Sunday, 10 March 2024
पियू बोले,पिया बोले
आपल्याकडे एकूणच *नवनिर्मिती* या शब्दाबद्दल बरीच उत्सुकता दाखवली जाते. क्वचित शोध घेण्याचा प्रयत्न होतो, जो कधी विफल होतो तर कधी पूर्णत्वास जातो. मूळ मुद्दा असा आहे, विशेषतः *ललित* संगीतात, नवनिर्मिती म्हणून काही अस्तित्वात येते का? मूळात नवनिर्मिती म्हणून जे काही आपल्या समोर येते, त्यात सत्य किती आणि आभास किती? असे तर नव्हे, नवनिर्मितीच्या नावाने मोठ्या आवाजात ढोल बडवला जातो? निर्मितीच्या खोलात जायचे म्हणजे निर्मितीचा संपूर्ण आवाका जाणून घेऊन, त्याचा *तळ* गाठण्याचा प्रयत्न करणे होय. त्यासाठी शोधक वृत्ती आणि मनावर संयम ठेवणे गरजेचे असते. थोडक्यात, हा शोध घेणे, ही व्यापक बौध्दिक मागणी करते आणि बहुतेकवेळा त्याचीच वानवा आढळते. ललित संगीतात तर बरेचवेळा सावळागोंधळ बघायला मिळतो. एकतर, ललित संगीत हा देखील बौद्धिक आविष्कार असतो, हे समजून घेतले जात नाही. त्यामुळे आस्वाद गंभीर आणि वैचारिक परिभाषेत घेतला जात नाही.
आजचे आपले गाणे *पियू बोले, पिया बोले* हे गाणे ऐकताना, वरील मुद्दे विचारार्थ ठेवावेसे वाटतात. आता गाण्यातील कविता, हा मुद्दा विचारात घेतल्यास, रचनेतील *लय* लगेच ध्यानात येते. ललित संगीतातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, असे म्हणता येईल. योग्य जागी नेमके *खटके* येतात. परिणामी स्वररचना करताना, संगीतकाराला मोकळीक मिळते. काही ठिकाणी शब्दांची उलटापालट केलेली, वाचायला मिळते! अर्थात त्यामुळे वेगळा आशय हाती येत नाही. केवळ सांगितिक तडजोड असेच म्हणावे लागेल. कविता संवादात्मक आहे आणि प्राणी थाटाचे असल्याने, एकमेकांना *जाणून* घेण्याच्या इच्छेपोटी कवितेची धाटणी बांधलेली आहे. परिणामी, वाचायला सकस कविता, याची इच्छापूर्ती फारशी होत नाही. *थोड़ा वो घबराई, थोड़ा सा शरमाई, उछली यहाँ से वहाँ* सारखी ओळ उदाहरण म्हणून बघता येईल.
गाण्याची खरी खुमारी ही स्वरचनेत आहे. मी सुरवातीला नवनिर्मितीचा जो मुद्दा मांडला होता, त्याचे उदाहरण म्हणून याला गण्याचा निर्देश करता येईल. या गाण्याची मूळ चाल, रवींद्र संगीतातील *फ़ुले फ़ुले, डोले डोले* या गाण्यावर आधारित आहे. आता गाण्याचे मूळ स्थान मिळाले म्हणजे संगीतकार शांतनू मोईत्रा, यांची सर्जकता काहीही नाही, हा निष्कर्ष चुकीचा ठरेल. मी या बंगाली गाण्याची लिंक लेखाच्या शेवटाला देत आहे, जिज्ञासूंनीं ऐकावे. मूळ गाण्यावर आधारित आहे असे म्हटले तरीही संगीतकार म्हणून शांतनू मोईत्रा यांनी स्वतःचे योगदान निश्चितच दिलेले आहे. बंगाली गाण्याचा मुखडा साम्य दर्शवतो परंतु पुढील स्वररचना मात्र *स्वतंत्र* आहे तसेच वाद्यमेळ संपूर्ण वेगळा आहे. गाण्याची चाल *जयजयवंती* रागावर आधारलेली आहे. रागाचे स्वरूप बघता, *निसारेगमप* हे आरोही तर *सानि(को)धपमगरेग(को)रेसा* हे अवरोही स्वर मिळतात. अर्थात या स्वरांशी गाण्याच्या स्वररचनेचा ताळमेळ बघता,
*पियू /बोले / पिया बोले/ जानू /ना*
*सा नि(को)/सारे / रेग मग /सानि(को)/सा*
आता जरा बारकाईने ऐकल्यास, *कोमल निषाद* स्वराचे प्राबल्य ऐकायला मिळते. *जिया डोले, होलै होलै, क्या ये डोले जानू ना* ही ओळ देखील वरील स्वरावलीत बांधलेली आढळते आणि म्हणूनच पुनरुक्ती टाळली. खरतर गाण्याचा सुरवातीला जे *humming* आहे, तिथेच रागाची ओळख पटते. अर्थात पुढे मात्र रागाला बाजूला सारले आहे. नवसर्जकता ही ललित संगीतात अशा प्रकारे आढळते. सुरवातीला पियानो वाद्याचे स्वर ऐकायला मिळतात आणि तिथे पाश्चात्य कॉर्ड्स धर्तीची रचना ऐकायला मिळते. एकप्रकारचे *फ्युजन* म्हणता येईल. दुसरा मुद्दा ध्यानात घेतल्यास, गाण्यावर *रवींद्र संगीताची* दाट छाया पसरलेली आहे आणि याचे कारण बहुदा गाण्याच्या मूळ चालीत दडलेले आहे. गाण्याच्या वाद्यमेळात आधुनिकता दिसते तसेच एके ठिकाणी क्षणमात्र पाश्चात्य बॉल डान्सचे स्वर सुंदररीत्या मिसळले आहे. ही संगीतकाराची आधुनिक दृष्टी म्हणता येईल. स्वररचना म्हणुन स्वतंत्र विचार करायचा झाल्यास, गाणे सरळसोट चालत आहे, फारशा अनघड हरकती नाहीत तसेच अति बौद्धिक वक्रता नाही. एक शांत लय गाण्यात दरवळत आहे आणि तीच लय आपल्या मनाचा ठाव घेते वरती मी कवितेच्या संदर्भात *खटके*हा मुद्दा मांडला होता, त्याची प्रचिती गाणे ऐकताना मिळते. कुठे फारशी शाब्दिक ओढाताण नसल्याने आस्वादात कुठेही विक्षेप येत नाही. जुन्या सरंजामी वातावरणातील गाणे असल्याने, त्याचा थोडा प्रभाव जाणवतो.
सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी हे गीत गायले आहे. गायन म्हणून तसे फार काही टीकात्मक लिहिता येणार नाही. गायक म्हणून सोनू निगम, यांच्या गायनात एक दोष मात्र कायम आढळतो. शब्दांचा उच्चार करताना, नेहमी शब्दांवर अनावश्यक जोर देतो किंवा शब्दांचा *थ्रो* करताना किंचित ओठ दाबून करतो, या शंकेला वाव आहे. श्रेया घोषाल मात्र अप्रतिम. स्वरिक खटके, छोट्या हरकती, या मधून गायिकेच्या अभ्यासाची जाणीव होते. ललित संगीत हे नेहमीच शब्दप्रधान असल्याने, शब्दांचा स्वरांतून उच्चार करताना, शंकाचे औचित्य सांभाळणे अगत्याचे असते आणि इथे श्रेया घोषाल बाजी मारून जाते. जरी मी वरती सोनू निगम यांच्या गायनातील एक ठळक मुद्दा मांडला तरी देखील स्वरांतील सुरेलपणा निश्चितच वाखाणण्यासारखा असतो. त्यामुळे हे युगुलगीत अतिशय श्राव्य झाले आहे.
हल्लीच्या एकूणच गदारोळात, त्यामुळे हे गाणे ऐकणे, ही सांगीतिक मेजवानी ठरते.
पियु बोले, पिया बोले, क्या बोले जानू ना
जिया डोले, होलै होलै, क्या ये डोले जानू ना.
दिल की जो बांते, बांते जो दिल की है,
दिल में ही रखना पियु बोले, पिया बोले, क्या बोले जानू ना
जिया डोले, होलै होलै, क्या ये डोले जानू ना.या
लब तो ना खोलूँ मैं, खोलूँ ना लब तो पर
आँखों से सब कह दिया
पियू बोले,पिया बोले, क्या बोले जानू ना
जिया डोले, होलै होलै, क्या ये डोले जानू ना.या
एक नदी से मैंने पूछा इठलाके चल दी कहाँ
दूर तेरे पी का घर है, बलखाके चल दी कहाँ
थोड़ा वो घबराई, थोड़ा सा शरमाई, उछली यहाँ से वहाँ
सागर से मिलने का उसका तो सपना था, मेरी ही तरह पिया
जिया डोले, होलै होलै, क्या ये डोले जानू ना.या
पियू बोले,पिया बोले, क्या बोले जानू ना
मैंने पूछा एक घटा से, इतराके चल दी कहाँ
प्यास के भरी जमीं हैं, बरसो भी, तरसाओ ना
थोड़ा वो गुर्राई, थोड़ा सा थर्राई, गरजी यहाँ फिर वहाँ
प्रीत लुटाती फिर वो झमझमझम बरसी वो, तेरी ही तरह पिया
पियू बोले,पिया बोले, क्या बोले जानू ना
जिया डोले, होलै होलै, क्या ये डोले जानू ना.या
Piyu Bole | Parineeta | Saif Ali Khan & Vidya Balan | Sonu Nigam & Shreya Ghoshal (youtube.com)
Subscribe to:
Posts (Atom)