गाय जशी हंबरते,
तसेंच व्याकूळ व्हावे
बुडतां बुडतां सांजप्रवाही;
अलगद भरुनी यावे."
कवी ग्रेसच्या या ओळी म्हणजे करुणेचे महिम्न स्तोत्र म्हणावे इतकी हळुवार, तरल अभिव्यक्ती आहे. तसे शब्द सहज समजण्यासारखे आहेत पण, त्यातील आशय अतिशय संपृक्त, भरीव आणि घाटदार असल्याने, या ओळी मनाला लगेच भिडतात. अशाच करुणप्रवाही ओळी बरेचवेळा चित्रपट गीतांत वाचायला मिळतात.
"फुटपाथ" चित्रपटात असेच एक असामान्य गाणे आहे - शाम-ए-गम की कसम. तलत मेहमूदनी गायलेले आणि खैय्याम यांनी तर्ज बांधली आहे. या गाण्याची गंमत म्हणजे, हे गाणे, मुळात चित्रपटासाठी लिहिले गेलेच नव्हते. मजरुह सुलतानपुरी आणि अली सरदार जाफरी, या दोन प्रतिभाशाली कवींच्या कवितेतून निवडक भाग निवडून, गाण्याची शब्दकळा निर्माण केली गेली. असे निदान चित्रपट क्षेत्रात फारच तुरळक किंवा जवळपास नाहीच घडले.
चित्रपटात दिलीप कुमार आणि मीना कुमारी, यांच्या भूमिका आहेत. तसे बघितले तर चित्रपट म्हणून खास वेगळ्या वळणाचा चित्रपट नाही परंतु समर्थ अभिनेते अशा चित्रपटात देखील, अभिनयाची कमाल मर्यादा गाठतात. वास्तविक बघता, हे दोघे अभिनेते संयत अभिनयासाठी प्रसिद्ध होते आणि त्याचेच यथार्थ दर्शन या चित्रपटात घडते. संध्याकाळची वेळ, प्रेयसी वियोग पाचवीला पुजलेला आणि अशा संत्रस्थ मनोवस्थेत, एका विकल अंधाऱ्या सांजसमयी, स्वत:शी हितगुज केल्यासारखे हे गाणे आहे.
खैय्यामच्या चालीत याच भावनेचा परिपोष आढळतो. शब्द आणि सुरांमधील वेदना, दिलीप कुमार अतिशय अप्रतिमरीत्या डोळ्यांतून आपल्यासमोर मांडतो. अक्षरश: दिलीप कुमारच्या डोळ्यांत, शब्दातील वेदना वाचता येते. शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास असल्याने, खैय्याम यांच्या रचनेत, नेहमी कुठेतरी शास्त्रोक्त गायकीचा अंतर्भाव नेहमी असतो आणि त्यामुळे रचना बरेचवेळा "गायकी" ढंगाची होते, किंबहुना गायक/गायिकेची परीक्षा घेतली जाते.
गाणे सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ खास ऐकण्यासारखा आहे. मंद्र सप्तकात व्हायोलीन आणि त्याच्या पार्श्वभागी पियानोचे सूर आहेत आणि त्यालाच "Spanish गिटार" या वाद्याची जोड दिली आहे. थोडे बारकाईने ऐकले तर समजेल, गाण्यात कुठेच तालवाद्य नसून, केवळ "Spanish गिटार" चे सूर, हेच तालवाद्य आहे. परिणामस्वरूप गाण्याचा मनावर होणारा अत्यंत गहिरा परिणाम. या वाद्यमेळाचे सूर काहीसे संथ होत असताना, आपल्याला तलत मेहमूद यांचा आवाज ऐकायला मिळतो - "शाम-ए-गम की कसम, आज गमगी है हम". इथे पडद्यावर, मेणबत्ती पेटलेली दिसते आणि त्यात देखील, ज्योतीचा भाग अधिक ठळक दिसतो. गाण्याचे शब्द आणि आणि ही जळती मेणबत्ती!! ज्यांना उर्दू संस्कृतीची थोडेफार माहिती असेल त्यांना, "गम" आणि "ज्योत" याचा अन्योन्न संबंध कळून घेता येईल!! खरेतर सुरवातीचे वाद्याचे सूर, बहुतेक सगळ्या रचनेची ओळख करून देतात, म्हणजे गाण्याची लय, गायन पद्धती इत्यादी.
तलत मेहमूद यांची गायकी ही तशी सुस्पष्ट पण अत्यंत सुरेल, शब्दांना कुठेही न दुखावता गाणारी तसेच भावनांचा योग्य तो परिपोष करणारी. मुळात उर्दू भाषा ही अति नजाकतदार असल्याने, गायन देखील त्याचा अंगाने होणे गरजेचे असते. त्यांच्या गायकीवर "लखनवी" संस्कृतीचा दाट प्रभाव दिसून येतो आणि त्याच अंगाने, त्यांचे शब्दोच्चार होतात. शब्दांची अनुभूती देणारी गायकी. याच गाण्यात याचा अनुभव घेत येतो. पहिला अंतरा गाताना, एका ओळीत "मार डाले ना दर्द-ए-जुदाई कही" असे शब्द आहेत. यात "डाले" मधील "ड" हे अक्षर खरे आघाती अक्षर आहे, उर्दू भाषेत याचीच खरी गंमत बघता येते. "ड","घ","ख" ही अक्षरे नेहमी आघाताने घेतली जातात पण गाताना, त्यातील "आघाताचा" स्पर्श वगळून, या अक्षरांचा उच्चार करणे, ही खासियत असते आणि ती प्रत्येक गायकाला नेमकेपणी जमते(च) असे नाही.
मुळात तलत मेहमूद यांचा मुलायम, रेशमी स्वर आणि त्यात साथीला उर्दू भाषा!! त्यामुळे गाणे ऐकताना, आपल्या भाषेचा देखील समृद्ध अनुभव घेता येतो. भारतीय संगीतात, गझल गायनात बेगम अख्तर यांनी जो आदर्श निर्माण केला त्याच्या जवळपास, केवळ तलत मेहमूद पोहोचतात - फरक इतकाच, गझलला गीताचे स्वरूप देऊन आणि याची नेमकी प्रचीती या गायनातून आपल्याला मिळते.
या गीतांत अनेक विस्तारशक्यता आपल्याला आढळतात परंतु चित्रपट गीत आणि त्यातही विरही गीत, याची जाण ठेऊन या गीताला भावगीताचे स्वरूप, संगीतकार खैय्याम यांनी प्रदान केले आहे. " दिल परेशान है रात विरान है, देख जा किस तरह आज तनहा है हम" या ओळीचे गायन ऐकताना, शब्दातील व्याकुळता आपल्याला लगेच जाणवते. गाण्याच्या आस्वादाच्या दृष्टीने बघायला गेल्यास, रचनेत कुठेही शब्दांची ओढाताण नाही, पेळूतून सलग सुत निघावे त्याप्रमाणे, सुरांतून शब्द घोळवून आपल्याला ऐकायला मिळतात. या ओळीतील, "तनहा" हा शब्द देखील किती आर्ततेने उच्चारला गेला आहे. आशयाची अभिव्यक्ती सुरांतून अशीच व्हायला हवी, अशीच अपरिहार्यता या गायनातून जाणवते आणि गाणे तिथेच सिद्ध होते.
गाण्याचा हाच "स्वभाव" कायम ठेऊन, पुढील वाद्यमेळाची बांधणी केली आहे. वाद्यमेळ त्याच वाद्यांनी सजलेला आहे आणि त्याच सुरांनी सजावट खुलावलेली आहे. वेगळ्या शब्दात लिहायचे झाल्यास, गाण्याच्या सुरवातीचा वाद्यमेळ आणि पहिला अंतरा सुरु होण्याआधीची सुरावट ऐकताना, आधीच्याच सुरांचा विस्तार आहे. लय तशीच कायम ठेऊन, त्याच अंगाने सुरांचा विस्तार केला आहे. त्यामुळे, चालीचा परिणाम आपल्या मनावर अतिशय गडद होतो. अखेर विचार केला तर, गाण्याचा अंतिम परिणाम परिपूर्ण होणे, यातच सर्जनशीलतेची बीजे आढळतात.
चांगली शब्दकळा आणि ती देखील, स्वररचना करण्यासाठी योग्य अशी रचना असणे, ही चित्रपट गीतांची प्राथमिक अट असते. योग्य जागी, शब्द संपणे तसेच चालीच्या सुरावटीशी संलग्न राहणे, हे गुण अवश्यमेव मानावेच लागतात. इथे केवळ उस्फूर्तता अजिबात उपयोगाची नसते आणि त्या बाजूने बघायला गेलो तर, पहिला अंतरा खास आहे.
"रुत हंसी है तो क्या, चांदनी है तो क्या
चांदनी जुल्म है, और जुदाई सितम"
या ओळी बघा. आजूबाजूला वातावरण प्रणयासाठी सुयोग्य आहे पण स्वत: नायकाची मन:स्थिती मात्र विमनस्क झालेली आहे. त्यादृष्टीने "रुत" आणि "चांदनी" सारखी प्रतीके योजून त्याच शब्दांचा उलट्या बाजूने उपयोग करून, आशय अधिक वृद्धिंगत केला आहे आणि हे करताना, चालीच्या "मीटर" मध्ये शब्द अतिशय चपखलपणे बसले आहेत. शब्दांच्यात गेयता तर हवीच पण त्याबरोबर आशयाकडे देखील टोकदारपणा आणणे जरुरीचे असते. त्याचबरोबर, गायनात देखील तीच तरलता तलत मेहमूद यांनी आणली आहे.
संगीतकार म्हणून खैय्याम यांचा विचार करताना, या गाण्यातून, त्यांची काही खास वैशिष्ट्ये दिसून येतात. वाद्यांचा गदारोळ नसणे, तसे करताना संगीत आणि शब्द दोन्ही आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर शांत भाव देखील. तसेच गाणे तयार करताना, शब्दांबद्दल आदरभाव राखणे आणि रचना करताना शक्यतो शब्दांची ओढाताण होणार नाही, याकडे जाणीवपूर्वक नजर ठेवणे. हाच मुद्दा आपल्याला, शेवटच्या अंतरा ऐकताना मांडता येईल.
"अब तो आजा के अब रात भी खो गयी
जिन्दगी गम के सेहराओ में खो गयी
धुंढती है नजर, तू कहां है मगर
देखते देखते आया आंखो में गम"
या ओळीच्या चालीत फारसा फरक नाही पण, ओळींतील आशय बघताना, शब्द कुठेही तोडले नाहीत, किंबहुना सुरांच्या सहाय्याने अर्थ अधिक गहिरा केला आहे. "देखते देखते आया आंखो में गम" या ओळीतील "आंखो में गम" सारख्या अप्रतिम प्रतीकाचा अर्थ किती सुंदररीतीने मांडला आहे, हे खरेच वाखाणण्यासारखे आहे. "नजर" आणि "आंखो में गम" याची नेमकी जोड लावण्याची शायराची कमाल आणि खैय्यामने हाच विचार सुरांत गुंफताना टिपलेला आहे. खरतर गाणे इथे संपते पण तरीही आपल्या मनात उरते ते अविस्मरणीय सुरांचे चित्र आणि त्याला मिळालेली, दिलीप कुमारच्या असामान्य भावदर्शनाची जोड. चित्रपटातील गाणे अजोड ठरण्यासाठी आणखी काय वेगळे लागते.