चित्रपटाच्या विषयानुरूप चाली तयार करायच्या परंतु तशा चाली निर्माण करताना, एक विशिष्ट पातळी कायम ठेवायची, संगीत रचनेचा ठराविक दर्जा कायम ठेवायचा अशी काही वैशिष्ट्ये संगीतकार सचिन देव बर्मन यांच्याबाबत सांगता येतील. तरुण असताना त्यांना, कृष्णचंद्र डे, उस्ताद बादल खान, गिरिजाशंकर चक्रवर्ती आणि उस्ताद अल्लाउद्दीन खान साहेब यांचे मार्गदर्शन मिळाल्याने, त्यांचा संगीताबाबत पायाभूत अभ्यास ठाम झाला. गमतीचा भाग म्हणजे, कलासंगीताचा अभ्यास केला असला तरी त्यांच्या रचनांवर बंगाली लोकसंगीताची दाट छाया होती, हे नक्की. एकदा याबाबत त्यांनीच एक विधान केले होते, "त्यांनी बंगाली लोकसंगीत आणि भारतीय शास्त्रोक्त संगीत या दोन्ही कलांच्या एकत्रीकरणाने त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली तयार केली".
सचिनदांच्या खास बंगालीपणाच्या आणि सांगीत प्रकृतीच्या संदर्भात एकदोन गोष्टी नोंदवायला हव्यात. १) रवींद्र संगीताबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनासंबंधी परस्पर विरोधी मते मांडली गेली. एक मत असे, त्यांना रवींद्र संगीताबाबत फारशी आस्था नव्हती. याचे महत्वाचे कारण असे सांगितले जाते, आपल्या पित्याला बाजूला सारून त्रिपुराच्या गादीवर बसलेल्या वीरचंद्र यांच्याशी रवींद्रनाथांचे खास जवळकीचे संबंध होते. २) परंतु इतर काही अभ्यासकांचे मत असे आहे, रवींद्रांच्या चाली सचिनदांनी बिनदिक्कतपणे वापरल्या आहेत, इतकेच नाही तर काही रचना त्यांनी गायल्या देखील आहेत.
आता सचिनदांच्या बंगाली संगीतावरील अंगभूत प्रेमाचा विषय निघालाच असताना, त्याचा थोडा खोलवर विचार केल्यास असे ध्यानात येऊ शकते, बंगालमध्ये भारतीय संगीताच्या सगळ्या म्हणजे सहाही कोटी बंगालीपणाचा ठसा मिरवू शकतात. आदिम, लोक, धर्म, कला, जन आणि संगम या सर्व संगीत कोटींवर बंगालमध्ये स्थानिक शिक्का दिसतो. याशिवाय बंगालमध्ये भक्तिसंगीतातील वैष्णव आणि सुफी अशा दोन परंपरा जोरदार आहेत.
त्यांचे सुशिक्षितपण, संगीताचा त्यांचा अभ्यास, लोकसंगीताविषयी त्यांची आस्था आणि चित्रपट संगीतास लाभलेली प्रतिष्ठा या घटकांमुळे, त्यांनी नाट्य वा कलासंगीत इत्यादींचा पाठपुरावा करण्यापेक्षा चित्रपटाकडे मोहरा वळवला, हे सुसंगतच होते. सुरवातीलाच त्यांनी बंगाली चित्रपटांना संगीत द्यायला सुरवात केली तसेच काही चित्रपटात पार्श्वगायन करायला सुरवात केली परंतु गमतीचा भाग असा, त्यांनी "उम्मीद भरा पंछी" ( आठ दिन - १९४६) हे गायन केल्यावर मात्र तब्बल १२ वर्षांनी दुसऱ्यासाठी संगीतरचना करताना गायन केले - "सुनो मेरे बंधू रे" (सुजाता - १९५९). पुढे त्यांनी "बंदिनी","गाईड","आराधना","तलाश","प्रेम पुजारी","अमर प्रेम" इत्यादी चित्रपटांसाठी गायन केले.
