Monday, 23 November 2020
आप की याद आती रही रातभर
रसास्वादाची क्रिया कशी असते? जीवनातील प्रत्येक अनुभवाचा एक विशिष्ट गाभा असतो आणि तो अनुभव, मग तो जीवनातील कुठल्याही क्षेत्रातील असो, पूर्णांशाने घेता यावा यासाठी त्या गाभ्याचे स्वरूप नीट जाणून घ्यावे लागते. त्यालाच घट्ट चिकटून राहावे लागते. प्रत्येक अनुभव ही त्या दृष्टीने क्रीडाच असते, आणि अशा प्रत्येक क्रीडेला तिचे अंतर्गत नियम (Rules of the Game) असतात. ज्या प्रमाणात आपण अधिक अनुभव घेत जातो, त्या प्रमाणात आपली अनुभव यंत्रणा या निरनिराळ्या क्रीडा आणि त्यांचे नियम आपोआप जाणत असते., आत्मसात करीत असते. काहींची यंत्रणा अधिक सूक्ष्मपणे अंगीकारत असते. पण हे जीवनाच्या प्रत्येक अनुभवाबद्दल खरे आहे. हे जसे जीवनाच्या अनुभवांबद्दल खरे आहे तसेच ते कलेच्या रसास्वादाबद्दल खरे आहे. इथेच कलाकृतीच्या रसास्वादाचा पाया *स्वानुभव* हाच असतो. There is no appreciation of art or literature by Proxy. म्हणूनच अनुभव हा अनुभव असतो आणि म्हणून एका मर्यादित अर्थाने सत्य असतो. आपल्याला काही गाणी आवडतात पण तीच गाणी नावडणारी माणसे आपल्या आजूबाजूला नेहमीच असतात. रसास्वाद हा जेंव्हा आपण स्वतः घेतलेला अनुभव आणि स्वतःशीच ठेवलेला अनुभव या पातळीवरून दुसऱ्या कुणाशी तरी केलेल्या संवाद या पातळीवर येतो तेंव्हा त्याची खऱ्याअर्थी *अनुभूती* मिळते!! आपल्या आवडत्या गाण्याबाबत हाच दृष्टीकोन बव्हंशी अस्तित्वात असतो आणि हाच विचार स्थूल स्वरूपात आजच्या गाण्यातून बघायचा प्रयत्न करू.
*मखदूम मोईउद्दीन* या प्रख्यात उर्दू शायराने या चित्रपटाला गीते पुरवली आहेत. संगीतकार जयदेव यांनी आयुष्यभर शायराच्या शब्दांना न्याय दिला कारण त्यांना सक्षम शायरी मिळाल्याखेरीज चाल बांधायचे सुचत नसे असेच वाटते. गाण्याचे ध्रुवपद वाचायला घेतल्यावर लगेच दुसऱ्या ओळीची सुरवात "चष्म - ए - नम मुस्कुराती" या शब्दांनी होते आणि उर्दू भाषेची चुणूक वाचायला मिळते. गझल वृत्तात शायरी लिहिली आहे. अर्थात गझल वृत्ताची जी ठळक वैशिष्ट्ये असतात, टी सगळी या कवितेत दिसून अली आहेत. तरीही तिसऱ्या अंतऱ्यात "याद की चाँद दिल में उतरती रही" सारखी ढोबळ शब्दकळा काहीशी खटकू शकते. चित्रपटासाठी केलेली शब्दरचना आहे, हे ध्यानात घेतले तरी संपूर्ण कवितेचा आवाका आणि दर्जा बघितल्यास अशी भावना मनात येते. "कोई दिवाना गलियों में फिराता रहा" ही ओळ मात्र चित्रपटाच्या एकूणच कथेच्या संदर्भात नेमकी आणि अचूक व्यथा सांगणारी ओळ आहे. इथे शायरने चित्रपटाचे मर्म जाणले आहे. "रात भर दर्द की शमा जलती रही, गम की लौ थरथराती रही रातभर" या ओळी जरी उर्दू शायरीत वारंवार वाचायला मिळतात तरी देखील चित्रपटीय मागणीनुरूप चपखल बसलेल्या आहेत. एक मजेशीर गंमत आठवली. १९६६ साली आलेल्या "ममता" चित्रपटातील एका गाण्यात शायर मजरुह यांनी लिहिलेल्या "छुपा लो यूं दिल में प्यार मेरा" या गाण्याच्या दुसऱ्या चरणात "के जैसे मंदिर में लौ दिये के" अशा संपूर्ण वेगळ्या आशयाच्या संदर्भात "लौ" शब्द वापरला आहे. दोन्ही प्रसंग संपूर्णपणे वेगळे तरीही एकच शब्द परंतु वेगळ्या आशयाच्या स्वरूपात आपली समोर येतो इतकेच मला म्हणायचे आहे.
संगीतकार जयदेव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नवोदित गायकांना, गायनाची संधी दिली आणि त्यांना प्रकाशात आणले, जसे हरिहरन, सुरेश वाडकर किंवा छाया गांगुली. छाया गांगुली तर, हे गाणे प्रकाशात येण्याआधी फारशी कुणाला माहितीच नव्हती. "गमन' सारखा नवी वाट चोखाळणारा चित्रपट, अशा चित्रपटातील "आप की याद आती रही" हे गाणे भैरवी रागातील, एक अनुपमेय रचना म्हणून गणली जाते.
निखळ रचना म्हणून जरी या गाण्याचा विचार केला तरी हे गाणे फार वेगळ्या ढंगाचे आहे. एकतर रचना, ठराविक साच्यात बसणारी नाही. सुरवात फक्त आलापीमध्ये गायन तर मधेच वाद्यमेळ फार वेगळ्या अंगाने वाजलेला. आता भैरवीचाच विचार करायचा झाल्यास, "आप की याद" या ओळींच्या सुरांतून नेमके सूचन होते. गाण्यात, मध्येच अतिशय गुंतागुंतीच्या रचना आहेत तसेच गायन देखील त्याच अंगाने गेलेले आहे. गाण्यातील ताल देखील तसा खास "उठावदार" नसून, गायकीला पूरक इतपतच तालाचे अस्तित्व आहे. याचा परिणाम असा झाला, गाण्यात गायनाला अपरिमित महत्व मिळाले. खरतर जयदेव यांच्या बहुतेक सगळ्या गाण्यांत, वाद्यांचा नेहमीच नाममात्र वापर असतो. थोडे बारकाईने ऐकले तर आपल्याला समजून घेत येईल, मोजक्याच वाद्यातून चालीची अर्थपूर्णता आणि शब्दांचा आशय अधिक अंतर्मुखतेने सादर केलेला आढळून येतो. या गाण्यात, जेंव्हा सुरवातीला ताल विरहित गायन चालू असताना, या कौशल्याची प्रचीती आपल्याला नेमकेपणाने घेता येते.
गीतास रागाधार असावा पण गीत रागात नसावे, या पंथाचे, जयदेव हे संगीतकार आहेत. प्रस्तुत गाण्यात, याच वाक्याचा प्रत्यय आपल्याला घेता येतो. भैरवी रागाचे सूर ऐकायला येतात, जाणवतात पण गाणे भैरवीपासून वेगळे होते आणि मुख्य म्हणजे "गाणे" म्हणून सादर होते. बरेचवेळा इष्ट ते चमकदार वा भरून टाकणारे सुरावटींचे परिणाम देखील जयदेवांनी वेचक वाद्यांच्या सहाय्याने साधले आहे. इथे आपल्याला बासरी वाद्याने साधलेला इष्ट परिणाम ऐकायला मिळतो. गीताचा लयबंध यामुळे पुढे सरकत असला तरी तो गीतास बळजबरीने पुढे ढकलतो आहे, असे अजिबात दिसत नाही आणि, संगीतकार म्हणून जयदेव इथे फार वेगळे होतात. आणखी खास वैशिष्ट्य लिहायचे झाल्यास, साधे, मधुर आणि तसे पहाता परिचयाचे, बारकाव्यांनी भरलेले व विस्तारशक्यता असलेले संगीतवाक्यांश त्यांना सहज सुचत असत. बरेच रचनाकार नेहमी म्हणतात, मुखडा सुचण्यातच खरी प्रतिभा लागते. नंतर सगळे बांधकामच असते आणि हे जर मान्य केले तर जयदेव फार मोठे कारागीर ठरतात.
आता या गाण्याचा स्वररचना म्हणून स्वतंत्र विचार केल्यास, मुखड्याची पहिलीच ओळ फार वैशिष्ट्यपूर्ण बांधली आहे. "आप की याद" गाताना "की" अक्षर जरा लांबवले आहे आणि लय अवघड करून ठेवली आहे!! अंतरे बांधताना स्वरांची उठावण आणि त्याला छोट्या हरकतींची जोड दिलेली असल्याने गायला एकूणच कठीण होऊन बसते. मी वरील परिच्छेदात जे लिहिले आहे - परिचयाचे आणि अनेक बारकाव्यांनी भरलेले संगीतवाक्यांश, या विधानाचा नेमका परिचय इथे आपल्याला मिळतो. सूर ओळखीचे आहेत परंतु त्याला हरकतींची जोड दिल्याने अनेक बारकावे सिद्ध होतात. वाद्यमेळ अगदी मोजका आहे परंतु प्रत्येक वाद्य आपली "ओळख" घेऊन अवतरते. अर्थातच बासरी आणि सरोद वाद्ये प्रमुख आहेत. आणखी एक बाब नजरेस आणावीशी वाटते. गझल मधील शेवटचा शब्द "रातभर" शब्द प्रत्येक वेळी अतिशय वेगळ्या अंगाने घेतला आहे, परिणामी चालीत पुनरुक्त परिणाम आढळत नाही.
गायिका छाया गांगुली तर आजही याच गाण्याने प्रामुख्याने ओळखल्या जातात. गायिका म्हणून विचार केला तर शब्दोच्चार करताना काही ठिकाणी "बंगाली गोलाई" ऐकायला मिळते पण जर का बारकाईने ऐकले तरच. परंतु एकूण गायन अर्थानुसारी झाले आहे. छाया गांगुली यांचा आवाज रागदारी संगीताची तालीम घेऊन किंवा मेहनत करून रुंद वा जड झालेला वाटत नाही. त्यांच्या आवाजात एक प्रकारचा किंचितसा कंप आहे आणि बहुदा यामुळेच गायन भावपूर्ण आणि परिणामकारक झाले. मघाशी मी "बंगाली गोलाई" जे म्हटले त्या दृष्टीने बघायचे झाल्यास, पुन्हा एकदा "रातभर" शब्द गाताना शेवटचा स्वरवर्ण लांबण्याची प्रवृत्ती दिसते. अर्थात हे संगीतकार जयदेव यांच्या सांगण्यानुसार झाले असावे. गाण्यात कारुण्य आणि शोकभाव पसरलेला आहे पण ते सगळे दबलेल्या सुरांतून व्यक्त होते. संगीतकार जयदेव यांच्या रचना नेहमीच "गायकी" अंगाने विस्तारात असतात आणि हे वैशिष्ट्य ध्यानात घेऊन, "बांसुरी की सुरीली सुहानी सदा" ही ओळ ऐकण्यासारखी आहे. शब्दांना योग्य असा बासरी वाद्याने सूर पुरवत असताना, गायिका आपले स्वरिक अस्तित्व ठळकपणे दाखवून देते.
एकूणच गाणे काहीसे "अनघड" पद्धतीचे आहे पण तरीही बुद्धीला खाद्य पुरवणारे आहे. या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, हा काही योगायोग नव्हे.
आप की याद आती रही रातभर
चष्म - ए - नम मुस्कुराती रही रातभर
रात भर दर्द की शम्मा जलती रही
गम की लौ थरथराती रही रातभर
बांसुरी की सुरीली सुहानी सदा
याद बन बनके आता रही रातभर
याद की चाँद दिल में उतरती रही
चांदनी डगमगाती रही रातभर
कोई दिवाना गलियों में फिराता रहा
कोई आवाझ आता रही रातभर
(29) Aap Ki Yaad Aati Rahi Raat Bhar -Mehmoodl - manojphulwaria - YouTube.FLV - YouTube
Subscribe to:
Posts (Atom)