आपल्याकडे काही समज घट्ट रुजले आहेत आणि दुर्दैव असे, "रसिक" म्हणून त्यांना मान्यता मिळते. त्यातला एक समज म्हणजे केवळ आणि केवळ जुनी (च) गाणी सुरेख असतात. त्यालाच जोडून, नवीन गाण्यांवर बरेचवेळा यथेच्छ टीका करायची आणि जमले तर नाउमेद करायचे. जुनी गाणी सुंदर आहेतच पण म्हणून नवीन काही चांगले निर्माण होतच नाही, हा कोता विचार झाला. मुळात मराठी समाज हा नेहमीच इतिहासात रममाण होणारा आहे. गत:स्मृती मराठी समाजाला भुलवतात आणि त्यातूनच मग, "आमच्या काळातील गाणी खरी" असला विचार पसरतो. थोडा विचार केला तर, विशेषतः ललित संगीत हे अतिशय परिवर्तनशील असते, साधारणपणे, दर १२ ते १५ वर्षांनी नवनवीन प्रघात उदयाला येतात, त्यातून नवीन प्रयोग निर्मिती होते, काही प्रयोग फसतात तर काही प्रयोग युगप्रवर्तक ठरतात. बदल हे कविता, स्वररचना, वाद्यमेळ आणि गायन, या सगळ्या घटकांत होतच असतात. बरेचवेळा आपण तिकडे दुर्लक्ष करतो. गंमत म्हणजे लालची संगीतातील मूलभूत घटक कायम स्वरूपी असतात, फरक पडतो तो त्या घटकांच्या आविष्कारात आणि तिथेच आपली रसिकता काहीवेळा तोकडी पडते. याबाबत असेच म्हणावे लागेल, निदान जी काही नवनिर्मिती होत असते, ती समजून घेण्याचा प्रयत्न करा!! आपल्याला देखील काहीतरी नवीन गवसेल. याच भूमिकेतून आपण आजचे गाणे "विलय जग हे जाईल सारे " ऐकणार आहोत.
कवियत्री शांता शेळके यांची कविता आहे. "आधी चाल मग शब्द" किंवा "आधी शब्द मग चाल" या दोन्ही पद्धतीने लिहिण्यात शांत शेळके वाकबगार होत्या. चालीचे "वजन" ध्यानात घेऊन, त्यांना लगोलग कविता स्फुरत असे. आपल्या दृष्टीने काहीच फरक पडत नाही. गाण्यातील शब्दकळा ही अर्थवाही असावी, सपकपणा प्रतिमांतील तोचतोचपणा टाळून कविता लिहिलेली असावी, इतपत प्राथमिक मागण्या जर कविता पूर्ण करत असेल तर उगीच एकाच पद्धतीला धरून धोशा लावण्याला काहीही अर्थ नाही. प्रणयी थाटाचे गीत आहे. रचनेत शब्दबंबाळता नसावी आणि तरीही आशयघन कविता असावी, ही मागणी ही कविता पूर्ण करते. मुळात कविता हे अल्पाक्षरी माध्यम आहे तेंव्हा मोजक्या शब्दातून आपले मांडणे अर्थपूर्ण करावे, इथे शांताबाईंची ही कविता महत्वाची ठरते. आपली शब्दरचना बांधीव व्हावी म्हणून शांताबाई काहीवेळा संस्कृत भाषेचा आधार घेतात. पहिल्या अंतऱ्यातील दुसऱ्या ओळीतील "व्योमी" शब्द हा व्योम-व्योमी असा बदलून घेतलेला आहे आणि अर्थ बघायला गेल्यास "अवकाश" हा अर्थ लावता येतो परंतु हाच संस्कृतप्रचुर शब्द शांताबाईंनी आपल्या कवितेत किती चपखल बसवला आहे.
तरुण संगीतकार कौशल इनामदारने स्वररचना करताना नेमके याच बाबीचे भान राखले आहे. खरंतर बारकाईने कविता वाचल्यास, कवितेत "या जगातील सगळे शाश्वत आहे - फक्त आपले प्रेम हे अशाश्वत आहे" ही भावना दृग्गोचर होते. हे एकदा समजून घेतल्यावर मग चालीचे कुलशील जाणून घेता येते. कवितेतील ऋजू भावना लक्षात घेऊनच संगीतकाराने आपला वाद्यमेळ हात राखून ठेवला आहे आणि वाद्यांची लय देखील शक्यतो मध्य लयीतच ठेवली आहे. वास्तविक स्वररचना काही ठिकाणी तार सप्तकात जाऊ शकत होती त्याऐवजी संगीतकाराने अंतरे बांधताना,मुखड्याची स्वररचना डोळ्यासमोर ठेऊन, त्यालाच जुळवून घेणारी स्वररचना केली आहे. अगदी स्पष्ट बोलायचे झाल्यास, गाण्याची चाल आणि वाद्यमेळ याचा बारकाईने विचार केल्यावर कुठेतरी हिंदीतील प्रख्यात संगीतकार रोशन यांच्या शैलीची आठवण होते. अर्थात ही तुलना नाही कारण दोघांचा पिंडधर्म वेगळा आहे परंतु स्वररचना मंद्र तसेच शुद्ध सप्तकात फिरवत ठेवायची, हाच मुद्दा समान दिसतो. मुळात आधुनिक संगीत हे बव्हंशी "आघाती" संगीत असते, या समजाला पूर्णपणे फाटा देत, स्वरलयीलाच केंद्रीभूत ठेऊन, निर्मिती केली आहे. वाद्यमेळ हा व्हायोलिन, बासरी आणि सतार इतपतच सीमित ठेवला आहे विशेषतः गायन चालू असताना, पार्श्वभागी व्हायोलिन किंवा बासरीच्या स्वरांचे परिमाण सुरेख रीतीने दिले आहे.
गायक म्हणून "अजित परब - प्रतिभा दामले" यांचा वेगळा विचार करायलाच हवा. गाण्याची प्रकृती ध्यानात घेऊन, एकूणच गायन हे मंद्र सप्तकात ठेवले आहे. शब्दांचे उच्चार करताना देखील कुठेही अकारण "वजन" दिलेले नाही.आधुनिक काळातील बऱ्याच गाण्यांत हा दोष स्पष्टपणे ऐकायला मिळतो. ललित संगीतात गायन करायचे म्हणजे "गायकी" दाखवायची, हा मुद्दा देखील बरेचवेळा अकारण दिसतो. वास्तविक त्याची काहीही गरज नसते. चालीचा गुणधर्म लक्षात घेऊन, गायन करणे महत्वाचे आणि दुसरे म्हणजे साधे, सरळ परंतु अतिशय सुरेल गायन करणे,कधीही सहज,सोपे नसते. कवितेतील आशय अधिकाधिक खोल मांडायचा,ही भूमिका घेणे महत्वाचे आणि इथे हे दोन्ही गायक यशस्वी झाले,या असेच म्हणायला हवे. ललित संगीताची दीर्घ परंपरा लक्षात घेता, नवोदित गायकांवर पूर्वसूरींचा प्रभाव पडणे अशक्य नसते परंतु तो प्रभाव टाळून, आपली "गायकी" त्यांनी सिद्ध केली आहे.
अर्थात या सगळ्याचा परिणाम म्हणजे आजचे हे गाणे होय.
विलया जग हे जाईल सारे
अशीच राहील रात्र तरीही, असेच गगनी तारे!!
जवळ असा तू, आणि अशी मी
पूर्णचंद्रही असाच व्योमी
सुगंधशीतळ असेच असतील वाहत भवती वारे
अशीच असतील मिटली नयने
कंपित श्वसने : अस्फुट वचने
अंगांगावर रोमांचाचे असतील मोरपिसारे
ही स्पर्शाची अबोल भाषा
नेईल तुज मज नवख्या देशा
युगायुगांच्या अवकाशातुनि जुळतील दोन किनारे