Sunday, 20 November 2022
सनशाईन हॉटेल
इराणी हॉटेल ही मुंबई शहराच्या सांस्कृतिक विस्ताराचा अविभाज्य भाग आहेत. विशेषतः; दक्षिण मुंबईत तर या हॉटेल्सचे प्रस्थ बरेच आहे. नक्की कधी ही हॉटेल्स कधी सुरु झाली? या प्रश्नाचे उत्तर कधीतरी मिळेल परंतु त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान मात्र आजही अबाधित आहे. विशेषतः तरुण वर्गात तर या हॉटेल्सची लोकप्रियता अखंडित आहे. दक्षिण मुंबईत जवळपास प्रत्येक विभागात, एखादे तरी इराणी हॉटेल आहे. अर्थात कालानुरूप काही ठिकाणाची इराणी हॉटेल बंद झाली आहेत परंतु समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनून राहिली आहेत, यात काहीही संशय नाही.
मी जिथे राहतो- ठाकूरद्वार इथे तर आसपास बरीच इराणी हॉटेल्स आहेत, व्हॉईसरॉय ऑफ इंडिया, कयानी, बास्तानी(आता काही वर्षांपासून बंद पडले आहे आणि बहुदा कायमचे बंद पडले असावे) आणि ठाकूरद्वार चौकातील सनशाईन हॉटेल!! जवळपास ३,४ किलोमीटर परिसरात अशी ३,४ इराणी हॉटेल्स आहेत. कयानी हॉटेलला तर प्रचंड ग्लॅमर आहे, ऐतिहासिक वारसा आहे. त्यामानाने, इतर हॉटेल्सना इतके ग्लॅमर नाही. सनशाईन हॉटेल तर माझ्या जन्माच्या आधी पासूनचे हॉटेल तिथे आहे. एकतर ठाकूरद्वार चौकाच्या एका टोकाला, सिग्नलला लागून आहे. परिणामी लोकांच्या सहज येण्याजाण्याच्या मार्गावर आहे. अक्षरश: लाखोंनी माणसे इथून ये जा करीत असतात आणि त्या सगळ्यांच्या नजरेत हे हॉटेल भरते.
इराणी हॉटेल्सची काही वैशिष्ट्ये आहेत आणि ती वर्षानुवर्षे जपलेली आहेत. इथे निव्वळ चहा (पानी कमी चहा तर इथेच मिळतो) घेऊन, तुम्ही या हॉटेलमध्ये निवांतपणे तासंतास बसू शकता. असे तुम्ही जगातील यच्चयावत कुठल्याही हॉटेलमध्ये बसू शकत नाही. मी अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून या हॉटेलमध्ये येत आहे. एकतर त्यावेळी खिशात नेहमीप्रमाणे पैशाची चणचण असायची. आम्ही ठराविक मित्र दिवसाच्या कुठल्याही प्रहरी इथे चहा प्यायला येत असू. चहाचे पैसे भरण्याइतकी ऐपत असायची. त्यावेळी बियर बार या हॉटेलमध्ये नव्हता, तो नंतर आला. नंतर आम्हा मित्रांना नोकऱ्या लागल्या आणि आमची मजल आम्लेट किंवा खिमा मागण्याइतकी वाढली. तरीही "ब्रून/बन मस्का आणि चहा" या डिशेश (यांना डिश म्हणावी इतका देखील परकेपणा आजही वाटत नाही) मागवणे, ही चैनीची परमावधी होती. इथेच चहा मागवायचे, त्याच्याबरोबर असंख्य गप्पा मारायच्या, वाद घालायचे, काहीवेळा भविष्याचे प्लॅन्स करायचे, इत्यादी उद्योग चालू असायचे. आमचे हे भावविश्व होते. गल्ल्यावरील पारशाने कधीही - अरे कितना टाइम बैठे हो , सारखे दरडावून विचारले नाही. चहाबरोबर सिगारेट घ्यायची म्हणजे इथल्या मैफिलीची सांगता व्हायची.
कित्येक तास या हॉटेलमध्ये घालवले आहेत. बरेचसे वाद, चहा संपला की विसरले जायचे. अगदी नुकत्याच बघितलेल्या तरुणीच्या सौंदर्याचे "माप" इथेच घेतले जायचे. इथे कुठल्याही विषयाचे बंधन नसायचे. अगदी शिवराळ भाषेची मुक्त तोंडाने देवाणघेवाण चालायची. वास्तविक हे हॉटेल ट्रॅफिक सिग्नलला लागून आहे, त्यामुळे आमच्या गप्पात रस्त्यावरील गाड्यांच्या आवाज मिसळला जायचा - त्याचा कधीही त्रास म्हणून जाणवला नाही. किंबहुना त्या हॉर्न्सची जाणीवच झाली नाही, इतके आम्ही आमच्या विश्वात रममाण होत असू. संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना, एखादी तरी चक्कर इथे व्हायचीच. हे हॉटेल कधीही रिकामे असे बघितलेच नाही. एखादा कोपरा पकडायचा, पानी कम चहा मागवायचा आणि त्याबरोबर तोंडात सिगारेट शिलगावयाची आणि कुठल्याही विचारांची धुंदी चढवून घ्यायची, हा परिपाठ कित्येक वर्षे अखंडपणे चालू होता. आमची तर गल्ल्यावरील मालकाशी चांगली मैत्री झालेली होती. त्यानेही आम्हाला हॉटेलचे दरवाजे कायमचे उघडे ठेवलेले असायचे.
एकतर इराणी हॉटेल्स पहाटे ५ वाजता उघडतात आणि रात्री उशिरा, अगदी १२ पर्यंत उघडी असतात. तरुण वयात याचा बराच फायदा व्हायचा. पहाटे इराणी हॉटेलचा चहा पिणे, यातील "स्वर्गसुख" हे फक्त मुंबईकर माणसांनाच कळू शकेल. त्या चहात कसलीही वैशिष्ट्ये नसायची म्हणजे वेलची, लवंग वगैरे काही नाही. त्या छोट्याशा कपात, गरम दूध, चहाच्या पावडरीची उकळलेली पूड आणि साखर, इतकेच!! तरीही त्याची चव जिभेवर रेंगाळायची. अर्थात सोबत बन किंवा ब्रून मस्का!! तो सोबत हवाच, त्याशिवाय मैफिल रंगणे निव्वळ अशक्य!! असा पाव फक्त इराणी हॉटेल्स मध्येच मिळणार. त्या पावाला लावलेला मस्का - त्याला बटर किंवा लोणी, अस्सल मुंबईकर कधीही म्हणणार नाही देखील फक्त तिथेच मिळणार.
पुढे ऐपत वाढल्यावर आम्लेट, त्यातही साधे आम्लेट, मसाला आम्लेट असे प्रकार आहेतच. आम्लेट आले की त्याच्यावर मीठ आणि मिरपूड फवारून (ती फवारूनच टाकायची, चमचा वगैरे लाड नाहीत) घ्यायची आणि आपल्या अंदाजाने टाकल्यावर सोबतच्या मऊशार पावाच्या तुकड्यासह आम्लेटचा तुकडा घ्यायचा!! तो तोंडात गेला की मग चहाचा एक घोट घशाखाली न्यायचा. खरंतर कुणी म्हणेल यात काय वैशिष्ट्य आहे? त्रयस्थ नजरेतून काहीही वैशिष्ट्य नाही पण त्या हॉटेलच्या स्थानाचे जे वैशिष्ट्य आहे, ते कुठेच नाही.
बहुतेक इराणी हॉटेल्समधील बसायला असणारी टेबल्स,खुर्च्या या एकरंगी असायच्या. काळ्या रंगाच्या खुर्च्या आणि पांढऱ्या रंगांची टेबल्स. पुढे या हॉटेलमध्ये एक मोठा कप्पा केला आणि तिथे बियर बार आला!! एव्हाना खिशात पैसे खुळखुळायला लागले होते, अंगात तरुणाईची मस्ती होती - मग काय बियर पिणे क्रमप्राप्तच होते. आज बियर पिण्यात फारसे काही थ्रिल वाटत नाही पण तेंव्हा घरच्यांना चुकवून बियर पिण्यातली लज्जत केवळ अवर्णनीय होती. बियर सोबत चखणा (हा मुंबईचा परवलीचा शब्द - याच्याशिवाय ड्रिंक्स संभवत नाही) म्हणून खारेदाणे, वेफर्स, खारी मुगडाळ असेच काहीतरी मागवायचे आणि धुनी पेटवायची!! ही धुनी मग रात्री उशिरापर्यंत पेटलेली असायची.
आता त्यावेळच्या गप्पा आठवत नाहीत कारण आता आयुष्याचे मार्ग बरेच बदलले. त्यावेळची स्वप्ने विरून गेली, त्यावेळच्या मुलींवरून मारलेल्या गप्पांचे फड असेच हवेत विरून गेले. आज हे सगळे आठवले कारण आता हे सनशाईन हॉटेल बंद होत आहे!! ती इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे चक्क कोर्टाकडून निर्देशित झाल्याने हॉटेल बंद करण्यावाचून तरुणोपाय राहिला नाही. काळ आम्ही मित्र तिथे गेलो, काही काळ घालवला. अर्थात जुन्या आठवणी निघाल्या. काही मित्र तर ठाकूरद्वार सोडून उपनगरात कायमचे राहायला गेलेत पण हे हॉटेल बंद पडणार म्हणून शेवटचे असे "बसायला" आले होते. आता असे सांगण्यात आले आहे, ही इमारत पुन्हा नव्याने बांधणार आहे आणि पुन्हा हे हॉटेल सुरु होणार आहे. आज आम्ही सगळे साठीपार आहोत. तेंव्हा हे हॉटेल पुन्हा जेंव्हा नव्याने सुरु होईल तेंव्हा आम्ही असू का? असलो तरी आज जशी धुंदी अनुभवता आली, तशी अनुभवण्याच्या अवस्थेत असू का? त्यावेळी मुंबई कशी असेल? मुंबई, विशेषतः ठाकूरद्वार/गिरगाव फार प्रचंड वेगाने बदलत चालले आहे, जुन्या चाळी पाआडून टॉवर्स होत आहेत. नवी संस्कृती स्थिरावत आहे. अशा नव्या संस्कृतीत "पानी कमी चाय" ला पुन्हा संजीवनी मिळेल का? बरेच प्रश्न डोक्यात घोंघावत आहेत, ज्याची आज उत्तरे सापडणे अशक्य.
Saturday, 19 November 2022
समीक्षा - एक अवघड शब्द
मुळात समीक्षा का हवी? त्याच्यामुळे नक्की कसली स्थित्यंतरे होतात आणि त्यामुळे कलेच्या आकलनाविषयी स्वच्छ प्रतिमा तयार होतात का? समीक्षा ही कशी असावी? या प्रश्नापेक्षा समीक्षा म्हणजे नक्की काय? आणि त्यामुळे नक्की काय साध्य होते? या प्रश्नांचा उहापोह करणे महत्वाचे आहे. समीक्षा नेहमीच जटील असते कारण मुळात कला आणि कलास्वरूप Normative नाही. हे मान्य करायला हवे. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास "सुंदर" हा शब्द घेतला तर सुंदर म्हणजे नक्की काय? हे आधी ठरवावे लागेल. आता ढोबळपणे असे म्हणता येते, जे रसिक ठरवतात, ते सुंदर!! मग प्रश्न असा येतो, "रसिक" कुणाला ठरवावे? रसिक गृहीत धरल्याशिवाय सुंदरता कशी सिद्ध करता येईल? तेंव्हा हे असे गुंतागुंतीचे चक्र आहे, हे नक्की. जो आस्वाद घेतो, तो रसिक, असे म्हणणे फार ढोबळ होते. कारण आस्वाद या शब्दाची वैशिष्ट्ये नक्की करावी लागतील. परंतु रसिक आणि कला अस्तित्वात आल्याखेरीज आस्वाद ही कृती अस्तित्वात येणार नाही. याचाच वेगळा अर्थ, रसिक आणि आस्वाद हे परस्पराश्रयी आहेत, हे मान्य करावे लागेल.अशा अवस्थेत कुठल्या अनुभवाला आस्वाद म्हणायचे?
याचा विचार करता, आपण लहानपणापासून विचार करीत असतो आणि त्यातून आपण आपली स्वतःची दृष्टी विकसित करत जातो. ती दृष्टी विकसित करताना, आपल्यावर असंख्य संस्कार होत असतात, अनेक अनुभवातून आपण जात असतो. अनुभव घेताना, त्यात आपला संदर्भ असतोच असे नसून निव्वळ उपस्थिती असल्याने, अनुभवाचे साक्षीदार होत असतो. या सगळ्या घालमेलीतून, आपला पिंड तयार होत असतो. हा पिंड तयार होतानाच, आपली आवड तयार होत जाते. म्हणजे मग पिंड या शब्दाशी आस्वाद हा शब्द जोडता येतो. इथेच मी वर म्हटलेल्या "सुंदर" या शब्दाची नेमकी व्याख्या करणे अवघड जाते कारण इथे व्यक्ती अवतरते आणि पुढे व्यक्तिनुरूप त्यांचे पिंड आणि विचार येतात आणि सुंदर शब्दाची ढोबळ व्याख्या देखील अवघड होऊन बसते. तद्नुषंगाने, कला आणिआस्वाद, याबाबत ठाम विधाने करणे आणखी किचकट होऊन बसते.
सौंदर्य हे काही ठराविक नीतीप्रमाणे मांडता येत नाही. कलेच्या संदर्भात तर ते फार धूसर होऊन बसते. कलेच्या संदर्भात आपण सुंदर शब्द वापरतो त्यावेळी त्याला फक्त व्यक्तिगत संदर्भ असतो. कलेच्या बाबतीत सौंदर्य हा शब्द निव्वळ एक प्रत्यय असतो आणि तो सिद्ध करणे, हेच अवघड होऊन बसते.
कलेच्या शास्त्रात सुंदर हा एक पारिभाषिक शब्द आहे. कलाकृतींचा रसिकांना जो प्रत्यय येतो, त्या प्रत्ययाला लावले गेलेले हे एक विशेषण आहे. कलास्वरूप शास्त्राचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतंत्र असतो. रसिकाचे मन हे नेहमीच निरनिराळ्या कप्प्यांनी बनलेले असते. एका कलेचा विचार करताना, दुसऱ्या कलेचा विचार त्याच मनात येणे सहजशक्य असते. हाच विचार पुढे मांडायचा झाल्यास, कलाकृतीच्या रसग्रहणात कलात्मक दृष्टिकोनाला अप्रस्तुत असणारे मुद्दे सतत जाणवत राहतात. आणि त्याचा परिणाम थोडाफार तरी प्रत्ययावर होत असतो. आता उदाहरण बघायचे झाल्यास, एखादे चित्र बघताना, त्या चित्राच्या अनुषंगाने, त्या चित्राची पार्श्वभूमी, चित्रकाराचे नाव आणि तद्नुषंगाने आठवला जाणारा इतिहास, याबद्दल मनात आदर निर्माण होतोच. रसिकाच्या मनात हे असे अवांतर ज्ञान उत्पन्न होत असते. याच बाबींवर त्याचे रसिकत्व सिद्ध होत असते. सामान्य माणूस ते रसिक, हा प्रवास असाच सुरु होत असतो. फक्त या इतर माहितीमुळे त्याची आस्वादाची कक्षा वाकलेली असू नये.
अर्थात हे जे अवांतर ज्ञान असते,ते त्या विषयाच्या संदर्भातच असावे लागते अन्यथा गोंधळ नक्की. समीक्षा करणे म्हणजे हेच ज्ञान, जे कलाकृतीच्या संदर्भात मूळ आणि अवांतर ज्ञान देते, त्याची संघटित रचना करून, त्याचे शाब्दिक स्वरूप इतरांसमोर मांडणे. यात एक बाब महत्वाची आहे, समीक्षा ही समीक्षाच असावी, तिथे नीतिशास्त्र, मानसशास्त्र किंवा सौंदर्यशास्त्र अशी वर्गवारी असू नये. कारण ही वर्गवारी म्हणजे समीक्षेला आधारभूत असणाऱ्या ज्ञानाची वर्गवारी आहे. आपल्याकडे बरेचवेळा हाच घोळ घातला जातो.
Wednesday, 16 November 2022
कारागिरी आणि कला
शिर्षकावरून विषयाबद्दल कल्पना यावी. आपल्याकडे आजही या दोन्ही शब्दांबद्दल घोळ घातला जातो आणि याचे कारण या दोहोंतील सर्जनशीलतेबद्दल असलेली संदिग्धता. मुळात दोन्ही कृतीत "निर्मिती" हा घटक प्रामुख्याने अस्तित्वात असतो, हे मान्य व्हावे. काहीतरी तयार होणे आणि त्याला कलात्मक रूप मिळणे, या प्रक्रियेत कुठेतरी निर्मितीची बीजे अंकुरलेली असतात. अर्थात या प्रक्रियेची प्रक्रिया कशी तयार होते, याचा शोध हा जवळपास अशक्य असतो कारण अबोध मनाच्या तळाशी कुठेतरी याची प्रक्रिया चाललेली असते. त्यामुळेच बहुदा आपण मनाशी काय ठरवत असतो आणि प्रत्यक्षात काय बघायला मिळते, यात नेहमीच तफावत निर्माण होते. जरी आपणच निर्मिती करत असलो तरी हाती येणारे फळ हे नेहमीच अतर्क्य जरी नसले तरी पूर्णतः समाधान देणारे नसते आणि ही वस्तुस्थिती आहे. या हताशतेचा शोध नेहमीच अपूर्ण असतो. यामुळेच निर्मितीचे गणित मांडता येत नाही. वास्तविक पहाता प्लेटोने Maths आणि Music, यांना फार वरचे स्थान दिले आहे परंतु एका विविक्षित मर्यादेपुढे यातील साम्यस्थळं शोधण्याची प्रक्रिया अत्यंत धूसर होत जाते.
मुळात निर्मिती म्हटली की त्यात कुठेतरी बरा,वाईट प्रतिभेचा अंश सापडतो. त्याशिवाय निर्मिती अशक्य. इथेच खरा गोंधळ होऊ शकतो कारण प्रतिभा म्हणजे नक्की काय? गणिताप्रमाणे त्याचे ठराविक उत्तर मिळत नाही. जिथे प्रमेय निर्माण करता येत नाही तिथे उत्तर कुठून शोधणार!! त्यामुळे प्रतिभावंत या शब्दाला खूप मर्यादा पडतात. याचाच दूरगामी परिणाम निर्मिती आणि त्या निर्मितीचा दर्जा ठरवण्यावर होतो. निर्मिती अवतरली की लगेच तिथे आपण सगळेच तिचा मूलभूत शोध आणि त्याची प्रतवारी शोधण्याच्या मागे लागतो. यात बरेचवेळा एक गोंधळ होतो, निर्मितीचा आस्वाद मागे पडतो. हाताशी आलेली निर्मिती काय दर्जाची आहे, हे ठरवण्याआधी त्या निर्मितीचा आनंद घ्यावा, ही प्रक्रिया बरेचवेळा मागे पडते आणि निर्मितीचा खल करण्याची प्रवृत्ती पुढे येते. काहीवेळा, निर्मितीच्या आनंदावर विरजण पडते!!
परंतु जरा विचार केल्यास, निर्मितीचा आनंद घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचे? एकतर जो निर्मिक असतो, त्याला बाजूला सारायचे आणि एक रसिक म्हणून आपणच ती निर्मिती अंतर्बाह्य न्याहाळायची. हे न्याहाळणे म्हणजे एक प्रकारे प्रतवारी लावण्याची प्रक्रिया करणे होय. आपण जेंव्हा निर्मितीकडे सजग दृष्टीने बघायला लागतो तेंव्हा आपल्याच नकळत आपण ती निर्मिती तपासत असतो. अशा वेळी आपण रसिक कधीही "प्रतिभा" वगैरे विचार करत नसतो तर समोर असलेली कलाकृती आपल्याला कितपत भावली आहे, कितपत आपण समजून घेतली आहे? या दृष्टीने बघत/ऐकत असतो. कलाकृतीचा मूलभूत आस्वाद घेणे म्हणजे सुरवातीला तरी आनंद घेणे, इतपतच मर्यादित असतो. प्रत्येक रसिक हा काही "बुद्धीवादी" किंवा "वैचारिक" नसतो. तितकी त्याला संवाद देखील नसते. प्राथमिक अवस्थेत आनंद घेणे, इतपतच उद्दिष्ट असते. त्यामुळेच जेंव्हा कलाकृती आवडली का? याचे उत्तर सर्वसाधारणपणे "मला आवडली" किंवा "मला नावडली" या दोन शब्दांपुरते सीमित असते. अर्थात या उत्तरावर आक्षेप घेण्याचे काही कारण नसते. अतिशय खोलात उतरून, निर्मितीची छाननी करणे, त्या रसिकांच्या रसिकत्वाच्या कक्षेच्या बाहेर असते.
आता प्रश्न पुढे येतो तो, अशी "छाननी" किंवा "विश्लेषण" करणे आवश्यक असते का? त्यातून नेमके काय साध्य करायचे असते? आणि तसे ते साध्य होते का? इथे कलेचे शास्त्र समोर येते. प्रत्येक कला ही शास्त्राधिष्ठित असते. प्रत्यक्षात कितपत शास्त्र पाळले जाते? हे प्रत्येक निर्मिकाच्या वकुबावर अवलंबून असते परंतु बरेचवेळा असे आढळते, कलाकारांकडून नकळत शास्त्र पाळले जाते, हे निश्चित. आता पहिल्या प्रश्नाकडे.निर्मितीचे विश्लेषण करायला हवे का? खरंतर शास्त्र कितीजणांना अवगत झाले असते? याचा विचार केल्यास, फारच तुरळक व्यक्ती होकारार्थी देऊ शकतील. शास्त्र हे नेहमीच जटील असते आणि त्यासाठी प्रचंड प्रमाणात चिकाटी लागते. बहुतेक कलांचे शास्त्र हे संस्कृत भाषेत (भारतीय कलांच्या बाबतीत हा विचार आहे) असल्याने, त्याचे सर्वंकष आकलन अवघड होते. भारतात, काही रसिक तितकी चिकाटी दाखवतात आणि त्या संस्कृत ग्रंथांचे आपापल्या भाषेत भाषांतर करतात. आता शास्त्र हा मुद्दा पुढे आणल्यास, बहुतेक रसिक एक मुद्दा जोरात मांडतात - जर का शास्त्र अवगत नसेल तर उगाच त्या शास्त्राचा आधार घेऊन काथ्याकूट कशासाठी करायची?
मुद्दा बिनतोड आहे, यात वादच नाही परंतु जर का अवगत शास्त्राचा आधार घेतला तर कलेबाबत भोंगळ दृष्टिकोन उत्पन्न होण्याची शक्यता मावळते. "माझी आवड" सारखे भोंगळ विधान पुन्हा, पुन्हा ऐकावे लागण्याची शक्यता कमी होते. शास्त्राचा आधार घेतला तर निर्मितीतील हिणकस किती आणि उत्तम किती, याचा शोध घेता येतो आणि जेंव्हा माझी आवड असे विधान केले जाते, तेंव्हा त्यातील अहंकारी भाव आणि हिणकस, हे सप्रमाण दाखवून देता येते. अर्थात त्यासाठी प्रचंड चिकाटी लागते, हे नक्की. आणि याच विधानातून पुढे "कारागिरी आणि कला" याचा नेमका शोध घेता येतो.
एक बाब नक्की मांडता येते, कलेच्या क्षेत्रात कुणीही "स्वतंत्र" हा दावा करून शकत नाही कारण कुठलीही निर्मिती ही कुठल्याना कुठल्यातरी स्त्रोतावर आधारित असते. आपण त्याचा वेध घेण्यात कमी पडतो. आता स्त्रोत म्हटल्यावर मग तुलनात्मकता आली. तुलना आली म्हणजे मग विश्लेषण आले. सर्वसाधारणपणे विश्लेषण या शब्दालाच बहुतेकजण जवळ करत नाहीत. कशासाठी विश्लेषण? हाच पहिला प्रश्न असतो परंतु या शब्दातील जटीलपणा बाजूला ठेवला तर त्यातून जो बौद्धिक आनंद मिळतो, त्याला दुसरी तोड नसते. पुन्हा "बौद्धिक" शब्दाला बहुतेकजण दचकतात. आपल्याला आस्वाद हा सहज, साधा आणि सोप्या पद्धतीने हवा असतो. आपण कलेचा आनंद घेत आहोत तेंव्हा तिथे निखळ आनंद का अप्राप्य करायचा? परंतु निखळ आनंद घेणे म्हणजे भोंगळ वृत्ती दाखवणे नव्हे. निखळ आनंद हा जोतक्या सजग वृत्तीने घेता येईल तितका मिळणार आनंद अधिक सुंदर असेल. आपण त्यासाठी थोडा विचार करायला घाबरतो.
प्रत्येक आस्वाद शास्त्राधिष्ठित असावा, हे विधान जरी हेकेखोर झाले तरी सजग आस्वादात आपण नकळत शास्त्राचा अवलंब करीत असतो, फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. वर मी ए विधान केले होते, त्याचाच थोडा विचार इथे करूया. वर मी म्हटले - कुठलीही निर्मिती ही कधीही स्वतंत्र अशी नसते, तिच्यावर पूर्वजांच्या विचाराचा काही प्रमाणात असर हा असतोच. बरेचवेळा असतो तो पुनरावतार! अर्थात त्या निर्मितीला देखील व्यासंगाचा, कलेचा खोलवर व्यासंग जरुरीचा असतो. इथेच मोठा प्रश्न उभा राहतो. जर का स्वतंत्र निर्मिती हा व्यदतोव्याघात मानला तर मग कारागिरी बद्दल टीका का आणि कशासाठी?
कलेच्या निर्मितीवर पूर्वीच्या कलाकृतींचा प्रभाव पडणे, अनिवार्य असेल तर मग नवीन होणारी कलाकृती ही थोड्याफार प्रमाणात कारागिरी असणे क्रमप्राप्तच ठरते. मुद्दा मग किती प्रमाणात सरमिसळ केली आहे? इतकाच. कवितेबाबत तर अगदी स्पष्टपणे म्हटले जाते - झारी कविता नेहमी कवीच्या मनातच असते!! कागदावर उतरते ते बऱ्याचप्रमाणात Crafting असते!! एक नक्की या बाबतीत म्हणावेसे वाटते, विशेषतः लेखन कलेबाबत असे म्हणता येते, लेखकाच्या मनात जे असते, ते जसेच्या तसे मनाबाहेर काढणे, हे जवळपास अशक्य असते आणि म्हणूनच कुठलेही लेखन हे "परिपूर्ण" तसेच "मनाजोगते" होत नाही.
हाच मुद्दा पुढे संगीत कलेबाबत मांडता येतो. अगदी रागदारी संगीत घेतले तरी पूर्वसूरींचा प्रभाव पूर्णपणे टाळणे अशक्य असते आणि जी काही "नवनिर्मिती" म्हणून सादर होते, त्यात पूर्वीचे म्हणून थोडेफार मिसळलेले असते. अर्थात संगीतकलेचा विस्तार अशाच प्रकारे होत असतो. ललित संगीतात तर काही बोलायलाच नको. "स्वतंत्र" स्वररचना असे काहीच नसते. जे काही तयार केले जाते ते मागील पिढींनी केलेले असते, त्याच्यावर नवेपणाचे "लेपन" करून लोकांच्या समोर आणले जाते. मग कला विशुद्ध स्वरूपात अवतरणे अवघड आहे का?
याचे उत्तर सोपे नाही. तुम्ही कुठल्या नजरेतून कलेकडे बघता, त्याच्यावर बरेचसे अवलंबून राहते. मग प्रश्न असा, शास्त्र या शब्दाचे इतके अवडंबर माजवण्याचे काहीच कारण नाही. संपूर्ण शास्त्र समजून घेणे किचकट होते आणि मग जी कलाकृती समोर येते, त्याच्यावर विशुद्ध असे लेबल लावणे कठीण होऊन बसते. शास्त्र टाळता तर येत नाही पण अवलंब करून निश्चितार्थ स्वरूपाची विधाने करता येत नाहीत. तेंव्हा कारागिरी असणे, हे अटळ आहे, असेच म्हणावे लागते.
Monday, 14 November 2022
जे वेड मजला लागले
खरंतर कुठलीही भावना ही आंतरिक प्रेरणेशिवाय प्रकट होत असेल तर तिला विसविशीत स्वरूप प्राप्त होते. आंतरिक प्रेरणा ही सततच्या चिंतनाने मनात येऊ शकते. त्यासाठी विचारांची कास धरणे आवश्यक असते. आपण बहुतेकवेळा इथेच कमी पडतो. चित्रपट गीतांचा स्वतंत्रपणे विचार करताना, हा मुद्दा विचारार्थ घ्यावा लागतो. सातत्याने, त्याच त्याच विषयावर कविता लिहिणे, हे चित्रपट माध्यमामुळे आवश्यक असले तरी देखील सातत्याने चिंतन केल्यास, कवितेत वेगळेपण आणि वेगळी अभिव्यक्ती आणता येऊ शकते. मानवी प्रतिभेच्या मर्यादा ध्यानात घेऊन हेच विधान करता येऊ शकते. इथे प्रतिभा या शब्दाचा अर्थ फक्त चित्रपट गीतांच्या संदर्भात मांडलेला आहे अन्यथा प्रतिभेला कसलेच कुंपण नसते, हे सिद्ध झालेले आहे.
याच विचाराची पुढील पायरी म्हणजे आस्वाद होय. कवितेचा आस्वाद हा शब्दप्रयोग आपण सर्वच कवितांच्या बाबतीत करीत असतो तरी आस्वादाचे प्रत्यक्ष रूप प्रत्येक कवितेगणिक बदलत असते. आपण वाचीत असलेली प्रत्येक कविता, हा नित्यनूतन शोध असतो. आज वाचलेली कविता, आणखी काही वाचताना, आपली तीच प्रतिक्रिया होईल, असे सांगता येत नाही. कदाचित तीच कविता अधिक आवडू शकेल. हा बदल का झालेला? हा प्रश्न आपण आपल्याला फारसा विचारत नाही. इथेच संवेदनशील वाचक नेहमीच आपली आवड शिळी होऊ नये याची काळजी घेत असतो. चित्रपट गीताच्या बाबतीत बहुतेकवेळा आपण कविता नजरेआड करतो आणि एका अननुभूत साहित्यनंदाला पारखे होत असतो. यात आपलाच तोटा असतो.
चित्रपट गीतातील कविता, या शब्दांना एकाबाजूने मर्यादा असते तर दुसऱ्या बाजूने आव्हान देखील असते. कवीच्या दृष्टिकोनावर बरेचसे अवलंबून असते. आजचे गाणे कवियत्री शांता शेळक्यांनी लिहिलेले आहे. अधिकृत नाव जरी वसंत अवसरे असले तरी. त्यावेळी शांताबाई सरकारी नोकरी करीत असल्याने, त्यांनी हा "बदल" स्वीकारला. शांताबाई या मुळातल्या कवियत्री परंतु आर्थिक कारणास्तव त्यांनी चित्रपटात गीते लिहायला सुरवात केली आणि तिथेही त्यांनी अप्रतिम गीते लिहून आपला ठसा उमटवला. चावून,चावून चोथा झालेल्या प्रणयी प्रसंगात देखील त्यांनी वेगळ्या प्रकारची शब्दरचना करून दाखवली. "स्वप्नी बघणे" "जागेपणी वावरणे" इत्यादी भावच्छटा लिहिताना, त्याचा समारोप करताना, "मुकेपणी बोलतो शब्दांत ते रंगेल का?" अशा शब्दात केलेला आहे. खरंतर ध्रुवपद कुणी शक्यतो प्रश्नार्थक करत नाही परंतु शांताबाईंनी तशी सुरवात केली आणि पुढील प्रत्येक कडव्याचा शेवट प्रश्नार्थक केला आहे आणि तसे करताना कुठेही किंचित विक्षेप होत नाही, हा त्यांच्या कवित्वाचा अधिकार. वास्तविक पहाता युगुलगीत आहे तरीही भावना कुठेही विसविशीत होत नाही. दोघांच्या भावना नीटसपणे मांडल्या आहेत. कुठेही शब्दांची अनावश्यक द्विरुक्ती नाही. चित्रपट गीतांत शब्दांची द्विरुक्ती ही वारंवार आढळते कारण स्वरिक लय सांभाळणे, आद्यकर्तव्य असते.
संगीतकार वसंत पवार आहेत. अतिशय कुशाग्र बुद्धीचे संगीतकार परंतु अपवाद वगळता, कधीही प्रसिद्धीचा झोत अंगावर पडला नाही आणि उपक्षेच्या खाईत, हा संगीतकार लोप पावला. मराठी संगीतकारांची, काही संगीतकार अपवाद म्हणून वगळता, हीच अवस्था बघायला मिळते. अतिशय हुशार संगीतकार असून, आर्थिक डबघाईत आयुष्य संपल्याचे आढळते. वसंत पवार हे प्रामुख्याने लावणीचे संगीतकार म्हणून ख्यातकीर्त होते परंतु त्यांनी सर्व प्रकारची गाणी देऊन, आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली होती. कवीच्या शब्दांना अचूक न्याय देत असत.
आता या गाण्याची स्वररचना "चंद्रकंस" रागावर आधारित आहे परंतु प्रसंगी रागाला बाजूला सारून, शब्दांच्या अभिव्यक्तीला महत्व दिले आहे. रागदारीत चाल आहे म्हणून कुठेही भरमसाट ताना, हरकती ऐकायला मिळत नाहीत. शब्दांतील ऋजुत्व सांभाळून, मंजुळ हरकती घेतल्या आहेत आणि एक अतिशय देखणे प्रणय गीत सादर केले आहे.
वाद्यमेळ बव्हंशी व्हायोलिन वाद्याने सजवला आहे. दुसऱ्या अंतऱ्याची सुरवातीची ओळ संपवताना, मुद्दाम ऐकण्यासारखे "वळण" दिले आहे. वेगळी स्वरावली असूनही क्षणार्धात स्वरावली "जे जागले माझ्या मनी" घेताना, फार नाजूक पद्धतीने वळवून घेतले आहे. गाण्यात तोचतोचपणा जरा देखील जाणवू नये, याची नेमकी दक्षता घेतली आहे. खरतर इतक्या हुशार संगीतकाराला बऱ्याच संधी मिळायला हव्या होत्या, परंतु मिळाल्या नाहीत, हे सत्य आहे.
सुधीर फडके आणि आशाबाईंनीं गाणे गायले आहे. मराठीत आशाबाईंनी जितकी विविधता, वैशिष्ट्यपूर्ण गायकी दाखवली, तितकी फार कुणी दाखवल्याचे आढळत नाही. आपल्या गळ्याचा "पोत", गळ्याची सर्जनशीलता इत्यादी वैशिष्ट्ये जितकी म्हणून विस्तारता येईल, तितकी त्यांनी दाखवली आहे. गायक म्हणून सुधीर फडक्यांनी मराठीत स्वतंत्र दालन उघडून ठेवले आहे. शब्दप्रधान गायकी कशी असावी, याचे उत्तम उदाहरण सुधीर फडक्यांनी दाखवले आहे.
या गाण्यात याची प्रचिती आपल्याला, अस्ताईपासून ऐकायला मिळते. वास्तविक गायकी ढंगाची स्वररचना नसून, गायला अवघड अशी गायकी, या दोघांनी पेश केली आहे. दुसरा अंतरा सुरु होण्याआधी, आशाबाईंनी जो "आलाप" घेतला आहे, तो ऐकावा. वेळ बघायची झाल्यास, ५,६ सेकंदाचा छोटा आलाप आहे पण त्यातूनही, किंचित का होईना गायकी ऐकायला मिळते. शब्दातील औचित्य सांभाळून, गायन कसे परिणामकारक करायचे, याचे उत्तम उदाहरण म्हणून या गाण्याचा निर्देश करावा लागेल. गायन बव्हंशी मध्य सप्तकात आहे आणि ती लय सांभाळून, प्रणयी भावनांचे स्फटिकीकरण करण्यात, हे दोन्ही गायक पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. मराठी ललित संगीतातील एक अजरामर गाणे म्हणून या गाण्याचा उल्लेख करावाच लागेल.
जे वेड मजला लागले, तुजलाही ते लागेल का?
माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का?
मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी
जे मी मुकेपणी बोलतो शब्दांत ते रंगेल का?
हा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण जाहलो
जे जागले माझ्या मनी, चित्ती तुझ्या जागेल का?
माझे मनोगत मी तुला केले निवेदन आज, गे
सर्वस्व मी तुज वाहिले, तुजला कधी उमगेल का?
(16) Je Ved Majala Lagale with lyrics | जे वेड मजला लागले | Asha Bhosle, Sudhir Phadke - YouTube
Wednesday, 9 November 2022
रणजी करंडक - हरपलेले श्रेय
१९७१ साली अजित वाडेकरच्या संघाने निव्वळ अभूतपूर्व यश मिळवून, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघांना, त्यांच्या भूमीत धूळ चारून, भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. त्यावेळी, इंग्लंडवरून मुंबईला परतल्यावर, मुंबईच्या पोलीस कमिशनर ऑफिसने, सगळ्या संघाचा सत्कार कार्यक्रम योजला होता. माझी आई त्यावेळी त्याच ऑफिसमध्ये - क्रॉफर्ड मार्केट हेड ऑफिसमध्ये नोकरीला होती. त्यावेळी आई त्या ऑफिसच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सातत्याने भाग घ्यायची. परिणामी तिच्या बऱ्याच ओळखी असायच्या. त्या ओळखीच्या संदर्भातून, मी आणि माझे नाना, त्या सत्कार समारंभा गेलो होतो.
एका आलिशान बस मधून सगळा संघ आला होता. बसपासून २,३ फुटावर मी, माझ्या नानांचे बोट धरून (१९७१ साली माझे वय वर्षे १२!!) उभा असताना, एकदम नाना बोलले, "अनिल, तो बघ सोलकर!!" एखादे अद्भुत प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवावे, तसे मी डोळे विस्फारून सोलकरला बघितले. सोलकरने घेतलेल्या असामान्य झेलांची छायाचित्रे जमवण्याच्या आटापिटा सार्थकी लागला होता. नंतर मग वाडेकर, सरदेसाई, विश्वनाथ,गावस्कर आणि स्पिनर्स असे बाहेर पडले. कार्यक्रम बहुदा छानच झाला असणार कारण आता त्या स्मृती बऱ्याच अंधुक झाल्या पण सोलकरला प्रत्यक्ष बघितल्याचे चित्र मात्र आजही मनावर कोरलेले आहे. त्यावेळी आपल्या भारतीय संघातील हे सगळे खेळाडू म्हणजे भूलोकीवरील गंधर्व वाटायचे.
याच पार्श्वभूमीवर पुढे रणजी सामने सुरु झाले. त्यावेळी ब्रेबर्न स्टेडियम म्हणजे क्रिकेट सामन्यांचे अद्वितीय श्रद्धाळू मंदिर!! अर्थात त्यावेळचा मुंबई संघ म्हणजे रत्नांची खाण होती. खेळाडू कितीही आंतर राष्ट्रीय ख्यातीचा झाला तरी, रणजी सामने, पावसाळ्यातील कांगा लीग सामने, कुणीही चुकवत नसे. मला आजही स्पष्ट आठवत आहे, याच काळात, मी नानांच्या बरोबरीने पहाटे उठून ब्रेबर्न स्टेडियमच्या तिकिटांच्या रांगेत उभे राहून, सामन्याच्या पहिल्या दिवसाचे तिकीट मिळवीत असे. गिरगावात रहात असल्याचा फायदा असा, मुंबईतील इतर प्रेक्षक ब्रेबर्न स्टेडियमपर्यंत येईपर्यंत, आम्हा दोघांकडे तिकीट मिळालेले असायचे.
सगळ्यांच्या आता जाऊन, आपली जागा पकडण्याचे अपूर्व समाधान मिळवणे, हा आनंदाचा पुढील भाग. त्यावेळी बहुतांश जागी लाकडी फळ्या असायच्या पण त्याचे काहीही वाटत नसे. लवकर आत गेल्यामुळे या खेळाडूंची चाललेली "नेट प्रॅक्टिस" फार जवळून बघायला मिळायची. बहुतेक खेळाडू साध्या कपड्यात, हसत खेळत प्रॅक्टिस करत असताना बघणे, फार अपूर्वाईचे वाटत असे. त्यावेळी आमचे आनंद देखील साधेसुधे होते. सुनील अर्ध्या चड्डीत फलंदाजी करत आहे आणि हाच सुनील आंतरराष्ट्रीय सामन्यात आपली द्वाही फिरवून ख्यातकीर्त झालेला आहे आणि आज मी त्यालाच १५,२० फुटांवर फलंदाजी करताना बघत आहे - असे साधे आनंद होते. असेच समाधान, वाडेकर,सरदेसाई, सोलकर इत्यादी खेळाडूंना बघण्यात मिळत असे.
जरा वेळानी सगळे आत पॅव्हेलियन मध्ये जात आणि मग अंपायर बाहेर पडत. अंपायर बाहेर येत आहेत, हे प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजराच्या आवाजाने समजून येत असे. एव्हाना, ब्रेबर्न स्टेडियम संपूर्णपणे भरलेले असायचे. पुढे मग वाडेकर आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार "टॉस" करायला यायचे आणि पुन्हा टाळ्यांचा प्रचंड गजर व्हायचा. सारा आसमंत नुसता गर्जून जायचा आणि वातावरण क्रिकेटमय व्हायचे. समाज मुंबईने टॉस जिंकला की लोकांनाच दिवस सार्थकी लागल्या सारखे वाटायचे कारण आता, सुनील आणि रामनाथ पारकर यांची फलंदाजी बघायला मिळणार!! हे दोघे बुटुकले फलंदाज म्हणजे मुबई संघाची शान होती. पारकर तर विजेच्या गतीने धावायचा. त्याचे क्षेत्ररक्षण बघणे, हा अवर्णनीय सोहळा असायचा. संपूर्ण "कव्हर्स" क्षेत्र एकटा सांभाळायचा. त्याच्या आसपास जरी चेंडू गेला असला तरी धाव घ्यायची एकही फलंदाजांची टाप नसायची, इतकी त्याची दहशत होती.
मुंबईचा संघ त्यावेळी संपूर्ण भारतभर आपली दहशत राखून असायचा आणि त्या संघातील बरेचसे खेळाडू कसोटी सामने खेळणारे असले तरी शक्यतो रणजी सामने खेळायचे आणि आपली कौशल्ये पुन्हा पारखून घ्यायचे. रणजी सामन्यांना त्यावेळी तितकी मान्यता होती. रणजी करंडकाचे उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने म्हणजे उत्सव असायचा. मला आठवत आहे, १९९० पर्यंत तरी रणजी करंडकाचे सामने म्हणजे ऑफिसमधून सुटी घ्यायची आणि वानखेडेवर ५ दिवस हजर राहायचे. हा माझा कित्येक वर्षे परिपाठ असायचा. अशोक मंकड म्हणजे आमचा रणजी सामन्यांचा "दादा" फलंदाज. तो "काका" म्हणूनच प्रसिद्ध असायचा आणि जोपर्यंत काका आहे, तोपर्यंत मुंबई संघ सुरक्षित!! ही भावना आम्हा सगळ्या प्रेक्षकांची असायची आणि त्याला या काकाने फारसा तडा जाऊ दिला नव्हता.
पद्माकर शिवलकर, राकेश टंडन हे मुंबईचे अद्वितीय स्पिनर्स. शिवलकर तर निव्वळ दुर्दैवी. बेदी आणि राजिंदर गोयल, यांच्या काळात जन्माला आला. आपल्याला कसोटी सामने खेळायला मिळण्याची शक्यता शून्य तरीही शिवलकरने वर्षानुवर्षे मुंबईला सामने जिंकवून दिले होते, अगदी एकहाती सामने जिंकवून दिले होते. खरंतर मी, माझ्या तरुणपणात रणजी करंडकाचे वैभवाचे दिवस बघितले. कॉलेज बुडवून रणजी सामने बघितले आणि त्याची धुंदी बाळगत, पुढील कित्येक दिवस धमाल केली होती. पुढे "टाइम्स करंडक" आणि पावसाळी दिवसातील "कांगा लीग" मधील सामने बघणे, हे माझ्या पिढीचे आद्यकर्तव्य होते. गंमत म्हणजे, पुढे दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अगदी संजय मांजरेकर पर्यंत सगळे खेळाडू आपले कर्तव्य मानून, या सगळ्या करंडकाच्या सामन्यातून भान हरपून खेळायचे.
असे असंख्य सामने मला आठवत आहेत, जिथे मुंबई हरणार असे जवळपास नक्की व्हायचे पण मुंबईचा "काका" (कितीतरी वर्षे अशोक मंकड मुंबईचा कर्णधार होता आणि त्याच्या हाताखाली सुनील,एकनाथ, सरदेसाई, जीवाची बाजी लावून खेळायचे) कुठलीतरी क्लुप्ती लढवायचा आणि हरत असलेला सामना, मुंबईच्या खिशात जायचा. मला तर आजही असेच वाटते, अशोक मंकड सारखा कर्णधार झाला नाही. सचिनचा उदय झाला आणि हळूहळू रणजी सामन्यांचे आकर्षण कमी व्हायला लागले. वास्तविक खुद्द सचिन देखील वेळ मिळेल तसा रणजी सामने खेळतच होता. एकेवर्षी तर सचिनने द्विशतक करून, मुंबईला रणजी करंडक मिळवून दिला होता पण आता मुंबई बाहेरचे अनेक संघ तितकेच बलशाली व्हायला लागले. माझ्या तरुणपणी, मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली आणि कधीकधी हैदराबाद किंवा तामिळनाडू संघ, यांच्यात जीवघेणी चुरस असायची. पुढे, या खेळात प्रचंड पैसा आला तसेच मुख्य म्हणजे मुंबई संघाची रया गेली आणि एकूणच मुंबईपुरते आकर्षण कमी होत गेले.
आता तर रणजी सामने कधी होतात, कोण जिंकते, असते प्रश्नच पडत नाहीत आणि रणजी करंडकाचे "ग्लॅमर" कधी संपले, हेच ध्यानात आले नाही.
