खूप वर्षांपूर्वी मी मराठीतील सुप्रसिद्ध कवी "आरतीप्रभू" यांचा "नक्षत्रांचे देणे" हा कविता संग्रह वाचत होतो. बहुतेक सगळ्याच कविता भावत होत्या. हा कवी असाच आहे. कविता वाचताना कळत-नकळत आपण जाणत्याच्या बाजूने बघत राहतो आणि अचानक उमजलेले खरोखर बरोबर आहे का? या प्रश्नाचे अगम्य कोडे टाकतो. बरेचवेळा भ्रांतचित्त होते तरीही मनाला लागलेली असोशी या कवितांकडे ओढते. अशाच अवस्थेत असताना काही ओळी एकदम मनाच्या गाभ्यात उतरतात.
"हारजीतीच्या दुव्यांची मी फुले रे वेचितें ,
हारजीतीच्या दुव्यांचे हार मी ही गुंफिते.
ऊन अन पाऊस यांचे कांठ पांढरा जोडुनी
वादीसंवादी सुरांच्या मी किनारी धांवतें."
प्रणय भावना आणि त्यातील अपयश इत्यादी विषयांवर हिंदी चित्रपटाचा डोलारा उभारलेला आहे तर ठरू नये. परिणामी आशयात तोचतोचपणा, शिळपट अभिव्यक्ती यांची उतरंड रचलेली आढळून येते. अर्थात अपवाद म्हणून काही सांगता येतील. आता या गाण्याच्या संदर्भात विचार केल्यास, कवी प्यारेलाल संतोषी कधीही साहिर, मजरुह यांच्या तोडीची शायरी करू शकले नाहीत कारण तितका त्यांचा वकूब नव्हता. असे असून देखील हा कवी हिंदी चित्रपट सृष्टीत आपले बस्तान मांडून बसला होता आणि याची काही कारणे अशी - १) हुकूमबर संगीतकाराच्या हातात कविता देणे किंवा संगीतकाराने दिलेल्या चालीनुसार काव्य रचणे. २) चित्रपट गीतांत अभिव्यक्ती ही फार नसली तरी चालते परंतु कवितेत गेयता असणे महत्वाचे आणि चालीचे अंतरंग ओळखून त्यात फारशी अवघड (समजायला अवघड) शब्दरचना न करता प्रसंग धकून नेण्याची हातोटी. आता प्रस्तुत गीत आशयाच्या अंगाने बघितले तर प्रेमात अपयशी ठरल्यानंतरची पार्श्वभूमी आहे. तेंव्हा रात्र तळमळत काढणे, किंवा मानसिक विकलावस्थेला कोमेजल्या कळ्यांची उपमा देणे तसेच सगळे तारुण्य शुष्क झाले इत्यादी उपमा वापरल्या आहेत. आता यात काय नावीन्य आहे? जेंव्हा अशा सामान्य भावनांचे शाब्दिक चित्रण करायचे तर मग कुठंतरी काव्य म्हणून आपली अभिव्यक्ती सकस असणे आवश्यक असते जे वर निर्देशित केलेल्या साहिर,मजरुह ( या यादीत आणखी शायर अंतर्भूत होऊ शकतात) यांनी सातत्याने आपल्या कवितांमधून दाखवले. परंतु गाणे म्हणून वाचताना शाब्दिक लयीला कुठेही अडथळा येत नाही आणि अशी शब्दरचना संगीतकाराच्या दृष्टीने आवश्यक ठरते. कविता म्हणून वाचताना कुठेही कुठलाही शब्द अडखळल्यासारखा बोचत नाही. सहजपणे लय बांधली जाते.
संगीतकार म्हणून सी.रामचंद्र यांच्या कारकिर्दीतील एक असामान्य स्वररचना म्हणून मान्यता पावली गेली आहे. आशयातील व्याकुळता तितक्याच तरलतेने त्यांनी आपल्या चालीत मांडली आहे.अगदी गाण्याच्या सुरुवातीपासूनचा वाद्यमेळ लक्षात घेतला तरी सारंगीचे आर्त सूर आणि धीम्या मात्रांचा तबला यांनी गाण्याची पार्श्वभूमी तयार केली आहे. रागाच्या दृष्टीने बघितल्या बागेश्री रागाची आठवण येते. परंतु या गाण्याचे स्वर "जंगला" या अनवट रागावर आधारित आहेत. मला ही माहिती खरे तर नव्हती पण माझे औरंगाबादचे स्नेही संगीत वाग्गेयकार विश्वनाथ ओक यांनी दिली होती. पुढे मी युट्युबवर या रागाच्या काही क्लिप्स ऐकल्या आणि "गारा" राग आणि "बागेश्री" राग यांचे एकत्रित मिश्रण केल्याचे समजले. अर्थात एक बाब नक्की, संगीतकार सी.रामचंद्र यांनी काही अपवाद वगळता रागाचा वापर करताना त्यात स्वतःचे काहीतरी नवीन अंतर्भूत करायचे आणि वेळ पडली तर रागालाच बाजूला सारायचे अशी भूमिका घेतलेली आढळते. आपण चित्रपट गीत सादर करीत आहोत आणि ही भूमिका त्यांची अतिशय स्वच्छ होती. याच भूमिकेचा परिपाक पुढे शंकर/जयकिशन,एस.डी. आणि राहुल देव बर्मन इथपर्यंत पोहोचला.
गाण्याच्या सुरवातीचे सारंगीचे स्वर इतके हलके आणि व्याकुळ करणारे की तिथे खरतर तालवाद्य नसते तरी फार बिनसले नसते. लताबाईंचा तारता पल्ला विस्तृत असल्याने बहुतेकवेळा त्यांना वरच्या सुरांत बऱ्याच संगीतकारांनी लावले आहे परंतु इथे मात्र संगीतकाराने पहिल्यापासून खर्ज स्वर हा आधार स्वर घेतल्याने स्वररचना ही त्याच परिघात रुंजी घालते. या संगीतकाराला नेहमी उडत्या आणि आनंदी, खेळकर चालीचा निर्माता म्हणून अगणित प्रसिद्धी मिळाली पण ती किती एकांगी आहे, हे गाण्यावरून दिसून येते. या स्वररचनेचा बंध हा हळूहळू संयत वेदनेने आतल्याआत झिजणारा आहे. या चालीत कुठेही आक्रोश नाही. मला तर बरेचवेळा हे गाणे ऐकताना महाभारतातील अश्वत्थाम्याची कायमची भळभळणारी जखम आठवते. सी.रामचंद्रांच्या चालीचे आणखी एक वैशिष्ट्य असे असते. मुखडा ज्या चालीत बांधला आहे त्यापासून वेगळी चाल हा संगीतकार अंतऱ्यांना प्रदान करतो. वेगवेगळे अंतरे बांधणे हे निश्चितच सर्जनशीलतेचे महत्वाचे अंग मानावेच लागेल.
वर म्हटल्याप्रमाणे इथे लताबाईंनी आपला आवाज जितका म्हणून खर्ज स्वरांत आणता येईल तितका आणला आहे. वास्तविक स्त्री स्वर आणि त्यातूनही लताबाईंचा स्वर हा वरच्या पट्टीत आणि अधिक निमुळता होता जाणारा आहे परंतु आपले नेहमीचे वैशिष्ट्य बाजूला सारून इथे ठाय लयीतील स्वररचना तितक्याच समर्थपणे गाऊन लताबाईंनी आपल्या गायकीचे वेगळे आणि तितकेच लोभसवाणे अंग दाखवले आहे. हे गायन ऐकताना कुठेही अकारण खटका घेतलेला नाही की हरकत लांबवलेली नाही. त्याची गरजच नव्हती.
चालीतील अंगभूत सौंदर्य इतके अप्रतिम आहे की त्यासाठी वेगळ्या सांगीतिक अलंकारांची अजिबात गरज नाही. एका अजरामर परंतु काहीशा दुर्लक्षिलेल्या गाण्याकडे लक्ष वेधून घ्यावे इतकाच या लेखाचा मूळ हेतू आहे.
तुम क्या जानो तुम्हारी याद में , हम कितना रोये
रैन गुजारी तारे गिन गिन, चैन से जब तुम सोये
कितनी कलियां खिली चमन में, खिलके फिर मुरझा गयी
बिरहन के एक भोले मन को, बार बार समझा गयी
रोके जवानी काटी जिसने प्रीत के बिजे बोये
कितने बादल घिरे गगन में, घिर के फिर ना बरसे
प्यास दबा कर दिल ही दिल में,कितना तडपे तरसे
दर्द हमारा दिल जाने या, नैना खोये खोये
No comments:
Post a Comment