फिल्मिस्तानच्या "शिकारी" चित्रपटाद्वारे,त्यांनी हिंदी चित्रपट संगीताच्या गुणसंपन्न कारकिर्दीला आरंभ केला. "आठ दिन", "दो भाई", "शबनम" असा सांगीतिक प्रवास सुरु झाला. १९५० मध्ये त्यांची देव आनंद यांच्याशी गाठभेट झाली आणि एक संपन्न भागीदारी आकारास आली. एकूण ९० हिंदी चित्रपट, ५ बंगाली चित्रपट, ५७ गायक आणि २७ गीतकार अशी नेत्रदीपक कामगिरी होती. आता इतकी समृद्ध, दीर्घ कारकीर्द हाताशी असताना, एकूणच मूल्यमापन करायचे झाल्यास, थोडी ढोबळ अशी वर्गवारी आवश्यक ठरते. १) रागाधारित गीते, २) स्वतः गायलेली गीते, ३) विनोदी गीते, ४) साधी पण चांगली गीते, ५) गुंतागुंतीची पण यशस्वी गीते, ६) पाश्चात्य संगीत शैलीतील रचना, ७) पाश्चात्य नृत्य शैलीची गीते, ८) आवाजाचे लगाव आणि ध्वनिपरिणाम दर्शवणारी गीते, ९) लोक अथवा आदिम संगीतावर आधारलेली गीते, १०) नायक/नायिका वा इतरांची युगुलगीते, ११) स्वतःच्या किंवा इतरांच्या चालींचे प्रतिध्वनी वाटणारी गीते, १२) पारंपरिक बंदिशींवर आधारलेली गीते, १३) भक्तिपर गीते, १४) निखळ, मधुर गीते, १५) संकीर्ण गीते. आता आपण या वर्गवारीद्वारे या संगीतकाराचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करू.
(१) रागधारीत गीते : - १) "दुनिया में मेरी आज अंधेरा हैं" ( दो भाई - रफी - १९४७) या गीतात दरबारी कानडा रागाच्या माफक छटा आढळतात. २) "सजन बिना नींद ना आये" (लता - मुनीमजी) केदार रागाचा यथायोग्य वापर, आणि श्रवणीय रचना, ३) "जलते हैं जिस के लिये" (तलत - सुजाता) राग काफीचा आधार, ४) "पूछो ना कैसे" (मन्ना डे - मेरी सुरत 'तेरी आँखे) अहीर भैरव रागाचे गुंगवणारे रूप, ५) "तेरे बिना सुने" (मेरी सुरत 'तेरी आँखे) काफी रागाची छाया.
(२) स्वतः गायलेली गीते : - "सुनो मेरे बंधू रे" (सुजाता -१९५९) खास लोकसंगीत गायनाची ढब आणि नियंत्रित लय, २) "ओ मेरे माझी" (बंदिनी - १९६३) भा आणि लोकगायनाचे वळण याचन्हे मनोज्ञ मिश्रण, ३) "वहा कौन हैं तेरा" (गाईड - १९६५) आपल्या शैलीचे खासपण राखून केलेले गायन.
(३) विनोदी गीते : - "कसूर आपका" (किशोर - बहार), "छप्पर फाडके" (किशोर आणि समूह - फंटूश), "ऐ मेरी टोपी पलट के आ" ( किशोर) "सर जो तेरा चकराये" (रफी - प्यासा) किंवा "सून सच ओ डियर" ( आशा + मन्ना डे - बेवकूफ)
(४) साधी पण चांगली गीते : - "नैन दिवाने" (सुरैय्या - अफसर), "जीवन के सफर में राही (किशोर - मुनीमजी - यात खास बाब म्हणजे किशोर कुमारचे "यॉडलिंग" अजिबात नाही), " जिन्हें नाझ हैं हिंद पर" ( रफी - प्यासा) - राग मिश्र पिलूमध्ये तसेच मराठी ओवी-गायनाची भावनिक तीव्रता घेऊन अवतरते, " जाने वो कैसे" (हेमंत कुमार - प्यासा) - या रचनेत स्त्री गीताची हळवी भावपूर्णता जाणवते. "वक्त ने किया" ( गीता दत्त - कागज के फुल) - गीता दत्तच्या नेहमीच्या गायनाच्या संदर्भात बघता, अंगाला स्वनरंग गायनात भरलेला. "काली घटा छाये" (आशा - सुजाता) - राग पिलू आणि स्त्री गीत बाब पुन्हा अवतीर्ण,
(५) गुंतागुंतीची पण यशस्वी गीते : - "दिल जले तो जले" ( लता - टॅक्सी ड्रायव्हर) साधा वाटणारा दादरा वापरला आहे पण गीताचे चलन अतिशय गुंतागुंतीचे. "जाने क्या तुने कही" (गीता दत्त - प्यासा) वक्रगतीचे लयबंध. "है अपना दिल" (हेमंत कुमार - सोलहवा साल ) गीत दोन भागात. एक दु:खी म्हणूनच संथ लयीत आणि नंतर लयीशिवायचे धृपदाच्या चरणांचे गायन, कडवे दुगणित गायले जाते. "देखी जमाने की यारी" (रफी - कागज के फूल) अजिबात ठेका नाही. ऐकणारा हळूहळू भावनेच्या वर्तुळात फिरायला लागतो. आवाहक गायन आणि समूहाचा उच्च स्वर व हुशारीने गुंफलेले घोषपूर्ण गायन ठाशीव परिणाम साधते.
