प्रसिद्ध कविवर्य कै. बा.भ. बोरकरांची " जपानी रमलाची रात्र " ही कविता, मराठीतील एक अद्वितीय कविता मानली जाते. भोगवादी शृंगारावरील मनोज्ञ चित्रण या कवितेत वाचायला मिळते.
" नखें लाखिया, दांत मोतिया, वैदूरयी नेत्र,
अवयव गमलें चपल चिवट कीं मयवनींचे वेत्र;
कात सोडिल्या नागिणींचे तें नवयौवन होतें,
विळख्याविळख्यातुनी आलापित ज्वालांची गीतें "
बोरकरांच्या एकूणच स्वभावधर्मानुसार सौंदर्यलोलुप वृत्तीतून लिहिली गेलेली ही कविता. म्हटले तर उद्दीपित करणारी तरीही संयत मांडणीतून शृंगारसम भावनेची ही कविता आहे. भावकवितेच्या नात्याशी फार जवळचा संबंध राखणारी ही कविता. ही कविता केंव्हाही वाचल्यानंतर मनात मनात एक प्रकारचे धूसर चित्र उभे रहाते. कुठल्याही कलेची अशा प्रकारे इतिश्री होणे, हे एका दृष्टीने यशस्वी होणेच होय.
पुढे १९८१ मध्ये, " उमराव जान " चित्रपट आला, आणि त्यातील " इन आँखो की मस्ती के" ही गझल ऐकली आणि तसेच आव्हानात्मक शृंगाराचे चित्र मनासमोर उभे राहिले. शहरयार या उर्दू भाषेतील प्रख्यात शायरने ही गझल लिहिली आहे. गझलबाबत फार मागे एक सुंदर सूत्रबद्ध वाक्य वाचल्याचे आठवत आहे. भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार म्हणजे गझल. एखाद्या गझलेला मनपसंत दाद द्यावी तशी मला या वाक्याला दाद द्यावीशी वाटली. मुळात गझलेचा आकृतिबंध हा अतिशय घट्ट विणीचा, एकसंध असला तरी देखील एका गझलेत ३,४ कविता असू शकतात ज्यांचा एकमेकांशी आशयाच्या दृष्टीने संबंध असेलच, असं नाही. खालील शब्दरचनेला, गझल हे वृत्त म्हणून वाचायला घेतले तर आपल्याला वरील विवेचनाची प्रचिती येईल. पहिला अंतरा आणि दुसरा अंतरा, यातील आशयात काहीही साधर्म्य नाही आणि तरीही हे दोन्ही अंतरे, स्वतंत्र कविता म्हणून आपण आस्वादू शकतो आणि गझल या वृत्ताची खरी खासियत आहे. एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगांना गझल वृत्तात अंगभूत प्रतिसाद मिळत असतो. गझलचा सांगीतिक दृष्ट्या विचार केल्यास, मानसिक अथवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, अशा प्रकारची आवाहक मागणी असते.
संगीतकार खैय्याम यांच्या सांगीतिक कारकिर्दीतील अजरामर संगीत. चित्रपटात बहुतांशी गझला आहेत आणि बहुतेक सगळ्या लखनवी ढंगाच्या ठुमरीवर आधारित आहेत. प्रस्तुत रचना, भूप रागावर आहे. वास्तविक पहाता, भूप रागाचे, संस्कृत ग्रंथातील वर्णन हे मांगल्यमय असे दिले आहे. त्या वर्णनाशी ताडून बघता, अशी श्रुंगारमय रचना भूप रागात तशी अपवादानेच सापडते आणि अशी " तर्ज " शोधून काढल्याचे संपूर्ण श्रेय हे, संगीतकार खैय्याम यांचेच म्हणावे लागेल. रचनेत भूप रागाची सावली आहे पण थोडे बारकाईने बघितले तर रागाचा तिरोभाव दृष्टीस पडतो. खरतर नृत्यगीत असून देखील, या मुजरा नृत्यात एल आदबशीर शृंगारच अवतरलेला आहे आणि एकूणच गझलच्या मूळ प्रकृतीला नेमके साजेसेच असे झाले आहे. छेडण्याचा तसेच गजांनी ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा या रचनेत आवाहक वापर आहे आणि असे आवाहनच गाण्याच्या प्रकृतीच्या नजरेतून बघितल्यास, गाण्याचा मूळ हेतू तडीस गेल्याचे समजून घेता येते.
" इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारो हैं
इन आँखो से वाबस्ता अफसाने हजारो हैं
गाण्याची सुरवात, कुठल्याही वाद्याचे सूचन न होता, थेट होते. " इन आँखो की मस्ती के " ही गाऊन संपते आणि एक छोटासा आलाप घेतला जातो. भूप रागाची ओळख इथे होते. " सा रे ग प" या सुरांतून भूप नजरेसमोर येतो. आलापानांतर संपूर्ण ओळ गायली आहे. गाताना, एक बाब लगेच स्पष्ट होते, गायनातून निर्माण होणारे आव्हानात्मक आर्जव आणि सूचक शृंगाराची जाणीव. खरेतर सगळ्या रचनेतून हाच भाव दृग्गोचर होतो. संयत शृंगाराचा आदिनमुना संगीतकार खैय्याम आणि आशाबाई यांनी सादर केला आहे. गाण्यात कुठेही औषधाला देखील उठवलं वृत्ती प्रतीत होत नाही, बहुदा कारण असे असावे, संपूर्ण चित्रपट हा सरंजामी संस्कृती आणि विलासी वृत्तीवर आधारित असल्याने, तसे भाव निर्माण होण्याला फारसा वाव नव्हता. गायनात खानदानी वृत्ती दिसून येते. " इन आँखो की मस्ती के " गाताना " मस्ती " शब्द कसा गायला गेला आहे, हे ऐकण्यासारखेच आहे. " आँखो की मस्ती" यात एक खट्याळपणा दडलेला आहे आणि आवाहन देखील आहे. हे सगळे आशाबाईंनी सुरांतून फारच सुरेख दर्शविले आहे. आशाबाईंच्या गायनाला बरेचवेळा " शब्दभोगी " गायकी म्हणतात आणि तसे शब्दांचे अलौकिक " भोगणे " अशा गायकीतून प्रतीत होते. गझल रचनेत नेहमीच शेराच्या दुसऱ्या ओळीला कमालीचे महत्व असते. पहिल्या ओळीतून कल्पनेची मांडणी केली जाते आणि दुसऱ्या ओळीत त्या कल्पनेचा प्रभावी समारोप केलेला असतो. गझल गाताना देखील त्याच पद्धतीने दुसरी ओळ गायली जाणे अध्याहृत असते. दुसऱ्या ओळीत " वाबस्ता " हा उर्दू शब्द योजला आहे - याचा नेमका अर्थ - जोडलेले नाते किंवा नातेसंबंध. आता दोन्ही ओळींचा अर्थ आणि त्याची व्याप्ती ध्यानात येऊ शकते आणि संगीतकाराने, हाआशय स्वररचनेतून मांडलेला आहे.
इथेच सारंगीचे स्वर ओघळतात आणि चाल आपली मनाची पकड घेते. सारंगी वाद्याचे सवर्च असे असतात, वाजता क्षणीच तुमचे लक्ष वेधून घेतात. वास्तविक इथे सारंगीच्या जोडीने सतारीचे सूर देखील ऐकायला येतात पण इथे सतार झमझमत नसून सारंगीच्या सुरांना पूरक अशीच वाजली आहे आणि सतारीचे सूर संपत असताना परत सारंगीचे सूर ऐकायला येतात आणि त्याच सुरांत पहिला अंतरा सुरु होतो.