आपली आवड
आपण एखादे गाणे ऐकतो किंवा एखादा रंगभूमीवर सादर होणारा कार्यक्रम बघतो तेंव्हा आपल्या मनावर त्याचा बरावाईट परिणाम नेहमीच होत असतो. कुठलीही जाहीररीत्या सादर होणारी कलाकृती ही मानवी मनावर परिणाम ही घडवितच असते , मग तो परिणाम कशाही प्रकारचा असू शकतो. आपल्याला त्याचा प्रभाव लगोलग जाणवतो, असे नसते. काही परिणाम दीर्घ काळाने आपले अस्तित्व दाखवतात तर काही तात्काळ दाखवतात. त्यानुरूप आपण आपली आवड नक्की करीत असतो. बहुतेकवेळा आपली आवड ही साधकबाधक विचार करून ठरतेच असे नाही कारण "माझी आवड" हाच विचार आपली ठरवायला प्रभाव टाकणारा असतो.
परंतु "आपली आवड" हा निकष म्हणून योग्य आहे का? यातून अहंकार प्रकट होत नाही का? बरेचवेळा इतपत विचार करण्याचे तारतम्य दाखवले जात नाही. याचे मुख्य कारण, पुन्हा "माझी आवड" इथेच गाडी येऊन थांबते. आपण आपल्यामध्ये इतके गुंतलेले असतो की त्यापलीकडील जग न्याहाळायची गरज वाटत नाही. त्यामुळे मग "दर्जा"ठरवणे, या कृतीला काहीच अर्थ उरत नाही.
हाच मुद्दा पुढे आणायचा झाल्यास, जेंव्हा आपण इतरांच्या कलाकृती बघतो/ऐकतो, तेंव्हा डोळ्यावरील पट्टी काढून आस्वाद घेणे, हे घडतच नाही. आपल्याला याची साधी जाणीव देखील होत नाही.
जेंव्हा एखादा कलाकार दुस-याची कलाकृती सादर करतो तेंव्हा त्याच्याकडे २ पर्याय असतात. १)मूळ कलाकृती जशी आहे, तशीच्या तशी सादर करणे किंवा २) त्या कलाकृतीत स्वत:ची भर टाकून, त्या कलाकृतीची सौंदर्यवृद्धी करणे.
आता हे दोन्ही मुद्दे तौलनिकदृष्ट्या बघितले तर सादर करायला अती अवघड असतात. स्वत:ची स्वतंत्र भर टाकायची म्हणजे मूळ कलाकृतीचे संपूर्ण आकलन होणे गरजेचे असते. त्या कलाकृतीतील अचूक सौंदर्याचे भान असायला हवे आणि मुख्य म्हणजे आपण जी भर टाकत आहोत, त्याची वाजवी जाणीव असणे गरजेचे असते.
मुळ कलाकृती तशीच्या तशी सादर करायची झाल्यास, पुन्हा तोच मुद्दा मांडायचा झाल्यास, मूळ कलाकृती पचवता आली पाहिजे.
एकूण काय, सादर करायच्या कलेचे समग्र भान अत्यावश्यक. बहुतेक वेळा, इथेच फसगत होते. आकलन होण्याआधीच सादर करायची घाई होते आणि सगळेच विसविशीत होऊन बसते.
मजेदार भाग म्हणजे सादरीकरण घिसडघाईने केले आहे, याचे भान देखील होत नसते. तरीही लोकांच्या समोर यायची प्रचंड इच्छा असते आणि बरेचवेळा आपलेच हसू करून घ्यायचे असते.
कुठलेही सादरीकरण हे नेहमीच गंभीरपणे सादर करायचे असते आणि हीच जाणीव नसते.
Monday, 7 November 2022
कविता आणि समीक्षा
कविता आणि वाचक यांच्यामध्ये दुर्बोधता हाच एकमेव अडथळा असतो, हे तितकेसे नेमके विधान म्हणता येणार नाही. परंतु यामुळेच निर्माण होणारे अंतर जमेल तितके कमी करणे, समीक्षकाच्या हाती असू शकते. विशेषतः कवितेच्या वेगवेगळ्या सर्जनशीलतेच्या शक्यता निर्माण होत असताना आणि त्यायोगे वाचकाच्या अभिरुचीच्या बदलाचा वेध घेत असताना,जेंव्हा तफावत जाणवते, तिथे समीक्षक मदतीला येऊ शकतो. असे म्हणता येईल, कवितेच्या सर्जनाच्या प्रगतीत प्रतिभेला अनन्यसाधारण महत्व मिळते तर अभिरुची घडताना, वाचकाच्या दृष्टीने सामाजिक संस्कृती आपले महत्व दाखवून देत असते. अर्थात ही संस्कृती घडण्यात, कलेबाहेरील असंख्य घटक कारणीभूत असतात. बरेचवेळा हेच घटक संस्कृती घडणे किंवा संस्कृतीवर परिणाम घडवणे, या कृतीला कारणीभूत ठरतात. वेगळ्या अर्थाने ही विधाने बघायची झाल्यास, या सगळ्या घटकांचा घडणारा आणि वाढणारा परिणाम बघता, कवितेच्या सर्जनशीलतेवरील परिणाम अनिवार्य होऊ शकतो. आणखी वेगळा मूड बघायचा झाल्यास, साहित्यातील सर्जनशीलता आणि त्याचा विकास आणि जोडीने अभिरुची, यातील अंतर कमी होणे, हे शक्य आहे का?
कवितेतील सर्जनता ही वाचकाच्या अभिरुचीशी ताडून बघता, नेहमीच गतिशील आणि म्हणून अतर्क्य राहणार. त्यामुळे दोन्ही बाबतीत काही अंतर जरी अनिवार्य असले तरी संवाद अशक्य होईल, अशी परिस्थिती उद्भवू नये, ही काळजी समीक्षकांनी घ्यायला पाहिजे. याचाच पुढील भाग म्हणजे कवितेतील अतर्क्यता किंवा दुर्बोधता, समीक्षकाने वाचकांना समजावून सांगण्याची जबाबदारी घ्यायला जाऊ नये. तो एकप्रकाराने आत्मघात ठरू शकतो. काव्यात्म दुर्बोधता खरी असेल तर ती कशा प्रकारची आहे, हे वाचकाला नुसती जाणवते असे नसून, ती प्रत्यक्ष कवीला देखील जाणवते.
प्रतिभेच्या अनाकलनीय शक्तीने सृजन करणारा कवी आणि आसपासच्या सामाजिक संदर्भात सामील असलेला कवी, जो काहीवेळा अभिरुचीच्या सामाजिक पातळीवर उभा राहून आपल्याच कवितेकडे न्याहाळणारा कवी, हे एक नव्हेत. असे देखील बरेचवेळा घडते, तो खुद्द कवीच आपल्या कवितेकडे पुन्हा बघतो तेंव्हा अधिक भांबावलेला असतो.
जाणीवलक्षी कवितावाचनाने दुर्बोध कविता कमी प्रमाणात अगम्य होऊ शकते. पण तादात्म्य पावून, जाणीवलक्षी कवितावाचन करणे, प्रत्येक कवीला शक्य असतेच असे नाही. यात आणखी एक मुद्दा महत्वाचा येतो, असामान्य प्रतिभेचा कवी देखील आपलीच कविता वाचताना, आपल्या कवितेच्या अंगाने रसिकाला नेण्याऐवजी, रसिकांचा कल बघून आपल्या कवितेला त्या अंगाने नेऊ शकतो. रसिकाला काय आवडते, ती आवड नेमकेपणाने लक्षात ठेऊन मग आपली कविता मांडणे, हेच प्रधान ध्येय ठेऊ शकतो. अर्थात यामुळे कविता आकळली नाही तरीही रसिक ती कविता उपभोगू शकतो!! अशा वेळी, कवीला नेमके काय म्हणायचे आहे/होते, याला पूर्णपणे गौणत्व प्राप्त होते. कविता बाजारू यशाला चटावली जाऊ शकते.
