Sunday 19 February 2023

गोलंदाजी - नयनरम्य सोहळा

केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगभर क्रिकेट खेळात फलंदाजाला जितके महत्व दिले जाते, कौतुक केले जाते त्याप्रमाणात गोलंदाजाला डावलले जाते. वास्तविक पहाता, गोलंदाजांनी २० बळी घेतल्याशिवाय सामना जिंकणे अशक्य! अशी स्थिती असूनही, फलंदाजाने षटकार मारल्यावर जे कौतुक प्राप्त होते, तिथे गोलंदाजाने त्रिफळा उडवल्यावर, कौतुक होते पण प्रमाण कमी असते. शतक लावल्यावर सामनावीर पारितोषिक मिळते पण त्याच सामन्यात १० किंवा जास्त बाली मिळवलेल्या गोलंदाजाला तितके झुकते माप मिळत नाही आणि अशा प्रकारचा दुजाभाव फार पूर्वीपासून चालत आला आहे. त्यामागे एक कारणमीमांसा केली जाते, फलंदाजाकडे कर्तृत्व दाखवायला एकच चेंडू असतो, तिथे जर काही दाखवले नाही तर सरळ पॅव्हेलियनची वाट पकडणे क्रमप्राप्त असते. गोलंदाजाकडे, समजा षटकार मारला तरी पुढील चेंडू टाकून बळी मिळवण्याची शक्यता अजमावता येते. अर्थात हा मुद्दा नजरेआड करणे अवघड आहे. क्रिकेट खेळ क्षणभंगुर ठरतो तो अशा क्षणांच्या वेळी. ताशी १५० च्या वेगाने चेंडू जेंव्हा अंगावर येतो तेंव्हा फलंदाजाकडे केवळ निमिष, इतकाच वेळ हाताशी असतो आणि त्याच वेळात निर्णय घ्यावा लागतो. निर्णय चुकला तर खेळ संपला. इतका हा खेळ क्रूर आहे. तेंव्हा फलंदाजीच्या कलेला थोडे झुकते माप मिळणे, अगदीच चुकीचे नसते. परंतु मी वर म्हटल्याप्रमाणे, २० बळी मिळवणे, हेच कुठल्याही विजयाचे इप्सित किंवा गमक असते. खेळपट्टी फलंदाजी धार्जिणी असली तर गोलंदाजीची होणारी कत्तल, निमूटपणे सहन करण्यावाचून काहीही करता येत नसते. अशा वेळी गोलंदाजी म्हणजे वेठबिगारी वाटते. थोडा विचार केल्यास, गोलंदाज व्हायचे असेल तर प्रचंड प्रमाणात घाम गाळणे, मनाची स्थिरता कायम ठेवणे तसेच चेंडू टाकणे म्हणजे रेम्याडोक्याचे काम नोहे, हे मनावर बिंबवणे होय. प्रत्येक चेंडूवर बळी मिळवण्याची आस मनात ठेऊनच गोलंदाजी करावी लागते. मनोनिग्रहाची कसोटी जितकी फलंदाजांची असते, तितकीच गोलंदाजांची देखील असते. टाकलेल्या चेंडूचा शेवट कसा आहे, हे त्याच्या हातात फारसे नसते, विशेषतः मंदगती गोलंदाजाच्या बाबतीत. चेंडू वळवलेला असतो पण त्याचे नेमके काय करायचे, हे समोरच्या फलंदाजाच्या हातात असते!! हा एक प्रकारचा जुगार असतो. असे फार थोडे मंदगती गोलंदाज झाले आहेत, त्यांनी निव्वळ मनगटी कलेच्या आधारावर फलंदाजांना भ्रांतचित्त करून सोडले आहे. अन्यथा वाट बघत बसणे, इतकेच बव्हंशी मंदगती गोलंदाजाच्या नशिबी असते. इथे मला "बेदी" आणि "प्रसन्ना" या जोडगोळीची आठवण आली. केवळ ३,४ पावलांची धाव आणि शेवटच्या क्षणापर्यंत समोरच्या फलंदाजाला कसाही चुणूक न दाखवता, त्याला गुंगारा द्यायचा आणि जाळ्यात पकडायचे!! हे असामान्य कौशल्य या दोघांकडे होते.असे नव्हे, हे दोघे एकाच प्रकारची गोलंदाजी करायचे. त्यांच्या भात्यात विविध अस्त्रे होती. कुठल्याही खेळपट्टीवर चेंडू वळवायची त्यांची ताकद निव्वळ बेमिसाल होती. चेंडू तरंगत टाकायचा आणि चेंडूचा टप्पा "फसवा" ठेवायचा!! तो इतका फसवा ठेवायची की समोरच्या फलंदाजाला शेवटपर्यंत, पाय पुढे टाकून खेळायचे की पाय मागे ठेऊन खेळायचे? हे समजू द्यायचे नाही. हे बघणे, हा नयनरम्य सोहळा असायचा. फलंदाजाला चकवा देण्यात हे दोन्ही गोलंदाज माहीर होते. ऑस्ट्रेलिया इथल्या खेळपट्ट्या सर्वसाधारपणे वेगवान गोलंदाजीला धार्जिण्या असताताई अशा खेळपट्टीवर तिथेच ३ सामन्यांच्या मालिकेत प्रसन्नाने २५ बळी मिळवले होते, अत्यंत खडूस अशा आयन चॅपल कडून त्याने मनापासूनची वाहवा मिळवली होती. तसेच बेदी, इंग्लंडच्या थंडगार हवामानात, तिथल्या फलंदाजांना आपल्या मनगटावर नाचवण्याची किमया घडवणारा किमयागार होता. दुर्दैव असे होते, त्यावेळी भारतीय फलंदाजी तितकी "सखोल" नव्हती,परिणामी बरेचवेळा या दोघांचे पराक्रम मातीमोल झाले. खेळपट्टी कशी असावी? गोलंदाजाला थोडी तरी पोषक असावी जेणेकरून फलंदाजाला, त्याच्या कौशल्याला आणि प्रयत्नांना पणाला लावणे जरुरीचे व्हावे. दोघांना आपले कौशल्य दाखवण्याची समसमान संधी मिळायला हवी, अशाचवेळी खऱ्याअर्थी क्रिकेट खेळाची मजा घेता येते एकतर्फीपणा निरस ठरतो. एकतर वेगवान गोलंदाजी ही नेहमीच शारीरिक परिश्रमाची प्रचंड मागणी करत असते. सततच्या खेळणे, सर्वात आधी दुखापतग्रस्त कुणी होत असेल तर, तो वेगवान गोलंदाज. सातत्याने प्रचंड ताकद लावून, वेगवान गोलंदाजी करणे, हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. त्यातून जेंव्हा फलंदाजाकडून mis time फटका बसून, चेंडू सीमारेषेबाहेर जाताना बघणे, हे त्रासदायक असते.वेगवान गोलंदाजी खेळणे, हा निमिषभराचाच खेळ असतो. टाकलेला चेंडू अंगावर शेकू शकतो, झेल जाऊ शकतो किंवा त्रिफळा उडू शकतो. टाकलेल्या चेंडूने यष्टी उडवली जाणे, यासारखे दुसरे सुख, वेगवान गोलंदाजाच्या नशिबात नसते. Cartwheeling बघणे, खरोखरच अनुपम सुख असते. नवीन चकचकीत चेंडू कसा उसळी घेईल,कितपत स्विंग होईल, याचा बरेचवेळा खुद्द गोलंदाला देखील पूर्ण अंदाज नसतो आणि फलंदाज तर थोडा भ्रांतचित्त असतो. त्यावेळचे द्वंद्व खरी, परीक्षा असते. अर्थात अशा वेळी मारलेला कव्हर ड्राइव्ह, डोळ्यांचे पारणे फेडत असतो, हे देखील तितकेच सत्य होय. हे साप-मुंगूस यांच्यातील युद्ध असते. एखादा लिली किंवा अँडी रॉबर्ट्स जेंव्हा चेंडू टाकत, तेंव्हा फलंदाजाला कायम दक्ष अवस्थेतच वावरायला लागायचे. येणार चेंडू कशा प्रकारचा असेल, किती स्विंग होणार असेल, याचा फक्त "अंदाज" बांधणे, इतकेच फलंदाजाच्या हातात असते. हवेत चेंडू स्विंग करणेआणि टप्पा पडल्यावर आणखी चेंडू स्विंग होणे, ही असामान्य ताकदीची कला आहे. तसेच वेगवेगळ्या वेगाचे बाउंसर्स टाकणे, अचानक "यॉर्कर" टाकून, फलंदाजांची भंबेरी उडवणे, ही वेगवान गोलंदाजाच्या भात्यातील प्रभावी अस्त्रे आहेत. फलंदाजांचा मनोनिग्रह आणि कस अशा वेळीच बघायला मिळतो. अचानक वेगात बदल करून, फलंदाजाला गंडवणे, ही उच्च प्रतीची कला आहे. विशेषतः इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया इथल्या वेगवान गोलंदाजी धार्जिण्या खेळपट्टीवर, म्हणूनच शतक लावणे, ही फलंदाजी कलेची उच्च श्रेणी ठरते. त्यातून अशा देशात, चेंडूची लकाकी बराच वेळ कायम असते, त्यामुळे फलंदाजाला उसंत मिळाली, असे फार कमी वेळा बघायला मिळते. वेगवान गोलंदाज नेहमीच आव्हान देत असतात. एखादा होल्डिंग किंवा थॉमसन सारखा गोलंदाज, अचानक sand shoe पद्धतीचा यॉर्कर टाकतात, तेंव्हा फलंदाजाला आपला त्रिफळा कधी उडाला, याचा पत्ताच लागत नाही. अर्थात अशा प्रकारचा चेंडू टाकायला, प्रचंड मेहनत घ्यावी लागते कारण जर का खोलवर अचूक टप्पा पडला नाही तर तो चेंडू "फुलटॉस" जातो आणि झणझणीत चौकार सहन करावा लागतो. एकूणच वेगवान गोलंदाजी ही क्रिकेट खेळाची खरी लज्जत आहे, खरे सौंदर्य आहे. खरतर टाकलेल्या चेंडूचा अंदाज घेऊन, तसाच विकेटकीपरकडे सोडून द्यायचा!! हा भाग देखील तितकाच विलोभनीय असतो. आपल्या सुनीलचा याबाबतीतला अंदाज निव्वळ थक्क करणारा होता. असे काही प्रसंग आठवत आहेत, जिथे द्वंद्व पराकोटीचे बघायला मिळाले आहे. एकदा वेस्टइंडिज इथे भारतीय संघ खेळायला गेला असताना, त्यावेळी मार्शल आग ओकत होता. मार्शलचा वेग म्हणजे तारांबळ नक्की, असेच सगळीकडे पसरलेले होते. अशाच एका सामन्यात, मार्शलचा चेंडू अचानक उसळला आणि सुनीलच्या कपाळावर आदळला!! बरोबर कपाळाच्या मध्यभागी आदळला!! वेडं पराकोटीच्या झाल्यास असणार परंतु ती वेदना सुनीलने मनातल्या मनात पचवली आणि पुढल्या चेंडूवर त्याने कचकचीत कव्हर ड्राइव्ह मारून चौकार मिळवला!! इथे मी खेळत आहे आणि मी इथला "बॉस" आहे, हे गर्जून सांगणारा तो क्षण होता. असाच आणखी एक प्रसंग आठवला. ऑस्ट्रेलियात वेस्टइंडीजचा संघ गेला होता, विव्ह रिचर्ड्सचा दबदबा जगभर पसरला होता. विव्ह नेहमीप्रमाणे हेल्मेट शिवाय खेळत असताना, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज, रॉडनी हॉग याने एक बाउन्सर टाकालाआणि विव्हचा अंदाज चुकला आणि डोक्यावर चेंडू शेकला. क्षणभर विव्ह दचकलाच!! असे फार कमी वेळा घडले पण कष्ट त्याने सावरून घेतले आणि पुढल्या चेंडूवर त्याने अफलातून षटकार मारला!! खच्चीकरण कसे करायचे असते, हे दर्शविण्यासाठी हे २ प्रसंग मी लिहिले परंतु यात मूळ मुद्दा असा, या दोन्ही गोलंदाजांनी, या फलंदाजांना आव्हान दिले, डिवचले आणि त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना चेव आला. असामान्यत्व इथेच सिद्ध होते. हे दोन्ही गोलंदाज जगभर धुमाकूळ घालणारे होते. अशी आणखी अनेक उदाहरणे देता येतील. यात गंमत अशी आहे, वेगवान गोलंदाजी अत्युच्च टप्प्यावर सुरु असताना, आपले तितकेच अत्युच्च कौशल्य दाखवले गेले. वेगवान गोलंदाज तगडा असला की असे प्रसंग बघायला मिळतात. दोन घ्यावे आणि दोन द्यावे, यात खरी या खेळाची लज्जत आहे. इथे एका क्षणी एखादा यशस्वी होतो पण त्याला यशस्वितेचा "फॉर्म्युला"सापडला असेच कधीच होत नसते.येणार प्रत्येक चेंडू हा एक आव्हान घेऊन येत असतो आणि त्या आव्हानाचा सामना करण्यातच फलंदाजाची असामान्य कसोटी असते. क्रिकेट खेळ उच्च प्रतीचा आनंद असाच देत असतो.

No comments:

Post a Comment