Sunday, 5 April 2020
समीक्षा - एक ओझरता दृष्टिक्षेप
हा विषय चर्चेसाठी घेण्याआधी एक बाब स्पष्ट करतो. इथे समीक्षा ही केवळ साहित्य हाच विषय घेऊन करणार आहे. वास्तविक साहित्य हा विषय कलेच्या प्रांगणात मोडतो तरीही इतर कलांसाठी स्वतंत्र लिहिणे मला अभिप्रेत आहे. आपण बहुतेकजण साहित्य वाचतो त्याचा प्राथमिक हेतू स्वानंद हाच असतो .अर्थात आनंद कशाप्रकारे घ्यावा किंवा मुळात स्वानंद म्हणजे काय? हा प्रश्न सुद्धा इथे येऊ शकतो. अर्थात त्यासाठी आपल्याला "सौंदर्य" या शब्दाकडे वळावे लागेल. याचे महत्वाचे कारण असे संभवते "आनंद" ही भावना मनात निर्माण होण्यासाठी त्या घटिताचे "सौंदर्य" आपल्याला भावलेले असणे जरुरीचे असते.
साहित्य समीक्षेला सौंदर्यशास्त्राचा व्यापक पायावर उभे करणे आणि सौंदर्यशास्त्रातील माध्यमाच्या विचारात सुसंगती आणून माध्यमाच्या कल्पनेपासून साधनांच्या कल्पनेची फारकत करणे फार आवश्यक ठरते. सर्वसाधारपणे ललित साहित्याचे सौंदर्य हे भावनात्मक आशयाच्या लयबद्ध संघटनावर अवलंबून असते आणि ही बाब बरेचजण मान्य करताना दिसते. आता हे सौंदर्यनिष्ठ संघटन म्हणजे काय? हा प्रश्न इथे पडू शकतो. वास्तविक कुठल्याही साहित्यात साहचर्यनिष्ठ आणि तर्कनिष्ठ या बाबी अंतर्भूत असतातच. परंतु सौंदर्यनिष्ठ हे कोणत्या अर्थी भिन्न आहे? आणि साहित्याच्या सौंदर्याचे मूल्यमापन करताना फक्त तेच तेव्हडे महत्वाचे ठरते का? वास्तविक पहाता कलाकृतीत अपेक्षित असलेल्या या सौंदर्यनिष्ठ संगतीविषयी आणि त्या संगतीच्या साहचर्यनिष्ठ तसेच तर्कनिष्ठ संगतीशी असलेल्या संबंधाविषयी बरीच मतांतरे आढळतात. यामुळेच बहुदा विशेषतः कवितेची समीक्षा करताना, बरेचवेळा साहचर्यनिष्ठ संबंध लावला जातो पण तो सौंदर्यनिष्ठ दृष्टीने अर्थहीन ठरतो.
मुळात सौंदर्यभावना म्हणजे काय? परिस्थितीकडून येणाऱ्या संदेशाविषयी ३ प्रकारच्या संगती लावता येतात. १) मानसशास्त्रीय, २) तर्कशास्त्रीय, ३) सौंदर्यत्मक. यातील मानसशास्त्रीयाची संगती ही साहचर्यनिष्ठ तर तर्कशास्त्रीय संगती ही कार्यकारणनिष्ठ आणि अनुमानप्रधान असते. परंतु सौंदर्यनिष्ठ ही बरेचवेळा साक्षात्कारासारखी कालनिरपेक्ष असते. साहित्याच्या सौंदर्यनिष्ठ संगतीचा प्रत्यय म्हणजेच संवाद,विरोध,समतोल याचा प्रत्यय होय.
ललित साहित्याचे कलामूल्य हे नेहमीच सौंदर्यनिष्ठ संगतीनेच सिद्ध होत असले तरी याच ललित साहित्यात साहचर्य आणि तर्क असतोच. विशेषतः कवितेसारख्या कलाकृतीत या तिन्हींचा समन्वय दिसू शकतो. सारांश मांडायचा झाल्यास, सौंदर्यनिष्ठ संघटनांची कल्पना आशयभीरू किंवा नकारात्मक नाही. अमुक एक मांडणी तर्कनिष्ठ किंवा साहचर्यनिष्ठ नाही म्हणून ते सौंदर्यनिष्ठ अशी उथळ समीकरणे मांडण्यास कसलाही आधार नाही. अर्थात विज्ञानात जसे प्रत्येक मुद्दा पूर्णपणे तपासून त्याची वैशिष्ट्ये नोंदवली जातात त्याप्रमाणे कलाकृतीबाबत करता येत नाही आणि हीच खरी अडचण आहे.
इथे आपल्याला २ बाबी लक्षात ठेवाव्या लागतील. कलास्वरूप शास्त्राचे स्वरूप नाही. जर तसे आहे हे गृहीत धरले तर सुंदर म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर त्या आधारे सुंदर वस्तूंचा वर्ग करून आपण सिद्ध करू पण तरीही सुंदर म्हणजे काय? याचे उत्तर रसिकांकडून पडताळता येईल. पण मग पुढला प्रश्न, रसिक कोण? रसिक तो ज्याला कलाकृती,कलाकृती म्हणून जाणवतात इथे बराच गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे "रसिक" गृहीत धरल्याशिवाय रसिक पदाची व्याख्या करता येत नाही. त्यामुळे सुंदर या शब्दाभोवतीच कलाकृतीची व्याख्या बघावी लागते आणि असे हे चक्र आहे. या चक्राची सोडवणूक "आस्वाद" या शब्दाने थोडीफार करता येईल. इथे "थोडीफार" हा शब्द वापरला कारण आस्वाद म्हणजे काय हे मांडण्याआधी रसिक आणि कलाकृती हे मुद्दे निश्चित करायला लागतात आणि हे सगळे परस्पराश्रयी आहेत. याची २ कारणे संभवतात. १) ऐतिहासिक, २) मानसिक. ऐतिहासिक या दृष्टीने म्हणता येईल, मानवजातीच्या प्रारंभकाळी मानवी व्यवहाराचे स्पष्ट असे भेद पडले नव्हते. पारलौकिक गरजा पूर्ण करणारे साहित्य, सत्यसंशोधन करणारे साहित्य आणि ललित साहित्य असे प्रकार पूर्वी नव्हते. कोणे एके काळी, धर्म,विज्ञान,नीती,कला ही क्षेत्रे परस्परसंमिश्र होती.त्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या अपेक्षा देखील संमिश्र होत्या. या कालखंडाती काही आकृती आज कलाकृती म्हणून मान्य झाल्या आहेत. उदाहरणार्थ महाभारत. मराठीतील शाहिरी साहित्य देखील एक सुंदर उदाहरण म्हणून घेता येईल.याचा परिणाम असा होतो या वर्गाची अचूक व्याख्या निरातिशय अवघड होऊन बसते. आता दुसरी बाब मानसिक. लहानपणापासून आपण सगळेच एका ठराविक क्रमाने बाहेरच्या जगाचा अर्थ समजून घेत वाढतो. या क्रियेत सत्य आणि असत्या या विधेयकांची जाणीव वास्तविक आणि काल्पनिक या पातळ्यांच जाणीव बऱ्याच उशिराने निर्माण होते. याच पातळीवर कुठेतरी कलाकृतींचा कलात्मक आस्वाद घेण्याच्या पातळीपर्यंत माणसाचा विकास होत जातो. हा विकास परंपरेने एकत्र आलेल्या साहित्याच्या आधारे होतो. हा प्रवाह ध्यानात घेतल्याशिवाय कलात्मक व्यवहारांचे कुठलेही स्पष्टीकरण अशक्य होते. याच क्रमाने व्यक्तींचा विकास होताना त्याच्या आवडी-निवडी अनेक कारणांनी मर्यादित होऊन बसतात. अनेकांना काही आकृती आवडतात पण त्यामागे बरेचवेळा wishful thinking हे सुद्धा असते. परंतु हे सगळे गृहीत धरले तरीही सौंदर्य हे स्वतंत्र तत्व असण्यास प्रत्यवाय का असावा? एकत्र सौंदर्य नावाचे कुठले तरी अमूर्त तत्व असून ते सर्व सुंदर वस्तूंच्या ठिकाणी प्रकट होते असे मानायला काही आधार सापडत नाही. आणि दुसरे म्हणजे Normative विधान आज्ञार्थी स्वरूपात मांडता येते गरजेचे होऊन बसते. उदाहरणार्थ "चोरी करणे पाप आहे". या विधानातच "अरे तू चोरी करू नकोस" हे विधान अंतर्भूत आहे. त्याचप्रमाणे "क्ष" सुंदर आहे. या विधानात "अरे तू क्ष चा आस्वाद घेऊन सुखी होणे आपले कर्तव्य मानले पाहिजे" असे विधान अभिप्रेत असणार नाही. कारण ज्या दिवशी अशी कर्तव्याची भाषा कलाकृतीच्या संदर्भात आपण मांडू त्या दिवशी रसिकाची स्वायत्तता संपून जाईल. ज्याप्रमाणे नीतितत्त्वे कायद्यात मिसळली आहेत, उदाहरणार्थ "चोरी करणे हा गुन्हा आहे", तशी मांडणी सौंदर्याच्या संदर्भात करावी लागेल.
काहीजण नीतिशास्त्राधिष्ठित समीक्षा,मानसशास्त्राधिष्ठित समीक्षासौंदर्यशास्त्राधिष्ठित समीक्षा अशी समीक्षेची वर्गवारी करतात. खरे म्हणजे अशी वार्डवरी कितपत ग्राह्य धरायची? असे तर नव्हे ही सगळी समीक्षेला आधारभूत असणाऱ्या ज्ञानाची वर्गवारी आहे. परंतु या आधारभूत ज्ञानात नीतिशास्त्र,समाजशास्त्र,मानसशास्त्र इत्यादी शास्त्रे असू शकतात पण त्यात सौंदर्यशास्त्र बसत नाही. कलाकृतीत असणाऱ्या सौंदर्याची अशी कोणती नवीन व्याख्या सौंदर्यशास्त्र इतरत्र शोधू शकत नाही. तेंव्हा अखेर असे म्हणता येईल, कलाकृती ही कलाकृती म्हणून ठरवण्यासाठी ज्याची गरज आहे त्यालाच सौंदर्य म्हणावे.
सर्वसाधारणपणे समीक्षकांच्या दृष्टीने साहित्याचे मूल्यमापन हा एक महत्वाचा प्रश्न असतो आणि त्या दृष्टीने बघायला गेल्यास, मूल्यमापनाचा प्रश्न हा काही अंशी अंतिम मूल्यांच्या प्रश्नांशी निगडित असतो. आपल्याकडे "सत्य","शिव" आणि "सौंदर्य" यांना सर्वसाधारपणे "अंतिम' मूल्ये म्हणून गृहीत धरतो. गंमत म्हणजे यातील कुठलेही एक मूल्य हे दुसऱ्याशी कार्यकारणभावाने निगडित नसते. तसेच कुठल्याही एका मूल्याशी संबंध जोडता आला तर त्याचे साफल्य आपण मान्य करतो आणि इथेच आपण भावानुभवांतील ळ्यतत्वांना आद्य स्थान देऊन सौंदर्य हे मूल्य साहित्याच्या स्वरूपात प्रविष्ट केले जाते. हाच मुद्दा पुढे वाढवायचा झाल्यास, साहित्याच्या महात्मतेत लक्ष्य असलेला कैवल्यपूर्ण (Absolute) मूल्यभाव म्हणजेच त्या लयबद्धतेतून व्यक्त होणारे सौंदर्य.
ललित साहित्याची अंगभूत श्रेष्ठता ठरवताना "आधुनिकता" हा मुद्दा थोडासा अप्रस्तुत असला तरी "नाविन्याचा" विचार अप्रस्तुत ठरत नाही. याबाबतीत एक मुद्दा मांडायचा झाल्यास, कोबी प्रतिभेचा धर्म असा असतो की, तो एका घटनेने येणाऱ्या प्रत्यक्ष अनुभूतीचा संबंध दुसऱ्या एका अध्याहृत घटनेवर आधारलेल्या अनुभूतींशी जोडीत असतो. हा संबंध भावनात्मक असतो म्हणजेच वेगळ्या शब्दात भावनानिष्ठ असतो. अर्थात यामध्ये आणखी एक मुद्दा उद्भवतो. भावनानिष्ठ समतानतेचा प्रत्यय मुख्यतः नव्या प्रतिमांतून येत असतो. इथे गोधळ उडण्याची शक्यता जास्त. "भाषेच्या सफाईदार आणि" आपण आपलीच फसगत तर करून घेत नाही ना आणि इथेच समीक्षक आणि त्याचे जागरूक असणे महत्वाचे ठरते. प्रतिमांचे आद्य कार्य आशयाला जिवंतपणा, इंद्रियगोचरत्व आणि विविक्षीतता देणे हेच असते. तरीही "नावीन्य" ही कल्पना कवीच्या विकासातील टप्पे दाखवताना उपकारक ठरते
समीक्षेचा पुढील विचार हा फलश्रुतीशिवाय कधीच पूर्ण होणार नाही. ललित साहित्याची सांस्कृतिक फलश्रुती समजून घेण्यासाठी प्रथम "ललित साहित्य" आणि "सांस्कृतिक फलश्रुती" या शब्दांचा अर्थ निश्चित करावा लागेल. ललित साहित्याविषयी असे म्हणता येईल "भाषेच्या साधनेने केलेली कल्पनाप्राप्त जीवनप्रक्रियेची बंदिश!" बंदिश या शब्दाने "स्वयंपूर्ण घाट" ही कल्पना व्यक्त होत असल्याने वेगळ्याने "सौंदर्यनिष्ठ" हा शब्द वापरायची गरज नाही.याचे कारण सौंदर्य हे ललित साहित्याचे एकमेव वैशिष्ट्य नव्हे. कल्पनाप्राप्त जीवनक्रिया हेच ललित साहित्याचे खरे वैशिष्ट्य आहे.त्या दृष्टीने पुढील विचार करता, तत्वज्ञानात्मक चिंतन आणि नितळ कल्पनाप्राप्त जीवनाभूतीची बंदिश या दोन्ही गोष्टी एकत्र आणणे योग्य ठरणार नाही.
आता आपण ललित साहित्याच्या सांस्कृतिक फलश्रुतीचा अर्थ निश्चित करण्याचा प्रयत्न करू. सत्य, शिव आणि ससौंदर्य ही आदिमूल्ये आत्मसात करण्यासाठी मानवाने परस्पर सहकार्यातून निर्मिलेल्या वस्तूंचा, संस्थांचा आणि कल्पनांचा एकात्म संभार म्हणजे संस्कृती असे साधारणपणे मांडता येईल. इथे मी "कल्पना" हा शब्द थोडा वेगळ्या अर्थाने वापरला आहे.त्यामध्ये विचार,संकेत,विधी,कलाकृती इत्यादी सर्व मानसिक सृजनाचा अंतर्भाव केला आहे. जर का ही व्याख्या मान्य असेल तर मग संस्कृती ही स्वभावतःच सामाजिक असली तरी तिची फलश्रुती मात्र व्यक्तीचे जीवन अनिवार्यपणे संस्कारित करणे हीच असते. समर्थ,जिवंत आणि सर्वस्पर्शी संस्कृतीचे लक्षण असे की त्या संस्कृतीच्या क्षेत्रात अंतर्भूत झालेल्या माणसाचे व्यक्तित्व हे त्याच्या नकळत कमीजास्तपणे संस्कारित झालेले असते. याच दृष्टीने "सांस्कृतिक वारसा" या शब्दाला असा अर्थ असतो. आणि त्यातूनच सुशिक्षित माणसे असंस्कृत आणि अशिक्षित माणसे सुसंस्कृत आढळणे शक्य असते.
ललित साहित्याच्या सांस्कृतिक फलश्रुतील स्थळकाळाच्या मर्यादा नसतात. फार मोठ्या व्याप्तीने बोलायचे झाल्यास, १) सूक्ष्म संवेदनशक्ती,२) व्यापक कल्पनाशक्ती, ३) औचित्यविचाराच्या सापेक्षतेची समज,४) सर्वसाक्षी सहानुभूती आणि ५) अपरिहार्य अस्वस्थता यातूनच बहुदा सुसंस्कृत शब्दाची व्याप्ती समजून घेता येईल.
जीवनदर्शी ललित साहित्य हे अशाच स्वरूपाचा मूलभूत संस्कार करीत असतात. अर्थात अशा स्वरूपाचा संस्कार आपण करावा हा हेतू त्यामागे असतोच असे ठामपणे सांगणे अवघड आहे. इथे चमत्कारिक विरोधाभास दडलेला आहे. जो संस्कार करण्याचा प्रयत्न करतो तो संस्कार करण्यात क्वचित यशस्वी होतो. हे काम जिद्दीने होणार नसून प्रतिभेच्या स्वभावसिद्ध अधिकारानेच सिद्ध होते. जीवनदर्शी साहित्याने आपली संवेदनशक्ती अधिक सूक्ष्म होते हे नक्की. परस्परविरोधी व्यक्तींचे अनुभव आत्मसात करण्याइतकी आपली कल्पनाशक्ती व्यापक करतात. या सर्वांचा अटळ परिणाम सर्वसाक्षी सहानुभूती हाच असतो. यात मोडणारे ललित साहित्य हे नेहमी सत्य ,शिव आणि सुंदर या मूल्यांचा अधिकाधिक साक्षेपी शोध घेण्याचा ध्यास निर्माण करतात आणि दुसरीकडे आपण या कल्पनांसाठी निर्माण केलेलं तकलुपी साचे व व्याख्या पुन्हापुन्हा मोडून टाकतात आणि त्याची पुनर्रचना करायला भाग पाडतात. जीवनाचे व्यापक दर्शन घडत असताना आपल्याला त्याच्यातील विसंगतीचा आणि अपूर्णतेची साक्षात्कार घडवत असतात.
कल्पनेच्या पातळीवर जीवनाच्या अनेक संभाव्य स्वरुपांचा अनुभव घेणे म्हणजेच आपल्या वैय्यक्तिक जीवनाच्या मर्यादा ओलांडून मानव या नात्याने आपल्या विशाल जीवनाला प्रारंभ करणे होय. अनेक आत्म्यांत प्रविष्ट होऊन जाणिवेच्या अनेक पातळ्या अनुभवण्यासाठी आपण जी विश्वप्रदक्षिणा करतो त्याचेच नाव ललित साहित्याचे वाचन होय. ललित साहित्याच्या मूळ स्वरूपातून निष्पन्न होणारी सांस्कृतिक फलश्रुती ही इतकीच असते
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment