Thursday, 26 July 2018

महंमद रफी - अष्टपैलू गायकी

महंमद रफी यांचा जन्म अमृतसरजवळील कोटला सुलतानसिंह या छोट्या गावात झाला. घरात तशी संगीताची आवड नव्हती परंतु मुलाचा संगीताकडे कल बघून, वडिलांनी किराणा घराण्याच्या वहीद खान, फिरोझ निझामी यांच्याकडे धाडला आणि त्यांच्याकडून महम्मद रफींना संगीताची थोडीफार तालीम मिळाली. वरील दोन गुरूंपैकी, फिरोझ निझामी यांनी काही हिंदी चित्रपटांना - जुगनू सारख्या त्याकाळी लोकप्रिय झालेल्या चित्रपटाला संगीत देखील दिले होते आणि रफींची पुढील कारकीर्द बघता, या योगायोग अन्वर्थक ठरतो.सैगल हे त्यांचे आदर्श गायक होते आणि त्याकाळचा सैगल यांचा प्रभाव बघता, ते सुसंगतच होते. 
प्रसिद्ध संगीतकार श्यामसुंदर यांनी रफींना १९४४ मध्ये आलेल्या "गुल बलोच" या चित्रपटात गायनाची संधी दिली. पुढे "गांव की छोरी आणि "बझार" सारख्या चित्रपटात श्यामसुंदर यांनी आणखी संधी देऊन, चित्रपट सृष्टीत पाय रोवायला मदत केली. परंतु खऱ्या अर्थाने, प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल-भगतराम या जोडगोळीने "मीना बझार" या चित्रपटातील १२ गाण्यांपैकी १० गाणी गावयास दिली आणि रफी प्रकाशात आले. हे सगळे लिहिण्याचा उद्देश असा, त्यावेळी निरनिराळ्या प्रकृतीच्या रचनाकारांनी रफींना पसंती दिली होती. रफींच्या अष्टपैलू गायनाला पुढेही वारंवार दाद मिळत गेली, त्याची ही नांदी असे सहजपणे म्हणता येईल. इथे एक बाब ध्यानात ठेवणे अत्यावश्यक ठरेल, हा सगळा काळ, नायक-गायकांचा होता आणि अर्थातच अशा वेळेस, केवळ गायक म्हणून स्थिरावण्यासाठी बरीच धडपड करणे क्रमप्राप्तच होते. चित्रपट संगीतात "साकार" सादर करण्याचा पार्श्वगायन हा प्रमुख मार्ग म्हणून निश्चित होईपर्यंत असेच चाललेले असे. त्याशिवाय गाणारा आवाज कोणत्यातरी नामवंत नायक-अभिनेत्याशी निगडित होते, काही प्रमाणात आवश्यक देखील होते. रफी यांच्या बाबतीत असे झाले नाही आणि अनेक नायक-अभिनेत्यांशी त्यांचे नाते जुळले. 
रफी प्रकाशात येत असताना, प्रख्यात संगीतकार नौशाद यांनी महत्वाची संधी दिली - चित्रपट "बैजू बावरा"!! या चित्रपटाने इतिहास घडवला. विशेषतः: आपल्या विस्तृत पल्ल्याने त्यांनी सगळ्यांना प्रभावित केले. असे आणखी म्हणता येईल १९४९ पासून, ते मुकेश, लताबाई, तलत यांसारख्या समकालीनांसोबत गात होते. रफी यांच्याबाबत आणखी एक वैशिष्ट्य  (कदाचित मर्यादा देखील म्हणता येईल) सांगता येईल, रफी भरपूर तालीम केल्याशिवाय गात नसत. परिणामतः: ऐनवेळी संहिता आणि चाल यांत बदल करणे त्यांना पसंत नसे. यांबद्दल काही रचनाकारांनी तक्रारीचा सूर लावला होता परंतु वेगळ्या शब्दात रफींना, आपल्या व्यावसायिक जबाबदारीची जाणीव दिसत होती. 
वाखाणण्याजोगे अष्टपैलुत्व :
चित्रपट गीतांव्यतिरिक्त गीत, गझल वगैरे रचना रफी सुंदर गात असत. यावरूनही त्यांच्या गायनकौशल्याच्या विविधतेची कल्पना करता येते. हिंदी सोडून इतर भाषांतील त्यांनी गायलेली गीते आणि चित्रपटबाह्य गीते यामुळे त्यांच्या कलाकारास एक वेगळे परिमाण मिळते. अष्टपैलूत्वासाठी पुढील काही गाणी बघावीत. 
१) मन तरपत हरी दरशन - शास्त्रोक्त संगीताचे वळण -बैजू बावरा 
२) ओ दुनिया के रखवाले - आवाहन - बैजू बावरा 
३) लेके पहला पहला प्यार - फेसाळणारे प्रेमगीत - सी.आय.डी. 
४) हम बेखुदी में - आवाहक गांभीर्य, गुंजणारे - काला पानी 
५) चौदहवी का चांद - नाजूक, हळुवार -   चौदहवी का चांद
६) ये ताजो ये तखतो की - भावपूर्ण आणि करुणगंभीर - प्यासा 
७) याहू, चाहे कोई मुझे - युवा-ऊर्जेने मत्त - जंगली 
८) कभी खुद् पे - सुरेल, पछाडून टाकणारे - हम दोनो 
९) सर जो तेरा टकराये  - विनोदी - प्यासा 
मी इथे मुद्दामून अशी वेगवेगळ्या ढंगाची गाणी स्वतंत्रपणे निवडली जेणेकरून "अष्टपैलुत्व" म्हणून रफीचा गौरव करणे किती सार्थ आहे, याची कल्पना यावी. 
रफींच्या गायनशैलीचा विचार करता काही ठाम मते मांडता येतील. त्यांचे नाव बहुतेकवेळा तयार स्वरी, सुरेल पण काहीशा नाटकी गायनशैलीशी निगडित झाले. अर्थात, यासाठी त्यांचे काही रचनाकार देखील तितकेच जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल. कारकिर्दीच्या आरंभाच्या काळात रफी यांनी काहीशा ढाल्या स्वरांत आणि काहीही नाट्यमयतेशिवाय गाणी गायली आहेत. उदाहरणार्थ १) शामे बहार आई (शमा परवाना) २) तारारी रारारी रारारी, दिल को 'तेरी तस्वीर से (दास्तान). थोडे बारकाईने बघितल्यास, रफींचा उदय सैगल युगानंतरचा आणि या काळात पुरुष गायनाचा एक आदिनमुना हिंदी चित्रगीत गायनात तयार करण्यात त्यांनी घेतलेल्या सहभागाशी निगडित आहे. एकापाठोपाठ वेगवेगळे आदिनमुने या विशिष्ट कालखंडात यशस्वीपणे पुढे ठेवण्यात त्यांच्याइतके दुसरे कुणी झटले आहे, असे दिसत नाही. 
या बाबतीत पहिली पायरी म्हणजे "मर्दानी गायन" म्हणजे काय हे सिद्ध करण्याची. यासाठी आवश्यक ते आवाजाशी संबंधित स्वामित्व आणि ताकद, हे गुण त्यावेळच्या प्रचलित गायनापेक्षा संपूर्ण वेगळे होते.
पुढे रफी यांनी "जंगली" या चित्रपटातून आणखी दुसरा आणि संपूर्ण वेगळा असा आदिनमुना समोर ठेवला आणि नंतर प्रचंड लोकप्रिय देखील केला. ध्वनी म्हणून ध्वनीस महत्वाचे मानून आविष्कार किंवा रचना करण्याच्या जागतिक किंवा सार्वत्रिक प्रवृत्तीच्या संदर्भात पाहता हे पाऊल अपरिहार्य असेच होते. सारत: आपण जे सध्या समजतो, तेवढी जागतिकीकरणाची प्रक्रिया फार अलीकडची नाही. अर्थात खुद्द रफींना अशा प्रकारची गाणी फारशी आवडत नव्हती, असे ते म्हणत परंतु एकदा का गायनाचा व्यवसाय म्हणून पत्करला म्हणजे मग कसलेही स्वरबंध पुढे आले तरी आपल्या व्यामिश्रतेतुन गायकी सिद्ध करायची, हे ठाम ब्रीद दिसून येते.  रफी यांनी आपल्या आवाजात ज्या प्रकारचे सहकंपन वर्धित केले होते त्यात उपलब्ध ध्वनिमुद्रण तंत्र आणि तंत्रज्ञान यांच्यामुळे गायनात वापरलेले आवाज नियंत्रित आणि लवचिक सहकंपनयुक्त असावेत, ही बाब लक्षात ठेवली. सहकंपन म्हणजे आवाजाचा लहानमोठेपणा नसून, ऐकणाऱ्याच्या मनात ध्वनिप्रतिमांची जागृती व्हावी अशा स्वरूपाच्या आवाजाच्या खुल्या लगावाचे नवीन ध्वनिमुद्रणाच्या तंत्राशी सामंजस्याचे नाते प्रस्थापित केले. याचाच परिणाम असा झाला, चित्रपटीय आशयाच्या सांगीत पूर्णतेत भर पडली. 
टिकाऊपणा :  आता आपण त्यांच्या काही गाजलेल्या रचनापैकी काही रचना  प्रसिद्ध संगीतकारांच्या नाहीत, हे नोंदले पाहिजे. उदाहरणार्थ - १) मुहब्बत जिंदा रहती है (चेंगीजखान - हंसराज बहेल) , २) दौलत के झुठे नशे में (ऊँची हवेली-शिवराम), ३) मैंने चाँद सितारों की तमन्ना (चंद्रकांता - एन.दत्ता) , ४) पास बैठिये तबियत (पुनर्मीलन - सी.अर्जुन) , ५) मैं अपने आप से घबरा (बिंदिया - इकबाल कुरेशी) वगैरे. या गाण्यांतून दोन गोष्टी जाणवतात. एकतर ते कुणाहीसाठी गात असत आणि दुसरे असे की संबंधित चित्रपट विस्मृतीत गाडला गेला असला तरी गाणी स्मृतीत राहतात. याचाच  अर्थ,त्यांचे सांगीत टिकाऊपणा सिद्ध होते. 
गुणगुणता येते ती सुरावट गीत होते, हे त्यांना मनापासून मान्य होते आणि आवाजाची गोलाई हा त्यांचा श्रद्धाविषय होता.  आपल्या गायनशैली पासून ते खूपवेळा दूर गेले पण ती त्यांची आवड नव्हती. विरोधासंबंधावर आधारलेल्या, न-स्वरी संगीताकडे झुकणाऱ्या आणि संयोगी आविष्काराकडे झेपावणाऱ्या संगीतयोजनेशी जुळवून घेणे, त्यांना निश्चितच आवडत नव्हते. प्रश्न असा मनात  येतो,नंतर चित्रपट संगीतात अवतरलेल्या म्युझिक व्हिडीओसाठी गायन करणे त्यांच्या पचनी पडले असते का? चित्रपटीय आविष्काराच्या गतिमानतेस लवचिक प्रतिसाद देणे, हे त्यांचे अतुलनीय कौशल्य होते आणि ते मानायलाच हवे पण अखेर कलाविचारांत अशा जर-तर अशा विवेचनाला आपण समजतो त्यापेक्षा फारच कमी वाव असतो. 
आपण त्यांच्या अष्टपैलूत्वाचा इथे बराच विचार केला आणि त्याच जोडीने गायनातील नाट्यात्म गुणांचा देखील. रफी यांच्या गायनात बरेचवेळा नाट्यात्म गुण नको तितका अवतरत असे - उदाहरणार्थ "बाबुल की दुआँये लेती जा (नीलकमल - रवी) या अतिप्रसिद्ध गाण्यांत अतिशय ढोबळपणे गदगदलेपण आणणे, हा नाट्यात्म गायनाचा एक आविष्कार म्हणता येईल. या अशा काही गाण्यात रफी वाहवत गेले आहेत, असे म्हणावेसे वाटते. अशा गिमिक्सची काहीही जरुरी नव्हती. हे गदगदलेपण बाजूला ठेऊन आवश्यक ती व्याकुळता आणता येऊ शकते आणि हे रफीसारख्या सव्यसाची गायकाला कधीच समजले नसेल असे वाटत नाही पण बहुदा अधिक भावनाशील  गावे,या विचाराने असे सादरीकरण झाले असावे. 
अर्थात असे काहीही झाले तरी त्यांचे चित्रपट संगीताला दिलेले योगदान निश्चितच अजरामर आहे आणि इथे मात्र कुठल्याही शंकेला वाव नाही. 

Monday, 23 July 2018

बाबूजी - ललित गायनाचे प्रतिष्ठित घराणे

शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास, प्रचंड मेहनत हीच सुधीर फडक्यांची प्राथमिक अशी ओळख करून घेता येईल. सुरवातीलाच पंडित वामनराव पाध्यांकडे शिस्तशीर शिक्षण तसेच त्याकाळातील कोल्हापूरमधील वास्तव्य असल्याने अनेक शास्त्रीय संगीतकारांच्या प्रभाव. १९४१ मध्ये HMV सारख्या मान्यवर कंपनीत कारकिर्दीला सुरवात झाली, पुढे १९४५ मध्ये "प्रभात" कंपनीत शिरकाव करून घेतला आणि कारकिर्दीला  नवीन वळण मिळाले. सुधीर फडक्यांची खरी कारकीर्द गाजली ती मराठी चित्रपट संगीत आणि प्रसिद्ध पावलेले गीत रामायण. जवळपास १२० चित्रपट संगीत दिग्दर्शन केले असल्याने, समीक्षा करायला निश्चित एक विस्तृत पट मिळतो. या संगीतकाराचे "ललित गायन" यात देखील अतिशय उल्लेखनीय योगदान आहे आणि त्याची देखील वेगळेपणाने समीक्षा करणे गरजेचे ठरते. 
गायक म्हणून विचार करता, स्वतः:च्या दिग्दर्शनाखाली गायलेली चित्रपटीय गीते तसेच खाजगी भावगीते(स्वतः:बांधलेली तसेच इतर संगीतकारांनी बांधलेली गाणी)  लक्षात घ्यायला हवीत. गायक म्हणून विचार करताना काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक ठरते. सुधीर फडके हे जेंव्हा उदयोन्मुख गायक म्हणून प्रसिद्धीला यायचे होते, त्यावेळी संगीत पटलावर, विशेषतः: भावगीत संगीतावर जी.एन. जोशी, गजानन वाटवे इत्यादींनी आपली "बैठक" स्थिर केली होती. सुधीर फडक्यांची सुरवातीची गायकी न्याहाळली तर एक बाब प्रकर्षाने लक्षात येते, गायनावर असणारा बालगंधर्वांचा दाट परिणाम!! पुढे हा परिणाम विलयाला गेला, हे फारच चांगले झाले. एक बाब ठामपणे सांगता येते, अगदी पहिल्यापासून, ललित संगीत म्हणजे काय? याविषयीची धारणा अगदी पक्की होती. आपल्याला अभिप्रेत संगीताशय कसा मांडायचा याविषयी, सुधीर फडके अगदी नि:शंक होते. काय सांगायचे आणि कसे सांगायचे, यात कधीही चाचपडलेपणाची भावना कधीही आढळली नाही. आणि बहुदा याच जाणिवेतून त्यांची गायकी हा ललित संगीतातील "मानदंड" म्हणून प्रस्थापित झाला. याचाच दुसरा भाग म्हणजे ध्वनिमुद्रण असो किंवा समोरच्याला साथसंगतीशिवाय  काहीतरी गुणगुणणे असो, गायनात तात्पुरतेपणा किंवा उरकून टाकणे, असे कधीही झाले नाही. गायनात एकप्रकारची शिस्त आली. आपल्या श्रोत्यांना आपण काय पोहोचवायचे आहे, याबाबत ठाम धारणा होती. गायनात एकामागोमाग एक व एका वेळेस एक स्वर घेणे म्हणजे संगीताविष्कारार्थ स्वरसंहती हे तत्व सांभाळणे होय. याची नेमकी प्रचिती गायनात कायम मिळत राहिली. आवाज फार बारीक अथवा जाड असा नव्हता पण लगाव काहीसा नाजूक होता (प्रसंगी या वैशिष्ट्याला छेद देणारी गायकी, विशेषतः: गीत रामायणातील गाणी सादर करताना) पट्टी जरी काहीशी उंच असली तरी तिथे मध्यममार्गच होता. आवाज सहजपणे हलका होत असे पण तरीही त्यात अस्थिरता नसायची. 
मध्ययुगीन संगीतशास्त्र्यांनी आवाजाविषयी बारकाईने विचार केला होता. आवाज, त्याचा लगाव आणि त्यातून साधणारा परिणाम याविषयी बरीच जागरूक नोंद "संगीत रत्नाकर" ग्रंथात आढळते. त्यानुसार त्या ग्रंथात त्यांनी एक खास संज्ञा वापरली आहे - "शारीर". शरीराबरोबर येणारा तो शारीर असे म्हटले आहे. अर्थात या बाबत आपल्याला अधिक खोलात जायचे नाही परंतु सुधीर फडक्यांची गायकी कक्षात घेताना हे "शारीर" वैशिष्ट्य नेमकेपणाने जाणवते. "गीत रामायण" गाताना प्रस्तुत वैशिष्ट्य ठामपणे त्यांनी निर्देशात केले आहे. वरवर पाहता, माणूस सुरेल असतो किंवा नसतो असेच म्हणावे लागेल. विशिष्ट आविष्कारात स्वरांची जी स्थाने संयुक्तिक असतात तिथे सहजपणे, पाहिजे तेंव्हा आणि श्रवणीयता राखून मुक्काम करणे म्हणजे सुरेल असणे. इथपर्यंत बहुतेकांचा प्रवास सारखाच असतो परंतु यापुढील प्रवास वेगळा असतो. थोडक्यात, द्रुत तान घेण्यासाठी किंवा एखादी उंच स्वरांवर हरकत सादर करण्याआधी, श्वास भरण्याकरता एक "ह" कार युक्त स्वर सादर फडके वापरात असत, त्यामुळे एकूणच सादरीकरणात गंभीरता वावरते आणि श्रोत्यांचे लक्ष खेचून घेण्यात यशस्विता येते.
प्रसंगी आवाजात काहीशी नाट्यमयता आणणे हा देखील एक विशेष म्हणता येईल. किंबहुना, त्यांच्या गायनाचे एक व्यवच्छेदक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल परंतु नाट्यमयता किती असावी, या बाबत ठाम आडाखे होते. गायनातील नाट्यमयता त्यांनी कधीही शब्दांवर स्वर होऊ दिली नाही. किंबहुना, गायन आणि स्वररचना तयार करताना, सुधीर फडक्यांनी कवीचे शब्द हे नेहमीच प्रमाण मानले. शक्यतो "यतिभंग" होऊ द्यायचा नाही, अशीच बहुदा प्राज्ञा केली असावी, असा संशय घेण्याइतपत  त्यांनी कवितेतील शब्दांना महत्व दिले. 
दुसरा विशेष सांगायचं झाला तर शब्दोच्चार. याबाबत तर त्यांनी विशेषतः: मराठीत स्वतः:ची एक खास शैली निर्माण केली असे म्हटले तर वावगे ठरू नये. "ष", "ऋ" इत्यादी अक्षरे गाण्यात उच्चारताना प्रयास पडतो तर स्वरांच्या साहाय्याने नेमका उच्चार करणे, किती अवघड असेल याची कल्पना यावी. केवळ हीच अक्षरे नव्हेत तर इतर अवघड वर्णनामांना, स्वरांतून घेताना, त्या अक्षरांचे व्याकरण सांभाळून त्यांनी आपली गायकी सिद्ध केली उदाहरणार्थ "दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा" या यमन रागाच्या सावलीतील गाण्यात, "दोष" मधील "ष" या अक्षराचा उच्चार फार अभ्यासपूर्ण आहे आणि तास तो स्वच्छपणे उच्चारल्याने, कवितेतील आशयात किती गहिरा रंग भरला जातो,हे मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. गमतीचा भाग असा, स्पष्ट शब्दोच्चार करण्याच्या नादात आवाजात "खडबडीतपणा" येऊ शकतो परंतु फडक्यांची खासियत अशी, स्पष्टोच्चारात गाताना, स्वरांत तितकेच मार्दव आणण्याची किमया करून दाखवत. हा प्रकार विलक्षण म्हणावा लागेल.  
संगीतकार म्हणून फडक्यांची कारकीर्द अधिक समृद्ध आहे. प्रभात सिनेमांच्या काळात सुरवात झाल्यानंतर त्यांनी हळूहळू स्वतः:चे स्थान निर्माण केले आणि पुढे प्रचंड लोकप्रिय केले, यात कसलाच वाद नाही. एक संगीतकार म्हणून बघताना,एकूणच त्यांच्या "यमन" रागाचा फार प्रभाव होता असे म्हणता येईल. "पराधीन आहे जगती", "धुंदी कळ्यांना", "तोच चंद्रमा नभात" कारे दुरावा" "आकाशी झेप घेरे"  ही आणि अशी आणखी गाणी वानगी दाखल सांगता येतील. अर्थात इथे यमन राग केवळ उदाहरण म्हणून घेतला आहे परंतु इतर अनेक रागात त्यांनी स्वररचना सादर करून, कलासंगीतावरील प्रभुत्व सिद्ध केले आहे. सुधीर  फडक्यांनी मराठी चित्रपट संगीतावर एकेकाळी अधिराज्य केले होते असे म्हटले तर अतिशयोक्ती चुकूनही होऊ नये. जवळपास १२० चित्रपटांसाठी त्यांनी संगीत रचना केल्या आहेत, असे इतिहास सांगतो. परंतु कधीकधी असे वाटते, त्यांच्यातील गायक, हा संगीतकारावर अधिकार गाजवत असावा. स्वररचना करतानाच त्यातील शब्दांचे औचित्य सांभाळणे आणि तसे करताना सादरीकरणाच्या वेळेस, गायन अधिक समृद्ध व्हावे, अशीच धारणा दिसते. त्यांची  जोडी,ग.दि. माडगूळकरांसोबत अधिक जमली, हे तर सर्वश्रुतच आहे. माडगूळकर कविता लिहिताना, बरेचवेळा संस्कृत शब्दांचा आधार घेत असत. सुधीर फडक्यांचे शब्दोच्चार स्पष्ट असण्यामागे माडगूळकरांची संस्कृतप्रचुर काव्यरचना असणे, हा केवळ योगायोग नक्कीच नसणार. कवितेची चाल सहज, गुणगुणता  येईल अशीच असायची परंतु त्यात विस्ताराच्या अनेक शक्यता दिसतात. फडक्यांचे वैशिष्ट्य हेच म्हणता येईल अशा विस्तारशक्यता असून देखील, त्यांनी शब्दांना नेहमीच प्राधान्य दिले. उदाहरण द्यायचे झाल्यास,  "ज्योतीकलश छलके" हे सुप्रसिद्ध गाणे. एकाबाजूने भूप तर दुसऱ्या अंगाने देसकार रागाच्या सावलीत बांधलेली स्वररचना, वेगळ्या ढंगाने गाऊन देखील कवितेचे पावित्र्य कुठेही ढळलेले नाही. YouTube वर आपल्याला लताबाईंच्या आवाजात आणि सुधीर फडक्यांच्या आवाजात, अशा दोन्ही रचना ऐकायला मिळतील. 
