Saturday, 22 October 2022
आधुनिकता की परंपरा - एक जोखड!!
आता दिवाळी सुरु झाली आहे आणि अर्थात बऱ्याच ठिकाणी *दिवाळी पहाट* या नावाखाली संगीताचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत बहुदा अशा प्रकारचे कार्यक्रम होत असावेत. अर्थात असे कार्यक्रम व्हायला विरोध असायचे काहीही कारण नाही कारण या निमित्ताने संगीताची आवड समाजात दृढ होते. पूर्वी रेडियोवर दिवाळीनिमित्ताने *संगीत नाटके* सादर होत असत. आता कालानुरूप संगीताचे कार्यक्रम होत आहेत.
आता गंमत अशी आहे, जरा बारकाईने बघितल्यास, जिथे *भावसंगीताचे* कार्यक्रम होत आहेत तिथे आजही *प्रभातकालीन* गाण्यांनी उजागर केला जात आहे!! आजही *लखलख चंदेरी* या आणि अशाच काळातील गाण्यांनी सुरवात होते. हा देखील एक स्तुत्य उपक्रम म्हणायला हवा कारण त्यानिमित्ताने, आपल्या संस्कृतीची आठवण नव्या पिढीला दिली जाते. थोडा विचार केल्यास, आज ही गाणी जवळपास, ५० वर्षे पूर्वीची गाणी आहेत. अर्थात एक सांस्कृतिक ठेवा म्हणून या गाण्यांकडे बघितले जाण्यात, कसलाही प्रत्यवाय असू नये.
पण गंमत अशी आहे, आपले जे *मराठी मन* आहे, ते आजही *पारंपरिक* संस्कृतीशी जखडलेले आहे. ही आणि अशा काळातील गाणी सुरु झाली की अनाहूतपणे, आपण *गहिवरले* जातो!! आपसूकच मनात तुलना सुरु होते आणि *रम्य त्या आठवणी* मध्ये गुंगून जातो. आता प्रश्न असा आहे, ५० वर्षानंतर काहीच घडले नाही का? आजही *शुक्रतारा* गायले गेल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही. इतके आपण परंपरेला बांधून घेतले आहे.
एकूणच आपले मराठी मन नको तितके *भावुक* असते. अर्थात यात कलाकार देखील तितकेच कारणीभूत आहेत. आपले तथाकथित कलाकार, *जुन्या गाण्यांत* इतकी भावुकता दाखवतात की ऐकणारे गहिवरले पाहिजेत!! अधिक आपले *श्रद्धाळू* मन, अधिक श्रद्धावान होते आणि कलाकार एकूणच, प्रेक्षकांकडून *टाळी* वसूल करून घेतात. एका बाजूने आपण *तथाकथित परंपरा* जतन करण्याचा *आविर्भाव* निर्माण करत असतो आणि दुसऱ्या बाजूने, *जुन्या* गाण्यांची *अक्षम्य* अशी मोडतोड करून, *भयाण* आधुनिकता निर्माण करीत असतो. आपण काय केले पाहिजे, याची मनाशी काहीही वैचारिक मांडणी न करता, *also run* मध्ये कलाकार हात धुऊन घेतात आणि आपली पोळी भाजून घेतात.
खर म्हणजे, एकूणच मराठी मन हे कात्रीत सापडलेले आहे, म्हणजे एका बाजूने परंपरेबद्दल आकर्षण ठेवायचे परंतु दुसरीकडे आधुनिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा (आधुनिकता म्हणजे काय? याची ठळक कल्पना मनाशी बांधली जात नाही). मराठी मन जात्याच इतिहाबद्दल अत्यंत तकलादू कल्पना आणि भोळसट वृत्ती बाळगून असते. यात ना धड इतिहासाबद्दलची *वाजवी* जाणीव असते आणि त्या इतिहासाची *नाळ* तोडायचा प्रयत्न करताना, नक्की काय करायचे? याबाबत कायम संभ्रम निर्माण करीत वाटचाल करायची.
नवीन काहीतरी निर्माण करायचे, असे ठरवले जाते पण परंपरेचे नक्की भान नसल्याने, मनाची कुतरओढ करून, मग *धेडगुजरी* करीत बसायचे आणि प्रेक्षकांसमोर निव्वळ *भास* निर्माण करून, टाळ्या मिळवायच्या!! यात मध्ये, आपण फक्त *चिंध्या बांधून ठिगळ लावलेली गोधडी* तयार करतो. यात ना नवनिर्मिती असते ना परंपरेचे भान असते. आपण कलाकार आहोत, याचे वृथा भान मात्र दिसून येत असते आणि इकडे रसिक म्हणून आपले संपूर्ण दुर्लक्ष होत असते. आपल्या समोर काय सादर होत आहे, याकडे *सम्यक* दृष्टीने बघितलेच जात नाही कारण आपण रसिकांच्या मनात, फक्त *स्मृती* तरळत असतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment