Saturday, 22 October 2022
आधुनिकता की परंपरा - एक जोखड!!
आता दिवाळी सुरु झाली आहे आणि अर्थात बऱ्याच ठिकाणी *दिवाळी पहाट* या नावाखाली संगीताचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत बहुदा अशा प्रकारचे कार्यक्रम होत असावेत. अर्थात असे कार्यक्रम व्हायला विरोध असायचे काहीही कारण नाही कारण या निमित्ताने संगीताची आवड समाजात दृढ होते. पूर्वी रेडियोवर दिवाळीनिमित्ताने *संगीत नाटके* सादर होत असत. आता कालानुरूप संगीताचे कार्यक्रम होत आहेत.
आता गंमत अशी आहे, जरा बारकाईने बघितल्यास, जिथे *भावसंगीताचे* कार्यक्रम होत आहेत तिथे आजही *प्रभातकालीन* गाण्यांनी उजागर केला जात आहे!! आजही *लखलख चंदेरी* या आणि अशाच काळातील गाण्यांनी सुरवात होते. हा देखील एक स्तुत्य उपक्रम म्हणायला हवा कारण त्यानिमित्ताने, आपल्या संस्कृतीची आठवण नव्या पिढीला दिली जाते. थोडा विचार केल्यास, आज ही गाणी जवळपास, ५० वर्षे पूर्वीची गाणी आहेत. अर्थात एक सांस्कृतिक ठेवा म्हणून या गाण्यांकडे बघितले जाण्यात, कसलाही प्रत्यवाय असू नये.
पण गंमत अशी आहे, आपले जे *मराठी मन* आहे, ते आजही *पारंपरिक* संस्कृतीशी जखडलेले आहे. ही आणि अशा काळातील गाणी सुरु झाली की अनाहूतपणे, आपण *गहिवरले* जातो!! आपसूकच मनात तुलना सुरु होते आणि *रम्य त्या आठवणी* मध्ये गुंगून जातो. आता प्रश्न असा आहे, ५० वर्षानंतर काहीच घडले नाही का? आजही *शुक्रतारा* गायले गेल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही. इतके आपण परंपरेला बांधून घेतले आहे.
एकूणच आपले मराठी मन नको तितके *भावुक* असते. अर्थात यात कलाकार देखील तितकेच कारणीभूत आहेत. आपले तथाकथित कलाकार, *जुन्या गाण्यांत* इतकी भावुकता दाखवतात की ऐकणारे गहिवरले पाहिजेत!! अधिक आपले *श्रद्धाळू* मन, अधिक श्रद्धावान होते आणि कलाकार एकूणच, प्रेक्षकांकडून *टाळी* वसूल करून घेतात. एका बाजूने आपण *तथाकथित परंपरा* जतन करण्याचा *आविर्भाव* निर्माण करत असतो आणि दुसऱ्या बाजूने, *जुन्या* गाण्यांची *अक्षम्य* अशी मोडतोड करून, *भयाण* आधुनिकता निर्माण करीत असतो. आपण काय केले पाहिजे, याची मनाशी काहीही वैचारिक मांडणी न करता, *also run* मध्ये कलाकार हात धुऊन घेतात आणि आपली पोळी भाजून घेतात.
खर म्हणजे, एकूणच मराठी मन हे कात्रीत सापडलेले आहे, म्हणजे एका बाजूने परंपरेबद्दल आकर्षण ठेवायचे परंतु दुसरीकडे आधुनिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा (आधुनिकता म्हणजे काय? याची ठळक कल्पना मनाशी बांधली जात नाही). मराठी मन जात्याच इतिहाबद्दल अत्यंत तकलादू कल्पना आणि भोळसट वृत्ती बाळगून असते. यात ना धड इतिहासाबद्दलची *वाजवी* जाणीव असते आणि त्या इतिहासाची *नाळ* तोडायचा प्रयत्न करताना, नक्की काय करायचे? याबाबत कायम संभ्रम निर्माण करीत वाटचाल करायची.
नवीन काहीतरी निर्माण करायचे, असे ठरवले जाते पण परंपरेचे नक्की भान नसल्याने, मनाची कुतरओढ करून, मग *धेडगुजरी* करीत बसायचे आणि प्रेक्षकांसमोर निव्वळ *भास* निर्माण करून, टाळ्या मिळवायच्या!! यात मध्ये, आपण फक्त *चिंध्या बांधून ठिगळ लावलेली गोधडी* तयार करतो. यात ना नवनिर्मिती असते ना परंपरेचे भान असते. आपण कलाकार आहोत, याचे वृथा भान मात्र दिसून येत असते आणि इकडे रसिक म्हणून आपले संपूर्ण दुर्लक्ष होत असते. आपल्या समोर काय सादर होत आहे, याकडे *सम्यक* दृष्टीने बघितलेच जात नाही कारण आपण रसिकांच्या मनात, फक्त *स्मृती* तरळत असतात.
Saturday, 8 October 2022
बडे अच्छे लगते है
केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगात असे नेहमीच चाललेले असते, मोठ्या वृक्षाच्या बाजूने इतर झाडांची वाढ खुंटत जाते. त्यांच्यात स्वतःचे स्वत्व नक्कीच असते परंतु वृक्षाची सावली आणि जोमदारपणा इतका प्रचंड असतो की इतर झाडांची वाढ जणू काही शोषली जाते. परिणामी वाढ खुरटली जाणे, हेच प्राक्तन नशिबात येते. वृक्षाच्या समोर, स्वतःचे अस्तित्व ठामपणे रोवून तरारून येणे अगदीच अशक्य नसते परंतु असे क्वचित घडते. आजचे आपले गाणे ऐकताना, आपल्याला असे नक्कीच वाटेल, क्षमता असूनही हा गायक मागे पडलाआणि आजचे गाणे हेच त्या गायकाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून उरले.
