Sunday, 29 May 2022
फ्युजनसंगीत - किती आधुनिक, किती प्राचीन?
या विषयाला हात घालण्यापूर्वी थोडी फार पार्श्वभूमी बघणे आवश्यक ठरते आणि इथे फक्त भारतीय संगीत, इतकेच अभिप्रेत आहे. मुळात, भारतीय संगीताची (शास्त्रविरहित म्हणूया) सुरवात ही सामवेदातील *ऋचा गायन* इथून झाल्याचे बहुतेक शास्त्रकारात मेनी झालेले मत आहे. अर्थात त्याला शास्त्राचे अधिष्ठान प्राप्त झाले नव्हते, जे नारद मुनींनी *नाट्यशास्त्र* या ग्रंथातून प्राप्त करून दिल्याचे आढळते. आज आपण जे *सप्तक* आणि *श्रुती* म्हणून जे वापरतो, त्याचे शास्त्रशुद्ध लिखाण प्रस्तुत ग्रंथात सर्वप्रथम लिहिल्याचे आढळते. अर्थात त्या पूर्वी काही घडले असेल तर त्याचा *पुरावा* काही सापडलेला नाही त्यामुळे *अग्रपूजेचा* मान हा नि:संशयरीत्या नारद मुनींकडे जातो. वास्तविक या ग्रंथात केवळ एकच असा लेख आहे जो या विषयाची मांडणी करतो. पुढे, *अहोबल* किंवा *लोचन* या मुनींनी यथाशक्ती भर टाकली आहे परंतु ढाचा हाच कायम ठेवलेला आढळतो. या ढाच्याचा खरा विस्तार १२व्या शतकातील शारंगदेव मुनींनी *संगीत रत्नाकर* मध्ये केलेला आढळतो आणि आजही हा ग्रंथ *प्रमाणभूत* ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. इथेच *धृपद धमार* या गायनाचा विस्तार केलेला आढळतो. तसेच *शास्त्र* म्हणून प्रमाणबद्ध चिकित्सा केलेली वाचायला मिळते.
आता थोडे पुढे येऊ या. १५ व्या शतकात *अमीर खुसरो* अवतरले आणि त्यांनी *सतार* वाद्य आणि *ख्याल* गायनाची मांडणी केली असे सांगण्यात आले. इथे २ प्रवाद प्रसिद्ध आहेत. काही शास्त्रकारांचा प्रतिवाद असा आहे, जर का १५ व्या शतकात निर्मिती झाली तर मग पुढे १८ वे शतक उजाडेपर्यंत ही निर्मिती कुठे लुप्त झाली? पुढील ३ शतके, याचा कुठेच संदर्भ मिळत नाही!! हे कसे घडले? मुस्लिम राज्य तर देशभर पसरलेले होते तेंव्हा हे संगीत *लपवले* असे म्हणायला काहीच अर्थ नाही परंतु, एक बाब मान्य करायलाच हवी, सतार या वाद्याने भारतीय संगीतात आमूलाग्र बदल बदल घडून आला.
आता थोडा वेगळा विचार केला तर धृपद गायकीवरून ख्याल गायकीकडे वळणे, हे एक प्रकारचे *फ्युजन* म्हणायला हवे!! आता आपण विचारातील कोतेपणा बाजूला सारायला हवे कारण आज जे *फ्युजन* म्हणून ढोल वाजवला जातो, ते म्हणजे प्रमाणित संगीतापेक्षा वेगळे संगीत, असेच आपल्याला दिसून येईल.आजच्या फ्युजन संगीताचा *आराखडा* बारकाईने ऐकायला घेतल्यावर, माझे हे विधान पटू शकेल. मुळात *फ्युजन* म्हणजे संगीताचा नवीन आकृतिबंध निर्माण करणे होय. *नवनिर्मिती* ही कधीही संपूर्णपणे *नवीन* कधीही नसते तर त्यात कुठेतरी पारंपरिक निर्मितीचा संदर्भ हा प्रत्येक पायरीवर असतो.
लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे, आपण नेहमी *नवनिर्मिती* या शब्दाचा ढोल वाजवतो परंतु त्यातील *नव* आणि *निर्मिती* या दोन्ही शब्दांना बऱ्याच मर्यादा असतात. जसे आपण वर बघितले, धृपद धमार मधून त्याचा लालित्यपूर्ण आविष्कार म्हणजे ख्याल किंवा रागसंगीत होय. याच रागसंगीतातून पुढे अनेक स्वराविष्कार निर्माण झाले जसे मराठी रंगभूमीवरील संगीत!! आता जरा बारकाईने ऐकले तर मराठी नाट्यसंगीतात *ऑपेरा संगीत*(संगीत रंगभूमीची प्रेरणा मुळात ऑपेरा संगीतातून अण्णासाहेब किर्लोस्करांनी घेतली आहे) पुढे, *बैठकीची लावणी*, *ठुमरी* किंवा *दादरा* सारखे उपशास्त्रीय संगीत प्रकारातून सगळे प्रवाह आणले गेले आणि खुमासदार गायकी तयार झाली. अर्थात इथे सगळे गायन प्रकार घेतलेले नाहीत, फक्त काही उदाहरणे वानगीदाखल घेतली आहेत. आता विचार केला तर हे सगळे *फ्युजन संगीत* आहे. फक्त त्याला शास्त्रीय आणि लोकसंगीताचा भरभक्कम आधार दिला आहे. मुळात भारतीय लोकसंगीत हेच मूळ संगीत मानता येईल कारण त्याची खरी निर्मिती कुणी केली? या प्रश्नाचे उत्तर आजही अंधारात आहे.
आज जे *फ्युजन संगीत* म्हणून ढोल वाजवला जातो त्यात नक्की *सर्जनशीलता* किती आणि *Craftmanship* किती? याचा स्वतंत्रपणे विचार व्हायला हवा. खरंतर *भावगीत*, *चित्रपटगीत* किंवा *बारावरची लावणी* असे अनेक ललित संगीत आविष्कार हे *फ्युजन संगीत* आहेत. crafting तर सगळ्याच आविष्कारात आहे. केवळ सर्जनशीलता कलेसाठी उपयोगी नाही. निर्मिती करताना, त्याचे *गणित* हे मांडावेच लागते अन्यथा होणाऱ्या कलाकृतीला बांधेसूदपणा कधीही प्राप्त होणार नाही तेंव्हा हल्ली नेहमी *सर्जनशीलता* या शब्दाचा धोशा लाव ला जातो, तो देखील चुकीचाच आहे.
हिंदी चित्रपटसंगीतात या संगीताचा वारेमाप उपयोग केला जातो परंतु याच चित्रपट संगीतात, १९४० मध्ये जेंव्हा *पियानो*, *सेलो* सारखी पाश्चात्य वाद्ये आणून स्थिरावली तिथेच *फ्युजन संगीत* सिद्ध झाले. *व्हायोलिन* पाश्चात्य वाद्य आहे पण हे मुद्दामून सांगावे लागावे, इतके ते भारतीय संगीतात मिसळून गेले आहे. काही उदाहरणे देतो. *होटो पे ऐसी बात* सारखी *ज्वेल थीफ* चित्रपटातील गाणे किंवा *तुम जो मिल गये हो* सारखे *हसते जख्म* चित्रपटातील गाणे, ही फ्युजन संगीताची म्हणून अप्रतिम उदाहरणे देता येतील. याचा काळात, *ओ.पी. नैयर*,*सलील चौधरी* सारख्या अनेक संगीतकारांनी अशाच फ्युजन संगीताच्या रचनांनी हिंदी चित्रपटसंगीत ढंगदार केले पण तेंव्हा *फ्युजन* हा शब्दच अवतरलेला नव्हता.
इतके कशाला १९६७ साली *शिवकुमार शर्मा*, *हरिप्रसाद चौरासिया* आणि *ब्रिजभूषण काब्रा* यांची *Call of the Valley* ही संयुक्त निर्मिती याच संगीताचे द्योतक म्हणता येईल. अर्थात त्याच्याही पंडित रविशंकर यांनी सत्यजित रे यांच्या गाजलेल्या *पथेर पांचाली* या गीतविरहित चित्रपटासाठी ज्या स्वररचना केल्या आहेत, ते फ्युजन संगीत आहे. खरंतर सध्या बरेचवेळा *फ्युजन संगीत* जे समोर येते, ते म्हणजे एका सुंदर कल्पनेचा विचका असतो. जुन्या गाण्यांची नव्याने बांधणी करायला हरकत नाही पण तसे करताना, त्या गाण्यातील काव्य काय आहे? त्याची अनुभूती घेऊन, नवी बांधणी करणे गरजेचे असते. केवळ आफ्रिकन संगीताचे तुकडे टाकून आपणच आपली पाठ थोपटून घेणे, याला काही अर्थ नसतो. अर्थात त्यासाठी कवितेची अर्थपूर्ण जाण असणे, आवश्यक असते आई तिथेच निराशा पदरी पडते. नवीन Remix सगळेच वाईट असत नाही परंतु बव्हंशी कडबाच हाती येतो!!
Subscribe to:
Posts (Atom)