१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि तेंव्हाच तत्कालीन ब्रिटिश नेते विन्स्टन चर्चिल यांनी भारताबद्दलची सुप्रसिद्ध धोक्याची घंटा वाजवली होती, खरेतर आता म्हणायचे झाल्यास त्यांनी कानाखाली झान्ज वाजवली होती!! आज "स्वातंत्र्य" या शब्दाकडे बघायचे झाल्यास मनात निव्वळ "लाज" हाच शब्द येतो. अर्थात याची सुरवात १९४७ पासून झाली होती. आपल्या समाजात भाबडेपणा पसरवण्यात या सगळ्याच राजकीय नेत्यांचा सर्वात जास्त हात आहे आणि याचाच परिणाम, याच समाजात "नेहरूंनंतर कोण?" असला अक्कलशून्य आणि व्यक्तिस्तोम माजवणारा प्रश्न उभा राहिला होता. या प्रश्नांमागील अगतिकता कुणाच्याच ध्यानात आली नव्हती किंवा असे म्हणू कुणी दर्शवली नव्हती. याचीच परिणती Indira is India असल्या मूर्ख घोषणेत झाली.
अशा घोषणा देऊन आपण आपले खच्चीकरण करीत आहोत, याची एकतर जाणीव देखील नव्हती किंवा या घोषणेमागून आपण आपली पोळी भाजून घ्यायची असला मतलबी विचार साधला गेला होता.
याचेच परिणत स्वरूप आज आपल्याला दिसत आहे. व्यक्तिकेंद्रित राज्यसत्ता हेच या परंपरेचे आजचे स्वरूप आहे. यात कुणालाच कसलीच खंत वाटत नाही, खरेतर सगळेच एका मूर्ख आनंदात मश्गुल आहेत. आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे निव्वळ मजा करायला मिळणे, तर्कशून्य स्वप्ने बघायला लावणे हेच वर्षानुवर्षे चालू आहे आणि याचाच फायदा सगळ्या राजकीय नेत्यांनी घेतला - अब अच्छे दिन आयेंगे, ही अशीच "गरिबी हटाव" या घोषणेसारखी भुलवणारी घोषणा आणि या घोषणेमागील मतितार्थ जाणून न घेता आपला समाज भुलून जातो. आपला समाज भुलतो, याचाच फायदा हे नेते उठवतात. लोकांना स्वप्नांची गाजरे दाखवायची आणि सत्ता हस्तगत करायची, हेच एकमेव तत्व गेली ७० वर्षे इमानेइतबारे सगळे राजकीय पुढारी पाळत आहेत.
याचीच दुसरी बाजू, समाज नको तितका राजकारणी नेत्यांवर अवलंबून राहिला आणि आपण आपल्याला शिस्त लावायची असते, हेच विसरून गेला. सगळ्या गोष्टी फक्त सरकार करणार हाच समज प्रचंड गतीने फैलावत गेला. मग कधीतरी निराशेचा कडेलोट होतो, सत्ताबदल होतो पण मागील पाढे पंचावन्न, असेच चालू आहे. आपला समाज जितका सडलेला असेल, हडहडलेला राहील तितके चांगले हेच सगळ्याच राजकीय नेत्यांना मनापासून पटलेले आहे आणि त्याचे अनुकरण वर्षानुवर्षे चालू आहे. नेते म्हणतात, "जनता सुबुद्ध आहे, जनतेला सगळे कळते" - इतकी ढोंगी वाक्ये कुठलीही नसतील. जनतेला भोळसट बनवणारी आणि तशी बनून घेणारी ही वाक्ये आहेत आणि तशीच भारतीय जनता देखील आहे, हेच खरे. या समाजात इतकी वर्षे झाली तरी ढिम्म फरक पडलेला नाही. सतत वेगवेगळ्या घोषणा द्यायच्या आणि त्या घोषणांना सत्य मानून, त्यामागे मेंढरांप्रमाणे धावत सुटायचे आणि ते देखील डोळ्यांना पट्टी बांधून, त्यामुळे कुठल्या खड्ड्यात आपण पडत आहोत, याची जाणीव देखील होऊ नये आणि मग खड्ड्यात पडल्यावर हताशतेने एकमेकांकडे फक्त बोटे दाखवत आयुष्य काढायचे!! याचीच सवय लागलेली आहे. अशा समाजात कधीही ना शास्त्रीय दृष्टिकोन आकाराला जात ना कधीही प्रगतीचे दरवाजे उघडले जात!! मुळात शास्त्र म्हणून काही असते आणि त्यामागे एक तर्कशास्त्र असते, हेच कुणाला पटत नाही आणि हे पटत नाही, हेच राजकीय नेत्यांच्या पथ्यावर पडते.
आजच्या आपल्या स्वातंत्र्याचा हा खरा अर्थ आहे ढोंगबाजी, सत्तालोलुपता आणि निव्वळ व्यक्तिगत फायदा हेच सगळ्या पक्षांचे धोरण आहे आणि याला आपण सगळेच बळी पडत आहोत.
No comments:
Post a Comment