Wednesday, 8 March 2023

निळ्या अभाळी कातरवेळी

आपल्या इथे ललित संगीतात असा एक अपसमज पसरलेला आहे. सातत्य राखले की दर्जा खालावतो किंवा त्यात एकसुरीपणा येतो. एक नक्की, सातत्य राखण्याच्या प्रयत्नात, संगीतकाराची शैली लोकमान्य होते आणि त्या शैलीतच बरेचसे संगीतकार गुंतून पडतात. शैली तयार होणे, कुणीच टाळू शकत नाही कारण वैविध्य तरी किती आणणार? त्यातून चित्रपट सृष्टीत एकासाचीपण कायम भोगावा लागतो. विषयांचे एकसुरीपणा असल्याने, विषयांत तोचतोचपणा येतो. परिणामी केवळ संगीतच नव्हे तर चित्रपटाची हाताळणी. अभिनय इत्यादी घटकांत सातत्य हरपले जाते. मग संगीत कसे अपवाद होईल? प्रसंग तर नको तितके एकसुरी असतात. विषयात वैविध्य असले म्हणजे संगीतकाराला देखील नवीन काही स्फुरू शकते आणि आपल्या निर्मितीत "ताजगी" आणता येते. भारतीय चित्रपट, काही अपवाद वगळता, अजूनही प्रेम हाच विषय मध्यवर्ती ठेऊन,निर्माण केले जातात. अर्थात प्रणयाच्या निरनिराळ्या छटा असतात पण आपल्याकडे बहुतांशी फॅक्टरी मधून प्रॉडक्शन काढावे, तसे चित्रपट बनवले जातात. त्यामुळे संगीतकाराची उर्मी मारली जाते. हिंदी चित्रपट घ्या किंवा मराठी चित्रपट घ्या, काही अपवाद वगळता, त्याच विषयांत दळण दळले जाते!! मुळात मराठी चित्रपटांचा परीघ विस्तीर्ण असा कधीच नव्हता. त्यामुळे चित्रपटाच्या कथांत फारसे वेगळेपण, फारसे बघायला मिळाले नाही. अर्थात याचा परिणाम सातत्यावर घडून येणे क्रमप्राप्त ठरते. अर्थात काही संगीतकारांनी आपली निर्मिती मर्यादित स्तरावर ठेवली आणि आपली ओळख कायम ठेवली. यामध्ये संगीतकार आनंदघन यांचे नाव घेता येते. आनंदघन हे टोपणनाव असले तरी आता आनंदघन म्हणजे लाटा मंगेशकर, हे गुपित सर्वश्रुत आहे. लताबाईंनी भालजी पेंढारकरांच्या काही चित्रपटांना संगीत दिले आणि आपण, मनात आणले तर अप्रतिम स्वररचना करू शकतो, हे दाखवून दिले. आजचे गाणे हे म्हटले तर लोकप्रिय आहे पण तरीही मानदंड ठरावा, इतके नक्कीच लोकप्रिय नाही. काही वेचक रसिकांच्या मनात घर करून आहे. शांता शेळक्यांच्या कविता या परिचित रुणझुणत्या पैंजणाच्या आवाजाप्रमाणे किणकिणत असतात. त्यात वेदना पिळवटून टाकणारे दु:ख नसते तर वेदनेची जात ही बव्हंशी संयत असते. तसेच प्रणयाची जात बरीचशी मुग्धतेकडे वळणारी असते. "मी हुरहुरते, मनात झुरते, दूर गेले पती" ही ओळ प्रातिनिधिक म्हणता येईल. प्रतिमा जरी ठोस नसल्या तरी खूप आशय दर्शवत, अशा देखील नाहीत. "नदी समिंदर नकळत मिसळुनी एकरूप होती" ही ओळ उदाहरण म्हणून चपखलपणे सांगता येते. आता या कवितेत कुठलाच शब्द गूढ, दुर्बोध नाही, सगळे शब्द आपल्या परिचयाचे आहेत पण तरीही वाचताना, आपण अंतर्मुख होतो आणि कवित्वाशी तादात्म्य पावतो. हे जे तादात्म्य पावणे आहे, इथेच खरी कविता जन्माला येते. अर्थात कवितेत एक शब्द खटकतो - निळ्या आभाळी हे अधिक योग्य असताना निळ्या अभाळी लिहिले आहे आणि हे केवळ चालीच्या मीटरमध्ये बसवण्यासाठी केलेली तडजोड आहे. संगीतकार म्हणून लताबाईंचा उल्लेख वर केलाच आहे. एकूणच त्यांच्या स्वररचनांचा विचार केला तर, चाली सहज गुणगुणता येतील अशाच आहेत. काही गाणी शास्त्रोक्त चीजेवर आधारित आहेत. ही चाल यमन रागाशी नाते सांगते. गाण्याच्या सुरवातीचा वाद्यमेळ अगदी मोजका आहे. एकूणच मराठी संगीतात (आता परिस्थिती बरीच बदललेली आहे) पूर्वी वाद्यमेळ ही संकल्पना फारशी रुजली नाही. बहुदा आर्थिक कारण असावे. स्वररचनेचा सगळा भार हा गाण्याच्या चालीवर असायचा. वाद्यमेळ बव्हंशी बासरीवर तोललेला आहे. रचनेत फारशा हरकती किंवा ताना नाहीत. मुळात यमन रागात एक प्रकारचा लोभस असा गोडवा आहे त्यामुळेच बहुदा आत्तापर्यंत असंख्य गाणी या रागावर आधारलेली आहेत आणि बहुदा यापुढे निर्माण होतील. हेच वैशिष्ट्य या गाण्यात प्रकर्षाने दिसून येते. एक प्रश्न इथे मांडता येईल. लताबाई संगीतकार की गायिका? गायिका म्हणून त्यांचे स्थान अनन्यसाधारण निश्चितच आहे पण संगीतकार म्हणून त्यांनी हे क्षेत्र का निवडले नाही? गायिका म्हणून प्रचंड मागणी आणि काम हाताशी असल्याने, संगीतकार म्हणून आपण तितका वेळ देणे अशक्य, असे काही वाटले असावे का? केवळ हेच गाणे नव्हे तर इतर काही चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे आणि केवळ गुणवत्तेच्या नजरेतून बघता, त्यांनी आपले स्वत्व सिद्ध करून दाखवले होते. अर्थात त्यांनी काम करायचे थांबवले, हा रसिकांचा तोटा आला. गायिका म्हणून इथे लताबाईंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. अर्थात ही द्विरुक्ती झाली म्हणा!! परंतु थोडा तुलनात्मक विचार करायचा झाल्यास, संगीतकारापेक्षा इथे गायिका म्हणून कामगिरी अधिक उजवी वाटते. अर्थात इथे मतभेद होऊ शकतात. "निळ्या अभाळी कातरवेळी,चांदचांदणे हसती" या मुखड्याच्या ओळीपासून त्यांच्या आवाजाचे गारुड, मनावर पसरते, ते पूर्ण गाणे संपेपर्यंत. हा देखील अनुभव अर्थात काही नवीन नाही म्हणा. "मी हुरहुरते, मनात झुरते, दूर गेले पती" याला ओळीतील "हुरहुरते" किंवा "झुरते" यांचे स्वरिक उच्चार मुद्दामून ऐकावेत असेच आहेत. त्या शब्दामागील व्याकुळ भावना, यापेक्षा अधिक अर्थपूर्ण करणे अशक्य वाटावे, इतके पूर्णत्व, त्या गायकीतून ऐकायला मिळते. अशीच गायकी शेवटच्या अंतऱ्यातील "मनमंदिरी मी पूजीन त्यांना, वाहीन पायी प्रीतफुलांना" या ओळीतील समर्पण भाव तितकाच विलोभनीय आणि तत्कालीन संस्कृतीला धरून आहे. निळ्या अभाळी कातरवेळी,चांदचांदणे हसती मी हुरहुरते, मनात झुरते, दूर गेले पती टिपूर चांदणे धरती हसते पती पाहता मी भान विसरते नदी समिंदर नकळत मिसळुनी एकरूप होती मनमंदिरी मी पूजीन त्यांना वाहीन पायी प्रीतफुलांना पाच जीवांच्या उजळून ज्योती ओवाळीन आरती (2) Nilya Aabhaali, Katarveli Mohityanchi Manjula 60 Shanta Shelke Anandghan Lata - YouTube

No comments:

Post a Comment