आशुतोष जावडेकरांच्या "लय पश्चिमा" पुस्तकावरील माझे परीक्षण - आजच्या "मी मराठी - सप्तमी" या पुरवणीत आले आहे.
कुठलेही संगीत ऐकताना आपण, आधी कानाने ऐकतो, पुढे मेंदूनेऐकतो आणि आपल्या आस्वादाची दिशा ठरवतो. अर्थात, आस्वाद घेताना, आपल्यावर झालेले संस्कार, बरेचवेळा आपली आवड घडवीत असतात आणि त्यानुसार आपली आवड ठरवली/ठरली जाते. त्यामुळे, विशेषत: आपले भारतीय मन हे अनाहूतपणे भारतीय संगीताकडे ओढ घेत असते. परंतु आपल्या संगीताच्या पलीकडे देखील संगीताचे विशाल विश्व पसरलेले आहे आणि ते संगीत देखील तितकेच अप्रतिम, आणि विलोभनीय असते. फक्त आपल्याला याची जाणीव नसते आणि जाणीव नसल्याने आपण आस्वादाचा दिशा बंद केलेल्या असतात. यात वस्तुत: काहीही चूक नाही. जर का वैश्विक संगीताकडे कान वळवला(च) नाही तर मग त्या सुरांची ओळख आणि पुढे मैत्री होणार तरी कशी? त्यातून, हल्लीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने जागतिक संगीत आपल्या घरात आले आहे पण, जर का त्या दृष्टीने आपण पाऊल टाकले नाही तर बहुदा आपणच आपल्याला अलौकिक आनंदापासून वंचित करत आहोत. नेमका हाच विचार, अधिक विस्ताराने, श्री. आशुतोष जावडेकरांनी आपल्या "लय पश्चिमा" या ग्रंथात मांडला आहे.
अजूनही आपल्याकडे पाश्चात्य संगीत म्हटले की आपण,"पॉप","जाझ", "रॉक" आणि "सिंफनी" या चतुष्टयावर आधारतो. मुळात, या संगीताकडे आपण किती जाणीवपूर्वक बघतो? जवळपास अजिबात नाही आणि ऐकतो ते देखील, रचनेच्या तालाच्या आधाराने. गाण्यातील ताल, आपले मन खेचून घेतले जाते. अर्थात अत्यंत प्राथमिक स्तरावर, ही आस्वादाची पहिली पायरी नक्कीच आहे. आपण, जर का आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे प्रश्न विचारला तर, पाश्चात्य रचना ऐकताना, आपण त्यातील काव्याचा किती विचार करतो? माझी खात्री आहे, आपल्यापैकी बहुतेक सगळेच नकारार्थी उत्तर देतील. एकतर, आपण सरसकटपणे, अशा रचनेतील काव्य जाणून घेण्याचा प्रयत्न(च) करत नाही आणि तशी आपल्याला इच्छा देखील होत नाही.
जावडेकरांनी, आपल्या ग्रंथात, "रॉक","पॉप","कंट्री","रेगी"," जाझ" अशा प्रकारांचा स्वतंत्रपणे आस्वाद घेतला आहे आणि त्याबाबत त्यांनी, कुठेही "अभिनिवेश" आणला नाही. त्यामुळे ग्रंथ वाचताना,आपण त्यात मांडलेल्या माहितीबरोबर गुंगत जातो. लेखक म्हणून, हे यश फार महत्वाचे म्हणायला लागेल. विषय तसा नवी आहे पण, केवळ नाविन्य, हाच धागा न मांडता, यातील प्रत्येक आविष्काराचा इतिहास , त्याची पाळेमुळे आणि त्याचा आजच्या जगाशी जोडलेला सबंध अतिशय सविस्तरपणे मांडलेला आहे आणि त्याची, विशेषत: मराठी वाचकांना जरुरी होती.
"रॉक' संगीत हे "पॉप" पासून किती वेगळे आहे, हे सांगताना, केवळ सांगीतिक फरक दाखवला नसून, भाषेतील फरक आणि सादरीकरणातील फरक देखील सुरेख सांगितला आहे आणि हे सांगताना, भाषा कुठेही जडजम्बाल होत नाही. अर्थात, त्यांना ग्रंथात कुठेही संगीताचे शास्त्र मांडायचे नसल्याने, भाषा देखील, मैत्रीनात्याप्रमाणे हसत खेळत, आपल्याला समजावीत जाते.
तसे बघितले तर, या सगळ्या संगीताचा उद्भव हा "सिम्फनी" आणि "ऑपेरा" संगीतातून झाला आहे. अर्थात, तसे बघितले तर भारतीय संगीतात तरी काय वेगळे मन्वंतर झाले आहे!! ग्रंथात, त्यांनी "अमेरिका" हा देश मध्यवर्ती ठेवला आहे आणि अमेरिकेत, जागतिक संगीताचे वेगवेगळे प्रवाह कसे येत राहिले आणि त्यातून, आणखी किती तरी वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले, हे मुळातून वाचण्यासारखे आहे. एकतर, अमेरिका देश आजही, "इमिग्रंट्स" लोकांचा आहे आणि याचा परिणाम असा होतो, या देशात, प्रत्येक देशाची सांगीतिक संस्कृती येते, त्या संस्कृतीला अमेरिका आपलीशी करते पण करताना, तिथे आधीच अस्तित्वात असलेली संस्कृती हाताशी धरून, नवीन संस्कृतीचे, नव्याने "रुपांतर" करते. आधीच अमेरिकन लोकांना नाविन्याचा अति सोस असतो आणि त्यातून जर का तिथे संगीताचा कुठला नवीन ओहोळ आला, तर त्याचे स्वागत करण्याची तितकीच स्वागतशील वृत्ती असल्याने, तिथे युरोपियन, आफ्रिकन, भारतीय, अरेबिक, वेस्ट इंडियन संगीताचे ओहोळ येतात, अमेरिका त्यांचे दोन्ही हाताने स्वागत करते आणि तिथे रुजवून घेतात, त्यात तिथल्या संस्कृतीनुसार परिवर्तन करून, संगीताचा नवा आविष्कार जगाला घडवते. त्यातूनच, "रॉक","पॉप" इत्यादी वैविध्यपूर्ण रचना अस्तित्वात आल्या आणि जागतिक संगीताचा पट व्यापक झाला.
अर्थात, हे सगळे सांगताना, संगीतात, किती अनिष्ट प्रथा सुरु झाल्या, याचे देखील दर्शन आपल्या घडते. कितीही झाले तरी अमेरिकेला "विक्री" या शब्दाचे अतोनात आकर्षण आहे आणि त्या शब्दाला जागून, तिथे प्रत्येक आविष्कार होत असतो आणि बरेचवेळा त्यातून अनेक सुंदर तर अनेक अनिष्ट प्रथा निर्माण होतात. या विसंगतीवर लेखकाने,विशेषत: "पॉप" संगीतावर लिहिताना नेमके बोट ठेवले आहे.
ग्रंथ वाचताना, आपल्याला अनेक कलाकारांचे दर्शन घडते. त्यातले बरेचसे कलाकार आपण कधी ना कधीतरी ऐकलेले असते, काही सूर कानात गुंजत असतात. त्या सगळ्या गाण्यांच्या आठवणी देखील मनोरंजक पद्धतीने लिहिल्या आहेत. मला, स्वत:ला त्यातील, "सागरा प्राण तळमळला" हे प्रकरण फारच आवडले. एकतर त्यातील बहुसंख्य कलाकार, मी देखील आज बरीच वर्षे ऐकत आहे पण, आता हे प्रकरण वाचताना, त्या कलाकारांनी भोगलेल्या दैन्याचे, मानसिक त्रासाचे, क्वचित वैफल्याचे सगळे दाखले वाचायला मिळतात. यशस्वी कलाकाराची आपल्याला नेहमीच झगमगती बाजू दिसत असते, आवडत असते पण गालीच्याखाली किती लाकडे जळत आहेत, हे फक्त त्या कलाकारालाच ठाऊक असते.
"रॉक" संगीताचा इतिहास फारच वेधक प्रकारे मांडला आहे. "एल्विस प्रिस्ले" पासून आजच्या "मेटल" संगीताचा धावता आढावा घेतला आहे पण घेताना, "रॉक' संगीतातील बहुसंख्य महत्वाच्या कलाकारांच्या योगदानाचे स्मरण ठेवले, अर्थात यात "बीटल्स" आलेच. तोच प्रकार, "कंट्री","पॉप","रेगी" संगीताबाबत आखला आहे. प्रत्येक आविष्कारात, गाण्याची भाषा कशी बदलेली आहे, याचे वेचक दाखले वाचायला मिळतात, प्रसंगी पातळी कशी घसरली, याची देखील उदाहरणे वाचायला मिळतात. त्यामुळे लेख एकांगी होत नाहीत.
आणखी वेधक भाग म्हणजे, यातील प्रत्येक रचनेत, वाद्ये कशी वाजतात, तसेच नव्याने कुठली वाद्ये घेतल्याने, सादरीकरणात कसे बदल होत गेले, याबद्दलचे विवेचन देखील खास वाचण्यासारखे आहे. आपल्याला "गिटार" म्हटल्यावर साधारणपणे, "इलेक्ट्रिक गिटार" आणि त्याचे खणखणीत, उद्दीपित करणारे सूर, इतकाच परिचय असतो पण, पुस्तक वाचल्यावर अशा, प्रसंगी "कंठाळी" वाटणाऱ्या वाड्यातून देखील, किती आश्वासक, निरलस सुरांचा प्रत्यय मिळू शकतो, हे समजून घेत येते. खरेतर कुठलेही वाद्य, हे कधीक "एकांगी" नसते, रचनेनुसार, त्या वाद्याची "जातकुळी" बदलते, बदलवता येते आणि त्यातून अतिशय समर्थ सांगीतिक वाक्यांशाचे रमणीय प्रत्यंतर घडवता येते. प्रश्न असतो, कलाकाराच्या वकुबाचा. या ग्रंथात अशा अनेक वकुबांचे असामान्य दाखले वाचायला मिळतात आणि आपण वाचताना स्तिमित होऊन जातो.
संगीत हे कधीच एकसाची राहू शकत, परिवर्तनशिलता हा कुठल्याही संगीताचा अंगभूत गुण असतो आणो त्याचे प्रतिबिंब, संगीताच्या प्रत्येक शाखेत, वारंवार सापडते. या बदलाचे ठराविक टप्पे असतात, आणि एकूणच इतिहासाचा मागोवा घेतला तर हे बदल आणि बदल घडवणारे कलाकार, यांची स्मृती निरंतर राहणारी असते. असे अनेक संदर्भ आणि त्या संदर्भाबरोबर होणारे बदल,वाचताना आपण त्या काळात जातो आणि ते सगळा इतिहास आपल्याला गुंगवून टाकतो.
ग्रंथात एके ठिकाणी "चटणी" संगीताचा उल्लेख आहे. मी परदेशी रहात असताना, १९९४ मध्ये, संगीताच्या संदर्भात हा शब्द प्रथम ऐकला होता. पुस्तक वाचताना, हा शब्दाचा उगम समजला. अर्थात, असे अनेक समज/गैरसमज, हे पुस्तक वाचताना आपल्याला दूर करता येतील. मुळात, "रॉक" काय किंवा "पॉप" काय, हे केवळ कंठाळी किंवा आक्रस्ताळी संगीत नाही. इथे व्हिटने हौस्टन किंवा सेलिन डियॉन सारख्या असामान्य गायिका, आपल्या प्रतिभेचे एंग दाखवून चकित करतात. गरज आहे ती मनमोकळ्या नजरेची आणि कान "उघडे" ठेऊन ऐकण्याची. कुठलेही संगीत हे मुलत: विशुद्ध स्वरूपातच असते, पुढे प्रगतीच्या नावाने त्यात अनेकांगाने भर टाकली जाते. त्यामुळे, त्यात चांगले - वाईट असे सगळे नाद अंतर्भूत होतात. ग्रंथ वाचताना, पाश्चात्य संगीताबाबत आपल्या मनात जी काही किल्मिषे असतात, त्यांना दूर झटकले जाते. पुस्तकाचे हे फार मोठे यश मानावे लागेल.
या विषयाच्या अनुरोधाने, या पुस्तकात मला वाटते, काही कलाकार अनावधानाने उल्लेखायचे राहून गेले असावेत. जसे "Eric Clapton" किंवा "George Benson". अर्थात ही काही ठळक नावे झाली. तसेच आणखी एक सुचवावेसे वाटते, युरोपमध्ये लोकसंगीताची फार मोठी परंपरा आहे आणि आजही ती अव्याहतपणे चालू आहे, जसे हंगेरियन लोकसंगीत किंवा स्कॉटलंड मधील "Bagpiper" वाद्याचे संगीत, तसेच रुमानियन, पोलंड, जर्मन देशाचे लोकसंगीत. या संगीताबाबत बाबत, अशीच विचक्षण दृष्टी ठेऊन, मराठीत एकूणच सुगम संगीताच्या लेखनात "बौद्धिक" लेखनाची जी उणीव आहे,ती दूर करण्याचा प्रयत्न करता येईल.
No comments:
Post a Comment