Saturday, 20 May 2017

मेघा बरसने लगा है आज की रात

"अंधार असा घनभारी चंद्रातून चंद्र बुडाले,
स्मरणाचा उत्सव जागून जणू दु:ख घराला आले;
नाहींच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे,
दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे....."

सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांच्या "संध्याकाळच्या कविता" या काव्यसंग्रहातील या सुप्रसिद्ध ओळी. माणसाच्या दु:खाच्या गवाक्षातून लिहिलेल्या कविता. माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारची दु:खे येतात आणि काव्यातून दु:खाला अनेक प्रकारे चिरंतनत्व दिले गेले आहे. ग्रेसच्या कवितेतून हीच भावना/ जाणीव नव्या रचनेतून, घाटातून नव्याने झळाळत प्रगट होते आणि त्याच भावनेचे अलौकिक रूप स्तिमित करून जाते. अशाच प्रकारची परंतु चित्रपट गीताच्या स्वभावगत मर्यादा ध्यानात घेऊन, ज्या कवींनी अथकपणे प्रयत्न केले यात गुलजार यांचे नाव अवश्य घ्यावेच लागेल. चित्रपट गीतांत, मुक्त कवितेप्रमाणे गूढ, अगम्य अशा प्रतिमांना फारसे स्थान नसते, किंबहुना अजिबात नसते आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे चित्रपट गीत हे मुळात, पडद्यावरील पात्राचे अंतर्मुख असे "स्वगत" असते आणि पात्राची मनोभूमिका कधीही गूढ असणे हे जवळपास अशक्य असते. कवी म्हणून गुलजार यांचा विचार करताना, गाण्यात काव्य कसे मिसळावे, याचा सुरेख अनुभव दिला आहे. १९७६ साली आलेल्या "शक" या चित्रपटात असेच दु:खाची अनुभूती देणारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर अतिशय तरल, सुरेख असे गीत लिहिले आहे. एक बाब तर नक्कीच मानावी लागेल, अगदी गालिब सारखा जगद्विख्यात शायर घेतला तरी त्याच्या सगळ्याच रचना असामान्य, अलौकिक अशा नाहीत आणि तशीच सम्यक दृष्टी इतर कवींच्या बाबतीत ठेवावी, असे मला मनापासून वाटते.. गाण्याची शब्दरचना बघितली तर नेहमीच्या पठडीतली रचना नाही, हे सहज उमजून घेता येते. गुलजार यांच्या काही रचना या नेहमीच्या पारंपरिक संकेतांना धुडकावून लिहिलेल्या आढळतात. त्यांच्या दृष्टीने आशय महत्वाचा असून रूढार्थाने त्यासाठी यमकप्रधान रचना लिहिलीच पाहिजे असे बंधन घालून घेतलेले नाही. खरतर काहीशा संवादात्मक पद्धतीने कविता उलगडत गेली आहे. सुरवातीला केवळ पावसाचे वर्णन असावे, अशी कल्पना पहिल्या ओळीवरून होते पण नंतरच्या ओळी वाचत गेलो म्हणजे हळूहळू कविता आत्ममग्नतेकडे झुकल्याचे दिसून येते. सगळी कविता पावसाचेच वर्णन करीत असते पण मध्येच "आज दोनो जहां सुलगने दो" किंवा "कोई रिश्ता कहीं जरूर होगा" या ओळी वाचताना, मानवी नातेसंबंधांची चुणूक मिळते आणि मग सगळीच कविता आपला पोत बदलते. पडद्यावरील पात्राचे आत्ममग्न वावरणे अधिक अंतर्मुख होते आणि मग सगळीच कविता आपल्याला देखील अधिक खोलवर जाणवते.अशी शाब्दिक किमया घडवण्याची ताकद, चित्रपट गीतांमध्ये विरळाच बघायला मिळते.
आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, सुरवातीलाच संथपणे गिटारचे सूर ऐकायला मिळतात आणि त्यातूनच गाण्याच्या स्वरिक लयीचे सूचन मिळते. "मेघा बरसने लगा है आज की रात" ही ओळ ऐकता,ऐकताच आपल्याला मेघ रागाची ओळख पटते. वास्तविक, मेघ राग म्हणजे म्हणजे मेघ मल्हार कुटुंबातील राग पण तरीही थोडा फटकून राहणारा!! गाण्याच्या सुरवातीलाच "कोमल निषाद" ज्या "वजनाने" वाजतो, तिथेच या रागाची खूण पटते. आशाबाईंच्या अगदी खालच्या सुरांत गाण्याची सुरवात होते आणि गाण्याचा "मूड" कळून येतो. थोड्या आळवणीच्या स्वरूपात गाणे सुरु होते, काहीसे संवादी स्वरूप म्हणता येईल. याच अनुरोधाने "मेघा बरसने लगा है, आज की रात" ओळ म्हटली आहे. आशाबाईंनी गाताना आवाज अतिशय लवचिक असा लावलेला आहे, त्यात पावसाची आळवणी केली आहे. याच अनुरोधाने या ओळीतील हरकती घेतल्या आहेत. हीच ओळ पुन्हा घेताना, स्वर किंचित वर गेला आहे पण तो ठेहराव किंचित क्षणापुरता असून लगेच मूळ स्वरावलीकडे ज्याप्रकारे आशाबाईंचे "उतरणे" आहे, ते ऐकणे हा अनिर्वचनीय अनुभव आहे आणि इथेच गाण्याची चाल, आपल्या मनाची पकड घेते.
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ, सारंगीच्या सुरांनी भारलेला आहे. "(कोमल) नि, सा, रे, (तीव्र) म, रे" या स्वरसंगतीने सारंगीचे स्वर अधिक खोलवर मनात राहतात. खरतर सगळे गाणे हे एकाच लयीत, संथपणे चालत आहे. कुठेही, उगीच वरच्या स्वरांत जाऊन "गायकी" दाखवणे, असला प्रकार नाही. शक्यतो मंद्र अथवा मध्य सप्तकातच गाण्याची चाल आणि गायन चाललेले आहे.     

पत्ते पत्ते पर बुंदे बरसेंगी
डाली डाली पे झुमेगा सावन
प्यासे होटों को चुमेगी बारीश
आज आँखो में फुलेगा सावन
धुआ धुआ सा हो रहा है जहां
आज दोनों जहां सुलगने दो
मेघा बरसने लगा है आज की

या पहिल्या अंतऱ्याची सुरवात इतक्या वेगळ्या सुरांवर होते की क्षणभर मनात संभ्रम निर्माण होतो, मुखडा कुठल्या चाळीत बांधला आहे आणि अंतरा कुठे सुरु होत आहे!! कविता म्हणून वाचताना पावसाशी चाललेला संवाद वाचत असताना, एकदम "आज दोनो जहां सुलगने दो " सारख्या ओळीतून भावनांचे वेगळे सूचना देणाऱ्या गुलजारच्या शब्दांना त्याच तोलामोलाच्या स्वरावलीने कोंदण देणे क्रमप्राप्तच ठरते. संगीतकार म्हणून वसंत देसाई, काय दर्जाचे होते, याची चुणूक दाखवणारी ही या अंतऱ्याची स्वरिक बांधणी आहे. वर दिलेल्या ओळीवरून पुन्हा जेंव्हा मूळ चालीशी सम गाठली जाते, हा सगळा बौद्धिक व्यामिश्रतेचा असामान्य अनुभव आहे. वसंत देसाई आणि आशा भोसले, यांच्या सांगीतिक ताकदीचा अप्रतिम नमुना म्हणता येईल. तार स्वरांत "धुआ धुआ सा हो रहा है जहां" गायले आहे पण तिथूनच हळूहळू पायऱ्या उतरत शमीची मात्रा गाठली जाते आणि त्यावेळी ती सगळीच चाल आपल्या मनात झिरपायला लागते. कुठलीही चाल मनात झिरपत जाणे, यासारखे दुसरे यश, एका संगीतकाराच्या दृष्टीने नाही.
वरील अंतरा संपवताना चाल पुन्हा तयार स्वरांत जाऊन पोहोचते जी परत संपूर्ण वेगळ्या सुरांत!! लय संगीतकाराच्या अंगी भिनलेली असेल तर तोच संगीतकार, स्वरिक लयीला कशाप्रकारे खेळवू शकतो, याचे हे सुंदर उदाहरण म्हणता येईल. "मेघा बरसने लगा है आज की रात" ही ओळ इथे परत घेताना, व्हायलिनचे स्वर किंचित वरच्या सुरांकडे झुकवून घेतले आहेत आणि मग हीच ओळ त्या सुरांच्या अनुषंगाने वरचे स्वर गाठायला लागते . हा प्रवास अतिशय देखणा आहे!! 
दुसरा अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ, आशाबाईंनी सोडलेल्या सुरांना जुळवूनच आपली करामत दाखवत आहे.जिथे आशाबाईंनी गायन थांबवले आहे तो सूर आणि वाद्यमेळाचा सुर याची बांधणी फार वेधक पद्धतीने केली आहे. लयीचे सूर बदलले आहेत पण म्हणून गाण्याचा स्वतःचा म्हणून जो अंगीभूत स्वभाव असतो त्याच्याशी तादात्म्य पावूनच सूर मिसळले आहेत.

