Friday, 30 November 2018

1979/80 World Championship

परवाच घरी निवांतपणे बसलो असताना आणि स्मार्ट टीव्हीवर युट्युब बघत असताना, अचानक, १९७९/८० साली गाजलेली  वेस्टइंडीज/ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिका आठवली. हाताशी युट्युब असल्याचा हा सर्वात मोठा फायदा. तेंव्हा लगेच सर्फिंग सुरु केले आणि ऍडलेड कसोटी सामान्यांच्या सलग ५ दिवसांच्या वेगवेगळ्या व्हिडियोज बघायला मिळाल्या. ही कसोटी सुरु होण्याआधी वेस्टींइंडीजने १-० अशी आघाडी घेतली होती आणि ऑस्ट्रेलियाला हा शेवटचा सामना जिंकणे अनिवार्य होते. कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ आणि दोन्ही संघात वेगवान गोलंदाजांचा सक्षम ताफा. समालोचक अर्थात रिची बेनॉ. हा माणूस खेळाडूपेक्षा समालोचक म्हणूनच अधिक चांगला होता, असे म्हणायला जागा आहे. खेळाचे थोडक्यात, परखड आणि नेमके विश्लेषण करण्यात आजही कुणीही बरोबरी करू शकणार नाही. आवाजातील किंचित खर्ज, शब्दांची अचूक निवड आणि समयोचित शेरे ही खास बेनॉची वैशिष्ट्ये म्हणता येतील. व्हिडियो सुरु व्हायच्या आधीच बेनॉ आपल्या शैलीत दिवसाच्या खेळाचे थोडक्यात करतो आणि मगच पडद्यावर तुंबळ (हाच शब्द योग्य आहे) युद्ध बघायला मिळते. 
सामन्यात लॉइड (पहिल्या इनिंगमध्ये) आणि कालिचरण (दुसऱ्या इनिंगमध्ये) यांच्या शतकी खेळी बघायला मिळतात तसेच विव रिचर्ड्सच्या दोन छोटेखानी सत्तरीच्या खेळी बघायला मिळतात. लॉइड म्हणजे काय चीज होता, याचे त्याच्या १२८ धावांच्या खेळीत पुरेपूर प्रत्यंतर येते. किंचित पुढे वाकून उभा राहायचा स्टान्स, बॅट काहीशी हवेत ठेवायची आणि अखेरच्या क्षणी अत्यंत बेदरकार पद्धतीने गोलंदाजाला हाताळायचे!! प्रथम वेस्टइंडीजची फलंदाजी, ग्रीनिज लवकर बाद झालेला आणि खेळपट्टीवर विव येतो. हा फलंदाज खेळायला येतो तो नेहमीच चेहऱ्यावर गुर्मीचा भाव घेऊन, तुच्छता केवळ चेहऱ्यावर नसून अंगात भरलेली. गोलंदाज, गोलंदाजी करतात म्हणजे याचे दास्यत्व पत्करतात, नव्हे हा त्यांना पत्करायला लावतो. बेमुर्वतखोर आणि बेछूट वृत्तीचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे रिचर्ड्सची फलंदाजी. पहिल्या इनिंग मध्ये रिचर्ड्सने ७८ धावा केल्या. शतक नव्हे पण जोपर्यंत तो खेळपट्टीवर होता, तोपर्यंत हा तिथला राजा होता. लिलीसारख्या प्रलयंकारी गोलंदाजाने एक चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर, काहीसा आखूड टप्प्याचा टाकला. कुणीही फलंदाज एकतर हा चेंडू सोडून देईल किंवा नुसताच तटवेल. इथेच विव आणि इतर फलंदाजात फरक पडतो. उसळी घेणारा चेंडू अंगावर घेतला आणि अगदी शेवटच्या क्षणी त्याने मिडविकेटकडे हाणला (हाच शब्द योग्य). लिली त्या फटक्याकडे अवाक होऊन बघत बसला. गोलंदाजाला संपूर्णपणे नामोहरम केल्याचा हा क्षण. लिली सारखा गोलंदाज जेंव्हा चकित होतो तेंव्हा तो फलंदाज त्याच कुवतीचा असला पाहिजे, हे ज्या कुणाला लिली माहीत असेल त्याला सहज पटावे. 
लंचनंतर वेस्टइंडीजची पडझड होते आणि पहिल्या तासात विव, हेन्स आणि रोवे फटाफट बाद होतात आणि मैदानावर लॉइड अवतरतो!! पाठीला बाक देऊन, हळूहळू खेळपट्टीवर येतो. सगळीकडे नजर फिरवतो. अगदी खेळणारा लॉइड असला तरी सुरवात ही काहीशी अडखळतच होत असते आणि इथे तर लिली, पास्को, हॉग सारखे गोलंदाज. पास्कोचे पहिले चेंडू त्याने तटवण्यात घालवले आणि आपली नजर स्थिर केली. संघाला सावरायची जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावरच होती. हालूहालू त्याने आपल्या भात्यातली शस्त्रे बाहेर काढली आणि प्रथम मिडविकेटला पूल मारून, आपल्या खंबीर अस्तित्वाची जाणीव करून दिली. खरेतर १९७९/८० म्हणजे लॉइडचा भरातला संपलेला पण तो दिवस त्याचाच होता. या खेळीतले दोन फटके केवळ अविश्वसनीय होते. १) हॉगने मिडल स्टॅम्पवर आखूड टप्प्याचा चेंडू टाकला आणि लॉइडने क्षणार्धात स्क्वेयर लेगला हूक मारला - चेंडू मैदानाच्या बाहेर!! अरेरावी म्हणतात ती अशी. २) लिलीने ऑफ स्टम्पच्या बाहेर पण छातीच्या उंचीएवढ्या उसळीचा चेंडू टाकला आणि लॉइडने पाय टाकून, कव्हर ड्राइव्ह मारला. हे कसे शक्य आहे? चेंडू जवळपास पाचव्या किंवा सहाव्या स्टॅम्पइतका बाहेर होता पण तरीही कुठल्यातरी अतर्क्य उर्मीने लॉइडने हा फटका खेळला. चेंडू निमिषार्धात सीमापार. एकाही क्षेत्ररक्षकाला साधे हलायची पण संधी मिळाली नाही. असे खेळायचे मनात आले आणि ते खेळून दाखवले, हेच अफलातून. संघाला ३०० पार नेले आणि इनिंग संपली. 
ऑस्ट्रलियाने आपला डाव सुरु केला आणि वेस्टइंडीजच्या गोलंदाजांनी रणकंदन सुरु केले!! रॉबर्ट्स, होल्डिंग, गार्नर आणि क्रॉफ्ट!! एकाच्या आगीतून सुटका केली तर दुसऱ्याच्या फुफाट्यात!! बरे या चारही गोलंदाजांच्या शैली एकमेकांपासून सर्वथा भिन्न. त्यातल्या त्यात गार्नर कमी वेगाचा म्हणजे ८५  ते ९० मैल वेगाचा गोलंदाज!! परंतु त्याचा चेंडू येणार म्हणजे १० ते १२ फुटांवरून - चेंडूवर नजर स्थिर ठेवणेच अवघड. होल्डींगला तर "whispering death" ही लक्षणीय उपाधीच मिळालेली. वेगवान गोलंदाजांमधील मूर्तिमंत काव्य म्हणजे होल्डिंग आणि त्याचा वेग हा जवळपास ९५ ते १०० च्या आसपास. रॉबर्ट्स तर तैल बुद्धीचा गोलंदाज, एकाच शैलीत दोन वेगवेगळे बम्पर टाकून फलंदाजांची भंबेरी उडवणारा तर क्रॉफ्टचा अँगल जगावेगळा!! कुठल्या दिशेने, किती वेगाने चेंडू येईल याची आधीच कल्पना करणे अशक्य!! अशा वेळी रॉबर्ट्सने जगप्रसिद्ध ओव्हर टाकली. पहिला चेंडू इयान चॅपलला समजलाच नाही. निव्वळ नशिबाने वाचला. पुढील चेंडू इतक्या वेगाने अंगावर आला की इयान स्वतः:ला बाजूला करूच शकला नाही. बोटेच शेकली!! फलंदाजाचे मानसिक खच्चीकरण होते ते अशा प्रकारे. तिसरा चेंडू, रॉबर्ट्सने त्याच वेगाने टाकला पण यावेळेस हाफव्हॉलीच्या किंचित आधी टप्पा ठेवला. इयानला खेळायला भाग पाडले पण चेंडू बॅटची कड घेऊन सहजगत्या स्लिपमधील क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. रॉबर्ट्स कशा प्रकारे विचार करणारा गोलंदाज होता, याचा साक्षात जिवंत अनुभव. इयान बाद आणि त्याचा भाऊ, ग्रेग आला. वास्तविक हे दोघेही फलंदाज दहशतवादीच म्हणून प्रसिद्ध होते. रॉबर्ट्सने चौथा चेंडू जो ग्रेगचा पहिलाच चेंडू होता, बम्पर टाकला पण हा चेंडू ग्रेगच्या चेहऱ्याच्या  समोर!! नजर हटवणे निव्वळ अशक्य. हताशपणे ग्रेगने कसाबसा चेहरा वाचवला पण चेंडूने बॅटची कड घेतली आणि ग्रेग बाद. लागोपाठच्या चेंडूवर प्रतिस्पर्धी संघातील दोन खंद्या फलंदाजांना बाद करून वेस्टइंडीजने सामन्यावर वर्चस्व ठेवले.  या धक्क्यातून ऑस्ट्रेलिया संघ सावरूच शकला नाही आणि जेमतेम २०० पार झाली. 
पहिल्या इनिंगमध्ये ७०, ८० धावांची आघाडी घेतली आणि वेस्टइंडीजने दिमाखदार खेळ सुरु केला यावेळेस, ग्रीनिज आणि विव यांनी सत्तरी गाठली, रोवेने चाळीशी गाठली. दुसऱ्या बाजूने कालिचरण आपली नजाकत पेश करीत होता. या वेस्टइंडीज संघातील खऱ्या अर्थाने नजाकतदार फलंदाज म्हणजे कालिचरण!! अर्थात प्रसंगी अंगातली रग दाखवून द्यायचा पण तरीही मुळातील नयनरम्य कलाकार. भारतीय संघातील विश्वनाथबरोबर याची तुलना होऊ शकेल. यावेळेस, कालिचरणने खेळपट्टीवर जम बसवला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज काहीसे हताश दिसायला लागले. याच्या खेळीत काय नव्हते? डोळ्यांचे पारणे फिटवणारा लेट कट, नयनरम्य कव्हर ड्राइव्ह, खिळून ठेवणारा पूल असे सगळे पोतडीतील फटके बघायला मिळाले. हा संघ आजही क्रिकेट इतिहासातील काही सर्वोत्तम संघापैकी एक संघ म्हणून का गणला जातो, याचे प्रात्यक्षिक या सामन्यात बघायला मिळाले. 
हाताशी ५०० धावांचा पुढाकार घेऊन वेस्टइंडीजने गोलंदाजी सुरु केली. वास्तविक मालिका वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे अत्यावश्यक होते परंतु पाठीवर ५००+ धावांचा बोजा घेऊन फलंदाजी करणे, हे अति दुष्कर कर्म होते. पहिल्या डावात रॉबर्ट्सने खिंडार पाडले होते तर यावेळेस होल्डींगने आपली किमया दाखवली आणि ४ विकेट्स घेतल्या. परिणाम ऑस्ट्रेलियाचा ४००+ धावांनी पराभव!! संघात चॅपल  बंधू,किम ह्यूज, अॅलन बॉर्डर, रॉडनी मार्श सारखे फलंदाज, लिली, पास्को, हॉग सारखे आग्यावेताळी गोलंदाज तरीही संघाचा ४०० धावांनी नामुष्की दाखवणारा पराभव!! ऑस्ट्रेलियन संघाचा त्यापूर्वी आणि त्यानंतर आजतागायत इतक्या मोठ्या फरकाने पराभव कधीही झाला नव्हता. १९७४-७५ च्या मालिकेचे संपूर्ण उट्टे काढले आणि त्या पराभवाचा वचपा घेतला.  
आजच्या पिढीला वेस्टइंडीजची क्रिकेटमध्ये काय दहशत होती, याची सुतराम कल्पना येणार नाही आणि ही दहशत अशी तशी नाही सलग १५ ते १७ वर्षे होती. केवळ स्वप्नातच कल्पना करता येईल असे गुणवान खेळाडू लॉईडला एकाच वेळी मिळाले आणि त्यांनी आपले साम्राज्य उभे केले होते. अर्थात इतिहासाची गतीच अशी असते - शिखरावर वास्तव्य केल्यावर हाताशी उतरंड असणे क्रमप्राप्तच ठरते आणि त्यानंतरचा इतिहास हा फक्त घसरणीचाच राहिला आणि त्यात दुर्दैवाने आजही सुतराम बदल नाही. 

Sunday, 11 November 2018

कवियत्री शांताबाई शेळके

कवियत्री शांताबाई शेळके यांचा स्वतंत्रपणे विचार करायला बसल्यावर सहजपणे मनात त्यांच्या विविध ढंगाच्या शब्दरचना, छंदोबद्ध कवितेपासून पुढे मुक्तछंदापर्यंत झालेला प्रवास, चित्रपटासाठी लिहिलेली गाणी तसेच मराठी खासगी भावगीते असा फार मोठा व्यापक असा पट नजरेसमोर येतो. शांताबाईंची सुरवात अर्थातच त्या काळाला अनुसरून अशा छंदोबद्ध कवितांनी झाली. शांताबाईंचे कलात्मक व्यक्तिमत्व हे बहुपेडी होते म्हणजे केवळ कवियत्री नसून, व्यक्तिचित्रे, ललित आणि अनुवाद लेखन प्रकारचे गद्य लेखन देखील त्यांनी आयुष्यभर केले - प्रसंगी अर्थार्जनासाठी विद्यार्थ्यांसाठी गाइडे लिहिली पण त्याचा उल्लेख कुठेही फारसा होत नाही कारण खुद्द शांताबाईंचेच म्हणणे असे होते, गाइडे लिहिणे, हा निरुपाय होता आणि त्यात सर्जनशीलता कुठेही नव्हती. कलावंत म्हणून तशा लेखनाला कसलाही दर्जा नव्हता. याचेच वेगळा अर्थ असा लावता येतो, सृजनक्षम लेखन आणि व्यावसायिक लेखन, यांच्याबद्दल त्यांच्या काही ठाम कल्पना होत्या आणि त्या कल्पना त्यांनी शेवटपर्यंत आपल्या मनाशी बाळगल्या. अर्थात इथे मी शांताबाईंच्या कविता, इतकाच भाग अभ्यासाला घेणार आहे आणि जर का जरा बारकाईने बघितले तर शांताबाईंना "कवियत्री" हे विशेषनाम नेहमीच आवडते होते जरी त्यांनी गद्य लेखन केलेले असले तरी  प्रामुख्याने त्याचन्ह उल्लेख हा "कवियत्री" असाच होतो.  आता आपण इथे त्यासारख्या "कविता" या अंगाने विचार करणार आहोत. मी "कविता" असे म्हटले कारण शांताबाई - गीतकार म्हणून बहुतेकांना अधिक ज्ञात आहेत. गीतकार म्हणून त्यांचा मी वेगळा विचार करणार आहे. 
सुरवातीलाच मी त्यांची "कविता" हीच कविता विचारात घेत आहे. 

"शेवटची ओळ लिहिली 
आणि तो दूर झाला 
आपल्या कवितेपासून 
बराचसा थकलेला 
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा 
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतिणीसारखा 
जरा प्रसन्न, जरा शांत 
नाही खंत, नाही भ्रांत.... 

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी 
आधाराचे बोट सुटलेल्या 
अजाण पोरासारखी 
भांबावलेली, भयभीत, 
अनुभवणारी, एका उत्कट नात्याची 
परिणती विपरीत 

ती आहे आता पडलेली 
कागदाच्या उजाड माळावर 
आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधत 
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!! 

मुक्तछंदातली रचना आहे आणि सुरवातीच्या ओळी वाचताना याचा आशयाशी संबंधित परंतु संपूर्ण वेगळ्या घाटाची आणि पुढे आशय वेगळा व्यक्त करणारी आरतीप्रभुंची "मी माझ्या कवितेकडे पाहतो, एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे" या कवितेची आठवण येऊ शकते. मुक्तछंदात उत्तम भावकविता कशी मांडता येते, याचे ही कविता म्हणजे सुंदर उदाहरण आहे. आता "भावकविता" कशी असावी? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा  अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी. 
शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात. वास्तविक कुठलेही लेखन हे प्राथमिक स्तरावर केवळ अनुभवांची मांडणी, इतपत मर्यादित असते आणि आपल्याला आलेला अनुभव, आपण आपल्या स्मृतीत जतन  करून ठेवतो, असंख्य अनुभव आपल्या पोतडीत जमा होत असतात परंतु एखादाच असा अनुभव असतो, तो आपल्याला लिहायला प्रवृत्त करतो. तसे बघितले तर प्रत्येक अनुभव हा केवळ "अनुभव" असतो, त्या क्षणाचे अनुभूतीत परावर्तन होत नाही तोपर्यंत त्याला शब्दांची झिलई प्राप्त होत नाही. आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या नेमक्या भावनेशी जितके एकरूप होता येईल, तितके तुमचे लेखन अधिक सशक्त होत जाईल, हा आपल्या सगळ्यांचा सर्वसाधारण अनुभव असतो. 
आता वरील कविता या विवेचनाच्या संदर्भात कुठे बसते? हा प्रश्न इथे उद्भवतो. आपण जरी सगळे कविता लिहीत नसलो तरी कधीना कधीतरी कवितेचा आस्वाद घेतच असतो. सर्वसाधारणपणे कविता वाचताना आपल्याला भावतात त्या प्रतिमा आणि प्रतिमांमधून व्यक्त होणारा आशय, जो कवितेला "जिवंतपणा" प्राप्त करून देतो. कवितेचे बीज मनात पडणे - या घटनेपासून कविता कागदावर उतरवणे,  या प्रक्रियेपर्यंतचा प्रवास हा कधीही नेमकेपणे मांडता येत नाही. 

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी 
आधाराचे बोट सुटलेल्या 
अजाण पोरासारखी 

इथेच कवितेचा खरा प्रवास दिसतो. एकदा का कागदावर लिहिली गेली की त्या कवितेची नाळ कर्त्यापासून तुटते आणि स्वतंत्र अस्तित्व धारण करते. फार पूर्वी तुकारामांनी - "म्या काय बोलिले, बोलाविले ते विश्वंभरा" असे जे म्हटले आहे, यातील जाणीव आणि शांताबाईंनी मांडलेली जाणीव यात तत्वदृष्ट्या काहीही फरक नाही तरीही  घाट आणि मांडणी यात फरक पडला जातो. आता या कवितेत कुठलाच शब्द गूढ, दुर्बोध नाही, सगळे शब्द आपल्या परिचयाचे आहेत पण तरीही वाचताना, आपण अंतर्मुख होतो आणि कवित्वाशी तादात्म्य पावतो. हे जे तादात्म्य पावणे आहे, इथेच खरी भावकविता जन्माला येते. आता बघा, एक कल्पना मनात आली आणि तिला काव्यरूप दिले आणि नंतर परत वाचताना तीच कविता आपल्यापासून दूर गेल्याची भावना होते आणि थोडे त्रयस्थ स्वरूप प्राप्त होते. वेगळया शब्दात, अनुभवाशी एकरूप होऊन, पुढे स्मृतीत "जिवंत" ठेवलेल्या त्या क्षणाला अनुभूतीत स्पर्श-रूप-रस-गंधांच्या संवेदना खऱ्या रूपात जाणवायला लागतात आणि असे होत असताना, जेंव्हा वर्तमानात जो अनुभव आपण प्रत्यक्ष घेतलेला असतो, तो अनुभव बाजूला सारून, हा दुसराच क्षण, भूतकाळातील क्षण त्याची जागा घेतो आणि मग भूतकाळ हाच आपला वर्तमानकाळ होतो आणि तिथेच तो अनुभव नव्या जाणिवांनी आपल्या कक्षेत यायला लागतो.भावकविता म्हणून वरील कविता आपल्याला एक वेगळाच साक्षात्कार दाखवते आणि आपल्या जाणिवा अधिक अंतर्मुख करते. 
आता आपण शांताबाईंची "गीतकार" म्हणून प्रसिद्ध पावलेली एक कविता घेऊया. खरतर "गीतकार" म्हणून वेगळी श्रेणी निर्माण करणे, हाच एक अत्यंत चुकीचा मानदंड आहे. खोलात जाऊन विचार केल्यास, "कवी" आणि "गीतकार" यात काय फरक आहे? काहीही नाही तरीही आपल्याकडे "गीतकार" म्हणून वेगळी पायरी निर्माण केली आहे. 

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी 
एकांती मज समीप तीच तुही कामिनी. 

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे 
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे 
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी 

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे? 
मीही तोच; तीच तुही; प्रीती आज ती कुठे? 
ती न आर्तता सुरांत, स्वप्न ते न लोचनी 

त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा 
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा 
गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरांतूनी 

एखादी कविता स्वरांच्या साहाय्याने ऐकायला मिळाली की खरतर सुरांचा परिणाम हा नेहमीच दाट होतो आणि कवितेचा स्वतंत्र अससी अभ्यास करणे अशक्य होते. अशावेळी ते गाणे, कवितेच्या स्वरूपात कागदावर मांडून वाचन करणे योग्य वाटते. सूर नेहमीच आपल्यावर गारुड घालतात परंतु जर का संगीतकाराला स्वतंत्र, गेयताबद्ध, आशयपूर्ण कविता मिळाली तर चाल बांधायला हुरूप मिळतो आणि असे मत अनेक रचनाकारांनी नोंदवून ठेवले आहे. आत या पार्श्वभूमीवर वरील कविता वाचताना, सर्वात प्रथम कवितेत दडलेले गझल वृत्ताचे वजन जाणवते. मी "जाणवते" हा शब्द मुद्दामून वापरला आहे कारण गझल वृत्त आणि ही कविता, या भिन्न रचना आहेत. भावाकवितेत एक बाब निश्चित असावीच लागते आणि ती म्हणजे शब्दांची अपरिहार्यता!! कवितेतील प्रत्येक शब्दच नव्हे तर उद्गारवाचक चिन्हे, टिम्ब इत्यादी चिन्हांना देखील तितकेच महत्वाचे स्थान असते आणि त्यातूनच कवितेचा आशय विस्तारत असतो. 
प्रस्तुत कवितेत पहिल्याच कडव्यात रात्र आणि जाईचा कुंज हे संदर्भ घेऊन, ध्रुवपदातील जाणीव अधिक खोलपणे अधोरेखित केली आहे. नीरव शांततेतील रात्र आणि जवळच असलेला जाईचा कुंज, यातून विरहाची भावना मांडली गेली आहे. खरतर ही संस्कृत काव्यातील प्रतिमा परंतु तोच संदर्भ शांताबाईंनी या कवितेत 
नेमकेपणाने आणला. आपल्याकडे आजही कवितेत संस्कृत संस्कृतीचा दाखला वाचायला मिळतो आणि त्यात तत्वत्त: काहीही चुकीचे नाही.  दुसरा अंतरा वाचताना, "धुंदी", "प्रीती" या शब्दातून व्याकुळता दाखवली गेली आहे. आता अशी व्याकुळता अधिक परीणामकारक होण्यासाठी मग सांगीतिक संकल्पनांचा आधार घेणे क्रमप्राप्तच ठरते आणि मग शेवट करताना "आर्तता सुरांत" असे शब्द येणे, हे अपरिहार्य होते. ही जी अपरिहार्यता आहे, इथे भावकविता सिद्ध होते. तिथे मग दुसरा कुठलाच शब्द साजून दिसणार नाही. असे फार कमी वेळा घडते पण घडते आणि तसे घडायलाच हवे कारण त्यामुळेच कवितेची बांधणी अधिक सशक्त, घोटीव आणि बांधीव होते. 
खरतर शांताबाईंच्या अशा अनेक कविता आहेत ज्या कविता या पातळीवर स्वतंत्रपणे आस्वादाव्या लागतील. जिवंत कविता आपल्यासमोर अशी आव्हाने फेकत असते आणि अशाच कवितेतून नादाची, आशयाची घाटाची अनंत चित्रे उभी राहतात आणि प्रत्येकवेळी ती कविता एक नवनिर्मितीचा आनंद मिळवून देते. आता थोडे मूल्यमापन. मराठी कवितेतील दीर्घ अशी परंपरा आहे आणि या परंपरेत शांताबाई कुठे बसतात? हा प्रश्न आवर्जूनपणे समोर येतो. आता तुलनात्मक बोलायचे झाल्यास, शांताबाईंच्या कवितेत आरतीप्रभूंच्या कवितेत आढळणारी व्याकुळता दीर्घ काळ आढळत नाही, ग्रेसच्या कवितेतील व्यामिश्रता आणि बौद्धिकता सापडत नाही तर नामदेव ढसाळांप्रमाणे चिघळणारी सामाजिक दु:खे वाचायला मिळत नाहीत त्याचप्रमाणे बोरकर, पाडगावकरांच्या कवितेत जसा रोमँटिक स्वानंद बघायला मिळतो तितके खोलवर चित्रण आढळत नाही. परंतु असे सगळे नाकारून देखील पुन्हा कवी म्हणून शांताबाई स्वतंत्रपणे आपली नाममुद्रा ठसठशीतपणे दर्शवतात. त्यांच्या कवितेतील आवाज एखाद्या रुणझुणत्या पैंजणाप्रमाणे झुळकतात आणि त्या नादमयतेत आपल्याला घेऊन जातात. हे काहीसे भा.रा.तांब्यांच्या  कवितेसारखे झाले.  शांताबाईंची कविता राजस आहे, निर्मितीक्षम खुणा दाखवणारी आहे. इथले दु:ख चिरंतनाच्या वाटेवरील दिशा दाखवणारे आहे पण दु:खाच्या खाईत उतरून तळ दाखवणारे नाही. अशा काही मर्यादा दाखवता येतील पण तरीही मराठी कवितेत आपली अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणारी कविता आहे. 

Sunday, 4 November 2018

कविता - आस्वादकता आणि दुर्बोधता

लिखाण माध्यमातील सर्वात सशक्त आणि तरीही अल्पाक्षरत्व असे स्वरूप फक्त "कविता" लेखन, याच माध्यमाला मिळते आणि हे कुणालाही पटू शकेल. याचाच पुढील विचार म्हणजे कविता आणि तिचा आस्वाद. आपल्या काव्याला रसिकाने दाद द्यावी ही कवीची अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूने, दाद देण्यासारखे त्या कवितेत काहीतरी असावे, ही रसिकाची अपेक्षा. वास्तविक हा देवघेवीचा खेळ दोन्ही बाजूने रंजकतेने खेळाला आजू शकतो आणि काही वेळा खेळला देखील जातो. याबाबत आणखी वेगळे म्हणायचे झाल्यास, आपल्या कवितेतील कुठल्या गोष्टीला रसिकाने महत्व द्यावे याबद्दल कवीच्या काही पूर्वकल्पना असतात. आणि रसिकांबाबत लिहायचे झाल्यास, आपल्याला वाचत असलेल्या कवितेतून काय मिळवायचे आहे, या बाबत असलेली धारणा. परंतु याबाबतची निरपेक्ष वृत्ती ही सदासर्व काळ परस्परांशी जवळीक करणारी असावी ही ही अपेक्षा मात्र प्रत्येकवेळेस पूर्ततेच्या पातळीवर पोहोचू शकत नाही. त्यादृष्टीने पूर्तता ही एक तार्किक शक्यता असते, हे म्हणावेच लागते. ज्याला वस्तुस्थितीची दाखल घ्यायची आहे त्याला अपेक्षा ही मूलभूत अडचण म्हणून टाळता येणार नाही. फार तर "अपेक्षांतर" कमी-जास्त प्रमाणात ठरवता येते. अर्थात असे अपेक्षांतर पूर्णपणे टाळता येणे किंवा पूर्ण करणे, ही सर्वस्वी अशक्य कोटीतील बाब आहे. करावी आणि रसिक यांच्यातील संवादाचे साधन म्हणजे "भाषा". सृजनशील कलाकृतीतील भाषा ही रोजच्या व्यवहारातील भाषेपेक्षा सर्वस्वी भिन्न असते परंतु रोजच्या व्यवहारात अस्फुटपणे जाणवणारी भाषेची सुप्त शक्ती एखादा समर्थ कवी सर्वंकषपणे वापरू शकतो, त्यामुळे मुलत:गतिरूप असलेली भाषा कवीच्या अभिव्यक्तीत अधिक प्रभावी आणि अधिक संमिश्र बनण्याची मोठी शक्यता असते. एखाद्या शब्दाचा एका विशेषतः कवितेतील अर्थ हा १) त्या शब्दाचा रूढ अर्थ, २) कवीच्या विशेषतः हेतूमुळे प्राप्त झालेला अर्थ, ३) कवितेच्या घाटाने संस्कारित झालेला अर्थ , ४) शब्दांचा कल्पित ध्वनीरूपाने जाणवणारा अर्थ, ५) कागदावरील दृश्य स्वरूपाने जाणवणारा अर्थ, ६) कवितेतील इतर शब्दांच्या साहचर्याने जाणवणारा अर्थ, ७) विशिष्ट सांस्कृतिक परिस्थितीतून उद्भवणारा अर्थ, ८) रसिकांच्या विशिष्ट हेतूंमुळे प्रतीत होणारा अर्थ (इथे बरेचवेळा गफलत होऊ शकते आणि तशी होते देखील)  आणि ९) शब्दांच्या आशयात, भविष्यात होणार संभाव्य बदल. इतक्या आणि अशा आणखी अनेक विविध ताणांनी कवितेचा अर्थ प्रभावित होऊ शकतो. एक नक्की, भाषेचा अंतिम अर्थ कुणालाही, कधी निश्चित करता आलेला नाही तेंव्हा संपूर्ण निरपेक्ष वृत्तीची असंभाव्यता आणि भाषेच्या साधनाने संपूर्णपणे निश्चयात्मक असा अर्ह सूचित होण्याची अशक्यता, या दोन्ही गोष्टी जमला धरूनच आपल्याला कवी आणि रसिक यांच्या संवादातील इतर अडचणी समजून घ्याव्या लागतील. 
दुर्बोधतेच्या संदर्भात पुढे जायचे झाल्यास, ज्या वेळी विचार, भावना आणि संवेदना एकात्म जाणिवेमध्ये अंतर्भूत असतात त्यावेळी त्याचे संपूर्ण अस्तित्व नाहीसे झालेले असते. अमुक एक अर्थ दुय्यम मानल्यामुळेकिंवा टाळल्यामुळे आजकालचे आधुनिक काव्य फार दुर्बोध आहे असे म्हणण्याचा एक मतप्रवाह दिसतो. त्याशिवाय कवितेचा रसिक, मग तो जुना असो किंवा नवीन असो, काव्याकडून तार्किक संगतीची आणि वस्तुदर्शक अर्थाची अपेक्षा करतो, म्हणून कविता दुर्बोध वाटते, असे समाजानेच काहीसे एकांगी विवेचन ठरेल. उदाहरणच द्यायचे झाल्यास, बालकवींची "औदुंबर" ही कविता दुर्बोध वाटू शकते. संपूर्ण जाणिवेचे एकात्मीकरण साधण्याच्या प्रयत्नातून निर्मिलेली संमिश्रता किंवा आनुषंगिक दुर्बोधता सर्वसाधारण रसिकाला जाणवत नाही. याबाबत वेगळे मांडायचे झाल्यास, उत्कट संवेदना, उत्कट भावना अथवा विचार याचन्हे अस्तित्व स्वतंत्रपणे जाणवू शकेल अशा घटकांना परस्परानुजीवी करणाऱ्या कविता रसिकांना सर्वसाधारणपणे दुर्बोध वाटत नाहीत. या सर्व घटकांचे सामिलीकरां झाले आणि त्यामुळे अभिव्यक्तीचे वेगवेगळे घाट निर्माण होऊ लागले की मग हळूहळू निर्मिलेली कविता काही प्रमाणात दुर्बोध व्हायला लागते. 
आता मराठी कवितेच्या संदर्भातील दुर्बोधतेचा प्रश्न हा गेल्या शतकात प्रामुख्याने चर्चेला आणि त्या अनुषंगाने बोलायचे नवनवीन वादांना निमंत्रण देणारा ठरला. नवकाव्यपूर्व दुर्बोधता, नवकाव्यातील दुर्बोधता आणि नवकाव्योत्तर दुर्बोधता, असे ढोबळपणे ३ कालखंड पाडता येतील. यात, पहिली अवस्था ही केशवसुतांच्या संदर्भात विचारात घ्यायला हवी. "झपुर्झा" किंवा कवी बींची "चाफा" या संदर्भाने सूचित होऊ शकेल तर दुसरी अवस्था मर्ढेकरांच्या "पिपात मेले उंदीर" ही उदाहरणादाखल घेता येईल आमी तिसरी अवस्था, अरुण कोलटकरांच्या "घोडा" कवितेतून मिळू शकते. काव्यात्म दुर्बोधतेच्या या तीन अवस्थांना एकत्र बांधणारे सूत्र, जाणिवेचे अधिकाधिक एकात्मीकरण हेच असेल. यात एक गंमत आहे, केशवसुतांच्या किंवा कवी बी, यांच्या कविता या कविताच नव्हेत, अशी काही टीका वाचण्यात आलेली नाही. याचाच वेगळा अर्थ, रसिकांच्या पूर्वनिश्चित काव्यकल्पनेतील महत्वाच्या घटकांचे अस्तित्व त्या रसिकांना या कवितेत जाणवत होते. या कवींच्या भावानुभवाबद्दल आणि त्याच्या काव्यात्मका बद्दल कुठेही,, कसलाच संशय व्यक्त केला गेला नाही. परंतु त्या भावानुभवातून जे विचार प्रगट होत होते, त्याबाबत ठाम निश्चितता निर्माण करणे अवघड होत होते. मर्ढेकरांच्या बाबत म्हणायचे झाल्यास, त्यांचे  भावानुभव आणि त्यात अंतर्भूत असलेले विचार आणि त्याचे एकूणच सादरीकरण हे काव्यात्म मानायचे का? हाच  प्रश्न मराठीत नव्याने उद्भवला होता. अरुण कोलटकरांचा "घोडा" प्रसिद्ध झाला आणि आजच्या "निरवयवी" कवितेची सुरवात झाली!! यात मुख्य् मेख अशी होती, प्रतिमांचे भावनासापेक्ष किंवा विचारसापेक्ष विश्लेषण करणे अवघड झाले होते आणि म्हणूनच सगळे शब्द कळूनही सगळी कविता दुर्बोध वाटायला लागली. एकात्मीकरणाच्या या वाटचालीत दुर्बोधतेची तिसरी अवस्था अटळ होती, असे देखील विधान आपण करू शकतो. 
कवी आणि रसिक यांच्यामध्ये काव्यात्म दुर्बोधता, ही एकमेव अडचण होती.परंतु इथे मराठीतील टीकाकार काहीसे कमी पडले का? हा प्रश्न इथे उद्भवू शकतो. विशेषतः: ज्या कालखंडात काव्याच्या विकासाचा आणि रसिकांच्या अभिरुचीचा वेग, यात तफावत पडायला लागली, असे म्हणता येते. आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे काव्याच्या विकासात व्यक्तिगत प्रतिभेला केंद्रीय स्थान मिळणे तर अभिरुचीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, सामाजिक संस्कृतीला महत्वाचे स्थान असते आणि खरी तफावत इथे पडते. काव्य हे नेहमीच संस्कृतीचे प्रारूप घेऊन अवतारात असते आणि जर का संस्कृती काळाचे बदल स्वीकारण्यात कमतरता दाखवत असेल तर मग दुर्बोधता निर्माण होणे शक्य होय आणि इथेच टीकाकार अवतरतात. कवितेचं विकास हा अभिरुचीच्या विकासापेक्षा अधिक गतिशील आणि अधिक अतर्क्य राहिला पाहिजे आणि त्यामुळेच पडणारे अंतर अपरिहार्य असले तरी संवाद अशक्य व्हावा, असे  न घडण्याची जबाबदारी टीकाकारांची!! टीकाकाराने असलेली दुर्बोधता सुबोध करण्यामागे न पडता दुर्बोधतेचे नेमके स्वरूप काय आहे? हे समजावून सांगितले  तरी पुष्कळ काही कमावले, असे म्हणायला वाव आहे. मघाशी मी " घोडा" या कवितेचा उल्लेख केला त्या संदर्भात लिहायचे झाल्यास, भाषेची विघटनात्मक मूलप्रकृती संपूर्णपणे मिटवून संबंध कविता म्हणजेच एक शब्द बनविणे, ही त्या कवितेमागील प्रमुख प्रेरणा दिसते. अशा कवितेतून, कवितेची पिंजण करून त्यातून एखादे जीवनदर्शक सूत्र वगैरे काढण्यात फारसे हशील नाही. मुळात कविता ही भोगायची असते, हे कवी विं.दा.करंदीकरांचे प्रसिद्ध विधान इथे चपखलपणे लागू पडते  तेंव्हा या आणि अशा कवितेसाठी भिडण्यासाठी प्रथम मराठी टीकेला बदलावे लागेल, पारंपरिक विचारांचे साचे मोडून नवीन साचे करणे अधिक योग्य!! त्यामुळे आपल्याला असे म्हणता येईल, काव्यात दुर्बोधता कमी आणि टीकाकार जास्त. 
कविता आस्वाद प्रक्रियेत वरील मुद्दे फार महत्वाचे आहेत. बरेचवेळा आपण कविता वाचीत असतो आणि त्याचा मनाशी अर्थ लावीत उपभोगीत असतो  कविता सर्वसाधारणपणे अशीच आत्मसात केली जाते आणि रक्तात मुरवली जाते. आस्वादन प्रक्रियेचा मागोवा घेताना आपण सरधोपटपणे एक शब्द, त्या पुढील शब्द असा नातेसंबंध जोडत जातो परंतु काहीवेळा कवितेत असा संबंध निर्माण न होता, निरनिराळ्या प्रतिमा, प्रतीकांच्या साहाय्याने बांधणी करीत शेवटी आशयाची अभिवृद्धी साधली जाते. अशा वेळेस बहुतेकवेळा आपण आपली सहनशीलता मध्येच सोडतो आणि निष्कारण कवितेला दुर्बोधतेचे लेबल लावतो आणि कवितेच्या अभिसरणाचे सगळेच मार्ग खुंटवून टाकतो. एकापरीने आपण त्या कलाकृतीवर अन्याय करीत असतो. कविता ही ठराविक पायऱ्यापायरीनेच समजून घेणे हा जो पारंपरिक संस्कार झालेला आहे, तो अशा कवितेच्या आस्वादक प्रक्रियेला फार घातक आहे. कविता सहज समजली पाहिजे, गाण्याची चाल सोपी असायला हवी, कथाविष्कार डोक्याला त्रास देणारा नसावा, इत्यादी मागण्या नेहमीच निर्मितीच्या प्रगतीला मारक असतात. म्हणूनच मी वर म्हटले त्याप्रमाणे समाज आणि सांस्कृतिक बदल कधीही सहज प्रक्रियेने घडत नसतात. त्यातून कलाविष्कार बदल हा नेहमीच शेवटच्या पायरीवर येत असतो. यातूनच साचलेपण साचत जाते आणि एकूणच गढूळ वातावरण निर्माण होते. मुळात कवितेत रस घेणारे रसिक हे तसे संख्येने कमीच असतात त्यातून स्वागतशील प्रवृत्तीचे रसिक नेहमीच तुरळकच असतात. जसे कलेत प्रयोगशील जरुरीचे असते त्याच चालीवर बोलायचे झाल्यास, आस्वाद आणि आस्वाद प्रक्रिया ही नेहमीच परिवर्तनशील असणे फार जरुरीचे आहे. अर्थात या प्रक्रिया नेहमीच हळूहळू घडत असतात आणि त्या तशाच घडायला हव्यात अन्यथा कुठलेही बदल सर्वार्थाने स्वीकारणे अशक्य होऊन बसते आणि प्रगती थांबण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कुठलाही आस्वाद हा आधी आपल्या मनाशी नंतर रक्तात मुरावा लागतो त्याशिवाय कलाकृतीचे समग्र आकलन अशक्य.