२०११ च्या फेब्रुवारीतील शेवटचा आठवडा होता. दक्षिण आफ्रिकेतील उन्हाळा
चालू होता. वास्तविक या देशात एव्हाना १७ वर्षे काढली होती तरी या वर्षीचा
उन्हाळा थोडा कडकच होता. माझ्या हेड ऑफिसमधून - बोटस्वाना मधून दोन
कर्मचारी कंपनीच्या कामासाठी आठवडाभर आले होते, त्यामुळे काम संपवणे फारच
जिकिरीचे झाले होते. ऑफिसमध्ये एयर कंडिशन असला तरी बाहेर उन्हाच्या झळा
जाणवायच्या. इथे एक बरे असते, सतत ३,४ दिवस कडाक्याचा उन्हाळा झाला की लगेच
पुढील दिवशी पावसाची सर ( पावसाची सर - धुंवाधार नव्हते!! तसा इथे
धुंवाधार पाऊस नैमित्तिकच असतो) हमखास येते आणि हवेचे तापमान कमालीचे
घसरते. दोन दिवसांपूर्वीच चांगला पाऊस पडून गेला होता त्यामुळे उन्हाची
तलखी जाणवत नव्हती.
सगळा आठवडा कामाच्या रगाड्याखाली गेला होता.
सकाळी ८.०० वाजता काम सुरु व्हायचे व्हायचे ते सलग संध्याकाळचे कमीत कमी
६.०० तरी वाजायचे. त्यानंतर आलेल्या लोकांना हॉटेलवर सोडायचे आणि घरी
परतायचे, असाच परिपाठ झाला होता. अर्थात या देशात आता १६ वर्षे काढल्याने,
हे सगळे अंगवळणी पडले होते. कधीकधी याच लोकांना घेउन, एखाद्या हॉटेलमध्ये
न्यावे लागायचे. अर्थात त्यांचे देखील बरोबर असायचे. जरी बोट्स्वानामधले
असले तरी, त्यांना जोहान्सबर्ग नवीनच. आधीच शहराचा अवाढव्य आकार बघून छाती
दडपली जायची, त्यात एकूणच कायदा आणि सुव्यस्थेवर प्रचंड प्रश्नचिन्ह उभे
राहिलेले!! त्यामुळे रात्री बेरात्री फिरायचे कसे? हा बऱ्याच नवीन
लोकांसमोर प्रश्न उभा असायचा आणि त्यात थोडेफार तथ्य नक्की होते. रोजचा
पेपर वाचायला घेतला तरी या मताला पुष्टी मिळणाऱ्या बातम्या, अगदी पहिल्या
पानावर वाचायला मिळायच्या!!
२७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी
जवळपास, ७.०० वाजता कामे उरकली आणि घरी जायचे ठरवले. उद्या इथे आलेली मंडळी
परतणार होती म्हणून, यावेळेस, मीच बाहेर जेवायचा प्रस्ताव मांडला आणि
ऑफिसच्या जवळच असलेल्या एका मॉलमधील इटालियन हॉटेलमध्ये जायचे ठरले.
त्यादिवशी दुपारीच किंचित सर कोसळल्याने, वातावरण काहीसे थंडगार होते.
गेल्यावर, शिरस्त्याप्रमाणे ड्रिंक्स मागवले आणि जेवणाचा मेन्यू ठरवला.
झालेल्या कामाबाबत थोडक्यात उजळणी केली आणि एक रिपोर्ट कसा सादर करायचा,
याची रूपरेखा निश्चित केली. याबाबत एक अनुभव, सर्वसाधारण्पणे, ऑफिसमधील
माणसे एकत्र आली, मग जरी पार्टी वगैरे असली तरी देखील ऑफीसचेच विषय
बोलण्यात येत राहतात, मग तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला त्यात भाग
घ्यावाच लागतो. खरंतर माझ्या दृष्टीने हे सगळेच कंटाळवाणे पण अशा वेळी
तुमच्या मताला, इच्छेला काहीही अर्थ नसतो. जगरहाटीच अशी आल्यावर तुमच्याकडे
दुसरा पर्याय नसतो. अर्थात जेवताना, काही विनोद सांगण्याचा प्रयत्न होतो,
आपल्याच ऑफिसमधील लोकांची टिंगल-टवाळी चालू असते, असलेली, नसलेली गॉसिपची
लफडी चघळली जातात. एव्हाना माझा जीव उबून गेलेला होता पण हा देखील आपल्या
कामाचाच भाग आहे, हे समजून घेऊन, मी त्यात टवाळकीत सामील झालो होतो. रात्री
जवळपास, ११.०० वाजेपर्यंत चालू होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवार असल्याने
आणि इथे शुक्रवारी एकूणच तसा कामाचा फारसा दबाव नसल्याने, ठीक होते.
शुक्रवार
आला म्हणजे इथे सगळ्यांना वीकएंडचे वेध लागतात, दुपारचे जेवण झाले म्हणजे
आपापसात गप्पांचे फड रंगतात किंवा फोनाफोनी सुरु होते. काही मोठ्या
कंपन्यांमध्ये तर दर शुक्रवारी ऑफिसमध्येच चक्क बार्बेक्यू पार्टीज चालतात.
मी काही वर्षांपूर्वी प्रिटोरिया इथे नोकरी करीत असताना,तिथल्या
कंपनीत, महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी ऑफिसमध्ये अशाच होणाऱ्या
बार्बेक्यू पार्टीजचा आनंद मनमुराद उपभोगला होता. अशा पार्ट्या मात्र
रंगवाव्यात त्या गोऱ्या माणसांनीच. अशा वेळी गोरा माणूस, निखळ मोकळा होतो,
प्रसंगी ज्याला अश्लील विनोद म्हणावेत, असे विनोद, सहजपणे
पार्ट्यांमध्ये सांगत असतो - मग आजूबाजूला मुली-बायका असल्या तरी!!
रस्टनबर्ग इथल्या एका पार्टीचा किस्सा. इथला ख्रिसमस म्हणजे आपल्याकडील
दिवाळी!! ख्रिसमस निमित्ताने, कंपनीने सन सिटीमध्ये डिनर पार्टी ठेवली
होती. ऑफिस तसेच संबंधित बरीच माणसे जमली होती. आमचा फ्लोअर मॅनेजर आणि इतर
बराच स्टाफ गोऱ्या समाजातील लोकांचा होता, अर्थात Annual Function म्हणून
सगळेजण पार्टी ड्रेस घालून आले होते. रिवाजाप्रमाणे ड्रिंक्स सुरु झाली आणि
एकेक मोकळे होत गेले. फ्लोअर मॅनेजर - जेरॉम पिण्यात अगदी सज्जड आणि
बोलण्यात फटकळ पण मिस्कील देखील. माझ्याच डिपार्टमेंटला तान्या तसेच
स्टेफनी, या गोऱ्या मुली आलेल्या होत्या. जशी पार्टी रंगायला लागली तशी
जेरॉम "Oh Stephani, looking fucking gorgeous and sexy. Let's have one
week date. We will enjoy lot!!" दोघे एकमेकांना जवळून ओळखत होते तरी
आपल्या संस्कृतीचा विचार केला तर असे बोलणे असभ्यपणाचेच!! पण इतपत
समंजस वृत्ती नक्कीच दाखवली जाते.आणि असे बोलणे चेष्टेवारी नेले जाते.
अर्थात अश्लीलतेची मर्यादा राखूनच चेष्टा केली जाते. अन्यथा
ऑफिसमध्ये गोरा माणूस चुकूनही वेळ वाया दवडत नाही. गोऱ्या लोकांच्या
संस्कृतीवर टीका करणे सहज, सोपे आहे पण कामाच्या बाबतीत दाखवली जाणारी
नि:स्पृहता निश्चितच वाखाणण्यासारखीच असते, अर्थात याला प्रतिवाद करणारी
उदाहरणे सापडतात पण एकूण प्रमाण फारच दुर्मिळ असते.
दुसऱ्या
दिवशी मी जरा उशिरानेच ऑफिसमध्ये गेलो, आलेल्या पाहुण्यांचे विमान दुपारचे
होते, त्यामुळे तशी घाई करण्याची गरज नव्हती. आल्यावर, काल ठरलेल्या
मुद्द्यांप्रमाणे एक रिपोर्ट तयार करून, सही शिक्क्यांसह पाहुण्यांकडे
दिला. फ्लाईट दुपारी १.०० चे होते म्हणौन सकाळचा चहा घेतला आणि त्यांना
विमानतळावर सोडायला, म्हणून गाडी काढली. ऑफिसपासून विमानतळ गाठणे म्हणजे
जवळपास अर्धा तास ड्राइव्ह, जर का रस्ता मोकळा मिळाला तर. जोहान्सबर्ग
शहरातील वाहतूक, हा दिवसेंगणिक त्रासदायक अनुभव होत चालला असल्याने, बरेचजण
साधारणपणे अर्धा तास हाताशी राखूनच प्रवासाची सुरवात करतात. वाहतुकीचा
प्रश्न आताशी डर्बन, प्रिटोरिया, केप टाऊन अशा शहरांतून देखील अनुभवावा
लागतो. त्यातून जोहान्सबर्ग म्हणजे देशाची आर्थिक राजधानी!! त्यामुळे इथे
रोजगाराच्या संधी भरपूर उपलब्ध, पर्यायाने गाड्यांची वर्दळ देखील भरपूर!!
आज लख्ख ऊन पडले होते. डिपार्टमेंटमध्ये कामासंबंधी आवश्यक त्या सूचना
देऊन,आलेल्या पाहुण्यांना विमानतळावर पोहोचवण्यासाठी गाडी काढली. सुदैवाने
रस्ता मोकळा मिळाला आणि गाडी दामटली. विमानतळावर पोहोचायला फरास वेळ लागला
नाही आणि लगोलग पाहुण्यांना सोडून, परतीच्या मार्गाला लागलो.
परत
येताना देखील रस्ता तसा फारसा वर्दळीचा नव्हता. आज जरा उन्हे आहेत म्हणून
गाडीच्या काचा देखील खाली सरकवल्या होत्या. मध्येच एका सिग्नलला गाडी
थांबवली. साधारणपणे सिग्नल एखाद मिनिटांपुरताच असतो कारण हा रस्ता काही
महामार्ग नव्हता. अचानक एकदम माझ्या डोक्यावर कसला तरी प्रचंड आघात झाला
आणि क्षणात मला कळले, माझ्यावर हल्ला झालेला आहे पण झालेला आघात इतका मोठा
होता की मला हालचाल करायला कसलाच वाव नव्हता. मला कळत होते, हल्लेखोरांनी
माझ्या खिशाला हात घातला होता पण मी संपूर्णपणे हतबल होतो. काही सेकंदाचा
खेळ पण मला काहीसा उध्वस्त करणारा. हल्लेखोर पळून गेल्याचे समजले आणि मी
गाडी कशीबशी बाजूला लावली आणि ऑफिसला फोन लावून, हल्ल्याची बातमी सांगितली.
तत्क्षणी माझी शुद्ध हरपल्याचे जाणवले!! गाडीच्या स्टिअरिंगवर डोके ठेवले,
इतपतच मला आजही आठवत आहे!!
साधारणपणे अर्ध्या तासाने मला जाग
आल्याचे समजले. मी ऑफिसमध्ये आलो होतो. अगदी मनापासून कबूल करायचे
झाल्यास,मनातून पूर्णपणे हादरून गेलो होतो. ऑफिसमध्ये आल्यावर, थोड्या
वेळाने काहीसा सावरलो आणि खिसा खाली झाल्याचे समजले. लगेच बँकेत फोन लावला
आणि सगळी कार्ड्स रद्द करून घेतली!! भारतातील IDBI बँकेचे कार्ड देखील घेऊन
गेले होते!! लगोलग, मित्राच्या गाडीतून घरी परतलो, कपडे बदलायला घेतले,
पायातील बूट काढला आणि अंगातून वेदनेची सळक निघाली. डाव्या पायाचा घोटा
धप्प सुजला होता, इतका की जमिनीवर पाऊल ठेवणे अशक्य झाले होते . नंतर
ध्यानात आले, डोक्यावर आघात होता क्षणी माझा डावा पाय प्रतिक्षिप्तपणे
ब्रेक पॅडवर आपटला होता आणि पाय सुजला होता.
त्याक्षणी घरी
कायमचे परतायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी घरी हल्ल्याची बातमी सांगावीच लागली
कारण भारतातील बँकेचे कार्ड रद्द करून घ्यायचे होते. १७ वर्षे ज्या देशात
सुखनैव पद्धतीने काढली, त्याचा असा शेवट मनात ठेऊन, देश सोडायचे ठरवले आणि
मे २०११ मध्ये मी मुंबईला कायमचा रहायला आलो. घरी बायको आणि मुलगा रहात
असल्याने मला राहायचे कुठे? हा प्रश्नच नव्हता. घरात शिरलो, तोच मुळी
काहीसा लंगडत!! हे माझे लंगडणे, पुढे दोन महिने तरी चालूच होते. त्यामुळे
बाहेर हिंडण्या-फिरण्यावर खूपच मर्यादा आल्या होत्या. पण हाच काळ, मला
मुंबईत स्थिरावयाला मदतीचा ठरला. वास्तविक,मी दक्षिण आफ्रिकेला गेलो तेंव्हा
पस्तिशी गाठली होती, म्हणजे अगदीच तरुण वगैरे अजिबात नव्हतो पण तरीही
एखाद्या देशात सलग इतकी वर्षे काढल्यावर, तुमच्यात थोडेफार बदल होणे,
क्रमप्राप्तच ठरते. सर्वात मोठा फरक पडला, हवामानातील प्रचंड फरक. दक्षिण
आफ्रिकेत, घाम गाळला तरच घाम येणार!! मुंबईत, पंख्यापासून जरा दूर राहिलात
की लगेच घामाची धार!! २००५ मधील गंमत. तेंव्हा मी एका आडगावात नोकरी करीत
होतो. एप्रिल महिन्यात, तिथे ०, -१ इतके तपमान खाली उतरते आणि अशावेळी मी
मुंबईत सुटीवर आलो होतो. त्यावेळी जाणवलेला झटका कायमचा मनात टाकलेला आहे.
खरी गंमत पुढे आली. महिन्याभराची सुटी संपवून (मुंबईतील +३० तपमान
उपभोगून) जेंव्हा जून महिन्यात त्या गावात पोहोचलो ते -३, -४ तपमानात!!
दोन्ही वेळा जुळवून घेणे अतिशय अवघड झाले.
अर्थात, यात नवल
वाटण्याचे काहीच कारण नाही, कारण मुंबईची हवा ही वर्षानुवर्षे अशीच आहे पण
आपण जेंव्हा परदेशी राहणाऱ्या माणसाला हवा मानवत नाही म्हटल्यावर काहीशा
कुचेष्टेने त्याच्याकडे बघतो, ते सर्वार्थाने चुकीचे आहे. हवामानातील फरक
अंगीकारणे, खरोखरच अवघड असते. मी परत आलो, तो २०११ मधील मे महिना होता आणि
तेंव्हा जोहान्सबर्ग हे ० ते -१ तपमानावर!! अर्थात मी सुखरूप घरी आलो,
कुटुंबात परत मिसळलो, ही बाब आनंदाचीच होती. आल्यावर, सर्वात आधी आर्थिक
कामे, driving license, Pan Card अशी कामे प्रामुख्याने मार्गी लावली. अगदी
रेशन कार्डवर माझ्या नावाची नोंदणी देखील करून घेतली.
इथे
भारतीय पद्धत आणि साऊथ आफ्रिकन पद्धत, यात खरा फरक लक्षात यायला लागला.
रेशन कार्डवर नाव नोंदण्यासाठी अक्षरश: हेलपाटे घालावे लागले. पूर्वी
जेंव्हा मी इथं राहात होतो तेंव्हा माझे नाव रेशन कार्डवर होते पण
कालांतराने नोंदणी रद्द केली. त्या ऑफिसमध्ये माझ्या पासपोर्ट कॉपीज
दिल्या, इतर सगळी कागदपत्रे दिली तरी नोंदणी व्हायचे नाव नाही!! पहिल्याच
भेटीत, काय कागदपत्रे सादर करायची? याबाबत कुणालाच काहीही माहिती नाही,
प्रत्येक भेटीत नवीन काहीतरी आणायला लावायचे. एक, दोनदा तर त्या टेबलावरचा
माणूस नाही म्हणून मला परत पाठवले!! आता एखाद दिवशी माणूस येऊ शकत नाही, हे
समजून घेता येते पण जर का त्या टेबलावर माणूस नाही तर त्याचे काम दुसरा
कुणी करेल, तर त्याबाबत नाव नाही!! मला तर फक्त कागदपत्रे सादर करायची
होती, माणूस नाही पण हा माणूस कधी येणार? या प्रश्नावर काहीही उत्तर नाही!!
मला लगेच एक तुलनात्मक प्रसंग आठवला. १९९९ मध्ये मला दक्षिण आफ्रिकेच्या
पर्मनंट रेसिडेन्सीसाठी होम अफेयर्सच्या ऑफिसमध्ये जायचे होते.
जाण्यापूर्वी कुठली कागदपत्रे लागतील, याबाबत स्वतंत्र इ-मेल मिळाल्याने,
मनात कसलीच शंका नव्हती. ऑफिसमध्ये सकाळी ११. ०० वाजता गेलो आणि सगळ्या
कामाची पूर्तता दुपारची जेवणाची सुट्टी होईपर्यंत पूर्ण झाली, यात माझी
स्वतंत्र मुलाखत झाली, माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या कागदपत्रांची
खातरजमा झाली आणि रँड १०,००००/- भरून, मी बाहेर देखील पडलो!! मला, एकूण
कामाला ६ महिने लागतील, असे आश्वासन दिले!! साधारणपणे ६ महिन्यांनी मला
मेल आला, मला पर्मनंट रेसिडेन्सी मिळाली आहे, पीटरमेरिट्झबर्ग मधील
कार्यालयातून कामाची पूर्तता करावी. त्या कार्यालयात मी एके दिवशी गेलो आणि
लगोलग मला रेसिडेन्सीची सर्टिफिकेट्स मिळाली, माझ्या दोन्ही तळहाताचे
शिक्के घेण्यात आले, कारण यथावकाश आयडी बुक मिळणार होते, जे मला साऊथ
आफ्रिकेत काहीही व्यवहार करायला मुभा देत होते तसेच मला या देशाचा कायमच
नागरिक व्हायला विनाशर्त परवानगी होती!! या पार्श्वभूमीवर, रेशन
कार्डावरील रद्द केलेली नोंदणी आणि त्या कामातली दिरंगाई, डोळ्यात भरणारी
होती. त्यामानाने बँकेची कार्ड्स आणि ड्रायव्हींग लायसन्सची कामे झटक्यात
झाली आणि मी आता भारतात कायमचा रहिवासी म्हणून जगायला मोकळा झालो.
खरतर दक्षिण आफ्रिका म्हणजे आफ्रिका खंडातील युरोप असे सहज म्हणता येईल.
लांब,रुंद विना खड्ड्याचे रस्ते, थंड हवामान, Infrastructure Development
म्हणजे काय, याचा उत्तम नमुना म्हणून साऊथ आफ्रिकेकडे बघता येईल. रस्ते
इतके अप्रतिम आहेत की, मी राहत्या कॉम्प्लेक्समध्ये देखील ४० च्या स्पीडने
गाडी चालवू शकत होतो आणि पोटातले पाणी देखील हलणार नाही, याची दक्षता,हे
रस्ते कायम घ्यायचे!! जो प्रिटोरियमध्ये राहात असताना, बरेचवेळा मित्रांना
भेटायला म्हणून पीटरमेरिट्झबर्ग किंवा डर्बन इथे जात असे. अंतर जवळपास ६००
कि,मी. होते पण मला कधीही ७ तासाहून अधिक वेळ लागला नाही!! तोच प्रकार इतर
अनेक बाबतीत, मला इथे परत आयुष्य सुरु करताना खटकला!! प्रश्न पैशाचा नसून,
एकूणच समाजात जी उदासीनता दिसते, त्याबाबतचा आहे. वास्तविक दक्षिण आफ्रिकेत
गेली काही वर्षे कायदा,सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे,
कालानुरूप भ्रष्टाचार देखील वाढीस लागला आहे पण तरीही काही अपवाद
वगळता,त्या देशाला कुणीही उठसूट नावे ठेवत नाही. त्यांचे आपल्या देशावर
प्रचंड प्रेम आहे.
अगदी स्पष्ट बोलायचे झाल्यास, दक्षिण
आफ्रिकेतील डेव्हलपमेंट जी झाली आहे, ती केवळ गोऱ्या लोकांच्या मेहनतीतून.
अर्थात याला काळी आणि भयाण बाजू देखील निश्चितच आहे. वांशिक भेदाचा भयाण
आणि अस्वस्थ करणारा इतिहास याला साक्ष आहे. इथल्या बहुसंख्यांनी अपार भोगले
आहे पण कदाचित म्हणूनच या लोकांचे आपल्या देशावर अपरंपार प्रेम आहे.
मुंबईत परत राहताना,आणखी एक वैगुण्य सतत जाणवत आहे. स्वच्छतेचा अभाव!!
दक्षिण आफ्रिकेत गचाळ वस्त्या अजिबात नाहीत असे म्हणणे निखालस खोटे ठरेल
परंतु राज्यकर्त्यांनी अशा वस्त्या खुंबीने दडवल्या आहेत, अंतरंगात
शिरल्याशिवाय कळणार नाही. फरक आहे तो अफाट वाढलेल्या शहरांतील
स्वच्छतेबाबत. आपले शहर, आपण राहतो ती जागा, स्वच्छ ठेवण्याबाबत दक्षता
आढळते. कुठेही "शहर स्वच्छ ठेवा" असल्या पाट्या नाहीत की टीव्हीवरून घोषणा
नाहीत!! मुंबईत आता तर जवळपास प्रत्येक स्टेशनच्या आसपास गलिच्छ
झोपड्यांच्या वस्त्या दिसतात.
इथे केवळ टीकाच करण्याचा उद्देश
नाही पण तुलना करताना, या बाबी आठवतातच. मुंबईत परतल्यावर एक मुद्दा
विशेषत्वाने लक्षात आला मुंबईत केवळ मीच नव्हे तर माझी बायको देखील
संध्याकाळी विनात्रास फिरू शकते. याच जोडीने विचार केल्यास, संध्याकाळी
एकदा ऑफिसेस बंद झाली की जोहान्सबर्गच्या रस्त्यावरून हिंडण्यासारखा धोका
दुसरा नाही. हाच प्रकार इतर शहरांतून जवळपास असाच आढळतो. दुसरा विशेष
जाणवला, आपण विकत घेतो, त्या मालाचा दर्जा!! कुठेही घासाघीस नाही, दर्जात
तडजोड नाही. दुर्दैवाने मुंबईत देखील याबाबत अपवादस्वरूप मॉल्स वगळता,
मालाच्या दर्जाबाबत खात्री देता येत नव्हती. सुदैवाने आता परिस्थिती बरीच
सुधारली आहे, असे म्हणायला वाव आहे!!
मी २०११ साली परतलो, तो
पावसाळी हंगाम सुरु होण्याच्या वेळी. नेहमीप्रमाणे मुंबईत पाणी तुंबणे,
गाड्या रखडणे अव्याहतपणे चालूच होते. दक्षिण आफ्रिकेत भारताइतका पाऊस पडत
नाही पण तरीही पाण्याचा वेळीच निचरा होणे, तसेच गाड्यांचा प्रवास
अव्याहतपणे चालूच राहणे, याबाबत विशेष दक्षता घेतली जाते. गाड्या भयानक
वेगाने धावत असतात,त्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय असते.
अपघात झाल्यावर, वाहतूक बिघडू नये म्हणून जी व्यवस्था आहे, ती कौतुकास्पद
आहे आणि याबाबत आपल्याकडे अजूनही अनास्था आहे. आपल्याकडे लोकसंख्येचा खरा
प्रश्न आहे आणि त्यातूनच बरेचसे प्रश्न निर्माण झाले आहेत.
दक्षिण आफ्रिकेची लोकसंख्या जवळपास ५ ते ६ कोटी इतकीच आहे आणि भौगोलिक आकार
बघायला गेल्यास, कन्याकुमारी पासून मध्यप्रदेश इतका विस्तारलेला आहे.
अर्थात याचा फायदा या देशाला मिळतो. त्यातून हवामान थंड असल्याने शक्यतो
धुळीचा संसर्ग नसतो. एकदा असाच मुंबईत - गिरगावात निवांत हिंडत होतो. अचानक
रस्त्यावरील वाहतूक थांबली. पुढे लक्षात आले, रस्त्यावर गाईने रस्ता
अडवला होता!! आजही आपल्याकडे याबाबत कुणालाच काहीही क्षिती नसते!! जणू
काही हे असेच चालणार आणि हे गृहीतच धरून चालायचे. मध्यंतरी मी राजस्थानला
गेलो असता, जयपूर शहराला जोडणाऱ्या महामार्गावर निवांतपणे गाई हिंडत
होत्या!! जणू काही या गाई म्हणजे Road Traffic Officers!! दक्षिण आफ्रिकेत,
फ्रीवे तर सोडाच पण अंतर्गत रस्त्यावर देखील माणसे, रस्ता, आपल्या बापाचा
असल्याप्रमाणे ओलांडत नाहीत. तसाच उद्मेखून मांडण्यासारखा मुद्दा म्हणजे
सार्वजनिक शौचालये!! केवळ फ्रीवे वरील शौचालये नसून, शहराच्या अंतर्गत
भागातील सार्वजनिक शौचालये लखलखीत असायची - एक मुद्दा, हे सगळे वर्णन २०११
पर्यंतचे आहे. आता एकूणच ६ वर्षे झाली आहेत, आज काय परिस्थिती आहे, याची
कल्पना नाही!! मुंबईतील सार्वजनिक शौचालयांबाबत अपवादस्वरूप वगळता काही
लिहिण्यासारखे नाही किंवा भरपूर लिहावे लागेल. तसाच प्रकार पिण्याच्या
पाण्याबाबत आणि एकूणच पाणी पुरवठ्याबाबत म्हणावे लागेल. इतकी वर्षे राहिलो,
अनेक शहरांत, गावात देखील नोकरीनिमित्ताने वास्तव्य केले. कुठेही २४ तास
पाण्याचा पुरवठा असतो तसेच मी प्रसंगोत्पात बिस्लेरी पाण्याची बाटली विकत घेतली,
अन्यथा नळाचे पाणी राजरोस पीत होतो.
हाच प्रकार सार्वजनिक
बससेवेबाबत आढळून येतो. एकतर या देशात सार्वजनिक बस सेवा बोकाळलेली नाही.
शहरातील लोकांकडे स्वतःच्या गाड्या असतात परंतु काहीवेळा एका शहरातून
दुसऱ्या शहरात जाण्यासाठी Greyhound, Inter City अशा बस सेवा उपलब्ध असतात.
आपल्याकडील "शिवनेरी" बाबत कितीही अभिमान बाळगला, तरी आपल्याला बरेच
शिकायचे आहे.
आणखी एका अत्यंत महत्वाच्या विषयाला हात घालतो.
ज्या स्थळांना आपण tourist spot समजतो, तिथला गलथानपणा डोळ्यांत भरणारा
आहे. डर्बन आणि केप टाऊन इथले समुद्रकिनारे म्हणजे आनंदनिधाने
आहेत.स्वच्छता
तर आहेच पण ज्या सोयीसुविधा मिळतात, त्यातून आपल्याला खूप शिकण्यासारखे
आहे. मी मुंबईत जिथे राहतो, तिथून प्रसिद्ध मरीन लाईन्सचा किनारा केवळ पायी
५ मिनिटांवर आहे. मी पहाटे उठून तिथे Morning Walk साठी जायला सुरवात
केली. इतका आलिशान परिसर पण, विशेषत: रविवारी पहाटे, किनाऱ्यावर इतका कचरा
पडलेला असतो की काहीही बोलायची सोय नाही. इतका सुरेख परिसर पण प्लास्टिक
कप, प्लास्टिक बॅग्स वाऱ्यावर उधळत असतात!! गंमतीचा भाग म्हणजे आजूबाजूला
कचरा टाकण्यासाठी कुंड्या असतात, पण त्याचा वापर केला जात नाही!! आपल्याला
एक वाईट सवय लागलेली आहे, आपल्यासाठी जे काही करायचे आहे, ते सगळे सरकारने
केले पाहिजे. आपण, स्वतः:हुन कसलीही जबाबदारी उचलायची नाही!! इतकी प्रचंड
उदासीनता, निदान मला तरी दक्षिण आफ्रिकेत आढळली नाही.
आता इतकी
वर्षे परदेशात घालवल्यामुळे काही त्रुटी आपल्या देशांतील जाणवल्या, आणि
त्या त्रयस्थपणे मांडायचा प्रयत्न केला. अर्थात माझ्यावर जो जीवघेणा हल्ला
झाला, त्याबाबत पूर्वीही आणि आजही अशीच भावना आहे, समजा असा हल्ला मुंबईत
झाला असता तर मी मुंबईला शिव्या दिल्या असत्या का? तेंव्हा त्या हल्ल्याची
कडवट आठवण कायमची ठेऊन देखील, या देशाने मला खूप शिकवले. मुख्य म्हणजे
जगाकडे निकोप दृष्टीने बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला, सर्वात महत्वाचा फायदा
म्हणजे पाश्चात्य संगीताची खास गोडी लावली. दक्षिण आफ्रिकेत सगळेच सुंदर
आहे, असे म्हणणे म्हणजे माझ्याशीच प्रतारणा करण्यासारखे आहे. पण थोडा
त्रयस्थ विचार केला तर जगातील कुठलाच देश "नंदनवन" म्हणून गणला जाणे अशक्य.
प्रत्येक देशाचे स्वतः:चे असे जगड्व्याळ प्रश्न असतातच. जसे दक्षिण
आफ्रिकेत, आर्थिक विषमता भयाण आहे. टीव्हीवर दिसणारी दक्षिण आफ्रिका आणि
प्रत्यक्षातील दक्षिण आफ्रिका, यात फार फरक आहे. Standerton इथे नोकरी
करताना, मला देशाच्या, खऱ्या अर्थाने अंतरंगात शिरण्याची संधी मिळाली आणि
त्यानिमित्ताने इथल्या समाजाचे भीषण वास्तव समजून घेता आले!! तसेच हळूहळू
का होईना पण लग्नसंस्था आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस यायला लागली आहे. या
सगळ्यांचा, तिथल्या व्यक्तींवर झालेला अटळ परिणाम देखील बघायला मिळाला.
तसेच समाजातील लैंगिक संबंध देखील जवळून बघता आले. मुंबईत देखील अशा
अतर्क्य वास्तवाची लागण लागायला सुरवात झाली आहे पण अजून तरी प्रमाण तसे
नगण्यच आहे. मी मुंबईला परत
तर येणारच होतो, ही भावना मुंबईबद्दलची कृतज्ञता भावना तर नक्कीच
आहे.
No comments:
Post a Comment