खरंतर कथा नेहमीचीच - नायक आणि नायिका एकत्र भेटतात, काही भेटीनंतर प्रेम जमते. पुढे उच्च शिक्षणासाठी नायकाने गाव सोडणे आणि नायिकेची मानसिक कुचंबणा व पुढे फरफट होणे!! याची अखेर, नायिका कोठीवरील गायिका होणे आणि अचानक नायक गावात येणे आणि भेट होणे!! नायकाला पश्चात्ताप होणे आणि पुढे नायिकेच्या मुलीची काळजी घेणे!! अत्यंत सरधोपटपणे लिहिले आहे पण अशा प्रकारचे कथानक, हिंदी चित्रपटाला नवीन नाही.
हिंदी चित्रपटात एकूणच प्रणयी प्रसंग बहुतांशी एकसाचीच असतात. त्यामुळे कथा कितीही सक्षम असली, अभिनेते कितीही नावाजलेले असले तरी प्रसंगात तोचतोचपणा बराच असतो, प्रसंगी बेचव देखील होतात. अर्थात, घाऊक उत्पादन झाले म्हणजे मग दर्जाच्या प्रतवारीत घसरण क्रमप्राप्तच होते. असे असले तरीही काही चित्रपट आणि काही प्रसंग मात्र आपल्या मनात कायमचे घर करून राहतात, त्यातील तजेला कायम ताजाच राहतो. १९६६ साली आलेल्या " ममता " चित्रपटाने घातलेली भुरळ, आजही मनावरून उतरत नाही.
पुढे कधीतरी वाचनात कविवर्य सुरेश भट यांच्या एका अजरामर कवितेतल्या या ओळी येतात. ही कविता जेंव्हा मी वाचली तेंव्हा मला कुठेतरी या ओळींशी नाते सांगणाऱ्या ओळींची आठवण यायला लागली.
" मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल !
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल !
मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुंद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल ! "
सुरेश भटांची कविता ही बरेचवेळा गझल वृत्ताशी नाते सांगणारी असते, जरी कविता गझल वृत्तात नसली तरी!! शेवटच्या ओळीत नवीन, चमकदार कल्पना आणायची आणि वाचकाला काहीसे स्तिमित करायचे, हा त्यांच्या कवितेचा खास भाग मला भावतो. अर्थात प्रत्येक कविता असा खेळ यशस्वी होत नाही पण जिथे खेळ जमतो, तिथे मात्र वाचक काहीसा चक्रावून जातो. वरील ओळी वाचताना, मला याच्याशी नाते सांगणाऱ्या ओळी, "ममता" चित्रपटातील " छुपा लो यूं दिल में प्यार मेरा " या गाण्यातील कविता वाचताना सापडल्या. एक मुद्दा, कुठल्याही कलाकृतीची अशी समांतर तुलना करण्यात फारसे हशील नसते कारण त्यातून फारसे काही हाती लागत नाही, बरेचवेळा केवळ शब्दच्छल होतो. परंतु एका कलाकृतीवरून दुसऱ्या कलाकृतीची आठवण होणे, सहजशक्य असते.
उर्दू साहित्यात मजरुह सुलतानपुरी यांचे नाव फार सन्मानाने घेतले जाते तसेच चित्रपटात गाणी लिहिणाऱ्या शायरांपैकी एक महत्वाचे नाव म्हणून नेहमी उल्लेख केला जातो. ममता चित्रपटातील सगळीच गाणी श्रवणीय आहेत आणि कविता म्हणून वाचताना, सुंदर वाचनानंद मिळतो. " छुपा लो यूं दिल में प्यार मेरा " हे गाणे चित्रपटात, नायकाच्या आयुष्यातील एका अत्यंत विकल संध्याकाळी, मानसिक दृष्ट्या कोलमडून गेल्यावर, झालेल्या उपरतीच्या क्षणाभोवती येते.
संगीतकार रोशन यांची बहुतांश गाणी अतिशय संथ, शांत प्रवृत्तीची असतात. त्याचा परिणाम, गाण्यातील मर्यादित स्तरावर वाजणारा वाद्यवृंद तसेच सगळे गायन देखील अतिशय संयत वृत्तीतून उमलत जातात. वाद्यमेळ बहुदा, सारंगी,बांसुरी, इत्यादी शक्यतो पारंपरिक भारतीय वाद्यांवर अधिक भर देत सजवलेला दिसतो. या गाण्याच्या संदर्भात विचार करता, प्रत्येक भाषिक वाक्यानंतर बांसुरी आपल्या छोट्या, खेचक व दर्दभरल्या सुरावटींच्या पाउलखुणा सोडीत गीताचा दरवळ वाढवते. चालीचे स्वरूप, बांसुरीस दिलेला वाव आणि तिचा स्वनरंग, यांमुळे बांसुरी संगीताचे नक्षीकामात रुपांतर होण्याचा धोका भरपूर होता परंतु संगीतकार म्हणून तो धोका त्यांनी टाळला!! वाद्याची निवड, हात राखून पण विचक्षण वापर अनोखी विशिष्ट वाद्ये, आणि तरीही आवाहक योजना, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.
या गाण्यात तर वाद्यांचा अतिशय मर्यादित स्तरावर वापर केलेला आहे, इतका की मानवी आवाज, हाच जणू काही वाद्य आहे असे वाटावे. गाण्याची सुरवात, थेट हेमंत कुमारांच्या स्वरांत होते. मुळातला धीरगंभीर आवाज, अत्यंत अशा प्रकारची शांत चाल, त्यामुळे गाण्याला सुरवातीलाच गहिरेपण लाभते. यमन रागात सुरावट बांधलेली आहे. मजरुह सुलतानपुरीचे शब्द देखील किती प्रत्ययकारी आहेत.
के जैसे मंदिर में लौ दिये की "
या दोन ओळींनंतर लताबाईंचा स्वर अवतरतो. सुरवातीची संथ आणि शांत चाल, प्रत्येक ओळींगणिक वरच्या सुरांत जाते पण शेवटची ओळ - ' के जैसे मंदिर में लौ दिये की " गाताना, ज्या प्रकारे परत मूळ स्वरांशी येऊन मिळते, हा सगळं सांगीतिक वाक्यांश मुद्दामून परत, परत ऐकण्यासारखा आहे. शब्दांचे औचित्य सांभाळत चालीचे सौंदर्य कसे वाढवत न्यायाचे, याचा हा सुंदर वस्तुपाठ आहे.
तुम अपने चरणों में रख लो मुझको
तुम्हारे चरणों का फुल हैं मैं
मैं सर झुकाये खडी हूं प्रीतम
के जैसे मंदिर में लौ दिये की
आणखी एक वैशिष्ट्य सुरवातीलाच सांगितले पाहिजे, गाण्यात कुठेही रूढ असे तालवाद्य नसून, केवळ झांजेचा हलका आघात, हेच तालवाद्य म्हणून योजलेले आहे. मुळातली अत्यंत हळवी चाल, अशा तालवाद्याने अधिक खुलली आहे." मैं सर झुकाये खडी हूं प्रीतम " ही ओळ दोन वेळा घेतली आहे, पहिल्यांदा किंचित वरच्या सुरांत घेतली आहे पण परत घेताना, मुखड्याच्या चालीशी जुळणारी घेतली आहे. शब्दातील आर्जव आणि मार्दव, सुरांच्या साहाय्याने कसे खुलवता येते, हा खरोखरच विलक्षण अनुभव आहे. रोशन यांच्या संगीताबाबत एक विलक्षण बाब ध्यानात येते, या संगीतकाराने आपल्या कारकिर्दीत युगुलगीते भरपूर बांधली आहेत आणि त्यांनी युगुलगीतांच्या बाबतीत आदिनमुना सादर केला आहे, हे म्हणावयास प्रत्यवाय नसावा.
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ (?) म्हणजे बासुरीची लकेर आहे. यमन रागाची स्पष्ट ओळख दाखवणारी ही लकेर आहे. रोशन नेहमीच हात राखून वाद्यांचा वापर करतात असे मी वरती विधान केले आहे आणि त्या विधानाच्या पुष्ठयर्थ इथली बांसुरी दाखवता येईल. अतिशय सुंदर अशी लयकारी आहे.
ये सच है जीना था पाप तुम बिन
ये पाप मैंने किया हैं अब तक
मगर है मन में छबी तुम्हारी
के जैसे मंदिर में लौ दिये की
पहिला अंतरा जरा वेगळ्या सुरांवर सुरु केला आहे. हेमंत कुमारांचा आवाज किंचित वरच्या स्वरांवर आहे. कवितेच्या ओळी बघता, पुरुष गायकाने सुरवात करणे इष्ट ठरते. किंचित ढाला आवाज, थोडी बंगाली वळणाची गायकी परंतु शब्दफेक अतिशय प्रत्ययकारी. मुळातच हेमंत कुमार हे संगीतकार असल्याने, एखादे गाणे गाताना, शब्दांवरील वजनाचा अचूक अंदाज दिसतो तसेच हरकत किती आणि कुठे घ्यायची/ तोडायची, याचे सम्यक दर्शन घडते. मुखड्यात जसे " मैं सर झुकाये खडी हूं प्रीतम " ही ओळ दोनदा घेऊन, परत मूळ स्वरावलीकडे चाल परतली आहे, तोच प्रकार " मगर हैं मन में छबी तुम्हारी " गाताना केला आहे. ही ओळ गाताना, " छबी " शब्दावर किंचित जोर दिला आहे आणि त्या शब्दाचे महत्व दर्शवून दिले आहे.
दुसरा अंतरा सुरु करण्यापूर्वीची बांसुरीची धून तीच ठेवली आहे. मला तर काहीवेळा असेच वाटते, अशा प्रकारच्या गाण्यात वाद्यमेळाची गरज असते का?? केवळ गायकांना काही क्षणाची उसंत मिळावी, या हेतूनेच वाद्ये योजली असावीत!! गाण्याची सुरावट इतकी मोहक आणि गोड आहे की इथे आणखी कसलीच सांगीतिक कलाकुसर गरजेची नाही, अगदी हरकती घेतल्या तरी त्याचे अतिशय माफक प्रमाण आहे. याचे महत्वाचे कारण - शब्दकळा भरजरी आहे आणि त्या शब्दकळेला सुरांच्या भाराखाली दाबून टाकण्याची जरादेखील गरज नाही. सगळी स्वररचना, हा उस्फुर्त स्वराविष्कार आहे.
फिर आग बिरहा की मत लगाना
के जलके मैं राख हो चुकी हूं
ये राख माथे पे मैंने रख ली
के जैसे मंदिर में लौ दिये की "
कुठलेही युगुलगीत बसवताना, शब्दानुरूप गायक/गायिकेला स्थान द्यायचे, हा अतिशय ढोबळ अंदाज या गाण्यात फार बारकाईने पाळला आहे. दुसरा अंतरा गाताना, " फिर आग बिरहा की मत लगाना, के जलके मैं राख हो चुकी हूं" या ओळी लताबाईंच्या आवाजात तर " ये राख माथे पे मैंने रख ली, के जैसे मंदिर में लौ दिये की " या ओळी हेमंत कुमारांच्या आवाजात गावुन घेण्यात, संगीतकाराने शब्दांची बूज कशी राखावी, हे सुरेखरीत्या सिद्ध केले आहे.
एकंदरीने रोशन यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता व खंत करण्याकडे झुकली आहे का? अर्थात, या विधानाला परस्पर शह देणाऱ्या रचना त्यांनी आपल्या कारकिर्दीत सादर केलेल्या दिसतात. लताबाईंच्या आवाजातील उंचावर पोहोचण्याच्या क्षमतेने मर्यादेपलीकडे मोहून न जाता, त्यांच्या आवाजातील मंद्र सप्तकातील किंवा मध्य सप्तकातील गायन कौशल्याचा वापर फार हुशारीने केला आहे आणि या गाण्यात देखील याच विशेषाचा आढळ होतो. या गाण्यात एकेक कडवे एकाच आवाजात जवळपास येते, दुसऱ्या आवाजाच्या कंठक्षेपाशिवाय. सांगीतदृष्ट्या लय आणि सुरावट यांची संगती राखूनही दोघेंही गायक जणू श्रोत्यांना थेट उद्देशून गातात, असेच वाटते. रोशन यांना बहुदा यमन रागाची विशेष आवड दिसत आणि हे त्यांनी, निरनिराळ्या प्रकृतीची गाणी या रागात बांधून आणि तरीही प्रत्येक चालीची स्वतंत्रता अबाधित ठेऊन, आपल्या सांगीतिक कौशल्याचा दाखला दिला आहे. वाद्यांचा स्वनरंग नेमकेपणाने ओळखून त्यानुसार गाण्यात त्यांचा वापर करण्याची कुशलता केवळ स्तिमित करणारी आहे.
आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, म्हणजे गाताना, तुम्हाला स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना "बांध" घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. साठोत्तरी गाण्यात मात्र काही गाणी या तत्वांना फटकून बांधली गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर विचार करता, या गाण्यातील भावनेच्या दृष्टीने बघता, भारतातील मोज़क्या " पवित्र " गाण्यांत या रचनेचा समावेश होतो आणि तसा समावेश सर्वार्थाने योग्य आहे.
त्यांची बहुतांश गाणी ऐकताना, मला आरतीप्रभूंच्या दोन ओळी नेहमी आठवतात,
"तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे"