संध्याकाळची रम्य प्रणयी वेळ, मोकळ्या मैदानावर एक राजहंसी, राजस जोडपे एकत्र आलेले. अव्यक्त शब्दातून भावना व्यक्त करीत गुंजारव करणारे. काहीसे अधिरे असल्याचे थरथरणाऱ्या अधरांतून जाणवत असताना, मुग्धतेची ग्वाही देणारे. जशी संध्याकाळ उलटायला लागते, तशी प्रेयसीच्या मनाची घालमेल आणि निघण्याची धडपड.
"जें मत्त फुलांच्या कोषांतून पाझरले,
निळ्या लाघवी दंवांत उलगडले,
जें मोरपिसांवर सांवरले,
ते - त्याहुनही - आज कुठेंसे
पुन्हा एकदां
तशाच एका लजवंतीच्या
डोळ्यांमध्ये - डोळ्यांपाशी --
झनन-झांजरें मी पाहिलें…….
सुप्रसिद्ध कवी, पु.शि. रेग्यांच्या या अप्रतिम ओळींतून रेखाटले गेलेले नवथर प्रेयसीची चित्र जणू काही, चित्रपटातील मधुबालाच्या भावनाच व्यक्त करते. खरतर या कवितेत, "झनन-झांजरें", "ठिबक-ठाकडे" सारखे काहीसे अर्थशुन्य वापरून, अर्थपूर्ण अभिव्यक्ती सादर केली.
१९५६ साली आलेल्या "राजहठ" सिनेमातील हे गाणे, काहीसे अप्रसिद्ध पण तरीही अतिशय गोड चालीचे गाणे. मधुबाला, प्रदीप कुमार, सोहराब मोदी, मुराद इत्यादी अभिनेते या चित्रपटात आहेत. कथावस्तू अगदी सरधोपट, साधी आहे. दोन राजघराण्यातील वैर आणि त्यात होरपळले जाणारे प्रेम, याभोवती चित्रपट गुंफला आहे. अर्थात अभिनयाचा भाग हा बराचसा मधुबालाने उचलला आहे. सोहराब मोदी काही प्रसंगात उठून दिसतात पण प्रभाव तात्कालिक ठरतो. त्याकाळात बहुतेक चित्रपट हे त्यातील गाण्यांवर तगलेले आहेत आणि हा चित्रपट अजिबात अपवाद नाही. शंकर/जयकिशन या जोडीने,चित्रपटातील गाणी केली आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीत मोलाची भर टाकणारी कामगिरी आहे.
संगीतकार म्हणून शंकर/जयकिशन यांच्याकडे बघायचे झाल्यास, त्यांच्या कारकिर्दीचे काही ठराविक टप्पे आहेत. १] राजकपूर, २] राजेंद्र कुमार, ३] शम्मी कपूर आणि ४] इतर चित्रपट. या जोडीची खासियत अशी, त्यांनी वरील तिन्ही अभिनेत्यांच्या शैलीनुसार गाणी तयार केली परंतु इतरत्र त्यांनी जे चित्रपट केले, ती गाणी या सगळ्यांच्या चित्रपटापेक्षा वेगळ्या शैलीने केली आणि आपल्या सर्जनशीलतेचा असामान्य दाखला दिला. या दृष्टीने विचार करता, हिंदी चित्रपट गीतांच्या इतिहासात यांचे नाव निश्चितपणे फार वरच्या श्रेणीत बसवावे लागेल. अर्थात जशी कारकीर्द दीर्घ होते तिथे गाण्यांच्या दर्जात कमअस्सल फरक हा नेहमीच पडत राहतो आणि तसा फरक यांच्या बाबतीत स्पष्टपणे बाजूला काढता येतो.
आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, शायर हसरत जयपुरी यांची शब्दकळा आहे. कविता म्हणून वाचायला गेल्यास, ओळींतील लय लगेच तोंडवळणी होते. चित्रपट गीतांसाठी अशा शब्दांची खरी आवश्यकता असते. हसरत जयपुरी शायर म्हणून फारसे वरच्या श्रेणीत कधी गणले नाहीत पण तरीही शब्दांचा दर्जा, एका विविक्षित दर्जाच्या खाली देखील कधी घसरू दिला नाही. सहज, सुलभ शब्दरचना, हेच बहुतांशी त्यांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य कायम राहिले. गेयताबद्ध शब्दरचना करणे, हेच त्यांचे प्रमाणभूत काम, असे म्हणता येईल.
गाण्याची सुरवात दीर्घ हुंकाराने होते पण त्या हुंकारातच चालीच्या रचनेची बीजे दडली आहेत. वास्तविक रफीच्या गळ्याची जातकुळी बघत, नैसर्गिक मर्दानी, दीर्घ पल्ल्याचा आवाज. तसे असून देखील हा हुंकार आलापीच्या अंगाने खालच्या पट्टीत घेतलेला आहे. बागेश्री रागाची किंचित छाया आहे पण तरी देखील चालीची सुरवात म्हणून स्वतंत्र आहे. दादरा तालाची योजना आहे पण अगदी खालच्या अंगाने वादन केले आहे. परिणाम असा, रफीचे गायन आणि हसरत जयपुरी यांचे शब्द, दोघांचा आस्वाद सहजशक्य होतो.
आता तांत्रिक शब्द योजायचे झाल्यास, गाण्याची "स्थायी" म्हणजे ध्रुवपद ऐकताना, "आ" शब्द घेताना "गंधार + मध्यम" घेतले आहेत तर पुढे "ये" शब्द "धैवत" स्वरावर स्थिरावला आहे. बागेश्री रागाची छटा या सुरांतून अधिक स्पष्ट मिळते.
आता लालित्याच्या अंगाने बघायला गेल्यास, नुकतीच प्रेयसी भेटून परतत असताना, मनाला जाणवणाऱ्या विषादाची ही रचना आहे. असले प्रसंग हिंदी चित्रपटात असंख्य बघायला मिळतात पण तरीही रसिकांच्या ध्यानात राहतात, याचे प्रमुख कारण, पार्श्वभागी ऐकायला मिळणारी अप्रतिम गाणी. हाच प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन, संगीतकाराने तर्ज बांधली आहे.
आये बहार बन के लुभाकर चले गये
क्या राज था जो दिल में छुपाकर चले गये
या स्थायी नंतरचे वाद्यमेळाचे संगीत, प्रामुख्याने व्हायोलीन वाद्यावर घेतलेले आहे आणि ती सुरावट जरा बारकाईने ऐकली तर काहीशी पाश्चात्य धाटणी आढळते!! संगीतकाराची प्रयोगशीलता अशीच सिद्ध होत असते. वेगळ्या अंगाने बांधलेली धून देखील, परत मूळ चालीशी नेमकेपणी जोडून घेणे, हे फार कौशल्याचे काम आहे. या ओळी गाताना रफीने देखील काही शब्द इतक्या अप्रतिमरीत्या त्याबद्दल त्या गायनाला देखील वेगळी अशी दाद द्यावीशी वाटते. जिथे शब्दांवर योग्य "वजन" द्यायला हवे, तिथेच रफीने आपल्या गायनाची करामत दाखवली आहे. "छुपाकर" म्हणताना, आवाजात किंचित थरथर आणली आहे आणि त्यामुळे गाण्यात, शब्दांच्या पलीकडले भाव दिसायला लागतात.
कहने को वो हसीन थी आंखे थी बेवफा
दामन मेरी नजर से बचाकर चले गये
आये बहार बन के लुभाकर चले गये
हा पहिला अंतरा, दोन वेळा घेतला आहे. शब्दकळा गझलेच्या वजनात लिहिली गेली आहे आणि गायन देखील त्याच अंगाने केले गेले आहे. पहिली ओळ, स्थायी रचनेशी नाते सांगत गायली जाते परंतु परत तीच ओळ वरच्या पट्टीत गायली जात, गाताना बागेश्री मधील "ग म म(तीव्र)" (एक गंमत - राग बागेश्री मध्ये "तीव्र मध्यम" स्वराला जागा नाही, पण तरीही इथे बसवला आहे!!) अशा सुरांवरून गायन हिंडते. रफी गायक म्हणून किती श्रेष्ठ आहे, हेच या ओळीच्या गायनातून समजून घेता येते. खास अवलोकण्याचा भाग असा आहे, ही ओळ झाल्यावर, दुसरी ओळ परत मूळ चालीशी संलग्न होते. हा सगळा सांगीतिक प्रवास खरच फार विलोभनीय आहे. रागाच्या सावलीत राहून, चालीचे स्वतंत्र अस्तित्व कसे टिकवायचे, याचा हे गाणे म्हणजे आदीनमुना आहे.
इतना मुझे बताओ मेरे दिल की धडकनो
वो कौन थे जो ख्वाब दिखाकर चले गये
आये बहार बन के लुभाकर चले गये
हा दुसरा आणि शेवटचा अंतरा तांत्रिक अंगाने तसाच बांधला आहे. सुतराम फरक केलेला नाही. बहुदा असे असावे, आधीची स्वररचना रसिकांच्या मनावर गडद परिणाम घडवून आणण्यासाठी, तोच स्वरबंध स्वीकारला असावा. अन्यथा दुसरे कुठलेच कारण संय्युक्तिक असे दिसत नाही. गायक म्हणून रफीच्या गायनाचा दर्जा इथे सुरेख दिसून येतो. बरेच ठिकाणी, रफी गाताना काही "गिमिक्स" घेण्याच्या नादात वाहवत जातो पण इथे मात्र संपूर्णपणे संयमित आविष्कार आहे. लयबद्ध शब्दकळेचा अतिशय योग्य मान राखून, कुठेही अकारण गळा भिरकावलेला नाही. याचा परिणाम, आपल्याला रचनेचा एकसंधपणा ऐकायला मिळतो वरच्या सुरांत जाताना देखील, मर्यादित स्तरावर गायकी ठेवल्याने, शब्दांतील आशय नेमक्या सुरांतून व्यक्त केला गेला आहे. शब्दांतून भावनेचे जे औचित्य राखले गेले आहे, त्याला रफीने आपल्या संयमित गायनाने अधिक सुंदर केले आहे.
संगीतकार म्हणून शंकर/जयकिशन यांचे मूल्यमापन करायचे झाल्यास, त्यांची रचनादृष्टी इतकी चित्रपट - अंगाची होती, की चित्रित दृश्यास आवश्यक आपल्या ध्वनिमुद्रित रचनांतही योग्य तसे बदल करण्यास, त्यांनी मागे-पुढे बघितले नाही. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे वाद्यवृंदावरील नियंत्रण. तसेच त्यांनी केलेल्या कामांतील विविधता अभ्यासण्यासारखी आहे. रागसंगीताबाबत दोन टोके दिसतात. काही रचना, सरळ सरळ रागाच्या पारंपारिक चौकटीमध्ये बांधल्या आहेत तर काही रचना रागाचा निव्वळ आधार घेऊन, त्या स्वरचौकटीत नव्याने स्वररचना केलेली आढळते. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटातील दृश्यासाठी रचना करणे जेणेकरून, बांधलेले गाणे हा चित्रपटाचा अंगभूत भाग म्हणून निर्देश करता येईल. या सगळ्यातून निष्कर्ष असा निघतो, चित्रपटाची हाताळणी, विषयाचे तारतम्य याला आपल्या रचनांसाठी पायाभूत कच्चा माल समजून, त्यानुसार संगीत रचना केल्या आणि तसे करताना, आपल्यातील सर्जनशीलतेची जाणीव अधिक प्रखर केली. त्यासाठी प्रसंगी पाश्चात्य परंपरेपासून त्यांनी केलेल्या उचलीमधून हिंदी चित्रपट संगीताचा आणखी एक विशेष उभारून वर आला आणि हा मुद्दा, त्यांनी तयार केलेल्या नृत्यगीतांच्या अवकाशात तपासून बघता येतो.
No comments:
Post a Comment