अरुण दाते यांचे नुकतेच
निधन झाले असल्याकारणाने त्यांच्याबद्दल तटस्थपणे लिहिणे थोडेसे अवघड
होणार आहे पण तरीही त्रयस्थपणे लिहिण्याचा प्रयत्न राहील. या लेखात गायक
म्हणून अरुण दात्यांचे वैशिष्ट्य आणि मर्यादा देखील , याचे विवेचन करणार
आहे. एक तर बाब स्पष्ट आहे, कुठलाही कलाकार/ गायक घेतला तरी तो एका विशिष्ट
परिप्रेक्षातच लक्षणीय असतो. त्याच्या कलेला मर्यादांचा परीघ नेहमीच असतो.
बरेचवेळा याच गोष्टीचे भान विसरले जाते आणि कौतुक करण्याच्या प्रयत्नात
वाहवले जातात. अरुण दात्यांचा आवाज कसा होता, हे आपण मूल्यमापनाच्या
संदर्भात लक्षात घेतले म्हणजे मग त्यांनी गायलेल्या गाण्याचे यथायोग्य
विश्लेषण करता येऊ शकेल. आवाज काहीसा रुंद पण ढाला म्हणता येणार नाही.
त्यात एक सूक्ष्म ध्वनिकंप आहे. त्यामुळे सादरीकरणात खास भावपूर्णतेचा
स्पर्श निर्माण करणे चांगले जमले. आवाजातील कंपामुळे काही वेळा स्वर लागावं
थरथरता वाटलं तरी गायन सुरेल नक्कीच म्हणता येईल. स्वरकेंद्रापासून ढळणे
हे काही वेळा फायद्याचे ठरले. छोट्या स्वरसमूहांची द्रुत फेक त्यांचा आवाज
सक्षमतेने करतो. बरेचवेळा आवाजाच्या गतीचे वर्णन भारदस्तपणे संथ असे करता
येईल. काही गीतांच्या संदर्भात ज्याला "अप्पर रजिस्टर" म्हणता तो लागावं
वापरून गती साधली आहे परंतु ते रजिस्टर नीट विकसित झाले आहे, असे म्हणवत
नाही. गायकास स्वरेलपणाची योद्धा आहे आणि पुष्कळ रचना सादर करताना, त्या
सादरीकरणात भरीव फेक जमली असे सार्थपणे म्हणता येते.
आणखी एक
वैशिष्ट्य निश्चितपणे मांडता येईल. आवाज कोमलमधुर, अंत:स्पर्शी, अंतर्मुख,
काहीसे उदास आणि अनाक्रमक असे गायन आहे. बालपण इंदोर सारख्या सरंजामी
वातावरणात गेल्याने तसेच बालपणी कुमार गंधर्वांसारख्या अनोख्या गायकाखाली
मार्गदर्शन मिळाल्याने, गायनात भारदस्तपणा येणे, हा योगायोग निश्चित म्हणता
येणार नाही. एक बाब निश्चितपणे मांडता येईल. अरुण दात्यांनी आपला गळा
ओळखला होता आणि त्या जातकुळीला ओळखूनच त्यांनी आयुष्यभर गायन केले. आवाजाला
निश्चित मर्यादा होत्या. मघाशी मी म्हटल्याप्रमाणे मूल्यमापन करताना
आपल्याला दोन परिप्रेक्षा ध्यानात घ्यायला हव्या. १) सामाजिक-सांस्कृतिक,
आणि २) सौंदर्यशास्त्रीय. आता सांस्कृतिक नजरेतून बघायचे झाल्यास, वर
निर्देशित केल्याप्रमाणे आवाजाला मर्यादा होत्या त्यामुळे गाण्यांमध्ये
विस्तृत अशी विविधता नव्हती. तशी विविधता दाखवणे हा त्यांच्या गळ्याचा
धर्मच नव्हता. त्यामुळे जनसंगीतात अवतरणाऱ्या धर्मसंगीत किंवा लोकसंगीत, या
कोटींतील गायन जवळपास अशक्य असे होते. Monday, 7 May 2018
अरुण दाते
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment