Saturday, 30 April 2016

तुम मुझे भूल भी जाओ



चित्रपट गीतांत अनेक प्रसंग असतात आणि त्यानिमित्ताने, कवींना त्या प्रसंगांना शब्दातून, रसिकांच्या समोर मांडायचे असते. अशावेळेस, कवितेत एखादी राजकीय विचारसरणी किंवा सामाजिक भान असावे का? हा एक कालातीत प्रश्न आहे आणि याचे उत्तर तसे सोपे नाही. एकतर चित्रपट हे माध्यम सामान्य माणसांपासून ते बुद्धीवादी समाजाला एकत्रित बाधून ठेवणारे माध्यम असल्याने, तिथे होणारा आविष्कार हा नेहमीचा तौलनिक दृष्टीने सादर होणे गरजेचे असते. एकांतिक विचाराने होणारी आविष्कृती काही ठराविक, मर्यादित स्तरावर यशस्वी ठरू शकते. विचाराबरोबर मनोरंजन, हा घटक देखील विचारात घ्यावाच लागतो अन्यथा सादरीकरणाचा डोलारा कधीही कोसळू शकतो. 
त्या दृष्टीने विचार करता, १९५९ साली आलेल्या "दीदी" चित्रपटातील "तुम मुझे भूल भी जाओ" हे गाणे विचारात घ्यावे लागेल. शायर साहिर हा मुळातला सक्षम कवी, त्याने आपले "कवित्व" चित्रपट गाण्यांसाठी वापरले, असा एक आरोप नेहमी केला जातो. एका दृष्टीने विचार करता, यात तथ्य नक्कीच आहे पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर गाण्यात "काव्य" आणले तर नेमके काय बिघडते? सरधोपट शब्दकळा असलेली असंख्य गाणी देखील, कवितेच्या अंगाने फारच थोड्या वेळा ऐकली जातात तेंव्हा "काव्य" असलेली गाणी दुर्लक्षित झाली तर त्यात काय नवल!! गीतात "भावकाव्य" असण्यात निदान मला तरी फार गैर वाटत नाही. 
जीवनात अनेक अनुभव आपल्याला येतात.त्यातील काही संवेदानाद्वारे आलेले, काही कल्पनेने जाणवलेले, काही वैचारिक स्वरूपाचे तर काही संमिश्र स्वरूपाचे असतात. परंतु यातील कोणत्याही एकाच्या किंवा सर्वांच्या अनुभवांचा एकात्म व अर्कभूत परिणाम म्हणून जी भाववृत्ती होते तिच्याशीच केवळ भावकवितेला कर्तव्य असते. ही भाववृत्ती एक मानसिक स्पंदन म्हणून जाणवते. याचअंगाने आपण, आजच्या या गाण्याचा विचार करू शकतो.  
ती माया ममता कृतज्ञता अन प्रीती 
बलिदान समर्पण श्रद्धा निष्ठा भक्ती 
चल विसर शब्द ते भरला बघ हा प्याला 
अर्थशुन्य शब्दांची ही दुनिया असे स्मशानशाळा….!! 

प्रसिद्ध कवी रॉय किणीकरांनी वरील ओळीत, साहीरच्याच विचारांची री ओढली आहे, असे मला वाटते. या गाण्यात साहीरच्या "डाव्या" विचारसरणीचा प्रभाव फार गडद असा जाणवतो. मी सुरवातीला, राजकीय किंवा सामाजिक भान याबद्दल चार शब्द लिहिले आहेत, ते याच संदर्भात आहेत. आता या गाण्यातील काव्याचाच विचार करायचा झाल्यास, 

"जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है" 
ही ओळ म्हणजे साहीरच्या मनातील डाव्या विचारसरणीचे तंतोतंत प्रतिबिंब आहे. आता प्रश्न असा येतो, चित्रपटातील पात्राच्या दृष्टीने असे विचार कितपत योग्य ठरतात? इथे मात्र वादाचा मुद्दा निश्चित निर्माण होतो. आणखी एक मजेशीर मुद्दा आहे. ही ओळ  - "जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है" इथे थोडे गूढ आहे, म्हणजे प्रसिद्ध शायर फैझ-अहमद-फैझ यांच्या अतिशय गाजलेल्या - "मुझसे पहिली सी मुहोब्बत, मेरे महेबूब ना मांग" या रचनेत हीच ओळ "और भी दुख है जमाने में मुहोबत के सिवा" अशी वाचायला मिळते!!  प्रश्न असा, याचे श्रेय नेमके कुणाचे?   अर्थात आणखी एक मजेदार किस्सा, फैझच्या याच रचनेतील, "तेरी आंखो के सिवा दुनिया में रख्खा क्या है' ही ओळ, मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या "चिराग" चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याशी साम्य दाखवते. 
गाण्याची चाल यमन रागावर आधारित आहे. चाल अतिशय सुश्राव्य आहे आणि सहज गुणगुणता येईल अशीच आहे. मुळात यमन राग अति गोड राग, त्यामुळे या चालीला सुंदर असा गोडवा प्राप्त झाला आहे. नायिकेच्या भासमान मनस्थितीतून निर्माण झालेली ही रचना आहे आणि तोच धागा पकडून, संगीतकार सुधा मल्होत्राने अतिशय मोजका वाद्यमेळ ठेऊन गाण्याला सुरवात केली आहे. 
तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है 
अतिशय मोहक सुरावटीने ही गाणे सुरु होते. नायिकेची स्वप्नावस्था ध्यानात घेऊन, गाण्याची सुरावट बांधली आहे. खरतर सुधा मल्होत्रा, संगीतकार म्हणून फारशी ख्यातकीर्त नाही पण इथे तिने जी "तर्ज" बांधली आहे, केवळ लाजवाब अशीच म्हणावी लागेल. हे गाणे म्हणून बघताना ही एक सुरेख कविता आहे, याचा विचार केलेला आढळतो. अर्थात, गाण्याची चाल बांधताना, ती "कविता पठण" होणार नाही, याची काळजी  घेतली आहे. गाण्यातील तालाची योजना देखील त्याच ढंगाने केलेली आहे. 
मेरे दिल की मेरे जजबात की कीमत क्या है 
उलझे उलझे से खयालात की कीमत क्या है 
मैंने क्यो प्यार किया तुमने ना क्यो प्यार किया 
इन परेशान सवालात की कीमत क्या है 
तुम जो ये भी ना बताओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है 

या ओळी म्हणताना, सुधा मल्होत्राने शब्दांचे औचित्य कसे सांभाळले आहे, ते ऐकण्यासारखे आहे. "मैंने क्यो प्यार किया तुमने ना क्यो प्यार किया, इन परेशान सवालात की कीमत क्या है" या ओळी म्हणताना, स्वर किंचित वरच्या पट्टीत घेतला आहे. या ओळीतून प्रकट होणारी मनाची बेचैनी किंवा तडफड, सुरांतून व्यक्त करण्यासाठी. सूर थोडे वरच्या पट्टीत घेतल्याने, शाब्दिक आशय नेमका आपल्या मनाला भिडतो. पुढील ओळीत " तुम जो ये भी ना बताओ तो ये हक़ है तुमको" मनाला समजावण्याची धडपड असल्याने, ही आणि पुढील ओळ अतिशय संयत स्वरांत मांडली आहे - परिणाम केवळ सूर(च) नव्हे तर शब्द देखील आपल्या ध्यानात राहतात. 

जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है 
जुल्फ-ओ-रुखसार की जन्नत नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुयी इस दुनिया में 
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है
तुम अगर आंख चुराओ तो ये हक़ है तुमको 
मैंने तुम से ही नहीं सब से मोहब्बत की है 
या ओळी प्रसिद्ध गायक मुकेश यांच्या आवाजात आहेत. एक गायक म्हणून मुकेश यांच्या आवाजाला खूप मर्यादा आहेत परंतु त्या मर्यादेत राहून देखील परिणामकारक गायन करण्याचे त्यांचे कौशल्य निश्चित वाखाणण्यासारखे आहे. मी लेखाच्या सुरवातीला, काव्यातील राजकीय विचारसरणी बाबत जे लिहिले होते, ते याच ओळींच्या संदर्भात आहे. इथे साहिर आपली विचारसरणी, चित्रपटातील पात्रावर लादत आहे का? हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अर्थात, कविता म्हणून इतके स्वातंत्र्य कवीला निश्चितच मिळायला हवे. 

तुमको दुनिया के गम-ओ-दर्द से फुरसत ना सही 
सबसे उल्फत सही मुझसे ही मोहब्बत ना सही 
मैं तुम्हारी हुं यही मेरे लिये क्या कम है 
तुम मेरे हो के रहो ये मेरी किस्मत ना सही 
और भी दिल को जलाओ तो ये हक़ है तुमको 
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है

चाल तशी संपूर्ण गाण्यात फारशी कुठे बदलेली नाही किंवा लयीत फार वेडीवाकडी वळणे देखील नाहीत. गाणे ऐकताना मात्र सारखे मनात येत राहते, इथे गाण्यापेक्षा कविता अधिक तुल्यबळ आहे. गाण्याची चाल आणि सादरीकरण अतिशय सुश्राव्य आहे. गाण्याची चाल मनाची पकड सहज घेते आणि हा मुद्दा विशेष मांडायला हवा. गाण्याची चाल ऐकताना, सहज समजू शकली तरच ती लोकांच्या मनात घर करते आणि ते साध्य इथे साधले आहे. 
मुकेश यांच्या आवाजाचा पल्ला फारसा विस्तृत नव्हता आणि त्याची परिणामकारकता मध्य सप्तकापुरती मर्यादित होती. परंतु आवाजात एक प्रकारचा आश्वासक किंवा सांत्वन करण्याचा धर्म होता. थोडे तांत्रिक बोलायचे झाल्यास, काही स्वरमर्यादांत सुरेल गाणे त्यांना सहज सुलभ जात असे. परिणामत: मुकेश यांचा आवाज छोटे स्वर समूह द्रुत गतीने आणि सफाईने घेऊ शके. वरील गाण्यांतील दुसरा अंतरा, या वाक्यांना पूरक म्हणून दाखवता येईल. आपल्या पट्टीपेक्षा वरच्या सुरांत गायची वेळ आली, तेंव्हा त्यांचा आवाज डळमळीत व्हायचा आणि त्यांच्या आवाजाची प्रमुख मर्यादा. 
सुधा मल्होत्रा यांच्या आवाजाबाबत देखील वरील वर्णन लागू पडेल परंतु यांच्या आवाजात एक प्रकारची फिरत असल्याने, हलक्या  हरकती घेणे सहज जमून जाते आणि त्यामुळे गाण्याला किंचित गायकी अंग प्रदान करणे शक्य होत असे. 
असे असून देखील, ही गाणे आपल्या मनाचा ठाव घेते, कारण चालीमधील असामान्य गोडवा आणि सहज सुंदर गायन. ललित संगीतासाठी खरेतर याच मुलभुत बाबी ध्यानात घेणे जरुरीचे असते. 


https://www.youtube.com/watch?v=xs1h-inHU4U

Tuesday, 19 April 2016

जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात



मध्यरात्री घनघोर पावसांच्या धारांत भिजत असलेली आणि त्यामुळे अवघडून गेलेली तरुणी, एखादा सुरक्षित आडोसा शोधत उभी असते. आजूबाजूला विजेचा कडकडात चालू असतो आणि त्या नादात पावसाचा जोर वाढलेला असतो. त्यामुळे ती तरुणी "ओलेती" झालेली. अचानक एक तरुण तिथे येतो आणि त्या ओलेत्या सौंदर्यावर लोभावून जातो. तरुणीला, हा तरुण आपल्याला "हेरत" आहे याची जाणीव होते आणि काहीशी सलज्ज होते. 
१९६० साली आलेल्या "बरसात कि रात" या चित्रपटातील "जिंदगी भर नहीं भूलेगी" या प्रसिद्ध गाण्याची वरील प्रमाणे पार्श्वभूमी आहे. चित्रपट सरधोपट आहे आणि अभिनयाच्या क्षेत्रात "मधुबाला" वगळता, सगळाच आनंद आहे!! मला तर बरेचवेळा असेच वाटते, समोर भारत भूषण सारखा नाठाळ अभिनेता असल्याने, मधुबालाचा अभिनय अधिक खुलून येतो!! तिच्या सौंदर्याबद्दल तर कुठलेच दुमत नसावे. रोशन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, हाच या चित्रपटाचा प्राण आहे!! 

"पाठमोरी मूर्ती तुझी पाहिली मी कौतुकें
वाटले स्वत्कुंतली गे गुंतली सारी सुखे 

भार त्यांचा गाढ काळा मेघ आषाढांतला 
का फुलांच्या मार्दवे मानेवरी भारावला? 

सुप्रसिद्ध कवी बा.भ. बोरकरांच्या या ओळी म्हणजे मोहक, सलज्ज तरुणीच्या संयत सौंदर्याचा आविष्कार आहे. या मतितार्थाशी संलग्न अशा ओळी, प्रसिद्ध शायर साहिर यांनी प्रस्तुत गाण्यात लिहिल्या आहेत. खरतर, या गाण्यातील ओळी अप्रतिम आहेत आणि अशा वेळी, या ओळी असामान्य आहेत की पडद्यावर दिसणारे मधुबालाचे सौंदर्य अलौकिक आहे, असा संभ्रम पडतो. सुंदर गाण्यात शब्द असे असावेत, जिथे स्वरलय संपते तिथेच अक्षर संपावे, जेणेकरून शाब्दिक "यतिभंग" होऊ नये. हे सगळे एकाच वेळी जुळून येणे फार अवघड असते. चित्रपट गीतांवर जेंव्हा सरसकट टीका केली जाते तेंव्हा हा मुद्दा फारसा ध्यानात घेतला जात नाही. 
संगीतकार रोशन यांच्या बहुतांशी रचना या अतिशय संयत, अनाक्रोशी आणि विशेष करून मुग्ध स्वरूपाच्या आहेत. गाण्यातील वाद्यमेळ बांधताना, कुठलेही वाद्य अति तार सप्तकात शक्यतो जाणार नाही आणि त्यायोगे गायन देखील त्याच पातळीवर वावरेल, याची काळजी घेतलेली आढळते. बरेचवेळा रचनेत, लय वरच्या सुरांत जाण्याची शक्यता दिसत असताना, लय खंडित करून खालच्या स्वरांवर वळवून घेण्याकडे त्यांच्या बराचसा कल दिसतो. गाणे अधिककरून मंद्र सप्तकात कसे बांधले जाईल, हाच दृष्टीकोन बाळगलेला आढळतो. त्यामुळे रचनेत, फारच कमीवेळा "यतिभंग" झाला आहे किंवा शब्दांची अनावश्यक मोडतोड झाली आहे, असे ऐकायला मिळत नाही. शब्दांच्या आशयानुरूप लयीला "वळण" द्यायला त्यांनी कधीही मागेपुढे बघितले नाही, त्या दृष्टीने, त्यांची गाणी ही अधिक करून "गीतधर्मी" असतात.
सुरवातीच्या हुंकारातून, गाण्याची सुरवात होते. या हुंकारातच आपल्या यमन रागाची खूण पटते. मोहमद रफी, हा गायक म्हणून विचार करताना, सरळ सरळ दोन भाग दिसतात. १] या अशा गाण्यातून गायकीचे अतिशय संयमित रूप ऐकायला मिळते तर इतर अशी काही गाणी आहेत, तिथे आवाजात अकारण "नाटकी" भाव फार डोकावतो. गायन करताना, शब्दांची जाण ठेऊन गायन करणे, हा फार ढोबळ विचार झाला परंतु शब्दांतील आशय अधिक खोलवर दाखवण्याच्या नादात वाहवत जाण्याचा धोका फार असतो आणि दुर्दैवाने, मोहमद रफी काही गाण्यात तसे वाहवत गेले आहेत.
जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात  
एक अंजान हसीना से मुलाकात की रात 

या ओळीतील भाव जाणून घेतला तर लगेच ध्यानात येईल, "त्या" अनुपमेय रात्रीच्या सुगंधी आठवणींची मांडणी आहे. मघाशी मी संगीतकार रोशन यांच्या बाबतीतील वैशिष्ट्य सांगताना, शब्दातील "ऋजुता" चालीत मांडताना, मुग्धता अधिक खोलवर कशी दाखवता येईल, याचाच प्रत्यय येतो. खरतर त्या रात्री त्या तरुणीशी "मुलाकात" म्हणावी तर केवळ दृष्टीभेट इतपतच मर्यादित परंतु त्या नजरभेटीतून अवतरलेले भावनांचे "बोलके" भाव केवळ शब्दातून(च) नव्हे तर सुरांतून देखील विभ्रमासहित आपल्याला ऐकायला मिळतात. गाण्याचा "मुखडा" असावा तर असा!! गेयताबद्ध शब्दकळा आणि त्याला संलग्न अशी स्वररचना आणि त्याचे आविष्कृत स्वरूप गायनातून तितक्याच प्रत्ययकारी दिसणे. सगळेच मधुबालाच्या सौंदर्याप्रमाणे विलोभनीय!! 
इथे पहिला अंतरा येण्याआधीचा वाद्यमेळ ऐकण्यासारखा आहे, "मुलाकात की रात"
या ल शेवटचा "त" या अक्षराचा सूर ध्यानात ठेऊन, सतारीच्या स्वरांची बांधणी केली आहे आणि त्यात पुढे सारंगी आणि जलतरंग या वाद्यांना जोडून घेतले आहे. मनाची घालमेल ही, जलतरंग वाद्यातून किती सुरेख उमटली आहे आणि हे भाव दाखवताना कुठेही लय कठीण किंवा वरच्या सुरांत गेली आहे, असे दिसत नाही. रोशन यांच्या रचनेतील "संयत" भाव दिसतो, तो असा. 

हाय वो रेशमी झुल्फो से बरसता पानी
फुल से गालों पे रुकने को तरसता पानी 
दिल में तुफान उठाते हुये, जजबात की रात 

इथे देखील रोशन यांची शब्दांप्रती दिसणारी जाणीव दिसते. "हाय वो रेशमी झुल्फो से बरसता पानी" ही ओळ दोनदा घेतली आहे आणि पहिल्यांदा घेतल्यानंतर काही सेकंद, सतार आणि जलतरंग यांचा स्वरमेळ ऐकायला मिळतो. पडद्यावर मधुबालेचा सलज्ज चेहरा आणि पार्श्वभागी जलतरंग वाद्याचे सूर!! "दिल में तुफान" इथे रचना किंचित वरच्या सुरांत जाते ती केवळ "तुफान" या शब्दाचे सूचन करण्यासाठी परंतु पुढल्या क्षणी चाल परत मूळ स्वरलयीशी जुळवून घेते. रचना परत, पहिल्या ओळीशी - "जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात"  येते पण ही ओळ घेताना, मोहमद रफी "बरसात" हा शब्द कसा घेतो हे खास ऐकण्यासारखे आहे. आवाजात किंचित थरथर आहे पण कुठेही नाटकीपणा नाही. आता, पडद्यावरील भारत भूषणच्या चेहऱ्यावरील रेषा देखील हलत नाही, हा या गाण्याचा भीषण विपर्यास आहे, तो भाग वेगळा!!

डर के बिजली से अचानक वो लिपटना उसका 
और फिर शर्म से बलखा के सिमटना उसका 
कभी देखी न सुनी ऐसी तिलिस्मात की रात 

या ओळी गाताना, लय जरा खालच्या पट्टीत गेली आहे आणि या ओळी वाचल्या की लगेच याचे उत्तर आपल्याला मिळेल. या गाण्यात, प्रत्येक कडव्याची पहिली ओळ संपल्यावर. रोशन यांनी जलतरंग वाद्याच्या सुरांनी अप्रतिम जोडकाम केले आहे जेणेकरून, ओळीचा अर्थ आपल्याला अधिक सुंदररीत्या लक्षात यावा. वाद्यमेळ अक्षरश: एखाद, दोन सेकंदाचा आहे पण अर्थपूर्ण आहे. हे शब्द देखील काय अप्रतिम आहेत. "लिपटना" च्या जोडीला "सिमटना" घेऊन, प्रणयाचा रंग भलताच सुरेख रंगवला आहे. मी सुरवातीला म्हटले आहे, "संयत" हा रोशन यांच्या संगीताचा स्थायीभाव आहे आणि तो इथे नेमका आढळतो. कडव्याची शेवटची ओळ पुन्हा वरच्या सुरांत सुरु होते पण पुढल्या क्षणी चाल खालच्या सुरांत येते. "शर्म से बलखा" हे शब्द कसे गायले गेलेत हे मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. 

सुर्ख आंचल को दबा कर निचोडा उसने 
दिल पे जलता हुआ एक तीर सा छोडा उसने 
आग पानी मे लगाते हुये हालात की रात 

सगळे गाणे हे केवळ काही मिनिटांच्या दृष्टीक्षेपावर आधारित आहे, जिथे एकही शब्दाचा संवाद नाही, अशा अनोख्या भेटीवर हे गाणे बेतलेले आहे. त्यामुळे, चित्रपटाचा नायक कवी प्रकृतीचा असल्याने, मनात उमटणाऱ्या निरनिराळ्या प्रतिमांचे आवर्तन, साहीरच्या कवितेतून वाचायला मिळते. अचानक नजरेसमोर तरुण येतो आणि त्यामुळे मनाची झालेली घालमेल "सुर्ख आंचल को दबा कर निचोडा उसने" या ओळीतून व्यक्त होते आणि त्या सलज्ज असहायतेतून झालेली दृष्टीभेट, नायकाच्या मनात कल्लोळ उठवते. 

मेरे नग्मो में बसती है वो तसवीर थी वो 
नौजवानी के हसीन ख्वाब की ताबीर थी वो 
आसमानो से उतर आई थी जो रात की रात 

चित्रपटातील नायक, कवी असल्याने, गाण्याचा शेवट देखील, "मेरे नग्मो में बसती है" याच शब्दांनी होणे उचित ठरते. साहीर कवी म्हणून काय दर्जाचा होता, हे बघण्यासारखे आहे. "नौजवानी के हसीन ख्वाब की ताबीर थी वो " इथे, "हसीन ख्वाब" च्या जोडीला "ताबीर" हाच शब्द यायला हवा. तिथे दुसरा कुठलाही शब्द उपरा ठरेल आणि अशी अपरिहार्यता जेंव्हा कवितेत येते, तिथे ती कविता "काव्य" म्हणून श्रेष्ठ ठरते. एक उदाहरण, पु.शि. रेग्यांच्या "त्रिधा राधा" कवितेत, "क्षेत्र साळीचे" असे शब्द येतात, तेंव्हा "क्षेत्र" हे "साळी"चेच असायला हवे, असे होते. तिथे दुसरा पर्याय नाही. 
सगळेच गाणे एका सुंदर लयीत बांधलेले आहे, कुठेही कुठलेच वाद्य "बेसूर" तर नाहीच पण, एखादा स्वर वाढवला तर, असला विचार देखील मनाला शिवत नाही. गाण्याची घट्ट बांधणी अशीच असावी लागते. या कडव्यानंतर गाणे परत ध्रुवपदावर येते आणि आपल्या मनात केवळ मधुबाला रहात नसून स्वर आणि शब्दांच्या आकृतीने निर्माण केलेला  नितांतरमणीय आविष्कार  आपल्या मनात उतरत जातो. कुठल्याही गाण्याची सांगता यापेक्षा वेगळी होणे उचित नाही. 

Saturday, 16 April 2016

सीने में सुलगते हैं अरमान

कुठल्याही गाण्यात प्राथमिक स्तरावर ३ घटक येतात आणि यातील एक जरी घटक सक्षम नसला तर सादर होणारा आविष्कार फसतो. अर्थात, यात शब्दकळा, संगीतरचना आणि गायन हेच ते मुलभूत घटक. असे फारच तुरळकपणे घडते, गाण्यात तीनही घटक तुल्यबळ आहेत आणि नेमके कुठल्या घटकाचा आस्वाद आपल्यावर असर करतो याबाबत आपली संभ्रमावस्था व्हावी. एक तर नक्की, सुगम संगीत हा अभिजात आविष्कार नव्हे. तो मान रागदारी संगीताकडे जातो. त्यामुळे, सुगम संगीत (यात चित्रपट संगीत येते) सादर होताना, एकतर शब्दांची मोडतोड होणे, किंवा संगीत रचना तकलादू होणे किंवा गायन फसणे, या गोष्टी बरेचवेळा घडतात. बहुतेक गाण्यांत, संगीत रचनेचा आणि गायनाचा प्रभाव हा अवश्यमेव होतो, विशेषत: वाद्यसंगीताचा प्रभाव लक्षणीय असतो. चित्रपट गीतांत हा विशेष अधिक दिसून येतो आणि याचे मुख्य कारण, पडद्यावर सादर होणारा प्रसंग. प्रसंगानुरूप संगीतरचना करणे, हे संगीतकाराचे प्राथमिक कर्तव्य ठरते. 
हिंदी चित्रपट गीतांचा विचार केल्यास, दर दहा, बारा वर्षांनी, गाण्यांच्या रचनेचा ढाचा बदलत गेला आहे आणि त्यामागे संगीतरचनेतील बदल हाच विशेष राहिला आहे. या पार्श्वभूमीवर विचार करताना, मला, "तराना" चित्रपटातील "सीने में सुलगते हैं अरमान" हे गाणे फार वेगळी रचना वाटते. 
१९५१ साली आलेला तराना चित्रपट तसा अगदी साधा, ढोबळ विषयावर आधारित आहे. परंतु चित्रपटात, दिलीप कुमार आणि मधुबाला यांचा अभिनय हे खास वैशिष्ट्य होते. अर्थात, आज विचार करायला बसलो तर, या दोघांपेक्षा या चित्रपटातील गाणी, हाच विशेष मनाला अधिक भावतो. त्या काळाचा थोडा त्रयस्थतेने विचार केला तर त्यावेळी चित्रपटात गाण्यांना प्राधान्य होते आणि असे कितीतरी चित्रपट सांगता येतील ज्यांनी चित्रपटातील केवळ असामान्य गाण्यांमुळे भरपूर धंदा केला आहे. अर्थात हा विषय वेगळा आहे. 
"सीने में सुलगते हैं अरमान" हे गाणे खऱ्याअर्थाने युगुलगीत म्हणता येईल. संगीतकार म्हणून अनिल बिस्वास यांनी, लताबाई आणि तलत यांच्या गायकीचा नेमका विचार करून त्यांच्याकडून आपल्या संगीतरचनेचा अप्रतिम आविष्कार सादर केलेला आहे. अनिल बिस्वास यांचे अगदी थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास,  पाश्चिमात्य संगीतातील काही तत्वे जाणून घेऊन, त्याचा भारतीय तत्वांशी सांधा जोडला. विशेषत: "पियानो", "गिटार" इत्यादी वाद्यांचा रचनांत केलेला सढळ वापर. अर्थात, एकूणच त्यांचा आग्रह भारतीयत्वाचाच राहिला. गीताला रागाधार घ्यायचा परंतु पुढे रचना स्वतंत्र करायची, या पद्धतीचा त्यांनी प्रामुख्याने अवलंब केला, जे  संगीतकारांच्या पुढील पिढ्यांचे वैशिष्ट्य ठरले. तसेच नवीन आवाजांना पुढे आणणे - तलत आणि मुकेश हे आवाज अनिल बिस्वास यांनी लोकांच्या पुढे आणले तसेच लताबाईंना, नूरजहानच्या प्रभावातून मोकळे केले. हा विशेष चित्रपट संगीताच्या दृष्टीने दूरगामी ठरला. 

याचेच रडू आले की जमले मला न रडणेही 
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते! 

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो 
मी विझलो तेंव्हा सारे आकाश उजळले होते! 

कवी सुरेश भटांच्या या ओळी, या गाण्यातील भावनेशी बऱ्याच प्रमाणात नाते सांगतात. चित्रपटातील गाण्याची शब्दकळा, प्रेम धवन यांची आहे.मी लेखाची सुरवात या वेळेस, थोडी तांत्रिक अंगाने केली यामागे मुख्य कारण, संगीतकार अनिल बिस्वास. या संगीतकाराची सगळी कारकीर्द जरा बारकाईने न्याहाळली तर एक वैशिष्ट्य लगेच जाणवते. गाण्यात गायकी अंग असून देखील, गाणे ही गीताच्या अंगाने फुलवले आहे आणि तसे करताना, शब्दांना फारसे कुठे दुखावलेले नाही. अर्थात अपवाद हे सर्वत्र असतातच. रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास असल्याने, लयीच्या अंगाने गाणे कसे फुलवावे, यासाठी प्रस्तुत गाणे हे अप्रतिम उदाहरण आहे. गाण्याची चाल यमन/यमन कल्याण रागावर आहे पण गाण्याच्या चालीवर रागाची केवळ सावली आहे. 
अनिल बिस्वास जेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीत आले, तेंव्हा चित्रपट संगीतावर मराठी रंगभूमी आणि पारशी रंगभूमी, या दोघांचा प्रभाव होता परंतु अनिल बिस्वास यांनी, गीताला खऱ्याअर्थाने "गीतधर्मी" बनविले. बंगाली लोकसंगीताबरोबर, स्वरलिपी आणि वाद्यमेळ या संकल्पना त्यानी ठामपणे रुजवल्या. प्रस्तुत गाण्यात याच सगळ्या बाबींचा आढळ सापडतो. 
या गाण्यात "चमत्कृती" अजिबात नाही किंवा अवघड हरकती तसेच ताना नाहीत पण चालीत जो काही अश्रुत गोडवा आहे, तो असामान्य आहे. गाण्याची चाल आणि वाद्यमेळ एकमेकांशी संपूर्णपणे तादात्म्य पावले आहेत. वाद्यमेळातील कुठलाही सूर इतका बांधीव,घट्ट आहे की  कुठे स्वरांची लांबी वाढवली तर सगळ्या आविष्काराचा डौल बिघडेल. हाच प्रकार गायनातून दिसून येतो. युगुलगान कसे गावे, याचा हे  आदिनमुना आहे. लताबाईंचा प्रत्येक स्वर हा तलतच्या पट्टीशी  जुळलेला आहे. गाण्यात कुठेही जरासा देखील सवंगपणा आही किंवा बेसुरेपण तर औषधाला देखील नाही. 
सर्वसाधारणपणे गाणे गाताना, गाण्यातील पहिल्या दोन ओळी नेहमी अचूक शब्दोच्चाराने गायल्या जातात परंतु गाण्यात परत त्या ओळी गाताना, कुठेतरी किंचित ढिसाळ वृत्ती अवतरते. कुठे एखाद्या अक्षराचे वजन घसरते किंवा शब्द तोडला जातो इत्यादी. या गाण्यात असले काहीही घडत नाही. संगीतकार म्हणून अनिल बिस्वास यांचे हे लक्षणीय यश. गायकाकडून कशा प्रकारे गावून घ्यायचे जेणेकरून, रचना अधिकाधिक समृद्ध होत जाईल, याकडे अनिल बिस्वास यांनी कायम लक्ष दिले.  
सीने में सुलगते हैं अरमान 
आंखो में उदासी छायी है 
ये आज तेरी दुनिया से हमें 
तकदीर कहां ले आई हैं 
या ओळी ऐकताना आपल्याला सतत जाणवत राहते, शब्दांचे सूर आणि वाद्यमेळाचे एकमेकांशी संपूर्णपणे संवादी आहेत, लय तर सारखीच आहे पण स्वरांचे वजन देखील त्याचप्रमाणात तोलले गेले आहे. बरेचवेळा असे घडते, गाण्यात प्रयोग करायचे म्हणून गाण्याची चाल आणि वाद्यमेळ यांच्यात फरक केला जातो परंतु अंतिमत: दोन्ही सूर एकत्र आणून सम गाठली जाते. आणि बिस्वास यांच्या रचनेत असले प्रयोग आढळत नाहीत, असतो तो सगळा भर मेलडी आणी त्याला अनुषंगून राहणाऱ्या स्वररचनेवर. इथे व्हायोलीन वाद्याचे स्वर आहेत पण त्या स्वरांची जातकुळी शाब्दिक रचनेशी नेमकेपणाने सांधून घेतलेली आहे. परिणाम असा होतो, ओळीतील आशय अधिक खोल जाणवतो. 
मुळात तलत मेहमूद यांचा मृदू स्वर असल्याने, गाण्याची ठेवण देखील त्याच अंगाने केली आहे. गाण्यात आणखी एक बाब सांगण्यासारखी आहे. गायन सुरेल असणे, हे तर फार प्राथमिक झाले परंतु गाताना, एकमेकांच्या गळ्याची "जात" ओळखून गायन करणे, याला देखील अतिशय महत्व असते. लताबाईंचा तारता पल्ला जरी विस्तृत असला तरी इथे त्याच्यावर योग्य संयम घालून, तलतच्या गायकीशी अतिशय सुंदररीत्या जुळवून घेतला आहे. म्हणूनच मघाशी मी म्हटले, युगुलगायन कसे असावे, यासाठी हे गाणे सुंदर उदाहरण ठरते. 

कुछ आंख में आंसू बाकी हैं 
जो मेरे गम के साथी हैं 
अब दिल हैं ना दिल के अरमां हैं 
बस मैं हुं मेरी तनहाई है 
या ओळी ऐकण्याआधी, मधल्या स्वरिक वाक्यांशात व्हायोलीनचे स्वर किंचित वरच्या पट्टीत गेले आहेत आणि तोच स्वर लता बाईंनी उचलून घेतला आहे. स्वर उचलून घेताना, तो स्वर ताणला जाणार नाही याची काळजी घेतली असल्याने, "मूळ" स्वररचनेशी संवाद साधला जातो. गाण्यांमध्ये अशीच छोटी सौंदर्यस्थळे असतात, जेणेकरून रचना अर्थपूर्ण होत जाते. संगीतकाराचे "कुलशील" इथे समजून घेता येते. गाण्यात स्वरांचे "वर-खाली" होणे क्रमप्राप्तच असते परंतु स्वरांतील ही "अटळ" बाब "टाळून" गायन करणे, खरे कौशल्याचे असते आणि फार अवघड असते. 

ना तुझ से गिला कोई हमको 
ना कोई शिकायत दुनिया से 
दो चार कदम जब मंझील थी 
किस्मत ने ठोकर खाई है 
गाण्यात धृवपद धरून चार, चारओळींचे चार खंड आहेत आणि प्रत्येकी दोन खंड प्रत्येकाला गायला मिळाले आहेत. इथे शब्दांतील आशय जाणून घेऊन, त्याप्रमाणे गायकांना गायला दिले गेले आहेत. अर्थात, हे देखील फार प्राथमिक झाले कारण बहुतेक सुंदर गाण्यात हा विचार नेहमीच दिसतो. मग या गाण्यात आणखी काय वेगळे आहे? या गाण्यातील दु:खाची प्रत काही जगावेगळी नाही किंवा शब्दकळा देखील अत्युच्च दर्जाची नाही. खरतर चित्रपट गीतात त्याची फारशी गरज देखील नसते. रचनेच्या लयीत शब्द चपखल बसणे, ही स्वररचनेच्या दृष्टीने आणि गायनाच्या दृष्टीने देखील अत्यावश्यक असते आणि ती गरज, ही शब्दकळा व्यवस्थित पुरवते. 
कुछ ऐसी आग लगी मन में 
जीने भी ना दे मरने भी ना दे 
चूप हुं तो कलेजा जलता है 
बोलुं तो तेरी रूसवाई है. 
मी वरती जो प्रश्न विचारला आहे, याचे उत्तर गाण्याचे शेवटाला मिळते. गाण्याच्या शेवट करताना, गाण्याचे ध्रुवपद लताबाईंच्या आवाजात आहे. गाण्याच्या सुरवातीला याच ओळी आपल्याला तलत मेहमूदच्या आवाजात ऐकायला मिळतात. दोन्ही वेळेस, लय तीच आहे पण स्वररचनेत किंचित फरक आहे. अर्थात, स्वररचना बदलली तरी देखील आशयाच्या अभिवृद्धीत काहीही फरक पडला आणि, किंबहुना लताबाईंच्या आवाजात याच ओळी अधिक गहिऱ्या होतात आणि गाण्यातील दु:खाची प्रत एकदम वेगळी होते. हे असे करताना, परत एकदा, शब्दांची कुठेही ओढाताण नाही, हे लगेच जाणवते. "चूप हुं तो कलेजा जलता है, बोलुं तो तेरी रूसवाई है. " या ओळी ऐकताना आपल्याला केवळ गायकी(च) दिसते असे नसून त्यामागे असलेला संगीतकारचा विचार देखील जाणवतो. मला वाटते यामुळेच हे गाणे हिंदी चित्रपट गीताच्या नामावळीत आढळ स्थान प्राप्त करून राहिले आहे. 

वक्त ने किया, क्या हंसी सितम

दोन कलासक्त जीव. एका औपचारिक प्रसंगातून ओळख होते, हळूहळू गाठ भेटी होतात, मने अनुरक्त होतात आणि मानसिक गुंतवणूक होते. कलेच्या माध्यमातून जवळीक निर्माण होते. पुरुष आधीच लग्नबंधातअडकलेला असल्याने, एका मर्यादेच्या पलीकडे स्नेहबंध वाढू शकत नाहीत. एव्हाना, स्त्री तिच्या कलाविश्वात यशाची नवीन शिखरे गाठत राहते आणि पुरुष मात्र अपयशाचा धनी!! त्यातून निर्माण होते ती अटळ मानसिक तडफड आणि दुरावा. अशाच एका विरक्त संध्यासमयी, या दोघांची अचानक गाठभेट होते. पूर्वीच्या आठवणी मनात येतात पण आता आपण कधीही जवळ येऊ शकणार नाही, ही जळजळीत जाणीव आतून पोखरत असते. आज, स्त्री यशाच्या शिखरावर असते तर पुरुष अपयशाच्या भोवऱ्यात भिरभिरत असतो. "कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाट जळे उंबऱ्याशी दिवा रात रात धुक्याच्या दिशेला खिळे शुन्य दृष्टी किती उर ठेवू व्यथा गात गात" आरतीप्रभूंच्या या कवितेतील ओळी, वरील प्रसंग अधिक खोलवर सांगून जातो. "वक्त ने किया, क्या हंसी सितम' या गाण्याच्या संदर्भात तर या ओळी फारच चपखल बसतात. हिंदी चित्रपटातील एक अजरामर गाणे. सर्वसाधारणपणे हिंदी चित्रपटात, गाण्याचे चित्रण बरेचवेळा सरधोपट वृत्तीने केले जाते. चित्रपटात गाण्याचे अपरिमित असूनदेखील त्याचे चित्रीकरण "बाळबोध" करायचे, हा विरोधाभास असतो!! याला सणसणीत अपवाद म्हणजे "कागज के फुल' चा दिग्दर्शक गुरुदत्त. गुरुदत्तने कुठल्याही गाण्याचे चित्रीकरण कधीही मळलेल्या वाटेने केले नाही. कथा, सादरीकरण, अभिनय, Camera Work, काव्य, संगीत सगळ्याच दृष्टीकोनातून "कागज के फुल" हा चित्रपट अप्रतिम असून देखील, त्या काळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला!! हे कधीही न सुटणारे कोडे आहे. प्रस्तुत गाण्याचे चित्रीकरण तर खास अभ्यासाचा भाग ठरवा, इतके अप्रतिम आहे. संगीतकार सचिन देव बर्मन, यांच्या संगीताची खासियत सांगायची झाल्यास, चित्रपट बघून त्याप्रमाणे, आपल्या गाण्यांची रचना करण्याचे कौशल्य केवळ "बेमिसाल" असेच म्हणावे लागेल. प्रसंगी, काव्यानुरूप रचना बदलण्यासाठी त्यांनी कधीही मागे पुढे बघितले नाही. संपूर्ण गाणे, हे पार्श्वगीत आहे, सगळा आशय केवळ चेहऱ्यावर वाचता येईल, इतका अमूर्त अभिनय बघायला मिळतो. गाण्याची सुरवातच मुळी. संथ लयीतील पियानो आणि व्हायोलीन वाद्यांच्या सुरांतून होते. हा स्वरमेळ खास ऐकण्यासारखा आहे, व्हायलीनचे स्वर हे पार्श्वभागी वाजत असतात तर पियानोचे स्वर प्रमुख आहेत. पुढे त्यात, पुढे त्यात बासरीचे स्वर मिसळताना, पडद्यावर विस्तीर्ण अशा स्टुडियोचा अवकाश दिसतो आणि सुरवातीला एकमेकांच्या समीप असलेले दोघे, दूरस्थ होत जातात. या हालचालींना, ज्या प्रकारे वाद्यमेळाचे सूर साथ देतात, हा असामान्य स्वरिक अनुभव आहे आणि पुढे ऐकायला मिळणाऱ्या रचनेची "नांदी" आहे!! वाद्यमेळ इतक्या संथ आणि खालच्या सुरांत वाजत असतो की त्यातून व्यक्त होणारी अव्यक्त भावना अटळपणे आपल्या मनात झिरपते. संगीतकार म्हणून सचिन देव बर्मन किती श्रेष्ठ आहेत, याचा हा आदीनमुना!! "वक्त ने किया क्या हंसी सितम तुम रहे ना तुम, हम रहे ना हम". गायिका गीता दत्त इथे अवतरते, तिचा आवाज देखील ठाय लयीत आणि मंद्र सुरांत लागलेला आहे. अति व्याकूळ स्वर आहेत आणि सुरवातीच्या वाद्यमेळाच्या सुरांची संगत धरून ठेवणारे आहेत. ऐकणाऱ्याच्या मनावर गडद परिणाम घडवून आणणारे आहेत. खरतर सगळे गाणे हे विरही भावनांचे अव्यक्त स्वरूप व्यक्त करणारे आहे. गायिका गायला सुरवात करते तेंव्हा साथीला पार्श्वभागी बेस गिटार आणि पियानोचे स्वर आहेत पण त्या स्वरांचे अस्तित्व तसे नाममात्र आहेत. गीता दत्त, आपल्या गूढ, आर्त सुरांनी असते. किंचित बंगाली गोलाई असलेला स्वर पण प्रसंगी आवाजाला टोक देण्याची क्षमता असल्याने, गायन अतिशय भावनापूर्ण होते. पहिला अंतरा यायच्या आधी, व्हायोलीन वाद्यांचे स्वर कसे बांधले आहेत, ते मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. "ऑर्केस्ट्रा" पद्धतीचा सुरेख वापर केलेला आहे. वाद्यमेळाची रचना करताना, व्हायोलीन वादकांचे दोन भाग केले आहेत आणि त्यानुरूप रचना सजवली आहे. एक भाग मंद्र सप्तकात वाजत आहे तर दुसरा भाग तार सप्तकात वाजत आहे. तार सप्तकात जे व्हायोलीनचे सूर आहेत, त्यातून रिकाम्या,ओसाड स्टुडियोची प्रचीती येते तर खालच्या सुरांत वाजत असलेल्या सुरावटीने, पडद्यावरील अभिनेत्यांच्या तरल अभिव्यक्ती निर्देशित होतात. "बेकरार दिल इस तरह मिले जिस तरह कभी, हम जुदा ना थे तुम भी खो गये, हम भी खो गये एक राह पर चल के दो कदम". "इस तरह मिले" हे शब्द गाताना, "तरह" हा शब्द, आवाजात किंचित थरथर आणून गायला गेला आहे, परिणाम काव्यातील आशय खोल व्यक्त होणे. संगीतकाराला काव्याची नेमकी जाण असेल तर तो स्वररचनेतून किती प्रकारची अनुभूती रसिकांना देऊ शकतो, हे ऐकण्यासारखे(च) आहे. या गाण्याचा वाद्यमेळ ऐकताना, प्रत्येक शब्दानंतर व्हायोलीन वाद्याचे स्वर ऐकायलाच हवेत. व्याकुळता केवळ गायकीतून स्पष्ट न करता, वाद्यमेळातून देखील तितक्याच परिणामकारकरीत्या अधोरेखित केली जाते. हे फार, फार कठीण आहे. गाणे सजवणे म्हणजे काय, याचा हा रोकडा अनुभव आहे. "एक राह पर चल के दो कदम' ही ओळ जेंव्हा पडद्यावर येते, त्यावेळी, वरून प्रकाशाचा झगझगीत झोत येतो आणि त्या झोतात, पडद्यावरील अभिनेत्यांच्या "प्रतिकृती" सामावल्या जातात. हा प्रकार केवळ अप्रतिम आहे. दिग्दर्शक म्हणून गुरुदत्त काय ताकदीचा होता, हे दर्शवून देणारे हे गाणे आहे. प्रकाशाच्या झोतात, व्यक्तीच्या प्रतिमा मिसळणे, ही कल्पनाच अनोखी आणि काव्यमय आहे. गमतीचा भाग पुढे आहे. ही ओळ संपते आणि आपल्याला लगेच गाण्याच्या सुरवातीची ओळ "वक्त ने किया, क्या हंसी सितम" हे ऐकायला मिळते. या दोन्ही ओळींतील विरोधाभास ज्या प्रकारे चित्रिकरणा मधून तसेच सांगीतिक वाक्यांशातून दर्शवला गेला आहे, असे भाग्य निदान हिंदी चित्रपट गीतांच्या बाबतीत फारच तुरळक आढळते. सगळे गाणे म्हणजे छायाप्रकाशाचा मनोरम खेळ आहे. गायिका म्हणून गीता दत्तच्या आवाजाला मर्यादा आहेत. शक्यतो गुंतागुंतीच्या हरकती, तिच्या गळ्याला शोभत नाहीत परंतु मुळातले नैसर्गिक हळवेपण तसेच भावपूर्ण आवाज, यामुळे तिचे गायन अतिशय अर्थपूर्ण होते. आवाजात किंचित कंप आहे आणि तो कंप तिला, विविध प्रकारची गाणी गाण्यासाठी उपयोगी पडला.संगीतकार म्हणून सचिन देव बर्मन यांची कामगिरी मात्र अतुलनीय अशीच म्हणायला हवी. हिंदी चित्रपट गाण्यांत जेंव्हा रागदारी संगीताचा प्रभाव होता (अर्थात काही संगीतकार याला अपवाद होते) तेंव्हा लोकसंगीताचा आधार घेऊन, चित्रपट गीतांना नवीन पेहराव दिला. "जायेंगे कहां, सुझता नहीं चल पडे मगर रास्ता नहीं क्या तलाश है, कुछ पता नहीं बुन रहे है दिन ख्वाब दम-ब-दम" इथे कैफी आझमी, कवी म्हणून फार वरची पातळी गाठतात. वरील ओळींमधील शेवटच्या दोन ओळी म्हणजे या गाण्याचा "अर्क" आहे. सगळी हताशता, मानसिक तडफड तसेच आतडे तुटण्याचा क्षण, सगळ्या भावना या दोन ओळींत सामावलेल्या आहेत. आत्ता या क्षणी आपण एकत्र आहोत, जवळ आहोत पण हे सगळे तात्पुरते आहे आणि एकदा हा क्षण विझला की परत आपण, आपल्या वाटांवर मार्गस्थ होणार आहोत. गाण्याच्या शेवटी आपल्याला पडद्यावर हेच दिसते. प्रश्न असा, हेच जर अटळ आहे, तर आपण आज एकत्र तरी का आलो? जी.ए. कुलकर्ण्यांच्या "प्रवासी" कथेत एक सुंदर वाक्य आहे. "इतरांचे प्रवास संपतात पण रस्ता मात्र अविरतपणे तसाच राहतो. आपला मात्र रस्ता संपला आहे पण प्रवास तसाच चालूच राहणार आहे!" इथे या दोन व्यक्तींचे असेच झाले आहे, जवळ येण्याचे सौख्य नाही पण आयुष्य मात्र निरसपणे चालूच रहाणार आहे. या चक्रव्यूहातून आता या दोघांपैकी कुणाचीही सुटका नाही आणि या अंतस्थ तडफडीचे जळजळीत वास्तव समजून घेणे, हेच या गाण्याचे खरे सौंदर्य.

सपना बन साजन आये



माझ्या तरुणपणी, मला अचानक, दुर्मिळ हिंदी गाणी जमविण्याचे "खूळ" मला लागले होते. "खूळ" अशा साठी म्हटले कारण नंतर काही वर्षांनी मला समजले की "दुर्मिळतेच्या" नावाखाली काही साधारण स्वरुपाची गाणी गोळा केली गेली. अर्थात, ही समज यायला काही वर्षे जावी लागली. अशाच काळात मला हे गाणे अवचित सापडले, वास्तविक जमालसेन हे नाव आता कितीजणांना ठाऊक असेल मला शंका आहे. त्यावेळी, १]शामसुंदर, २] विनोद,, ३] जगमोहन आणि असे अनेक संगीतकार माझी श्रवणयात्रा श्रवणीय करून गेले.  
"शोखिया"चित्रपटातील हे गाणे. सुरैय्या आणि प्रेमनाथ यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा, चित्रपट, चित्रपट म्हणून काही खास नव्हता, जवळपास सरधोपट म्हणावा, इतपतच हा चित्रपट होता परंतु या चित्रपटाला जी काही थोडीफार लोकप्रियता लाभली ती केवळ श्रवणीय गाण्यांमुळे. खरतर केदार शर्मांसारखा जाणता दिग्दर्शक असून, चित्रपट सर्वसाधारण प्रकृतीचा निघाला. या चित्रपटात इतकी सुंदर गाणी असून देखील हा चित्रपट काळाच्या ओघात विसरला जावा!! याच काळात, केवळ गाण्यांवर तरलेले असंख्य चित्रपट निघत होते आणि त्यांनी अमाप लोकप्रियता प्राप्त केली. असे देखील असू शकेल, अत्यंत ढोबळ कथानक, प्राथमिक दर्जाचा अभिनय आणि कथेची विस्कळीत मांडणी इत्यादी गोष्टींमुळे हा चित्रपट विस्मरणात गेला. 
"मंद असावे जरा चांदणे, कुंद असावी हवा जराशी;
गर्द कुंतली तुझ्या खुलाव्या, शुभ्र फुलांच्या धुंद मिराशी". 
कविवर्य बोरकरांनी, या ओळींतून जो आशय व्यक्त केला आहे त्याचीच प्रतिकृती जणू "सपना बन साजन आये" या गाण्यातून व्यक्त होते. जरा खोलवर विचार केला तर गाण्यातील शब्द देखील याच आशयाशी जुळणारे आहेत. केदार शर्मांचीच शब्दकळा आहे.
आता सरळ गाण्याकडे वळायचे झाल्यास, लता अगदी तरुण असतानाचे हे गाणे आहे. आवाजाची कोवळीक, लगेच गायनाचे वय दाखवून जाते."सोयी कलिया हस पडी, झुके लाजसे नैन, बिना की झनकार मे तरपन लागे रैन" अशा ओळीने हे गाणे सुरु होते. कुठेही ताल वाद्य नसून, पार्श्वभागी हलकेसे व्हायोलीन आणि बासरीचे तसेच गिटारचे मंद सूर!! परंतु त्याच सुरांनी रचनेची ओळख होते. इथे बघा, "झनकार" शब्द उच्चारताना, "झन" आणि "कार" असा विभागून गाताना, छोटासा आकार लावला आहे तसेच "लागे' म्हणताना, "ला" वर असाच बारीक आकार आहे पण तिथेच लताच्या आवाजाची कोवळीक ऐकायला मिळते आणि आकार लावताना, झऱ्याचे पाणी उतरणीवर यावे त्याप्रमाणे हळुवारपणे ती हरकत समेवर येते.वास्तविक इथे "सम" अशी नाही परंतु ज्या सुरांवर रचना सुरु होते, त्याच सुरांवर रचनेचे सूर परत येतात, ते हेच दर्शविण्यासाठी - "सोयी कलिया हस पडी" या शब्दांचा आशय व्यक्त करण्यासाठी!! 
लगेच "सपना बन साजन आये, हम देख देख मुसकाये, ये नैना भर आये, शरमाये" हि ओळ सुरु होते. इथे संगीतकाराने कमालीच्या हळुवारपणे पार्श्वभागी बासरीचे सूर वापरलेत. "मुसकाये" म्हणताना, वाटणारी मुग्ध लाज, पुढे "शरमाये" या शब्दाच्या वेळी अत्यंत आर्जवी होते आणि आर्जवीपण बासरीच्या मृदू स्वरांनी कशिदाकाम केल्याप्रमाणे शब्दांच्या बरोबरीने ऐकायला मिळते आणि ही रचना अधिक समृद्ध होत जाते. 
आपल्याकडे एक विचार नेहमी मांडला जातो, तीन मिनिटांच्या गाण्यात वैचारिक भाग फारसा अनुभवायला मिळत नाही पण अशी माणसे मनाचे कोपरे फार कोतेपणाने बंद करून टाकीत असतात. आता, वरील ओळीच्या संदर्भात, "शरमाये" या शब्दाबरोबर ऐकायला येणारी बासरीची धून कशी मन लुभावून जाते, हे अनुभवण्यासारखे आहे. काही सेकंदाचा "पीस" आहे परंतु त्याने गाणे एकदम वरच्या पातळीवर जाते. 
पहिल्या अंतऱ्यानंतर, व्हायोलीन एक गत सुरु होते आणि त्याच्या पाठीमागे अति मंजुळ आणि हलक्या आवाजात छोट्या झांजेचे आवाज येतात, हलक्या आवाजात म्हणजे फार बारकाईने ऐकले तरच ऐकायला येतात. व्हायोलीनची गात, तुकड्या तुकड्याने जिथे खंडित होते, तिथे झांजेचा आवाज येतो आणि तो सांगीतिक वाक्यांश उठावदार करतो. हे जे कौशल्य असते, तिथे संगीतकाराची बुद्धीमत्ता दिसते. रचना भरीव कशी करायची, ज्यामुळे मुळातली सुरवातीची चाल, पुढे विस्तारत असताना, अशा जोडकामाने भरजरी वस्त्र सोन्याच्या बारीक धाग्याने अधिक श्रीमंत व्हावे, असे ते संगीत काम असते आणि हे बहुतेक सगळ्याच गाण्यात असते पण आपण तिथे फारसे लक्ष देत नाही, हे दुदैव!! 
पुढील कडवे,"बिछ गये बादल बन कर चादर, इंद्रधनुष पे हमने जाकर , झुले खूब झुलाये, ये नैना भर आये, शरमाये!!" इथे लताची गायकी कशी समृद्ध होते बघा.  "बिछ गये बादल बन कर चादर, इंद्रधनुष पे हमने जाकर" ही ओळ आधीच्या पहिल्या ध्रुवपदाच्या चालीला सुसंगत आहे पण, नंतर, "झुले खूब झुलाये" म्हणताना, आवाजाला जो "हेलकावा" दिला आहे किंवा आपण "हिंदोळा" म्हणू, तो केवळ जीवघेणा आहे. शब्दांची मर्यादा दाखवून देणारा!! 
वास्तविक मधल्या अंतऱ्यात फारसे प्रयोग नाहीत, म्हणजे मुळातली चालच अति गोड असल्याने, त्या चालीला अनुलक्षून अंतरे बांधले आहेत. "नील गगन के सुंदर तारे चून लिये फुल समझ अति न्यारे, झोली मे भर लाये" इथे, "झोली मे भर लाये" हे शब्द म्हणताना, लाटणे आवाजात एक छोटासा "खटका" घेतला आहे पण तो कुठेही लयीत खटकत नाही, हे त्या आवाजाचे मार्दव!! वास्तविक, या कडव्याची सुरवात थोड्या वरच्या पट्टीत आहे परंतु शेवटची ओळ दुसऱ्यांदा म्हणताना, लय परत समेच्या सूरांकडे वळते, ती तिथे तो :खटका" घेऊन!! लताचे गाणे हे असे फुलत असते जे पहिल्या श्रवणात फारसे जाणवत नाही परंतु नंतर प्रत्येक घटक वेगवेगळा घेऊन ऐकायला लागलो की आपल्याला हातात केवळ शरणागती असते!! 
"मस्त पवन थी हम थे अकेले, झिलमील कर बरखा संग खेले; फुले नही समाये, ये नैना भर आये" हे गाताना, लताची शब्दामागील जाणीव अनुभवण्यासारखी आहे. "मस्त पवन थी" या शब्दांचा सांगीतिक आशय किती मृदू स्वरांतून ऐकायला मिळतो, खरेतर सगळे गाणेच हे अतिशय मुग्ध परंतु संयत प्रणयाचा आविष्कार आहे. नायिका, वयाने "नवोढा" आहे, पहिल्या प्रेमाची जाणीव झाली आहे आणि त्यातून हे सूर उत्फुल्लपणे उमटले आहेत, इथे "उमटले" हा शब्दच योग्य आहे, कारण इथे भावनेत तोच आशय आविष्कृत झालेला आहे. मनापासूनची विशुद्ध प्रेमाची भावना, ज्याला थोडेशी अल्लड भावना, असे देखील म्हणता येईल, अशा भावनेचे शब्दचित्र आहे. त्यामुळे चाल बांधताना आणि गाताना कुठेही सूर, मुग्धता सोडून जाणार नाहीत, याचेच भान संगीतकाराने आणि गायिकेने नेमकेपणाने राखले आहे. 
खरतर हे गाणे ऐकताना मला असेच वाटत होते, हल्लीच्या जमान्यात असे शांत, संयत गाणे कितपत पचनी पडू शकेल परंतु जेंव्हा हे गाणे मी जवळपास ८ वर्षांनी ऐकले आणि मला त्यात अजुनही तशीच "ताजगी" आढळली. या गाण्यात कुठेही अति वक्र ताना नाहीत की प्रयोगाचा अवलंब केलेला आहे पण मुळात हाताशी इतकी गोड चाल असल्यावर, अशा गोष्टींची गरजच पडत नाही, हेच खरे. ते स्वरांचे आर्जव, त्यामागील बासरीच्या मंजुळ हरकती, हेच या गाण्याचे खरे वैभव आहे आणि हेच वैशिष्ट्य, मला हे गाणे वारंवार ऐकायला भाग पडते. 
एक मजेदार किस्सा. फार पूर्वी, एका मैफिलीत, पंडित जितेंद्र अभिषेकींनी राग यमन सादर केला. साथीला अर्थात, त्यांचे शिष्य होते. गाताना, पंडितजींनी काहीशा वेगळ्या धर्तीच्या ताना घेतल्या आणि त्याचबरोबर लयीचे वेगळे बंध दाखवले. मैफिल संपल्यावर, शिष्यांनी पंडितजींना, या नवीन सादरीकरणाबद्दल विचारले असता, अत्यंत शांतपणे, पंडितजींनी, या गाण्याचा उल्लेख करून, या गाण्यातील लताबाईंच्या तानांचा उपयोग केला. चित्रपट गीत किती असामान्य माध्यम आहे, यासाठी आणखी वेगळे उदाहरण कशाला? 

जरा सी आहट होती है

पावसाळी हवेतील धुंद संध्याकाळ. प्रियकर सैन्यात सामील झाल्याने दूर गेलेला. मनात उठलेली हुरहूर आणि कालवाकालव. अशाच विक्लांत क्षणी सुरुच्या घनदाट बनात शिरल्यावर, अंगावर कोसळलेला अंधार. तिथल्या प्रत्येक खोडावर उमटलेले स्पर्श, पानांनी ऐकलेले हितगुज या सगळ्याचा झालेला "कोलाज". मनाची सगळी सैरभैर अवस्था आणि त्या अवस्थेतून बाहेर पडण्याची धडपड. नजरेसमोर जाणवत असलेला प्रियकर आणि त्याच्या बरोबर घालवलेले धुंद क्षण, गोकर्णाच्या दुमडलेल्या पाकळीप्रमाणे उमटलेले अस्फुट स्मित. 
रॉय किणीकरांच्या शब्दात ,मांडायचे झाल्यास, 
"लागली समाधी आभाळाला आज,
गौतमीस आली कृतार्थतेची नीज;
बघ तपोवनावर पडले इंद्रधनुष्य,
भगव्या मातीवर नाचे हिरवे हास्य". 
"हकीकत" चित्रपटातील "जरा सी आहट होती है" हे गाणे ऐकताना आणि चित्रीकरण बघताना, मनासमोर असलेच अर्धुकलेले चित्र उभे राहते. यमन रागाचा आधार असलेले हे गीत, प्रणयाच्या अनोख्या रंगाचे अनोखे प्रणयरम्य चित्र. 
हिंदी चित्रपटात एकूणच युद्धपट फारसे निघत नाहीत आणि त्यात देखील युद्धाचा खरा थरार आणि निर्माण झालेल्या झळा फारशा जाणवत नाहीत. १९६२ च्या चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर काढलेला चित्रपट. दिग्दर्शक चेतन आनंदने चित्रपटासाठी लडाखचा डोंगराळ प्रदेश निवडला असल्याने,चित्रपटाला वास्तवाची सुरेख डूब मिळालेली आहे. 
आता या गाण्याच्या संदर्भात मांडायचे झाल्यास, चित्रपटाची नायिका प्रिया राजवंश आहे. दुर्दैवाने अभिनेत्री म्हणून तिच्या अभिनयाला बऱ्याच मर्यादा आहेत. पडद्यावर इतके नितांतरमणीय गाणे चालू आहे पण चेहऱ्यावर त्या भावनेचे अतिशय अस्पष्ट प्रतिबिंब पडावे, हे या गाण्याचे दुर्दैव म्हणायला लागेल. गाण्यातील शब्दकळा मात्र केवळ अप्रतिम, अर्थगर्भ आणि आशयसंपृक्त आहे.     
कैफी आझमी हे नाव उर्दू साहित्यात, विशेषत: शायरीमध्ये फार गौरवाने घेतले जाते. चित्रपट गाण्यांना अजूनही फारसा साहित्यिक दर्जा दिला जात नाही ( दर्जा का दिला जात नाही, हे एक कोडेच आहे!! पण ते असुदे!!) परंतु ज्या कवींनी त्याबाबत अथक प्रयत्न केले त्यात, कैफी आझमी यांचे नाव निश्चित घ्यावे लागेल, जसे शकील, साहिर किंवा गुलजार या यादीत येतील. ( या यादीत आणखी नावे येतील!!) प्रस्तुत गाणे म्हणजे मुक्त छंदाच्या वळणाने गेलेली प्रणय कविता आहे, मुक्त छंदाने अशासाठी, कवितेत, यमकादि गोष्टी आढळत नाहीत, अर्थात मुक्त छंदाचे हेच व्यवच्छेदक लक्षण नव्हे. चित्रपटातील गाण्यात, शब्दांमध्ये आंतरिक लय असावीच लागते तसेच सांगीतिक क्रिया होण्यासाठी शब्द देखील तितकेच अर्थवाही आणि गेयतापूर्ण असावेच लागतात. 
इथेच बघा, "जरा सी आहट होती है तो दिल सोचता है" म्हणजे नायिका, प्रियकराची किती आतुरतेने वाट पहात आहे, हेच दृग्गोचर होते. "आहट" हा शब्दच असा आहे तिथे दुसरा कुठलाच शब्द योग्य नाही!! गाणे हे असे शब्दांकित असावे, तिथे आपण दुसऱ्या कुठल्याच शब्दाची कल्पना करणे अवघड. वास्तविक, चित्रपटात "प्रणय" भावना नेहमीच प्रमुख असते, त्यामुळे, ती भावना शब्दांकित करताना, रचनेत तोचतोचपणा बरेचवेळा जाणवतो परंतु "खानदानी" कवी, तीच भावना अशा असामान्य शब्दातून मांडतो. पुढे, "कहीं कहीं ये वो तो नहीं" हे वाक्य दोनदा लिहिण्यात औचित्य आहे, केवळ सांगीतिक रचनेसाठी केलेली तडजोड नव्हे. 
पुढील कडवे देखील याच दृष्टीने बघणे संय्युक्तिक ठरेल. "छुप के सीने मे कोई जैसे सदा देता है, शाम से पहले दिया दिल को जला देता है; है उसीकी ये सदा, है उसीकी ये अदा" इथे "सदा" शब्द दोन वेळा लिहिला गेला आहे परंतु आशय मात्र वेगळा!! शब्दांशी असे मनोहारी खेळ खेळणे आणि त्याचबरोबर आशयाची अभिव्यक्ती अधिक अंतर्मुख करणे, इथेच कवी दिसतो. 
आता गाण्याकडे वळूया. वास्तविक "हकीकत" हा युद्धपट तरीही अशा चित्रपटात असे प्रणयी गीत!! असो, हा मुद्दा वेगळा आहे. व्हायोलीनच्या सुरांनी रचनेला सुरवात आहे. त्यात देखील एक गंमत आहे, सुरवातीचा व्हायोलीनचा "पीस" १९,२० सेकंदाचा आहे पण त्या सुरांत मध्येच २ तुटक ध्वनी आहेत, ते जर बारकाईने ऐकले तर ध्यानात येतील आणि ते ध्वनी व्हायोलीनचेच आहेत म्हणजे लय साधली ती व्हायोलीनच्या स्वरांनी तरीही मध्येच असे ते २ ध्वनी वेगळे, ज्यांनी तो २० सेकंदाचा "पीस" एकदम वेगळाच होतो, हे मदन मोहनचे कौशल्य. नंतर लगेच लताबाईंचा सूर सुरु होतो. नायिका प्रणयोत्सुक आहे आणि ती भावना, स्वरांकित करताना, "कहीं ये वो तो नहीं" ही ओळ तीनदा गायली आहे पण प्रत्येक वेळेस, "वो" शब्द कसा स्वरांतून, ज्याला "वेळावून" म्हणता येईल असा गायला आहे. लताबाईंचे गाणे कसे शब्दांच्या पलीकडे जाते, ते असे!! 
ह्या कडव्यानंतर व्हायोलीनचे सूर दुपदरी ऐकायला मिळतात!! म्हणजे असे, कडवे संपते आणि पहिल्या अंतऱ्याच्या आधीची सुरावट सुरु होते, ती संतूरच्या ३ स्वरांनी, ते स्वर म्हणजे पुढील व्हायोलीनच्या सुरांना वाट काढून देतात!! थोडक्यात, संतूरच्या सुरांनंतर जी व्हायोलीनची गत सुरु होते, त्या सुरांत दुसरी व्हायोलिन्स वेगळीच गत सुरु करतात आणि काही सेकंदातच परत समेवर येतात. 
"छुप के सीने मे" हे उच्चारल्यावर, त्या क्षणी, एक "आकार" युक्त हरकत घेतली आहे, किती जीवघेणी आहे!! ओळ चालू आहे पण, मध्येच क्षणभर थांबून, त्या लयीतच तो आकार घ्यायचा!! खरच फार कठीण सांगीतिक वाक्यांश!! पुढे, "शाम से पहले दिया दिल को जला देता है" हे गाताना, "शाम" हा शब्द कसा उल्लेखनीय उच्चारला आहे आणि नुसते तेव्हडेच नसून, त्या स्वरांतून, पुढील शब्दांचा आशय देखील मूर्त केला आहे. "है उसी की ये सदा, है उसी की ये अदा"!! मघाशी मी जे कवितेचे विशेष सांगितले तोच विशेष नेमका स्वरांतून मांडणे, "सदा" आणि "अदा" ह्यामागील स्वरांची हलकी वेलांटी, किती तोच भाव अमूर्त करते!! छोटासा "आकार" आहे पण, तोच "आकार" त्या शब्दांचे "विभोर" किती प्रत्ययकारी ऐकायला मिळतात. 
लताबाईंचे गाणे हे असेच छोट्या स्वरांनी अलंकारित असते, जे पहिल्या प्रथम ध्यानात येत नाहीत पण गायला घेतले की त्या "जागा" गळ्यातून घेणे किती अवघड आहे, हे लक्षात येते. एकाच लयीत गाताना, मध्येच त्या लयीत वेगळा सूर लावून, तरीही ती लय कुठेही बेलय होऊ न देता, संगीत वाक्यांश पूर्ण करते, सगळेच अद्भुत!! 
"शक्ल फिरती है" हे गायल्याक्षणी तिथे परत आकार आहे पण पहिल्या अंतऱ्याप्रमाणे नसून थोडासा "सपाट" आहे, म्हणजे गाण्याची लय, चाल तशीच आहे पण तरीही असे आलाप वेगवेगळ्या प्रकारे आलेत!! भारतीय संगीताचे हे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शब्द देखील किती अप्रतिम आहेत!! "शक्ल फिरती है निगाहो मे वोही प्यारी सी, मेरी नसनस मे मचलने लगी चिंगारी सी;छु गयी जिस्म मेरा, किसके दामन की हवा"!! व्वा, गाण्याला दाद द्यावी, तशी शब्दांना द्यावीशी वाटली.  
वास्तविक गाणे केवळ दोनच कडव्यांचे आहे पण गाण्यातील प्रत्येक सूर आणि त्याबरोबरची लय, इतकी अप्रतिम आहे की वेगळे काही बोलायची सोयच उरलेली नाही. आणखी एक मुद्दा!! सतार आणि मदन मोहन यांचे नाते "अद्वैत" असे नेहमी म्हटले जाते पण या गाण्यात सतारीचा एकही सूर नाही!! गाण्यातील काव्य आणि संगीत रचना, ह्या नेहमी हातात हात घालून सादर व्हावे, अशी अपेक्षा बहुतांशी असते पण फारच थोड्या गाण्याच्या बाबतीत असा भाग्ययोग जुळून येतो. मदन मोहन आणि लताबाई, यांनी कितीतरी अजरामर गाणी दिली आहेत, त्यामुळे हेच गाणे मी का निवडले, याला कसलेच संय्युक्तिक उत्तर नाही, कदाचित या गाण्यात सतारीचा अजिबात वापर नाही, हे कारण देखील असू शकते!! अर्थात हे संगीतबाह्य कारण आहे. गाण्याची चाल अद्भुत आहे, हेच खरे महत्वाचे. 


छा गये बादल नील गगन पर!!

सर्वसाधारणपणे साहिरला, कवीमंडळीत उर्दू कवी म्हणून मान्यता आहे आणि ती मान्यता तशी सार्थच आहे. कवी म्हणून साहिर केवळ अजोड असा कवी होता. तसे पाहिले तर त्याच्या काळात, "कैफी आझमी","मजरुह", शकील", "जान निसार अख्तर" सारखे तितकेच असामान्य शायर चित्रपटाच्या प्रांगणात होते तरी कुणालाही साहिरप्रमाणे यश आणि Glamour मिळाले नाही, आणि ही वस्तुस्थिती आहे. कवितेचा दर्जा, प्रसिद्धी याबाबतीत त्याला चित्रपटसंगीतात तुलना आजही नाही. याच साहिरने, कारकीर्द बहरात असताना, "चित्रलेखा" चित्रपटात, केवळ चित्रपट हिंदू राज्यकर्त्यांचा आहे म्हणून, एकही उर्दू शब्द न वापरता, केवळ हिंदी भाषेत कवितेच्या रचना केल्या आहेत आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या चित्रपटातील गाणी, कविता म्हणून वाचताना, आशय, गेयता, वैचारिक समृद्धता याचीच साक्ष आपल्याला मिळते. १९४२ सालच्या "चित्रपटाचा" हा १९६४ मध्ये "रिमेक" आहे. प्रसिद्ध दिग्दर्शन केदार शर्मांनी, चंद्रगुप्त मौर्य काळातील एका कथेचाआधार घेऊन, चित्रपटाची निर्मिती केली होती. चित्रपटात, प्रमुख भूमिका - अशोक कुमार, मीना कुमारी आणि प्रदीप कुमार. अर्थात अभिनयाच्या पारड्यात प्रदीप कुमार कमअस्सल असला तरी त्याच्या वाट्याला जी गाणी आली, त्याने अभिनयाची कसर भरून निघते आणि याचे श्रेय नि:संशय संगीतकार रोशनकडे जाते. "चित्रलेखा" चित्रपटातील सगळीच गाणी अप्रतिम आहेत तरीही "छा गये बादल" सारखे रमणीय गीत, काही वेगळ्याच "चवीचे" आहे. युगुलगीत बांधताना, संगीतकारासमोर काही प्रश्न अवश्यमेव पडतात. गाण्यात गायक आणि गायिकेला किती प्राधान्य द्यायचे? गाणे, दोन आवाजात बांधायचे आहे, तेंव्हा दोन्ही आवाजांना सम प्रमाणात "वाटा" मिळणे आवश्यक ठरते परंतु कवितेचा आशय, घाट याचा सम्यक विचार करणे गरजेचे असते आणि त्यानुसार आवाजाला प्राधान्य देण्याचा निर्णय घ्यायचा असतो आणि तो निर्णय तसा सहज नसतो.पुढील रचना, अधिक जिज्ञासेने ऐकली जाते. इथे गाण्याची सुरवात, सतारीच्या सुरांनी आणि त्याच्या पार्श्वभागी स्वरमंडळ!! या सुरांनी "तिलक कामोद" रागाची ओळख होते!! अस्ताईमधील प नि सा रे या सुरांनी राग स्पष्ट होतो पण तरीही राग ओळख, अशी स्वरांची ठेवण नसून, केवळ "आधार" स्वर असल्याचे लक्षात येते. "छा गये बादल नील गगनपर, घुल गया कजरा सांज ढले" ओळीची सुरवातच कशी सुंदर आहे. प्रणयोत्सुक जोडप्याची प्रणयी भावना आहे. "छा" शब्द कसा आशाबाईंनी उच्चारला आहे. स्वरात अर्जाव तर नक्कीच आहे पण त्याचबरोबर ओळीतील पुढील आशयाचे नेमके सूचन आहे. मघाशी मी, "मुखडा" हा शब्द वापरला तो या संदर्भात. पुढे याच ओळीती "कजरा" शब्दावरील जीवघेणा हेलकावा, केवळ कानाच्या श्रुती मनोरम करणाऱ्या!! ओळीचा संपूर्ण अर्थ ध्यानात घेता, "कजरा" शब्दातील "रा" या शेवटच्या अक्षराचे महत्व आणि तिथला स्वरांचा नाजूक हेलकावा, एखाद्या प्रणयिनीच्या डोळ्यांच्या विभ्रमाप्रमाणे अवघड आहे. इथे लयीला जो ताल वापरला आहे, त्याची गती आणि मात्रेचे "वजन" ऐकण्यासारखे आहे. जसे स्वर "वळतात" त्याच हिशेबात, तालाच्या मात्रांचे वजन राखलेले आहे. संगीतकार म्हणून रोशनचे हे "खास" वैशिष्ट्य म्हणावे लागेल. गाणे बांधताना, आपण शब्दांसाठी सूर पुरवत आहोत, ही जाणीव फार थोड्या संगीतकारांच्या रचनेत दिसून येते आणि त्यात रोशनचे नाव नेहमीच अग्रभागी राहील. पहिली ओळ संपल्यावर, क्षणमात्र "व्हायोलीन" चे सूर ऐकायला येतात पण किती अल्प काळ!! हे वाद्य वरच्या पट्टीत जात असताना, तिथेच ते सूर "रोखले" आहेत आणि लगेच बासरी आणि सतारीच्या सुरांचे "नर्तन" सुरु होते. रोशनच्या रचनेत, वाद्यांचे असे क्षणमात्र "बंधन" आणि लगेच मूळ लयीत पुढील वाद्यमेळ, हा जो सांगीतिक विचार दिसतो, तो केवळ अतुलनीय आहे. लय वरच्या पट्टीत जाण्याचे अत्यंत अल्पकाळ सूचन करायचे आणि तिथेच ती लय "खंडित" करायची आणि पुढील संगीत वाक्यांश मूळ लयीशी आणून जोडायचा!! अशी रचना अजिबात सोपी नव्हे! "देख के मेरा मन बेचैन, रैन से पहले हो गयी रैन; आज हृदय के स्वप्न फले, घुल गया कजरा सांज ढले"& आशाबाईंना नेहमी "शब्दभोगी" गायिका असे म्हटले जाते आणि ते कसे सार्थ आहे, ते ह्या ओळीतून दिसून येते. या ओळीतील, "बेचैन" शब्द ऐका, त्या शब्दाचा नेमका अर्क, सुरांतून मांडला आहे. शब्दप्रधान गायकी म्हणजे काय, याचे ह्या ओळी हे समर्थ उदाहरण म्हणता येईल. लय तशी मध्यम आहे तरीही "देख" शब्दावर किंचित जोर देऊन, "बेचैन शब्दाची "ओळख पटवून, शेवटचा शब्द "रैन", इथे छोटासा "एकार" घेऊन संपविणे, बारकाईने ऐकण्यासारखे आहे. गंमतीचा भाग असा आहे, पुढील ओळ - "आज हृदय के स्वप्न फले" म्हणताना स्वर आणि लय किंचित वरच्या सुरांत घेताना, आशयाला कुठेही धक्का लागत नाही. "स्वप्न फले" मधील "अतृप्त" अशी "तृप्ती" दाखवली आहे!! केवळ आशाबाईच असला स्वरीक खेळ मांडू शकतात!! पुढील कडव्यात रफीचा आवाज अवतरतो, पण त्याचे "येणे" देखील किती सुंदर आहे. "रूप की संगत और एकांत, आज भटकता मन है शांत; कह दो समय से थमके चले, घुल गया कजरा सांज ढले". ह्या ओळी येण्याआधी, मधल्या अंतरा आणि तिथले संगीत जरा बारकाईने ऐकावे, व्हायलीनचा "पीस" संपताना, छोटासा स्वरमंडळाचा स्वरांचा "पुंजका" आहे आणि ते स्वर, पुरुष गायकाचा निर्देश करतात. ही रोशनची करामत. असाच प्रकार त्याने, पुढे, "हम इंतजार करेंगे" या अशाच अजरामर युगुलगीतात केलेला आहे. या स्वरांच्या मागील विचार महत्वाचा आहे. या स्वरांनी, नायकाच्या आवाजाने, नायिकेच्या मनात जी गोड शिरशिरी उमटते, त्याचे सूचन आहे!! या ओळी आणि त्याला लावलेली चाल, हाच विचार आपल्यापुढे मांडतात. "कह दो समय से थम के चले" हे शब्दच किती सुंदर आहेत, आपली प्रेयसी आपल्याला भेटली आहे आणि तिच्या संगतीने आपले "ओढाळ" मन स्थिरावले आहे आणि अशी वेळ, कधीच संपू नये, अशी सार्वकालिक भावना, तितक्याच सुंदर शब्दात व्यक्त झालेली आहे आणि इथे पुरुषाचा(च) आवाज असायला हवा आणि तो देखील किती "मृदू" आणि "संयत" भावनेने व्यक्त झालेला आहे. रोशनकडे, रफीने गायलेली गाणी ही अशीच आहेत, कुठेही स्वरांची "आरास" मांडली आहे, असे कधीच नसते तर आवाजातील मूळ गोडवा अधिक गोड कसा सादर होईल, इकडे रोशन यांचे लक्ष असते. मुळातली असामान्य लयकारी आणि तिथे रफीचा शांत आवाज, हे द्वैत, केवळ अप्रतिम आहे. इथे आणखी एक मजा, आहे, रफीने उच्चारलेली "छा गये गये बादल" ही ओळ आणि आशाबाईंनी , गाण्याच्या सुरवातीला, उच्चारलेली ओळ, किती बारीक पण तरीही अर्थपूर्ण फरक आहे, प्रत्येक कलाकाराचा वेगवेगळा दृष्टीकोन प्रकट करणारी, ही उदाहरणे आहेत. "अन्धीयारो की चादर तान, एक होंगे दो व्याकूल प्राण; आज ना कोई दीप जले, घुल गया कजरा सांज ढले". इथे परत आशाबाईंचे स्वर येतात. कवितेच्या ओळीच तशा आहेत. प्रणयी जोडप्याच्या हृदयाची "धडकन" कशी नेमक्या शब्दात वर्णन केली आहे!! "आज ना कोई दीप जले" मधील "जले" शब्दानंतरचा "एकार" देखील असाच अफलातून आहे. वरती, मी "रैन" शब्दानंतरचा असाच "एकार" लिहिला आहे, ते स्वर आणि या शब्दानंतरचे स्वर, जरा नीट लक्ष देऊन ऐकल्यास, त्यातील "फरक" ध्यानात येईल. आशाबाई गायिका म्हणून किती वरच्या दर्जाच्या आहेत, हे लगेच ध्यानात येईल. गाणे मीनाकुमारी आणि प्रदीप कुमार, यांच्यावर चित्रित झालेले आहे.संध्याकाळच्या रमणीय पार्श्वभूमीवर, प्रणयाचे अनोखे रंग मीनाकुमारीच्या चेहऱ्यावर निराखाने, हे अतुलनीय अनुभव आहे. गाण्याची चाल गोड, नितळ तर आहेच पण तरीही "गायकी" अंगाची आहे. लय शब्दागणिक "हेलकावे" घेत असते आणि त्यातच या गाण्याचे खरे सौंदर्य दडलेले आहे. <