Saturday 1 April 2023

आजचे कुमार गंधर्वांवरील लेख

प्रिय संपादक, आजच्या आपल्या लोकरंग पुरवणीतील प्रस्तुत विषयावरील २ दीर्घ लेख वाचले. बरीच उत्सुकता होती. परंतु काही प्रमाणात निखळ निराशा पदरी पडली, असे माझे मत झाले आहे. मुळात, अतुल देऊळगावकरांनी जागतिक घटनांची जंत्री मांडायचे प्रयोजन काय? हेच कळत नाही. १) कुमार गंधर्वांच्या सांगीतिक कारकिर्दीवर या जागतिक घटनांचा परिणाम झाला, असे सुचवायचे आहे का? तसे असेल तर त्याचे व्यवस्थित विश्लेषण आणि कुमारांच्या सांगीतिक कारकिर्दीवरील परिणामांची मीमांसा होणे गरजेचे होते. २) असे तर नव्हे जागतिक घटनांवर कुमारांच्या संगीताचा प्रभाव पडला,असे सुचवायचे आहे!! हे खूपच अति झाले, असे म्हणायला हवे. तेंव्हा अशा लेखातून नेमके काय सिद्ध करायचे आहे. जागतिक घटना घडतात, त्यावर एखाद्याच व्यक्तीचा प्रभाव असतो, हे फार धाडसी विधान झाले. तसेच सांस्कृतिक बदल - अगदी भारत देशापुरता विचार केला तरी या देशाचे सांस्कृतिक बदल हे काही ठराविक एका कलावंताच्या अस्तित्वाने, विचाराने किंवा कृतीने घडले आहेत, असे अजिबात म्हणवत नाही. मी अतुल देऊळगावकरांचा लेख २,३ वेळा वाचूनही मला त्या लेखाचे प्रयोजन ध्यानात आले नाही. कदाचित माझी आकलनशक्ती तितकी सदृढ नसेलही. आता मुकुंद संगोराम यांच्या लेखातील उल्लेख. कुमार गंधर्वांच्या रागदारी गायनाबाबत कुणालाही संशय व्यक्त करता येणार नाही, इतकी प्रचंड कामगिरी त्यांनी केली आहे आणि यात अजिबात संशय नाही. परंतु "नाट्यगीत","गीतवर्षा" तसेच "गीतहेमंत" या कार्यक्रमातील सांगीतिक रचनांबाबत. वास्तविक रागदारी संगीत आणि उपशास्त्रीय संगीत, हे दोन्ही स्वतंत्र संगीताचे प्रकार आहेत आणि दोन्ही ठिकाणी गायकी ही वेगळ्या स्तरावर वावरत असते. "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी" ही गाणे उदाहरण म्हणून घेतल्यास, गायन करताना, शब्दांची यथेच्छ मोडतोड करून गायले आहे. जर असेच गायचे होते तर मग कविता कशासाठी घ्यायची? नाट्यगीत म्हणजे बंदिश नव्हे. तिथे शब्दांना योग्य ते महत्व द्यावे लागते. वसंतराव देशपांड्यांनी एका कार्यक्रमात सप्रमाण सिद्ध केले होते. "गीत वर्ष" आणि "गीत हेमंत" या कार्यक्रमाबाबत हेच म्हणता येईल. हे शब्दप्रधान संगीत आहे तेंव्हा शब्दांना योग्य ते महत्व देणे अगत्याचे ठरते आणि कुमारांचे शब्दोच्चार हे नेहमीच लडबडीत व्हायचे तसेच "गायकी" दाखवण्याच्या नादात शब्दांची "किंमत" हलकी होते, या कडे फारसे लक्ष दिले गेले नाही. आणखी उदाहरण देतो - कवी अनिलांची कविता - "आज अचानक गाठ पडे.हे गीत ऐकावे, ही ललित संगीतातील स्वररचना आहे, हे ध्यानात घेणे जरुरीचे आहे. कवितेत "अचानक गाठ" पाडण्यातली मजा, गायनातून कधीच दृग्गोचर होत नाही. ऐकायला मिळते ते बंदिशसदृश गायन!! कुमारांनी आपल्या सांगीतिक कल्पनांसाठी कवी अनिलांच्या कवितांचा बाली दिला,असे खेदाने म्हणावेसे वाटते. परंतु कुमार गंधर्वांचा दबदबा इतका की कुणीही या विषयावर सखोल विश्लेषणाने बोलत नाही. यालाच "व्यक्तिपूजा" म्हणतात. मला, प्रभाकर जठारांचा कुमारचा साईबाबा करू नका!! हा लेख आठवला आणि दुर्दैवाने, तशीच परिस्थिती उद्भवली आहे. आपल्याकडे व्यक्तिपूजेचा रोग सगळ्या क्षेत्रात पसरलेला आहे. असंख्य उदाहरणे देता येतील. असो, मला जे मनापासून वाटले, ते इथे तुम्हाला लिहून पाठवले आहे. अनिल गोविलकर

No comments:

Post a Comment