आपले आजचे गाणे, *बडे अच्छे लगते है* या गाण्याच्या संदर्भात वरील विवेचन अतिशय चपखल बसते. *बालिका बधू* या नावाने मूळ चित्रपट बंगाली भाषेत निघाला होता, त्याचाच पुनरावतार हिंदीमध्ये तयार झाला. चित्रपटाची पार्श्वभूमी, स्वातंत्र्यपूर्वकालीन बंगाल मधील सरंजामी संस्कृतीची आहे. त्यावेळची समाजव्यवस्था, त्यालाच अनुषंगून असलेली कुटुंबव्यवस्था आणि संस्कार, या सगळ्याचा दाट प्रभाव या चित्रपटावर आहे. परिणामी, चित्रपटातील प्रणय देखील त्या काळाला सुसंगत असा मुग्ध, संयत असाच आहे.
कवी आनंद बक्षी यांनी हे गीत लिहिले आहे. चित्रपट गीतात *चटपटीतपणा* असावा, असा संकेत एकूणच चित्रपटसंगीतात सुरुवातीपासून चालत आलेला आहे. अर्थात चटपटीतपणा आणण्याच्या नादात कधी कधी ढिसाळ रचना होणे क्रमप्राप्तच ठरते आणि याचे मुख्य कारण म्हणजे सातत्याने गाणी लिहावी लागणे. फोफशी कविता लिहिली जाण्याचे प्राक्तन अगदी प्रतिभावंत कवींच्या नशिबी देखील आलेले आहे. चित्रपटांची मागणी ही कायमस्वरूपी असते आणि त्याला अंत नसतो. अशा वेळी मग उतरली जाणारी रचना, प्रत्येकवेळी तितकीच सशक्त, आशयपूर्ण असेल हे मानवी शक्तीच्या बाहेरील काम आहे आणि टीका करताना, हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यातून आनंद बक्षी यांनी कधीही असा *दावा* केला नव्हता, *मी प्रतिभावंत कवी आहे*. त्यांचे म्हणणे एकच, मी मागणीनुसार गीताचा पुरवठा करतो, त्यातून चित्रपटातील प्रसंगात अटळपणे येणारा तोचतोचपणा मनाला शिणवून टाकणारा असतो. असे असून देखील काहीवेळा आनंद बक्षी यांनी काही अप्रतिम गीतांची रचना केलेली आढळते.
प्रस्तुत गाणे अल्पाक्षरी शैलीत लिहिलेले आहे. आपली बायको उद्या माहेरी जायला निघाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आदल्या निवांत सायंकाळी, आपल्या गावाच्या नदीच्या किनारी दोघेच बसलेले आहेत आणि त्यांच्यात *मूक* संवाद चाललेला आहे. नवऱ्याची तशीच मूक भावना, या गाण्यातून मांडली आहे. पहिल्याच ओळीत *धरती*,*रैना* सुंदर वाटतेच आहे परंतु त्यापेक्षा मला तू अधिक सुंदर वाटत आहेस आणि हे अत्यंत सूचकपणे *और तुम* या शब्दांनी अधोरेखित केले आहे, अल्पाक्षरी शैली ही अशी आपल्या समोर येते. गाण्यात पुढे मग याच भावनेचा विस्तार तितक्याच तरलपणे मांडलेला आहे.
संगीतकार राहुल देव बर्मन यांनी बांधलेली *तर्ज*, हेच गाण्याचे खरे आकर्षण आहे. संगीतकार अगदी समृद्धपणे आपल्या समोर येतो. थोडा तांत्रिक विचार केल्यास, *बिहाग* रागावर चाल आधारलेली आहे परंतु स्वररचनेवर *बंगाली बाऊल* लोकसंगीताचा दाट प्रभाव आहे. *ओ माझी रे, जइयो पिया के देस* या ओळीतून माझे म्हणणे अधिक स्पष्ट होईल. आता थोडे तांत्रिक विवेचन. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी सादर केला जाणारा राग. आरोहात *रिषभ* आणि *धैवत* वर्ज्य तर अवरोही सप्तकात सगळे स्वर लागतात. अर्थात *दोन्ही मध्यम* आणि बाकीचे सगळे स्वर *शुद्ध* लागतात. आता या पार्श्वभूमीवर गाण्याची संगती कशी लागते, हे बघूया. पहिल्याच ओळीची स्वरांची मांडणी ही * रे ग रे सा नि ध नि सा ग* अशी ऐकायला मिळते. सर्वसाधारणपणे आपल्याकडे *सा* स्वराने सुरवात केली जाते पण इथे *रिषभ* स्वराने सुरवात झालेली आढळते. मुखड्याच्या दुसऱ्या भागात *ये धरती, ये नदिया* इथे *ग ग प म रे रे सा नि* हे सूर ऐकायला मिळतात. इथला *मध्यम* शुद्ध स्वरूपात ऐकायला मिळतो. *ये रैना और तुम* ही ओळ *सा सा ग रे नि नि सा ग रे सा* अशा *अविकृत* स्वरांच्या संगतीने ऐकायला मिळते आणि *मुखडा* पूर्ण होतो. आता यात *तीव्र मध्यम* स्वर कुठे आहे? त्यासाठी आपल्याला *झुठे लगते हैं ये सारे* या अलीकडे यावे लागेल. इथे *बिहाग* रागाचा वैशिष्ट्यपूर्ण *तीव्र मध्यम* स्वराचा *अदमास* घेता येतो.
गाण्याची प्रकृती लक्षात घेता, वाद्यमेळ देखील अतिशय संयमित वापरला आहे. तशी एकूण रचना देखील फारच छोटी आहे पण प्रत्येक क्षण हा स्वरावकाशाने भरलेला आहे त्यामुळे गाण्यातील *सलगता* एकसंध झालेली आहे. वास्तविक राहुल देव बर्मन यांची कुठलीही स्वररचना ऐकायला घेतली तर तिथे *तालाचे* वेगवेगळे प्रयोग ऐकायला मिळतात आणि हे गाणे देखील अपवाद नाही. जरा बारकाईने ऐकल्यास, परिचित ६ मात्रांचा *दादरा* ताल आहे पण त्याचे सादरीकरण इतक्या वेगळ्या अंगाने केले आहे की पटकन ध्यानात येत नाही आणि हीच या संगीतकाराची खासियत म्हणावी लागेल.
आता वर उल्लेखलेल्या आवाजाबद्दल. गायक अमितकुमार याने या गीताचे गायन केले आहे. संगीतकार जर का व्यासंगी असेल तर गायकाकडून कशाप्रकारे परिणाम घडवून आणू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून या गीताकडे बघता येईल. अमितकुमार म्हणजे सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांचा पुत्र. अर्थात जगरहाटीप्रमाणे अमितकुमारकडून कायम *अवाजवी* अपेक्षा ठेवल्या गेल्या आणि हा गुणी गायक मागे पडला. हा आपल्या समाजाचा दोष आहे. किशोरकुमार अद्वितीय गायक होते पण म्हणून त्यांच्या मुलाकडून तशीच अपेक्षा बाळगणे, हे काही सुजाण लक्षण नव्हते. असे असून देखील या गीतात अमितकुमार अतिशय संयमित गायला आहे आणि संगीतरचनेला यथोचित न्याय दिला आहे. गाण्यात कसल्याही *हरकती* घ्यायला फारशी *जागा* नाही आणि तशी गाण्याची मूलभूत प्रकृती देखील नाही. अमितकुमार यांनी हेच ध्यानात ठेऊन, गायन केले आहे. कुठेही आपल्या वडिलांच्या गायनाची छाप पडू दिली नाही. खरंच हे दुर्दैव म्हणायला लागेल, पार्श्वगायनाच्या आक्रोशी स्पर्धेत, हा गायक मागे पडला.
बडे अच्छे लगते है, ये धरती, ये रैना और तुम,
ओ माझी रे, जइयो पिया के देस
हम तुम कितने पास हैं, कितने दूर हैं चाँद सितारे
सच पूछो तो मन को झुठे लगते हैं ये सारे
मगर सच्चे लगते हैं, ये धरती, ये रैना और तुम,
तुम इन सबको छोडके कैसे कल सुबह जाओगी
मेरे साथ इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी
बडे अच्छे लगते है, ये धरती, ये रैना और तुम,
Bade Acche Lagte Hai - Balika Badhu (1976) - Amit Kumar - YouTube
जादुगर सैंय्या
आपल्या हिंदी चित्रपटात, गाण्यांच्या साहाय्याने चित्रपट गाजणे फार नवलाचे नाही. वास्तविक चित्रपट माध्यम इतके सशक्त आहे की केवळ गाण्याने त्या चित्रपटाचे यश जोखणे योग्य नाही. परंतु आपल्याकडे सगळेच *यशानुवर्ती* असते. आर्थिक यश आणि अमाप लोकप्रियता, हेच तथाकथित *मानदंड* म्हणून मान्यताप्राप्त झालेले आहेत. मग त्यासाठी खरे *निकष* सहजपणे बाजूला सारले जातात. अर्थात भारतासारख्या प्रचंड देशात आणि जिथे असंख्य जाती-जमातीचा प्रचंड पगडा असलेल्या देशात. नेमक्या निकषांची फारशी गरज भासत नाही. आपल्या हिंदी चित्रपटाचा एकूणच *इतिहास* बघितला तर इथे फक्त *यश* या शब्दालाच किंमत आहे, मग तुम्ही ते कसे मिळवता, कितपत संयुक्तिक आहे, असल्या प्रश्नांना अजिबात जागा नसते. अर्थात हे सगळे विवेचन *गंभीर* चित्रपटाला केंद्रीभूत ठेऊन केले आहे. चित्रपट माध्यम हे सामान्य किंवा तळागाळाच्या समाजासाठी असते आणि हे एकदा मान्य केल्यावर, *पलायनवादी* किंवा *स्वप्नवादी* चित्रपटांना मागणी बरीच मिळते. अर्थात अशाच चित्रपटात, गाण्यांना अपरिमित महत्व मिळते आणि हे चित्रपट संगीत समाजात झिरपत राहते. याचा परिणाम असा झाला, चित्रपटातील गाणी ही अविभाज्य अंग होऊन बसली. चित्रपटातील गाणी इतकी लोकप्रिय झाली की चित्रपटाचे कथानक, चित्रपटातील अभिनय आणि इतर घटकांना त्यामानाने मागे ढकलले गेले आहे. अर्थात, याला उत्तर म्हणून काही सुंदर चित्रपटांची नावे घेतली जातील परंतु एकूण चित्रपट संख्या आणि दर्जा, याबाबत व्यस्त प्रमाण आढळते, हे नक्की.
आपले आजचे गाणे, असेच संपूर्णपणे काल्पनिक घटनांवर आधारलेल्या चित्रपटातील गाणे आहे. हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. किंबहुना, चित्रपटातील गाणी, हेच या चित्रपटाचे बलस्थान आहे आणि त्या गाण्यांनी या चित्रपटाला अमाप यश मिळवून दिले.
शायर राजेंद्र कृष्ण, हे नाव हिंदी चित्रपट संगीतात अतिशय मान्यताप्राप्त नाव आहे. सहज, सोपी रचना, बरेचवेळा शब्दांशी खेळत केलेली रचना तसेच उर्दू आणि हिंदी भाषेचा सुंदर मिलाफ घडवलेला, वाचायला मिळतो. आता *नागीन* चित्रपट तसा गावाकडचा, अद्भुत आणि काल्पनिक घटनेवर आधारलेला. त्यामुळे कवितेत *लोककलेच्या* आधारावरील शब्द बरेचवेळा वाचायला मिळतात. *सैंय्या* आणि त्याला जोडून *बैंय्या* हे शब्द, किंवा पहिल्या कडव्यात, *रसिया* शब्दाच्या जोडीने *मन बसिया* हे शब्द येणे किंवा शेवटच्या कडव्यात *झुकी-झुकी अंखिया* बरोबर *सारी सखियां* असे वाचायला मिळते. परिणामी कवितेत सहजसाध्य अशी *गेयता* प्राप्त होते, जी संगीतकाराच्या दृष्टीने *पर्वणी* असते. कविता वाचताना, कवितेतील शब्दात अचूक *खटके* आढळतात, जे संगीतकाराच्या आणि गायक/गायिकेच्या दृष्टीने महत्वाचे असतात. *तेरी नगरिया रुक ना सकूं मैं* यातून नायिकेची मजबुरी तर व्यक्त होतेच परंतु हे शब्द उत्तर भारतीय संस्कृतीशी जवळीक साधणारे आहेत. या सगळ्याचा गाणे लोकप्रिय होण्यामागे मोठा हात असतो. एकूणच अभिव्यक्ती फार सोपी आहे पण *सपक* नाही. पडद्यावरील नायिकेची तडफड व्यक्त होणारी आहे. प्रणयी थाट तर उघड आहे, त्या काळाचे चित्र स्पष्ट करणारे आहे.
संगीतकार हेमंतकुमार, हे आधी गायक म्हणून लोकप्रिय झाले आणि पुढे संगीतकार म्हणून मान्यताप्राप्त झाले. त्यांच्या संगीताचा एकूणच साकल्याने विचार केल्यास, रवींद्र संगीताचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. आजच्या आपल्या गाण्यावर देखील रवींद्र संगीताचा ठसा उमटलेला दिसतो. भारतीय संगीताचा मनापासून पाठपुरावा केला. अर्थात, आपल्या वाद्यमेळात त्यांनी पाश्चात्य वाद्यांचा समावेश केला आहे परंतु एकूणच धाटणी भारतीय संगीताशी जुळवून घेणारी आहे. आजचे गाणे जरी *वृंदावनी सारंग* या रागावर आधारित असले तरी रागाच्या काही *छटा* स्वररचनेत दिसतात. एकतर गाणे द्रुत लयीत आहे त्यामुळे रागाचे चलन ध्यानात घेऊनच हे विधान करावे लागते. *गंधार* आणि *धैवत* वर्जित स्वर असून, दोन्ही निषाद आणि बाकीचे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात. आपल्या भारतीय संगीतात *दुपारच्या समयाचे* राग फारसे आढळत नाहीत, जितके *पहाट*,*सायंसमय* किंवा *रात्रसमय* या काळात ऐकायला मिळतात. आता या स्वरांचे चलन, या गाण्यात कसे *सम्मिलीत* झाले आहे, हे बघूया.
*नि सा सा रे सा* ही स्वरावली आणि लगेच *नि सा सा रे सा रे सा नि प* या स्वरांनी *जादूगर सैंय्या, छोडो मोरी बैंय्या* ही ओळ सिद्ध होते. तर पुढील ओळ *पप मपधप मपपरे रेम पम रे सानिसा* या स्वरांनी बांधली आहे. इथे *निषाद* स्वर कोमल आहे आणि गंमत म्हणजे *वर्जित धैवत किंचित स्वरूपात* इथे लागलेला ऐकायला मिळतो. म्हणूनच मी वरती विधान केले, *वृंदावनी सारंग* रागाच्या आधारावर स्वररचना आहे. ललित संगीतात असे स्वातंत्र्य संगीतकार वारंवार घेत असतात. अर्थात अशा मुळे गाण्याची *खुमारी* तर वाढतेच आणि त्याचबरोबर शब्दांचे सौंदर्य अधिक वर्धिष्णू होते.
अंतऱ्यांची बांधणी समान थाटाची आहे. अर्थात चाल इतकी गोड आहे की त्याची फारशी आवश्यकता वाटत नाही. ताल इतका वेधक वापरला आहे की ऐकणारा त्याच्या मात्रांत डोलायला लागतो. याचे श्रेय संगीतकार हेमंतकुमार यांनाच द्यावे लागेल. वाद्यमेळ, मेंडोलिन,क्ले व्हायोलिन आणि बासरी याच प्रमुख वाद्यांनी सजवला आहे. गाण्याची लय इतकीही द्रुत नाही की शब्दार्थाकडे दुर्लक्ष व्हावे. हेमंतकुमार यांच्या कारकिर्दीला या चित्रपटाच्या यशाने अमाप प्रसिद्धी मिळवून दिली, हे तर खरेच आहे परंतु यातील *क्ले व्हायोलिन* वादन आणि एकूणच या गाण्यांचा ढाचा, हेच पुढे काही काळ अडचणीचे ठरले की काय? अशी शंका येते.
