो तर समोर असलेली कलाकृती आपल्याला कितपत भावली आहे, कितपत आपण समजून घेतली आहे? या दृष्टीने बघत/ऐकत असतो. कलाकृतीचा मूलभूत आस्वाद घेणे म्हणजे सुरवातीला तरी आनंद घेणे, इतपतच मर्यादित असतो. प्रत्येक रसिक हा काही "बुद्धीवादी" किंवा "वैचारिक" नसतो. तितकी त्याला संवाद देखील नसते. प्राथमिक अवस्थेत आनंद घेणे, इतपतच उद्दिष्ट असते. त्यामुळेच जेंव्हा कलाकृती आवडली का? याचे उत्तर सर्वसाधारणपणे "मला आवडली" किंवा "मला नावडली" या दोन शब्दांपुरते सीमित असते. अर्थात या उत्तरावर आक्षेप घेण्याचे काही कारण नसते. अतिशय खोलात उतरून, निर्मितीची छाननी करणे, त्या रसिकांच्या रसिकत्वाच्या कक्षेच्या बाहेर असते. आता प्रश्न पुढे येतो तो, अशी "छाननी" किंवा "विश्लेषण" करणे आवश्यक असते का? त्यातून नेमके काय साध्य करायचे असते? आणि तसे ते साध्य होते का? इथे कलेचे शास्त्र समोर येते. प्रत्येक कला ही शास्त्राधिष्ठित असते. प्रत्यक्षात कितपत शास्त्र पाळले जाते? हे प्रत्येक निर्मिकाच्या वकुबावर अवलंबून असते परंतु बरेचवेळा असे आढळते, कलाकारांकडून नकळत शास्त्र पाळले जाते, हे निश्चित. आता पहिल्या प्रश्नाकडे.निर्मितीचे विश्लेषण करायला हवे का? खरंतर शास्त्र कितीजणांना अवगत झाले असते? याचा विचार केल्यास, फारच तुरळक व्यक्ती होकारार्थी देऊ शकतील. शास्त्र हे नेहमीच जटील असते आणि त्यासाठी प्रचंड प्रमाणात चिकाटी लागते. बहुतेक कलांचे शास्त्र हे संस्कृत भाषेत (भारतीय कलांच्या बाबतीत हा विचार आहे) असल्याने, त्याचे सर्वंकष आकलन अवघड होते. भारतात, काही रसिक तितकी चिकाटी दाखवतात आणि त्या संस्कृत ग्रंथांचे आपापल्या भाषेत भाषांतर करतात. आता शास्त्र हा मुद्दा पुढे आणल्यास, बहुतेक रसिक एक मुद्दा जोरात मांडतात - जर का शास्त्र अवगत नसेल तर उगाच त्या शास्त्राचा आधार घेऊन काथ्याकूट कशासाठी करायची? मुद्दा बिनतोड आहे, यात वादच नाही परंतु जर का अवगत शास्त्राचा आधार घेतला तर कलेबाबत भोंगळ दृष्टिकोन उत्पन्न होण्याची शक्यता मावळते. "माझी आवड" सारखे भोंगळ विधान पुन्हा, पुन्हा ऐकावे लागण्याची शक्यता कमी होते. शास्त्राचा आधार घेतला तर निर्मितीतील हिणकस किती आणि उत्तम किती, याचा शोध घेता येतो आणि जेंव्हा माझी आवड असे विधान केले जाते, तेंव्हा त्यातील अहंकारी भाव आणि हिणकस, हे सप्रमाण दाखवून देता येते. अर्थात त्यासाठी प्रचंड चिकाटी लागते, हे नक्की. आणि याच विधानातून पुढे "कारागिरी आणि कला" याचा नेमका शोध घेता येतो. एक बाब नक्की मांडता येते, कलेच्या क्षेत्रात कुणीही "स्वतंत्र" हा दावा करून शकत नाही कारण कुठलीही निर्मिती ही कुठल्याना कुठल्यातरी स्त्रोतावर आधारित असते. आपण त्याचा वेध घेण्यात कमी पडतो. आता स्त्रोत म्हटल्यावर मग तुलनात्मकता आली. तुलना आली म्हणजे मग विश्लेषण आले. सर्वसाधारणपणे विश्लेषण या शब्दालाच बहुतेकजण जवळ करत नाहीत. कशासाठी विश्लेषण? हाच पहिला प्रश्न असतो परंतु या शब्दातील जटीलपणा बाजूला ठेवला तर त्यातून जो बौद्धिक आनंद मिळतो, त्याला दुसरी तोड नसते. पुन्हा "बौद्धिक" शब्दाला बहुतेकजण दचकतात. आपल्याला आस्वाद हा सहज, साधा आणि सोप्या पद्धतीने हवा असतो. आपण कलेचा आनंद घेत आहोत तेंव्हा तिथे निखळ आनंद का अप्राप्य करायचा? परंतु निखळ आनंद घेणे म्हणजे भोंगळ वृत्ती दाखवणे नव्हे. निखळ आनंद हा जोतक्या सजग वृत्तीने घेता येईल तितका मिळणार आनंद अधिक सुंदर असेल. आपण त्यासाठी थोडा विचार करायला घाबरतो. प्रत्येक आस्वाद शास्त्राधिष्ठित असावा, हे विधान जरी हेकेखोर झाले तरी सजग आस्वादात आपण नकळत शास्त्राचा अवलंब करीत असतो, फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. वर मी ए विधान केले होते, त्याचाच थोडा विचार इथे करूया. वर मी म्हटले - कुठलीही निर्मिती ही कधीही स्वतंत्र अशी नसते, तिच्यावर पूर्वजांच्या विचाराचा काही प्रमाणात असर हा असतोच. बरेचवेळा असतो तो पुनरावतार! अर्थात त्या निर्मितीला देखील व्यासंगाचा, कलेचा खोलवर व्यासंग जरुरीचा असतो. इथेच मोठा प्रश्न उभा राहतो. जर का स्वतंत्र निर्मिती हा व्यदतोव्याघात मानला तर मग कारागिरी बद्दल टीका का आणि कशासाठी? कलेच्या निर्मितीवर पूर्वीच्या कलाकृतींचा प्रभाव पडणे, अनिवार्य असेल तर मग नवीन होणारी कलाकृती ही थोड्याफार प्रमाणात कारागिरी असणे क्रमप्राप्तच ठरते. मुद्दा मग किती प्रमाणात सरमिसळ केली आहे? इतकाच. कवितेबाबत तर अगदी स्पष्टपणे म्हटले जाते - झारी कविता नेहमी कवीच्या मनातच असते!! कागदावर उतरते ते बऱ्याचप्रमाणात Crafting असते!! एक नक्की या बाबतीत म्हणावेसे वाटते, विशेषतः लेखन कलेबाबत असे म्हणता येते, लेखकाच्या मनात जे असते, ते जसेच्या तसे मनाबाहेर काढणे, हे जवळपास अशक्य असते आणि म्हणूनच कुठलेही लेखन हे "परिपूर्ण" तसेच "मनाजोगते" होत नाही. हाच मुद्दा पुढे संगीत कलेबाबत मांडता येतो. अगदी रागदारी संगीत घेतले तरी पूर्वसूरींचा प्रभाव पूर्णपणे टाळणे अशक्य असते आणि जी काही "नवनिर्मिती" म्हणून सादर होते, त्यात पूर्वीचे म्हणून थोडेफार मिसळलेले असते. अर्थात संगीतकलेचा विस्तार अशाच प्रकारे होत असतो. ललित संगीतात तर काही बोलायलाच नको. "स्वतंत्र" स्वररचना असे काहीच नसते. जे काही तयार केले जाते ते मागील पिढींनी केलेले असते, त्याच्यावर नवेपणाचे "लेपन" करून लोकांच्या समोर आणले जाते. मग कला विशुद्ध स्वरूपात अवतरणे अवघड आहे का? याचे उत्तर सोपे नाही. तुम्ही कुठल्या नजरेतून कलेकडे बघता, त्याच्यावर बरेचसे अवलंबून राहते. मग प्रश्न असा, शास्त्र या शब्दाचे इतके अवडंबर माजवण्याचे काहीच कारण नाही. संपूर्ण शास्त्र समजून घेणे किचकट होते आणि मग जी कलाकृती समोर येते, त्याच्यावर विशुद्ध असे लेबल लावणे कठीण होऊन बसते. शास्त्र टाळता तर येत नाही पण अवलंब करून निश्चितार्थ स्वरूपाची विधाने करता येत नाहीत. तेंव्हा कारागिरी असणे, हे अटळ आहे, असेच म्हणावे लागते.

No comments:

Post a Comment