Tuesday 4 April 2023

सांज ये गोकुळी

साधारणपणे मागील शतकात, ८०च्या दशकात, मराठी भावगीतांमध्ये एकप्रकारची "पोकळी" निर्माण झाली होती. काहीच नवीन घडत नव्हते आणि जी नवीन गाणी येत होती, त्यात फारसे नावीन्य नव्हते. वाद्यमेळात देखील तेच जुने "साचे" वापरले जात होते. एकूणच मरगळ आल्यासारखी स्थिती होती. वास्तविक संगीताचा नेहमीच स्वतःचा असा स्वतंत्र प्रवाह असतो आणि प्रवाह जसा पुढे सरकत असतो त्याप्रमाणे रचनेत बदल घडत असतात आणि त्याचीच वानवा होती. अशा वेळेस, "ऋतू हिरवा" हा नवीन गाण्यांचा संच बाजारात आला आणि त्या गाण्याचा बराच बोलबाला व्हायला लागला. गाण्यांत अप्रतिम कविता होत्या (ज्यांना कवितेच्या अंगाने आस्वाद घ्यायचा आहे, त्यांना तर पर्वणी होती) चालींमध्ये आधुनिकपणा तर होताच परंतु वाद्यमेळ, स्वररचना आणि गायन, सगळेच टवटवीत होते. बोरकरांपासून ते नवागत कवी नितिन आखवे, सगळ्या प्रकारच्या कवींना स्थान मिळाले होते. प्रत्येक गाणे, एक कविता म्हणून देखील स्वतंत्रपणे अभ्यासता येत होती. एकूणच हा संच लोकांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाला. प्रत्येक गाण्याचा आशय वेगळा होता तसेच त्याच्याच अनुषंगाने स्वररचना केली गेली होती. संगीतकार श्रीधर फडक्यांनी आपले नाणे खणखणीतपणे सिद्ध केले. "ऋतू हिरवा" मधील गाण्यांनी श्रीधर फडक्यांना मानमरातब, लोकप्रियता मिळाली आणि संगीतकार म्हणून त्यांचे नाव प्रस्थापित झाले. मला वाटते, हृदयनाथ मंगेशकरांच्या नंतर मराठी भावगीतांच्या क्षेत्रात प्रथमच ज्यांना "कवी" म्हणतात ( जे शक्यतो चित्रपट संगीताच्या वाटेला फारसे जात नाहीत!!) अशांच्या कविता स्वरबद्ध झाल्या. याच संचातील "सांज ये गोकुळी" हे गाणे आज ऐकणार आहोत. या गाण्याची एक गंमत खुद्द संगीतकार श्रीधर फडक्यांनीच सांगितली आहे. त्यांच्या मनात प्रथम या गाण्याच्या चालीचा "आराखडा" तयार झाला आणि त्यांनी ती स्वरलिपी कवी सुधीर मोघ्यांकडे पाठवून दिली. कवी म्हणून सुधीर मोघे हे सिद्धहस्त होतेच. चालीचे "वजन" लक्षात घेऊन त्यांनी शब्दरचना लिहिली. आपल्याकडे चालीवर कविता बेतणाऱ्यांची शेलक्या शब्दात संभावना केली जाते, जणू काही तसे करणे, हा अधर्म झाला किंवा गुन्हा झाला!! कोत्या मनोवृत्तीचा हा परिपाक आहे. वास्तविक आपल्यासारख्या रसिकांकडे गाणे येते ते नेहमीच संपूर्णपणे रेकॉर्ड झाल्यावर आणि त्यावेळी अशी चर्चा करणे, हा वृथा खेळ आहे. आपल्या समोर असलेले गाणे काय प्रतीचे आहे, याचीच प्रतवारी लावणे, हेच योग्य. सुधीर मोघे हे प्रासादिक. लालित्यपूर्ण कवी म्हणून ज्ञात आहेत. मुखडाच बघा, संध्याकाळ सावळी असणे आणि त्यात सावळ्या रंगाची सावली दिसणे, हेच काव्यमय आहे. आता मुखडाच संध्याकाळ विषयी आल्यावर पुढील कविता त्याचाच विस्तार असणार, हे ओघानेच आले. दूर असलेली पर्वत शिखरे आणि त्यातून दिसणारी काजळाची रेघ, ही खास प्रतिमा मनावर रेंगाळते. किंबहुना "सावळ्या" शब्दाला अनुलक्षून कवितेत बऱ्याच प्रतिमा आहेत. मग, डोहांतले सावळे चांदणे किंवा श्यामरंगात बुडालेल्या पायवाटा इत्यादी प्रतिमा "सावळ्या" शब्दाशीच निगडित आहेत. कविता वाचताना निसर्गचित्र तर उभे राहतेच परंतु कवितेच्या शेवटी, "अंधाराला फुटलेला पान्हा" आणि त्याच्या जोडीने "सगळे विश्व कान्हारुपात समोर येणे" !! इथे संध्याकाळचे चित्र पूर्ण होते. एक कवी म्हणून सुधीर मोघ्यांचा विचार करायचा झाल्यास, कविता शक्यतो छंदात लिहिलेली आढळते मागतो छंद कुठलाही असू दे. हल्लीच्या मुक्त छंदाच्या वाटेल ते फारसे गेले नाहीत आणि याचे मुख्य कारण, त्यांच्या रचना प्राय: गीतधर्मी असल्याने, स्वरांचे बंधन पाळून केलेल्या वाचायला मिळतात. अर्थात आपल्याकडे अजूनही गीतकार नामक खालची पातळी तयार केली जाते आणि गीतकाराला तद्नुषंगाने, खालच्या पातळीत ठेवले जाते. याची अजिबात गरज नसते आणि याचा वैचारिक उहापोह होणे आवश्यक आहे. उर्दूतील बहुतेक रचना गीताच्या अंगाने लिहिलेल्या आहेत, अगदी गालिब,इक्बाल सारखे मान्यवर कवी घेतले तरी त्यांच्या रचनांतून गेयता हाच प्रधान गुण आढळतो पण तिथे त्यांना *शायर* असेच संबोधले जाते, त्यांना कुणी *गीतकार* अशा शेलक्या शब्दात सांभवना करत नाहीत. संगीतकार श्रीधर फडक्यांनी "पूर्वी" थाटातील राग (पुरियाकल्याण/पुरिया धनाश्री) समोर ठेऊन चालीचा आकृतिबंध तयार केला. खरतर ललित संगीतात रागाचे शुद्ध स्वरूप शोधावे का? हा मूलभूत प्रश्नच आहे म्हणा. मुळात संध्याकाळचे राग हे आपल्या मनाची लगेच पकड घेतात आणि इथे या गाण्याचा मुखडाच अतिशय लोभसवाण्या आलापीने सुरु होतो आणि आपण त्यातच गुंगून जातो. सांज ये गोकुळी, सावळी सावळी गम' ग गरेसासा, निनिम' म'रेग अंतरे मात्र त्याच सुरावटीत बांधले आहेत. गाण्याची लय मध्य लयीत ठेवल्याने आणि ताल सर्वव्यापी असा "दादरा" योजला असल्याने, कविता देखील गाणे ऐकता, ऐकता आस्वादता येते. वाद्यमेळ प्रामुख्याने संतूर/बासरीने तोलला आहे. एकूणच मनात चाल रुंजी घालते. वाद्यांचा माफक वापर असल्याने आशय गुदमरत नाही. एकूणच मराठीत भावसंगीतात फार पूर्वीपासून वाद्यांचा नेहमीच माफक वापर आढळतो. मराठी स्वररचनाकारांच्या मते, गाण्याची चाल महत्वाची!! चाल उत्कृष्ट असेल तर मग वाद्यमेळाचे इतके स्तोम माजवण्याचेकाहीच कारण नाही, असे मत बहुतेक रचनाकारांकडून ऐकायला मिळते. त्यातून *ऋतू हिरवा* मधील सगळीच गाणी खाजगी स्तरावरची म्हटल्यावर वाद्यांच्या वापरावर बंधने येणे क्रमप्राप्तच ठरते. अर्थात याची दुसरी बाजू देखील