Thursday, 1 March 2018

विश्वनाथ

मला वाटते, १९६९ मध्ये बिल लॉरीचा ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात आला होता, इयान चॅपेल, रेडपाथ, वोल्टर्स  सारखे फलंदाज मैदान गाजवत होते तर मॅकेंझी, कॉनोली, मॅलेट गोलंदाजीत भारताला दमवत होते. दिल्ली वगळता, भारतात कुठेही टीव्हीचे चिन्ह देखील दिसत नव्हते. भारताने सामना अनिर्णित ठेवला तरी माझ्यासारख्यांना आनंद व्हायचा. बेदी, प्रसन्ना, चंद्रा हळूहळू आपले फिरकीचे जाळे पसरवायला सुरवात करीत होते तर भारताची फलंदाजी, पतौडी, बोर्डे आणि वाडेकर याच त्रयींभोवती गुंफलेली होती. गावस्कर तर तोपर्यंत मुंबई पर्यंतच प्रसिद्ध होता. आमच्या पिढीचे त्यावेळचे क्रिकेट हे प्रामुख्याने रेडियोपुरतेच सीमित होते मात्र त्यावेळी रेडियोवरील समालोचन म्हणजे उत्सव होता. सगळे कुटुंबाच्या कुटुंब रेडियोला चिकटलेले असायचे. 
आणि अशा पार्श्वभूमीवर या मालिकेतील कानपूरचा सामना उगवला. भारताची सुरवात ढेपाळली (हे त्याकाळचे वैशिष्ट्यच होते, सुनील उगवेपर्यन्त बरेचवेळा हाच प्रकार असायचा). त्यावेळी मी "विश्वनाथ" हे नाव ऐकले. त्यापूर्वी त्याने रणजी सामन्यात धावांचा रतीब टाकल्याचे थोडेफार माहित होते पण लगेच कसोटी सामन्यासाठी निवड होईल असे वाटले नव्हते (त्याच्या निवडीला त्यावेळी पतौडीने आग्रह धरला होता) आणि नमनाला अशुभ शकुन झाला!! विश्वनाथ शून्यावर बाद झाला. अगदी स्पष्ट लिहायचे झाल्यास, माझ्या मनातून तेंव्हा नाव उतरलेच होते. त्यावेळी जुनी वर्तमानपत्रातील कात्रणे जमवण्याचा माझा छंद होता आणि त्या कात्रणात तर त्याचे (भरमसाट!!) कौतुक वाचले होते पण तरीही फारशी आशा नव्हती, हे आता मान्यच करायला हवे. 
दोन दिवसांनी भारताची दुसरी इनिंग सुरु झाली आणि लगेच चौथ्या नंबरवर विश्वनाथ आला!! भारताचा डाव, हा पोरसवदा खेळाडू सावरेल याची यत्किंचितही कल्पना केली नव्हती आणि हळूहळू, विश्वनाथने आपल्या भात्यातील अस्त्रे बाहेर काढली आणि दुसऱ्या दिवशी शतक झळकावले. रेडियोवर नुसती धमाल कॉमेंट्री चालू होती. त्यावेळी, दोन दिवसांपूर्वी मी काय विचार करीत होतो, हेच विसरून विश्वनाथ बद्दल कौतुक करायला लागलो ( असे त्यावेळी माझ्याबाबतीत बऱ्याच खेळाडूंबाबत घडले होते, उदाहरणार्थ दिलीप वेंगसरकर!!) 
त्यानंतर मात्र, सलग पुढील १४, १५ वर्षे, याची फलंदाजी अक्षरश: मन:पूत उपभोगली. पुढे १९७१ चे  वेस्ट इंडिज, इंग्लंडचे दौरे आली, विश्वनाथची जागा सुनीलने घेतली. सुनीलचे पदार्पण देखील अविश्वसनीय असेच झाले होते. त्याच्या जोडीला सरदेसाई आणि सोलकर आले आणि भारतीय संघ एकदम विश्वविजयी वाटायला लागला (अशी एकदम टोकाची मते बनवणे, मला सहज जमत होते!!) एव्हाना, स्पिनर्सची चौकडी खऱ्याअर्थी जगद्विख्यात झाली होती. परंतु विश्वनाथ काय चीज आहे, यासाठी मला वेस्टइंडीजची १९७४/७५ ची वाट बघावी लागली. मद्रास आणि कोलकात्ताचे सामने त्याने अक्षरश: एकहाती खेचून काढले. पुढे मला मद्रास सामन्याची क्षणचित्रे असलेली व्हिडियो बघायला मिळाली आणि सुनीलने त्याच्या नाबाद ९७, या खेळीचे का इतके अफाट वर्णन केले, यामागील इंगित उमगले. अँडी रॉबर्ट्स भरातला आग्यावेताळी गोलंदाज होता, एकहाती सामना लीलया फिरवायची अचाट क्षमता त्याच्या गोलंदाजीत होती आणि मद्रासला तो एका बाजूने ६ विकेट्स घेत असताना, विश्वनाथने नाबाद ९७ धावा केल्या होत्या!! संख्याशास्त्राप्रमाणे ९७ या आकड्याला फारसे महत्व नाही पण ज्या परिस्थितीत आणि ज्याप्रकारे त्याने रॉबर्टसला थोपवले होते, हा प्रकार केवळ अचाट होता. त्याच जोरावर आपण मद्रास कसोटी सामना जिंकला आणि  मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. लक्षात घ्या, हाच संघ पुढे इतिहासातील अजरामर संघ म्हणून गणला गेला होता. ग्रिनीज, फ्रेड्रिक्स, कालिचरण, रिचर्ड्स, लॉइड सारखे अद्वितीय फलंदाज, रॉबर्ट्स, होल्डर, ज्युलियन सारखे थरकाप उडवणारे गोलंदाज बघणे हा कसोटी सामान्यांचा आनंद सोहळा होता. 
पाचवा कसोटी सामना वानखेडे स्टेडियमवर होता आणि तिथे मी डोळे भरून विश्वनाथला बघितले. खरेतर तो सामना लॉइडचा म्हणून गणला जातो पण तरीही पहिल्या इनिंगमध्ये विश्वनाथने ९५ धावा केल्या होत्या. वास्तविक ही इनिंग त्याची सर्वोत्कृष्ट मानली जात नाही पण काही स्ट्रोक्स, त्याचा दर्जा दाखवून देणारा होता. त्याचे काही स्ट्रोक्स केवळ त्याचेच होते. क्रिकेटच्या शास्त्रानुसार square cut खेळणे म्हणजे किंचित मागील पायावर जायचे, जाताना शरीराला उजव्या यष्टीच्या जवळ आणायचे, अर्थात चेंडू short pitched असणे गरजेचे आहे. शरीर उजव्या यष्टीच्या आसपास आणताना, हातातील bat किंचित खाली ठेवायची आणि जमिनीला सामन्तर ठेवायची, जेणेकरून फटका मारताना, चेंडू हवेत उडण्याची शक्यता फारच कमी होते. साधारणपणे, Point आणि  Cover Point  यांच्या मधून मारणे अपेक्षित असते, क्वचित Second Gully मधूनही मारला जातो आणि हा फटका अगदी शेवटच्या क्षणी खेळायचे, जेणेकरून क्षेत्ररक्षकाला हालचाल करायला फारसा वाव मिळू नये. अतिशय नयनरम्य स्ट्रोक आहे आणि त्या Late Cut सारखी नजाकत आहे तसेच अनपेक्षितता आहे, गोलंदाज देखील, slip मध्ये झेल उडेल, या अपेक्षेत असतो पण प्रत्यक्षात चेंडू भरमसाट वेगात सीमापार जात असलेला बघावे लागते!! आता विश्वनाथ केवळ अतुलनीय होता. विश्वनाथला हा स्ट्रोक खेळण्यासाठी कधीही short pitched चेंडू असण्याची गरज नसायची. अगदी Good Length चेंडू देखील, केवळ मनगटाच्या किंचित हालचालीने square cut मारायचा!! हे खरंच अविश्वसनीय होते. एकीकडे रॉबर्ट्स १५० वेगाने चेंडू टाकत आहे आणि केवळ क्षणभरात केलेल्या मनगटाच्या हालचालीने, त्या चेंडूतील "जाळ" विझून जायचा. रॉबर्ट्स हताश!! मद्रासला त्या इतिहासप्रसिद्ध खेळीत असे स्ट्रोक्स विशीच्या बरेच मारले इतके की एक वेळ अशी होती, लॉइडने २ thirdman क्षेत्ररक्षक ठेवले होते तरीही विशी त्यातून सहजरीत्या gaps काढीत होता. हा प्रकार डोळ्यांना देखील भुलवणारा होता, सामन्याचे चित्र पालटवणारा होता.  
आता थोडा वेगळा आणि गमतीशीर विचार. जेंव्हा, केंव्हा विशीच्या भारतातर्फे शतक लावले तेंव्हा एकतर भारताने सामना सन्मानाने अनिर्णित ठेवलेला आहे किंवा जिंकलेला आहे. अर्थात क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, जेंव्हा एकाबाजूने एखादा खेळाडू शतक मारतो तेंव्हा दुसऱ्या बाजूचा फलंदाज देखील त्याला मोलाची साथ देत असतो. तेंव्हा match winner या शब्दाला देखील मर्यादित अर्थ आहे. अगदी विव रिचर्ड्स घेतला तरी, त्याने लावलेल्या सगळ्याच  शतकांच्या वेळी वेस्ट इंडिज जिंकली आहे, असे नाही.
एक फलंदाज विचार कररतांना, आपण फार एकांगी विचार करतो जसे विशी म्हणजे शैलीदार फलंदाज वगैरे. सुनील त्याच काळात भरात असेल पण तरीही जरी सुनील इतके नसले तरी विश्वनाथाचे तंत्र विलक्षण अचूक होते. एक प्रसंग आठवत आहे, आपण  १९७७साली ऑस्ट्रेलियात गेलो होतो. त्या संघात थॉमसन होता आणि मला वाटते, सिडनेचा सामना असावा, थॉमसनने जीव तोडून short pitched चेंडू टाकला. वास्तविक सरळ रीत म्हणजे backfoot जायचे आणि एकतर चेंडू सोडायचा किंवा मागे जाऊन, चेंडू नुसता तटवायचा. इथे विश्वनाथ सरळ front foot वर गेला आणि चेंडूला Point ची दिशा दिली. ऑस्ट्रेलियाचा संघ बघतच राहिला!! विश्वनाथने हे कसे शक्य केले? हाच भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता पण आयुष्याबभर विश्वनाथने सगळ्यांना असेच अकल्पित धक्के दिले. आता आपण सहजपणे improvise हा शब्द वापरतो पण त्याकाळी हा शब्दच अस्तित्वात नसताना, विशी चमत्कार दाखवायचा. असाच तो hook मारीत असे. Hook हा फटका, क्रिकेटमधील काही अति आव्हाहनात्मक स्ट्रोक पैकी एक. गोलंदाजांचा आत्मविश्वास खचवून टाकणारा!!  विश्वनाथचे वैशिष्ट्य असे, हा फटका खेळताना, त्याने कधी चेंडू हवेत मारला नाही. फटका खेळताना चेंडू जमिनीवरच राहील, अशी त्याची हालचाल असायची. अशाच प्रकारे पुढे राहुल द्रविड फटका मारीत असे. 
हा सव्वा पाच फुटी खेळाडू म्हणजे क्रिकेटमधी असामान्य कलाकार होता. याचा खेळ बघताना कधीही असे वाटले नाही, हा खेळ किती अवघड आहे. जे अवघड आहे, ते हा माणूस सहज करून दाखवत असे.
१९८१ ला मेलबर्नच्या "आखाडा" खेळपट्टीवरील याची ११३ धावांची इनिंग म्हणजे गोलंदाज धार्जिणी खेळपट्टीवर आणि अगदी, लिली, पास्को सारखे गोलंदाज असले तरी कशी साकारायची, याचा अफलातून आदिनमुना होता. खेळपट्टी पहिल्या दिवसांपासून बेभरवशी वागत होती. याच सामन्यात सुनीलचा लिलीबरोबरचा  किस्सा गाजलेला. कदाचित त्यातून स्फूर्ती घेऊन, विश्वनाथने परत एकदा जगाच्या क्रिकेटच्या इतिहासातील एका नयनरम्य खेळीचा नजराणा पेश केला. त्या सामन्यात टाकलेला चेंडू कसा असलेले, याचा कसलाच तर्क लढवता येत नव्हता आणि अशा वेळी विश्वनाथला स्फुरण चढले आणि भारताच्या अजरामर विजयाची पायाभरणी केली. केवळ अविश्वसनीय खेळी होती. पास्को ज्या त्वेषाने चेंडू टाकत होता, त्या त्वेषातील धग, ज्या सहजतेने विश्वनाथने शांत केली, हा असामान्य वस्तुपाठ होता. याच सामन्यात लिलीने एक बाउन्सर टाकला!! अग्निलोळ मधल्या यष्टीवरीळ रोखाने येत होता.जो पल्ला गाठला, त्याच्या भोज्यालाच हात लावता  वास्तविक मधल्या यष्टीवरील चेंडू म्हणजे defence हेच उत्तर पण विश्वनाथने मधल्या यष्टीवरील चेंडू सरळ सोडून दिला, अर्थात बाउन्सचा योग्य अंदाज घेऊन. असा चेंडू संहजतेने सोडून देणे, हा गोलंदाजांचा अपमान आहे पण विश्वनाथने सहजपणे तो अपमान केला. हा "अंदाज"च मार्श, चॅपल, बॉर्डर यांना अवाक करून गेला. लिली तर विस्फारून बघत होता ज्यांना लिली म्हणजे काय चीज आहे, हे माहित असेल त्यांना या वागण्याचा अंदाज येईल. 
या कलाकाराने सुनीलच्या जोडीने भारतीय क्रिकेटला खूप काही शिकवले. मुख्य म्हणजे जलदगती गोलंदाजांचा जरादेखील मुलाहिजा ठेवण्याची गरज नाही, हे मनावर बिंबवले. विशीने आयुष्यात कितीतरी अजरामर खेळी खेळल्या आहेत. सगळ्याच्या आठवणी इथे मांडण्यात तसा अर्थ नाही. त्याची प्रत्येक हालचाल म्हणजे मूर्तिमंत काव्य होते. पुढे, अझर, लक्ष्मण यांनी ही कला आणखी पुढे नेली पण तरीही या दोघांना विश्वनाथने जे निर्माण केले , त्याच पायवाटेची  संगत मानवली. 
१९७९ च्या लॉर्ड्स वरील सामन्यात भारत पराभवाच्या काठावर होता, दिलीप वेंगसरकर आणि विश्वनाथ एकत्र आले आणि दोघांनी शतके झळकावून भारताला सन्मानाने अनिर्णित सामन्यात वाटा उचलला. पावसाळी हवा होती, चेंडू कसा आणि किती स्विंग होईल, कळत नव्हते पण शांतपणे विश्वनाथने भात्यातील अस्त्रे काढली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना नेस्तनाबूत केले. ही देखील अशीच भारताच्या क्रिकेट इतिहासातील जवाहिऱ्याची खेळी. विशी खेळात असताना आपण तिथे असावे आणि त्याने केवळ आपल्यासाठी  वाटावे,अशा प्रकारे फटक्यांची टांकसाळ उघडावी आणि प्रत्येक स्ट्रोकने आपला काळजाचा तुकडा हलावा, हेच त्याच्या खेळाचे खरे सौंदर्य. या बुटक्या खेळाडूने जगभरातल्या प्रेक्षकांना नेहमीच क्रिकेट खेळाचे अवर्णनीय  सौंदर्य घडवले, याची उतराई होणे केवळ अशक्य. 

No comments:

Post a Comment