Sunday, 24 January 2016

पुछो ना कैसे मैने रैन बितायी

"आहे गुणगुण,
      आहे मिणमिण,
खंगतात रंग अस्ताचलांतून;
केवळ धुसर शुन्य नादहीन. 
किटतात पर्णे,
      जिणे जीवघेणे,
जगती मुक्याने फांद्याफांद्यांतून,
काळोखी कवेंत हालतात म्लान."
आरती प्रभूंच्या या ओळींतून, मानवी दु:खाचे अत्यंत गडद रंग अम्लानपणे उमटतात. सगळीकडे केवळ काळोखी, राखाडी रंग पसरला असून, कुठेच आशेचा किरण दिसत नाही पण तरीही आपले आयुष्य आपल्याला अटळपणे भोगावे लागणारच असते. तिथे आपल्या हाती कुठलाच पर्याय शिल्लक नसतो.  केवळ श्वास आहे म्हणून आयुष्य आहे.  
चित्रपट गीतांत अशाच प्रकारच्या भावनेवर असंख्य गाणी निर्माण झाली आहेत. अर्थात, चित्रपट गीतांत, कविता म्हणून विचार करता, इतकी तरल भावना अपवाद परिस्थितीत वाचायला मिळते आणि याचे मुख्य कारण, चित्रपट गीत ही प्रामुख्याने सामान्य रसिकांसाठी लिहिलेले असते आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शब्दांना दृश्यरूप देणे, ही या माध्यमाची प्राथमिक गरज असते. मानवी भावनांच्या अति तरल छटा पडद्यावर तितक्याच समर्थपणे दाखवणे तसे फार अवघड असते. त्यामुळे, गीत लिहिताना, दृष्यभान ठेवणे आवश्यक असते.
"मेरी सुरत तेरी आंखे" या चित्रपटातील " पूछो ना कैसे मैने रैन बितायी" या गाण्यात, मी वर मांडलेल्या आरतीप्रभूंच्या ओळींचे काहीसे अर्धुकलेले दर्शन वाचायला मिळते. चित्रपटातील गाणे हे नेहमीच चटपटीत तरीही आशयपूर्ण असावे लागते. कवी शैलेंद्र यांनी हे गाणे लिहिताना असा विचार केलेला आढळतो. खरतर शैलेंद्र यांच्या कविता बहुश: अत्यंत साध्या, सोप्या शब्दांत लिहिलेल्या असतात परंतु तशाच शब्दांतून अर्थवाही भावना मांडण्यात, हा कवी बरेचवेळा यशस्वी झालेला दिसतो.आता हे गाणे, केवळ काव्य म्हणून वाचायला घेतले तर,  
"पूछो ना कैसे मैने रैन बितायी
इक पल जैसे, इक युग बिता 
युग बीते मोहे नींद ना आई!!"
या ओळींतूनच आपल्याला, पडद्यावरील पात्राची भावस्थिती समजून घेता येते आणि हेच तर, चित्रपट गीतांत महत्वाचे असते. अत्यंत थोड्या शब्दात, प्रसंगाची जाण व्यक्त होणे महत्वाचे.या चित्रपटात, अशोक कुमारची भूमिका सर्वस्वी वेगळी आहे. प्रतिभाशाली गायक परंतु लहानपणीच कुरूप चेहऱ्याचा म्हणून "टाकून" दिलेला. उपेक्षेचे जिणे जगावे लागल्याने, केवळ खंतावलेले मन नसून मनात एकूणच प्रचंड न्यूनगंड तयार झालेला. त्यामुळे प्रसिद्धीपेक्षा सिद्धीकडे अधिक लक्ष. आयुष्य अंधारी जगात काढण्याची मनीषा आणि तसेच जगायला सुरवात केलेली. अर्थात, कधीतरी मनात दाबून ठेवलेल्या इच्छा उफाळून वर येणे क्रमप्राप्तच आणि याच जाणीवेतून, त्या गायकाच्या मनात ही "विराणी" तयार होते. आता सकाळ उजाडली आहे पण मनातील अंध:कार तसाच साचलेला आहे. त्यातून उद्भवलेली निराशा, हाच या रचनेचा पाया आहे. त्यामुळे गाण्याचे चित्रीकरण हे अंधारी जगात होणे साहजिक.सकाळची वेळ असून देखील, गाण्याची चाल काहीशी दुर्मुखलेली आहे, यामागचे हे महत्वाचे कारण.   
इथे आणखी एक विशेष सांगता येईल. चित्रपटाचा नायक - अशोक कुमार. अत्यंत देखणा,राजबिंडा आणि रुबाबदार अभिनेता. अतिशय संवेदनशील कलाकार म्हणून विख्यात. आता, या चित्रपटातील भूमिका बघितली  तर,संपूर्ण वेगळ्या ढंगाची आहे. विद्रूप चेहरा जन्मत:  लाभल्याने,प्रसिद्धीपासून सतत दूर राहण्याची असोशी. सतत अंधारात वावरण्याची  जडवून घेतली आहे. हे गाणे देखील, अशाच अंधाऱ्या वेळेस  सुरु होते. वास्तविक, गाणे गायकी वळणाचे आहे. बहुतेकवेळा, शास्त्रीय अंगाचे गाणे अभिनित करायची वेळ आली म्हणजे अभिनेता  आक्रस्ताळी अभिनयाकडे वळतात पण इथे आपण बघितले तर, आपल्याला दिसतो तो अशोक कुमार यांचा अतिशय संयत वेदनेचा अविर्भाव. गाणे अवघड चालीचे आहे पण कुठेही अभिनित करताना, अभिनय गाण्याच्या चालीशी जराही विसंगत ठरणार नाही याची योग्य ती काळजी घेणारा. 
आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या कारकिर्दीतील काही खऱ्या अर्थी अजरामर रचना घेतल्या, तर त्यात या गाण्याचा अंतर्भाव अवश्य करावाच लागेल. "अहिर भैरव" रागाचे स्वर आधाराला घेतले आहेत. वास्तविक, अहिर भैरव हा सकाळचा राग मानला जातो आणि सकाळचे राग, प्रामुख्याने आनंदी, काहीसे अंतर्मुख अशा प्रकारचे असतात पण हीच तर भारतीय संगीताची खासियत आहे. एकाच रागातून अनंत छटा निर्माण करण्याची असामान्य क्षमता रागसंगीतात नेहमीच दडलेली आढळते. 
कवितेतील करुण, आर्त भाव, संगीतकाराने तितक्याच समर्थपणे रचनेतून प्रतीत केला आहे आणि गायक मन्ना डे यांच्या गायकीतून तितक्याच अप्रतिमरीत्या ऐकायला मिळतो. सुरवातीचे सारंगीचे सूर आपल्या समोर गाण्याची पार्श्वभूमी तयार करतात. गाण्याचा "मुखडा" किती सुंदर आहे. सारंगीचे सूर कानात तरळत असताना, आपल्याला मन्ना डेच्या आवाजात आलापीचे सूर ऐकायला मिळतात मुळात, या गायकाचा आवाज म्हणजे ज्याला "अस्सल" गायकी म्हणता येईल असा आहे आणि इथे तर "गायकी" ढंगाची चाल मिळाल्यावर, त्याच आवाजातील घुमारेदार मार्दव अधिकच खुलून येते. या आलापीमधूनच आपल्याला "अहिर भैरव" रागाची ओळख पटते.  
चित्रपट गीतांत, गायकी कशी दाखवता येते हे या गाण्यातून बघता येते."युग बीते मोहे नींद ना आई" ही ओळ गाताना, "बीते" या शब्दावर किंचित "कंप" घेतला आहे आणि तो देखील किती सूक्ष्म आहे!! नीट ऐकला तरच ध्यानात येतो. इथे गाण्याच्या सगळ्या ओळी लक्षात घ्यायला घेणे जरुरीचे आहे. "युग बीते" मध्ये जी विषण्णतेची छटा आहे, त्याला असला "कंप" आवश्यकच आहे, जेणेकरून शब्दातील आशय अधिक भावगर्भ व्हावा. चित्रपट गीतांत गायकी ही अशाच अलंकाराने दिसते आणि सजलेली असते. पुढे "मोहे नींद ना आई" म्हणताना आवाज अधिक हळुवार आणि खालच्या पट्टीत आणला आहे आणि यामागे त्या शब्दातील औचित्य, सुरांच्या सहाय्याने खुलवले आहे, हाच विचार दिसतो. गाणे गाताना, गाण्यातील शब्द आणि त्यातील आशय समजून घेऊन, त्या शब्दांना, तशाच सुरांची जेंव्हा "अपरिहार्यता" मिळते, तिथे ते गाणे नेमक्या अर्थाने जमून जाते आणि ही अपरिहार्यता कशी तर तिथे दुसरा कुठलाच सूर प्रवेश करू शकत नाही. तिथे तोच सूर आणि त्याच "वजनाने" यायला हवा. 
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा जो वाद्यमेळ आहे, त्यात सारंगीचे सूर प्रामुख्याने ऐकायला येतात आणि गाण्याच्या आधी जी सारंगीची सुरावट आहे, त्याचाच अधिक खोल विस्तार, या इथे ऐकायला मिळतो आणि याचा परिणाम, रचना अधिक बांधीव होते. गाण्याची चाल इतकी आर्त आहे की तिथे आणखी कुठल्याच वाद्याची गरज भासत नाही. मुळात, सारंगी हे वाद्यच पटकन मनाची तार छेडणारे वाद्य आणि इथे तर फक्त त्याच वाद्याचा वावर!!  
"इक जले दीपक, इक मन मेरा 
फिर भी ना जाये मेरा घर का अंधेरा 
तरपत, तरसत उमर गवायी 
पूछो ना कैसे मैने रैन बितायी"
या ओळी गाताना, गायकाने एके ठिकाणी अतिशय सुंदर हरकत घेतली आहे."इक जले दीपक, इक मन मेरा" ही ओळ वारंवार घेतली आहे पण प्रत्येक वेळेस सुरांचे वळण वेगळे आहे, प्रत्ययकारी आहे. "मेरा" शब्द घेताना, इथे स्वर तर थोडा उंचावला आहेच पण तो इतका देखील वरच्या सुरांत नाही की तिथे "गायकी" प्रस्थापित होईल. शब्दांतील हताषता सुरांतून कशी मांडायची, याचा हा सुंदर वस्तुपाठ आहे. कुठेही विशविशीतपणा नाही तर प्रत्येक सूर हा, प्रत्येकवेळी रचनेच्या पहिल्या सुराशी नाते जडवून घेतो. असे असून देखील, रचना म्हणजे रागाचे "लक्षण गीत" नाही, हे देखील समजून घेता येते. "उमर गवायी" म्हणताना ज्या सुरांत गायले गेले आहे ते ऐकताना, मला नेमके काय म्हणायचे आहे, याचा अंदाज घेता येईल. अर्थात, इथे संगीतकार सचिन देव बर्मन यांचे श्रेय देखील तितकेच महत्वाचे. ही "शब्दप्रधान गायकी" आहे पण "कविता वाचन" नव्हे!!
"फिर भी ना जाये मेरा घर का अंधेरा" ही ओळ म्हणताना, सुरवात मंद्र सप्तकातील सुरांत होते पण लगेच "मेरा घर का अंधेरा" हे शब्द घेताना सूर किंचित उंचावला गेला आहे, विशेषत: "का" अक्षर घेताना स्वरांतून जी व्याकुळता प्रदर्शित होते, ती खास गायकाच्या गायनाची खूण!! "अंधेरा" अधिक गडद होतो. मजेचा भाग असा आहे, हा अंतरा वेगळ्या सुरांवर सुरु होतो आणि तिथे मूळ रागाच्या सुरांपासून फारकत आहे पण, अंतरा संपत असताना, आपण परत मुखड्याच्या सुरांपाशी येउन थांबतो. हे सगळे केवळ अनिर्वचनीय आहे. 
संगीतकार सचिन देव बर्मन यांनी, रचना बांधताना सरळसोट "केरवा" ताल वापरला आहे पण तोच ताल संपूर्ण रचनेत तसाच कायम ठेवला आहे. किंबहुना अतिशय धीम्या लयीत तालाचे बोल चालत आहेत. धीम्या वजनाचा केरवा ताल रचनेत फिरत आहे. 
दुसरा अंतरा सुरु होण्याआधी, परत सारंगीची तशीच "गत" कायम ठेवली आहे आणि त्याच सुरांवर दुसरा अंतरा सुरु होतो. 
"ना कही चंदा, ना कही तारे 
ज्योत के प्यासे मेरे नैन बेचारे 
भोर भी आस कि किरन ना लायी 
पूछो ना कैसे मैने रैन बितायी"
हा अंतरा पहिल्या अंतरयाशी नाते राखून गायला गेला आहे. किंबहुना, स्वरांतील छोटे,छोटे खटके देखील त्याचप्रमाणात घेतले आहे. खरतर बरेच संगीतकार इथे प्रयोगशीलता दाखवतात पण इथे संगीतकाराने, स्वरांचा तोच "आराखडा" कायम ठेवून, आधी जो परिणाम साधलेला आहे, तोच परिणाम अधिक गडद, खोलवर केलेला आहे.वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, संगीतकाराला, आपण जी तर्ज निर्माण केली आहे, त्याच्यावर प्रचंड आत्मविश्वास असल्याचे द्योतक आहे आणि जर का आपण, हाच दृष्टीकोन लक्षात घेतला तर तो विश्वास अनाठायी नाही, याचाच प्रत्यय घेता येतो.
कवी शैलेंद्रने लिहिताना, "भोर भी आस कि किरन ना लायी" या शब्दात जी निराशता मांडली आहे, त्याचेच फलस्वरूप स्वरांतून ऐकायला मिळते आणि मग त्या गाण्याला चिरंजीवित्व मिळते, यात नवल ते कसले!!   

Attachments 

No comments:

Post a Comment