(६) पाश्चात्य संगीत शैलीतील रचना : - "चूप है धरती" (हेमंत कुमार - हाऊस नं. ४४) तसेच "फैली हुवी है" (लता - हाऊस नं. ४४) या दोन्ही गीतांत वॉल्ट्झ लयबंधाचा सुरेख वापर.
(७) पाश्चात्य नृत्य शैलीची गीते : - "तदबीर से बिगडी हुवी" ( गीता दत्त - बाझी ) - चाल तशी सहज मागोवा घेता येण्यासारखी पण वाद्यवृंद हात राखून वापरूनही एक गिटार अधिक बोलकी करून परिणाम साध्य केलेला. "जीने दो और जियो (आशा - टॅक्सी ड्राइव्हर ) - अकॉर्डीयन आणि आवाजाच्या लगावाचे परिणाम, "मेरी तरफ देखिये" ( आशा - ज्वेल थीफ).
(८) आवाजाचे लगाव आणि ध्वनिपरिणाम दर्शवणारी गीते : - "घायल हिरनिया" ( लता - मुनीमजी) - सरगम, झपताल आणि हसणे याचे अजब मिश्रण, "कोई आया" (आशा - लाजवंती) - उत्साही स्वरफेक आणि हसता आवाज, ""सांझ ढली" ( मन्ना डे + आशा - काला बाझार) "थंडी हवा"गीतांत थोडा बदल करून आवश्यक तो परिणाम गाठला, "अपनी तो हर आह" (रफी - काला बाझार) आगगाडीची शिट्टी, सॅक्सोफोन + क्लॅरिनेट याचा सुरेख वापर.
(९) लोक अथवा आदिम संगीतावर आधारलेली गीते : - "नैन दिवाने" ( सुरैय्या - अफसर) - अनलंकृत स्रीगीताची आवाहक डूब,
(१०) नायक/नायिका वा इतरांची युगुलगीते : - "चांदनी रात प्यार की" ( हेमंत कुमार + लता - जाल) हे गीत ऐकताना अनारकलीची आठवण येते, "बोल ना बोल ऐ जानेवाले" ( आशा + तलत - अरमान), "रिमझिम के तराने" ( गीता दत्त + रफी - काला बाझार), "सोच के ये गगन" ( मन्ना डे + लता), "गुनगुना रहे हैं भंवर" ( आशा + रफी - आराधना).
(११) स्वतःच्या किंवा इतरांच्या चालींचे प्रतिध्वनी वाटणारी गीते : - "बस चुपके ही चुपके से" ( गीता दत्त - एक नजर) या गीतावर "मेरी लाडली" तसेच "दा दिर दारा" या गीतांची सावली आहे. "गा मेरे मन गा" (आशा - लाजवंती) या गीतावर "प्यार हुवा इकरार हुवा" या चालीची सावली आहे. "ना मैं धन चाहू" (गीता दत्त + सुधा मल्होत्रा - काला बाजार) या गाणे ऐकताना "अल्ला तेरो नाम" या गाण्याची फार आठवण येते.
(१२) पारंपरिक बंदिशींवर आधारलेली गीते : - "नाचे मन मोरा" (रफी - मेरी सुरत 'तेरी आँखे) - "साडे नाल गला" या भैरवी टप्पा पद्धतीवर आधारित पण शास्त्रोक्त न करता, "मोसे छल किये जाय" (लता - गाईड) - नृत्यगीताचे "बंदिश की ठुमरी" या संगीतप्रकाराबरोबर मिश्रण, गुंतागुंतीचा मुखडा, "हटो, काहे को झूठी" ( मन्ना डे - मंझिल) विडंबन न होता पारंपरिक दादरा हुशारीने हलका फुलका करून चाल सिद्ध केलेली. "किसने चिलमन से मारा" (मन्ना डे - बात एक रात की) कव्वालीसदृश रचना पण थाटापासून दूर.
(१३) भक्तिपर गीते : - "आज सजन मोहे" (गीता दत्त - प्यासा) - बाउल संगीत बाजाचा अप्रतिम वापर, "ना मैं धन चाहू" ( गीता दत्त + सुधा मल्होत्रा - काला बाजार)
(१४) निखळ मधुर गीते : - "जाये तो जाये कहां" (तलत - टॅक्सी ड्रायव्हर) अतिशय मधुर आणि अर्थवाही गीत, "खोया खोया चाँद"(रफी - काला बाझार), "छोडो छोडो मोरी बैंय्या" (सुमन - मियाँ बीबी), "तेरे मेरे सपने" रफी - गाईड)
(१५) संकीर्ण गीते : - "कुछ रंग बदल रही हैं" (शमशाद - शिकारी), "उम्मीद भरा पंछी" (स्वतःच गायलेले - आठ दिन - थेट लोकगीत शैली व लगाव टाळलेले).
निष्कर्ष : - संगीतकार नौशाद यांनी हिंदी चित्रपटगीतांचा साचा तयार करण्यात पुढाकार घेतला राजे पुढे सचिनदांनी त्याचा आवाका आणि आशय वाढवण्यात हातभार लावला. विशेष म्हणजे दोन परस्पर विरोधी वाटणाऱ्या प्रवृत्तींचा पाठपुरावा करीत त्यांनी किमया साधली.
पहिले वैशिष्ट्य असे, आपल्या स्वतःच्या गायनातून ते वाद्यांनी अलंकृत केलेल्या रचनेत नक्षीकाम भरलेल्या आणि काहीशा सर्वसमावेशक गीतापासून दूर सरकले. आपल्या गायनातून आणि आवाजाच्या आवाहक आपण आगळ्या वेगळ्या लगावातून त्यांनी एक ठोस सादरीकरणाचा, एक मुक्त शैलीचा म्हणण्यासारखा प्रघात रसिकांच्या पुढे मांडला. भोवतालच्या स्वरछायेपासून फेक दूर राखून पण मोकळ्या प्रक्षेपणाचा हा प्रघात होता. त्यामुळे कधीकधी ध्वनिकेंद्रापासून आवाज ढळे. त्यांच्याशिवाय किशोर कुमार आणि मन्ना डे यांनाच ही गायकी जमली.
दुसरी एक सर्वसाधारण म्हणण्यासारखी कामगिरी, सांगीत परिमाणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक तो सुसंस्कृतपणा दाखवला.
प्रतिभावंत संगीतकारांप्रमाणे सचिनदांच्या संगीताचे काटेकोर वर्गीकरण अनेकवेळा दुरापास्त होते. त्यांनी सांगीत प्रयोग केले तसेच चित्रसंगीतातही केले. अभारतीय संगीताचे स्वागत करणारे पण तरीही भारतीय राहणारे संगीत रचण्यात त्यांनी विलक्षण यश मिळवले. गुणगुणण्यासारखे, लक्षात राहणारे संगीत वाद्यवृंदाने रचावे, अर्थात भारून टाकणारे नव्हे, हेच त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच त्यांची रसिकांबरोबर नेमकी नाळ जुळली होती.
No comments:
Post a Comment