एक उदास संध्याकाळ. हवेतच हुरहूर पसरलेली असते. खोलीतील सगळे वातावरणच विषण्ण आणि कातर झालेले. मन कुरतडत असलेली संध्याकाळ!! सगळे पठाण आपल्या गतस्मृतीत रममाण झालेले आणि त्यामुळे बोलायचा विषय देखील त्यालाच धरुन. अंगापेराने धडधाकट असलेली व्यक्तिमत्वे पण आपल्या अफगाणिस्तान मधील गावाच्या आठवणीत गुंतलेली आणि म्हणून काहीशी हळवी झालेली. पैसा मिळवायचा, याच उद्देशाने घर सोडून दूर बंगालमधील एका खेडे वजा गावात रहात असतात.
प्रसिद्ध कवी, ना. वा.टिळक यांनी एका कवितेत मातृभूमीवर फार सुरेख लिहिले आहे.
"सृष्टी तुला वाहुनी धन्य!! माते,अशी रूपसंपन्न तू निस्तुला
तू कामधेनु! खरी कल्पवल्ली! सदा लोभला लोक सारा तुला;
या वैभवाला तुझ्या पाहुनिया मला स्फूर्ती नृत्यार्थ होते जरी
सामर्थ्य नामी तुझ्या, आर्यभूमी, तसे पाहिले मी न कोठे तरी"
१९६१ साली आलेल्या "काबुलीवाला" चित्रपटातील "ऐ मेरे प्यारे वतन" हे गाणे, काळाच्या ओघात थोडे विस्मरणात गेलेले. सुप्रसिद्ध लेखक, कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या तितक्याच सुप्रसिद्ध कथेवरील हा चित्रपट. आजच्या काळातील भौतिकवादी व्यवस्थेत हा चित्रपट कदाचित "मागासलेला" वाटू शकतो पण मानवी नात्यांची जपणूक आणि नातेसंबंधातील तलम धाग्यांच्या विणीत, या चित्रपटाला आजही तोड नाही. खरतर या सिनेमाचे निर्माते बिमल रॉय आहेत आणि चित्रपट त्यांच्या पठडीतला असून देखील, त्यांनी, या चित्रपटासाठी हेमेन गुप्ता यांना पाचारण केले आणि हेमेन गुप्तांनी देखील या अजरामर कथेला योग्य न्याय दिला.
बलराज सहानी यांनी आयुष्यात अनेक अजरामर भूमिका केल्या आहेत परंतु या चित्रपटातील "काबुलीवाला" केवळ अविस्मरणीय आहे. सगळी कथा, याच माणसाच्या भोवती फिरते आणि बलराज सहानींनी आपल्या underplay शैलीत, या भूमिकेला फारच वरच्या स्तरावर नेउन ठेवले आहे.
आता मी गाण्याकडे वळतो. गाण्याच्या सुरवातीला मेंडोलीन वाद्यावर अरेबिक धाटणीचे स्वर घेतले आहेत आणि चित्रपटात पठाण लोकांचा अंतर्भाव बघता, ते योग्यच आहे. हे गाणे जितके संगीतकार सलिल चौधरी यांचे आहे तितकेच गायक म्हणून मन्नाडे यांचे आहे. इथे थोडे तांत्रिक भागाविषयी दोन शब्द लिहितो.
ऐ मेरे प्यारे वतन ऐ मेरे बिछडे चमन, तुझपे दिल कुर्बान
तू ही मेरी आरझू , तू ही मेरी आबरू तू ही मेरी जान.
गाणे अत्यंत हळव्या मन:स्थितीचे असल्याने, गायनाची बैठक देखील तरल आणि हळव्या सुरांनी मांडलेली आहे. "ऐ मेरे प्यारे वतन" हे शब्द गाताना, "ऐ" अक्षराला "शुद्ध सा" स्वराने तर पुढील "मेरे" या शब्दासाठी मन्नाडे यांनी "कोमल निषाद" स्वर जसा लावला आहे, त्याला तोड नाही. शब्दांतील सगळी आर्तता या स्वरांतून मांडली आहे आणि गाणे एकदम वरच्या स्तरावर जाते. हे गाणे आपण, कधीही सहज जाता-येताना ऐकावे, असे नसून, गाणे ऐकायचे असेल तर स्वस्थचित्त मनाने ऐकायला हवे, तरच या गाण्याची खुमारी कळेल. या एकाच सुराने सगळे गाणे भारून टाकले आहे.
प्रेम धवन यांचे शब्द आहेत आणि त्यांनी नेहमीप्रमाणे साध्या शब्दातून अंतर्मुख करणारा आशय व्यक्त केला आहे. कवितेत, शब्दयोजना करताना, एक प्रकारची अपरिहार्यता येणे फार गरजेचे असते, कविता म्हणून सिद्ध होण्यासाठी. चित्रपटातील नायक, आपले घरदार सोडून परक्या प्रदेशात रहात असताना, होणाऱ्या मनाची व्याकुळता दर्शविणारे गाणे आहे.
तेरे दामन से जो आये, उन हवाओ को सलाम
चूम लू मैं उस जुबां को, जिस पे आया तेरा नाम
सब से प्यारी सुबह तेरी, सब से रंगी तेरी शाम.
एखादा गायक जर का सुरांचे यथार्थ ज्ञान घेऊन आलेला असेल तर गाताना, शब्दांची आवश्यक जाणीव ठेऊन, आशय किती खोल वर्तवू शकतो, हे समजून घेण्यासाठी, पहिल्या अंतरा बारकाईने ऐकणे गरजेचे आहे. "तेरे दामन से जो आये, उन हवाओ को सलाम" ही ओळ गाताना, "दामन से जो आये" हे खास ऐकण्यासारखे आहे. मनाची कातर अवस्था दर्शविण्यासाठी, चालीतील "अरेबिक" ढंग कायम ठेऊन,"आये" हा शब्द कंपायमान सुरांत घेतला आहे. वास्तविक श्रुतींचे गणित, याचे विश्लेषण करू शकेल पण त्यात क्लिष्टता अधिक!! गाण्याची "संस्कृती" ध्यानात घेऊन, गायन कसे करावे, याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे.
मां का दिल बन के कभी सीने से लग जाता हैं तू
और कभी नन्ही सी बेटी बन के याद आता हैं तू
जितना याद आता हैं तू , उतना तडपाता हैं तू.
गाण्यात फारसा वाद्यमेळ नाही. केवळ मेंडोलीनचे व्याकूळ करणारे स्वर आणि तालवाद्य, इतकीच वाद्ये आहेत परंतु मेंडोलीनचे स्वर इतके हळवे आणि कातर आहेत की इथे दुसरे कुठलेही वाद्य "उपरे" ठरले असते. चालीत थोडा फेरफार केला आहे म्हणजे लय तशीच ठेवली आहे पण स्वरांचा "ठेहराव" बदलेला आहे तसेच शब्दोच्चार अधिक संदिग्ध केले आहेत. चित्रपटात, पठाण आणि त्या कुटुंबातील छोटी मुलगी यांच्या नात्याचे वेगवेगळे पदर दाखवले आहेत आणि या गाण्याच्या दरम्यान, बलराज सहानीला आपल्या अफगाणिस्तान मधील लहान मुलीची आठवण येते आणि हीच आठवण "और कभी नन्ही सी बेटी" हे शब्द गाताना खोलवर होते. संगीतकार आणि गायक, दोघेही तितकेच तालेवार असतील तर हाताशी असलेल्या रचनेचे कसे सोने करतात, याचा सुंदर वस्तुपाठ आहे,
छोड कर तेरी जमी को दूर आ पहुचे है हम
फिर भी है यही तमन्ना तेरे जारो की कसम
हम जहां पैदा हुये, उस जगह ही निकले दम.
गाण्याची शब्दकळा बघितली तर प्रत्येक कडव्यात, आशय तसाच ठेऊन, निरनिराळ्या भावनांच्या छटा वाचायला मिळतात. मातृभूमीचा वियोग, पुढे काहीसे प्रतीकात्मक चित्रण पण त्यातही आपल्या मुलीची आठवण आणि शेवटी "हम जहां पैदा हुये, उस जगह ही निकले दम" असे लिहून आयुष्याच्या इतिकर्तव्यतेची असोशी!! वास्तवात कितीजणांना असे भाग्य उपभोगायला मिळते? अत्यंत साध्या शब्दातून आपल्याला खोल अभिव्यक्ती समजून घेता येते आणि हेच गाणे अतिशय अर्थपूर्ण होत जाते.
वास्तविक, सलिल चौधरी यांची ख्याती म्हणजे गाण्यात काहीना काहीतरी वेगळेपण करायचे, प्रसंगी पाश्चात्य सिंफनी संगीताचा आधार घेऊन, रचनेत वैविध्य आणायचे परंतु इथे सगळे गाणे केवळ मेंडोलीन वाद्यावर तोलले आहे. गाण्याची चाल(च) इथे अतिशय गहिरी असल्याने, वाद्यमेळ फारसा वापरलेला नाही आणि याचा परिणाम, गाण्यातील गायन आणि शब्द, या दोन्ही घटकाची अभिव्यक्ती आपल्या मनाला भावते.
गाण्याची चाल तशी सगळ्या अंतऱ्याना सारखीच आहे पण तरीही प्रत्येक ओळीतील "खास" शब्द ध्यानात घेऊन, त्यावर नेमका जोर देऊन, नेमका आशय व्यक्त केला गेला आहे. पहिला अंतरा ऐकताना आपण, "आये" शब्दावरील कंपायमान हरकत ऐकली तर इथे शेवटचा अंतरा ऐकताना, "छोड कर तेरी जमी को" गाताना "जमी" शब्दावर अशीच अर्थपूर्ण हरकत घेतली आहे आणि रचनेतील उदासवाणा भाव अधिक खोल दर्शवला आहे.
संगीतकार म्हणून त्यांचे मूल्यमापन करायचे झाल्यास, काही बाबी विशेषत्वाने ध्यानात घ्याव्याच लागतील. त्यांच्या मनात वैश्विक संगीताची एक धारणा होती आणि त्याच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, त्यांना जे सांगीत निर्णय घ्यावे लागत होते, त्याला बऱ्याच मर्यादा प्राप्त झाल्या होत्या. सुदैवाने सलिल चौधरींची गीतसर्जन शक्ती आपले सौंदर्यपूर्ण सांगीत वर्चस्व मिळवण्यासाठी आवश्यक त्या चैतन्याने भारलेली होती.त्यांचे संगीत ऐकताना अनेक वेळा हिंदी चित्रपटसंगीतात जे संगीत अस्तित्वात होते, त्यापेक्षा टिकाऊ आणि सार्थ संगीतरचना करण्याची इच्छा होती आणि तशी त्यांची क्षमता देखील होती. हे काम कुणालाही सहज पेलणारे नव्हते.
खरेतर गाण्याचे चित्रण यथामुलक आहे, त्यात काही खास "दिग्दर्शकीय" कौशल्य दिसत नाही परंतु कथेच्या अंगाने चित्रीकरण केल्याने, मुळातल्या सखोल आशयाला, अत्यंत साधेपणाचे अप्रतिम अस्तर लाभले आहे. गाणे ऐकताना आणि ऐकून झाल्यावर, आपल्या मनावर खरा ठसा उमटतो, तो मन्नाडे यांच्या व्याकूळ करणाऱ्या सुरांचा आणि तसेच बलराज सहानींच्या भावगर्भार चेहऱ्याचा.