अशावेळेस कवीने "भाष्यकार" बनणे कितपत योग्य ठरेल? काहि वेळा खुद्द कवी हाच चांगला टीकाकार होऊ शकतो पण असेलच ही शक्यता योगायोगाची ठरू शकते. कवीच्या सृजनप्रक्रियेत अंतर्भूत असलेली अटळ आणि अप्रकट आत्मटीका कितपत प्रस्तुत मानवी? हा प्रश्न देखील इथे उद्भवू शकतो. याशिवाय कवीची टीका ही पुष्कळदा एकांगी तसेच समर्थनपर होऊ शकते. कवीने स्वतःबाबत कितीही त्रयस्थ भूमिका घेतली तरी स्वतःचीच कलाकृती म्हटल्यावर त्रयस्थ वृत्ती कितपत त्रयस्थ राहू शकेल? त्यामुळे कविता लिहिणे, हीच आपली जबाबदारी असावी. कवितेतील अगम्यतेचे स्वरूप स्पष्ट करण्याची जबाबदारी, अखेरीस टीकाकार किंवा समीक्षकांची असावी. अशा कवितांमध्ये जे अनिर्वचनीय असेल ते स्पष्ट करण्याचा मोह टाळणे इष्ट.
Friday, 4 November 2022
टेबललॅन्ड - केप टाऊन
खरंतर केप टाऊन शहर, हाच निसर्गाचा उत्सव आहे. एकतर दक्षिण गोलार्धाचे अंतिम टोक म्हणून जगप्रसिद्ध आहे. केप ऑफ गुड होप बघताना, आपण पृथ्वीच्या एका टोकाला उभे आहोत, हि जाणीव कधीच विसरली जात नाही. त्यातून, केप ऑफ गुड होप, हे एक छोट्या डोंगरावर आहे. तिथून खाली उतरायला परवानगी नाही. तिथून खाली व्यवस्थित बघता येते. एका बाजूला अटलांटिक महासागर आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर, स्पष्टपणे ओळखता येतात. हिंदी महासागराचे काळसर पाणी तर अटलांटिक महागराचे निळसर पाणी बघता येते. आपण पृथ्वीच्या टोकाला आहोत आणि जिथे कुठे नजर जाते तिथे फक्त पाणी दिसते. जरा लांबवर बघितले तर खवळलेला समुद्र दिसतो. असे पाणी बघताना, मनात एक भाव सतत असतो, या पाण्याच्या पलीकडे नक्की काय असेल? अर्थात कुठेतरी लांबवर अंटार्क्टिक बेट आहे पण नजरेच्या कुठल्याच टप्प्यात ते दिसणे अशक्य आहे. त्यामुळे पाण्याचे साहचर्य, काहीवेळा
भयावह वाटू शकते. मी ४ वेळा तरी या स्थळाला भेट दिली आहे. एकदा पार आत लांबवर, व्हेल मासा पोहत असल्याचे दिसले आणि जरी आम्ही मित्र सुरक्षित असलो तरी एकूणच त्याचे आकारमान निश्चितच भयप्रद असे होते.
केप टाऊन शहर निसर्ग सौंदर्याने वेढलेले आहे. शहरात झाडी तर आहेच परंतु एकूणच हिरवळीचे प्रमाण भरपूर आहे. शहराच्या बाजूलाच वेगवेगळ्या वायनरीज असल्याचा परिणाम असणार पण हिरवळ भरपूर आढळते. एकत्र दक्षिण गोलार्धाच्या टोकाला हे शहर वसलेले असल्याने, जून,जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी अनुभवायला मिळते. अगदी अंगात जॅकेट वगैरे घातलेले असले तरी देखील चेहरा झाकून घ्यायला लागतो. विशेषतः दुपार कलायला लागली की काळोख पसरतो आणि थंडीचे साम्राज्य सुरु होते.
शहरात काही अप्रतिम समुद्र किनारे आहेत आणि अर्थात आधुनिक सुखसोयी असल्याने, किनाऱ्यावर नुसते बसून राहणे, हा देखील आनंदोत्सव असतो. हातात बियरचा थंडगार ग्लास घ्यायचा आणि किनाऱ्यावर एखाद्या खुर्चीवर निवांतपणे बसून राहणे, हा अनिर्वचनीय अनुभव असतो. अर्थात असे समुद्र किनारे डर्बन शहराला लाभले आहेत, त्यामुळे समुद्र किनारे म्हणून काही नवल वाटत नाही परंतु सुखसोयी उपभोगणे, हा वेगळाच आनंद असतो. मी एकदा जून महिन्यात, मित्रांबरोबर या शहरात आलो असताना, मुद्दामून "सी पॉईंट" इथल्या किनाऱ्यावर संध्याकाळी, अक्षरशः वारा भणाणत असताना, मुद्दामून थंडगार बियर घेऊन, बसलो होतो. तापमान जवळपास ३ इतके उतरले होते आणि अक्षरश: दात वाजत होते तरीही मनाचा हिय्या करून तासभर, तिथे बसलो (बियर सेवन चालूच होते). असा अनुभव चुकूनही डर्बन इथे येत नाही. डर्बन इथले हवामान बरेचसे मुंबई सारखे असते, फक्त मुंबईत घामाच्या धारा सहन कराव्या लागतात तर डर्बनचे अतिशय ड्राय हवामान असते.
अशाच एका फेरीत आम्ही मित्र इथल्या जगप्रसिद्ध "टेबललँड" या डोंगरावर जायचे ठरवले. खरंतर हा डोंगर, हीच या शहराची खरी ओळख आहे. महासागराच्या एका अंगाला पाचर मारून, हा डोंगर उभा आहे. डोंगराच्या पायथ्याशी तुम्ही गाडी ठेवायला लागते. या डोंगरावर ट्रेकिंग करायची परवानगी नाही! पायथ्याशीच केबल कार मिळते. केबल कार म्हणजे काचेची केबिन असते आणि विजेच्या केबल्सने ती डोंगराच्या पठारावर आणू सोडते आणि तुम्हाला वेळ तेंव्हा, तुम्ही याच केबल कारने खाली येऊ शकता. खालून वर जाताना, सगळे केप टाऊन शहर बघता येते. ते दृश्य विलोभनीय असते. ही काचेची केबिन, पूर्णपणे बंदिस्त असते आणि अर्थात सुरक्षित असते. अतिशय हळू वेगाने केबल कार वर चढत असल्याने, आपण सगळे शहर बघू शकतो. वर गेल्यावर मात्र निसर्गाचा खरा प्रताप अनुभवायला मिळतो. केबिन बंदिस्त असल्याने, बाहेरील वातावरणाचा "प्रसाद" अनुभवायला मिळत नाही. मी जेंव्हा प्रथमच आलो होतो तेंव्हा डिसेंबर महिना होता, म्हणजे कडाक्याचा उन्हाळा होता परंतु इथे या पठारावर पाऊल ठेवले आणि थंडीने अंग शहारून निघाले!!
डोंगर माथ्यावर विस्तीर्ण असे पठार आहे. त्यामुळे तुम्ही भरपूर पायी हिंडू शकता. भर दुपारी, डोंगराच्या पायथ्याशी २५ तपमान असते आणि काही मिनिटांत तुम्हाला ५,६ तपमानात वावरावे लागते!! त्यातून, वारा नुसता सुसाटलेला असतो. अर्थात जून,जुलै महिन्यात, तिथे जायला बंदी असते कारण कडाक्याची थंडी!! आजूबाजूला सावलीला म्हणून झाड नाही. तसेच तिथे, इतर पर्यटन स्थळांवर निदान एखादे छोटेखानी रेस्टॉरंट असते पण इथे तसली एकही सुविधा नाही. निसर्गाचा चमत्कार अनुभवणे, हा आनंदाचा भाग असतो. डोळे उन्हाने दिपून जातात पण शरीर थंडीने काकडलेले असते!! तुम्ही फारतर अर्धा,पाऊण तास तिथे राहू शकता पण तेव्हड्या वेळात, तुम्ही आयुष्यभराचा अनुभव गाठीशी बांधून घेता. वास्तविक पाहता, हा नैसर्गिक चमत्कार आहे परंतु हाच डोंगर, या शहराची ओळख करायची, त्याचे व्यावसायिक पद्धतीने मार्केटिंग करायचे आणि एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून गणना करून घ्यायची, हे इथल्या सरकारचे खरे यश म्हणायला हवे.
Subscribe to:
Posts (Atom)