Saturday, 12 January 2013

साउथ आफ्रिका!!

मी जेंव्हा १९९४ साली या देशात प्रथम आलो, तेंव्हा, सम्पूर्ण देशात मी धरून, फक्त ३ कुटुंबीय(माझे कुटुंब!!) राहत होते. त्यातील, एक माझा ओळखीचा, मकरंद फडके, जो जोहानसबर्गला राहत होता(अजूनही तिथेच आहे) आणि डॉ. नेर्लेकर(जे नंतर ऑस्ट्रेलिया इथे गेले!!) हे डर्बन इथे राहत होते. मी डर्बन जवळील पीटरमेरीत्झबर्ग या शहरात राहत होतो. २००० सालानंतर, इथे बऱ्याच भारतीय कंपन्यांनी आपली ऑफिसेस इथे थाटली आणि बरीच मराठी माणसे इथे यायला लागली. आजमितीस, जोहानसबर्ग इथे जवळपास दोनशे तरी कुटुंबे राहत आहेत, त्याशिवाय, डर्बन, केप टाऊन, प्रिटोरिया येथील मराठी कुटुंबे वागली!!इथे आमचे मराठी मंडळ आहे पण ते आपले नावाला!! अरे, कोण कधी कुठल्या गोष्टीला पुढाकार घेतील तर शपथ!! साधे, कुठे पिकनिकला जायचे म्हटले तरी शेकडो कारणे पुढे करतील आणि कार्यक्रम रद्द होईल(नुकताच असा एक कार्यक्रम रद्द झाला!!) प्रत्येकजण, आपण या देशात आलो म्हणजे फार मोठे शौर्य गाजवल्याच्या थाटात वावरत असतो!! त्यामुळे, एकूणच मराठी मंडळ हे नोंदलेले आहे पण काही कामाचे नाही!! अरे, कुठे सहज गप्पा मारायला भेटायचे म्हटले तरी प्रश्न असतो. बर, येणारा प्रत्येकजण स्वत:ला प्रचंड हुशार वगैरे, गुर्मीत वावरत असतो. त्यामुळे, मैत्री अशी फारशी काही जमत नाही. असो, कोळसा किती उगाळायाचा!!
इथे, फिरायला जाण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. उदाहरणार्थ डर्बन आणि केप टाऊन इथले बीचेस!! अप्रतिम, असेच वर्णन करावे लागेल. विशेषत: भारतातील बीचेस नजरेसमोर आणता, हा फरक अजूनही जाणवतो. केप टाऊन तर, टूरिस्त सेंटर म्हणून जगात प्रसिद्धच आहे म्हणा. फोनवर बोललो त्याप्रमाणे, इथे उत्तरेला क्रुगर पार्क म्हणून आफ्रिकन सफारी जगप्रसिद्ध आहे. जवळपास  ८०० स्क्वे. किलोमीटर इतका विस्तीर्ण प्रदेश आहे. तिथले जंगल नित पाहायचे झाल्यास, कमीतकमी ५ ते ६ दिवस हाताशी हवेत. मी तिथे आतापर्यंत दोनदा जाऊन आलो आहे. केप टाऊन मात्र खरोखरच निसर्गरमणीय शहर आहे. केवळ बीचेस नव्हेत पण इतर अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत( अगदी, मुली देखील!!) Table Mountain, Cape of Good Hope, इत्यादी बरीच नावे घेता येतील. अरे, इथे एक Unofficial NUDE beach देखील आहे!! म्हणजे बघ!!
सर्वात मजेचा भाग म्हणजे इथले हवामान!! सध्या इथे उन्हाळा आहे पण, इथे उन्हाळा आणि पावसाळा हे सतत एका मागोमाग फिरत असतात. त्यामुळे, उन्हाचा कडक असा फार जाणवत नाही. अर्थात, डर्बन इथे जरा जाणवतो. डर्बन तसे आपल्या मुंबईसारखेच आहे. अगदी, जून/जुलै च्या कडाक्याच्या थंडीत देखील तुम्ही डर्बन इथे आरामात राहू शकता. जोहानसबर्ग आणि केप टाऊन मात्र थंडीचे आगर!! तापमान, ० किंवा -१ इतके खाली उतरते. ब्लुमफोन्तेन तर, -६ ते -८ पर्यंत खाली जाते!! अर्थात, आता मार्च पासून हवा बदलायला सुरु होईल. मे/जून-जुलै-ओगस्ट हे खरे थंडीचे महिने. इथे गंमत म्हणजे, सध्या जर का सलग ३,४ दिवस गरम उकाडा झाला की लगेच पावसाची सर(अगदी तुरळक देखील!!) येते आणि वातावरण थंड करून जाते, इतकी की रात्री अंगावर गरम पांघरूण घ्यावेच लागते. तसा इथे पावसाळा भारताच्या मानाने कमीच असतो. इतकी वर्षे इथे राहून, मी अजून छत्री घेतलेली नाही!! मुंबईसारखा धोधो पाऊस एकूण कमीच. त्यामुळे, पाणी तुंबले, गाड्या अडकल्या(गाड्या म्हणजे कार्स!!) इथे, एक मोठा प्रश्न आहे व तो म्हणजे, जर का तुझ्याकडे मोटार नसेल तर तू मेलास!! मुंबईसारखी रिक्षा, Taxi वगैरे सोयी फारशा नाहीत. सरकारी बसेस आहेत पण त्या केवळ मोठ्या शहरापुरत्या आणि त्या देखील ठराविक ठिकाणीच जातात. खासगी taxis आहेत, पण सुरक्षेचा प्रश्न भयाण आहे. रेल्वे जवळपास नगण्यच म्हणायला लागेल. मी अजूनही रेल्वेने प्रवास केकेका नाही. धीरच होत नाही!! साधारणपणे, काळे लोक, रेल्वेने प्रवास करतात, मग कोण रेल्वेने जाईल!!Inter City Buses आहेत, म्हणजे Greyhound वगैरे. पण त्यादेखील, एका ठराविक थांब्यापर्यंत!! त्यामुळे, माझ्याइथून केप टाऊन जरी १६०० किलोमीटर लांब असले तरी, मी प्रत्येकवेळेस माझी नाहीतर मित्राची गाडी काढूनच प्रवास केला आहे. रस्ते मात्र खरोखर अप्रतिम!! कितीही लांबचा प्रवास असो, शीण  म्हणून जाणवतच नाही!! मी, दोनदा, इथून केप टाऊनला जाण्यासाठी, रात्री एकला सुरवात केली आणि संध्याकाळी सहापर्यंत तिथे पोहोचलो आहे. त्यात, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण नंतर थोड्यावेळाने, चहा/कॉफी!! आणि, इतका प्रवास होऊन देखील रात्री परत गाडी काढून फिरायला गेलो आहे. मी केवळ Free Way बद्दल लिहित नसून, अगदी आडरस्ते देखील तितकेच अप्रतिम आहेत(अपवाद म्हणून काही रस्ते, भारताची याद आणून देतात!!) 
असो, तसे लिहिण्यासारखे बरेच आहे.

No comments:

Post a Comment