चाल बांधताना, शक्यतो खालचे किंवा मध्य सप्तकातील स्वर आणि संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवायचा. "चालली शकुंतला" , "डोळ्यात वाच माझ्या" इत्यादी गाण्यांमधून हाच विचार प्रबळ दिसतो. पहिली रचना दु:खाचे नाटकी प्रक्षेपण न करता व्याकुळ करणाऱ्या व्यथेचे मन:स्पर्शी दर्शन घडवते तर दुसऱ्या गाण्यात एकमेकांच्या सहवासासाठी  आतुर झालेल्या जीवांचे मनोमिलन दिसते. दोन्ही गीतांत प्रामुख्याने फडक्यांचा आवाज आहे पण तरीही सादरीकरण करताना, वर दर्शविलेल्या वैशिष्ट्यांचे दर्शन आपल्या घडते.. अर्थात, पुढे मात्र त्यांनी आपले धोरण बदलले आणि उच्चस्वरी वाद्यवृंद वापरण्याचे धोरण ठेवले - उदाहरणार्थ "जाशील कोठे मुली तू" वगैरे. वस्तूत: तशी फारशी गरज नव्हती 
. एकंदरीत सुधीर फडक्यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता आणि खंत करण्याकडे झुकली होती, असे सहजपणे म्हणता येईल - उदाहरणार्थ "चल सोडून हा गाव" किंवा "हा माझा मार्ग एकला" या दोन्ही गाण्यात एकटेपणाची व्याकुळ अवस्था अतिशय सुरेख प्रकारे मांडली  आहे त्या दृष्टीने फडक्यांच्या रचना "गीतधर्मी" आहेत, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. रागाच्या स्वरक्षेत्रात रुंजी घालण्याच्या ब्रीदास ते जगतात पण शिवाय भारतीय वाद्यांचा स्वरधर्म ओळखून त्यांचा वापर करायचा. कवितेच्या चरणाचा पायाभूत अभ्यास करून, त्याच्या भोवतीच वाद्यमेळाची रचना करायची.या आग्रहामुळे काव्याचा अर्थच नव्हे तर आशय देखील ऐकणाऱ्याच्या मनात सावकाश दाटपणे उतरत जातो. 
सुधीर फडक्यांच्या रचनेचे आणखी एक अंग दाखवायचे झाल्यास, त्यांची दृष्टी "चित्रपटीय" होती. गाणी ही चित्रपटातील आहेत आणि चित्रपटाची कथा पुढे नेण्यास मदत करणारी आहेत, याची वास्तविक जाणीव आढळायची. याचाच वेगळा अर्थ, कवितेतील कवित्व जपायचे पण ते जपताना चित्रपटातील प्रसंगाचे देखील नेमके भान ठेवायचे. अशी अंतर्मुख दृष्टी ठेवणारे, विरळाच आढळणारे कलाकार होते. 

Friday, 20 July 2018

गीता दत्त

बांगला देशातील फरीदपूर मधील एका संगीतप्रेमी आणि संपन्न कुटुंबात जन्म, लहानपणीच पंडीत हीरेंद्रनाथ चौधरी यांच्याकडून संगीताची थोडीफार तालीम.
वयाच्या सोळाव्या वर्षी "भक्त प्रल्हाद" चित्रपटात प्रथम गायन केले. परिणामत: गायिका म्हणून तिला बरीच प्रसिध्दी मिळाली. पुढे १९५३ मध्ये गुरूदत्त यांच्याशी अयशस्वी विवाह, याची परिणिती, गायन थांबविणे!! याचा मानसिक त्रास आणि आजारपण. याला तोंड देतानाच अखेर २०.जुलै १९७२ मध्ये पंचत्वात विलीन. 
सुरवातीलाच आपण या गायिकेच्या आवाजाचे थोडक्यात विश्लेषण करायला घेऊ. आवाज रागदारी संगीताची तालीम घेऊन वा मेहनत करून रूंद तसेच जड झालेला नाही. तिच्या आवाजात किंचीतसा कंप आहे पण तो जर थोडा अधिक असता तर तो दोष ठरला असता. ज्या प्रकारे  हा कंप तिच्या विविध गाण्यांत आला आहे, त्याचा परिणाम, तो आवाज समाधानकारक भावपूर्ण वाटतो. तिच्या सुरवातीच्या गीतांत थोडा बंगाली स्पर्श जाणवतो. उदाहरणार्थ "मेरा सुंदर सपना बीत गया" - या गीतात काहीसा गोल उच्चार व शेवटचा स्वरवर्ण लांबवण्याची प्रवृत्ती आढळते. अर्थात पुढे ती लकब नाहीशी झाली, हे फार चांगले झाले. 
भावनापट आणि लगावांची विविधता:
गीता दत्तच्या आवाजात विस्तीर्ण भावनापटांची प्रतीती येते. एका असाधारण भावावस्थेसहीत येणाऱ्या आवाजाच्या लगावाकडे आपण प्रथम वळूया. विविधकृत्याशिवाय अवतरणाऱ्या बहुतेक भारतीय भक्ती आणि धर्म संगीतात या लगावाचा आढळ होतो असे सहजपणे म्हणता येईल. अशी गीतें साध्या चालींची, सरळ साध्या लयबंधांची आणि संहितेबाबत ठराविक असतात आणि तरीही त्यात अनेक गुंतागुंतीच्या जागा असतात. अशा रचनांमधील बांधणीत पुनरावृत्ती अधिक आढळते आपल्या सादरीकरणामधून ही गायिका बहुतेक प्रसंगी भावनिक अवस्थेस सहज आवाहन करू शकते - उदाहरणार्थ "आज सजन मोहे अंग लगाये" ( चित्रपट प्यासा). अशीच फसवी अलिप्तता "आन मिलो श्याम सांवरे" ( चित्रपट देवदास) या मन्नाडे बरोबर गायलेल्या गीतात ऐकायला मिळते. नेहमीची आणि ढोबळपणे वावरणारी भजनी भावपूर्णताही तिच्या गायनातून ऐकायला मिळते - घुंघट के पट खोल" (चित्रपट जोगन ) किंवा "तोरा मनवा क्यूँ घबराये" (चित्रपट साधना) या रचना ऐकाव्यात. 
चित्रपटदृष्ट्या उपयुक्त असे इतरही काही भाव गीताच्या गायनात आढळतात. हात टेकल्याचा हताश भाव - "ठेहेरो जरासी देर" (चित्रपट सवेरा), काकुळतीचा आणि स्वीकार करणारा भाव - "वक्त ने किया (चित्रपट कागज के फूल), नाजूक आणि मृदू भाव - "हवा धीरे आना" (चित्रपट सुजाता) उत्साही आणि उसळी घेणारा भाव - "दो चमकती आँखों में" ( चित्रपट डिटेक्टीव), हलका फुलका आणि प्रेमपूर्वक खट्याळभाव - "कैसा जादू बालम तूने डाला" (चित्रपट १२ ओ क्लॉक), फक्त शब्दोच्चारात विनोदी व गायन नेहमीचे - " ये है बॉंबे मेरी जान" (चित्रपट सी. आय. डी. ) तसेच "जाने क्या तुने कही" (चित्रपट प्यासा) हे गीत आशंका आणि प्रेमभरल्या भावनांचे आहे आणि अतिशय सौम्य तक्रारीच्या सुरांत गायले असल्याने, चटका लावून जाते. "साहेब बिबी और गुलाम" चित्रपटातील तिन्ही गाण्यांचा संक्षेपाने उल्लेख करायला हवा. १) "पिया ऐसो जिया में" - हे साधे गीत खेड्यातील वातावरणाचा गंध घेऊन येणाऱ्या स्त्री गीतांच्या वर्गात मोडेल. अशिक्षित आवाजाचे साधेपण गायनात आणून गीताची परिणामकारकता सुंदरपणे वाढवली आहे. २) "चले आओ" हे गीत पठण आणि गायन, या दोहोंचा अंतर्भाव करून उभे राहिले आहे. ३) "न जाओ सैंय्या" यात कारुण्य आणि शोक भाव सापडतात पण ते देखील अंतर्मुखी आणि व्याकुळ सुरात प्रगट होतात. मुद्दामून उल्लेख करण्याची बाब म्हणजे, ही तिन्ही गीते सादर करताना, आवाजात शहरी संस्कृतीचे गुण अजिबात ऐकायला मिळत नाहीत. 
नाइट क्लब गीते:
चमकदार, उर्जायुक्त, किंचित प्रमाणात स्वरेलपणास बाहेर ढकलणारे आवाज आणि त्यांचे लगाव, ही अशा प्रकारच्या गाण्यांची खास लक्षणे म्हणता येतील. यात आणखी खास बाब म्हणजे आवाजाने मींड घ्यावी पण मान्य स्वरांतरांच्या मधल्या बिंदूंना हळूच स्पर्श करीत खाली यावे. तसेच आघातापूर्ण लयबद्ध गायन देखील अत्यावश्यक असते. त्यात आणखी भर घालायची झाल्यास, मुद्दामून बिघडवले उच्चार आणि शब्दांची अपभ्रंश फेक तसेच स्वरांत आवश्यक तितके आवाहकत्व जेणेकरून समोरच्याला नृत्य करण्यास प्रवृत्त करावे. या गायिकेने अशी गाणी फार सुरेखरीत्या गायली आहेत. 
"सुनो गजर क्या गाये" (चित्रपट बाझी) हे सुरवातीच्या काळातील गीत. वास्तविक यात भूल घालण्याचे किंवा वशीकरण करण्याचे परिणाम स्पष्ट नाहीत पण पुढील विस्ताराच्या पाऊलखुणा आढळतात. "मेरा नाम चिन चिन चिन" (चित्रपट हावरा ब्रिज) "जाता कहां हैं दिवाने" (चित्रपट सी.आय.डी.) दुसऱ्या रचनेत मिस्कीलपणा आणि मुश्किलपणा देखील दिसून येतो. यात द्रुतगती तसेच वशीकरणासाठी योजलेल्या सुरावटीचा मादकपणा सांभाळायचा, अशी दुहेरी कसरत आहे. 
सुश्राव्य आणि जुळवून घेणारी युगुलगीते:
सर्वसाधारणपणे युगुलगीते म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री स्वर - यांनी एकानंतर पद्धतीने किंवा एकत्रित पद्धतीने सादर केलेली गीतें. यात कधीकधी सामूहिक स्वरांचा देखील अंतर्भाव होतो. यातील वेधक बाब म्हणजे स्त्री आणि पुरुष एकमेकांना गुणवत्तापूर्ण प्रतिसाद देत असतात. अशा गायनात साधारणपणे तीन प्रकारचे प्रतिसाद दिलेले आढळतात. 
१) "मुझको जो तुम मिले" (चित्रपट डिटेक्टीव) हेमंतकुमार आणि गीता दत्त यांनी सादर केलेली रचना. या गीतात लालित्यपूर्ण दादरा तालात दोघांनी सावरेल आणि किंचित कंपायमान आवाज लावले आहेत. याशिवाय आणखी सुंदर उदाहरण घ्यायचे झाल्यास, "ना ये चाँद होगा" (चित्रपट शर्त). सध्या चालीच्या या गीतात सफाईदार गायनाने प्रेमिकांची एकमेकांविषयी असलेली टिकाऊ प्रीती व्यक्त होते. 
२) "तूने मेरा दिल ले लिया(चित्रपट शरारत) या गाण्यात किशोर कुमार आणि गीता दत्त यांनी मोकळेपणाने, काहीशा थिल्लर आवाजात आणि शब्दांती आंदोलित लगावाने गायले आहे. "दे भी चुके हम" (चित्रपट जाल) याही गीतात मौजमजा व्यक्त होते. या रचनेत शिट्टीचा स्वन, गद्यात उद्गार, सर्वप्रकारची हुंकारयुक्त फेक आणि इतर विशेषांनी कॉमिक वातावरणात भर टाकतात. 
३) "दिल से दिल टकराया" ( चित्रपट लव्ह मॅरेज) गायक गीता दत्त आणि रफी. उच्चारण आणि प्रक्षेपण यांत नाट्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करून गरीमायुक्त, दणदणीत आणि कारागिरीपूर्ण आविष्कारात असलेल्या तालांचे प्रक्षेपण असून सुरेख प्रतिसाद देतात.  असाच अनुभव "जाने कहा मेरा जिगर" आणि "उधर तुम हसीन हो" (चित्रपट मिस्टर अँड मिसेस ५५) या रचनांत आहे. 
इतर प्रकारची परिणामकारक गीते: 
"बाबूजी धीरे चलना" आणि " ये लो मैं हारी पिया" (चित्रपट आर पार) ही गाणी चमकदार आणि हलकेफुलके आहेत.  यांत रंगतदार उच्चारण आहे आणि ते देखील रंगतदार पद्धतीने केलेले आहे. आपल्या सुजाण अपभ्रंशातून गीता, गाण्यातील वाद्यमेळाला प्रतिसाद देते. "ठंडी हवा काली घटा" (चित्रपट मिस्टर अँड मिसेस ५५) हे गीत अपेक्षा निर्माण करणारे आहे. जास्त काही भावनात्मक न करता गीता दत्त शांत आणि आत्मविश्वासाने गीत उभे करते. "ऐ दिल मुझे बता दे" (चित्रपट भाई भाई) हे गीत, खेळकर वृत्तीने आतल्या प्रेमाला पाहणारे पण गंभीर अंतर्मुखतेने नव्हे. द्रुत गतीने हे गाणे पुढे चालत असते. "ला ला ला" सारखे स्वरहुंकार व्यवस्थितपणे सादर केले आहेत. 
रागदारी पद्धतीची गाणी: 
रागदारी पद्धतीची गाणी कुठली हे तपासताना, एकूणच फारशी गाणी ऐकायला मिळत नाहीत. पण त्याकडे झुकाव असलेल्या काही रचना सापडतात. उदाहरणार्थ "देखो जादूभरे तोरे नैन" (चित्रपट आसमान) हे गीत द्रुत तीनतालात असून, गौडसारंग, तिलंग इत्यादी रागांच्या क्षेत्रांत स्वररचना फिरते. या रचनेत अनेक शास्त्रोक्त संगीतनियमांना नीटपणे बाजूला सारले आहे आणि ते कार्य गीता दत्तने समर्थपणे पार पाडले आहे. दुसरी एक रचना - "बाट चलत" (चित्रपट लडकी) - रचना थेट पारंपरिक भैरवी "बंदिश की ठुमरी" या अंगाने बांधली आहे. इथे मात्र सरगम गाताना चाचपडल्याची भावना होते. 
खरे सांगायचे झाल्यास, गीता दत्त अशा प्रकारच्या गायनासाठी नव्हती हेच खरे आणि हीच तिच्या गळ्याची खरी मर्यादा.  

Tuesday, 17 July 2018

नेल्सन मंडेला - जन्मशताब्दी

माझा नेल्सन मंडेलांशी थेट संबंध कधीच आला नाही, येण्याचे काहीही कारणच नव्हते. एकतर मी दक्षिण आफ्रिकेत १९९४ सालच्या मार्चमधील निवडणुका संपल्यावर गेलो होतो. नुकताच मंडेलांचा राज्यरोहण समारंभ पार पडला होता. दुसरे कारण म्हणजे मंडेला राहायचे, एकतर जोहान्सबर्ग/प्रिटोरिया किंवा केप टाऊन मध्ये तर मी त्यावेळी पीटरमेरिट्झबर्ग मध्ये!! देशात मी संपूर्णपणे नव्याने प्रवेश केलेला. 
अर्थात नव्या राजवटीचे पडसाद हळूहळू समाजात पसरायला लागले होते. लोकांच्यात नवी स्वप्ने, नवा आनंद दिसून येत होता. एक मात्र नक्की, जरी वंशभेद कायद्यान्वये संपला असला तरी लोकांच्या मनातून गेलेला नव्हता. खरेतर पुढील जुळपास ४,५ वर्षांत तो तसाच राहिला होता. 
एके रात्री मी काही मित्रांसमवेत एका हॉटेलात (पूर्वी काळातील गोऱ्या वंशाचे) गेलो असताना, मिळालेली नकारात्मक वागणूक, ही मला चपराकच होती. माझ्या पूर्वीच्या लेखांत त्याबद्दल सविस्तर वर्णन केले असल्याने, इथे पुनरुक्ती नको. असो, तेंव्हा सांगायचं मुद्दा असा, वातावरणात नव्या स्वातंत्र्याचे वारे भरले होते. १०४७ साली, भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेंव्हाची परिस्थिती जेंव्हा मी वाचली तेंव्हा जे मनावर चित्र उमटले होते, त्याचेच तंतोतंत चित्र मला १९९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत बघायला मिळाले. 
सुदैवाने, नेल्सन मंडेला अतिशय व्यवहारी असल्याने, त्यांनी मंत्रिमंडळ तयार करतानाच, पूर्वकालीन गोऱ्या राजवटीतील अनुभवसिद्ध गोऱ्या लोकांना नव्याने सामावून घेतले. ते अर्थातच जरुरीचे होते. कारण काळ्या लोकांना राज्य चालवण्याचा कसलाच अनुभव नव्हता. विशेषतः: उपाध्यक्ष म्हणून "डी क्लर्क" यांची नेमणूक केली - ही व्यक्ती पूर्वाश्रमीच्या मंत्रिमंडळात अध्यक्ष होते. इतर अनेक महत्वाच्या खात्यांचा अधिभार त्यांनी गोऱ्या लोकांकडेच सोपवला होता. उदारमतवादी धोरणाचे सुरेख उदाहरण म्हणून म्हणायला हवे. 
पहिली ३,४ वर्षे तरी देशात कसलाच गोंधळ उडाला नव्हता. वास्तविक पहाता, इतर आफ्रिकन देशातील अनुभव बघता, दक्षिण आफ्रिकेत हिंसाचाराचा आगडोंब उसळणे अशक्य नव्हते. नवीन राजवट आली तरीही अतिशय शांततेने सगळं बदल झाला आणि हळूहळू स्थिरावला गेला आणि याचे सगळे श्रेय नेल्सन मंडेला यांच्याच कडे जाते. जुन्या राजवटीतील मंत्र्यांना देखील तशीच सहानुभूतीपूर्वक वागणूक दिली. त्यांच्या खात्यात कधीही फारसा हस्तक्षेप केला नाही. अर्थात सगळेच सुंदर होते, असे नक्कीच म्हणता येणार नाही. 
गोऱ्या लोकांचे काही गैरव्यवहार नंतर उघडकीस आले. त्याचीच परिणीती काळ्या लोकांवर झाली आणि हळूहळू भ्रष्टाचार पसरायला लागला. दुर्दैवाने, नेल्सन मंडेलांच्याच काळात, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उभे राहायला लागले होते, इतके की संध्याकाळी ऑफिस वेळ संपल्यावर जोहान्सबर्गमध्ये रस्त्यावरून पायी हिंडणे अवघड होऊ लागले. हे मंडेलांचे  ठळक अपयश म्हणायला हवे. आर्थिक व्यवस्था खालावायला लागली होती. मंडेलांनीच, पुढे  "Black Empowerment" कायदा पास झाला, त्याचा पाया घातला होता  पण त्याचीच कडू फळे तुरळक का होईना दिसायला लागली होती. गोरा समाज आणि काळा समाज, यामधील आर्थिक दरी वाढायला लागली होती आणि समाजात असंतोष वाढायला लागला होता. 
वास्तविक पहाता, आता कुणीही स्थानिक रहिवासी, मनात येईल तिथे घर, कॉलेजमध्ये प्रवेश, हवी तिथे नोकरी इत्यादी सुखसोयी उपभोगायला मुक्त होता पण मुळात आर्थिक चणचण कमालीची असल्याने काळ्या लोकांच्या मनातील उद्रेक अधूनमधून उफाळत होता. स्वातंत्र्य मिळून केवळ ४,५ वर्षेच झाली होती आणि तितक्या काळातच,विशेषतः: स्थानिक भारतीय लोकांच्यात "पूर्वीची राजवट बरी होती" असे मतपरिवर्तन व्हायला लागले होते - जरी उघडपणे व्यक्त होत नसले तरी अनेक घरगुती समारंभात व्यक्त होत असे आणि याचा मी साक्षीदार होतो. हे देखील मंडेलांच्या नावावर अपयश मांडायला हवे. 
मुळात काळा समाज हा नेहमीच उग्र स्वभावाचा - कुठे, कधी उद्रेक होईल, हे सांगता येत नाही. जे इतर आफ्रिकन देशांत घडत असते त्याचीच छोटी आवृत्ती दक्षिण आफ्रिकेत क्षीणपणे का होईना व्यक्त होत होती. 
मंडेलांना देशाच्या आर्थिक परिस्थितीची वाजवी जाण होती आणि आपली करन्सी मजबूत व्हावी म्हणून त्यांनी अनेक पावले उचलली होती परंतु हळूहळू ठिगळ पडत होते. एक कारण असे देखील देता येईल, मंत्रिमंडळातील गोऱ्या लोकांनी जितके सहाय्य्य देणे अपेक्षित होते तितके मंडेलांना मिळाले नाही आणि काळ्या लोकांना अनुभव कमीच असल्याने, ती बाजू देखील लंगडीच होती. असे असून देखील त्यांनी तक्रारीचा कुठेही पाढा वाचला नाही किंवा मागील राजवटीला दोष दिला नाही. 
आज जी परिस्थिती दक्षिण आफ्रिकेत आहे, त्याची सुरवात मंडेलांच्या काळातच सुरु झाली होती. याचे परिणाम म्हणजे त्यांच्या राजकीय पक्षाचा घटत चाललेला पाठिंबा - पण हे घडणारच होते, केवळ  लोकांना सुविधा दिल्या म्हणजे परिस्थितीत बदल होतो, हा भाबडा समज फार बोकाळला. माणूस सुधारण्याचे प्रयत्नच झाले नाहीत आणि त्याचा दुष्परिणाम फार दूरगामी होतो. आताचे चित्र यालाच पुष्टी देते. आजच्या परिस्थितीला काही प्रमाणात मंडेला जबाबदार नक्कीच आहेत. सत्ता आल्यावर तिचा वापर करताना काही प्रमाणात तुम्हाला कठोर वागणे क्रमप्राप्तच असते. काळ्या लोकांना तळागाळातून वर आणणे आवश्यकच होते, त्यासाठी त्यांना सुविधा देणे योग्य होते परंतु त्या सुविधा कितपत परिणामकारक ठरत आहेत, हे तपासण्याची कसलीच यंत्रणा उभी केली नाही- हा भाबडेपणा झाला. केवळ कायदे केले म्हणजे सर्व काही सुव्यवस्थित होईल, हे मानले गेले!! याचा दुष्परिणाम झाल्याशिवाय कसे राहील? वास्तविक काळा समाज म्हणजे आपला समाज. तेंव्हा आपल्या समाजाबाबत मंडेलांना व्यावहारिक दृष्टी दाखवायला हवी होती. आपला समाज कसा आहे? याची समज त्यांना नसणार तर कुणाला असणार. असे असताना देखील, कायदे तयार करणे आणि त्याच कायद्यांची परिणामकारकता तपासणे, याबाबत मंडेला कमी पडले आणि पुढील काळ्या अध्यक्षांनी त्यांचीच "री" ओढली!!  
असे असले तरी, दक्षिण आफ्रिकेचे सुदैव असे की, जेंव्हा सत्तापालट झाला तेंव्हा त्या देशाला मंडेला सारखा सहिष्णू, समंजस आणि व्यवहारी नेता मिळाला. त्यामुळेच नव्या राजवटीत कुठेही अनागोंदी झाली नाही आणि संक्रमण शांततेत पार पडले. 
इतर आफ्रिकन देशांचा अनुभव बघता, मंडेला यांचे नेतृत्व खरोखरच प्रेरणादायी असेच म्हणायला हवे.