Saturday, 11 August 2018

रहें ना रहें हम

आजही आपल्याकडे, "ललित संगीत" आणि त्यातही खासकरून "हिंदी चित्रपट गीत" या आविष्काराकडे फारसे सर्जक दृष्टीने बघितले जात नाही. या माध्यमातील रचनांना "सर्जनशीलता" लागते किंवा त्यात काही बुद्धीवादी दृष्टिकोन जरुरीचं असतो, अशी जाण ठेवली जात नाही. हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आज जवळपास ८०, ९० वर्षे सतत, हिंदी चित्रपट गीतें जनमानसावर अव्याहतपणे अधिराज्य गाजवत आहेत, त्या कलेकडे गंभीरपणे बघण्याची गरज भासू नये, याचेच खरे नवल आहे. आणि याचाच परिणाम म्हणून हिंदी चित्रपट गीतांवर फारसे बुद्धीगामी लिहिले गेले नाही. यात एक मुख्य मुद्दा असा दिसतो. एकूणच ललित संगीताकडे बघण्याचा काहीसा उदासीन दृष्टिकोन. 
हे संगीत साधे आहे, सर्वसमावेशक आहे, त्यात फार गुंतागुंत नाही (रागदारी संगीताच्या संदर्भात) ही आणि अशी आणखी अनेक कारणे, लोकप्रियतेची निदर्शक म्हणून मांडता येतील. परंतु, याचाच दुसरा भाग असा झाला, चित्रपट संगीताचा कधीही अभ्यासपूर्ण व्यासंग झाला नाही आणि ही एकूणच भारतीय संगीताच्या वाटचालीच्या मार्गातील उल्लेखनीय कमकुवत दुवा ठरू शकतो.
आता, हिंदी चित्रपट संगीताकडे गांभीर्याने बघणे अभ्यासकांना जमले नाही किंवा त्यांनी उत्साह दाखवला नाही याचे आणखी एक कारण बघणे योग्य ठरेल. इथे आणखी एक मुद्दा विचारार्थ घ्यावा लागेल. हिंदी चित्रपट संगीताच्या स्वरूपातील काही अंगभूत गुणधर्मामुळे त्यास बाजूला ठेवले जात आहे का? विविधता, लोकप्रियता इत्यादी कारणांखेरीज हिंदी चित्रपट संगीताचा विचार इतक्या कसोशीने करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सांगीत कल्पनांच्या अभिसरणातील त्यांची भूमिका. 
इथे दोन विचार गृहीत धरावे लागतील. या संगीतामुळे पसंत वा मान्य ध्वनी, आवाज, सादरीकरणाच्या लयी तसेच  संगीताची योजना करण्याचे प्रसंग यांविषयी सार्वत्रिक प्रथा रूढ होऊ लागल्या आहेत. अर्थात हा भाग दोषी नाही पण याला दुसरी बाजू अशी आहे, अत्यंत बहुविध आणि पुष्कळ बाबतींत विचक्षण नसलेल्या श्रोते-प्रेक्षकांमुळे हिंदी चित्रपट संगीताचे स्वरूप ठरत असल्याने काही समान सांगीत बाबींचे व त्याच्या प्रभावांचे सर्वत्र वितरण होणे हा खरे निकृष्टाचा प्रसार अभावितपणे होतो. हा मुद्दा देखील विचारात घेणे जरुरीचे आहे. 
खरे म्हणजे भारतीय संगीत, भारतीय जनसंगीत आणि चित्रपट संगीत, या तिघांनी पुरवलेल्या परिप्रेक्षांमधून हिंदी चित्रपट संगीताचा अर्थ लावला पाहिजे. म्हणजेच भारतीय संगीत -- भारतीय जनसंगीत -- भारतीय चित्रपटसंगीत -- हिंदी चित्रपटसंगीत -- हिंदी चित्रपटगीत अशी ती साखळी आहे.    
चित्रपटगीत - संगीताची तपासणी अधिक सहेतुक करणे जरुरीचे आहे आणि त्यासाठी आणखी काही पायाभूत आणि सांकल्पनिक कारणे आहेत. आपल्याला से आढळून येईल, विवश कारणामुळे चित्रपटीय संज्ञापन भाषिक संज्ञापनाप्रमाणेच राहणे अपरिहार्य आहे आणि हा विचार निश्चितपणे विचार करण्यायोग्य आहे. एक बाब इथे ध्यानात घ्यावीच लागेल. अनेकदा हिंदी चित्रातगीत आपली चित्रपट बाह्य मार्गक्रमणा इतक्या जोमदारपणे करतात की, चित्रपटाचे आवाहन म्हणजे चरित्ररेखांबरोबरचे प्रेक्षकांचे तादात्म्य वगैरे उपपट्टी खूप ताणून धरल्या तरच गीताच्या आकर्षणाचे काही प्रमणात स्पष्टीकरण देऊ शकतील. 
या वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने बघायला गेल्यास, सौ. मृदुला दाढे-जोशी लिखित "रहें ना रहें हम" हा ग्रंथ विचारात घ्यायला लागतो. लेखिकेने, पुस्तकात एकूण १२ संगीतकार विचारात घेतले आहेत आणि सर्वात चांगली बाब म्हणजे प्रत्येक संगीतकाराचे विस्ताराने, विश्लेषक पद्धतीने विवरण केले आहे. लेखिका मुळातच संगीताची गाढी अभ्यासक असल्याने, संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कुठेही संकुचित झालेला नाही. प्रत्येक संगीतकार हा विचारांच्या पातळीवर तसेच रंजकतेच्या पातळीवर हाताळलेला आहे. संगीतकाराची एक ठराविक शैली, त्या शैलीचे रचनांमधून दृग्गोचर होत जाणारे दर्शन आणि अर्थातच त्यांच्या सांगीतिक रचनांमधून दिसणारे वेगवेगळे प्रयोग. या सगळ्या बाजूने अतिशय विस्ताराने विचार मांडलेला आहे. तसे करताना त्यांच्या गाण्याचा उल्लेख अपरिहार्यच ठरतो आणि त्या गाण्यांवर लिहिताना रंजकता आणि तांत्रिक कौशल्य याचा नेमका संबंध जोडलेला आहे. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, एखाद्या गाण्याचा उल्लेख झाल्यावर त्या गाण्यातील चालीचे सौंदर्य विशद करताना स्वरमालेचा आधार घेऊन, ते सौंदर्य अधिक खोलवर मांडलेले आहे. अर्थात असे केल्याने वाचकांना स्वर आणि स्वरलिपी याची अंधुकशी कल्पना यायला हरकत नाही. 
पहिलेच प्रकरण - सी. रामचंद्र या असामान्य रचनाकारावर आहे. एकेकाळी हिंदी चित्रपटावर अधिराज्य गाजवणारा संगीतकार, एका बाजूने अत्यंत हळुवार तर दुसऱ्या बाजूने पाश्चात्य थाटावर उडत्या स्वररचना करणारा अजब किमयागार!! हा संगीतकार कुठल्या नजरेने इतका लोकाभिमुख झाला आणि तसे होताना, कधीही अभिरुची घसरू दिली नाही, याचे विश्लेषण मुळातून वाचायला हवे. एकाचवेळी सामान्य रसिक आणि पंडिती रसिक यांना भुरळ घालू शकणारे संगीत निर्माण करताना, गाण्याचा दर्जा कुठेही घसरू दिला नाही आणि याचेच वर्णन या लेखातून वाचायला मिळते. 
दुसरा लेख - सलील चौधरी. पाश्चात्य संगीताचे डोळस अभ्यासक असल्याने, त्याचा आपल्या रचनांमधून किती आणि कसा प्रयोगशील अंतर्भाव केला तसेच आदिवासी संगीत, भारतीय वैदिक संगीत यातून पाश्चात्य हार्मनी तत्व कसे अंतर्भूत होते, याची असामान्य जाणीव करून देणारा संगीतकार. अर्थात याचा परिणाम, त्यांचा वाद्यमेळ आणि त्यांची गुंतागुंतीची रचना, याचा अतिशय वेधक वेध घेतलेला आहे. 
तिसरा लेख - शंकर/जयकिशन. हा लेख तसा खूप विस्तारपूर्वक लिहिलेला आहे आणि या जोडगोळीची संपूर्ण कारकीर्द बघता तशा मोठ्या लेखाची आवश्यकता नक्कीच होती. या संगीतकार जोडीचे वैशिष्ट्य सांगताना, त्यांनी वाढवलेला वाद्यमेळ, त्याचा आपल्या रचनांमधून दिलेला प्रत्यय आणि चालीतील अश्रूत असा गोडवा याचे यथार्थ दर्शन आपल्याला मिळते. लोकाभिमुख गाणी करायची पण तशी करताना, विशेषतः: कलासंगीताचा वापर करताना, त्यातील नेमक्या सौंदर्याचा अचूक वापर कसा केला आहे, याचे विवरण वाचायला मिळते. हे शिवधनुष्य पेलणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हते, असे मत आवर्जूनपणे नोंदले आहे. 
मदन मोहन - मदन मोहन बाबत लिहिताना त्यांच्या रचनांतील "गीतधर्मी" गुणवत्तेचा समर्पक उल्लेख केला आहे. गाण्याचे मुखडे गुणगुणता येतात तसेच द्रुतगती किंवा गुंतागुंतीच्या पण उस्फुर्त वाटणाऱ्या संगीतात वाक्यांशासाठी चालीत मुबलक जागा सोडलेल्या असतात. याचा परिणाम चाली "गायकी" अंगाच्या होतात. अर्थात या संगीतकाराचा गझलेकडील ओढा सर्वश्रुतच होता आणि त्यानिमित्ताने त्यांनी गझल रचनेत काय आणि कसे नावीन्य आणले, हे सांगताना लेखिकेने आपल्या विश्लेषक वृत्तीचा परिचय करून दिला आहे. माझ्या मते, हाच दृष्टिकोन फार महत्वाचा ठरतो. 
रोशन - हा संगीतकार एकीकडे पारंपारिक रचनातत्वावर भर देणारा असला तरी स्वररचना करताना, त्याकाळी प्रचलित असलेला कल बाजूला सारून टिकाऊ आणि मधुर भावतरंगांचा वावर चालीत ठेवण्यात कसलीही कसूर ठेवलेली नाही - एकदम अचूक वर्णन वाचायला मिळाले. आणखी दुसरा विशेष सांगताना, चाळीचे स्वरूप शक्यतो मंद्र सप्तक किंवा शुद्ध सप्तक, याच प्रांगणात ठेवायचा. ही या संगीतकाराची असोशी होती. एखाद्या कलाकाराचे बुद्धीवादी विश्लेषण कसे करावे, याचा हा लेख म्हणजे अभ्यासक नमुना ठरेल. 
सचिन देव बर्मन - सतत प्रयोगशील राहायचे आणि तरीही लोकप्रियतेत खंड पडू द्यायचा नाही, असे जणू ब्रीद घेतलेला प्रतिभाशाली संगीतकार. या संगीतकाराचे वैशिष्ट्य सांगताना, चित्रपटाची कथा, तसेच हाताळणी लक्षात घेऊन स्वररचना निर्माण करण्याचे अद्भुत कौशल्य - हे नेमकेपणाने वाचायला मिळते. विशेषतः गुरुदत्त आणि बिमल रॉय, यांच्या चित्रपटांना संगीत देताना या संगीतकाराने जी वेगळी वाट चोखाळली, तो उल्लेख फारच योग्य वाटतो. 
वसंत देसाई - ललित संगीतातील, चित्रपट (हिंदी + मराठी) आणि मराठी रंगभूमी इथे यथोचित वावर. हा उल्लेख आवश्यकच होता त्याशिवाय या संगीतकाराचे बहुश्रुत व्यक्तिमत्व साकार होणे अशक्यच. या संगीतकाराबद्दल लिहिताना, नाट्यसंगीत परंपरेचा आलेला गंध आणि त्याचबरोबर कलासंगीताचा वापर करताना ते "पातळ" करून वापरण्यावर अजिबात भरवसा नसणे, ही वैशिष्ट्ये नेमकी टिपली आहेत. त्यानिमित्ताने रागसंगीताचा किती यथोचित वापर केला आहे, हे उदाहरणासहित दाखले दिल्याने, लेखाची उपयुक्तता खूपच वाढली. 
ओ.पी नैय्यर - एका बाजूने पंजाबी ढंग तर दुसऱ्या बाजूने लोकसंगीताचा ठेकेबद्ध वापर, हे सुरवातीलाच सांगितल्याने लेखाची उत्सुकता वाढली. हे सांगताना, या संगीतकाराचा कलासंगीताचा पायाभूत अभ्यास अजिबात नव्हता. हे वाचल्यावर, याच संगीतकाराने रागसंगीतावर आधारित गाणी कशी दिली सात? असा विस्मयपूर्वक प्रश्न पडतो. अर्थात कुठल्याही संगीतात असलीच कोडी रसिकांना नेहमी भुलवत असतात. एखाद्या संगीतकाराचे मर्म कसे पकडायचे,, याचा हा लेख म्हणजे सुंदर नमुना आहे. 
हेमंतकुमार - वास्तविक हा कलाकार म्हणजे गायक/संगीतकार अशा दोन्ही पातळ्यांवर समर्थपणे वावर करणारा. अर्थातच लेखात या दोन्ही बाबींचा यथायोग्य परामर्श घेणे आवश्यक आणि आपली इथे कसलीच निराशा होत नाही. गायक म्हणून केलेले विश्लेषण आणि संगीतकार म्हणून केलेली कामगिरी, या दुहेरी पातळीवर केलेले लेखन या कलाकाराचे सुरेख मूल्यमापन करते. कलाकाराच्या वृद्धीचे नेमके टप्पे मांडून संगीतकार म्हणून किती वेगळ्या प्रतीचा होता, हे वाचताना प्रतीत होते. 
जयदेव - सुरवातीलाच या संगीतकाराची योग्यता आणि बूज राखली नाही, याबद्दलची खंत व्यक्त करून लेखाला सुरवात होते. असा एक सर्वसाधारण समज आहे, या संगीतकाराच्या चाली फार अवघड असतात, असे लक्षण नोंदवून पुढे ज्या रचना अवघड समजल्या जातात त्या रचनेतील अनघड सौंदर्य दाखवून देतात आणि त्यामुळे त्याच गाण्यांना एक वेगळीच झालेली प्राप्त होते. रागदारीत गाणे तयार करण्यापेक्षा गाण्यात रागाची काही मुळे सापडतात. जयदेव यांचे हेच खरे वैशिष्ट्य म्हणता येईल. 
खैय्याम - उर्दू भाषा आणि कलासंगीताचा व्यासंग असल्याने, या संगीतकाराच्या स्वररचना नेहमीच अंतर्मुख तसेच शब्दांना सांभाळून घेणाऱ्या असतात, हे अचूक वैशिष्ट्य मांडलेले आहे. वास्तविक "पहाडी" रागावरील या संगीतकाराच्या प्रेमाची योग्य दाखल घेतली असून तरीही इतर रागांचा करून घेतलेला उपयोग आणि तसे करताना, चालीला  शालीन सौंदर्य प्रदान करण्याची हातोटी, हेच या संगीतकाराचे खरे वैशिष्ट्य लिहिले आहे.  
लक्ष्मीकांत/प्यारेलाल - या संगीतकाराचे वैशिष्ट्य सांगताना, यांना "मुखडा" बांधण्याविषयीचे अतोनात प्रेम दाखवून दिले आहे आणि त्याबाबतची सोदाहरणे देखील नेमकी टिपली आहेत. आयुष्यभर एकत्रित काम केले तरीही प्रत्येकाची अशी स्वतंत्र अशी खासियत सांगून या जोडीने हिंदी चित्रपट संगीतात टाकलेली भर विशेषत्वाने मांडली आहे. अर्थात त्यांनी गाणी गाजवण्यासाठी केलेल्या खास क्लुप्त्या देखील आवर्जूनपणे लिहिल्यामुळे एकूणच सगळाच लेख समतोल झाला आहे  
एक नक्की म्हणता येईल, हे पुस्तक अतिशय गंभीरपणे लिहिलेले आहे आणि वाचून झाल्यावर, चित्रपट संगीत म्हणजे काही  उथळ,थिल्लर आविष्कार नसून, प्रतिभेचे निरनिराळे कवडसे दाखवणारा आविष्कार आहे, असे मान्यच करावे लागेल. 
पुस्तक वाचून माझ्या मनात एकच विचार आला, प्रत्येक संगीतकारांची वैशिष्ट्ये सांगताना, त्यांच्या काही सांगीतिक रचनांची छाननी केली आहे परंतु ते विश्लेषण जरा थोडक्यात आटोपले आहे. जर का ते अधिक विस्ताराने, खोलवर झाले असते तर मिळणारा बौद्धिक आनंद अधिक द्विगुणित झाला असता.  त्यासाठी या लेखिकेने यात निर्देशित केलेल्या प्रत्येक संगीतकारावर स्वतंत्र पुस्तक लिहावे जेणेकरून त्यांच्या निर्मितीतील नेमका आनंद, तांत्रिक माहितीसहित अधिक घेता येईल आणि त्यांच्या स्वररचनेतील सौंदर्याचा अधिक विस्ताराने उपभोग घेता येईल. 

No comments:

Post a Comment