इक तुम ही नहीं तन्हा, उल्फत में मेरी रुसवा
इस शहर में तुम जैसे, दीवाने हजारो हैं
इन आँखो की मस्ती के
गझल वृत्ताचे जेंव्हा संगीतात रूपांतर होते, तेंव्हा बरेचवेळा मुखड्याची चाल आणि अंतऱ्याची चाल, यात फरक केला जातो. वेगळ्या शब्दात, अंतरा बांधताना स्वररचना वेगळ्या स्वरूपात बांधली जाते/जाऊ शकते. या मागे विचार असा दिसतो, काव्य म्हणून प्रत्येक कडवे ही जर स्वतंत्र कविता असेल तर प्रत्येक अंतरा वेगळ्या सुरांत का गायला जाऊ नये? प्रश्नात तथ्य जरूर आहे पण हा भाग संपूर्णपणे संगीतकाराच्या अखत्यारीत येतो आणि त्याचा संगीताचा अभ्यास किती खोलवर आहे, त्यावर अवलंबून असते. या रचनेतील अंतरा देखील वेगळ्या चालीत बांधलेला आहे. रचना भूप रागापासून दूर सरकल्याचे लक्षण. गंमत अशी आहे, " इस शहर में तुम जैसे, दिवाने हजारो हैं " ही ओळ परत मुखड्याकडे वाळवून घेतली आहे आणि भारतीय संगीत परंपरेनुसार समेची मात्रा अचूक घेतलेली आहे. गझल गाताना, त्यात स्वरोच्चारित ठसका आणि नखरा याचे अप्रतिम प्रमाण असते आणि तसा नखरा, आशाबाईंनी आपल्या गायनातून सादर केला आहे. वरती मी आशाबाईंची " भोगवादी " गायकी असे वर्णन केले आहे, त्याला पूरक असे गायन, हीच ओळ ऐकताना मिळते. " इस शहर में " गाताना, " इस " शब्दावर नेमका जोर देऊन, त्या शब्दाचा अर्थ आणि त्याचे या ओळीतील वजन, सगळे एकत्रितपणे दर्शवून दिले आहे.
इक सिर्फ हमी मय को, आँखो से पिलाते हैं
कहने को तो दुनिया में, मयखाने हजारो हैं
इन आँखो की मस्ती के
या अंतऱ्याच्या आधीच वाद्यमेळ जवळपास पाहिल्याप्रमाणेच आहे. सतार अतिशय मंद स्वरांत ठेवली आहे आणि त्यालाच जोडून सारंगी घेतली आहे. सारंगी या वाद्याचा गुणधर्म नेमका ओळखून, त्याला साजेशी अशीच स्वररचना इथे प्रदान केली आहे. कोठीवरील गाण्यात, सारंगी वाद्याने नेहमीच महत्वाची भूमिका घेतलेली आहे आणि परिणामी, गझल गायनात सारंगीचे स्थान जवळपास अढळ स्वरूपाचे झाले. मानसिक चलनवलनाच्या गुंतागुंतींशी सारंगी वाद्य फार परिणामकारक साम्य दाखवते. हा या वाद्याच्या स्वनरंगाचा अप्रतिम गुण आहे. ही रचना, शायरी म्हणून वाचताना, या अंतऱ्याच्या दोन ओळी लक्षणीयरीत्या प्रत्ययकारी ठरल्या आहेत. खरतर गझल म्हटली की बरेचवेळा उच्च दर्जाच्या उर्दू शब्दांची फवारणी वाचायला मिळते आणि त्यातच बहुतांशीवेळा आशय गुदमरून जाण्याची शक्यता असते. इथे मात्र तासाला प्रकार दिसत नाही. असे देखील असू शकेल,प्रस्तुत रचना ही जरी गझल वृत्तात लिहिली असली तरी मुलत: चित्रपटासाठी लिहायची असल्याकारणाने, शक्यतो प्रचलित उर्दू मिश्रित हिंदी भाषेत लिहिली गेली असावी.