या गाण्याच्या वेळेस, लताबाई जवळपास *सार्वभौम* झाल्या होत्या. त्यांची जवळपास *एकहाती* सत्ता प्रस्थापित झाली होती. विशेषतः प्रणयी थाटाची गाणी किंवा विरही थाटाची गाणी, हा त्यांचा *प्रांत* झाला होता.(याचा अर्थ असा नव्हे, इतर भावनिक गाणी लताबाईंनी गायली नाहीत) ही टीका नसून, एखादा कलाकार, संपूर्ण चित्रपट सृष्टीला कसा भारून टाकतो, हे दर्शवण्याचे प्रयोजन आहे. गायनातील लालित्य आणि प्रसादगुण इथे प्रकर्षाने आढळतात. शब्द गाताना, शब्दाला *किंचित वळण* द्यायचे जेणेकरून स्वररचनेतील खुमारी अधिक वाढावी आणि या गाण्यात वारंवार ऐकायला मिळते. *अब घर जाने दो* ही ओळ मुद्दामून ऐकावी. मुखडा संपताना, परत मूळ चालीकडे कसे *वळवले* जाते, ही खासियत निव्वळ अप्रतिम म्हणावी लागेल. अंतर वरच्या पट्टीत सुरु करायचा आणि त्याच लयीत अंतरा घ्यायचा. असे करताना पुन्हा मुखड्याकडे वळताना, जोड जुळवून घ्यायची. विशेषतः स्वरांतर्गत *श्रुतींचा* वापर करायचा, ही तर लताबाईंच्या गायनाची खरी हातोटी म्हणता येईल. असे श्रुतींचा अचूक वापर करणे, इतर गायक/गायिकांच्या आवाजात सातत्याने ऐकायला मिळत नाही आणि असे सातत्य राखण्यासाठी, जो *नजर* आणि *व्यासंग* लागतो, तिथे लताबाई वेगळ्या ठरतात.
साधी सोपी चाल, त्यामुळे लोकांच्या कानात रुंजी घालून बसते आणि अर्थातच गाणे कायम स्वरूपी चिरस्मरणीय होते.
जादूगर सैंय्या, छोडो मोरी बैंय्या
हो गई आधी रात, अब घर जाने दो
जाने दे ओ रसिया,मेरे मन बसिया, गांव मेरा बडी दूर हैं
तेरी नगरिया रुक ना सकूं मैं, प्यार मेरा मजबूर हैं
जंजीर पडी मेरे हाथ, अब घर जाने दो
झुकी-झुकी अंखिया, देखेंगी सारी सखियां, देगी ताना मेरे नाम का
ऐसे में मत रोक बेदर्दी, ले वचन कल शाम का
कल होंगे फार हम साथ, अब घर जाने दो
https://www.youtube.com/watch?v=3SSa0RLK2Bs&authuser=0
Sunday, 2 October 2022
सावळाच रंग तुझा
आपल्या कानावर काही गाणी अशी पडतात की त्याचा मनावर अतिशय गाढा परिणाम होतो. ते गाणे कशाप्रकारचे आहे, म्हणजे चित्रपटातील आहे की खाजगी आहे, हा प्रश्नच उद्भवत नाही आणि मनात कायम रुंजी घालत असते. गाणे मनात सतत रुंजी घालणे, ही गाण्याच्या गोडव्याची एक कसोटी नक्कीच म्हणता येईल कारण ही कामगिरी सहज जातायेता जमणारी नसते. अशी गाणी ऐकताना फार गोड आणि आपणही गाऊ शकतो, अशी भुलावणी देणारी असतात परंतु प्रत्यक्षात गायला घेतल्यावर चालीतील खाचखळगे दिसायला लागतात. अशी अद्भुत भुलावणी निर्माण करण्याचे श्रेय हे कायम संगीतकार आणि त्यापेक्षा अधिक गायकाचे असते. पुन्हा एक बाब अधोरेखित करावीशी वाटते, अशी गाणी जरी सरळ, सोपी वाटली तरी प्रत्यक्षात गायकाच्या गळ्याची *परीक्षा* घेणारी असतात. इथेच संगीतकाराच्या व्यामिश्र बौद्धिकाची कसोटी असते. भुलभुलैय्या इथेच असतो आणि चकवा इथेच अनुभवायला मिळतो.
आपले आजचे गाणे, *सावळाच रंग तुझा* हे मराठीतील अतिशय लोकप्रिय गाणे तर आहेच परंतु त्यापलीकडे ललित संगीताची व्याप्ती रुंदावणारे गाणे आहे. सत्कृतदर्शनी सोपी वाटणारी स्वररचना अचानक, त्यातील हरकती तसेच ताना, या अलंकारांनी अवघड होऊन बसते. अर्थात या सगळ्या विषयीचा, आपण पुढे आढावा घेणारच आहोत.
मराठी भाषेतील सिद्धहस्त कवी, ग.दि.माडगूळकरांची शब्दरचना आहे. प्रासादिक तसेच गेयतापूर्ण कविता करणाऱ्या काही मोजक्याच कवींपैकी माडगूळकर एक प्रथितयश कवी आहेत. माडगूकरांची बव्हंशी कविता वाचायला घेतल्यास वरील दोन वैशिष्ट्ये तर बघायला मिळतातच परंतु त्यापलीकडे, *मराठी संस्कृतीचा अर्क* म्हणून या कवितांकडे निर्देश करता येईल. अस्सल मराठी मातीचा सुगंध घेऊन येणाऱ्या कविता असतात. त्यातील प्रतिमा, प्रतीके, उपमा, सगळ्या मराठी संस्कृतीशी जोडलेल्या असतात. परिणाम मराठी समाजाशी त्यांची *नाळ* अचूक जोडली गेली. आणखी एक वैशिष्ट्य सांगण्यासारखे म्हणजे *चित्रदर्शी शैली*!! माडगूळकरांच्या बहुतेक रचना या मराठी चित्रपटाशी निगडित असल्याने, पडद्यावरील प्रसंगांशी त्याच्या कविता इतक्या मिसळून जातात की, त्या चित्रपटाच्या अविभाज्य भाग होतात. अर्थात, चित्रपटासाठी लिहायचे म्हटल्यावर कधीना कधीतरी, हातून *सपक* शब्द लिहिले जातात कारण सातत्य राखण्याच्या नादात कुठेतरी *तडजोड* ही होतच असते परंतु जिथे *कविता* म्हणून आपल्या समोर येते, तिथे मात्र दर्जा दिसून येतो.
आता आजची शब्दरचना बघायला गेल्यास, ध्रुवपदातच कवितेची *मध्यवर्ती* कल्पना समोर येते आणि त्या कल्पनेचा विस्तार पुढील ओळींतून केलेला आढळतो. *रंग सावळा पण पावसाळी नभाप्रमाणे* हे समोर आल्यावर, पावसाळी हवेशी साद्ध्यर्म्य जोडणारी *वीज* येणे अपरिहार्य होते. वीज म्हटल्यावर टी *झगझगीत* तसेच *क्षणार्धात* चमकून जारी असते आणि तिथे मग *नाचरी वीज* या शब्दांनी त्याला पूर्तत्व येते. चित्रदर्शी शैलीचे उत्तम उदाहरण म्हणता येईल तसेच भावनांचे अप्रतिम प्रकटीकरण म्हणता येईल. आता पुढील कडव्यांच्या मग, *चंदनाचे बन* येते आणि त्याच्या जोडीला *बनातील विखारी सर्प* येतात. मानवी भावनांची अतिशय थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. तिथे मग *गोकुळचा कृष्ण* आणि त्याची *पावरी* अवतरते. या सगळ्या कल्पनांकडे जरा बारकाईने बघितल्यास, या प्रतिकांमधून मानवी भावनांची *गुंफण* केलेली दिसेल. ही सगळी प्रतीके, आपल्या मराठी संस्कृतीची अविभाज्य अंगे आहेत. परिणामी, मराठी मन लगेच आकृष्ट होते. ललित संगीतातील काव्यात, *लालित्य* कसे खेळावयाचे, याचे ही कविता, सुंदर उदाहरण म्हणता येईल.
मी जेंव्हा रेडिओवर प्रथमच गाणे ऐकले तेंव्हा माझी भावना अशी झाली, त्यावेळी *भावसरगम* नावाचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता आणि त्याच्या अंतर्गत हे गाणे रेडिओवर सादर झाले. अर्थात त्यावेळी गाण्याची माहिती वगैरे सांगितली असणार पण तिकडे माझे दुर्लक्ष झाले होते. पुढे काही वर्षांनी मी प्रख्यात कवी सुधीर मोघ्यांनी सादर केलेला *मंतरलेली चैत्रवेल* हा कार्यक्रम ऐकायला गेलो असताना समजले की हे गाणे *उमज पडेल तर* या चित्रपटातील गाणे आहे!! तोपर्यंत डोक्यात चित्रपटातील गाण्यांविषय ठराविक ठाम कल्पना झाल्या होत्या, त्यात चित्रपटातील गाण्याची स्वररचना, वाद्यमेळाची स्वतंत्र रचना आणि एकूणच गायकीबद्दल एक साचा मनात तयार झाला होता आणि प्रस्तुत गाणे तर एकदम वेगळ्या धर्तीचे निघाले.
गाण्याची स्वररचना सत्कृतदर्शनी तरी *मराठी नाट्यगीताच्या* अंगाने गेलेली आहे. गाण्याच्या सुरवातीचा आलाप, पुढील रचनेत उपयोगात आणलेला वाद्यमेळ देखील तसाच निर्देश करतो. वाद्यमेळ तर बव्हंशी *ऑर्गन* या वाद्याने सजवला आहे आणि तिथेच आपली फसगत होते. गाण्याचे गायन देखील त्याच धर्तीवर गेलेले असल्याने, समाज काहीसा दृढ होतो आणि सगळी करामत, संगीतकार सुधीर फडक्यांची. सुधीर फडक्यांच्या सुरवातीच्या काळातील रचनांवर बालगंधर्वांच्या गायकीचा असर दिसतो, तो असा. अर्थात आपण ३ मिनिटांचे गाणे तयार करत आहोत, तेंव्हा ती *गायकी* जरी अनुकरणीय असली तरी ललित संगीतात कितपत आणायची, याचे अचूक भान दिसते. गाण्याची चाल *शिवरंजनी* रागावर आधारित आहे. *औडव/औडव* जातीचा राग असून *कोमल गन्धार* वगळता (मध्यम आणि निषाद स्वर वर्ज्य) सगळे स्वर *शुद्ध* लागतात. पंचकल्याणी स्वरांचा समूह भावसंगीतात फार ख्यातकीर्त आहे, अगदी हिंदी चित्रपटसंगीतात देखील विशेष प्राबल्य दिसते. अर्थात प्रत्यक्ष गाण्यात मात्र रागाची सावली दिसते.
*सावळाच / रंग /तुझा*
*पपधसासा/रेग(को)/रेसा*
*पावसाळी / नभापरी*
*रेग(को)सा....ध/धसारेग(को)रे*
*आणि/ नजरेत /तुझ्या*
*सारे /ग(को)पपम(तीव्र)/धप*
*वीज/ खेळते /नाचरी*
*पध /पग(को)रेग(को)रेसा/सारेग(को)रेसा*
आता जरा बारकाईने स्वरावली वाचल्यास *तीव्र मध्यम* स्वराचा उपयोग केलेला दिसतो जो शिवरंजनी रागात नाही परंतु हे ललित संगीत आहे, याचे भान ठेवल्यास, सगळे प्रश्न सुटतात. अर्थात प्रत्येक ओळीच्या नंतर जो आलाप आहे, त्यात देखील *तीव्र मध्यम* लावलेला दिसून येतो. मी एकूणच स्वरावली इथे मांडतो, याचे कारण इतकेच, ललित संगीत कितीही वेगळे असले तरी अखेर *रागदारी संगीताच्या* सावलीतच त्याचा *उगम* होतो, हे दर्शविण्यासाठी.
