Tuesday, 14 November 2017

स्वररचना - एक गूढ प्रक्रिया - भाग १

सर्वसाधारणपणे आपण जेंव्हा एखादी ललित संगीतातील रचना ऐकतो तेंव्हा स्वाभाविकपणे त्यातील गायन आणि नंतर स्वररचना आपल्याला सर्वाधिक आकर्षित करते. खरतर ललित संगीताच्या स्वाभाविक घडणीत, गायन प्रकार शेवटच्या पायरीवर येतो तरीही रसिकांना, गायन अधिक भावते!! थोडा विचार केल्यास, गायन हा घटक, स्वररचनेनंतर अवतरतो!! जर का स्वररचना सुदृढ असेल तरच बव्हंशी गायनाचा असर अधिक गाढा होतो. आणखी थोड्या खोलात जाऊन विचार केल्यास, स्वररचना हाच ललित संगीताच्या आकृतीबंधाच्या गाभ्याशी जोडलेला असतो. या लेखात मला याच घटकाच्या सर्जनशीलतेविषयी चार शब्द लिहावेसे वाटतात.
स्वररचना = स्वर + रचना, अशी विभागणी आपल्याला करता येईल. याचाच वेगळा अर्थ, स्वरांची एकत्रित बांधणी करणे, ही क्रिया स्वररचना या संदर्भात मांडता येते.  स्वर हे संहतीत घटक म्हणून वावरतात. सुटे काढल्यास, त्या ध्वनीला स्वरत्व मिळत नाही.स्वर व्यक्तीभूत राहिले तर ते केवळ "नाद"च राहतात. परंतु परस्पर संबंधातून ते स्वरत्वास पोहोचतात.म्हणजे, सा म प ध हे चार स्वर चौकटीचे घटक म्हणून घेतले, तर पुढील विकास, विस्तार यांचा हे स्वर पाया म्हणून असतात. परंतु इथेच नवा निकष उद्भवतो, स्वरमयतेचा!! प्रत्येकवेळी जेंव्हा वरील स्वरसंहतीची पुनरावृत्ती केली जाईल,तेंव्हा सर्व स्वरबिंदू तादात्म्य पावू शकले तरच तिथे स्वरमयता उद्भवू शकते. म्हणजे, "सा म प ध" हि संदर्भचौकट निश्चित झाली म्हणजे तिथे यांचे अधिराज्य सुरु झाले. समजा पुनरावृत्तीत मुळचा "म" पुनारावृत्तीतील "म" पेक्षा खालचा असेल तर मूळ "म" ला तितके खाली यावेच लागेल,अन्यथा सगळा संगीत व्यापार विस्कळीत होईल. याचाच पुढील भाग, याच "सा म प ध" यामध्ये जर  "रे" हा नवीन असला, जुनी संहिता कितपत निर्णायक मानायची? याचे उत्तर, आपल्या मुल संहितेत सापडते. जुनी असो किंवा नवीन स्वरसंहिता असो, जिथे "संगीत" सिद्ध होण्याची शक्यता दिसली पाहिजे. अन्यथा सगळीच स्वरचौकट मोडून जाईल.इथे एक शंका नेहमी विचारली जाऊ शकते. गणिती पद्धतीने "सा" स्वराची कंपने नक्की झाली आहेत पण प्रत्येक अविष्कारात तीच कंपने ताडून पाहता शक्य नसते.मग, तो गायक बेसूर म्हणायचं का? इथेच याचे उत्तर मिळते. इथे त्या ठराविक नादबिंदूशी नाते जोडणे, असा प्रकार नसून, त्या ध्वनिभोवती एक गतिमान संबंध असतो, त्याच्याशी "स्पर्श" करणे, पुन्हा तिथून दूर जाणे, असा असतो. याचाच अर्थ, सप्तकमर्यादा असते त्याचप्रमाणे, स्वरमर्यादा देखील असते. 
