Friday, 8 January 2016

निगाहे मिलाने को जी चाहता है

सुगम संगीतात, प्रत्येक आविष्काराचा एक स्वतंत्र ढाचा असतो. त्याची स्वतंत्र  संस्कृती असते आणि त्याला अनुरूप शब्दकळा, स्वरिक रचना आणि गायन, हे सगळे घटक त्या आविष्कारात एकवटतात. त्याचा स्वत:चा असा "लहेजा" असतो आणि खुमारी असते. गझलेची शायरी भावगीतापेक्षा वेगळी तर कव्वालीचा रचना ढंग वेगळा. प्रत्येक गीताच्या शब्दकळेनुरूप सादरीकरण आणि सांगीतिक वाक्यांशाचा बदल आणि गायनाची पद्धत बदलत असते. खरतर कुळशील भिन्न असते.
गझल म्हणजे भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार तर कव्वाली हा सुफी पंथातून निघालेला अधिक ललित भाग. तसे बघितले तर या रचनेत रागदारी संगीताचा प्रभाव तर नक्कीच असतो पण रागाचे मूळ स्वरूप बाजूला ठेऊन, त्यातील लालित्याचा भाग अंगिकारला जातो. अर्थात, शायरीची रचना देखील वेगळी असणे क्रमप्राप्तच असते. कव्वालीमध्ये  शृंगारिक, भक्तीभाव तसेच सवाल-जवाब पद्धतीने शायरीचे घाट बदलत असतात आणि त्यानुसार चालीची रचना तयार होत असते. 
"निगाहे मिलाने को जी चाहता है" ही कव्वाली, हिंदी  गीतांतील एक अजरामर रचना म्हणून मान्यता पावली आहे. संगीतकार रोशन, यांनी या रचनेची चाल  बांधली आहे. रोशन यांच्या कारकिर्दीकडे जरा बारकाईने बघितले तर, त्यांच्यावर उर्दू संस्कृतीचा प्रभाव आणि ठसा पडलेला आढळतो. उर्दू संस्कृतीत आढळणारे आलिशान वर्णन तसेच शृंगार आणि विलासी जीवनाचे प्रतिबिंब, शायरीमध्ये नेमकेपणी दिसते आणि त्याचाच अतिशय रम्य आविष्कार संगीतासारख्या तरल कलेतून वारंवार आढळतो. "दिल ही तो है", या चित्रपटातील ही कव्वाली, प्रसिद्ध कवी साहिर लुधीयान्वी यांनी लिहिली आहे. पारंपारिक रचनेत, आपल्याला नेहमीच सवाल-जवाब वाचायला मिळतात आणि त्या निमित्ताने भाषेतील खटकेबाज आणि रंगतदार शब्दकळा अनुभवायला मिळते. 
गंमत असते ती सगळी रचना कौशल्यात. एकतर अशा प्रकारच्या रचना, त्याचा अंगभूत स्वभावामुळे काहीशा दीर्घ स्वरूपाच्या असतात, जेणेकरून शायरीमध्ये भाषिक फुलोरा फुलून यावा. 
"राज की बात है महफ़िल में कहे या ना कहे,
बस गया है कोई इस दिल मे कहे या ना कहे.

निगाहे मिलाने को जी चाहता है
दिल-ओ-जान लुटाने को जी चाहता है."

