महंमद रफी यांचा जन्म अमृतसरजवळील कोटला सुलतानसिंह या छोट्या गावात झाला. घरात तशी संगीताची आवड नव्हती परंतु मुलाचा संगीताकडे कल बघून, वडिलांनी किराणा घराण्याच्या वहीद खान, फिरोझ निझामी यांच्याकडे धाडला आणि त्यांच्याकडून महम्मद रफींना संगीताची थोडीफार तालीम मिळाली. वरील दोन गुरूंपैकी, फिरोझ निझामी यांनी काही हिंदी चित्रपटांना - जुगनू सारख्या त्याकाळी लोकप्रिय झालेल्या चित्रपटाला संगीत देखील दिले होते आणि रफींची पुढील कारकीर्द बघता, या योगायोग अन्वर्थक ठरतो.सैगल हे त्यांचे आदर्श गायक होते आणि त्याकाळचा सैगल यांचा प्रभाव बघता, ते सुसंगतच होते.
प्रसिद्ध संगीतकार श्यामसुंदर यांनी रफींना १९४४ मध्ये आलेल्या "गुल बलोच" या चित्रपटात गायनाची संधी दिली. पुढे "गांव की छोरी आणि "बझार" सारख्या चित्रपटात श्यामसुंदर यांनी आणखी संधी देऊन, चित्रपट सृष्टीत पाय रोवायला मदत केली. परंतु खऱ्या अर्थाने, प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल-भगतराम या जोडगोळीने "मीना बझार" या चित्रपटातील १२ गाण्यांपैकी १० गाणी गावयास दिली आणि रफी प्रकाशात आले. हे सगळे लिहिण्याचा उद्देश असा, त्यावेळी निरनिराळ्या प्रकृतीच्या रचनाकारांनी रफींना पसंती दिली होती. रफींच्या अष्टपैलू गायनाला पुढेही वारंवार दाद मिळत गेली, त्याची ही नांदी असे सहजपणे म्हणता येईल. इथे एक बाब ध्यानात ठेवणे अत्यावश्यक ठरेल, हा सगळा काळ, नायक-गायकांचा होता आणि अर्थातच अशा वेळेस, केवळ गायक म्हणून स्थिरावण्यासाठी बरीच धडपड करणे क्रमप्राप्तच होते. चित्रपट संगीतात "साकार" सादर करण्याचा पार्श्वगायन हा प्रमुख मार्ग म्हणून निश्चित होईपर्यंत असेच चाललेले असे. त्याशिवाय गाणारा आवाज कोणत्यातरी नामवंत नायक-अभिनेत्याशी निगडित होते, काही प्रमाणात आवश्यक देखील होते. रफी यांच्या बाबतीत असे झाले नाही आणि अनेक नायक-अभिनेत्यांशी त्यांचे नाते जुळले.
रफी प्रकाशात येत असताना, प्रख्यात संगीतकार नौशाद यांनी महत्वाची संधी दिली - चित्रपट "बैजू बावरा"!! या चित्रपटाने इतिहास घडवला. विशेषतः: आपल्या विस्तृत पल्ल्याने त्यांनी सगळ्यांना प्रभावित केले. असे आणखी म्हणता येईल १९४९ पासून, ते मुकेश, लताबाई, तलत यांसारख्या समकालीनांसोबत गात होते. रफी यांच्याबाबत आणखी एक वैशिष्ट्य (कदाचित मर्यादा देखील म्हणता येईल) सांगता येईल, रफी भरपूर तालीम केल्याशिवाय गात नसत. परिणामतः: ऐनवेळी संहिता आणि चाल यांत बदल करणे त्यांना पसंत नसे. यांबद्दल काही रचनाकारांनी तक्रारीचा सूर लावला होता परंतु वेगळ्या शब्दात रफींना, आपल्या व्यावसायिक जबाबदारीची जाणीव दिसत होती.
वाखाणण्याजोगे अष्टपैलुत्व :
चित्रपट गीतांव्यतिरिक्त गीत, गझल वगैरे रचना रफी सुंदर गात असत. यावरूनही त्यांच्या गायनकौशल्याच्या विविधतेची कल्पना करता येते. हिंदी सोडून इतर भाषांतील त्यांनी गायलेली गीते आणि चित्रपटबाह्य गीते यामुळे त्यांच्या कलाकारास एक वेगळे परिमाण मिळते. अष्टपैलूत्वासाठी पुढील काही गाणी बघावीत.
१) मन तरपत हरी दरशन - शास्त्रोक्त संगीताचे वळण -बैजू बावरा
२) ओ दुनिया के रखवाले - आवाहन - बैजू बावरा
३) लेके पहला पहला प्यार - फेसाळणारे प्रेमगीत - सी.आय.डी.
४) हम बेखुदी में - आवाहक गांभीर्य, गुंजणारे - काला पानी
५) चौदहवी का चांद - नाजूक, हळुवार - चौदहवी का चांद
६) ये ताजो ये तखतो की - भावपूर्ण आणि करुणगंभीर - प्यासा
७) याहू, चाहे कोई मुझे - युवा-ऊर्जेने मत्त - जंगली
८) कभी खुद् पे - सुरेल, पछाडून टाकणारे - हम दोनो
९) सर जो तेरा टकराये - विनोदी - प्यासा
मी इथे मुद्दामून अशी वेगवेगळ्या ढंगाची गाणी स्वतंत्रपणे निवडली जेणेकरून "अष्टपैलुत्व" म्हणून रफीचा गौरव करणे किती सार्थ आहे, याची कल्पना यावी.
रफींच्या गायनशैलीचा विचार करता काही ठाम मते मांडता येतील. त्यांचे नाव बहुतेकवेळा तयार स्वरी, सुरेल पण काहीशा नाटकी गायनशैलीशी निगडित झाले. अर्थात, यासाठी त्यांचे काही रचनाकार देखील तितकेच जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल. कारकिर्दीच्या आरंभाच्या काळात रफी यांनी काहीशा ढाल्या स्वरांत आणि काहीही नाट्यमयतेशिवाय गाणी गायली आहेत. उदाहरणार्थ १) शामे बहार आई (शमा परवाना) २) तारारी रारारी रारारी, दिल को 'तेरी तस्वीर से (दास्तान). थोडे बारकाईने बघितल्यास, रफींचा उदय सैगल युगानंतरचा आणि या काळात पुरुष गायनाचा एक आदिनमुना हिंदी चित्रगीत गायनात तयार करण्यात त्यांनी घेतलेल्या सहभागाशी निगडित आहे. एकापाठोपाठ वेगवेगळे आदिनमुने या विशिष्ट कालखंडात यशस्वीपणे पुढे ठेवण्यात त्यांच्याइतके दुसरे कुणी झटले आहे, असे दिसत नाही.
या बाबतीत पहिली पायरी म्हणजे "मर्दानी गायन" म्हणजे काय हे सिद्ध करण्याची. यासाठी आवश्यक ते आवाजाशी संबंधित स्वामित्व आणि ताकद, हे गुण त्यावेळच्या प्रचलित गायनापेक्षा संपूर्ण वेगळे होते.
पुढे रफी यांनी "जंगली" या चित्रपटातून आणखी दुसरा आणि संपूर्ण वेगळा असा आदिनमुना समोर ठेवला आणि नंतर प्रचंड लोकप्रिय देखील केला. ध्वनी म्हणून ध्वनीस महत्वाचे मानून आविष्कार किंवा रचना करण्याच्या जागतिक किंवा सार्वत्रिक प्रवृत्तीच्या संदर्भात पाहता हे पाऊल अपरिहार्य असेच होते. सारत: आपण जे सध्या समजतो, तेवढी जागतिकीकरणाची प्रक्रिया फार अलीकडची नाही. अर्थात खुद्द रफींना अशा प्रकारची गाणी फारशी आवडत नव्हती, असे ते म्हणत परंतु एकदा का गायनाचा व्यवसाय म्हणून पत्करला म्हणजे मग कसलेही स्वरबंध पुढे आले तरी आपल्या व्यामिश्रतेतुन गायकी सिद्ध करायची, हे ठाम ब्रीद दिसून येते. रफी यांनी आपल्या आवाजात ज्या प्रकारचे सहकंपन वर्धित केले होते त्यात उपलब्ध ध्वनिमुद्रण तंत्र आणि तंत्रज्ञान यांच्यामुळे गायनात वापरलेले आवाज नियंत्रित आणि लवचिक सहकंपनयुक्त असावेत, ही बाब लक्षात ठेवली. सहकंपन म्हणजे आवाजाचा लहानमोठेपणा नसून, ऐकणाऱ्याच्या मनात ध्वनिप्रतिमांची जागृती व्हावी अशा स्वरूपाच्या आवाजाच्या खुल्या लगावाचे नवीन ध्वनिमुद्रणाच्या तंत्राशी सामंजस्याचे नाते प्रस्थापित केले. याचाच परिणाम असा झाला, चित्रपटीय आशयाच्या सांगीत पूर्णतेत भर पडली.
टिकाऊपणा : आता आपण त्यांच्या काही गाजलेल्या रचनापैकी काही रचना प्रसिद्ध संगीतकारांच्या नाहीत, हे नोंदले पाहिजे. उदाहरणार्थ - १) मुहब्बत जिंदा रहती है (चेंगीजखान - हंसराज बहेल) , २) दौलत के झुठे नशे में (ऊँची हवेली-शिवराम), ३) मैंने चाँद सितारों की तमन्ना (चंद्रकांता - एन.दत्ता) , ४) पास बैठिये तबियत (पुनर्मीलन - सी.अर्जुन) , ५) मैं अपने आप से घबरा (बिंदिया - इकबाल कुरेशी) वगैरे. या गाण्यांतून दोन गोष्टी जाणवतात. एकतर ते कुणाहीसाठी गात असत आणि दुसरे असे की संबंधित चित्रपट विस्मृतीत गाडला गेला असला तरी गाणी स्मृतीत राहतात. याचाच अर्थ,त्यांचे सांगीत टिकाऊपणा सिद्ध होते.
गुणगुणता येते ती सुरावट गीत होते, हे त्यांना मनापासून मान्य होते आणि आवाजाची गोलाई हा त्यांचा श्रद्धाविषय होता. आपल्या गायनशैली पासून ते खूपवेळा दूर गेले पण ती त्यांची आवड नव्हती. विरोधासंबंधावर आधारलेल्या, न-स्वरी संगीताकडे झुकणाऱ्या आणि संयोगी आविष्काराकडे झेपावणाऱ्या संगीतयोजनेशी जुळवून घेणे, त्यांना निश्चितच आवडत नव्हते. प्रश्न असा मनात येतो,नंतर चित्रपट संगीतात अवतरलेल्या म्युझिक व्हिडीओसाठी गायन करणे त्यांच्या पचनी पडले असते का? चित्रपटीय आविष्काराच्या गतिमानतेस लवचिक प्रतिसाद देणे, हे त्यांचे अतुलनीय कौशल्य होते आणि ते मानायलाच हवे पण अखेर कलाविचारांत अशा जर-तर अशा विवेचनाला आपण समजतो त्यापेक्षा फारच कमी वाव असतो.
आपण त्यांच्या अष्टपैलूत्वाचा इथे बराच विचार केला आणि त्याच जोडीने गायनातील नाट्यात्म गुणांचा देखील. रफी यांच्या गायनात बरेचवेळा नाट्यात्म गुण नको तितका अवतरत असे - उदाहरणार्थ "बाबुल की दुआँये लेती जा (नीलकमल - रवी) या अतिप्रसिद्ध गाण्यांत अतिशय ढोबळपणे गदगदलेपण आणणे, हा नाट्यात्म गायनाचा एक आविष्कार म्हणता येईल. या अशा काही गाण्यात रफी वाहवत गेले आहेत, असे म्हणावेसे वाटते. अशा गिमिक्सची काहीही जरुरी नव्हती. हे गदगदलेपण बाजूला ठेऊन आवश्यक ती व्याकुळता आणता येऊ शकते आणि हे रफीसारख्या सव्यसाची गायकाला कधीच समजले नसेल असे वाटत नाही पण बहुदा अधिक भावनाशील गावे,या विचाराने असे सादरीकरण झाले असावे.
अर्थात असे काहीही झाले तरी त्यांचे चित्रपट संगीताला दिलेले योगदान निश्चितच अजरामर आहे आणि इथे मात्र कुठल्याही शंकेला वाव नाही.
No comments:
Post a Comment