आज चाहे कहीं भी ये पानी
चाहे कितना भी मुझसे दूर होगा
मेरे घर पे बरसती बदली से
कोई रिश्ता कहीं जरूर होगा
मोती मोती बिखर रहा है गगन
पानी पानी है सब पिघलने दो
मेघा बरसने लगा है आज की रात"

दुसरा अंतरा मात्र पहिल्याच्याच अंगाने बांधलेला आहे. तशीच स्वरांची वळणे घेतली आहेत, हरकती देखील त्याच अंगाने घेतलेल्या आहेत. अर्थात त्यामुळे सगळी चाल आपल्या जवळची होते. आता हरकतीच्या अंगाने लिहायचं झाल्यास, या हरकती अतिशय कठीण आहेत, ऐकायला सहज वाटतात, लांबीने देखील फार दीर्घ स्वरूपाच्या नाहीत पण त्यामुळेच ऐकताना फार फसगत होते. एकवेळ दीर्घ लांबीच्या हरकती घेणे तसे सोपे असते परंतु छोट्याशा हरकती घेणे, हे नेहमीच गायकाच्या गळ्याची परीक्षा घेणाऱ्या असतात.
संगीतकार म्हणून वसंत देसायांचे मूल्यमापन वेगवेगख्या स्तरांवर करावे लागेल. वसंत देसायांच्या रचनेत मराठी नाट्यगीतांचा गंध दरवळत असे आणि याचे  कारण,त्यांचा रंगभूमीशी असलेला दीर्घकालीन संबंध असावा.याचा परिणाम असा  झाला,त्यांच्या एकूणच सांगीतिक कारकिर्दीत दोन समांतर रेषा स्पष्टपणे दिसतात.व्ही. शांतारामसारख्या चित्रपटात चाली बांधण्याची एक शैली दिसते  तर बाहेर इतर चित्रपटांचे संगीत देताना वेगळी शैली स्पष्टपणे ओळखता येते. गाण्याची चाल शक्यतो रागाधारित असावी पण गाण्यातून आपल्याला रागाचे स्वरूप दाखवायचे  नसून,गाण्यासाठी रागाच्या चलनाचा यथायोग्य उपयोग करून घ्यायचं आहे, अशीच धारणा त्यांच्या रचनेतून समजून घेता येते. प्रसंगी प्रसिद्ध शास्त्रोक्त चीजेवर आधारित रचना करताना देखील गीतस्वरूप कायम राखण्यासाठी प्रचलित ताल  बदलून,दुसऱ्या वेगळ्याच तालात आणि लयीचे वेगवेगळे बंध स्वीकारून, गाण्याचे गीत बनविल्याचे आढळून येते. तसेच काही ठिकाणी पारंपरिक लोकगीत प्रकाराच्या धर्तीवर त्यांनी गाणी बनवताना, त्या रचनांना केवळ गीतांचे स्वरूप न देता केवळ चालीचं ठेवण्यात, परंपरेत राहून रचनापद्धतीत बदल करण्याचा अवलंब केला आहे. यातून एक बाब अधिक स्पष्टपणे मांडता येते, वसंत देसायांनी भारतीय संगीत परंपरेचा भरपूर व्यासंग केला होता आणि वेळीप्रसंगी त्याचा यथायोग्य उपयोगकरून, आपले सांगीतिक विश्व अधिक भरीव केले. मी वर जसे म्हटले होते, राजकमलसाठी केलेल्या रचनांपेक्षा अधिक वेगळ्या आणि प्रसंगी संपूर्ण वेगळ्या धाटणीच्या रचना सादर करून, आपल्या सर्जनशीलतेला व्यापक रूप दिले होते.  

आता गायिका म्हणून आशाबाईंनी हे गाणे १९७६ साली गायले. तोपर्यंत एक गायिका म्हणून त्यांनी आपला अधिकार चित्रपटसृष्टीत सिद्ध केला होता. तेंव्हा गायिका म्हणून विचार करता, त्यांनी काही गीतप्रकारांच्या सीमारेषा विस्तारल्या. कंठसंगीतातील ध्वनिपरिणामांच्या शब्दावलींत भर टाकून, त्यांनी चित्रपटीय आणि सांगीत शक्यतांची नवी एकत्रीकरण करण्यात असामान्य यश मिळविले. खरतर प्रस्तुत गाण्यात कुठेही नाट्यात्म रंग भरण्याची गरज नव्हती आणि तशी आशाबाईंनी केली देखील नाही पण अशा प्रकारच्या रचना गाताना, गायिका म्हणून त्यांनी हरकतीचा स्वरूप छोट्या स्वराकृतींनी सजवले आणि गाण्यात वेगळाच रंग भरला. ही रचना सुरेलपणे, गुंतागुंतीच्या तरीही संथगती ताना विलक्षण सफाईने घेण्याच्या त्यांच्या क्षमतेचे प्रत्ययकारक उदाहरण म्हणून नक्कीच म्हणता येईल. उलट्या शब्दात सांगायचे झाल्यास, हीच रचना दुसऱ्या कुणी गायली असती तर याच हरकती घेताना हरकतींत घुसमटल्यासारखी रचना वाटली असती, हे नि:संशयपणे मान्यच करावे लागेल. एखाद्या रचनेवर अशा प्रकारे आपली मुद्रा निर्माण करून ठेवावी, हे सर्जनशीलतेचे अप्रतिम उदाहरण म्हणावेच लागेल.





No comments:

Post a Comment