Saturday, 16 April 2016

सपना बन साजन आये



माझ्या तरुणपणी, मला अचानक, दुर्मिळ हिंदी गाणी जमविण्याचे "खूळ" मला लागले होते. "खूळ" अशा साठी म्हटले कारण नंतर काही वर्षांनी मला समजले की "दुर्मिळतेच्या" नावाखाली काही साधारण स्वरुपाची गाणी गोळा केली गेली. अर्थात, ही समज यायला काही वर्षे जावी लागली. अशाच काळात मला हे गाणे अवचित सापडले, वास्तविक जमालसेन हे नाव आता कितीजणांना ठाऊक असेल मला शंका आहे. त्यावेळी, १]शामसुंदर, २] विनोद,, ३] जगमोहन आणि असे अनेक संगीतकार माझी श्रवणयात्रा श्रवणीय करून गेले.  
"शोखिया"चित्रपटातील हे गाणे. सुरैय्या आणि प्रेमनाथ यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा, चित्रपट, चित्रपट म्हणून काही खास नव्हता, जवळपास सरधोपट म्हणावा, इतपतच हा चित्रपट होता परंतु या चित्रपटाला जी काही थोडीफार लोकप्रियता लाभली ती केवळ श्रवणीय गाण्यांमुळे. खरतर केदार शर्मांसारखा जाणता दिग्दर्शक असून, चित्रपट सर्वसाधारण प्रकृतीचा निघाला. या चित्रपटात इतकी सुंदर गाणी असून देखील हा चित्रपट काळाच्या ओघात विसरला जावा!! याच काळात, केवळ गाण्यांवर तरलेले असंख्य चित्रपट निघत होते आणि त्यांनी अमाप लोकप्रियता प्राप्त केली. असे देखील असू शकेल, अत्यंत ढोबळ कथानक, प्राथमिक दर्जाचा अभिनय आणि कथेची विस्कळीत मांडणी इत्यादी गोष्टींमुळे हा चित्रपट विस्मरणात गेला. 
"मंद असावे जरा चांदणे, कुंद असावी हवा जराशी;
गर्द कुंतली तुझ्या खुलाव्या, शुभ्र फुलांच्या धुंद मिराशी". 
कविवर्य बोरकरांनी, या ओळींतून जो आशय व्यक्त केला आहे त्याचीच प्रतिकृती जणू "सपना बन साजन आये" या गाण्यातून व्यक्त होते. जरा खोलवर विचार केला तर गाण्यातील शब्द देखील याच आशयाशी जुळणारे आहेत. केदार शर्मांचीच शब्दकळा आहे.
आता सरळ गाण्याकडे वळायचे झाल्यास, लता अगदी तरुण असतानाचे हे गाणे आहे. आवाजाची कोवळीक, लगेच गायनाचे वय दाखवून जाते."सोयी कलिया हस पडी, झुके लाजसे नैन, बिना की झनकार मे तरपन लागे रैन" अशा ओळीने हे गाणे सुरु होते. कुठेही ताल वाद्य नसून, पार्श्वभागी हलकेसे व्हायोलीन आणि बासरीचे तसेच गिटारचे मंद सूर!! परंतु त्याच सुरांनी रचनेची ओळख होते. इथे बघा, "झनकार" शब्द उच्चारताना, "झन" आणि "कार" असा विभागून गाताना, छोटासा आकार लावला आहे तसेच "लागे' म्हणताना, "ला" वर असाच बारीक आकार आहे पण तिथेच लताच्या आवाजाची कोवळीक ऐकायला मिळते आणि आकार लावताना, झऱ्याचे पाणी उतरणीवर यावे त्याप्रमाणे हळुवारपणे ती हरकत समेवर येते.वास्तविक इथे "सम" अशी नाही परंतु ज्या सुरांवर रचना सुरु होते, त्याच सुरांवर रचनेचे सूर परत येतात, ते हेच दर्शविण्यासाठी - "सोयी कलिया हस पडी" या शब्दांचा आशय व्यक्त करण्यासाठी!! 
लगेच "सपना बन साजन आये, हम देख देख मुसकाये, ये नैना भर आये, शरमाये" हि ओळ सुरु होते. इथे संगीतकाराने कमालीच्या हळुवारपणे पार्श्वभागी बासरीचे सूर वापरलेत. "मुसकाये" म्हणताना, वाटणारी मुग्ध लाज, पुढे "शरमाये" या शब्दाच्या वेळी अत्यंत आर्जवी होते आणि आर्जवीपण बासरीच्या मृदू स्वरांनी कशिदाकाम केल्याप्रमाणे शब्दांच्या बरोबरीने ऐकायला मिळते आणि ही रचना अधिक समृद्ध होत जाते. 
आपल्याकडे एक विचार नेहमी मांडला जातो, तीन मिनिटांच्या गाण्यात वैचारिक भाग फारसा अनुभवायला मिळत नाही पण अशी माणसे मनाचे कोपरे फार कोतेपणाने बंद करून टाकीत असतात. आता, वरील ओळीच्या संदर्भात, "शरमाये" या शब्दाबरोबर ऐकायला येणारी बासरीची धून कशी मन लुभावून जाते, हे अनुभवण्यासारखे आहे. काही सेकंदाचा "पीस" आहे परंतु त्याने गाणे एकदम वरच्या पातळीवर जाते. 
पहिल्या अंतऱ्यानंतर, व्हायोलीन एक गत सुरु होते आणि त्याच्या पाठीमागे अति मंजुळ आणि हलक्या आवाजात छोट्या झांजेचे आवाज येतात, हलक्या आवाजात म्हणजे फार बारकाईने ऐकले तरच ऐकायला येतात. व्हायोलीनची गात, तुकड्या तुकड्याने जिथे खंडित होते, तिथे झांजेचा आवाज येतो आणि तो सांगीतिक वाक्यांश उठावदार करतो. हे जे कौशल्य असते, तिथे संगीतकाराची बुद्धीमत्ता दिसते. रचना भरीव कशी करायची, ज्यामुळे मुळातली सुरवातीची चाल, पुढे विस्तारत असताना, अशा जोडकामाने भरजरी वस्त्र सोन्याच्या बारीक धाग्याने अधिक श्रीमंत व्हावे, असे ते संगीत काम असते आणि हे बहुतेक सगळ्याच गाण्यात असते पण आपण तिथे फारसे लक्ष देत नाही, हे दुदैव!! 
पुढील कडवे,"बिछ गये बादल बन कर चादर, इंद्रधनुष पे हमने जाकर , झुले खूब झुलाये, ये नैना भर आये, शरमाये!!" इथे लताची गायकी कशी समृद्ध होते बघा.  "बिछ गये बादल बन कर चादर, इंद्रधनुष पे हमने जाकर" ही ओळ आधीच्या पहिल्या ध्रुवपदाच्या चालीला सुसंगत आहे पण, नंतर, "झुले खूब झुलाये" म्हणताना, आवाजाला जो "हेलकावा" दिला आहे किंवा आपण "हिंदोळा" म्हणू, तो केवळ जीवघेणा आहे. शब्दांची मर्यादा दाखवून देणारा!! 
वास्तविक मधल्या अंतऱ्यात फारसे प्रयोग नाहीत, म्हणजे मुळातली चालच अति गोड असल्याने, त्या चालीला अनुलक्षून अंतरे बांधले आहेत. "नील गगन के सुंदर तारे चून लिये फुल समझ अति न्यारे, झोली मे भर लाये" इथे, "झोली मे भर लाये" हे शब्द म्हणताना, लाटणे आवाजात एक छोटासा "खटका" घेतला आहे पण तो कुठेही लयीत खटकत नाही, हे त्या आवाजाचे मार्दव!! वास्तविक, या कडव्याची सुरवात थोड्या वरच्या पट्टीत आहे परंतु शेवटची ओळ दुसऱ्यांदा म्हणताना, लय परत समेच्या सूरांकडे वळते, ती तिथे तो :खटका" घेऊन!! लताचे गाणे हे असे फुलत असते जे पहिल्या श्रवणात फारसे जाणवत नाही परंतु नंतर प्रत्येक घटक वेगवेगळा घेऊन ऐकायला लागलो की आपल्याला हातात केवळ शरणागती असते!! 
"मस्त पवन थी हम थे अकेले, झिलमील कर बरखा संग खेले; फुले नही समाये, ये नैना भर आये" हे गाताना, लताची शब्दामागील जाणीव अनुभवण्यासारखी आहे. "मस्त पवन थी" या शब्दांचा सांगीतिक आशय किती मृदू स्वरांतून ऐकायला मिळतो, खरेतर सगळे गाणेच हे अतिशय मुग्ध परंतु संयत प्रणयाचा आविष्कार आहे. नायिका, वयाने "नवोढा" आहे, पहिल्या प्रेमाची जाणीव झाली आहे आणि त्यातून हे सूर उत्फुल्लपणे उमटले आहेत, इथे "उमटले" हा शब्दच योग्य आहे, कारण इथे भावनेत तोच आशय आविष्कृत झालेला आहे. मनापासूनची विशुद्ध प्रेमाची भावना, ज्याला थोडेशी अल्लड भावना, असे देखील म्हणता येईल, अशा भावनेचे शब्दचित्र आहे. त्यामुळे चाल बांधताना आणि गाताना कुठेही सूर, मुग्धता सोडून जाणार नाहीत, याचेच भान संगीतकाराने आणि गायिकेने नेमकेपणाने राखले आहे. 
खरतर हे गाणे ऐकताना मला असेच वाटत होते, हल्लीच्या जमान्यात असे शांत, संयत गाणे कितपत पचनी पडू शकेल परंतु जेंव्हा हे गाणे मी जवळपास ८ वर्षांनी ऐकले आणि मला त्यात अजुनही तशीच "ताजगी" आढळली. या गाण्यात कुठेही अति वक्र ताना नाहीत की प्रयोगाचा अवलंब केलेला आहे पण मुळात हाताशी इतकी गोड चाल असल्यावर, अशा गोष्टींची गरजच पडत नाही, हेच खरे. ते स्वरांचे आर्जव, त्यामागील बासरीच्या मंजुळ हरकती, हेच या गाण्याचे खरे वैभव आहे आणि हेच वैशिष्ट्य, मला हे गाणे वारंवार ऐकायला भाग पडते. 
एक मजेदार किस्सा. फार पूर्वी, एका मैफिलीत, पंडित जितेंद्र अभिषेकींनी राग यमन सादर केला. साथीला अर्थात, त्यांचे शिष्य होते. गाताना, पंडितजींनी काहीशा वेगळ्या धर्तीच्या ताना घेतल्या आणि त्याचबरोबर लयीचे वेगळे बंध दाखवले. मैफिल संपल्यावर, शिष्यांनी पंडितजींना, या नवीन सादरीकरणाबद्दल विचारले असता, अत्यंत शांतपणे, पंडितजींनी, या गाण्याचा उल्लेख करून, या गाण्यातील लताबाईंच्या तानांचा उपयोग केला. चित्रपट गीत किती असामान्य माध्यम आहे, यासाठी आणखी वेगळे उदाहरण कशाला? 

No comments:

Post a Comment