जेंव्हा आपण स्वररचना म्हणून स्वतंत्र विचार करायला लागतो तेंव्हा त्यामागे स्वर आणि संहती, याचा देखील स्वतंत्रपणे विचार अत्यावश्यक ठरतो कारण स्वररचना या संकल्पनेचे हे पायाभूत घटक आहेत. वरील विवेचनाचा मुख्य उद्देश असा आहे,कुठलीही स्वररचना, रचनेच्या अंगाने बघायला गेल्यास, आपल्याला स्वर आणि स्वरसप्तक, यांना टाळून बघताच येणार नाही. मी इथे केवळ भारतीय ललित संगीताच्याच परिप्रेक्षात विचार करणार आहे.
जग जवळ येण्याच्या आजच्या काळात भारतीय संगीताचा विचार करताना, मनात पाश्चात्य संगीतपरंपरा आणि तिची वैशिष्ट्ये यांचा विचार हमखास मनात येतो. आपल्याकडे ललित संगीताच्या स्वररचनेची परंपरा नव्हती पण ती इथे रुजली याचे महत्वाचे कारण, पाश्चात्य संगीताशी जोडला गेलेला संबंध. विशेषतः: जेंव्हा आपण वाद्यवृंद स्वररचनेचा मागोवा घेत गेलो तर पाश्चात्य संगीताशी असलेले साहचर्य लगेच लक्षात येते. परंतु हा झाला नंतरचा भाग. मुळात "स्वररचना" ही संकल्पना मांडताना, हाती असलेल्या शब्दकळेला आशयबद्ध सुररचना तयार करणे अभिप्रेत असते. अर्थात काहीवेळा उलट प्रकार अस्तित्वात येऊ शकतो म्हणजे रचनाकाराच्या मनात एखादा आकृतिबंध तयार होतो आणि त्याला शब्द पुरवले जातात. परंतु वर म्हटल्याप्रमाणे "स्वर" हा घटक अत्यावश्यक असतो.
गमतीचा भाग म्हणजे इथे रचनाकाराच्या मनात उद्भवणारा स्वरबंध कसा उद्भवतो, याचा मागोवा घेणे निरातिशय जिकिरीचे ठरू शकते, किंबहुना याचे यथार्थ विश्लेषण अशक्यकोटीतील बाब ठरते, विशेषतः: आपल्यासारख्या, केवळ बाहेरून आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेत तर अनंत अडथळे निर्माण होतात. तेंव्हा या प्रतिभेचे गारुड कायम अम्लानस्वरूपातच स्वीकारावे लागते. मग प्रश्न पुढे येतो, स्वररचनेचा, स्वररचना म्हणून कसा मागोवा घ्यायचा? केवळ स्वर आणि सप्तक याचाच विचार केला तर केवळ आराखडा, याशिवाय फारसे काही पदरात पडणार नाही.इथेच रागसंगीत आणि ललित संगीत यात फरक पडतो. स्वरांचे अपरिमित महत्व ध्यानात घेऊन देखील, ललित संगीतातील स्वररचनेचा अभ्यास करताना, शब्द हा घटक देखील तितकाच महत्वाचा ठरतो आणि त्याच्याशिवाय स्वररचनेचा स्वतंत्र विचार करणे अजिबात संभवत नाही.
बरेच रचनाकार, स्वररचना हा स्वतंत्र आविष्कार मानतात आणि त्यात बरेच तथ्य आहे. हाताशी कसलाच आसभास नसताना, मनात काही स्वराकृती येतात आणि त्या स्वराकृतीच्या साहाय्याने, हाती असलेल्या कवितेला तर्कशुद्ध न्याय देण्यात यशस्वी होतात. ललित संगीतात, नेहमीच कवितेतील आशय स्वरांच्याद्वारे अधिक अंतर्मुख करणे, अभिप्रेत असते आणि तीच प्राथमिक कसोटी जाते.  

No comments:

Post a Comment