आपल्या शाळेच्या गृपमधील अत्यंत वेगळे व्यक्तिमत्व!! असे वेगळेपण राखले याला कारण तीच स्वतः. वास्तविक एकेकाळी माझ्या गल्लीच्या अगदी बाजूला राहणारी पण त्यावेळी एखादा शब्द तर दुरापास्त पण एखादे स्मित देखील अप्राप्य!! त्यातून शाळेतील प्रतिमा म्हणजे अत्यंत हुशार (आजही या प्रतिमेत लवमात्र फरक नाही!!)! तिथे तर अस्मादिकांची दांडी गुल. त्यावेळी कुणा मुलीशी बोलणे तर दूरच पण बघणे देखील धाडसाचे! मला अजूनही स्पष्ट आठवत आहे, ती आणि गीता, दोघीही मागील बेंचवर बसायच्या तरीही वर्गात प्रथम क्रमांकाने यायच्या. गीताने शाळा पुढे सोडली पण मीनल शेवटपर्यंत पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत असायची. पुढे तिला चष्मा लागला (त्यामुळे तर व्यक्तिमत्व अधिकच गूढ, बौद्धिक झाले.... )
आमची खरी ओळख आपला गृप झाला आणि झाली. मळवलीच्या पहिल्या पिकनिकमध्ये, शनिवारी रात्री गाण्याच्या भेंड्या सुरु झाल्या आणि मीनल फार्मात आली. माझ्याच बाजूला बसली होती. आजही एक आठवण लख्ख आहे. *र* अक्षर आले होते. या अक्षरावरून पुढे पुढे फार गाणी आठवत नाहीत आणि एकदम मीनलने "रे तुझ्यावाचून काही येथले अडणार नाही" हे भावगीत सुरु केले आणि अनिल थक्क. वास्तविक इतके सुंदर भावगीत कसे काय विस्मरणात गेले कुणास ठाऊक. अनंता माझ्या कानात पुटपुटला - शाळेतही पहिला नंबर आणि आता इथेही..... खरंतर त्यावेळी प्राची माझ्या डाव्या बाजूला आणि मीनल माझ्या उजव्या बाजूला, दोन मित्र पलीकडे!! अशा परिस्थितीत माझा गळा तर सुकलेलाच होता पण गाणी तरी कशी सुचणार!! कसेतरी अवसान आणून मी गाणी म्हणण्याचा प्रयत्न करीत होतो.
तर अशी ही मीनल. या पिकनिकनंतर आमची ओळख घट्ट व्हायला लागली. या गृपवर उद्मेखूनपणे माझ्याशी "पंगा" घेणाऱ्या दोनच. 1) औंधची महाराणी - प्राची आणि 2) महान विदुषी मीनल. या दोघींना या उपाध्या मीच लावल्या कारण त्या दोघीच कारणीभूत आहेत. या दोघींनीच मला असंख्य पदव्या बहाल केल्या की आता इथे मला "अनिल" म्हणून कुणीही हाक मारत नाही! अशा परिस्थितीत मला "जिवंत" राहण्यासाठी काहीतरी करणे भागच होते. म्हणूनच मी अशा उपाध्या लावल्या! या दोघी कधीही माझ्याशी सरळ बोलल्या नाहीत पण मला हेच मनापासून आवडते.
मीनल तर प्रसंगी - "पंडितजी, वाद घालता येत नसेल तर गप्प बसा" असे सहजपणे खडसावते. अर्थात गप्प बसणे अनिलच्या स्वभावातच नसल्याने मी देखील तिच्या वाक्यातील काहीतरी खुसपट काढतो.सुदैवाने तितकी तिरकी नजर थोडीफार मिळाली असल्याने माझे थोडेफार निभावते.यात महत्वाचा भाग म्हणजे मीनल मोकळेपणी खडसावते.मग त्यात खवचटपणा ओतप्रोत भरलेला असतो.मी बरेचवेळा बरेच ठिकाणी लिहीत असतो आणि त्यावरून माझी यथेच्च टर उडवण्यात प्राची आणि मीनल नेहमी आघाडीवर पण मला हे सगळे मनापासून भावते.
अर्थात हा झाला मीनलच्या स्वभावातील एक भाग. कधीकधी मला पण इथे काही लिहायचा कंटाळा येतो कारण मी काहीही लिहिले तरी कुणी व्यक्तच होत नाही!! माझ्या शैलीची इथेच मीनलकडून व्यवस्थित टिंगल उडवली जाते पण मी कधी काही दिवस लिहिले नाही तर उद्मेखूनपणे मीनलचा फोन येणार.सर्वात आधी प्रकृतीची चौकशी करणार आणि ती ठीक आहे म्हटल्यावर जिभेचा सट्टा आणि पट्टा सुरु करणार. फोनवर अव्याहतपणे बोलत असते. मग मध्येच तिच्या लक्षात येते, अनिल काहीच बोलत नाही!! हे ध्यानात आल्यावर ती अधिक तिखट बोलते. हे सगळे अत्यंत निर्लेप मनाने चालते कारण एकमेकांत असलेला विश्वास. हा विश्वास मला फार मोलाचा वाटतो आणि त्याच जीवावर मी इथे उंडारत असतो.
अशावेळी ती अतिशय हुशार आहे आणि अनिल "ढ" आहे, असले विचार देखील कुणाच्या मनात येत नाहीत. मीनल तल्लख तर आहेच पण तितकीच हळवी आहे. मध्यंतरी माझी तब्येत बरीच बिघडली होती (वास्तविक आजही तितकी ठीक नाही पण पूर्वीपेक्षा काबूत आली आहे) आणि अशा वेळेस हमखास मीनलचा फोन येणार. अशावेळी मात्र फोनवर गंभीर बोलणे चालणार.मी ठीक आहे याची पूर्ण खातरजमा करणार. त्यासाठी सलग अर्धा तास फोनवर चौकशी करणार.
पूर्वी ती बँकेत नोकरी करीत होती. काहीवेळेस मी उगाचच तिला फोन करीत असे (बँकेत फारसे काम नसते असे मला फार पूर्वीपासून वाटत असे!! आता इथले बँकर चवताळणार....) पण काहीवेळा ती कामात असायची, म्हणजे तसे फोनवर तरी सांगायची!! गमतीचा भाग म्हणजे त्या संध्याकाळी मीनलचा फोन हमखास येणार.
आजही तिचा फोन अधूनमधून येतो - वास्तविक आता ती निवृत्त झाली आहे तरी अधूनमधून फोन....अशाच आमच्या गप्पा रंगतात. बोलताना कोण कुठे घसरतो याचीच वाट बघणार आणि जरा संधी मिळाली की लगेच वाक्ताडन सुरु करणार. मला हे सगळे फार आवडते कारण इथे आणि अशाच वेळेस माझे पाय जमिनीवर ठेवण्यात हिचा सहभाग असतो. मला "लेखक" असे चिडवण्यात मीनल नेहमी पुढे आणि ती पुढे असतें हे मी गृहीतच धरून इथे व्यक्त होतो. वास्तविक मी या आधीही काही मित्र/मैत्रिणींवर थोडेफार लिहिले आहे आणि ते मी माझ्या ब्लॉगवर टाकले आहे. लिहिताना मला असेच वाटते, मी नेमके लिहिले आहे पण आज वाचताना त्यातील अपूर्णता जाणवते. ती व्यक्ती मला अचूक शब्दात अजिबात मांडता आली नाही अशीच भावना झाली. मीनलबाबत असेच होणार आहे.
परंतु मैत्रीच्या नात्यात असा "जिव्हाळा" निर्माण होणे, यासारखा आनंद नाही आणि या पेक्षा वेगळी अपेक्षा करणे देखील चूक आहे. माझ्या मनात अशी भावना निर्माण झाली कारण मीनलची निर्व्याज मैत्री.
No comments:
Post a Comment