प्रत्येक झाडाचे
प्रत्येक पक्षी कसले तरी
कसले तरी गाणें गातो
प्रत्येक सूर
पानाइतकाच झाडांनाही
आपला आपला वाटतो
गाणें गातात
देणें देतात
झडून जातात
उडून जातात
झाडे नुस्ती नुस्ती
नुस्ती रहातात
आरतीप्रभूंची ही अजरामर कविता. छंदात्मक रचनेपासून वेगळे अस्तित्व दाखवणारी आणि तरीही आशयाचा अप्रतिम नमुना दाखवणारी. केवळ शब्दांच्या उलटापालटी मधून, वेगवेगळे आशय व्यक्त करणारी. या कवितेत,
गाणें गातात
देणें देतात
झडून जातात
उडून जातात
या ओळी मला भैरवी रागाचे अस्तित्व दर्शवतात, असे मला वाटते. भैरवी रागिणीचा सगळा प्रवास हा असाच चालू असतो. स्वर येतात आणि येताना काहीतरी संपल्याची जाणीव देत, मनाला हुरहूर लावतात. ही रागिणी अशीच आहे, साफल्याचे समाधान देत असताना, अस्तित्वाचा अंत दर्शवत असते. कधीकधी तर दु:खाच्या आवर्तात गुंतवून ठेवतात आणि तसे ठेवत असताना, या भावनेच्या अनंत "परी" दिसतात. इथे, अंत संपून जीवनाची नव्याने सुरवात झाली, असले काही नसते. जे आहे ते आता विरायला लागले आहे, हेच खरे.
या रागात, एक, नाही दोन नाही चक्क चार स्वर कोमल आहेत. "रिषभ,गंधार,धैवत, निषाद" हे स्वर कोमल आणि त्यामुळेच, या रागाची ठेवण अंतर्मुख आहे. वादीसंवादी स्वर आहेत - मध्यम/षडज. भारतीय संगीतातील, "षडज/पंचम" भावानंतर "षडज/मध्यम" भावाला अनन्वित महत्व आहे. तसे बघितले तर संस्कृत ग्रंथानुसार रागिणीचा समय, दिवसाचा पहिला प्रहर किंवा पहाटेची वेळ दर्शवली आहे. पण, भैरवी ही रागिणी, कधीही सादर केली तरी तितकीच गहिरी, आर्त आणि अवीट गोडीची आहे. रागाच्या प्रमुख स्वरसंहती बघायला गेल्यास, "रे ग रे ग सा रे सा","प ध नि ध म","सा ग रे ग म". या स्वरांना अतिशय महत्व आहे.
"मेवाती" घराण्याचे प्रथितयश गायक, पंडित जसराज यांनी सादर केलेली भैरवी आपण ऐकायला घेऊया. मुळात, पंडित जसराज यांचा अत्यंत मुलायम आवाज पण विसविशीत नसलेला. प्रसंगी अति खर्जात जाउन देखील आवाजाचा निराळाच पोत दाखवण्याचे त्यांचे कौशल्य असामान्य आहे. गायनात केवळ मेवाती घराण्याचेच सौंदर्य न दाखवता, बरेचवेळा आग्रा घराण्याची छाया देखील पडलेली आढळते. रागदारी गायन, सुगम संगीताच्या जवळपास आणता येते, हा विचार त्यांच्या गायनातून वारंवार दिसतो, याचा परिणाम असा झाला, अगदी सामान्य रसिक देखील, त्यांच्या गायकीकडे आकृष्ट झाला. तीनही सप्तकात विहार सहजतेने करण्याची अचाट क्षमता, "मुर्घ्नी" स्वराचे अस्तित्व दाखवण्याची करामत, आणि "मूर्च्छना" या अतिशय अवघड अलंकाराचे दर्शन घडविणे इत्यादी सौंदर्यस्थळे सहज मांडता येतात.
प्रस्तुत रचनेत, आलापीतून रागाचे सौंदर्य अतिशय विलोभनीय पद्धतीने आपल्याला ऐकायला मिळते. स्वरांवर आरूढ होण्यापेक्षा त्या स्वरांशी "मैत्री" साधून, रागाचा आविष्कार कसा करता येऊ शकतो, याचे ही रचना हे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल.साधारणपणे, भैरवी म्हटले की - आता सगळे संपत आले, ही भावना दृग्गोचर होते. हे संपणे, साफल्याचे असू शकते, अपयशाचे देखील असू शकते परंतु आता पुढे काही नाही, हीच भावना या रागातून जी प्रकर्षाने आढळते, तिचा आढळ या रचेनेतून पुरेपूर घेता येतो. अर्थात, या रागाचे जो "स्वभाव" आहे, त्या स्वभावाला साजेसे असे गायन म्हणजे परिपूर्तीचा अप्रतिम अविष्कार आहे.
संगीतकार जयदेव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नवोदित गायकांना, गायनाची संधी दिली आणि त्यांना प्रकाशात आणले, जसे हरिहरन, सुरेश वाडकर किंवा छाया गांगुली. छाया गांगुली तर, हे गाणे प्रकाशात येण्याआधी फारशी कुणाला माहितीच नव्हती. "गमन' सारखा नवी वाट चोखाळणारा चित्रपट, अशा चित्रपटातील "आप की याद आती रही" हे गाणे भैरवी रागातील, एक अनुपमेय रचना म्हणून गणली जाते. निखळ रचना म्हणून जरी या गाण्याची विचार केला तरी हे गाणे फार वेगळ्या ढंगाचे आहे. एकतर रचना, ठराविक साच्यात बसणारी नाही. सुरवात फक्त आलापीमध्ये गायन तर मधेच वाद्यमेळ फार वेगळ्या अंगाने वाजलेला. आता भैरवीचाच विचार करायचा झाल्यास, "आप की याद" या ओळींच्या सुरांतून नेमके सूचन होते. गाण्यात, मध्येच अतिशय गुंतागुंतीच्या रचना आहेत तसेच गायन देखील त्याच अंगाने गेलेले आहे. गाण्यातील ताल देखील तसा खास "उठावदार" नसून, गायकीला पूरक इतपतच तालाचे अस्तित्व आहे. ययाचा परिणाम असा झाला, गाण्यात गायनाला अपरिमित महत्व मिळाले. खरतर जयदेव यांच्या बहुतेक सगळ्या गाण्यांत, वाद्यांचा नेहमीच नाममात्र वापर असतो. थोडे बारकाईने ऐकले तर आपल्याला समजून घेत येईल, मोजक्याच वाद्यातून चालीची अर्थपूर्णता आणि शब्दांचा आशय अधिक अंतर्मुखतेने सादर केलेला आढळून येतो. या गाण्यात, जेंव्हा सुरवातीला ताल विरहित गायन चालू असताना, या कौशल्याची प्रचीती आपल्याला नेमकेपणाने घेता येते.
गीतास रागाधार असावा पण गीत रागात नसावे, या पंथाचे, जयदेव हे संगीतकार आहेत. प्रस्तुत गाण्यात, याच वाक्याचा प्रत्यय आपल्याला घेता येतो. भैरवी रागाचे सूर ऐकायला येतात, जाणवतात पण गाणे भैरवीपासून वेगळे होते आणि मुख्य म्हणजे "गाणे" म्हणून सादर होते. बरेचवेळा इष्ट ते चमकदार वा भरून टाकणारे सुरावटींचे परिणाम देखील जयदेवांनी वेचक वाद्यांच्या सहाय्याने साधले आहे. इथे आपल्याला बासरी वाद्याने साधलेला इष्ट परिणाम ऐकायला मिळतो. गीताचा लयबंध यामुळे पुढे सरकत असला तरी तो गीतास बळजबरीने पुढे ढकलतो आहे, असे अजिबात दिसत नाही आणि, संगीतकार म्हणून जयदेव इथे फार वेगळे होतात. आणखी खास वैशिष्ट्य लिहायचे झाल्यास, साधे, मधुए आणि तसे पहाता परिचयाचे, बारकाव्यांनी भरलेले व विस्तारशक्यता असलेले संगीतवाक्यांश त्यांना सहज सुचत असत. बरेच रचनाकार नेहमी म्हणतात, मुखडा सुचण्यातच खरी प्रतिभा लागते. नंतर सगळे बांधकामच असते आणि हे जर मान्य केले तर जयदेव फार मोठे कारागीर ठरतात.
आताचे गाणे आपण ऐकणार आहोत, हे देखील सरळ सरळ भैरवी रागावर आधारित अजिबात नाही पण, आपण चित्रपट गीत बांधत आहोत, याची नेमकी जाणीव ठेऊन, रचना केल्याचे स्पष्टपणे दिसते. "हमे तुमसे प्यार कितना" हे "कुदरत" चित्रपटातील, संगीतकार राहुल देव बर्मन यांनी सादर केलेली रचना आहे. किशोरकुमारने गायली आहे. गाण्यात, केरवा ताल वापरले आहे. या संगीतकाराची खासियत अशी आहे, गाण्यातील ताल हा कधीही पारंपारिक पद्धतीने आपल्या समोर येत नाही, पण जर का मात्रांचा हिशेब लावायला बसलो तर मात्र, भारतीय पद्धतीचा ताल आढळतो. अर्थात, गाणे भारतीय बनावटीचे असल्याने, हा संगीतकार, परंपरेपासून जरी फटकून वागत असला तरी त्याची अखेर मात्र परंपरेशी नाळ जोडून असते. इथे गंमतीचा भाग म्हणजे चालीतून रागाचे सूचन होण्यापेक्षा, गाण्यात जो वाद्यमेळ वापरला आहे, त्यातून भैरवी रागाचे सूर आपल्याला मिळतात याचेच वेगळा अर्थ, तत्काल म्हणजे महत्वाचे वा अर्थपूर्ण सांगीत विधान करण्याआधीच परिणाम साधणे, हे या संगीतकाराचे आद्य उद्दिष्ट होते. म्हणूनच त्याने बहुदा तारतेच्या ध्वनीपरिणामावर लक्ष केंद्रित करून संगीत रचना मार्ग थोडा सहज करून घेतला. हे ध्वनीपरिणाम सर्वांत सहज आणि सर्वांच्या कानात लवकर शिरते, त्याचा बोध होतो.
मघाशी मी, तालाच्या बाबतीत जे मांडले आहे, त्या बाबत आणखी लिहायचे झाल्यास, ध्वनीपरिणाम, भारतीय केरवा तालाशी वरकरणी साम्य नसणारा मात्रांचा एक लायाबंध, तसे बघत सुटेपणाने केलेले गायन, सहज प्रतीत न होणारी सुरावट आणि घसीट तसेच मींड या स्वर लगावांचा मुबलक वापर करताना, लयखंडाचे भान काळजीपूर्वक ठेऊन, सादर केलेले गायन!! या संगीतकाराच्या शैलीचा आणखी एक बारकावा म्हणजे अनेक वेळा रचनेचा लयबंध लयवाद्यांतून प्रतीत न होता गीताच्या गतीतून प्रत्ययाला येतात. गीतांत लय प्रतीतीला येते ती शब्दांच्या घनतेमुळे, चरणाला आणि छंदाला मिळणारी गती अबाधित राहिल्यामुळे. या गाण्याच्या बाबतीत आपल्याला असे म्हणता येईल, भैरवी रागचौकटीपासून दूर सरकूनही रागाचे एकसंधपण आपल्या चालीस देण्याची प्रशंसनीय क्षमता या संगीतकाराकडे होती. भोवतालच्या निसर्गाचे निमित्त करून काहीसे अंतर्मुख होण्यासाठी हे गीत अवतरले आहे आणि या परिणामासाठी, या संगीतकाराने इथे संयमित भावनावेग आविष्कृत शास्त्रोक्त बाज - किंचित पातळ करून - एक अप्रतिम चित्रपट गीत निर्माण करण्यासाठी कामी लावला आहे, असे ठामपणे म्हणता येते.
आता, या रागावरील आणखी काही रचना खालील लिंक्समधून ऐकता येतील.
मेरी तन्हाइयो तुम हि लगा लो - जगजीत सिंग
अजी सोनियाचा दिनु - लता मंगेशकर - हृदयनाथ मंगेशकर
गा बाळांनो श्रीरामायण - सुधीर फडके