शाळेपासूनच अंगाने भरलेला, काहीसा स्थूल, सरळ केस (पण वागणे तिरके पण ते असो....) शरीरयष्टी थोडी बुटकबैंगण, घारे आणि निळसर डोळे (जात कुठली ते सांगायलाच नको म्हणा) आवाज थोडा घोगरा (म्हणूनच गायनाचे अंग नाही पण हे आमचे सगळ्यांचे सुदैव म्हणायला हवे) आणि शाळेपासूनच नैसर्गिकरीत्या जपलेली तिरकस जीभ!! सुनील सरळ बोलला तर आजच्या काळातील Breaking News ठरेल. शाळेपासून वाकड्यात बोलण्याची सवय आणि त्यातून बुद्धीचे वरदान असल्याने बोलताना सुनील जरी सरळ वाक्य बोलला तरी आम्ही मित्र त्याचा तिरका(च) अर्थ घेतो आणि ही सवय त्यानेच आम्हा सगळ्यांना लावली आहे.
त्याचे हसणे देखील प्रथमदर्शनी छद्मी वाटावे असे असते. सुनील मनापासून हसला आहे, हे दर्शन देवदुर्लभ असते. किंबहुना कुठे तिरकस विनोद झाला (बरेचवेळा त्यानेच केलेला असतो) की ओक्याला मनापासून आनंद होतो आणो आनंद त्याच्या सुप्रसिद्ध हास्यातुन जगाला समजतो. एकूणच ही व्यक्ती पहिल्यापासून काहीशी हूड अशी आहे आणि त्याला जोडून जहरी बोलणे आहे. त्यामुळे त्याच्या नाडी फारसे कुणी लागत नाही आणि बरोबरच आहे म्हणा, कोण उगीचच खवट टोमणा सहन करून घेईल. त्याच्या जिभेला खरी धार आली ती आपला हा गृप झाल्यापासून. तशी ही स्वारी शाळेच्या जवळच राहणारी - काही वर्षांपूर्वी त्याने खारघर इथे फ्लॅट घेतला आहे ( हे सुनीलच जगाला सांगत असतो. अर्थात खारघर सारख्या लांब जागा घेण्यात दुहेरी फायदा. कुणाला आमंत्रण दिले तरी येण्याची शक्यता कमीच. अर्थात सुनीलचे आमंत्रण म्हणजे भल्या पहाटे अचानक उंबराचे फुल दिसण्यासारखे आहे!!) त्यामुळे बरेचवेळा ही स्वारी जगप्रसिद्ध (हे सुनीलच जगाला ओरडून सांगतो) नावलकर बिल्डींग - खरेतर चाळ- या इमारतीच्या गॅलरीत (सुनीलच्या भाषेत "सौंध"!! सुनीलचे सगळेच जगावेगळे असते.) बसलेला दिसायचा. दुसऱ्या मजल्यावर त्याचे घर होते. अस्मादिकांना ३ वर्षांपूर्वी सुनीलच्या घरी जाण्याचे भाग्य लाभले होते. गणेशोत्सव होता आणि त्यानिमित्ताने त्याने घरी बोलावले होते. मी पण लगेच पडत्या फळाची आज्ञा स्विकारुन लगोलग घरी गेलो होतो. घरी स्वागत चांगले केले. चाळीत गणपती उत्सव असल्याने आनंदी वातावरण होते. मला त्याने चाळीतील गणपती दाखवला आणि त्या चाळीत किती प्रथितयश (हा शब्द सुनीलने मला त्यावेळी ऐकवला होता) व्यक्ती आल्या होत्या, त्यांचे फोटो वगैरे दाखवले आणि सुंदर प्रसाद दिला. अर्थात आमचा गणपती नवसाला पावतो आणि हो, जगप्रसिद्ध आहे वगैरे वाक्ये ऐकवली (मला या वाक्यांची सवय असल्याने लगोलग कानाबाहेर टाकली!!)
सुनील खरा खुलतो तो आपल्या WhatsApp गृपवर. इथे त्याची तलवारबाजी चालते आणि विशेषतः मी काही लिहिले की लगेच सुनीलचे उत्तर आलेच आणि ते त्याच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे (म्हणजे खवचट) असते. मला मानसिक दु:ख देण्यात त्याला तथाकथित आसुरी आनंद होतो पण मला आता त्याची सवय झाल्याने त्याचे टोमणे वाचतो आणि त्यालाही शालजोडीतले देण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक त्याचा आणि माझ्या मतांत भरपूर विरोधाभास आहे. सुनी देवादिकांवर सढळहस्ते विश्वास ठेवणारा तर मी तिकडे शक्यतो दुर्लक्ष करणारा. आता इथे कुणीही म्हणेल असे असूनही मी त्याच्या चाळीच्या गणेशोत्सवाला का गेलो? प्रश्न नक्कीच वाजवी आहे पण दस्तुरखुद्द सुनील महाराजांचे (मनापासूनचे असावे!!) आमंत्रण मिळण्याचे भाग्य नाकारणार कसे. या आपल्या गृपवर असे भाग्य किती जणांचे असेल? या प्रश्नावर एका हाताची बोटे जास्त होतील म्हणजे बघा. सुनील पक्का हिंदुत्ववादी आणि मी तसा निरालंब. शक्यतो या विषयांवर बोलणे टाळणारा. मला संगीतात भरपूर रुची आणि सुनील अगदी औरंगझेब नसला तरी गाण्यांवर गप्पा मारण्यातला नव्हे. माझी संगीतातील रुची हा सुनीलला मी कायमस्वरूपी चेष्टा करायला दिलेला मसाला आहे आणि सुनील तो मसाला व्यवस्थित वापरतो, अगदी माझे डोळे झोंबेपर्यंत!!
असे सगळे दैवीदत्त गुण असूनही त्याचा स्वभाव लोभस आहे. खवट बोलेल पण सगळे तात्कालिक असणार. गेल्या काही वर्षांपासून त्याला गुडघेदुखी झालेली आहे आणि सुनील त्या दुखण्याने त्रस्त झालेला आहे पण तरीही त्याच्या बोलण्यात कधी रडगाणे नसते. आम्ही गृपमधील काहीजण पूर्वी रविवारी सकाळी Morning Walk साठी चौपाटीवर जमत असू. अर्थात सुनील गिरगावात असल्याने त्याला आमंत्रण जायचे. त्यावेळी तर त्याचे दुखणे जरा वाढले होते. आमही सगळे आरामात नरिमन पॉईंट पर्यंत चालत जात असू पण हे महाशय फारतर हिंदू जिमखान्यापर्यंत आमच्या बरोबर असायचे आणि नंतर तिथेच बसून राहायचे. सुनील सरळ बोलला असेल तो याच वेळी!! एकदा तर मलाच शंका आली होती, खरेच याचा गुढगा दुखत आहे की हा नाटके करीत आहे? परंतु लगोलग त्याच्या गुढग्यावर ऑपरेशन झाले आणि मनातील किल्मिष नष्ट झाले. प्रश्न असा आहे,मनात किल्मिष आलेच कसे? याला उत्तर सुनीलचे वागणे!!
तसा ड्रिंक्स पार्टीला मात्र सुनील अफलातून कंपनी आहे. सतत बडबडत असे नाही नाही पण मध्येच एखादी फुसकुली सोडेल कि जी वर्मावर नेमके बोट ठेवणारी असेल. माझ्या घरी २,३ वेळा सुनील इतर २,३ मित्रांबरोबर आलेला आहे. पार्टीच्या वेळेस मात्र स्वान्तसुखाय पद्धतीने ड्रिंक्स घेणार, एखाद्या नावडता विषय मुद्दामून काढून काड्या टाकायचे काम इमानेइतबारे करणार आणि वाद वाढायला लागला कि लगेच नामानिराळे राहणार. हे त्याचे नामानिराळे राहण्याचे जे कौशल्य आहे, ते मात्र अद्वितीय आहे आणि याची आम्हा सगळ्यांना कल्पना असून देखील सुनील अचूकपणे टायमिंग साधतो. अथर त्याचे बोलणे हे सहसा निर्विष असते, कुणावरही शक्यतो वैय्यक्तिक शेरेबाजी करीत नाही त्यामुळे केलेले विनोद कुणालाही आनंदाने स्विकारता येतात. तशी फार मोठ्या आवाजात बोलायची सवय नाही. सुनील काय करतो, गप्पांचा वेग जरा कुठे थंडावला असे व्हायला लागले की स्वारी आग लावते.
अशाच अप्रतिम गप्पांत काही तास निघून जातात. अर्थात असा मित्र सहजपणे प्राप्त होत नाही आणि सुदैवाने मला त्याची मैत्री प्राप्त झाली आहे. तसे आम्ही दोघे रोज काही फोनवर बोलत नाही पण कधी एकमेकांना फोन झाला की आमच्या जिभा तिरकस होतात. काही मिनिटे निश्चिन्तपणे घालवली जातात, एकमेकांची टर मनसोक्तपणे उडवली जाते, आमचा बोलण्याचा कंडू शमवला जातो आणि आम्ही फोन खाली ठेवतो. एक नक्की, उद्या मला जर काही मदत लागली तर माझे इथे हक्काचे असे काही थोडेफार मित्र आहेत जे रात्रीबेरात्री देखील मदतीला धावून येतील त्यात सुनीलचे नाव नक्की आहे कारण तितका विश्वास खुद्द त्यानेच मला दिलेला आहे.
No comments:
Post a Comment