बाजूला टाकता येत नाही पण एकूणच हा विषय फार मोठ्या चर्चेचा होतो. वास्तविक वडील प्रख्यात गायक/संगीतकार तरीही या संगीतकाराने स्वतःची अशी स्वतंत्र वाट चोखाळली आणि आपले नाणे खणखणीत वाजवले. आपली स्वतःची शैली निर्माण करणे हे आणि संगीतकार म्हणून हे श्रेय श्रीधर फडक्यांचेच. येऱ्यागबाळ्याचे काम नाही. विलक्षण प्रज्ञा लागते आणि ती या संगीतकाराने वारंवार दाखवली आहे. गाणे ऐकताना, आपल्या सतत ध्यानात येते, ते संगीतकाराची काव्यविषयक जाण. असे सांगण्यात आले आहे की, या गाण्याची सुरावट आधी जन्माला आली आणि ती स्वररचना, कवी सुधीर मोघ्यांकडे पाठवली गेली. याचाच अर्थ, "आधी चाल, मग शब्द" अशी आधुनिक प्रथा स्वीकारली गेली. अर्थात आपण रसिकांच्या दृष्टीने "अंतिम परिणाम" महत्वाचा आणि तिथे हे गाणे अगदी चोख आहे. या रचनेचे गायन हा विषय तर खास वेगळा करावा लागेल. आशा भोसले यांचे परिपूर्ण गायन, अचूक शब्दोच्चार आणि जरूर आहे तिथेच हलके असे खटके, ही सौंदर्यस्थळे म्हणता येईल. सुरवातीलाच घेतलेला हुंकारात्मक आलाप, इतका अवघड आहे की त्याचे यथार्थ शब्दात वर्णन करणे अशक्य. "श्यामरंगात वाटा बुडाल्या" ही ओळ गाताना, "श्यामरंगात" इथे किंचित बारीक असा खटका आहे पण त्यामुळे कवितेतील ती प्रतिमा आपल्या मनावर ठसते. तसेच त्याच अंतऱ्याचा शेवट करताना, "पैल घंटा घुमे राउळी" मधील "घंटा" शब्द जितका स्पष्टपणे गायला जायला हवा, त्याच वजनाने गायला गेला आहे आणि त्या अंतऱ्याचा सगळा "तोल" सांभाळला गेला आहे. ही कामगिरी सहज जमणारी नाही. गाण्याच्या शेवटी "अमृताच्या जणू ओंजळी" गाताना जणू आपल्या ओंजळीतच हा स्वरांचा नजराणा पेश केला आहे, या थाटातच गायले आहे. त्या स्वरांतील आर्जव (आता ओंजळ म्हटल्यावर ते अध्याहृतच आहे) निव्वळ अप्रतिम आहे. आशाबाईंच्या आवाजाचा खूप दिवसांनी ज्याला *भोगवादी गायन* असे सार्थपणे म्हणता येईल, अशा प्रकारचे गायन ऐकायला मिळाले. गायकी ढंगाची स्वररचना आपण कशाप्रकारे खुलवून गाऊ शकतो, याचा एक सिद्धहस्त मानदंड त्यांनी पेश केला आहे. अर्थात इतके सगळे घटक एकजीव झाल्यावर निर्माण होणारी रचना ही काळावर आरूढ होऊन, आपल्या मनावर गारुड टाकणारी झाली तर त्यात नवल ते कुठले!! सांज ये गोकुळी, सावळी सावळी सावळ्याची जणू साउली धूळ उडवीत गाई निघाल्या श्यामरंगात वाटा बुडाल्या परतती त्यासवे पाखरांचे थवे पैल घंटा घुमे राउळी पर्वतांची दिसे दूर रांग काजळाची जणू दाट रेघ होई डोहातले चांदणे सावळे भोवती सावळ्या चाहुली माउली सांज, अंधार पान्हा विश्व सारे जणू होय कान्हा मंद वाऱ्यावरी वाहते बासरी अमृताच्या जणू ओंजळी

1 comment:

  1. सुंदर मलाहे श्रीधर फडके गातात तेही अतिशय आवडते शांत विलक्षण अनुभूती!

    ReplyDelete