चित्रपटात, ही रचना प्रामुख्याने नूतन या अभिनेत्रीवर चित्रित झाली आहे. वास्तविक, ही अभिनेत्री गंभीर भूमिकांसाठी प्रसिद्ध होती.पण, या गाण्यावरील तिचा अभिनय केवळ अप्रतिम. कवितेत मांडलेला आशय, तिच्या चेहऱ्यावर इतका समर्थपणे उमटलेला दिसतो की त्यामुळे, एकूणच रचनेची खुमारी अधिक वाढते. विशेषत:, "निगाहे मिलाने को जी चाहता है" या ओळीवरील तिच्या चेहऱ्यावरील खोडकर छटा खास अनुभवण्यासारखी आहे. एकतर तिला संगीताची उपजत जाण असल्याचे समजते. ही वरील ओळ जेंव्हा आशाताईंच्या गळ्यातून बाहेर येते, तेंव्हा Camera तिच्या चेहऱ्यावरील भाव अगदी नेमकेपणाने टिपतो आणि गाण्याची गोडी अधिक वाढते.  
गाण्याची सुरवात,  पारंपारिक कव्वाली थाटाने झाली आहे, म्हणजे ढोलक,हार्मोनियम आणि टाळ्या यांचा समन्वय साधून, गाण्याची पार्श्वभूमी तयार केली आहे. अर्थात,  हळूहळू द्रुत गतीत नेउन, एका विविक्षित क्षणी थांबवली आहे आणि तिथे आपल्याला आशा भोसलेंच्या आवाजात छोटीशी आलापी आणि मुखडा समोर येतो. खरतर इथेच यमन राग आपल्याला कळून घेता येतो. सुरवातीच्या द्रुत लयीतून, रचनेची सुरवात काहीशी संथ लयीत होते आणि चाल मनाची पक्कड घेते. इथे आणखी एक वैशिष्ट्य सांगावे लागेल. शायरी उर्दू आहे आणि त्या भाषेचा लहेजा, आशा भोसले यांनी आपल्या स्वरांतून अतिशय नेमकेपणी दाखवला आहे. 
"वो तोहमत जिसे इश्क कहती है दुनिया,
वो तोहमत उठाने को जी चाहता है."
इथे "इश्क" आणि "तोहमत" हे खास उर्दू शब्द आहेत आणि ते या ओळीतील आशयाचा अर्क आहेत. गायिकेने, याचे ने महत्व जाणून, आपल्या स्वरिक आविष्काराने कसे मांडले आहेत, हे ऐकण्यासारखे आहे. प्रत्येक भाषेची जी खासियत असते, ती त्यातील शब्दांच्या उच्चारात आणि ते उच्चार, जसेच्या तसे स्वरांतून काढणे, ही बाब वाटते तितकी सहजगत्या जमणारी कधीच नसते. कवी म्हणून साहिर आणि गायिका म्हणून आशा भोसले, यांचे श्रेष्ठत्व अशाच छोट्या पण अति महत्वाच्या जागेतून दिसून येते. गाण्याची लय किंचित जलद झाली आहे, तालाचा वेग देखील वाढला आहे आणि अशा वेळेस, शब्दाचे वजन अचूक  दाखवणे,सुगम संगीतात नेहमीच अत्यावश्यक असते. 
"किसी के मनाने में लज्जत वो पायी, 
के फिर रूठ जाने को जी चाहता है." 
मघाशी मी नूतनच्या अभिनयाचे वर्णन करताना, चेहऱ्यावरील खोडकर भावाबद्दल लिहिले होते. इथे शब्दकळा बदलेली आणि "लज्जत" तसेच "रूठ" या शब्दातून प्रणयातील मुग्ध भाव समोर आला. नूतन, हेच भाव आपल्या चेहऱ्यावर किती अप्रतिम दाखवते. हा वाचिक अभिनय, गाण्याची "लज्जत" आणखी वाढवतो. 
गाण्याची चाल गायकी ढंगाची आहे आणि गाण्यात विस्ताराच्या अनेक शक्यता दिसतात. याचाच परिणाम असा, 
"वो जलवा जो ओझल भी है सामने भी,
वो जलवा चुराने को जी चाहता है". 
यातील पहिली ओळ गाताना, ती गायकी अंगाने घेतली आहे परंतु गायकी अंग म्हणजे रागाचे प्रदर्शन नव्हे. लयीच्या ओघात, तीच ओळ वेगवेगळ्या "अंगाने" आळवून, परत परत घोळवली आहे. इथे गाण्याची लय अधिक द्रुत होते आणि हे पारंपारिक कव्वाली रचनेचे वैशिष्ट्य म्हणता येईल. सुरवातीची संथ लय आणि आताची द्रुत लय, परत ऐकली म्हणजे यातील सांगीतिक वाक्यांशाचा आनंद घेता येईल.
यापुढील रचना, गाण्याच्या दृष्टीने थोडी दीर्घ आहे. 
"जिस घडी मेरी निगाहो को तेरी दीद हुई  
वो घडी मेरे लिये ऐश की तमहीद  हुई  
जब कभी मैने तेरा चांद सा चेहरा देखा  
ईद हो या के नी हो, मेरे लिये ईद हुयी
वो जलवा जो ओझल भी है सामने भी 
वो जलवा चुराने को जी चाहता है" 
या ओळी वाचताना, आपल्याला सहज समजून घेत येईल, या ओळीतून, नायिकेचा आपल्या सखींशी संवाद चालला आहे. आपला नायक डोळ्यासमोर आहे पण वेगळ्या रुपात आलेला आहे. "वो घडी मेरे लिये ऐश की तमहीद  हुई, ईद हो या के नी हो, मेरे लिये ईद हुयी" इथे मुस्लिम संस्कृतीतील "ईद" आणि "चांद" याचा गोड संबंध ध्यानात घेतला म्हणजे शब्दातील खुमारी ध्यानात येईल. कव्वाली रचनेत हीच तर खरी गंमत असते. शाब्दिक फुलोरा आणि उपमांचे संयोजन जागोजागी वाचायला मिळते. या ओळींमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला हरकती ऐकायला मिळतात पण त्या हरकतींतून गाण्याचा गोडवा अधिक वाढतो आणि संगीतकार म्हणून रोशन यांचे हे खास कर्तृत्व म्हणावे लागेल. 
हा अंतरा झाला की आपल्याला अप्रतिम सरगम ऐकायला मिळते. "नि रे ग ग रे ग नि म" अशी ती सरगम आहे. हा तर यमन रागाचा वाक्यांश. इथे आशा भोसले "खालच्या रे पासून वरचा रे" किती अचूक घेतात, ही मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. लयीची गती घेऊन, तालाची गती सांभाळून, ही सरगम (हरकतींच्या फिरतीसह) कव्वालीला वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवते. 
"मुलाकात का कोई पैगाम दीजे 
के छुप छुप के आने को जी चाहता है 
और आ के ना जाने को जी चाहता है" 
रचना आता अति जलद लयीत शिरलेली आहे पण तरीही गाताना शब्दांचे औचित्य कुठेही डागाळलेले नाही, ही फार महत्वाचे आहे. 
"आ के ना जाने को जी चाहता है" ही ओळ शेवटची आहे, तेंव्हा रचना समाप्त होणार हे ध्यानात घेऊन, इथे द्रुत लय, कशी परत एकदा संथ लयीत आणली आहे, हा भाग फार वेधक आहे. परत पहिल्या ओळींवर गायन येते आणि ही रचना संपते, जिथे ही रचना सुरु झाली होती. रोशन यांचा रागदारी संगीताचा किती व्यापक अभ्यास होता, हे दर्शविणारी ही रचना आहे. ही रचना ऐकताना, वारंवार एक जाणीव होते. हे गाणे "ठुमरी" स्वरूपात जाऊ शकले असते पण, शब्दरचना कव्वाली थाटाची आहे आणि समजून रचनेला तसे नेमके वळण, रोशन यांनी लावले आणि हिंदी चित्रपट गीतांतील एका अजरामर गाण्याचा जन्म झाला. 

No comments:

Post a Comment