Friday, 4 June 2021

चाँद फिर निकला!!

"किती चालावे चालावे कधी कधी येतो शीण : वाटे घ्यावासा विसावा कुठे.... कुणाशी थांबून.... असे वाटतां कांहीसे कांही वाटेनासे होतें; भुतें फुटती पायांना वाट भिऊन पळते ...." भावकवितेत आशयाची बंदिश किती तऱ्हांनी करता यावी याला भावकविता या रुपाचेच बंधन असते. प्रसिद्ध कवियत्री इंदिरा संत यांच्या *शीण* या कवितेतील काही ओळी इथे घेतल्या आहेत. काल आणि अवकाश यांच्या अगदी संकुचित अशा क्षेत्रात, अगदी थोड्याच घटकांच्या द्वारे अभिव्यक्ती घडवावी लागते. म्हणूनच भावकवितेचे एक क्षितिज गाठल्यानंतर त्यापलीकडील प्रगती ही अधिकाधिक संमिश्र आणि तरल अशा जाणिवांना नेमके शब्दरूप देणे हीच असू शकते. ज्या भावच्छटा शब्दस्पर्शाने देखील कोमेजतील, त्यांना शब्दरूपानेच उमलविणे हीच कसोटी इथे असते आणि अशाच सुंदर तसेच व्यामिश्र भावनांना आजच्या आपल्या *चाँद फिर निकला* या गाण्यात अचूक दार्शनिक स्वरूप दिलेले आढळते. प्रख्यात शायर मजरुह सुलतानपुरी यांची शब्दकळा आजच्या गीताला लाभलेली आहे. प्रसंग असंख्य वेळा हिंदी चित्रपटात आलेला आहे परंतु झालेले दु:ख व्यक्त करताना, कवीची अभिव्यक्ती आपल्याला सुंदर प्रचिती देऊन जाते. जातिवंत शायर हा नेहमीच शिळ्या झालेल्या भावनांना निरनिराळ्या शब्दांनी नटवून तोच आशय वेगळ्या शब्दांतून आपल्या समोर मांडत असतो. *सुलगते सीने से धुआ सा उठता हैं, लो अब चले आओ के दम घुटता हैं!!* मनात ठसठसत असलेली घुसमट किती वेगळ्या प्रतीकांतून वाचायला मिळते. *सीने से धुआ सा उठता हैं* या धुमसणाऱ्या वेदनेला पुढील ओळीतील *दम घुटता हैं* हेच प्रत्ययकारी शब्द अत्यावश्यक होतात. इथे नायिकेच्या वेदनेची प्रत ध्यानात येते. मी वरील कवितेच्या संदर्भात, *काल आणि अवकाश यांच्या अगदी संकुचित अशा क्षेत्रात, अगदी थोड्याच घटकांच्या द्वारे अभिव्यक्ती घडवावी लागते.* हे जे विधान केले होते त्याचे दुसरे सुंदर उदाहरण या ओळींच्या द्वारे आपल्याला पुन्हा एकदा वाचायला मिळते. इथे शायर म्हणून मजरुह आपले अस्तित्व दाखवून देतात. आणि मग पुढील ओळ - *जला गये तन को बहारो के साये* या ओळीतील अर्थ, अधिक अर्थपूर्ण होतो. वास्तविक *बहारो के साये* हे शब्द आधीच्या *जला गये तन* या अभिव्यक्तीच्या तिरकस अनुभूतीने व्यक्त झाल्याने, त्यातील वेदना अधिक खोलपणे जाणवते. त्यामानाने पहिला अंतरा फार सहज, सोपा (अर्थात असे लिहिणे कधीच सहज, सोपे नसते) आहे. त्यातील प्रतिमा *रात केहती हैं* किंवा *ये जानता हैं दिल के तुम नहीं मेरे* असे शब्द किंवा अशीच अभिव्यक्ती वारंवार असंख्य हिंदी चित्रपट गीतांतून बघायला मिळते. संगीतकार सचिन देव बर्मन यांनी या गीताची *तर्ज* बांधली आहे. *शुद्ध कल्याण* रागाचे बरेचसे *अशुद्ध* रूप या गाण्यातून बघायला मिळते!! गाण्याची चाल आणि पडद्यावरील सादरीकरण इतके महत्वपूर्ण आणि परिपूर्ण आहे की, गाणे ऐकताना, कुठल्या रागावर आधारित? असला प्रश्नच मनात उद्भवत नाही आणि याचे श्रेय, संगीतकार सचिन देव बर्मन आणि गायिका लताबाई, यांच्याकडे नि:संशय जाते.या संगीतकाराला, चित्रपट गाणे कसे "सजवायचे" याचे नेमके भान होते आणि प्रसंगी त्यासाठी रागदारी नियमांना तिलांजली देण्याचे धार्ष्ट्य त्यांनी वेळोवेळी दाखवले. इथे देखील हाच प्रकार घडला आहे. रागाचे सूर आणि चलन ध्यानात घेता, प्रथमत: या गाण्यात "शुद्ध कल्याण" कुठे आहे, याचाच शोध घ्यावा लागतो!! गाणे हे शब्दानुरूप असणे जरुरीचे आहे आणि त्यासाठी चाल निर्मिती करताना, सूर कुठून घेतले, कशा प्रकारे वापरले, हे मुद्दे नेहमीच गैरलागू ठरतात. थोडक्यात, केवळ हे गाणे या रागावर आहे म्हणून हे गाणे सुंदर आहे,असे ध्वनित करणे, हा रागदारी संगीताचा फाजील दुराभिमान ठरतो. मग प्रश्न असा येतो, शुद्ध कल्याण रागाच्या लेखात, या गाण्याची जागा कुठे? प्रश्न जरी वाजवी असला तरी काही प्रमाणात अस्थानी ठरू शकतो कारण, आपल्याला इथे या रागाची ओळख करून घ्यायची आहे, तो राग संपूर्णपणे समजून घ्यायचा नाही. एकदा का हा विचार नक्की केला म्हणजे मग वरील सगळेच प्रश्न निकालात निघतात!! सचिन देव बर्मन हे नेहमी गाण्यातील वाद्यमेळ, बांधणी आणि मुळात गाणे चित्रपटासाठी आहे, याकडे कधीही दुर्लक्ष करीत नसत. त्यासाठी त्यांनी वैश्विक संगीताला देखील आपलेसे केले होते. दुसरा महत्वाचा मुद्दा, हिंदी चित्रपटात देव आनंद, बिमल रॉय आणि गुरुदत्त यांचे ३ संपूर्ण वेगळ्या शैलीचे चित्रपट होते आणि सचिनदांनी प्रत्येकासाठी संपूर्ण वेगळी शैली स्वीकारली. हा भाग निश्चितच बौद्धिक आणि म्हणून विलोभनीय आहे. इथे गाण्याची लय ठाय आहे तसेच प्रत्येक शब्द स्वरांतून अर्थपूर्णतेने बांधलेला आहे. अंतरे समान बांधणीचे आहेत. गाण्यात सर्वत्र दरवळणारा *केहरवा* ताल आहे. गाण्याची चाल लगेच मनाची पकड घेणारी आहे. खरंतर *लताबाईंची गायकी* या विषयावर आता काय लिहायचे, हा खरा प्रश्नच आहे. अनेकवेळा अनेक प्रकारे मांडून झाले आहे तरीही ही *गायकी* दशांगुळे वर उरते!! शब्दांचे उच्चारण कौशल्य, स्वरांतील लालित्य, गायनातील प्रसादगुण इत्यादी अनेक वैशिष्ट्ये सांगून झाली तरीही अजून बरेच शिल्लक आहे असे तरी वाटत राहते किंवा हातातून बरेच निसटून गेले, असेच वाटत राहते!! रागाच्या बाराखाडी पलिकडील अद्वितीय कौशल्य आहे आणि हे देखील अनेकांनी लिहून झाले आहे. स्वरांतर्गत श्रुतींचा अचूक प्रत्यय देणारी ही गायकी आहे. श्रुती अशा सहजपणे समजू शकत नाहीत तसेच त्याचा नेमका प्रत्यय घेणे फार अवघड असते तरीही श्रुतींचे अस्तित्व असते!! खरंतर हा विषय अतिशय जटील आहे म्हणूनच इथे थांबतो. *जला फिर मेरा दिल, करू क्या मैं हाये* ही ओळ गाताना, ओळीचा पहिला खंड वरच्या स्वरांत सुरु होतो आणि अक्षरश: क्षणार्धात ओळीचा दुसरा खंड हळूहळू उतरी स्वरांने खाली येतो. जरा बारकाईने ऐकल्यास, स्वरांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. गळ्यावर असामान्य control असल्याखेरीज हे जमणे अशक्य आहे. दुसरा भाग म्हणजे गाणे ऐकताना, पडद्यावर सादर करणारी व्यक्ती ही नूतन आहे, हे पडद्याकडे न बघता, त्याचा नेमका प्रत्यंतर देणे. हे कौशल्य निव्वळ अजोड आहे. *सुलगते सीने से धुआ सा उठता हैं* या ओळीतील घुसमट तितक्याच ताकदीने देणे, हे सहज जमण्यासारखे नाही. विशेषतः *धुआ सा उठता* घेताना, घेतलेली स्वरावली आणि त्याआधीची *सुलगते सीने से* स्वरावली, मुद्दामून अभ्यास करावी अशीच आहे. शब्दांची जाण स्वरांतून कशी व्यक्त करावी, याचे सुंदर उदाहरण म्हणता येईल. इथे राग, श्रुती सगळे बाजूला राहते आणि हाती निव्वळ अपूर्व असे स्वरिक सौंदर्य अनुभवायला मिळते. पुढील ओळीतील *दम घुटता हैं* मधील अशीच व्याकुळता अनुभवायला मिळते. अशी आणखी बरीच सौंदर्यस्थळे दाखवता येतील पण कुठेतरी थांबणे गरजेचे असते म्हणून इथेच थांबतो. पडद्यावरील नैसर्गिक अभिनय आणि स्वरांतून सादर झालेला असामान्य स्वरिक अभिनय, फार थोड्या गाण्याच्या वाट्याला येतो. चाँद फ़िर निकला, मगर तुम ना आये; जला फिर मेरा दिल, करू क्या मैं हाये. ये रात केहती हैं वो दिन गये तेरे, ये जानता हैं दिल के तुम नहीं मेरे; खडी मैं हूं फिर भी निगाहे बचाये मैं क्या करूं हाय के तुम याद आये सुलगते सीने से धुआ सा उठता हैं लो अब चले आओ के दम घुटता हैं जला गये तन को बहारो के साये मैं क्या करू हाये के तुम याद आये Chand Phir Nikla - Nutan, Lata Mangeshkar, Paying Guest Song - YouTube

No comments:

Post a Comment