Sunday, 4 March 2018

दिलीप वेंगसरकर

१९७४/७५ मधील inter collegiate क्रिकेट स्पर्धा चालू होत्या. त्यावेळीच पोदार आणि रुईया यांच्यातील स्पर्धा, हे एक मोठे आकर्षण होते. पोदारमधून दिलीप, वैद्य (नाव विसरलो पण अतिशय सुरेख खेळाडू होता) आणि रुईया मधून संदीप, भरत नाडकर्णी सारखी नावे गाजत होती. दिलीप नुकताच मुंबई संघात निवडला गेला होता, त्यामुळे त्याच्या नावाचे आकर्षण अधिक. या दोन संघातील सामने नेहमीच तुल्यबळ ठरत असत आणि माझ्यासारख्या नव्याने खेळायला लागलेल्या मुलाला, ही पर्वणी असायची. त्यासाठी मी गिरगावातून शिवाजी पार्क किंवा माटुंगा जिमखाना इथे जात असे. पुढे एकदम, दिलीप प्रकाशात आला तो इराणी सामन्यात!! ती खेळी आजही बहुतेंच्या स्मरणात असेल. बेदी, प्रसन्नाला अक्षरश: बडवले होते आणि दिलीपने षटकारांचा खच पाडून, शतक झळकावले होते. मला वाटते, याच सामन्यानंतर त्याला "कर्नल" ही उपाधी मिळाली. आणि याच खेळीने त्याचा भारतीय संघातील प्रवेश सुकर झाला. मी त्यावेळी रेडियोवर भान हरपून या खेळीचे समालोचन ऐकले होते. एक पोरसवदा तरुण पण बेदी, प्रसन्ना सारख्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना कस्पटासमान लेखून, मैदानाबाहेर भिरकावून देत आहे, ही घटनाच अचंबित करणारी होती. त्यानंतर लगेच दिलीप न्यूझीलंड/वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला. 
वास्तविक त्याचे कसोटी सामन्यातील पदार्पण काही जगावेगळे झाले नाही. बरेचवेळा ३५, ४० धावा व्हायच्या आणि दिलीप बाद व्हायचा. कसोटी सामन्यात ३५, ४० धावा झाल्यानं म्हणजे साधारणपणे शतकाची वेस गाठायची स्वप्ने पडतात पण तिथे बरेचवेळा दिलीपने निराशा केली. अशाच वेळी, जमैकाच्या सु(कु)प्रसिद्ध कसोटी सामन्यात, होल्डींगच्या दहशतवादी गोलंदाजीसमोर ठामपणे उभा राहून दिलीपने ४०, ४५ धावा केल्या आणि त्याचे खुद्द लॉइडने देखील कौतुक केले. 
त्यानंतर हा पट्ठ्या माझ्या घराच्या मागील बाजूला असलेल्या Grant Medical मैदानावर कॉलेजचा सामना खेळायला आला होता, अर्थात मी बघायला जाणे क्रमप्राप्तच होते. पावसाळी हवा होती, विकेट काही झाकून ठेवलेली नव्हती. अगदी कॉलेज स्पर्धेतील वेगवान गोलंदाज प्रलयंकारी वाटावेत, अशी बॉलिंग सुरु झाली होती आणि मैदानावर दिलीप आला. दुसराच चेंडू थोडा आखूड टप्प्याचा होता पण दिलीपने किंचित पाय पुढे आणला आणि चेंडू सरळ मैदानाबाहेर भिरकावून दिला!! हा उर्मटपणा बघून, लक्षात आले, होल्डींगची गोलंदाजी खेळल्यावर अशी गोलंदाजी खेळायचे कसले दडपण येणार!! 
उंची सहा फूट,सडपातळ बांधा (आजही दिलीप तसाच आहे!!) दिसायला तसा देखणाच होता. frontfoot वर येऊन खेळणे, हा त्याचा खास प्रांत होता. स्पिनर्स आले की तुटून पडायचे, हा त्याचा खाक्या होता. सुरवातीला, त्याच्यावर सुनीलच्या खेळीचा प्रचंड प्रभाव होता आणि याचा परिणाम असा झाला, ना तो सुनील सारखा खेळू शकत होता (तसे कुणाला जमणार!!) ना स्वतः:ची शैली विकसित करू शकत होता.पण लवकरच त्याला आपला सूर सापडला आणि सूर सापडलेला दिलीप म्हणजे धुंद करणारी कविता होती. अगदी साधा स्टान्स होता, शक्यतो, चेंडू बॅटवर येऊ द्यायचा आणि मग त्याला दिशा द्यायची, असा खेळ असायचा. अर्थात स्पिनर्स आले म्हणजे त्यांना आपल्या तालावर नाचवायचा.
दिलीप हा खऱ्याअर्थी मी पाहिलेला, अथ पासून इति पर्यंत घडत गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू. त्याला कांगा लीगमध्ये बघितला, रणजी, इराणी, देवधर स्पर्धेत खेळताना बघितला आणि पुढे अर्थात कसोटी सामने खेळताना बघितला. मला अजूनही असेच वाटते, जर का फलंदाज म्हणून स्वतः:ला घडवायचे असेल तर "कांगा" लीगला पर्याय नाही. १९७० च्या दशकात, दादर युनियन आणि शिवाजी पार्क, या दोन तुल्यबळ संघातील लढत म्हणजे तुंबळ युद्ध असायचे. एकतर कांगा लीगचे सामने पावसाळ्यातच आणि ते देखील रविवारीच खेळले जायचे. तेंव्हा खेळपट्टी झाकून ठेवण्याचे लाड पुरवले जात नसत, पाऊस नाही, इतकेच बघायचे आणि खेळ सुरु करायचा. एखाद्याने ५० धावा केल्या म्हणजे सामना जवळपास जिंकल्याचीच हमी. हेल्मेट वगैरे चैनीच्या गोष्टी दृष्टीक्षेपात देखील नव्हत्या. दादर युनियन मधून सुनील, दिलीप पुढे संजय मांजरेकर खेळायचे तर शिवाजी पार्कमधून संदीप, पद्माकर शिवलकर वगैरे दिग्गज खेळायचे. मैदानात गुडघाभर गावात वाढलेले असायचे, हवा कुंद झालेली, गार थंड हवा आणि खेळपट्टी पावसाच्या पाण्याने दमट झालेली. अगदी इंग्लंडमधील धुकाळ वातावरण असावे, अशा हवेत सामने व्हायचे. फलंदाज बाद होणे, ही मोठी घटना नसायची तर फलंदाजाने चौकार मारणे आणि जर का जमिनीसलग चौकार मारला तर खरे वैशिष्ट्य!! बरेचवेळा मैदानावरील गवत इतके वाढलेले असायचे की मारलेला चेंडू गवतातच हरवलेला असायचा!! असे असले तरी त्यावेळी देखील आंतरराष्ट्रीय ख्याती मिळालेले सुनील, दिलीप अतिशय मनापासून हे सामने खेळायचे, हे बघण्यासारखेच होते. अशाच एका सामन्यात दिलीपने शिवाजी पार्क विरुद्ध ५६ धावा केल्या होत्या, पद्माकर शिवलकरला उचलून हाणले होते. ज्या कुणाला शिवलकरची गोलंदाजी माहित असेल त्याला कल्पना येईल, त्याची गोलंदाजी उचलून फेकून मारणे, किती जिकिरीचे असायचे!! त्याच्या ५६ धावा पण संघ १२१ धावात गारद!! तरीही दादर युनियनने तो  सामना जिंकला!!
दिलीप खऱ्याअर्थी भारतीय संघात स्थिरावला, तो १९७९ साली लॉर्ड्स वरील सामन्यातील शतकाने!! त्यावेळी त्याच्या जोडीला विश्वनाथ होता आणि त्यांनी शतकी भागीदारी करून भारताला सुस्थितीत आणून सोडले. इथे दिलीपची जगाला ओळख पटली. पुढे तर दिलीपने लॉर्ड्सवर इतिहास घडवला, त्याची ही खेळी म्हणजे मुहूर्तमेढ!! त्याने लॉर्ड्सवर ३ शतके लावली तरीही मला भावलेले शतक हे लीड्स वरील १९८६ च्या दौऱ्यातील १०२ धावा. खेळपट्टी आखाडा झाली होती. संपूर्ण सामन्यात, पहिल्या इनिंग मध्ये दिलीपच्या ६१ आणि दुसऱ्या इनिंग मध्ये नाबाद १०२ वगळता, एकाही फलंदाजाने पन्नाशी देखील ओलांडली नव्हती. अर्थात भारताने सामना आणि मालिका जिंकली आणि फलंदाज म्हणून दिलीप जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून गणला गेला. दिलीपचा तसा दर्जाच होता. काहीही झाले तरी  विकेट फेकायची नाही, हा जो मुंबई फलंदाजांचा "गुरुमंत्र" होता, त्याचे दिलीपने मनापासून आचरण केले. "खडूस"  हेच वर्णन योग्य आहे.
आता थोडे तंत्राच्या बाजूने बघूया. दिलीप मुळातला आक्रमक फलंदाज, front foot वर दिलीप खेळताना बघणे हा सोहळा असायचा. एका स्ट्रोक आठवला - १९८३ साली आपल्याकडे वेस्टइंडीजचा संघ आला होता. वर्ल्ड कप हरल्याचे उट्टे काढायलाच आला होता. मुंबईला ४ था कसोटी सामना होता आणि ६ सामन्यात त्यांनी २/०  अशी आघाडी घेतली होती. मार्शल तर चवताळुनच गोलंदाजी करीत होता, साथीला होल्डिंग, गार्नर!! अशा वेळेस, मुंबईत मार्शल परत एकदा भारताला गुंडाळण्याची चिन्हे दिसत असताना, मध्ये दिलीप उभा राहिला. मला वाटते त्यावेळी, दिलीप पन्नाशी पार करून चांगला स्थिरावला होता. पॅव्हिलियनच्या बाजूने मार्शल रोंरावत आला आणि काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. मार्शलचा वेग बघता, कुणीही फलंदाज बॅकफूटवर गेला असता, पण इथेच दिलीप वेगळा!! किंचित फ्रंटफूटवर आला आणि सरळ मार्शलच्या बाजूने स्ट्रेट ड्राइव्ह हाणला!! सगळे स्टेडियम उसळले. मार्शल तर त्या फ़टक्याकडे बघतच राहिला आणि दिलीपच्या  चेहऱ्यावर मंद असे स्मित होते. आगीला चोख उत्तर दिले होते. त्या सामन्यात दिलीपने शतक तर लावलेच आणि त्याचबरोबर भारताची प्रतिष्ठा देखील सन्मानाने राखली. क्रिकेटच्या तंत्रात हा फटका कुठेच लिहिलेला नव्हता. 
आणखी एक अविस्मरणीय सामना आठवत आहे - हरियाणा विरुद्धचा रणजी अंतिम सामना. गावस्कर निवृत्त झाला होता, आकाशात सचिन तळपत राहणार, याची सुचिन्हे दिसत होती. या सामन्यात शेवटच्या डावात सचिन घणाघाती ९६ धावा काढून बाद झाला परंतु एका बाजूने दिलीप खिंड लढवत होता आणि अखेरीस १३९ काढून नाबाद राहिला. मुंबई तो सामना हरली पण आजही दिलिपचे ते शतक सगळ्या रसिकांच्या स्मरणात आहे. अखेरीस कुणी राहिले नाही म्हणून विकल चेहऱ्याने परतणारा दिलीप कितीतरी रसिकांना आठवत असेल. केवळ असामान्य खेळी असेच म्हणावे लागेल आणि नंतर कर्णधार कपिलने दिलीपचे जाहीर कौतुक केले. अर्थात जाहीर कौतुक जरी झाले तरी आपण रणजी कप जिंकू शकलो नाही, हे वैषम्य त्याच्या मनात सतत राहिले. 
तसा दिलीप मितभाषी, तो नेहमी म्हणायचा, माझी बॅट सगळ्यांना उत्तरे देईल. जेंव्हा भारतीय क्रिकेट प्रांगणात सुनील, विश्वनाथ यांचे साम्राज्य होते आणि इतरांची बॅटिंग झाकोळून जायची, त्याकाळात दिलीप आणि संदीप ,असे दोनच फलंदाज झाले, ज्यांनी या दोघांचे दडपण झुगारले आणि आपली कारकीर्द सजवली. दुर्दैवाने संदीपने आपल्याच पायावर धोंडा पाडून कारकिर्दीचा अकाली अंत करून घेतला पण दिलीपने आपले नाणे खणखणीत वाजवले आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मानाचे स्थान पटकावले. त्यांच्या तंत्रात दोष नव्हते, असे अजिबात नाही पण त्याने आपले दोष अशा खुबीने लपवले की प्रतिस्पर्ध्यांना पत्ताच लागू दिला नाही. त्याच्या भात्यात सगळे फटके होते तरीही Late Cut सारख्या नाजूक फटाक्यांवर तितकेसे  नव्हते!! तसेच काहीसे shuffle होऊन, उभा राहण्याचा स्टान्स असल्याने, काहीवेळा हाताच्या कोपऱ्याच्या दिशेने येणारा आखूड टप्प्याचा चेंडू खेळण्यात तितकीशी सहजता नव्हती - अर्थात असा चेंडू खेळणे भल्या भल्या फलंदाजांना अवघड जाते, ही देखील लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. 
परंतु पाय पुढे टाकून, कव्हर ड्राइव्ह मारणे किंवा खांद्याच्या उंचीवरील चेंडू मिडविकेटच्या दिशेने भिरकावून देणे आणि ते देखील फ्रंटफूटवर येऊन, ही खास दिलीपच्या फलंदाजीची वैशिष्ट्ये म्हणता येतील. फ्रंटफूटवर येऊन खेळणारा दिलीप बघणे, हे क्रिकेटमधील नयनरम्य दृश्य होते. आपल्या उंचीचा व्यवस्थित फायदा घेऊन, दिलीप फ्रंटफूटवर येऊन "दादागिरी" 'करीत असे. सुनील आणि विश्वनाथ निवृत्त झाल्यावर आपल्या खांद्यावर भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा सहजपणे वागवीत असे. त्याच्या फलंदाजीत एक प्रकारचा 'ग्रेस" होता, चैतन्य होते, ते चैतन्य एकूणच क्रिकेट क्षेत्रात अभावानेच बघायला मिळते. 

No comments:

Post a Comment