इस शम्म-ऐ-फरोजा को, आँधी से डरातें हो
इस शम्म-ऐ-फरोजा के, परवाने हजारो हैं
इन आँखो की मस्ती के
इथे " फरोजा " हा उर्दू/अरेबिक शब्द योजलेला आहे - अतिशय मौल्यवान रत्न अशा अर्थाने योजलेला आहे. उर्दू भाषेत आणखी एक खासियत आढळते, जसे इथे " शमीम-ऐ-फरोजा " शब्दरचना वाचायला मिळते. अशा प्रकारे संपूर्ण शब्द विघटित केल्याने, आशयाची अभिवृद्धी सहज आणि संपूर्णपणे ध्यानात येऊ शकते आणि गझल ही बहुतेकवेळा गायली जात असल्याने, लयीचा अंदाज आणि गायकी (एखादी हरकत किंवा मुरकी किंवा खटका घेण्यासाठी) साठी याचा सुरेख उपयोग केला जातो. अशा शब्दरचनेमुळे काव्याला सौंदर्य मिळते, हा मुद्दा आणखी वेगळाच!! आशाबाईंनी, संपूर्ण रचना गाताना,, अंतऱ्यातील पहिली ओळ गाताना दोन भागात गायली आहे आणि तसे करताना,तिथे प्रत्येकवेळेस एखादी हरकत/आलाप घेऊन, केवळ गायकीचा दाखवली नसून, त्या ओळीतील अर्थ नेमका दर्शविला आहे जसे इथे, " इस शम्म-ऐ-फरोजा " नंतर छोटासा आलाप घेतला आहे.
आशाबाईंना कोणालाही हेवा वाटावा असा लाभला आहे. चैतन्यपूर्ण, कंपविहीन असूनदेखील भावपूर्ण, कुठेही घसरू न देता द्रुत लयीत फिरणारा, खालच्या आणि वरच्या तारतांवर सहज आविष्कारपूर्ण विहार करणारा आणि भरीव असून जणांनी सौंदर्याने तसेच लालित्याने युक्त असा आहे. आपली ताकद लपवू शकणारा आवाज, भावुक न होता सूचन करण्याची अफाट क्षमता व शब्दांच्या अर्थापलीकडे त्यांच्या आशयापर्यंत नेऊ शकणार लगाव - या आणि यासारख्या इतर गुणांचे भांडवल गझल गायनासाठी लागते आणि ते आशाबाईंकडे भरपूर आहे. यामुळे गाताना आवाजात अनेकवेळा अनपेक्षितरित्या उतार-चढाव दाखविता येणे सहजशक्य झाले आणि परिणामी ललित गायन अधिक समृद्ध, श्रीमंत झाले. नेहमी (जरूर नसताना) निकष म्हणून चित्रपटसंगीताभोवतो तरंगणाऱ्या गोष्टीकडे वळायचे तर, शास्त्रोक्त संगीताबाबत मत मांडायचे झाल्यास, रूढ आणि नियमबद्ध रूपापासून सरकून अर्थपूर्ण बदल घडवून रागात नवीन प्रयोग करण्यात यश मिळाले आहे नाही, हा प्रश्न विचारता येऊ शकतो. प्रस्तुत रचनेच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास ,भूप रागाच्या तिरोभावातून स्वररचना उभी राहात असताना, त्या रचनेचे बंदिशीत किंवा ठुमरीत साच्यात गायन न करता,गीतधर्मी गायन करीत, सुंदर गीत आपल्या समोर ठेवणे, हेच खरे त्यांच्या गायनाचे खरे यश म्हणायला हवे. mano
नैसर्गिक सौंदर्य आणि संवादी मनोभाव रचनाकाराने केरवा या तालातल्या डौलदार रचनेत आणला आहे. संयत गायन आणि मोजका वाद्यमेळ वापरून रचनासंबद्ध निश्चिततेने ही कामगिरी पेलणे सर्वांना जमते असे नाही. खैय्याम यांना ते जमले आहे याचा सहज प्रत्यय हेच त्यांचे यश मानता येईल.
No comments:
Post a Comment