Saturday, 19 December 2015

बहारदार बहार



"सुमकेसरकुंतल उडती । पवनावर पोहत तरती;
मंद गंध भवति भरती । पानपुष्प पुलकित करिती." 
कविश्रेष्ठ मर्ढेकरांच्या या ओळींतून निसर्गवर्णन नेमक्या रीतीने आपल्याला वाचायला मिळते. विशेषत:  "मंद गंध भवति भरती । पानपुष्प पुलकित करिती" ही ओळ तर खास "बहार" रागाचीच आठवण करून देते. 
बहार रागाची जाती "औडव/षाडव" आहे, म्हणजे आरोहात ५ स्वर तर अवरोहात ६ स्वर येतात. आरोही सप्तकात "रिषभ, पंचम" स्वर वर्ज्य असतात तर अवरोही सप्तकात "धैवत" स्वराला अजिबात जागा नसते. रागाचे वादी-संवादी स्वर आहेत, मध्यम, षडज. प्राचीन ग्रंथानुसार, रात्रीच दुसरा प्रहर किंवा वसंत ऋतूमध्ये कधीही सादर केला तरी चालतो. त्या दृष्टीने, ऋतूप्रधान राग आहे. रागात, कोमल गंधार आणि दोन्ही निषाद स्वरांचे स्थान खास मानले गेले आहे. किंबहुना रागातील कोमल गंधार स्वराचे स्थान अतिशय महत्वाचे मानले गेले आहे. मुख्य स्वरसंहती बघायला गेल्यास,  "ग म ध नि सा","रे ग रे ग सा रे नि सा","नि सा रे रे स नि सा" या स्वरिक वाक्यांशांना अधिक महत्व असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. 
प्रत्येक वाद्याबरोबर एकेक कलाकाराचे नाव कायमचे जोडले गेल्याचे आपल्याला आढळून येते. शहनाई वाद्याबाबत, "एकमेवाद्वितीयम" म्हणावे असे "उस्ताद बिस्मिल्ला खान" यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे. इतिहासात जरा डोकावले तर असे आढळते, शहनाई वाद्य हे प्रामुख्याने, मंगल प्रसंगी किंवा काही समारंभ, इतपतच मर्यादित असायचं परंतु उस्तादांनी, आपल्या प्रतिभेने, शहनाई वादनात कमालीची सुधारणा घडवून आणली आणि सादरीकरणाचा असामान्य आदिनमुना सादर केला. केवळ, रागदारी संगीत(च) नव्हे तर लोकसंगीताला देखील, त्यांनी प्रमाणभूत दर्जा मिळवून दिला. विशेषत: उत्तर भारतीय लोकसंगीतातील, "होरी","चैती","कजरी" इत्यादी प्रकारांना, त्यांनी मैफिलीत स्थान मिळवून दिले. 

प्रस्तुत रचना, आलापीपासून सुरु होते, अगदी ठाय लयीत,  संथपणे,प्रत्येक सूर "न्याहाळता" यावा, इतक्या लडिवाळपणे वादन केले आहे, याचा परिणाम, आपल्या मनावर रागाची आकृती स्पष्टपणे ठसते. तसे काटेकोरपणे ऐकले तर, शहनाई वाद्याच्या काही अंगभूत मर्यादा आहेत, विशेषत: श्रुती मांडणी आणि स्थिरावणे, इथे काही वेळा हे वाद्य कमतरता दर्शविते. इथे एक बाब स्पष्टपणे मांडतो, भारतीय संगीत शास्त्रानुसार, श्रुती व्यवस्था बघितली तर कुठलेच वाद्य परिपूर्ण नाही. तेंव्हा शहनाई वाद्याबद्दलचे जे मत वर उद्धृत केले आहे, ते इतर वाद्यांबाबत देखील लागू होते. 
वादनात, रागदारी संगीतातील जे खास सांगीतिक अलंकार असतात, त्याचे व्यवस्थित दर्शन होते, जसे, हरकती, दीर्घ ताना, गुंतागुंतीच्या ताना, मिंड, गमक हे सगळे इथे ऐकायला मिळते आणि त्यामुळे वादन समृद्ध होते. एका समृद्ध वादनाचा आनंद आपल्याला इथे नक्की घेता येतो. 
आता आपण, हिंदी चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणे ऐकायला घेऊ. "छाया" चित्रपटातील, "छम छम नाचत आई बहार" हे गाणे प्रथितयश आणि प्रयोगशील संगीतकार, सलिल चौधरी यांनी बांधलेले आहे. गाण्यात स्पष्टपणे "त्रिताल" आणि "केरवा" हे ताल वापरले आहेत. या रागाचे लक्षणगीत म्हणून, या गाण्याची ओळख करून देता येईल. गाण्याच्या सुरवातीला, "जलतरंग","सरोद" आणि "सतार" या वाद्यांचे सूर एकत्रित केले आहेत, ते जर का बारकाईने ऐकले तर, वर निर्देशित केलेल्या स्वरसंहतीचा पडताळा घेता येतो. विशेषत:, जलतरंग वाद्याचा खास उल्लेख करावाच लागेल इतके उठावदारपणे हे वाद्य या गाण्यात वापरले आहे. जलद लयीत जेंव्हा वाद्यांची गत जाते, तिथे दोन्ही निषाद, मध्यम आणि षडज, या सुरांचा खास आढळ दिसतो. त्याच लयीत पुढे तबल्याचा अप्रतिम चक्रधार सादर होतो आणि गाण्याला एक "वजन" प्राप्त होते. त्रितालातील ते सादरीकरण आहे आणि, जिथे त्रितालातील "धा" अक्षर येते, तिथे लताबाईंचा अप्रतिम स्वर ऐकायला मिळतो आणि तिथे राग सिद्ध होतो. संगीतकार म्हणून, सलिल चौधरींनी, ज्या प्रकारे भारतीय वाद्यांचा समर्पक उपयोग करून घेतला आहे आणि त्यामुळे गाण्याची बांधणी आणि वीण घट्ट होते, तिथे आपल्याला दाद द्यावीच लागते. गाण्यात, पहिला अंतरा जिथे सुरु होतो, तिथे "फुल फुल  जोबन आया" या ओळीवर, लताबाई ज्याप्रकारे, हलका स्वर घेऊन, उतरल्या आहेत, तो स्वरिक वाक्यांश तर केवळ अतुलनीय म्हणावा लागेल, कारण तोपर्यंत, गाण्याची लय जलद झालेली आहे पण, तिथेच लयीने वेगळे "वळण" घेतले आहे. लताबाईंच्या गळ्यावरील स्वामित्वाचे सुंदर उदाहरण.   

सलिल चौधरींच्या संगीताचे मुल्यमापन करायचे झाल्यास, आपल्याला ४ टप्पे ध्यानात घ्यावेच लागतील. १] युथ क्वायर (युवासमूह गायन),२] त्यांनी दिलेले हिंदी चित्रपट संगीत, जे संपूर्णपणे मुंबईत फळाला आले, ३] "बंगाली गीते" आणि इथे त्यांची कामगिरी फारच वेधक आहे, ४] बालगीते. हे चार टप्पे अशासाठी विचारात घ्यायचे, कारण त्यांच्या एकूण सांगीतिक कारकीर्दीचा विचार करायचा झाल्यास, त्यात कुठे ना कुठे तरी याच टप्प्यांचा समावेश झालेला आढळतो. आणखी एक अनन्यसाधारण विशेष मांडायचा झाल्यास, त्यांनी समूह्गायनाचा, पार्श्वसंगीतासाठी वाद्यांसारखा केलेला वापर. इथे त्यांच्या पिंडावर, पाश्चात्य सिंफनी संगीताचा प्रभाव जबरदस्त आढळतो. 
सलिल चौधरींची गीतसर्जनशक्ती वारंवार आपले सौंदर्यपूर्ण सांगीत वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक त्या चैतन्याने भारलेली होती. काम जर अधिक केंद्रीभूत झाले असते तर सुगमसंगीताच्या गतिमान कोटींत चपखल बसणारे संगीत, ते आपल्याला देऊ शकले असते. त्यांची गाणी ऐकताना, अनेकवेळा हिंदी चित्रपट संगीतात जे संगीत होते, त्यापेक्षा अधिक टिकाऊ आणि सार्थ संगीतसंगम साधण्याची त्यांना इच्छा होती, असे फार जाणवते आणि तशी त्यांची क्षमता देखील होती. हे काम कुणालाही सहज पेलणारे नव्हते!!  

आपल्याकडे अभंग, भजन यांचा  ठराविक  साचा आहे. सर्वसाधारण रचना या बहुतांशी पारंपारिक रचनेत बांधल्या जातात. याला, अपवाद म्हणून काही रचना मराठीत सिद्ध करणाऱ्या झाल्या आहेत. यात, हृदयनाथ मंगेशकरांची "गणराज रंगी नाचतो" ही रचना अवश्य सामावली जाते. बहार रागावर आधारित हे गाणे आहे.  कवियत्री शांताबाई शेळक्यांची ही अनुपमेय, गेयतापूर्ण रचना आहे. सुंदर गाण्याच्या बाबतीत एक बाब नेहमीच बघण्यासारखी असते. गाण्यातील शब्द असे असावेत की वाचतानाच त्यातील अंतर्गत लय, जाणवायला लागावी आणि त्यातूनच चालीचा "जन्म" होत जावा. बहुतेक रचनाकारांचा हाच अनुभव आहे. स्वरिक रचना बघताना, जिथे स्वर संपतात, तिथेच शब्द देखील संपत राहणे, हे संगीतकाराचा हुरूप वाढवणारे असते. प्रस्तुत रचना, या अपेक्षा बहुतांशी पूर्ण करते. 


गाण्यात पारंपारिक तबला किंवा ढोलक न वापरता, पखवाजावर ताल घेतल्यामुळे, गाण्याला अंगभूत अशी गंभीरता प्राप्त होते आणि वजन मिळते. अर्थात, रचनेचा बाज जरी आनंदी, खेळकर असा असला तरी देखील, बांधणी ही नेहमीच गंभीरतेने करणे आवश्यक असते. गाण्याच्या पहिल्या सुरापासून, आपल्याला "बहार" रागाची ओळख पटते. अर्थात, कुठल्याही सुगम संगीताच्या रचनेत, विशुद्ध स्वरूपात राग आढळणे कठीण असते, तरीही इथे बऱ्याच प्रमाणात रागाचे शुद्धत्व राखले आहे. विशेषत: अंतऱ्यामधील स्वर रचनेत, जे सतारीचे सूर आहेत, तिथे तर ओळख स्पष्ट होते. नेहमीप्रमाणे, या रचनेत देखील, खास "मंगेशकरी" ठसा उमटलेला आहे. विशेषत: गाण्यातील ओळ संपवताना, अवघड तान किंवा हरकत घ्यायची आणि लय थोडी लांबवायची किंवा असाच प्रकार, कवितेची ओळ किंचित खंडित करून घेताना, अशीच अवघड हरकत घ्यायची. याचा परिणाम एकच होतो आणि तो म्हणजे  रचना गळ्याची परीक्षा घेते.  हृदयनाथ मंगेशकरांवर एक आक्षेप नेहमी घेतला जातो - त्यांना, चाल बांधण्यासाठी, रागदारीची चीज लागते. वेगळ्या शब्दात त्यांची सर्जनशीलता ही बहुतांशी रागदारीतील चीजेवर आधारित असते आणि त्यामुळे, त्यात त्यांची,स्वत:ची  "सर्जनशीलता" कुठे आढळते? काही गाण्यांच्या बाबतीत हा आक्षेप जरी मान्य केला तरी, चालीसाठी चीज आधाराला घेतली तरी, त्यानिमित्ताने सामान्य रसिकाला रागदारी संगीताची आवड आणि जाणकारी निर्माण होते, हे देखील नक्की. 

सकल बरज गगन - ममता - रोशन - लता 

मन की बीन मतवारी - शबाब - नौशाद - लता/रफी - त्रिताल 

सुरत पिया की छिन - वसंतराव - अभिषेकी 

No comments:

Post a Comment