अनेक
संगीत-संबद्ध क्षेत्रात सहज विहार करणारा आणखी एक बंगाली संगीतकार म्हणून
अभिमानाने उदाहरण देण्यासारख्या कलांकारात हेमंतकुमार यांचा नक्कीच समावेश
करावा लागेल. इथे आपण गायक आणि संगीतकार, या दोन्ही पातळ्यांवर वावरताना
दाखवलेली सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता, यांचे विश्लेषण करणार आहोत. ते
आधुनिक बंगाली गीते, बंगाली चित्रपटसंगीत, हिंदी चित्रपटसंगीत स्वतः: गात व
त्यांची स्वररचना देखील करीत असत. याशिवाय आपल्या सादरीकरणातून
रवींद्रसंगीताचा प्रसार आणि गायन करून, याही क्षेत्रात त्यांनी महत्वाचे
कार्य केलेले आहे. याखेरीज विचारणीय बाब अशी, की गायक म्हणून वाटचाल करायला
सुरवात केली तेंव्हा बांगला गान आणि रवींद्रसंगीत प्रभावीपणाने सादर
करणारे दुसरे अनेक कलाकार होते आणि तरीही हेमंतकुमारांनी आपला स्वतः:चा
निश्चित असा ठसा उमटवला.
आपण आधी गायक म्हणून त्यांचे
कर्तृत्व विचारात घेऊ. एक पार्श्वगायक म्हणून अपेक्षेनुसार त्यांनी विविध
प्रकारच्या रचना गायल्या आहेत. हेमंतकुमारांचा आवाज रुंद असला तरी ढाला
म्हणता येणार नाही. त्यात एक सूक्ष्म ध्वनिकंप देखील आहे. त्यामुळे त्यांना
एका खास भावपूर्णतेचा स्पर्श निर्माण करणे चांगले जमले. आवाजातील कंपामुळे
काहीवेळा स्वर लगाव थरथरता वाटलं तरी एकंदरीने गायन सुरेल म्हणूनच प्रतीत
होते. काही वेळा स्वरकेंद्रापासून ढळणे अर्थातच फायद्याचे ठरते. छोट्या
स्वरसमूहांची द्रुत फेक त्यांचा आवाज सक्षमतेने करतो. थोडक्यात आवाजाचे
वर्णन म्हणून करायचे झाल्यास, भारदस्तपणे संथ असे करता येईल. काही
गीतांच्या गायनात ज्याला "अप्पर रजिस्टर" म्हणतात, तो लगाव वापरून, त्यांनी
गती साधली आहे. पण अशा वेळी आवाज कोता आणि कमताकद वाटतो आणि संगीताशय
खात्रीपूर्वक पोहोचत नाही. एकंदर असे म्हणता येईल, या गायकास सूक्ष्म
स्वरेलपणाची आवड आहे व पुष्कळ सादरीकरणात या आवाजाला भरीव फेक जमते. इतर
काही बंगाली गायकांच्या तुलनेत त्यांच्या हिंदी चित्रपटगीतांच्या गायनात
बंगाली छापाचा उच्चार कमी जाणवतो पण मन्ना डे त्यांच्याइतका तो खुला देखील
नाही. एक वैशिष्ट्य आणखी सांगता येईल - "ओ" या स्वरवर्णाच्या उत्पादनाची
छाया एकूणच सगळ्या गायनात अधिक जाणवते.Wednesday, 13 June 2018
हेमंत कुमार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment