Tuesday, 19 April 2016

जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात



मध्यरात्री घनघोर पावसांच्या धारांत भिजत असलेली आणि त्यामुळे अवघडून गेलेली तरुणी, एखादा सुरक्षित आडोसा शोधत उभी असते. आजूबाजूला विजेचा कडकडात चालू असतो आणि त्या नादात पावसाचा जोर वाढलेला असतो. त्यामुळे ती तरुणी "ओलेती" झालेली. अचानक एक तरुण तिथे येतो आणि त्या ओलेत्या सौंदर्यावर लोभावून जातो. तरुणीला, हा तरुण आपल्याला "हेरत" आहे याची जाणीव होते आणि काहीशी सलज्ज होते. 
१९६० साली आलेल्या "बरसात कि रात" या चित्रपटातील "जिंदगी भर नहीं भूलेगी" या प्रसिद्ध गाण्याची वरील प्रमाणे पार्श्वभूमी आहे. चित्रपट सरधोपट आहे आणि अभिनयाच्या क्षेत्रात "मधुबाला" वगळता, सगळाच आनंद आहे!! मला तर बरेचवेळा असेच वाटते, समोर भारत भूषण सारखा नाठाळ अभिनेता असल्याने, मधुबालाचा अभिनय अधिक खुलून येतो!! तिच्या सौंदर्याबद्दल तर कुठलेच दुमत नसावे. रोशन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, हाच या चित्रपटाचा प्राण आहे!! 

"पाठमोरी मूर्ती तुझी पाहिली मी कौतुकें
वाटले स्वत्कुंतली गे गुंतली सारी सुखे 

भार त्यांचा गाढ काळा मेघ आषाढांतला 
का फुलांच्या मार्दवे मानेवरी भारावला? 

सुप्रसिद्ध कवी बा.भ. बोरकरांच्या या ओळी म्हणजे मोहक, सलज्ज तरुणीच्या संयत सौंदर्याचा आविष्कार आहे. या मतितार्थाशी संलग्न अशा ओळी, प्रसिद्ध शायर साहिर यांनी प्रस्तुत गाण्यात लिहिल्या आहेत. खरतर, या गाण्यातील ओळी अप्रतिम आहेत आणि अशा वेळी, या ओळी असामान्य आहेत की पडद्यावर दिसणारे मधुबालाचे सौंदर्य अलौकिक आहे, असा संभ्रम पडतो. सुंदर गाण्यात शब्द असे असावेत, जिथे स्वरलय संपते तिथेच अक्षर संपावे, जेणेकरून शाब्दिक "यतिभंग" होऊ नये. हे सगळे एकाच वेळी जुळून येणे फार अवघड असते. चित्रपट गीतांवर जेंव्हा सरसकट टीका केली जाते तेंव्हा हा मुद्दा फारसा ध्यानात घेतला जात नाही. 
संगीतकार रोशन यांच्या बहुतांशी रचना या अतिशय संयत, अनाक्रोशी आणि विशेष करून मुग्ध स्वरूपाच्या आहेत. गाण्यातील वाद्यमेळ बांधताना, कुठलेही वाद्य अति तार सप्तकात शक्यतो जाणार नाही आणि त्यायोगे गायन देखील त्याच पातळीवर वावरेल, याची काळजी घेतलेली आढळते. बरेचवेळा रचनेत, लय वरच्या सुरांत जाण्याची शक्यता दिसत असताना, लय खंडित करून खालच्या स्वरांवर वळवून घेण्याकडे त्यांच्या बराचसा कल दिसतो. गाणे अधिककरून मंद्र सप्तकात कसे बांधले जाईल, हाच दृष्टीकोन बाळगलेला आढळतो. त्यामुळे रचनेत, फारच कमीवेळा "यतिभंग" झाला आहे किंवा शब्दांची अनावश्यक मोडतोड झाली आहे, असे ऐकायला मिळत नाही. शब्दांच्या आशयानुरूप लयीला "वळण" द्यायला त्यांनी कधीही मागेपुढे बघितले नाही, त्या दृष्टीने, त्यांची गाणी ही अधिक करून "गीतधर्मी" असतात.
सुरवातीच्या हुंकारातून, गाण्याची सुरवात होते. या हुंकारातच आपल्या यमन रागाची खूण पटते. मोहमद रफी, हा गायक म्हणून विचार करताना, सरळ सरळ दोन भाग दिसतात. १] या अशा गाण्यातून गायकीचे अतिशय संयमित रूप ऐकायला मिळते तर इतर अशी काही गाणी आहेत, तिथे आवाजात अकारण "नाटकी" भाव फार डोकावतो. गायन करताना, शब्दांची जाण ठेऊन गायन करणे, हा फार ढोबळ विचार झाला परंतु शब्दांतील आशय अधिक खोलवर दाखवण्याच्या नादात वाहवत जाण्याचा धोका फार असतो आणि दुर्दैवाने, मोहमद रफी काही गाण्यात तसे वाहवत गेले आहेत.
जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात  
एक अंजान हसीना से मुलाकात की रात 

या ओळीतील भाव जाणून घेतला तर लगेच ध्यानात येईल, "त्या" अनुपमेय रात्रीच्या सुगंधी आठवणींची मांडणी आहे. मघाशी मी संगीतकार रोशन यांच्या बाबतीतील वैशिष्ट्य सांगताना, शब्दातील "ऋजुता" चालीत मांडताना, मुग्धता अधिक खोलवर कशी दाखवता येईल, याचाच प्रत्यय येतो. खरतर त्या रात्री त्या तरुणीशी "मुलाकात" म्हणावी तर केवळ दृष्टीभेट इतपतच मर्यादित परंतु त्या नजरभेटीतून अवतरलेले भावनांचे "बोलके" भाव केवळ शब्दातून(च) नव्हे तर सुरांतून देखील विभ्रमासहित आपल्याला ऐकायला मिळतात. गाण्याचा "मुखडा" असावा तर असा!! गेयताबद्ध शब्दकळा आणि त्याला संलग्न अशी स्वररचना आणि त्याचे आविष्कृत स्वरूप गायनातून तितक्याच प्रत्ययकारी दिसणे. सगळेच मधुबालाच्या सौंदर्याप्रमाणे विलोभनीय!! 
इथे पहिला अंतरा येण्याआधीचा वाद्यमेळ ऐकण्यासारखा आहे, "मुलाकात की रात"
या ल शेवटचा "त" या अक्षराचा सूर ध्यानात ठेऊन, सतारीच्या स्वरांची बांधणी केली आहे आणि त्यात पुढे सारंगी आणि जलतरंग या वाद्यांना जोडून घेतले आहे. मनाची घालमेल ही, जलतरंग वाद्यातून किती सुरेख उमटली आहे आणि हे भाव दाखवताना कुठेही लय कठीण किंवा वरच्या सुरांत गेली आहे, असे दिसत नाही. रोशन यांच्या रचनेतील "संयत" भाव दिसतो, तो असा. 

हाय वो रेशमी झुल्फो से बरसता पानी
फुल से गालों पे रुकने को तरसता पानी 
दिल में तुफान उठाते हुये, जजबात की रात 

इथे देखील रोशन यांची शब्दांप्रती दिसणारी जाणीव दिसते. "हाय वो रेशमी झुल्फो से बरसता पानी" ही ओळ दोनदा घेतली आहे आणि पहिल्यांदा घेतल्यानंतर काही सेकंद, सतार आणि जलतरंग यांचा स्वरमेळ ऐकायला मिळतो. पडद्यावर मधुबालेचा सलज्ज चेहरा आणि पार्श्वभागी जलतरंग वाद्याचे सूर!! "दिल में तुफान" इथे रचना किंचित वरच्या सुरांत जाते ती केवळ "तुफान" या शब्दाचे सूचन करण्यासाठी परंतु पुढल्या क्षणी चाल परत मूळ स्वरलयीशी जुळवून घेते. रचना परत, पहिल्या ओळीशी - "जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात"  येते पण ही ओळ घेताना, मोहमद रफी "बरसात" हा शब्द कसा घेतो हे खास ऐकण्यासारखे आहे. आवाजात किंचित थरथर आहे पण कुठेही नाटकीपणा नाही. आता, पडद्यावरील भारत भूषणच्या चेहऱ्यावरील रेषा देखील हलत नाही, हा या गाण्याचा भीषण विपर्यास आहे, तो भाग वेगळा!!

डर के बिजली से अचानक वो लिपटना उसका 
और फिर शर्म से बलखा के सिमटना उसका 
कभी देखी न सुनी ऐसी तिलिस्मात की रात 

या ओळी गाताना, लय जरा खालच्या पट्टीत गेली आहे आणि या ओळी वाचल्या की लगेच याचे उत्तर आपल्याला मिळेल. या गाण्यात, प्रत्येक कडव्याची पहिली ओळ संपल्यावर. रोशन यांनी जलतरंग वाद्याच्या सुरांनी अप्रतिम जोडकाम केले आहे जेणेकरून, ओळीचा अर्थ आपल्याला अधिक सुंदररीत्या लक्षात यावा. वाद्यमेळ अक्षरश: एखाद, दोन सेकंदाचा आहे पण अर्थपूर्ण आहे. हे शब्द देखील काय अप्रतिम आहेत. "लिपटना" च्या जोडीला "सिमटना" घेऊन, प्रणयाचा रंग भलताच सुरेख रंगवला आहे. मी सुरवातीला म्हटले आहे, "संयत" हा रोशन यांच्या संगीताचा स्थायीभाव आहे आणि तो इथे नेमका आढळतो. कडव्याची शेवटची ओळ पुन्हा वरच्या सुरांत सुरु होते पण पुढल्या क्षणी चाल खालच्या सुरांत येते. "शर्म से बलखा" हे शब्द कसे गायले गेलेत हे मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. 

सुर्ख आंचल को दबा कर निचोडा उसने 
दिल पे जलता हुआ एक तीर सा छोडा उसने 
आग पानी मे लगाते हुये हालात की रात 

सगळे गाणे हे केवळ काही मिनिटांच्या दृष्टीक्षेपावर आधारित आहे, जिथे एकही शब्दाचा संवाद नाही, अशा अनोख्या भेटीवर हे गाणे बेतलेले आहे. त्यामुळे, चित्रपटाचा नायक कवी प्रकृतीचा असल्याने, मनात उमटणाऱ्या निरनिराळ्या प्रतिमांचे आवर्तन, साहीरच्या कवितेतून वाचायला मिळते. अचानक नजरेसमोर तरुण येतो आणि त्यामुळे मनाची झालेली घालमेल "सुर्ख आंचल को दबा कर निचोडा उसने" या ओळीतून व्यक्त होते आणि त्या सलज्ज असहायतेतून झालेली दृष्टीभेट, नायकाच्या मनात कल्लोळ उठवते. 

मेरे नग्मो में बसती है वो तसवीर थी वो 
नौजवानी के हसीन ख्वाब की ताबीर थी वो 
आसमानो से उतर आई थी जो रात की रात 

चित्रपटातील नायक, कवी असल्याने, गाण्याचा शेवट देखील, "मेरे नग्मो में बसती है" याच शब्दांनी होणे उचित ठरते. साहीर कवी म्हणून काय दर्जाचा होता, हे बघण्यासारखे आहे. "नौजवानी के हसीन ख्वाब की ताबीर थी वो " इथे, "हसीन ख्वाब" च्या जोडीला "ताबीर" हाच शब्द यायला हवा. तिथे दुसरा कुठलाही शब्द उपरा ठरेल आणि अशी अपरिहार्यता जेंव्हा कवितेत येते, तिथे ती कविता "काव्य" म्हणून श्रेष्ठ ठरते. एक उदाहरण, पु.शि. रेग्यांच्या "त्रिधा राधा" कवितेत, "क्षेत्र साळीचे" असे शब्द येतात, तेंव्हा "क्षेत्र" हे "साळी"चेच असायला हवे, असे होते. तिथे दुसरा पर्याय नाही. 
सगळेच गाणे एका सुंदर लयीत बांधलेले आहे, कुठेही कुठलेच वाद्य "बेसूर" तर नाहीच पण, एखादा स्वर वाढवला तर, असला विचार देखील मनाला शिवत नाही. गाण्याची घट्ट बांधणी अशीच असावी लागते. या कडव्यानंतर गाणे परत ध्रुवपदावर येते आणि आपल्या मनात केवळ मधुबाला रहात नसून स्वर आणि शब्दांच्या आकृतीने निर्माण केलेला  नितांतरमणीय आविष्कार  आपल्या मनात उतरत जातो. कुठल्याही गाण्याची सांगता यापेक्षा वेगळी होणे उचित नाही. 

No comments:

Post a Comment