"तो कधीं येईंल, कधीं न येईल
कधीं भेटेल, कधीं न भेटेल.
कधीं लिहील, कधीं न लिहील.
कधीं आठवण काढील, कधीं न काढील
असा तो. एक अनिश्चिती......
बंदिस्त घड्याळांतील लंबकासारखी. मृत्यूसारखी."
प्रसिद्ध कवियत्री इंदिरा संत यांच्या एका कवितेतील या सुरवातीच्या ओळी. प्रियकर भेटणे तसेच वियोग होणे, या कालातीत अशा भावना आहेत आणि त्या सार्वकालिक कायम अशाच राहणाऱ्या आहेत तरीही अशा अनघड नात्याची वेगवेगळ्या शब्दांनी वेगळी अनुभूती देण्याचे काम अशाच असामान्य कवींनी निरंतर केले आहे आणि अशाच भावनेचे तितकेच अलौकिक प्रत्यंतर आपल्याला "मुहब्बत ऐसी धडकन है जो समझाई नही जाती" या गाण्यातून घेता येईल.
हिंदी चित्रपट संगीतात अनेक चित्रपट असे होऊन गेले, जे आज केवळ गाण्यांवर, कायमचे लोकांच्या मनावर राज्य करीत आहेत. अर्थात, ही सगळी करामत संगीतकाराची. भारतीय संगीताचा एकूणच आढावा घ्यायचा झाल्यास, हिंदी चित्रपट गीतांच्या सहभागाशिवाय तो नेहमीच अपूर्ण ठरेल. जनमानसावर अविरतपणे अधिकार गाजवणारे संगीत म्हणून, हिंदी गीतांचा अवश्यमेव उल्लेख करावाचा लागेल. किंबहुना, असे म्हणता येईल, देशातील सामन्यातील सामान्य माणसाच्या मनात जर का संगीताचे काही पडसाद उमटत असतील, तर त्याचे मुख्य श्रेय हे हिंदी चित्रपट गीतांना द्यावेच लागेल.
दुसरा भाग असा आहे, जर का इतकी वर्षे ही गाणी लोकांच्या मनात ठाण मांडून आहेत, तर त्या संगीताला डावलणे कसे शक्य आहे? जनाधार हा कुठल्याही कलेचा मुख्य आधार असतो आणि त्या पातळीवर, हिंदी चित्रपट संगीत पुरेपूर उतरते.उठावदार शब्दकळा, मनाची लगेच पकड घेणारी चाल आणि त्याचे अप्रतिम गायन, या त्रयींवर हा सगळा आविष्कार उभा असतो.
या मुद्द्यावर विचार करायचा झाल्यास, आजचे आपले गाणे, " मुहब्बत ऐसी धडकन है जो समझाई नही जाती" विचारात घ्यायला लागेल. १९५३ साली आलेल्या "अनारकली" चित्रपटातील हे गाणे. वास्तविक, या चित्रपटातील सगळीच गाणी श्रवणीय आहेत आणि आजही बहुतेक सगळी गाणी, रसिकांच्या आठवणीत राहिलेली आहेत. कुठल्याही गाण्याच्या चालीच्या संदर्भात एक बाब ध्यानात घेणे जरुरीचे असते आणि ती म्हणजे, गाण्याचा "मुखडा" जर सांगीतिक दृष्ट्या आकर्षक असेल तर तिथेच ते गाणे रसिकांच्या पसंतीला उतरते. याचाच पुढील भाग म्हणजे, मुखडा व्यवस्थित बांधला म्हणजे पुढील बांधकाम अतिशय सुरळीत होते. या गाण्याच्या बाबतीत नेमका हाच प्रकार घडलेला आहे. गाण्याच्या सुरवातीला, दोन ओळींचा शेर आहे.
"इस इंतजार ए शौक को, जनमो की आस है,
इक शम्मा जल रही है, तो वो भी उदास है".
अतिशय शांत स्वरांत या दोन ओळी गायल्या गेल्या आहेत पण यातूनच पुढील चालीची थोडी कल्पना येते. गंमतीचा भाग असा आहे, स्वरावली अतिशय सरळ, सोपी आहे आणि चटकन मनावर परिणाम करणारी आहे. मघाशी मी, मुखड्याच्या चालीचा उल्लेख केला तो याच संदर्भात आहे. मुखडा स्पष्ट आहे, आर्त आहे आणि गाण्याची वाटचाल कशी होणार आहे, याची पूर्ण कल्पना देणारा आहे.
चित्रपटातील प्रसंग लक्षात घेता, अनारकलीला दु:खावेग झालेला आहे आणि त्या उर्मीतून हे गाणे पडद्यावर सादर झाले आहे.
"मोहब्बत ऐसी धडकन है, जो समझाई नही जाती,
जुबां पर दिल की बेचैनी, कभी लायी नही जाती
मोहब्बत ऐसी धडकन है.
गाण्याची चाल अगदी सहज, सोपी आणि कुणालाही गुणगुणता येईल, अशाच धर्तीवर आहे. सी. रामचंद्र यांच्या सगळ्याच गाण्यांवर जर का जरा बारकाईने नजर फिरवली तर एक बाब लगेच ध्यानात येईल आणि ती म्हणजे, त्यांची गाणी ऐकताना, आपण देखील गाऊ शकतो, इतपत ती गाणी प्रोत्साहित करतात. बहुतांशी गाणी तशी आहेतही. सहज ओठावर येणाऱ्या चाली असतात परंतु काही गाणी मात्र प्रथम क्षणीच "गायकी" ढंग दाखवतात. वरील ओळीतील "मोहब्बत" हा शब्द ऐकताना, आपल्याला हे जाणवेल. "मोहब्बत" सुरांतून घेताना, लताबाईंनी जे काही अप्रतिम "आर्जव" मांडले आहे, ते केवळ शब्दातीत आहे. गाण्याची चाल तिथेच आपल्या मनाची पकड घेते आणि शेवटपर्यंत या गाण्याचे गारुड, मनावरून उतरत नाही. मी बरेचवेळा एक मुद्दा कायम मांडत आलो आहे, गाण्याचा मुखडा जर प्रत्ययकारी असेल तर पुढे रचनेची मांडणी करणे त्यामानाने सोपे असते आणि इथे असा "मुखडा" ऐकायला मिळतो.
"दिल की बेचैनी" म्हणजे नेमके काय असते, याची यथार्थ जाणीव, लताबाईंनी आपल्या सुरांतून दाखवून दिली आहे.
चले आओ, चले आओ, तकाजा है निगाहो का
किसी की आरजू ऐसे, तो ठुकराई नही जाती
मोहब्बत ऐसी धडकन है...
सी. रामचंद्र यांच्या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. बहुतेक गाण्याची "अस्ताई" एका चालीत बांधलेली असते तर अंतरा वेगळ्याच सुरांवर सुरु होतो. अर्थात गाणे जेंव्हा परत, मूळ ध्रुवपदावर येते, तिथे मात्र चालीच्या मूळ रूपाशी अप्रतिमरीत्या जोड लावलेली, ऐकायला मिळते. इथे देखील "चले आओ, चले आओ, तकाजा है निगाहो का" ही ओळ वेगळ्याच पट्टीत सुरु होते आणि त्याच सुरांना अनुषंगून चालीचा विस्तार होत आहे. इथे गंमत अशी केली आहे, "तकाजा है निगाहो का" हे प्रथम म्हणताना, वरच्या सुरांत घेतलेले आहे पण तीच ओळ परत घेताना, स्वर खालच्या पट्टीत आणले आहेत, जेणेकरून पुढील ओळ आणि परत "मुहब्बत ऐसी धडकन है'' घेताना मूळ चालीशी "नाळ" जुळलेली आहे. संगीतकाराच्या व्यामिश्र बुद्धिमत्तेचा अप्रतिम आविष्कार आहे आणि तो आविष्कार, तितक्याच सहजतेने, गायिकेने, आपल्या समोर मांडलेला आहे.
मेरे दिल ने बिछाये है, सजदे आज राहो में
जो हालत आशिकी की है, वो बतालाई नही जाती,
मोहब्बत ऐसी धडकन है...
मघाशी मी जे विधान केले - हा संगीतकार, प्रत्येक अंतरा घेताना, मुळातल्या चालीशी फारकत घेऊन आपल्या समोर आणतो, त्याचे इथे प्रत्यंतर मिळते. "मेरे दिल ने बिछाये है" ही ओळ संपूर्णपणे वेगळ्याच सुरांवर सुरु होते जशी आधीचा अंतरा घेताना - अर्थात या दोन्ही अंतऱ्याच्या "उठावणी" पार भिन्न स्तरीय आहेत, हे देखील लक्षात घ्यायला हवे. सी. रामचंद्र यांनी कधीही कवीच्या शब्दांना दुखावल्याचे फारसे आढळत नाही आणि याचे कारण, त्यांची काव्यावर असलेली अव्याभिचारी निष्ठा, हेच होय. "आधी शब्द, मग चाल" या पंथाचा त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा केला.
No comments:
Post a Comment