Monday, 20 March 2023
साहिर - अवलिया कवी
ख़ुदा-ए-बऱतर तेरी जमी पर
जमीं के खातिर ये जंग क्यूँ हैं
हर एक फ़तह-ओ-जफ़र के दामन पे
खून-ए-इन्सान का रंग क्यूँ हैं
जमीं भी तेरी,है हम भी तेरे
ये मिल्कियत का सवाल क्या हैं
ये क़त्ल-ओ-ख़ून का रिवाज क्यूँ हैं
ये रस्म-ए-जंग-ओ-जदाल क्या हैं
जिन्हें तलब है जहान भर की
उन्ही का दिल इतना तंग क्यूँ है
गरीब माओ शरीफ़ बेहनों को
अम्न-ओ-इज्जत की जिंदगी दे
जिन्हे अता के है तूने ताक़त
इन्हे हिदायत की रोशनी दे
सरों में किब्र-ओ-गरूर क्यूँ है
दिलो के शीशे पे जंग क्यूँ है
खजा के रस्ते पे जानेवालो को
बच के आने की राह देना
दिलों के गुलशन उजड़ ना जाये
मुहब्बतों को पनाह देना
जहाँ में जश्न-ए-वफ़ा के बदले
ये जश्न-ए-तिर-ओ-तफ़ंग क्यूँ हैं
साहिरच्या काही सुंदर कवितांपैकी चित्रपटात गेलेली ही कविता. असे म्हणता येईल मानवतावादी दृष्टिकोनातून कविता लिहिली आहे तरी देखील कवितेतील डावी विचारसरणी लपत नाही आणि खरंतर साहिरने अंगिकारलेली ही विचारसरणी, चित्रपटातील गाणी लिहिताना देखील लपवली नाही. खरतर मानवी आयुष्यातून युद्ध ही कल्पना कायमची बाजूला सारता येईल का? आज तर नक्कीच नाही परंतु आशावाद कायम असतो आणि त्या आशावादातूनच अशी कविता जन्माला येते. प्रस्तुत कवितेत बरेच उर्दू भाषिक शब्द आहेत जे मराठी भाषिक वाचकांना अगम्य वाटू शकतात परंतु इथे एक बाब ध्यानात घेण्यासारखी आहे, साहिर हा हाडाचा उर्दू भाषिक कवी होता आणि आजही उर्दू साहित्यात त्याला मान आहे. किंबहुना असे देखील म्हणता येईल, चित्रपटातील गाण्यात साहिरने कविता मिसळली आणि गाण्याचा दर्जा उंचावला. अर्थात टीका करणारे उलट बाजूने टीका करतच असतात. चित्रपटातील गाण्यात काव्य मिसळायला हवे का? एक काळ असा होता, चित्रपट क्षेत्रात उर्दू भाषिक कवींचे प्राबल्य होते आणि बहुतेक गीते उर्दू भाषेत लिहिली जायची. गमतीचा भाग म्हणजे, त्याच काळातील जान निसार अख्तर, शकील बदायुनी इन्वा कैफी आझमी, हे सगळेच डाव्या विचारसरणीचे कवी होते आणि कम्युनिझम विचारसरणीचा प्रचंड पगडा त्यांच्यावर होता.
तेंव्हा साहिर यांच्यावरील कम्युनिझम पगडा काही जगावेगळा नक्कीच नव्हता. साहिरची पार्श्वभूमी बघितल्यावर, या विचारसरणीचे महत्व पटते. १९४७ सालचा नृशंस नरसंहार, पुढे आई वडिलांचे विभक्त होणे, या सगळ्याचा साहिरवर परिणाम घडणे अटळ होते. आई वडिलांचे विभक्त होते, याचा त्याच्या मनावर कायमचा चरा पडल्याचे, त्याच्या सुरवातीच्या काही कविता वाचताना दिसून येते.
मेरे सरकश तराने सुनके दुनिया ये समझती है,
की शायद मेरे दिल को इश्क़ के नग्मों से नफ़रत है
मुझे हंगामा-ए-जंगो-जदल में कैफ़ मिलता है
मेरी फ़ितरत को खूरेंजी के अफ़सानों से रग़बत है
मेरी दुनिया में कुछ वक़अत नहीं है रक़्सो-नग़्मे की
मेरा महबूब नग़्मा शोरे-आहंगे-बग़ावत है
याओळीतून सहज दिसणारी वैफल्याची भावना, पुढे सरसकट वेगवेगळ्या कवितांमधून अधिक दृढ होत गेली. साहिरच्या कवितेत निखळ आनंद फारसा वाचायला मिळत नाही. अगदी प्रणयी थाटाची कविता असली तरी कुठेतरी निराशेचा सूर घुमत असतो.
मेरा जुनूने - वफ़ा है ज़वाल - आमादा,
शिकस्त हो गया तेरा फ़ुसने-जेबाई!
उन आरजुओं पी छाई है गर्दे - मायूसी,
जिन्होंने तेरे तबस्सुम में परवरिश पाई!
प्रेमाचा उन्माद असताना, तो कमी होत आहे, श्रृंगार मनात असताना देखील मनात निराशा दाटलेली आहे. त्यामुळे त्याच्या कविता वाचताना, आपल्या मनात देखील बराच काळ काळोखी दाटते आणि कवितेचा निखळ आस्वाद घेणे अवघड होते. सतत कवितेत "मायूसी" सारखे विरही शब्द वाचायला मिळतात. कलाकाराचा त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंध जोडू नये, हे खरेच आहे पण साहिरचे आयुष्य पहिले की असेच वाटते, याच्या वाट्याला निखळ आनंद कधी आलाच नसावा. संस्कारक्षम वयातील देशाची फाळणी, पुढे वडिलांचे ऐय्याशी जीवन आणि आईची झालेली फरफट, पुढे अमृता प्रीतमशी तुटलेले नाते, या सगळ्यांचा परिपाक त्याच्या कवितेतून वारंवार दिसून येतो. साहिर डाव्या विचारसरणीकडे का वळला, याचा तर्क आपल्याला लढवता येऊ शकतो.
विचार करणे ही मनुष्याची प्रकृती आहे आणि म्हणूनच त्याच्या अनुभवत विचारांचा अंश अपरिहार्यपणे असतो. ललित साहित्यातून आणि विशेषकरून कविता लेखनातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांच्या बाबतीत तर हे विशेषत्वाने खरे आहे. कारण भाषा हे ललित साहित्याचे माध्यम आहे. भाषेचाच द्वारे त्यात व्यक्त होणारा हा अनुभव होतो, म्हणजेच त्याला अर्थ प्राप्त होतो. आणि भाषेचं घडणच अशी आहे की, तिच्या द्वारे घेतलेल्या अनुभवत विचार अपरिहार्यपणे यावा लागतो.
आपण ललित साहित्याची एकंदर घडण बघितली तर एक गोष्ट नेहमी स्पष्ट होते. प्रतिमा,पत्रे आणि घटक हे ललित साहित्याचे महत्वाचे घटक असतात. आणि या तिन्ही घटकांचा एक समान गुणधर्म असा की ते संवेदना,भावना आणि विचार यांना एकत्र बांधून ठेवतात. वेगळ्या शब्दात प्रतिमा जे कार्य मूलभूत स्तरावर करते, तेच कार्य घटना आणि पात्रे अधिक विस्तारित स्वरूपावर करतात. आणि म्हणूनच कदाचित ललित साहित्यात विश्वात्मकता असू शकते.
साहिरच्या कवितांचा विचार करताना, वरील विचार फार महत्वाचा ठरतो. याचे महत्वाचे कारण, त्याच्यावरील संस्कार आणि त्याचा कार्यकारणभाव, हेच त्याच्या कवितांचे मुलतत्व कायम राहिले. आपल्याला आलेले अनुभव, हा त्याच्या कवितांचा कच्चा माल आहे आणि ही जाणीव कायम त्याच्या सोबत आहे.अगदी चित्रपटातील गीतांचा स्वतंत्र विचार केला तरी हेच दिसून येते.
तुम मुझे भूल ही जाओ तो ये हक़ है तुमको
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है
याच कवितेत पुढे साहिर स्पष्टपणे लिहितो,
ज़िन्दगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है
जुल्फ़ - ओ - रुख़सार की जन्नत नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुई इस दुनियामें
इश्क़ ही एक हक़ीक़त नहीं कुछ और भी है
इथे साहिरवरील डाव्या विचारसरणीचा पगडा स्पष्ट दिसतो. खरे तर चित्रपटातील साधे प्रणयी थाटाचे गाणे आहे परंतु साहिर तसा विचार करत नाही. प्रेमात कितीही आकंठ बुडायचे म्हटले तरी सामाजिक वास्तव आणि त्याची जळजळीत विखारी जाणीव त्याच्या केंद्रस्थानी येते. मी वरती संस्कार आणि त्याचा कार्यकारणभाव संबंधी विधान केले, त्याला या ओळी पूरक ठरतील. पुढे त्यांने अगदी भांडवलशाही वातावरणात गीते लिहिली तरी त्याच्यातील मूळ धागा कधीच लोपला नाही आणि ती वेगवेगळ्या स्तरावर दृग्गोचर होत राहिला.
इथे एक मुद्दा सुचला. कलाकारांच्या बाबतीत असे म्हणता येईल, निरनिराळ्या व्यक्तींच्या प्रकृती भिन्न असतात. कुणी आवेगाने अनुभव घेतो तर कुणी संयमाने अनुभव घेतो; दुसरा अलिप्तपणे अनुभव घेतो आणि आणखी कुणी तिरक्या नजरेतून अनुभव घेत असतो. परिणामी होणारी अभिव्यक्ती ही नेहमीच वेगवेगळी असते. आता साहिरच्या कवितेत बरेचवेळा उत्कटता हा भाव दिसतो. परंतु साहित्यात जी उत्कटता असावी लागते ती आता उत्कटता म्हणजे काय?उत्कटता अनुभवाची नसून अभिव्यक्तीची असते. ललितकृतीतून व्यक्त होणार अनुभव जर जिवंत नसेल तर तो वाचकांपर्यंत नेमका पोहोचणे अवघड असते. तेंव्हा हा जिवंतपणा म्हणजे उत्कटता कलाकृतीत असलीच पाहिजे. अर्थात निव्वळ उत्कटता असणे कलाकृतीच्या जिवंततेला आशय प्रदान देते का? उत्कट अभिव्यक्ती ही पूर्णपणे कलात्मक पातळीवर गेलेली असते. साहिरच्या पुढील ओळीत ही उत्कटता अभिव्यक्तीच्या पातळीवर गेली आहे, हे बघता येते.
मेरे जहाँ में समनजार ढूंढ़ने वाले,
यहाँ बहार नहीं आतशी बगूले हैं
धनुक के रंग नहीं, सुरमई फ़िज़ाओं में
उफ़क़ से ता-ब-उफ़क़ फांसियों के झूलें हैं
माझ्या आयुष्यात उपवन शोधणाऱ्यांनो, इथे फक्त अग्निलोळ मिळेल. मी फक्त पहिल्या २ ओळींचा मतितार्थ लिहिला आहे. परंतु उत्कटता अभिव्यक्तीच्या पातळीवर कशी जाते, हे आपल्याला समजून घेता येते. कविता बरीच मोठी आहे आणि आपण इथे आस्वादाच्या पातळीवरून साहिर यांचे काव्य बघत आहोत.
आता थोडे मूल्यमापन करायचे झाल्यास, काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील. जीवनाचे सत्य स्वरूप दाखवणे आणि जीवनविषयक ऊच्च आदर्श वाचकांपुढे मांडणे,ह्या दोन्ही गोष्टी साहित्यिक करत असतो. वास्तविक या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. जीवनाचे सत्य स्वरूप दाखवले की त्यातून आपोआप जीवनाचे आदर्श सूचित होतात अशी बरेचवेळा एक भूमिका असते. काही वेळा तर सत्य, शिव आणि सौंदर्य ही सारी एकच आहेत, अशी भूमिका अद्वैतवादी घेतात. पुढे जाऊन असे देखील मांडले जाते, सौंदर्य हे केवळ घाटात नसून आशयात देखील असू शकते. एकंदरीत आपण भूमिकेवर आलो की तर्कशास्त्र दूर जाते. त्या दृष्टीने नीतिमूल्ये बदलत असतात, तेंव्हा त्यानुसार साहित्याच्या प्रतवारीत देखील फरक पडतो परंतु मूलभूत नीतिमूल्ये शाश्वत असतात, बदलतात ती आनुषंगिक आणि तात्कालिक मूल्ये. साहित्याचा संबंध मूलभूत मूल्यांशी असतो तेंव्हा तात्कालिक मूल्ये बदलली तरी फारसा फरक पडत नाही. कुठलाही साहित्यिक हा भाषेचं उपयोग प्रत्यक्षाचे किंवा सामाजिक परिस्थितीचे चित्रण करण्याकरता करतो, असे मार्क्सवादी ठामपणे मांडतात आणि इथे साहिरच्या कवितेची कुंडली जुळते.
साहिरचे सामाजिक भान कधीही विरळ होत नाही, अगदी निसर्गचित्र मांडताना देखील हा दृष्टिकोन प्रकर्षाने दिसून येतो. साहिरची अतिशय लोकप्रिय कविता ध्यानात घेतल्यास, हा मुद्दा थोड्या वेगळ्या पद्धतीने स्पष्ट करता येईल.
ताज़ तेरे लिए इक मज़ार - ए - उल्फत ही सही
तुझको इस वादी - इ - रंगीन से अक़ीदात ही सही
मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से
बज़्म - ए - शाही में गरीबों का गुज़र क्या मानी
सब्त जिस राह में हों सतवत - ए - शाही के निशाँ
उस पे उल्फत भरी रूहों का सफर क्या मानी
आता मान्य करायला हवे, एकेकाळी या कवितेने मला वेड लावले होते पण पुढे एकूणच ही सगळीच कविता बटबटीत वाटायला लागली. वास्तविक ताजमहाल सारखी अलौकिक सुंदर वास्तू आणि ती बघून साहिरला, ती बांधतानाची झालेली पिळवणूक आठवते. सगळे चित्रण याच पार्श्वभूमीवर आहे. एका दृष्टीने हा स्वतंत्र दृष्टिकोन म्हणता येईल पण तो दृष्टिकोन मांडताना, कुठेतरी साहिरची सौंदर्यदृष्टी एकांगी झाली, असे आज वाटते.
अर्थात इथे एक मुद्दा आणखी मांडता येईल. कुठल्याही कलाकाराच्या सगळ्याच साहित्यकृती या असामान्य दर्जावर ठेवता येत नसतात, त्यात डावे - उजवे हे नेहमीच असते. आपण आपली दृष्टी किती सम्यक पातळीवर ठेवतो, त्याप्रमाणे मूल्यमापन होऊ शकते. दुर्दैवाने मूल्यमापनाचे ठाम आणि ठराविक असे निकष अजुन तरी उपलब्ध नाहीत.
अर्थात साहिरने निसर्गचित्रे लिहीलीच नाहीत का? उत्तर सोपे आहे. नक्कीच लिहिली आहेत परंतु दुर्दैवाने त्याची जी प्रतिमा निर्माण झाली, त्याच्यापुढे झाकोळून गेली.
तसव्वुरात की परछाइयाँ उभरती हैं
कभी गुमान की सूरत कभी यकीं की तरह
वो पेड़ जिनके तले हम पनाह लेते थे
खड़े है आज भी साकित किसी अमी की तरह
आता या ओळी वाचताना, त्याची ठराविक ओळख "खड़े है आज भी साकित किसी अमी की तरह" या ओळीतून प्रकट होते "साकित" म्हणजे "चुपचाप"! निसर्गचित्र निर्माण करताना देखील त्याचा व्याकुळ स्वर लपत नाही. साहिरच्या बहुतांशी कवितेत निराशा कायमची ठाण मांडून बसलेली असते आणि त्याचे मूळ, मी वर निर्देश केलेल्या संस्कारात दडलेले आहे.
खरेतर सौंदर्यवाद्यांची भूमिका अशी असते की, साहित्याचा एकमेव विशेष आणि निकष हा सौंदर्य असतो. साहित्यकृती ही तिच्या घटकांची लयबद्ध रचना करून घडवलेली असते आणि म्हणून ती सुंदर असते. साहित्यकृतींचे सौंदर्य अशा रीतीने तिच्या रचनेत अथवा घाटात साठवलेले असते. परंतु ह्या गोष्टी काहीशा आनुषंगिक असतात. अर्थातच साहित्य श्रेष्ठ की कनिष्ठ हे तिच्या ठिकाणी असलेल्या सौंदर्यावरून ठरवायचे असते. सौंदर्य हाच साहित्याचा महत्वाचा निकष असू शकतो आणि हाच दृष्टिकोन महत्वाचा ठरवला तर साहिर यांच्या कविता एकूणच भाषेच्या दृष्टीने फारच समृद्ध ठरतात.
Wednesday, 15 March 2023
ये दिल और उनकी निगाहो के साये!!
"अशीच आलीस निळ्या नभांतून
पांघरुनी स्वप्नांचा शेला!!
आणिक मजला तव नयनांतुन
नव्या जागांचा प्रत्यय आला."
कविवर्य विं.दा. करंदीकरांच्या "मृदगंध" कविता संग्रहातील या ओळी. प्रणयोत्सुक मानसिकतेचे सुरेख दर्शन या ओळींतून आपल्याला भावते. वास्तविक विं. दा. करंदीकर हे प्रणयोत्सुक कवी म्हणून फारसे कुणाला ज्ञात नाहीत पण म्हणून अशा कवीची थोडी वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्न.
आजचे गाणे "ये दिल और उनकी निगाहो के साये" हे देखील अशाच एका ओढाळ मनस्थितीचे आहे. चित्रपटातील नायिकेला प्रेमाची ओळख पटते आणि त्या धुंदीत वावरताना, अशी ओळ गुणगुणायला लागते.
काही गाणी ही सतत तुमच्याशी "संवाद" साधण्याचा प्रयत्न करीत असतात, आपणच, एकतर त्या संवादाची भाषा समजून घ्यायला तयार नसतो किंवा दुर्लक्ष करीत असतो. वास्तविक गाण्यातील शब्दांची भाषा काय किंवा सुरांची भाषा काय, माणसानेच निर्माण केलेली परंतु आपण बरेचवेळा तिकडे अक्षम्य दुर्लक्ष करतो. सुरांची भाषा ही अतिशय तरल आणि अमूर्त असते, त्यामुळे त्या भाषेशी संवाद साधायचा झाल्यास, आपल्यालाही तशीच मनोभूमी तयार करणे आवश्यक असते. "ये दिल और उनकी निगाहो के साये" हे गाणे अशाच प्रतीचे आहे, अप्रतिम कविता, तितकीच बेजोड चाल, त्यालाच साजेसा वाद्यमेळ आणि या सर्वांचा शर्कारावगुंठीत गायकी आविष्कार!!
चाल स्पष्टपणे "पहाडी" रागावर आहे पण तरीही वेगळी आहे!! कशी? सुरवातीलाच जे वाद्यमेळाचे संगीत आहे, त्यातून पहाडी रागाचे सूर प्रतीत होत असले तरी जो प्रचलित पहाडी राग आहे, त्यापासून थोडे वेगळे आहेत आणि ही संगीतकार म्हणून जयदेव यांची खासियत. चित्रपट किंवा एकूणच सुगम संगीतात, संगीतकाराचे जे महत्व अधोरेखित होते, त्यात वाद्यमेळाची रचना नेहमीच ,महत्वाची गणली जाते. आपल्याकडे, या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
या गाण्याच्या सुरवातीला बासरी आणि संतूरच्या सुरांचा जो अद्भुत मेळ घातला आहे, तो खास ऐकण्यासारखा आहे. जवळपास दीड मिनिटांचा मेळ आहे पण प्रत्येक सूर आणि त्याची पुढील स्वराशी घातलेली सांगड आणि त्याला दिलेली तालाची जोड, इथेच गाण्याची "बैठक" पक्की होते. बासरी आणि संतूर, ही जयदेवची खास आवडीची वाद्ये!! बासरीचे सूर तर त्यांनी इतक्या गाण्यात ज्या खुमारीने वापरले आहेत, त्याला तोड नाही. वास्तविक, हिंदी चित्रपट संगीतात बासरी काही नवीन नाही पण, जयदेवच्या रचनेत, बासरीचे :वजन" नेहमीच वेगळे असते जशी मदन मोहनच्या संगीतात सतार!! पहाडी रागातील "गधार", "पंचम" आणि "धैवत" स्वरांची जी जोड आहे, त्याचाच आविष्कार या पहिल्या स्वररचनेत आविष्कृत होतो आणि तुम्ही या गाण्यात गुंगून जाता.
तसे बघितले तर पहाडी राग हा लोकसंगीताशी फार जवळचे नाते राखणारा राग, त्यामुळे इथे स्वराविष्काराला भरपूर वाव. काही कलाकार तर, "मध्यम" स्वराला "षडज" मानून रागाची बढत करतात!! गाण्याचे सुरवातीचे शब्द देखील, याच रागाशी साद्धर्म्य राखतात. आता आपण मुखड्याची ओळ स्वरलेखनासाठी घेऊया
ये दिल और उनकी नि गा हो के सा ये
प प मम गम म ग सा नि सा पप
या पहिल्याच चरणात, चालीचे "गायकी" अंग स्पष्ट होते. जयदेव यांची कुठलीच चाल कधीही सरळ आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पहिल्या ओळीतील "उनकी" या शब्दावरील मुरकी, कशी अवघड आहे!! "उन" ही अक्षरे चालू असलेल्या सुरावटीत येतात पण "की" शब्द मात्र क्षणात वरच्या पट्टीत जातो, इतका की ऐकताना चकित व्हावे आणि गाणे अवघड लयीत शिरावे!! बरे तिथे स्वराचा "ठेहराव" क्षणमात्र असून, पुढे "निगाहो" शब्दावर शब्दावर लय विसावते!! हा सांगीतिक प्रकार, फार,फार अवघड आहे!! सुरवातीला श्रवणीय वाटणारी चाल, एका क्षणात चालीचे स्वरूप पालटते आणि वेगळ्याच लयीचे दर्शन घडवते!! इथे जयदेवची कुशाग्रता आणि लताबाईंची गायकी दिसून येते.
पुढील ओळीत अशीच सांगीतिक गुंतागुंतीची रचना आहे. "मुझे घेर लेते है ये बाहो के साये"!! जरा बारकाईने बघितले असे दिसेल, पहिल्या ओळीतील अक्षर संख्या आणि दुसऱ्या ओळीतील अक्षर संख्या, यात तफावत आहे आणि लयीच्या दृष्टीने अशी तफावत योग्य असत नाही आणि इथेच जयदेवची खासियत दिसते. त्याने काय केले बघा, "मुझे" नंतर "घेर" शब्द सुरांत बांधताना, त्याला हलक्या अशा हरकतीची जोड दिली आहे आणि ते देखील आशय अधिक अर्थपूर्ण होईल, या दृष्टीने दिली आहे. म्हणजे बघा, शब्दसंख्या अनघड झाली तरी लय कुठेच अडखळत नाही!!
सगळ्या गाण्यात, वाद्ये फारशी नाहीतच आणि जयदेवने काही अपवाद गाणी वगळता, कधीच गाण्यात भरमसाट वाद्यांचा वापर केलाच नाही. मोजकी वाद्ये घ्यायची पण त्या वाद्यांचा गुणधर्म ओळखून, त्यातून वेचक सुरांची निर्मिती करून, आवश्यक तो परिणाम साधायचा!! खरेतर, लताबाईंचा आवाज, हा देखील त्या वाद्यमेळात असा काही जमून जातो की तिथे आणखी कुठलेही वाद्य उपरे वाटावे.
"पहाडो को चंचल किरण चुमती है,
हवा हर नदी का बदन चुमती है,
यहा से वहा तक, है चाहो के साये"
इथे प्रत्येक ओळीतील खटके ऐकण्यासारखे आहेत. गायिकेला शब्दांचे नेमकी जाण असेल तर प्रत्येक शब्द सुरांतून उच्चारताना, त्याचा आशय आणि वजन, याचा नेमका "तोल" साधून गायला गेला की तेच शब्द आणि तीच चाल, एका वेगळ्या झळाळीने झगमगते!! "हवा हर नदी का बदन चुमती है" मध्ये, "हर" या शब्दावर दिलेला "हलकासा" जोर आणि त्यामुळे हेलकावणारी लय, प्रणयी विभ्रम, सुरांतून कसे व्यक्त करावेत, याचा, ही गायकी म्हणजे उत्तम नमुना ठरावा!! किंवा, पहिल्याच ओळीचा शेवट करताना, जो "है" शब्द आहे, तो कसा येतो, "चुमती" मधील "ती" शब्द वरच्या पट्टीत जातो पण "है" मात्र मुलाच्या लयीत अवतरतो!! कमाल आहे, गायिकेची आणि संगीतकाराची!!
"लिपटते है पेडो के बादल घनेरॆ,
ये पल पल उजाले, ये पल पल अंधेरे,
बहोत ठंडे ठंडे, है राहो के साये"
इथे, पहिल्याच ओळीत चाल वरच्या पट्टीत गेली आहे आणि कशी गेली आहे, बघा!! "लिपटते" पासून लय हळूहळू वरच्या पट्टीत जाते आणि "घनेरे" इथे ती लय संपते. संपूर्ण ओळ वरच्या सप्तकात जाते पण लगेच " ये पल पल उजाले, ये पल पल अंधेरे" ही ओळ सुरवातीच्या लयीत अवतरते. अवघड लय आणि ती गळ्यावर कशी पेलायची, इथे लयीतील प्रत्येक "क्षण" टिपून घ्यावा!! वास्तविक इथे स्वर, शब्दांवर गारुड घालू शकले असते पण तरीही स्वरयोजना अशी आहे, की शब्द कुठेही स्वरांखाली गुदमरत नाहीत तर शब्दात दडलेला आशय अधिक मोकळा करते!!
"धडकते है दिल कितनी आजादीयो से,
बहोत मिलते जुलते है इन वादियो से,
मोहब्बत की रंगीन पनाहो के साये"
या असामान्य गाण्याची शब्दरचना सुप्रसिद्ध शायर जान निसार अख्तर (जावेद अख्तरचे वडील) यांची आहे. वास्तविक हा शायर रूढार्थाने चित्रपटात गीते लिहिणाऱ्या कवींच्या पंक्तीत कधीच बसला नाही. या शायरची चित्रपटीय कारकीर्द बघायला गेल्यास,बहुदा हाताची बोटे देखील अधिक भरतील परंतु जेंव्हा केंव्हा संधी मिळाली, तेंच या कवीने आपला "वेगळा" दर्जा दाखवून दिला. या शब्दकळेतील खास निसर्गचित्रे अनुभवण्यासारखी आहेत. "लिपटते है पेडो के बादल घनेरॆ" अशा सारखी रम्य ओळ, चित्रपट गीतांत फार अभावानेच वाचायला मिळते. अगदी उदाहरण घ्यायचे झाल्यास, साहिरच्या काही कवितेत अशा प्रकारच्या ओळी वाचायला मिळतात.खरंतर इथे हे एक सुंदर भावकाव्य म्हणून आपल्याला प्रतीत होते आणि त्यामुळे हे गाणे आपल्याला अधिक जवळचे वाटायला लागते.
चित्रपट गीतांतील कविता वाचावी का? वाचल्यावर अनुभवावी का? असा प्रश्न बरेचवेळा विचारला जातो, एक नक्की, गाणे म्हटल्यावर त्यातील सूर हा घटक नेहमीच प्रबळ ठरतो आणि त्याचे गारुड दीर्घकाळ टिकणारे असते. त्यामुळे बहुतेक सगळ्याच गाण्यात "शब्द" घटक नेहमीच एकतर दुर्लक्षिला तरी जातो किंवा बाजूला सारला जातो. यापुढे आपल्याला असे म्हणता येईल, जर का शब्द नसतील तर आकारास येणारा आविष्कार, गाणे यासाठी पात्र ठरेल का? वेगळ्या शब्दात, त्याला मग धून म्हणणे भाग पडेल. म्हणजे शब्दांविना गाणे सर्वस्वी अशक्य. असे असताना,
"शब्द" हा घटक आवर्जूनपणे दखल घेणाराच ठरतो.
गाण्याचा योग्य आस्वाद घेण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी, गाण्यातील शब्दकळा ही नेहमीच प्रभावी, अर्थपूर्ण आणि सघन असावीच लागते. बरेच रचनाकार "आधी शब्द, मग चाल" या पंथाचे आणि त्यानुसार चाल निर्मिणारे असतात, तेंव्हा त्यावेळी त्यांच्या डोक्यात हाच एकमेव विचार घोळत असतो. अर्थात हा काही नियम किंवा निकष म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. विशेषतः चित्रपट गीत प्रक्रियेत उलट्या प्रकारे देखील सुंदर गीत जन्माला येण्याची भरपूर उदाहरणे सापडतात. असे देखील, गीतातील प्रक्रियेत शब्दाचे महत्व हे नेहमीच अधोरेखित केले जाते.
त्यादृष्टीने इथे शब्द कसे निसर्गातील प्रतिमा घेऊनच अवतरले आहेत आणि त्याच निसर्गात दडलेली चाल, संगीतकाराने, कवितेला "अर्पिलेली" आहे. इथे आणखी बारकाईने ऐकले तर कळेल, प्रत्येक कडव्याची सुरवात वेगळ्या सुरांवर होते पण शेवट मात्र, पहिल्या ध्रुवपदाच्या सांगीतिक रचनेशी नाते जोडत असतो. संगीतातील अवघड तरीही मनात रुंजी घालणारी व्यामिश्रता, ही अशी!! इथे प्रत्येक सूर, त्याला जोडलेली मात्रा याचे नाते नेमकेपणी समजून घ्यावे. रचनेत कुठेच "रेंगाळलेपण" नाही, किंबहुना जी नायिकेची प्रणयी आतुरता आहे, त्या भावनेचे स्फटीकीकरण सुरांतून मांडलेले आहे. लयीचे इतके विभ्रम ऐकायला मिळतात की मनाला संभ्रमावस्था यावी आणि तशी येते!! रचनेतील कुठला स्वर न्याहाळावा, याचाच संभ्रम पडावा!! अतिशय स्वच्छ गायकी तरीही कुठेही अकारण स्पष्टता नाही!! ऐकताना, चाल, मनाला वेढून टाकते आणि आपण हे गाणे सहज गाऊ शकतो, असे आव्हान करते पण जेंव्हा गाणे गायला घेतले जाते तेंव्हा आपले आपल्याच कळून चुकते, इथे फक्त लताबाईंचाच गळा आवश्यक आहे आणि आपल्या हातात, जयदेव आणि लताबाई, यांच्यासमोर नतमस्तक होण्यापलीकडे काहीही रहात नाही!!
@अनिल गोविलकर
Ye Dil Aur Unaki, Nigaahon Ke Saaye ..... Original Track - Lata Mangeshkar - Prem Parbat (1973) - YouTube
हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू
"फिके फिके रंग व्हावे गर्द गर्द निळे
डोळे डोळ्यांत तसेच झाकून राहिले
तुझ्या माझ्या अस्तित्वाची स्तब्ध रानजाळी
एकदाच उजळेल मरणाच्या वेळीं
रंग रंगांत तोंवरी गर्दसे वाहूं दे
प्राण होऊन पावरी वाजत राहूं दे"
आरतीप्रभूंच्या एका अप्रतिम कवितेच्या ओळी, आपल्या मनाच्या नेहमीच ठाव घेतात आणि आपण एकदम अंतर्मुख होतो. शब्दांचा असा अनिर्वचनीय अनुभव आपल्याला हलवून जातो. सुंदर कवितेंबाबत असा अनुभव येणे ही आनंदपूर्ती असते आणि अशी पूर्तता आपल्याला वारंवार मिळायला हवी, असे वाटायला लागते.
चित्रपट संगीतात किंवा एकूणच संगीतात, रसिकांच्या दृष्टीने या सांगीतिक आविष्कारात सुरांचे महत्व अनन्यसाधारण असते आणि ते साहजिकच आहे. सुरांचा अमूर्त भाव नेहमीच मनावर गाढा परिणाम करीत असतो आणि त्यामानाने शब्द/भाषा माध्यम अपुरेच असते. याचा परिणाम असा झाला, आस्वादाच्या दृष्टीने सुरांचे महत्व अपरिमित वाढले आणि शब्दांना बरेचवेळा दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली, हा अर्थातच चुकीचा पायंडा पडला. जर का गाण्यात शब्द नसतील तर होणारा आविष्कार, धून या सदरेत मोडतो, म्हणजे गाण्यात शब्द तर हवेतच पण त्याचे स्थान तसे खालच्या पायरीवर ठेवायचे, असाच विचार बळावला गेला. त्यातून(च) असे घडले असावे, सुगम संगीतासाठी शब्दकळा "चटपटीत" असणे जरुरीचे आहे, हा विचार पुढे आला आणि जवळपास निकष, या स्वरूपात मान्यता पावला. याचा मुख्य परिणाम असा झाला, सुगम संगीतासाठी शब्दकळा लिहिणारे हे "गीतकार" आणि स्वतंत्र लिहिणारे हे "कवी" असला पंक्तिप्रपंच निर्माण झाला. तसे जरा खोलात जाउन बघितले तर सहज समजून घेता येईल, जे कवी म्हणवतात, त्यांच्या देखील कित्येक रचना केवळ "टुकार" म्हणता येतील अशा आहेत, या वाक्याचा उत्तरार्ध असा मांडता येईल, जी गीतकार म्हणून गणले जातात, त्यांनी देखील काहीवेळा, अत्यंत सकस, अर्थपूर्ण आणि घाटदार रचना लिहिली आहे. मग प्रश्न असा उरतो,असा पंक्तिप्रपंच निर्माण करून नेमके काय साधतो?
या मताला पुष्ठ्यर्थ म्हणून हे गाणे दाखवता येईल. गुलजार हे मुळातले भावगर्भ कविता लिहिणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बहुतेक रचना वाचल्यास,एक बाब लगेच ध्यानात येते. कवितेतील शब्द तसे साधे असतात, प्रतिमा तशा परिचयातील असतात पण त्याची "जोडणी" फार विलक्षण असते आणि साध्य शब्दातून, ते अतिशय तरल,भावपूर्ण आशय आपल्यापुढे सादर करतात, ज्याला आपण सहजपणे "भावकविता" म्हणू शकतो.
आपल्या सर्व प्रेरणा व कृती यांच्यामध्ये एक अविभाज्य नाते असते. विचाराच्या पातळीवर हे नाते स्पष्टपणे कार्यकारणभावाचे असते. परंतु भावना, इच्छा, संवेदना, कल्पना व विचार या सर्वांनी सिद्ध होणाऱ्या प्रेरणाक्षेत्रामुळे घडलेल्या आपल्या सखोल अशा भावानुभवात कार्यकारणभाव स्पष्टपणे दाखवणे अशक्य असते. प्रेरणाक्षेत्राची संमिश्रता, तसेच प्रेरणा व कृती यांच्यासंबंधातील संमिश्रता आणि या सहस्थिती इथे पोहोचू शकत नाही. तर्कात्म सूत्रावर बांधलेली अनुभवाची बंदिश ही नेहमीच निश्चिततेकडे जाते, कार्य आणि कारण यातील संबंध स्पष्ट करीत असते. तो अनुभव अशा विचाराशिवाय वेगळा होतो आणि म्हणून अधिक बुद्धिगम्य होतो. भावकवितेचे अंग काही प्रमाणात स्पष्ट होऊ शकेल. खरतर इथे बौध्दिक प्रवासाची चर्चा येऊ शकते पण हा भाग रसिकतेच्या पलीकडे जाणारा असल्यामुळे, त्याची चर्चा इथे नको. कवितेत ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. मुळात भावकवितेचे कार्य हे भाववृत्तीने भारलेल्या क्षणांचे स्पंदन जाणवून देणे, त्या क्षणांमधील सारे ताण शब्दांकित करणे, हे असते आणि हे सगळे गुलजार यांच्या कवितेत आढळतात.
अशी सक्षम शब्दकळा हाती आल्यावर संगीतकाराला सांगीतिक रचना करायला निश्चित हुरूप येतो. संगीतकार हेमंतकुमार (जरी मूळचे गायक असले तरी !!) यांचा संगीताचा पाया व्यापकप्रमाणावर बंगाली संगीत आणि रवींद्र संगीतावर आधारलेला जरी असला तरी, त्यांची कवितेबद्दलची जाण, त्यांनी आपल्या यापूर्वीच्या गाण्यांतून नेमकेपणे दाखवलेली आहे. पारंपारिक संगीत आणि आधुनिक संगीत याचा मेळ, त्यांच्या रचनेत नेहमी आढळतो. आपल्याला संगीत रचना निर्माण करायची आहे आणि त्यासाठी आपण, हाती असलेल्या शब्दांच्या सहाय्याने बनवायची आहे, याचे नेमके भान त्यांच्या रचनेतून सारखे दृग्गोचर होत असते. शब्दांना सुरांचे आवरण चढवायचे परंतु ते करताना, शब्दात जो "आशय" दडलेला असतो, तिथून आपले लक्ष जरादेखील विचलित नाही!! प्रसंगी सांगीतिक रचनेला थोडी मुरड देखील, त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
या गाण्यात, या विचाराचे तंतोतंत प्रत्यंतर येते. गाण्याचा पहिल्या २ ओळी बघूया.
"हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू, हाथ से छुके इसे रिश्तो का इल्जाम ना दो;
सिर्फ एहसास है ये रुह से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो."
मी वरती म्हटले तसे, दोन्ही ओळीत एकच कल्पना मांडली आहे. शब्द सगळे परिचित आहेत " आंखो की महकती खुशबू" आहे पण त्याला स्पर्शाने डागाळू नये, अशी इच्छा आहे आणि त्याच जोडीला, प्रत्येक संबंधाची इतिश्री नात्यातच हाण्याची अजिबात गरज नसते, असला इशारा देखील आहे आणि हे सगळे फक्त "महसूस करो" याच पातळीवरील भावनेत आहे, इथे "तर्कात्म बंदिश" पूर्ण होते. सांगीतिक दृष्टीने बघायला गेले तर, साधारणपणे,बहुतेक गाण्यात, गाण्याच्या आधी थोडासा वाद्यमेळ असतो, ज्यायोगे चालीचे सूचन होईल पण इथे सुरवातीला काही क्षणांपुरते व्हायोलीनचे सूर वाजतात आणि कानावर लताबाईंचा सूर येतो, अगदी स्पष्ट तरी व्याकूळ करणारा!! पुढील रचना कशी विस्तारित होणार आहे, याची कल्पना देणारा!! लताबाईंच्या गायनाचे हे एक प्रमुख लक्षण म्हणता येईल. ओळीच्या पहिल्या काही शब्दातच त्या, संगीतकाराच्या रचनेची ओळख करून देतात आणि हे फार कठीण आहे.
गाताना, इथे "छुके" या शब्दावर किंचित थरथर आहे पण, हा स्वरिक आविष्कार, पुढील शब्दांतील आशय अधिक खोलवर जाणवून देणारा!! संगीतकार आणि गायक, हे रचनेतील छुपे सौंदर्य अशा प्रकारे आपल्यापुढे सादर करतात पण आपणच बरेचवेळा दुर्लक्ष करतो!! लगेच पुढे येणारा "एहसास" शब्द आवर्जून ऐकावा. भावनेत आर्जव जरूर आहे पण, तरीही भावविवशता नाही आणि हेच या उच्चारातून दाखवून दिले आहे. इथे गाण्याचा विचार करताना, मी प्रामुख्याने "गाणे" हेच ध्यानात घेतले आहे आणि चित्रपट आणि त्यातील प्रसंग बाजूला ठेवले आहेत कारण, तो विचार, संपूर्ण चित्रपटाच्या संदर्भात घेणे, मला योग्य वाटते. या चार ओळी, दोन वेळा गायल्यामुळे, कवितेतील आशय आणि त्याची व्याप्ती, नेमकेपणी आपल्याला जाणवते आणि संगीतकार म्हणून हेमंतकुमार यांचे महत्व अधोरेखित होते.
एकदा की गाण्याचा "मुखडा" झाला की मग पुढील बांधणी तशी तर्कात्म पद्धतीने विस्तारित करता येते अर्थात, काही संगीतकारांचे प्रयोग, पुढील रचनेत देखील दिसून येतात, पण तो भाग वेगळा!! "मुखडा" देखणा झाला म्हणजे गाण्याचा परिणाम साधण्याच्या दृष्टीने, संगीतकाराचे अर्धे अधिक काम पूर्ण होते, हे मात्र मान्यच करावे लागेल.मुखड्याचे स्वरलेखन बघितल्यास, अधिक स्पष्ट यावी.
*हम ने दे खीsहै उन आँखों की म ह क ती खु श बू*
*ग गरे रेसा सा.... सा.... रेसा.... सानि नि नि सासा सारेरे.....*
गाण्याची स्वररचना *पिलू* रागावर आधारित आहे. *रिषभ,धैवत* वर्ज्य असलेला राग(आरोही सप्तकांत) असून रागात दोन्ही *गंधार,धैवत आणि निषाद* स्वर लागतात(अवरोही सप्तकांत). त्यामुळे रागाची ठेवणं "औडव/संपूर्ण* अशा धर्तीची आहे. गाण्यात सर्वत्र दरवळणारा *दादरा* ताल आहे.
पहिला अंतरा येताना, अचानक व्हायोलीनचे स्वर वरच्या सप्तकात जातात आणि तिथेच काही क्षण तरळत राहतात. वास्तविक, गाण्याची सुरवात मंद्र स्वरांत झालेली आहे तरीही अंतरा बांधताना, वाद्यमेळ तीव्र स्वरांत वाजतो वाद्यमेळ म्हणजे इथे प्रामुख्याने व्हायलीन हेच वाद्य आहे पण, जरा बारकाईने ऐकले तर समजेल, इथे अनेक व्हायोलिन्स वेगवेगळ्या स्तरावर वाजत आहेत आणि तरीही अंतरा संपताना, एकाच स्वरावर विलीन होत आहेत.
"प्यार कोई बोल नही प्यार आवाज नही, एक खामोशी है सुनती है कहा करती है;
न ये बुझती है न रुकती है न ठहरी है कहीं. नूर की बुंद है सदियो से बहा करती है.
सिर्फ अहसास है ………"
किती तरल कल्पना आहे आणि ती देखील अत्यंत साध्या शब्दातून व्यक्त झाली आहे. कविता समजून घेण्यासाठी फारसे कष्ट पडत नाहीत पण वाचताना, वाचनानंद म्हणून जो काही असतो,त्याचे पुरते माप आपल्या पदरी पडते!! वास्तविक प्रेमाची भावना आणि अभिव्यक्ती ही मानवाच्या आयुष्यात अनंत काळापासून चालत आलेली आहे आणि यापुढे अशीच चालत राहणार आहे, हेच वैश्विक सत्य, कवीने किती अप्रतिम शब्दात मांडले आहे, "खामोशी". "सदियो" सारख्या प्रतिमा चपखलपणे वापरल्या आहेत. हेमंतकुमार यांनी हा अंतरा संपवताना, पारंपारिक पद्धतीने पहिल्या ओळी न वापरता, तिसरी आणि चौथी, अशा ओळी वापरल्या आहेत आणि यामागचे कारण एकच संभवते - शब्दातील दडलेला आशय अधिक गडद करणे.
किंचित वरचा स्वर लावून, कडव्याला सुरवात होते आणि ती सलगपणे " नूर की बुंद है सदियो से बहा करती है"या शब्दापर्यंत सुरावट चालू आहे. जिथे वाद्यसंगीत संपले तिथला "वरचा" स्वर उचलून, रचना त्याचा स्वरात पुढे सरकते आणि सगळे कडवे काहीशा वरच्या सुरात गायले जाते. पण तीही परत " सिर्फ अहसास है …." इथे येताना स्वर पहिल्या ओळीच्या सुरांशी जवळीक साधतो. हे जे सुरांचे "जोडकाम" आहे, इथे कलाकाराची व्यामिश्रता दिसून येते. हे काम सोपे नाही. काव्याची नेमकी जाण असेल तरच असले जमू शकते.
दुसरा अंतरा देखील पाहिल्याप्रमाणे(च) वरच्या सुरांत सुरु आहे पण, काही क्षणात, वाद्यमेळातील काही व्हायोलिन्स एकदम "खर्जाच्या" सुरांत येतात!! म्हणजे बघा, एका पातळीवर काही व्हायोलिन्स टिपेचा सूर लावतात, तिथे तेच वाद्य त्याचवेळेस, खर्जाचा सूर लावून, शब्दातील भावना अधिक अंतर्मुख करतात!! प्रत्येक वाद्याचा स्वत:चा असा एक गुणधर्म असतो आणि त्यानुरूप त्यावर सूर वाजण्याची क्षमता असते. त्या वाद्याची जातकुळी, क्षमता याचा पुरेपूर उपयोग करवून घेण्यातच संगीतकाराची कुशलता दडलेली असते आणि त्यायोगे गाण्याचे सौंदर्य अधिक खुलवण्याची ताकद अजमावता येते. वाद्यांचा खर्जातील सूर जिथे सुरु होतो, तिथे खरतर गाणे सिद्ध होते, असे मला वाटते. यातही एक गंमत आहे, गाण्यात व्हायोलिन्स भरपूर आहेत पण त्याच सुरांना पियानोचे सूर देखील साथ कशी देतात, हे ऐकण्यासारखे आहे.
"मुस्कुराहट सी खिली रहती है आंखो मे कहीं, और पलको पे उजाले से झुके रहते है;
होंठ कुछ कहते नही कांपते होठो पे मगर, कितने खामोश से अफसाने रुके रहते है.
हमने देखी है ……."
"मुस्कुराहट सी खिली रहती है" हे शब्द ऐकताना जरा विचार केला तर असे दिसेल, गाण्याच्या चालीच्या "मीटर" मध्ये "मुस्कुराहट" हा तसा मोठा शब्द सहज खपून जाण्यातला नाही पण, संगीतकाराने, चालीत बसवताना, हा शब्द कसा घेतला आहे, हे आवर्जून ऐकण्यासारखे आहे. मघाशी मी जे म्हटले होते, प्रसंगी हा संगीतकार, शब्दांसाठी चालीला किंचित "वळण" किंवा "मुरड" घालतो, ते इथे दिसून येते. अर्थात, इथे एकाच लेखात या गाण्याचे सगळे सौंदर्य विशद करणे, तसे फार अवघड आहे. वास्तविक गाण्यात एकच भावना मांडलेली आहे परंतु ती भावना, ज्या वेगवेगळ्या प्रतिमांच्या सहाय्याने मांडली आहे आणि त्या भावनेचे स्फटीकीकरण सुरांच्या सहाय्याने कशी अधोरेखित केली आहे, हेच लिहिण्याचा हा सगळा प्रपंच!!
@अनिल गोविलकर
Wednesday, 8 March 2023
निळ्या अभाळी कातरवेळी
आपल्या इथे ललित संगीतात असा एक अपसमज पसरलेला आहे. सातत्य राखले की दर्जा खालावतो किंवा त्यात एकसुरीपणा येतो. एक नक्की, सातत्य राखण्याच्या प्रयत्नात, संगीतकाराची शैली लोकमान्य होते आणि त्या शैलीतच बरेचसे संगीतकार गुंतून पडतात. शैली तयार होणे, कुणीच टाळू शकत नाही कारण वैविध्य तरी किती आणणार? त्यातून चित्रपट सृष्टीत एकासाचीपण कायम भोगावा लागतो. विषयांचे एकसुरीपणा असल्याने, विषयांत तोचतोचपणा येतो. परिणामी केवळ संगीतच नव्हे तर चित्रपटाची हाताळणी. अभिनय इत्यादी घटकांत सातत्य हरपले जाते. मग संगीत कसे अपवाद होईल? प्रसंग तर नको तितके एकसुरी असतात. विषयात वैविध्य असले म्हणजे संगीतकाराला देखील नवीन काही स्फुरू शकते आणि आपल्या निर्मितीत "ताजगी" आणता येते. भारतीय चित्रपट, काही अपवाद वगळता, अजूनही प्रेम हाच विषय मध्यवर्ती ठेऊन,निर्माण केले जातात. अर्थात प्रणयाच्या निरनिराळ्या छटा असतात पण आपल्याकडे बहुतांशी फॅक्टरी मधून प्रॉडक्शन काढावे, तसे चित्रपट बनवले जातात. त्यामुळे संगीतकाराची उर्मी मारली जाते. हिंदी चित्रपट घ्या किंवा मराठी चित्रपट घ्या, काही अपवाद वगळता, त्याच विषयांत दळण दळले जाते!! मुळात मराठी चित्रपटांचा परीघ विस्तीर्ण असा कधीच नव्हता. त्यामुळे चित्रपटाच्या कथांत फारसे वेगळेपण, फारसे बघायला मिळाले नाही. अर्थात याचा परिणाम सातत्यावर घडून येणे क्रमप्राप्त ठरते.
अर्थात काही संगीतकारांनी आपली निर्मिती मर्यादित स्तरावर ठेवली आणि आपली ओळख कायम ठेवली. यामध्ये संगीतकार आनंदघन यांचे नाव घेता येते. आनंदघन हे टोपणनाव असले तरी आता आनंदघन म्हणजे लाटा मंगेशकर, हे गुपित सर्वश्रुत आहे. लताबाईंनी भालजी पेंढारकरांच्या काही चित्रपटांना संगीत दिले आणि आपण, मनात आणले तर अप्रतिम स्वररचना करू शकतो, हे दाखवून दिले. आजचे गाणे हे म्हटले तर लोकप्रिय आहे पण तरीही मानदंड ठरावा, इतके नक्कीच लोकप्रिय नाही. काही वेचक रसिकांच्या मनात घर करून आहे.
शांता शेळक्यांच्या कविता या परिचित रुणझुणत्या पैंजणाच्या आवाजाप्रमाणे किणकिणत असतात. त्यात वेदना पिळवटून टाकणारे दु:ख नसते तर वेदनेची जात ही बव्हंशी संयत असते. तसेच प्रणयाची जात बरीचशी मुग्धतेकडे वळणारी असते. "मी हुरहुरते, मनात झुरते, दूर गेले पती" ही ओळ प्रातिनिधिक म्हणता येईल. प्रतिमा जरी ठोस नसल्या तरी खूप आशय दर्शवत, अशा देखील नाहीत. "नदी समिंदर नकळत मिसळुनी एकरूप होती" ही ओळ उदाहरण म्हणून चपखलपणे सांगता येते. आता या कवितेत कुठलाच शब्द गूढ, दुर्बोध नाही, सगळे शब्द आपल्या परिचयाचे आहेत पण तरीही वाचताना, आपण अंतर्मुख होतो आणि कवित्वाशी तादात्म्य पावतो. हे जे तादात्म्य पावणे आहे, इथेच खरी कविता जन्माला येते. अर्थात कवितेत एक शब्द खटकतो - निळ्या आभाळी हे अधिक योग्य असताना निळ्या अभाळी लिहिले आहे आणि हे केवळ चालीच्या मीटरमध्ये बसवण्यासाठी केलेली तडजोड आहे.
संगीतकार म्हणून लताबाईंचा उल्लेख वर केलाच आहे. एकूणच त्यांच्या स्वररचनांचा विचार केला तर, चाली सहज गुणगुणता येतील अशाच आहेत. काही गाणी शास्त्रोक्त चीजेवर आधारित आहेत. ही चाल यमन रागाशी नाते सांगते. गाण्याच्या सुरवातीचा वाद्यमेळ अगदी मोजका आहे. एकूणच मराठी संगीतात (आता परिस्थिती बरीच बदललेली आहे) पूर्वी वाद्यमेळ ही संकल्पना फारशी रुजली नाही. बहुदा आर्थिक कारण असावे. स्वररचनेचा सगळा भार हा गाण्याच्या चालीवर असायचा. वाद्यमेळ बव्हंशी बासरीवर तोललेला आहे. रचनेत फारशा हरकती किंवा ताना नाहीत. मुळात यमन रागात एक प्रकारचा लोभस असा गोडवा आहे त्यामुळेच बहुदा आत्तापर्यंत असंख्य गाणी या रागावर आधारलेली आहेत आणि बहुदा यापुढे निर्माण होतील. हेच वैशिष्ट्य या गाण्यात प्रकर्षाने दिसून येते. एक प्रश्न इथे मांडता येईल. लताबाई संगीतकार की गायिका? गायिका म्हणून त्यांचे स्थान अनन्यसाधारण निश्चितच आहे पण संगीतकार म्हणून त्यांनी हे क्षेत्र का निवडले नाही? गायिका म्हणून प्रचंड मागणी आणि काम हाताशी असल्याने, संगीतकार म्हणून आपण तितका वेळ देणे अशक्य, असे काही वाटले असावे का? केवळ हेच गाणे नव्हे तर इतर काही चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे आणि केवळ गुणवत्तेच्या नजरेतून बघता, त्यांनी आपले स्वत्व सिद्ध करून दाखवले होते. अर्थात त्यांनी काम करायचे थांबवले, हा रसिकांचा तोटा आला.
गायिका म्हणून इथे लताबाईंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. अर्थात ही द्विरुक्ती झाली म्हणा!! परंतु थोडा तुलनात्मक विचार करायचा झाल्यास, संगीतकारापेक्षा इथे गायिका म्हणून कामगिरी अधिक उजवी वाटते. अर्थात इथे मतभेद होऊ शकतात. "निळ्या अभाळी कातरवेळी,चांदचांदणे हसती" या मुखड्याच्या ओळीपासून त्यांच्या आवाजाचे गारुड, मनावर पसरते, ते पूर्ण गाणे संपेपर्यंत. हा देखील अनुभव अर्थात काही नवीन नाही म्हणा. "मी हुरहुरते, मनात झुरते, दूर गेले पती" याला ओळीतील "हुरहुरते" किंवा "झुरते" यांचे स्वरिक उच्चार मुद्दामून ऐकावेत असेच आहेत. त्या शब्दामागील व्याकुळ भावना, यापेक्षा अधिक अर्थपूर्ण करणे अशक्य वाटावे, इतके पूर्णत्व, त्या गायकीतून ऐकायला मिळते. अशीच गायकी शेवटच्या अंतऱ्यातील "मनमंदिरी मी पूजीन त्यांना, वाहीन पायी प्रीतफुलांना" या ओळीतील समर्पण भाव तितकाच विलोभनीय आणि तत्कालीन संस्कृतीला धरून आहे.
निळ्या अभाळी कातरवेळी,चांदचांदणे हसती
मी हुरहुरते, मनात झुरते, दूर गेले पती
टिपूर चांदणे धरती हसते
पती पाहता मी भान विसरते
नदी समिंदर नकळत मिसळुनी एकरूप होती
मनमंदिरी मी पूजीन त्यांना
वाहीन पायी प्रीतफुलांना
पाच जीवांच्या उजळून ज्योती ओवाळीन आरती
(2) Nilya Aabhaali, Katarveli Mohityanchi Manjula 60 Shanta Shelke Anandghan Lata - YouTube
Tuesday, 7 March 2023
मैं पागल मेरा मनवा पागल
आपल्याकडे काय किंवा एकूणच जगात, लोकांची आवड, हा विषय अती दुर्घट मानला जातो. त्याला महत्त्वाचे कारण, व्यक्ती तितक्या प्रकृती, हेच लागू होते. एकाची आवड दुसऱ्याशी जुळणे अवघड असते. अर्थात याचा दुसरा परिणाम असा दिसतो, त्यामुळे आवडीची वैविध्ये बघायला मिळतात. संस्कृती संपन्न होते. हाच प्रकार ललित संगीतात वारंवार अनुभवायला मिळतो. अगदी हमरीतुमरीवर वाद झडतात. खरंतर ३ मिनीटांच्या गाणे पण तरीही त्यात प्रचंड वैविध्य आढळते आणि रसिकांत मतभैदांना वाव मिळतो.
एक मुद्दा तर विशेष करून ध्यानात घ्यावा लागेल. एखादे गाणे केवळ प्रचंड जाहिरात करून, लोकांच्या मनावर बिंबवणे! पूर्वी रेडिओ होता, आता इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी उपलब्ध आहेत, जेणेकरून गाणे लोकांना सतत ऐकायला मिळावे आणि त्यातून गाण्याची लोकप्रियता वाढत जावी. त्यामुळे, मुळात गाणे किती कसदार आहे? हा प्रश्नच उद्भवत नाही. निर्मात्याचा बक्कळ फायदा होतो. बरेचवेळा अशा प्रकारे उबवलेली गाणी अल्पजीवी ठरतात. गाण्यात, प्रत्येक घटकाचा कस लागलेला असावा म्हणजे दर्जा आपसुकच वाढतो. अर्थात रसिकाश्रय, हा मुद्दा विवादास्पद राहतो.
आजचे आपले गाणे - "मैं पागल, मेरा मनवा पागल", हे गाणे, गाणे म्हणून सर्वार्थाने अप्रतिम असून, दुर्दैवाने विस्मरणात गेले. का गेले? या प्रश्नाचा कारणमिमांसा करता येत नाही.
गाण्याची शब्दरचना प्रसिद्ध कवी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिली आहे.राजेंद्र कृष्ण, अगदी चित्रपटसृष्टीत नावाजलेले कवी आहेत. विशेषतः त्यांच्या शब्दरचना गीताला अनुकूल अशाच असतात. गीतासाठी शब्दरचना फारशी क्लिष्ट असू नये तसेच गेयताप्रधान असावी, अशी काही ठळक वैशिष्ट्ये वाचताना जाणवतात. प्रसंगी उर्दू शब्दांचा सढळ हाताने उपयोग केलेला आढळतो. या त्यांच्या शैलीमुळे, त्यांचे अनेक प्रतिभावान संगीतकारांशी जमले आणि हिंदी चित्रपटसंगीतात फार मोलाची भर पडली. कविता वाचताना,काही प्रतिमा असंख्य वेळा त्यांनीच कुठेना कुठेतरी वापरल्याचे समजून घेता येते. अर्थात सातत्याने शब्दरचना करायचे म्हटल्यावर अटळपणे तोचतोचपणा कवितेत येणे क्रमप्राप्त ठरते. शब्दरचना वाचताना, आपल्याला देखील त्यातील शाब्दिक लय सापडते आणि पुढे गीताची चाल ऐकताना, गाण्यातील खटके अचूकपणे शब्दांमधून मांडल्याचे दिसून येते. ही या कवीची खास हातोटी होती, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. मर्यादित प्रतिभा पण एकूणच चित्रपट गीताचे नेमके तंत्र जाणून घेऊन, गीते लिहिणारा कवी, असे सार्थ वर्णन करता येईल.
संगीतकार मदन मोहन यांची स्वररचना आहे. मदन मोहन यांची स्वररचना म्हटल्यावर, त्यांची विशिष्ट शैली उभी राहते. वाद्यमेळाची खास रचना ब-याच गाण्यांमधून बघायला मिळते. अर्थात, थोडा विचार केल्यास प्रत्येक संगीतकाराची ठराविक शैली असते आणि ती, त्यांच्या रचनांमधून ऐकायला मिळते, मग गाण्याच्या चालीत कितीही वैविध्य असू दे. आजचे गाणे जरी संगीतकाराची शैली दाखवत असले तरी थोडेफार फारकत घेणारे आहे. अगदी सुरवातीचा वाद्यमेळ ऐकायला घेतल्यावर या विधानाची चुणूक मिळते. स्वरमंडळाच्या सुरात व्हायोलिनचे सूर मिसळतात आणि गाण्याचा गाढा परिणाम मनावर व्हायला लागतो. अर्थात जिथे व्हायोलिन संपते, तिथे सतार झमझमायला लागते आणि सतारीचे सूर या संगीतकाराची शैली स्पष्ट करतात. सतार वाद्य, संगीतकार मदन मोहन यांच्या स्वररचनेत नेहमीच प्राधान्यपुर्वक आपले अस्तित्व दर्शवत असते. या वाड्याचा "टणत्कार" कानाला सुखवून जातो.
केदार रागावर आधारित स्वररचना आहे पण रागाची प्रकृती बघता, रागातील एखादी फ्रेज ऐकून गाण्याची तर्ज बनवली आहे, असे समजून घेता येते आणि हे या संगीतकाराचे वैशिष्ट्य. गाण्यातील ताल - केरवा असून त्याचे प्रचलित स्वरूप ऐकायला मिळत नसून, "मटका" धर्तीवर तालाच्या मात्रा घेतल्या आहेत. असे करताना, गाण्याचा भावार्थ मात्र गहिरा ठेवण्यात यश मिळवले आहे. करुण भावना आहे त्यामुळे गाण्याची लय अतिशय संथ आहे. रागाशी संबंध ठेवायचा परंतु त्यातील आवाहक सुरावटींकडे लक्ष देऊन, गाण्याची उभारणी करायची. असे संगीतकार नेहमीच गाण्यातील काव्याला नेहमीच प्राधान्य देतात. आणखी वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, गाण्यातील लय तर सांभाळतात परंतु त्यापेक्षा सुरावट आणि त्याचे चलन, या घटकांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याचे आढळते. याचाच परिणाम, गझल वृत्ताकडे या संगीतकाराची आवड का झुकली? या प्रश्नाचे उत्तर सापडते. त्यातून या संगीतकाराला एकूणच "वेदना" या भावनेचे पराकोटीचे आकर्षण असल्याचे, समजून घेता येते. आजचे गाणे, या भावनेचा "अर्क" आहे, असे मानता येईल. आपल्या स्वररचनेने रसिकांना दिपवून टाकावे, मग त्यात अवघड हरकती किंवा दीर्घ ताना, इत्यादी सांगीतिक अलंकारांचा उपयोग करावा, असे फारसे ऐकायला मिळत नाही. एखादी जखम हळूहळू चिघळत जावी आणि त्या वेदना सहन करणे, इतकेच प्राक्तन असावे, असा भाव गाण्यात दिसतो.
गायक तलत मेहमूद, यांच्या गायकीला सुयोग्य अशीच स्वररचना आहे. मुळात संगीतकार मदन मोहन आणि गायक तलत मेहमूद, हे दोघेही लखनौ संगीत वारशाचे प्रतिनिधी म्हणावेत, इतका जवळचा संबंध राखून आहेत. गाण्याच्या मुखड्यापासून जी सुरवात होते, तिथून "हताशता" किंवा "विखार" अशा भावना ऐकायला मिळतात आणि गायनावर काळी छाया पडलेली आहे. "कहे ये दुनिया मैं दीवाना, दिन में देखूं सपने" या ओळी माझ्यावरील विधानाला पूरक म्हणून सांगता येतील. तसेच शेवटचा अंतरा ऐकायला घेतल्यास, "छुपी हुई मेरी काया में,राख किसी परवाने की" हीच भावना प्रकर्षाने ऐकायला मिळते. याची दुसरी बाजू अशी, आपली गायनाची शैली ओळखूं, त्यावरच ठाम राहिल्याने, या गायकाला वारंवार संधी मिळणे अशक्य होते. विशेषतः १९६० नंतर हिंदी चित्रपट संगीताचा ढाचा बदलला आणि त्या बदललेल्या संगीताला प्रतिसाद देणे, या गायकाच्या कुवतीबाहेर होते. अर्थात ही या गायकाची मर्यादा होती. असे असून देखील त्यांच्या गायकीचा प्रभाव पुढे मराठीतील अरुण दाते तसेच सुरवातीच्या काळातील जगजीत सिंग, यांच्यावर पडलेला होता,असे त्यांच्या काही रचना ऐकताना, समजून घेता येते. अर्थात पुढे या दोघांनी आपली शैली बदलली. एकूणच गायन हे कोमलमधुर, अंत:स्पर्शी, अंतर्मुख, काहीसे उदास आणि अनाक्रमक गायन हीच एक मान्यवर शैली ठरली.
वास्तविक उदास, दु'खी प्रकृतीच्या गाण्यांना रसिकांचा प्रतिसाद नेहमीच मिळत आलेला आहे परंतु या आणि अशा काही गाण्यांचा अपवाद म्हणायला लागले. अन्यथा इतके नितांत रमणीय गाणे विस्मृतीत जाण्याचे काही कारण संभवत नाही.
मैं पागल मेरा मनवा पागल
पागल मेरी प्रीत रे
पगले - पन की पीड़ वो जाने
बिछड़े जिसका मीत रे
कहे ये दुनिया मैं दीवाना
दिन में देखूं सपने
दीवानी दुनिया क्या जाने
ये सपने हैं अपने
घायल मन की हंसी उड़ाये
छुपी हुई मेरी काया में
राख किसी परवाने की
ये मेरा दुखिया जीवन है
रूह किसी दीवाने की
मन के टुटे तार बजाकर
गाऊं अपने गीत रे
(2) Main Pagal Mera Manva Pagal | Shaam-E-Ghazal | Ashiana | Talat Mahmood - YouTube
Wednesday, 1 March 2023
लताबाई - अविरत शोध
खरतर आत्तापर्यंत लताबाईंवर असंख्य लेख लिहून झालेत, पुस्तके आली आहेत. तेंव्हा नवीन काय लिहायचे? हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. मला देखील पडला परंतु त्यांची गाणी ऐकताना, सतत काहींना काहीतरी नवीन ऐकायला मिळाले. वास्तविक रेकॉर्डवरील गाणे हे कधीही बदलत नसते!! ओरॅशन इतकाच असतो, आपल्या वकूब किती आहे? ऐकताना, आपली एकतानता किती आहे? या प्रश्नांचा विचार केला तेंव्हा माझे मलाच अपुरेपण जाणवले. आपण किती उथळपणे गाणे ऐकतो, असेच वाटले. गाणे ऐकताना, मन एकाग्र करतो परंतु मध्येच कुठेतरी ती एकाग्रता भंग पावते आणि तिथेच गाण्याचा संपूर्ण आवाका,माझ्या परिप्रेक्षाच्या पलीकडे जातो! बरेचवेळा असे होते, गाण्याच्या सुरवातीलाच एखादी जागा अशी ऐकायला मिळेते की तिथेच मन गुंतून जाते आणि गाणे पुढे निघून जाते. हे माझ्या रसिकतेची तोकडेपण नक्कीच आहे पण लताबाईंच्या गायकीचा समग्र आढावा घ्यायला मी किती अपूर्ण आहे, याची जळजळीत जाणीव पोखरून टाकणारा आहे.
या बाईंच्या आवाजात असे काय आहे जे इतरांच्या गळ्यात नाही? काहीतरी नक्कीच आहे त्याशिवाय सलग इतकी वर्षे पंडितांपासून सामान्यांपर्यंत या आवाजाची भुरळ पडणे अशक्य. आवाज गोड आहे, नितळ आहे, तिन्ही सप्तकात सहज फिरणारा आहे, भाषेनुरूप शब्दोच्चार करण्याइतका व्यासंग आहे, प्रासादिक आहे, लालित्यपूर्ण आहे, इत्यादी अनेक विशेषणे आत्तापर्यंत लावून झाली आहेत तरीही त्यांच्या आवाक्यात या आवाजाचे समग्र वर्णन आले आहे का? संगीतबाह्य विशेषणे तर अगणित लावली गेली आहेत आणि मी तरी याचा इथे अजिबात विचार करणार नाही. इथे फक्त लताबाईंच्या आवाजाने जे अलौकिक गारुड टाकले आहे, त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
वास्तविक काही वर्षांपूर्वी मी लताबाईंच्या आवाजावर ३ सलग लेख लिहिले होते आणि तेंव्हा असे वाटले की मी पुरेसा वेध घेतला आहे पण माझी समजूत याच आवाजाने खोटी पाडली. लताबाईंनी सगळ्या देशाला आपल्या आवाजाने भुरळ टाकली, हे तर मान्यच करायला लागेल आणि यात त्यांना मिळालेल्या नैसर्गिक देणगीचा भाग देखील अंतर्भूत आहे कारण सर्वसामान्य माणूस आवाजाच्या विश्लेषण करायला धजत नाही किंवा तो विचार त्यांच्या मनात देखील येत नाही. याच कारणास्तव लताबाई दंतकथा झाल्या. अर्थात दंतकथा झाल्या म्हणजे पूर्णत्व मिळाले का? दंतकथांना वास्तवाचा आधार कधीच नसतो. कुठलाही आवाज वास्तवावर तपासून घेणे, हे आवश्यक असते. मग त्यासाठी शास्त्राचा आधार घ्यावा लागला तरी काय हरकत आहे. अगदी लताबाई झाल्या तरी संगीतशास्त्र आणि संगीतकला आहे, म्हणून लताबाई आहेत. कला आधी मग कलाकार येतो. आपल्याकडे बरेचवेळा हीच जाणीव ठेवली जात नाही.
असो, लताबाईंच्या आवाजाचा वेध घेताना काही गाणी उदाहरणादाखल घ्यावीच लागतील जेणेकरून मुद्दा स्पष्ट होईल. एक बाब महत्वाची, लताबाईंनी आवश्यक तितकी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि त्या ललित संगीताच्या क्षेत्रात आल्या. परिणामी सूर पक्का झालेला होता, तालाची नेमकी समज ग्रहण करून झाली होती. लताबाई ललित संगीतातात आल्या तेंव्हा काय परिस्थिती होती? अनेक संगीतकारांनी याबाबत भरपूर लिहून ठेवले असल्याने, त्याची पुनरावृत्ती इथे नको. एक प्रसिद्ध गाण्याचे उदाहरण बघूया.
"ये जिंदगी उसी की है" हे गाणे आजही अतोनात लोकप्रिय आहे आणि रसिकांच्या मनात ठाण मांडून बसले आहे. या गाण्याची स्वररचना भीमपलास रागावर आधारित आहे.आणखी खोलात विचार केला तर गाण्यात काफी आणि किरवाणी रागाचे सूर देखील ऐकायला मिळतात. या गाण्याच्या संदर्भात बघताना, मुखड्याची ओळ - ये जिंदगी उसी की है, या ओळीचे स्वर ताडून बघताना - *सा प प म ध/प म ग म ग म प * हे स्वर ऐकायला मिळतात. हा झाला तांत्रिक भाग आणि हा देखील जरा बाजूला सारू. इथे लताबाई "जिं" या अक्षरावर "पंचम" स्वर घेतात पण तो आंदोलित स्वर घेऊन त्याचा स्वरात पुढील अक्षर "द" देखील तांत्रिक दृष्ट्या "पंचम" स्वरात घेतात. इथेच गंमत आहे. तंत्रानुसार दोन्ही अक्षरे एकाच सुरांत आहेत पण ऐकायला वेगळे वाटत कारण इथेच पहिल्या पंचम स्वरानंतर त्यांनी ज्या श्रुती वापरल्या आहेत किंवा असे म्हणून गळ्यातून निघाल्या आहेत, तिथेच वेगळेपण सिद्ध होते. सूर तोच आहे पण त्याला नवीन झळाळी दिली आहे. ही जी शब्दांना झळाळी, लताबाई देतात, तेच स्वर इतरांना प्रदान करणे जमत नाही.
याच गाण्यातील दुसरे वैशिठ्य बघायचे झाल्यास, "धडक रहा है दिल तो क्या, दिल की धडकने लेकिन" ही ओळ बघूया. "धडक रहा है" इथे "प नि म प म ग म" तर पुढील "दिल की धडकने ना गिन" ही ओळ "प सां सां सां नि नि सां रें मं गं" या सुरांनी सजवली आहे. आता इथे लताबाई कुठे श्रेष्ठ ठरतात? "धडक" शब्द नीट ऐकावा. हृदयाची धडधड त्या सुरांतून उमटते. प्रेयसी आहे आणि प्रियकराला भेटली आहे तेंव्हाची आतुरता, सलज्जपणा सगळे त्या "धडक" शब्दाच्या उच्चारातून समोर येते. तिथे लागलेला "पंचम" स्वर आणि पुढे "धडकने" हा शब्द गाताना घेतलेला "वरचा सा", हा विचारपूर्वक घेतलेला आहे. एका शब्दात केवळ एका "ने" अक्षराने वेगळी भावना समोर येते आणि टी भावना दाखवायला स्वरांची वापराने देखील तितकेच सक्षम होते. ही किमया लताबाईंच्या आवाजाची, त्यांनी केलेल्या विचाराची आहे. आपल्याला आवाजाची देणगी नक्कीच मिळाली आहे परंतु त्या देणगीवर अवलंबून न राहता टी देणगी, सादरीकारांतून सादर करताना, अधिक परिष्कृत कशी करायची, जेणेकरून संगीतकाराच्या आराखड्यात "विशेष" भर टाकता येते. हा जो भरणा आहे, तिथे लताबाईंच्या आवाजाची कमाल ऐकायला मिळते आणि इथे निव्वळ दैवी प्रसाद नव्हे तर व्यासंगी कुशाग्रता महत्वाची ठरते.
आपण आणखी उदाहरण बघूया. "हाये रे वो दिन क्यूँ ना आये". लयीला अतिशय अवघड गाणे आहे आणि म्हणूनच मी निवडले आहे. हे गाणे "जनसंमोहिनी" सारख्या अनवट रागावर आधारित आहे. आपण तंत्राचा अति आहारी न जाता, सुरांवर लताबाई अवघड लय कशी तोलून घेतात, हे बघण्यासारखे आहे. वर निर्देशित केलेली ओळ स्वरांकित करायची झाल्यास, "ग प ध नि ध नि ध प/प प ग प/रे ग सा रे/नि सा" अशा पद्धतीने मांडता येते. आता इथे "रे" या अक्षरावरून "धैवत" स्वरावरून "वो" अक्षर घेताना "पंचम" स्वरपर्यंत "मींड" कशी घेतली आहे, हा निव्वळ बुद्धीवादी भाग नसून श्रवणेंद्रिय तृप्त करणारा भाग आहे. गाण्यात "रूपक" ताल आहे. इतर गाण्यात हाच ताल अगदी उडत्या स्वरूपात ऐकायला मिळतो पण इथे त्याच तालाचे धीरगंभीर स्वरूप ऐकायला मिळते. "तिन तिन ना/ धिं ना/धिं ना" असा ७ मात्रांचा आराखडा आहे. अर्थात यात पुढे असंख्य permutation/combination येत राहतात. जसे आपण वरच्या गाण्यात श्रुतींचे अस्तित्व बघितले जे मूळ स्वरांना असंख्य परिमाणे देत असतात. भारतीय संगीताचे हे अलौकिक वैशिष्ट्य म्हणायला हवे. आता या केवळ ७ मात्रांचे "वजन" लक्षात घेऊन, या गाण्यातील लयींशी लताबाई कशा खेळतात, हेच अतिशय महत्वाचे आहे. मात्रांची लय सुरांच्या अवगाहनाशी जोडलेली असताना, प्रत्येक अक्षर आणि त्याचे लयींशी असलेला अन्योन्य संबंध, निव्वळ अवर्णनीय आहे. तालाच्या मात्रांचे वजन तर ध्यानात ठेवायलाच हवे पण गाण्यातील सौंदर्यतत्त्व अचूकपणे सांभाळायला हवे. हा लयीचा बोजा अति बिकट आहे. "हाये" शब्दांचा उच्चार तर वर्णनाच्या पलीकडे आहे. सगळी वेदना, त्या उच्चारात वाचता येते. भावभावनांचे परिष्करण तर लताबाईंच्या तिलोमोलाचे आजमितीस कुणीही अचूकपणे करू शकलेले नाही.
इतके लिहून देखील मनात हेच येत आहे, लताबाईंची गाणे दशांगुळे वर उरले आहे. माझी रसिकताच तोकडी पडली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)