गायिका म्हणून माणिक वर्मा, यांचे नाव अनेक संदर्भात घेता येते. आपण असे देखील म्हणू शकतो, *कलासंगीताची* शास्त्रोक्त तालीम घेतलेली कलावती असून देखील *गझल*,*ठुमरी* सारख्या उपशास्त्रीय संगीतातील गती आणि शेवटी *ललित संगीतातील* प्राविण्य मिळवणारी, माणिक वर्मा ही *एकमेव* कलावती, जे अगदी लताबाई किंवा आशाबाई, यांना देखील जमू शकले नाही. *किराणा* घराण्याचे पायाभूत शिक्षण घेतले आणि रागसंगीतात आपली गायकी सिद्ध केली. ठुमरी गायन करताना, *पंजाबी* अंगाने सादर करून आपल्या कर्तृत्वाची प्रचिती दिली आणि आता या प्रकारचे गीत गाऊन, ललित संगीतात आपली छाप उमटवली. हे निव्वळ थक्क करणारे आहे. ललित संगीत जेंव्हा कलासंगीतातील गायक गायला घेतात तेंव्हा ,त्यांच्या गायकीत अनाहूतपणे, रागदारी संगीताचा जबरदस्त प्रभाव दिसतो. अगदी कितीही मोठा कलाकार असला तरी, गायनावरील हा प्रभाव त्यांना पुसून टाकणे अशक्य झाले आहे. माणिकबाईंनी,आपण कुठल्या प्रकारचे *गाणे* गात आहोत, याचे नेमके भान राखलेले दिसते आणि त्यानुरूप गायकीचा ढंग ठेवलेला दिसतो. ललित संगीतात घेतले जाणारे सांगीतिक अलंकार हे, शब्दांना पूरक असावे लागतात, जेणेकरून कवीच्या शब्दांना योग्य असा न्याय मिळू शकतो तसेच संगीतकाराने जो चालीचा आराखडा दिलेला आहे, त्यातील स्वरिक सौंदर्य जाणून घेऊन, गायनाचे स्वरूप ठेवायचे असते.
आता इथे मुखड्यातील प्रत्येक ओळीच्या शेवटी आलाप आहेत पण ते स्पष्टपणे रागसंगीताची ओळख देणारे नसून, त्या ओळीतील आशयाची अभिव्यक्ती वाढविणारे आहेत. ललित संगीत गाताना याचेच भान ठेवणे अत्यावश्यक असते. तसेच अंतऱ्यामधील *चंदनाच्या बनापरी* गाताना किंचित *खटका* घेतला आहे. आता हा खटका इतपतच *वजनदार* हवा, जेणेकरून त्या शब्दांचे औचित्य तर राखले जाईल परंतु त्याचबरोबर त्यातील स्वरिक सौंदर्य अधिक मुखरीत होईल. ही तारेवरची कसरत असते पण तशी करणे, आवश्यक असते.
शेवटच्या अंतऱ्यातील *आणि नजरेत तुझ्या* गाताना, किंचित *गायकी* आहे पण ती *गायकी* आहे, हे दर्शवले नाही. चालीच्या ओघात ती हरकत घेतली आहे. त्यामुळे ऐकताना कुठेही विक्षेप निर्माण होत नाही.
अद्वितीय गीते ही अशीच तुरळक निर्माण होतात.
सावळाच रंग तुझा, पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या, वीज खेळते नाचरी
सावळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी
सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी
आणि नजरेत तुझ्या नित्य नादते पावरी
सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकोळतो
आणि नजरेचा चंद्र पाहू केंव्हा उगवतो
सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदिवान
Savalach Ranga Tuzha- Manik Varma, Bhavgeet - YouTube
Saturday, 1 October 2022
सतीश आळेकर मुलाखती निमित्ताने
आत्ताच थोड्यावेळापूर्वी टीव्हीवर प्रख्यात लेखक,नाटककार सतीश आळेकरांची मुलाखत बघितली/ऐकली. अर्थात मला त्यांच्या सगळ्या मुलाखतीबाबत बोलण्याइतका अभ्यासू नक्कीच नाही कारण, प्रामुख्याने मुलाखत ही, त्यांच्या नाट्य कारकिर्दीवर आधारलेली होती परंतु बोलण्याच्या ओघात त्यांनी सध्या जे *बॉयकॉट* चळवळीबद्दल ४ शब्द व्यक्त केले, त्याबाबत माझ्या मनात काही विचार आले, इतकेच.
एक नक्की, सध्या आपल्या समाजात *एकांतिक* विचारांचे नको तितके प्राबल्य वाढले आहे. देशात, *सेन्सॉर मंडळ* ही पद्धती अस्तित्वात आहे ना!! मग ती संस्था कशासाठी आहे? आपण एखादी संस्था स्थापन करतो तेंव्हा *आपल्याच* समाजातील काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीचा त्या संस्थेत समावेश करतो. त्यांच्याकडे *निर्णयक्षमता* असते, हे मान्य असते. दुसरे असे, आपल्याकडे एक गोष्ट अत्यंत दुर्दैवी अशी घडत आहे, समाजातील काही लोकांना असे वाटते, *आपण सर्वज्ञ आहोत आणि आपल्यालाच समाजाचे हित कळते*!!
या वृत्तीनुसार ते आपल्या हातात *धारवाडी तराजू* घेतात आणि सगळ्या प्रकरणांची शहानिशा करतात. अरे, कमाल झाली!! तुम्हाला असा अधिकार कुणी दिला आहे? या लोकांचा सतत *धर्म* बुडत चालला आहे, असा घोष चालू असतो. धर्म आणि तद्नुषंगाने मराठी भाषा बुडत चालली आहे, हा घोष गेली कित्येक वर्षे/कित्येक दशके चाललेला आहे. तरीही त्यात फारसा फरक पडलेला नाही. जर का आपली भाषा मरत चालली असेल तर एकदाची, त्या भाषेची *तिरडी* बांधा आणि स्मशानभूमीत शेवटचे *अंत्यसंस्कार* करून टाका!! धर्म आणि भाषा, या गोष्टी *चिरंजीवी* असतात. त्यामागे शतकानुशतकांची परंपरा असते. कुणीतरी उठते आणि आवई उठवते, त्यामागे निव्वळ वैय्यक्तिक स्वार्थ असतो. हिंदू धर्म बुडत आहे, हे तर ज्ञानेश्वरांच्या काळात देखील चालूच होते आणि त्यामुळेच ज्ञानेश्वरांना समाजातून पूर्णपणे *बहिष्कृत* केले होते. आज या घटनेला ६०० वर्षे उलटून गेली. त्याकाळचा धर्म आज नाही हे मान्य पण परिवर्तनशीलता ही सततची चालणारी प्रक्रिया असते आणि धर्माचे स्वरूप त्यानुसार बदलत असते. परंतु हा विचार कितीतरी व्यक्तींना *अपमानास्पद* वाटतो आणि *धर्म बुडाला* सारखी निष्फळ आवई उठवली जाते.
एक गंमत आठवली. हॉलिवूड मधील चित्रपट होता, चित्रपटाचे नाव आठवत नाही पण *सीझर* च्या भूमिकेत *पीटर सेलर्स* नावाचा अभिनेता होता. तो दरबारात सिंहासनावर बसलेला असताना, *खालून ढुसकी* सोडतो!! प्रत्यक्ष सीझर असे करतो पण तिथे त्या प्रसंगातील *मानवी भाग* लोकांनी लक्षात घेतला आणि विनोदाला दाद दिली. विचार करा, शिवाजी किंवा संभाजी बाबत असा प्रसंग आपल्याकडे चित्रित होईल का? समाजाची जडणघडण सतत बदलत असते, आपलेच विचार वठलेले राहतात. एकेकाळी विजय तेंडुलकरांना *घाशीराम कोतवाल* आणि *सखाराम बाईंडर* या नाटकांवरून किती अपमानास्पद व्हावे लागले. गमतीचा भाग म्हणजे, ज्या घाशीराम नाटकावरून, तथाकथित ब्राह्मणांची छीथू झाल्याचा कांगावा करण्यात आला, त्या नाटकात, *मोहन आगाशे*,*चंद्रकांत काळे* यांच्यासारखे *चित्पावन ब्राह्मण* आपल्या भूमिका रंगवत होते!!
मला व्यक्तीश: ही *बॉयकॉट* चळवळ म्हणून अतिशय घातक वाटते. केवळ स्वतःचा अहंकार शमवून घेण्याची अश्लाघ्य पद्धत वाटते. तुम्हाला चित्रपट आवडणार नाही ना, मग बघायला जाऊ नका. तुम्हाला *आमंत्रण* दिले आहे का? आपण जेंव्हा तरुण होतो, तेंव्हा मराठी रंगभूमीवर तथाकथीन *हिट अँड हॉट* नाटकांची लाट आली होती. मी देखील एक नाटक बघायला, साहित्य संघ मंदिरात गेलो होतो आणि निराश होऊन बाहेर पडलो कारण हे नाटक बघण्याच्या माझ्या अपेक्षा वेगळ्या होत्या आणि त्याची *पूर्ती* त्या नाटकात झाली नव्हती!! आता विचार करा, कुठे गेली ती लाट?आता त्याप्रकारची नाटके अस्तित्वात देखील नाहीत. आजच्या काळात अशी नाटके आली असती तर किती *गदारोळ* झाला असता, याचा विचार करा.
मागे एकदा, विवेकानंदांना समाजातील वेश्याबाबत प्रश्न विचारला असताना, त्यांनी निर्भीडपणे सांगितले, आपल्या समाजात वेश्या आहेत म्हणून तुमच्या आया,बहिणी रस्त्यावरून सुखरूप हिंडत आहेत!! किती नेमका आणि समर्पक विचार आहे. समाजात अनेक प्रवृत्तींची माणसे रहात असतात आणि प्रत्येकाची आवडनिवड ही नेहमीच वेगळी आणि स्वतंत्र असणार. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून समूळ नष्ट करण्याचा *घाट* घालायचा, हा कुठला विचार? दुर्दैवाने आपल्या समाजावर *रामायण* कथेचा नको तितका प्रभाव आहे. गंमत म्हणजे त्यात रावणाला सीतेबद्दल *अभिलाषा* निर्माण झाली आणि पुढील *रामायण* घडले!! याचा अर्थ असा, तेंव्हा देखील समाजात *विघातक* घटना घडत होत्या. महाभारतात तर *चोरून पळवणे* वगैरे गोष्टींची बरीच रेलचेल आहे. हे आपल्यापैकी कुणीही लक्षात घेत नाही अंडी आपण इथे *रामराज्य* निर्माण करण्याची अभिलाषा ठेवतो. अशी अभिलाषा निर्माण करणे, हेच आपल्या विचारांचे खरे तोकडेपण आहे.
Subscribe to:
Posts (Atom)